Monday, June 28, 2021

Dnyaneshwar Adhyay 8 Part 10 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ८ भाग १०

 

Dnyaneshwari
Adhyay 8 Part 10 
Ovya 238 to 260 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ८ भाग १० 
ओव्या २३८ ते २६०
मूळ श्लोक
शुक्लकृष्णे गती होते जगतः शाश्र्वते मते ।
एकया यात्यनावृत्तिमन्ययवर्तते पुनः ॥ २६ ॥
२६) जगाचें प्रकाशरुप आणि अंधकाररुप ( म्हणजे अर्चिरादि आणि धूम्र ) असे हे दोन मार्ग नित्य आहेत. पहिल्या मार्गानें मनुष्य पुनः जन्माला येत नाहीं, पण दुसर्‍यानें पुनः जन्म पावतो.  
ऐसिया अनादि या दोन्ही वाटा । एकी उजू एकी अव्हांटा ।
म्हणऊनि बुद्धिपूर्वक सुभटा । दाविलिया तुज ॥ २३८ ॥
२३८) हे अर्जुना, अशा या अनादि कालापासून चालत असलेल्या दोन्ही वाटा आहेत. त्यांपैकीं एक सरळ व एक आडमार्गाची आहे. म्हणून तुला या दोन्ही वाटा मुद्दाम दाखविल्या आहेत. 
कां जे मार्गामार्ग देखावे । साच लटिकें वोळखावें ।
हिताहित जाणावें । हिताचिलागीं ॥ २३९ ॥
२३९) कारण कीं, आपल्या हिताकरितां योग्य-अयोग्य मार्ग पाहावे, खरें-खोटें ओळकावें आणि आपलें हित कशांत आहे व अनहित कशांत आहे, हे समजून घ्यावें.
पाहें पां नाव देखतां बरवी । कोणी आड घाली काय अथावीं ।
कां सुपंथ जाणोनिया अडवीं । रिगवत असे ॥ २४० ॥
२४०) असें पाहा कीं, चांगली नाव डोळ्यांपुढें दिसत असून ( तीमध्यें न बसतां ) कोणी अथांग पाण्यांत उडी घालील काय ? अथवा राजमार्ग  माहीत असून, कोणी आडरानांत शिरेल काय ?
जो विष अमृत वोळखे । तो अमृत काय सांडू शके । 
तेविं जो उजू वाट देखे । तो अव्हांटा न वचे ॥ २४१ ॥
२४१) विष व अमृत ही जो ओळखतो, त्याच्यानें अमृत टाकवेल काय ? त्याचप्रमाणें जो सरळ मार्ग जाणतो, तो आडमार्गाला जाणार नाहीं.
म्हणोनि फुडें । पारखावें खरें कुडें ।
पारखिलें तरी न पडे । अनवसरें कही ॥ २४२ ॥
२४२) म्हणून खरें व खोटें, याची चांगली परीक्षा करावी. अशी परीक्षा केली असतां कधींहि अनुचित होणार नाही, ( अकाली देह पडणार नाहीं )
एर्‍हवीं देहांतीं थोर विषम । या मार्गाचें आहे संभ्रम ।
जन्में अभ्यासिलियाचें हन काम । जाईल वायां ॥ २४३ ॥
२४३) तसें केलें नाहीं तर मरणकाळीं या भ्रांतिकारक धूम्रमार्गाचें मोठे संकट आहे कीं, जन्मभर ज्या हेतूनें अभ्यास केला तो हेतु व्यर्थ जाईल. 
जरी अर्चिरा मार्गु चुकलिया । अवचटे धूम्रपंथें पडलिया ।
तरी संसारपांतीं जुंतलिया । भंवतचि असावें ॥ २४४ ॥
२४४) अर्चिरादि मार्ग चुकून, अकस्मात् जर धूम्रमार्गांत ( शरीर ) पडलें, तर संसाराच्या पातीला जुंपलें जाऊन फिरतच राहावें लागेल.
हे सायास देखोनि मोठे । आतां कैसेनि पां एकवेळ फिटे ।
म्हणोनि योगमार्ग गोमटे । शोधले दोन्ही ॥ २४५ ॥
२४५) हे ( पुनः पुन्हा जन्ममरणाचें ), मोठे सायास पाहून आतां हे सायास कशानें एकवार दूर होतील ( हें पाहावें ) म्हणून हे दोन्ही योगमार्ग नीट रीतीनें दाखविले. 
तंव एकें ब्रह्मत्वा जाइजे । आणि एकें पुनरावृत्ती येइजे ।
परि दैवगत्या जो लाहिजे । देहांतीं जेणें ॥ २४६ ॥
२४६) तर पहिल्या मार्गानें ( अर्चिरादि मार्गानें ) ब्रह्मत्वास जातां येते, आणि ( दुसर्‍या धूम्रमार्गानें ) पुनर्जन्माला येणें होतें. परंतु प्रारब्धानें मरणकाळीं ज्याला जो मार्ग वाट्याला येईल, ( त्याला त्या मार्गाने गति मिळेल ).
मूळ श्लोक
नैते सृती पार्थ जानन्योगी मुह्यति कश्र्चन ।
तस्मत्सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन ॥ २७ ॥ 
२७) हे पार्था, हे दोन मार्ग जाणणारा कोणताहि योगी मोह पावत नाही. म्हणून अर्जुना, तू सर्वकाळी योगयुक्त हो.  
ते वेळीं म्हणितलें हें नव्हे । वायां अवचटें काय पा
वे ।
देह जाऊनि वस्तु होआवे । मार्गेंचि कीं ॥ २४७ ॥
२४७) ( मरणकाळी अर्चिरादि मार्ग वाट्याला येतो का धूमर्माग वाट्याला येतो, हें अनिश्र्चित आहे. असे पाहून अर्जुन खिन्न झाला. ) त्यावेळीं ( भगवंत ) म्हणाले, देह जाऊन अर्चिरादि मार्गाने ब्रह्म होईल हे व्यर्थ आहे; कारण प्रारब्धवशात् अकस्मात् काय प्राप्त होईल कोणास ठाऊक ? ( तें कळत नाही. )  म्हणून हे नको. 
तरी आतां देह असो अथवा जावो । वस्तूचि आम्ही तों केवळ आहों ।
कां जे दोरीं सर्पत्व वावो । दोराचिकडुनि ॥ २४८ ॥
२४८) तर आता देह असो अथवा जावो. आम्ही तर केवळ ( ब्रह्मच ) आहोत. कारण की असें दोरीवर भासलेला सर्पपणा दोरीच्या दृष्टीनें मिथ्या आहे.    
मज तरंगपण असे का नसे । ऐसें हें उदकासी कहीं प्रतिभासे।
तें भलतेव्हां जैसें तैसें । उदकाचि कीं ॥ २४९ ॥
२४९) मला तरंगपणा आहे किंवा नाहीं, असें पाण्याला केव्हांतरी वाटते काय ? तें वाटेल तेव्हां पाणी जसेंच्या तसे पाणीच असतें.
तरंगाकारें न जन्मेचि । ना तरंगलोपें न निमेचि । 
तेविं देहीं जे देहेंचि । वस्तु जाहले ॥ २५० ॥
२५०) लाटेच्या व्यक्त होण्यानें पाणी जन्मत नाही. अथवा लाट नााहीशीं झाली तरी तें पाणी मरत नाहीं. त्याप्रमाणें जे देहवान् असतांना देहानेंच ब्रह्म झाले.  
आतां शरीराचें तयाचिया ठाईं । आडनांवही उरले नाहीं ।
तरी कोणें काळें काई । निमे तें पाहें पां ॥ २५१ ॥
२५१) आतां त्या तत्ववेत्त्यांच्या ठिकाणी शरीराचें आडनांवहि उरले नाहीं. तर बाबा अर्जुना, असा विचार कर कीं, कोणत्या काळी काय नाश पावणार आहे ? 
मग मार्ग तैं कायसा शोधावे । कोणें कोठूनि कें जावें ।
जरी देशकालादि आघवें । आपणचि असिजे ॥ २५२ ॥
२५२) जर सर्व देश व काल आपणच आहोंत, तर मग हे अर्चिरादि व धूम्रमार्ग हे कशाला शोधावे ? आणि अणि कोणी शोधून कोठे जावयाचें ?   
आणि हां गा घटु जे वेळीं फुटे । ते वेळीं तेथिंचे आकाश लागे नीटे वाटे ।
वाटा लागे तरि गगना भेटे । एर्‍हवी चुके ॥ २५३ ॥
२५३) आणि अरे अर्जुना, घटज्या वेळेला फुटतो, त्या वेळीं घटांतील आकाश नीट वाटेला लागतें व नीट वाटेला लागलें तर महाआकाशाला तें नेमके मिळतें, नाहीं तर ( एर्‍हवीं ) हे महाकाश तें महाकाशाला मिळावयाचें चुकेल काय ?     
पाहें पां ऐसें हन आहे । कीं तो आकारचि म्हणों जाये ।
येर गगन तें गगनींचि आहे । घटत्वाहि आधीं ॥ २५४ ॥
२५४) आम्हीं म्हणतो असें आहे; पाहा कीं घटाचा आकारच ( फक्त ) नाहींसा होतो. वास्तवीक पाहिलें तर घटपणाच्या आधींहि ( त्यांतील ) आकाश आकाशाच्या ठिकाणींच आहे. 
ऐसिया बोधाचेनि सुरवाडें । मार्गामार्गाचें सांकडें ।
तयां सोऽहंसिद्धा न पडे । योगियांसी ॥ २५५ ॥
२५५) अशा या बोधाच्या अनुकूलतेने मार्गामार्गाचे संकट, ' मी ब्रह्म आहे ' असें ज्ञान झालेल्या त्या योग्यांना पडत नाहीं.    
याकारणें पंडुसुता । तुवां होआवें योगयुक्ता । 
येतुलेनि सर्वकालीं साम्यता । आपणपां होईल ॥ २५६ ॥
२५६) अर्जुना, म्हणून तूं योगसंपन्न हो, एवढ्यानें स्वतःच्या ठिकाणीं सर्व काळ स्वरुपसाम्यता होईल. 
मग भलतेथ भलतेव्हां । देहबंधु असो अथवा जावा ।
परि अबंधा नित्य ब्रह्मभावा । विघड नाहीं ॥ २५७ ॥
२५७) मग वाटेल तेथें वाटेल तेव्हां देहाचा पाश असो अथवा जावों, परंतु बंधरहित अखंड ब्रह्मस्थितींत बिघाड येणार नाहीं.
तो कल्पादि जन्मा नागवे । कल्पांतीं मरणें नाप्लवे ।
माजि स्वर्गसंसारांचेनि लाघवें । झकवेना ॥ २५८ ॥
२५८) तो कल्पाच्या आरंभी जन्मांत सांपडत नाहीं. कल्पाच्या अंती तो मरणानें बुडत नाहीं व मधल्या स्थितींत, म्हणजे स्थितिकालीं, स्वर्ग आणि संसार यांच्या मोहानें तो फसला जात नाहीं.    
येणें बोधें जो योगी होये । तयासी या बोधाचेंचि नीटपण आहे ।
कां जे भोगातें पेलूनि पाहे । निजरुपा ये ॥ २५९ ॥
२५९) या बोधानें जो योगी होतो. त्याला या बोधाचाच सरळपणा असतो. कारण कीं, तो स्वर्गातील व संसारातील भोगांना विचारानें वजन करुन पाहतो व ते असार म्हणून त्यांचा त्याग करुन तो आत्मस्वरुपाला येतो.
पैं गा इंद्रदिका देवां । जयां सर्वस्वें गाजती राणिवा ।
तें सांडणें मानूनि पांडवा । डावली जो ॥ २६० ॥
२६०) बा अर्जुना, इंद्रादिक देवांना त्यांचे सर्वस्व म्हणून जी राज्यें प्रसिद्ध आहेत, ती ओवाळून टाकलेल्या बळीप्रमाणें त्याज समजून तीं तो तुच्छ म्हणून टाकून देतो.   



Custom Search

No comments: