Monday, June 28, 2021

Dnyaneshwari Adhyay 8 Part 9 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ८ भाग ९

 

Dnyaneshwari 
Adhyay 8 Part 9 
Ovya 220 to 237 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ८ भाग ९ 
ओव्या २२० ते २३७
मूळ श्लोक
अग्निर्ज्योतिरहः शुक्लः षण्मासा उत्तरायणम् ।
तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः ॥ २४ ॥
२४) ( आंत ) अग्नि व ज्योतीचा प्रकाश, ( बाहेर ) दिवस,  शुक्लपक्ष आणि उत्तरायणाचे सहा महिने, यांच्या ठिकाणीं ( या स्थितींत ) ज्यांचें देहावसान होतें, ते ब्रह्मवेत्ते जन ब्रह्माप्रत जातात.   
आंत अग्निज्योतींचा प्रकाशु । बाहेरी शुक्लपक्षु परी दिवसु ।
आणि सामासांमाजीं मासु । उत्तरयण ॥ २२० ॥
२२०) देहांत अग्नीचा व ज्योतीचा प्रकाश असून, बाहेर शुक्लपक्ष परंतु दिवस, आणि उत्तरायणांतील सहा महिन्यांपैकी एक महिना,    
ऐसिया समायोगाची निरुती । लाहोनि जे देह ठेवती ।
ते ब्रह्मविद होती । परब्रह्म ॥ २२१ ॥
२२१) अशा या चांगल्या जुळून आलेल्या योगांची प्राप्ति होऊन, जे योगी आपला देह सोडतात, ते ब्रह्मवेत्ते परब्रह्म होतात.  
अवधारीं गा धनुर्धरा । येथवरी सामर्थ्य यया अवसरा ।
तेवींचि हा उजू मार्ग स्वपुरा । यावयासी ॥ २२२ ॥
२२२) अर्जुना, ऐक. या कालाचें येथपर्यंत सामर्थ्य आहे आणि त्याचप्रमाणें आत्मस्वरुपाकडे येण्यास हा सरळ मार्ग आहे.  
एथ अग्नी हें पहिलें पायतरें । ज्योतिर्मय हें दुसरें ।  
दिवस जाणें तिसरें । चौथें शुक्लपक्ष ॥ २२३ ॥
२२३) येथें अग्नि ही पहिली पायरी आहे. ज्योतीचें स्वरुप ही पायरी दुसरी आहे, दिवस ही तिसरी पायरी आणि शुक्लपक्ष ही चौथी पायरी असें समज. 
आणि सामास उत्तरायण । तें वरचील गा सोपान ।
येणें सायुज्यसिद्धिसदन । पावती योगी ॥ २२४ ॥
२२४) आणि उत्तरायणांतील सहा महिने ही वरची पायरी आहे. या मार्गानें योगी तद्रूपता सिद्धीच्या वराला येतात.
हा उत्तम काळु जाणिजे । यातें अर्चिरा मार्गु म्हणिजे ।
आतां अकाळु तोही सहजें । सांगेन आईक ॥ २२५ ॥ 
२२५) हा उत्तम काळ आहे, असें समज. याला अर्चिरादि मार्ग म्हणावें. आतां अकाळ जो आहे. तोहि ओघानें सांगतो. ऐक.    
मूळ श्लोक
धूमो रात्रिस्तथा कृष्णः षण्मासा उत्तरायणम् ।
तत्र चान्द्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते ॥ २५ ॥
२५) ( आंत ) धूर ( धूमयुक्त अग्नि ), त्याप्रमाणें ( बाहेर ) रात्र, कृष्ण पक्ष आणि दक्षिणायनाचे सहा महिने, या स्थितींत ( ज्याचें देहावसान होतें तो ) योगी चंद्रलोकापर्यंत जाऊन परत येतो.  
तरी प्रयाणाचेनि अवसरें । वातुश्र्लेष्मु सुभरे ।
तेणें अंतःकरणी आंधारें । कोंदलें ठाके ॥ २२६ ॥
२२६) तरी मरणाच्या वेळीं वात व कफ ( शरीरामध्यें ) फार दाटतो, त्यामुळें अंतःकरणांत अंधार गच्च भरुन राहतो. 
सर्वेंद्रियां लांकूड पडे । स्मृति भ्रमामाजीं बुडे ।
मन होय वेडें । कोंडे प्राण ॥ २२७ ॥
२२७) सर्व इंद्रियें लांकडासारखीं जड होतात, स्मरणशक्ति भ्रमांत बुडते, मन वेडें होतें व प्राण कोंडतो.   
अग्नीचें अग्निपण जाये । मग तो धूमचि अवघा होये ।
तेणें चेतना गिंवसली ठाये । शरीरींची ॥ २२८ ॥ 
२२८) अग्नीची उष्णता जाते, मग सर्व धूरच होतो, त्या धूरानें चेतना शरीरांत कोंडून राहते. 
जैसे चंद्राआड आभाळ । सदट दाटे सजळ ।
मग गडद ना उजाळ । ऐसें झांवळें होय ॥ २२९ ॥
२२९) ज्याप्रमाणें पाण्यानें भरगच्च भरलेले ढग चंद्राच्या आड दाट यावेत, मग त्या वेळीं गडद अंधकारहि नाहीं आणि स्वच्छ उजेडहि नाहीं, असा झुंजुमुंजु उजेड असतो.  
कां मरे ना सावध । ऐसें जीवितासि पडे स्तब्ध ।
आयुष्य मरणाची मर्याद । वेळु ठाकी ॥ २३० ॥
२३०) याप्रमाणें तो धड मेलेला नसतो व शुद्धीवरहि नसतो अशी जीवितास स्तब्धता येते आणि मरणाच्या वेळेची वाट पाहात राहतें,  
ऐसी मनबुद्धिकरणीं । सभोंवतीं धूमाकुळाची कोंडणी ।
जेथ जन्में जोडलिये वाहणी । युगचि बुडे ॥ २३१ ॥
२३१) याप्रमाणें मन, बुद्धि व इंद्रियें यांच्या सभोंवती अशी ही धुराच्या समुदायाची वांटणी होते, तेव्हां जन्मभर संपादन केलेला स्वरुपअभ्यासाचा मार्ग संपूर्ण नष्ट होतो. 
हां गा हातींचें जे वेळीं जाये । ते वेळीं आणिका लाभाची गोठी कें आहे ।
म्हणऊनि प्रयाणीं तंव होये । येतुली दशा ॥ २३२ ॥
२३२) बाबा अर्जुना, जन्मभर केलेला हातचा अभ्यास जेव्हां जातो त्या वेळीं आणखी प्राप्तीची गोष्ट कशाला मनांत आणावयाला पाहिजे ? म्हणून मरणकाळी तर अशी अवस्था होते. 
आणि देहाआंतु ऐसी स्थिती । बाहेरी कृष्णपक्षु वरि राति ।
आणि सामासही ते वोडवती । दक्षिणायन ॥ २३३ ॥
२३३) अशी ही देहाच्या आंत स्थिती होऊन, बाहेर वद्य पंधरवडा, शिवाय रात्र आणि दक्षिणायनांतील सहा महिने येतात. 
इये पुनरावृत्तीचीं घराणीं । आघवीं एकवटती जयाचिया प्रयाणीं ।
तो स्वरुपसिद्धिची काहाणी । कैसेनि आइके ॥ २३४ ॥
२३४) ही वारंवार फेर्‍यांत आणणारीं ठिकाणें, ज्याच्या मरणाच्या वेळेला सर्वच एकत्र जुळुन येतात, तो ब्रह्मप्राप्तीची गोष्ट कशी ऐकेल ?   
ऐसा जयाचा देह पडे । तया योगी म्हणोनि चंद्रवरी जाणें घडे ।
मग तेथूनि मागुता बहुडे । संसारा ये ॥ २३५ ॥
२३५) अशा रीतीनें ज्याचा देह पडतो, तो योगी असल्याकारणानें त्याचें चंद्रलोकापर्यंत जाणें घडतें. नंतर तेथून तो माघारा फिरुन पुनः मृत्युलोकांत जन्मास येतो.  
आम्हीं अकाळु जो पांडवा । म्हणितला तो हा जाणावा ।
आणि हाचि धूम्रमार्गु गांवा । पुनरावृत्तीचिया ॥ २३६ ॥
२३६) अर्जुना, आम्ही अकाळ म्हणून जो म्हटला, तो हाच, असें समज आणि हाच पुनर्जन्मरुप गांवास येण्याचा धूम्रमार्ग आहे. 
येर तो अर्चिरा मार्गु । तो वसता आणि असलगु । 
साविया स्वस्त चांगु । निवृत्तीवरी ॥ २३७ ॥
२३७) दुसरा जो अर्चिरादि मार्ग, तो वाहता आणि सुगम आहे; आणि तो सहज कल्याणकारक असून मोक्षाची प्राप्ति करुन देण्यास चांगला आहे.



Custom Search

No comments: