Shri Dnyaneshwari
मूळ श्लोक:
यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु ।
एकोऽथवाप्यच्युत तत् समक्षं तत्क्षामये
त्वामहमप्रमेयम् ॥ ४२ ॥
४२) आणि हे अच्युता, क्रीडा, शयन, आसन, भोजन
इत्यादि प्रसंगीं तूं एकटा असतांना किंवा ( लोकांच्या ) देखत तुझा उपहास
करण्याकरितां जो तुझा अपमान केला, त्याबद्दल, हे अप्रमेया, तूं मला क्षमा कर.
तूं या विश्र्वाची अनादि आदी । बैससी जियें
सभासदीं ।
तेथें सोयरीकीचिया शब्दीं । रळीं बोलों ॥ ५४४ ॥
५४४) या विश्वाचें अनादि मूळ जो तूं, तों
ज्या सभासदांमध्यें बसत होतास तेथें जे शब्द नातलगांशी बोलत असतांना शोभतील, त्या
शब्दांनी आम्हीं तुझ्याशी विनोद करीत होतों.
विपायें राउळा येवों । तरि तुझेंनि अंगे मानु
पावों ।
मानसीं तरी जावों । रुसोनि सलगी ॥ ५४५ ॥
५४५) आम्ही केव्हा तुझ्या घरीं येत होतों,
तेव्हां तूं स्वतःच ( आमचे आदरातिथ्य करुन ) आम्हांस मान देत होतास, तरी ( सुद्धां
) तुझ्याशीं अतिपरिचय असल्यामुळें आम्ही उलट तुझ्यावरुनच रुसून बसत होतों.
पायां लागोनि बुझावणी । तुझां ठायीं शार्ङ्गपाणी
।
पाहिजे ऐशी करणी । बहु केली आम्हीं ॥ ५४६ ॥
५४६) देवा, तूं पायां पडून आमची समजूत केली
पाहिजेस ( असा आम्ही हट्ट करीत होतों ) व हट्टाप्रमाणें आम्हीं तुझ्याशीं अनेक
गोष्टी केल्या.
सजनपणाचिया वाटा । तुजपुढें बैसें उफराटा ।
हा पाडु काय वैकुंठा । परि चुकलों जी ॥ ५४७ ॥
५४७) मी तुझा जिवलग मित्र या नात्यानें
तुझ्यापुढें पाठ करुन बसत होतों. श्रीकृष्णा, ही काय आमची योग्यता होती ! पण
महाराज, आम्ही चुकलों.
देवेंसि कोलकाठी धरुं । आखाडां झोंबीलोंबी करुं ।
सारी खेळतां अस्करुं । निकरेंही भांडों ॥ ५४८ ॥
५४८) देवाशीं दांडपट्टा खेळत होतों,
आखाड्यांत देवाशी कुस्ती करीत होतों व सोंगट्या खेळतांना देवा, धिक्कारुन बोलत
होतों व हातघाईवर येऊन देवाशी भांडत होतों.
चांग तें उराउरीं मागों । देवासि कीं बुद्धि
सांगों ।
तेवींचि म्हणों काय लागों । तुझें आम्ही ॥ ५४९ ॥
५४९) जी चांगली वस्तु असेल, ती झटपट मागत
होतों. तूं देवा, सर्वज्ञ पण तुलादेखील शहाणपणाच्या गोष्टी सांगत होतो;
त्याचप्रमाणें ‘ आम्ही तुझें काय लागतों ?’ असें म्हणत होतों.
ऐसा अपराधु हा आहे । जो त्रिभुवनीं म समाये ।
जी नेणेंचि कां पाये । शिवतिले तुझे ॥ ५५० ॥
५५०) हा अपराध असा आहे कीं, जो त्रिभुवनांतहि
मावणार नाहीं; परंतु देवा, मी तुझी शपथ वाहून सांगतों की, हे अपराध आमच्या हातून न
कळून ( अज्ञानामुळें ) झाले.
देवो बोनयाचां अवसरीं ।
लोभें कीर आठवण करी ।
परि माझा निसुग गर्व
अवधारीं । जे फुगूनचि बैसें ॥ ५५१ ॥
५५१) जेवणाच्या वेळीं
देव माझी खरोखर प्रेमाने आठवण करीत असे, पण माझा निर्लज्ज गर्व पाहा कीं, मी फुगून
बसत होतों.
देवाचिया भोगायतनीं ।
खेळतां आशंकेना मनीं ।
जी रिगोनियां शयनीं । सरिसा
पहुडें ॥ ५५२ ॥
५५२) देवाच्या
अंतःपुरांत खेळतांना मनांत शंका धरीत नव्हतों, इतकेंच काय, पण देवा, तुझ्या
बिछान्यावर जाऊन तुझ्या शेजारीं निजत होतों.
‘ कृष्णा ‘ म्हणोनि
हाकारिजे । यादवपणें तूतें लेखिजे ।
आपली आण घालिजे । जातां तुज
॥ ५५३ ॥
५५३) ‘ कृष्णा ‘ म्हणून
तुला हांक मारीत होतों. तूं एक यादव आहेस, असे तुला समजत होतों व तूं जाण्यास
निघाला असतांना तुला आम्ही आपली शपथ घालीत होतों.
मज एकासनीं बैसणें । कां
तुझा बोलु न मानणें ।
हें वोळखीचेनि दाटपणें ।
बहुत घडलें ॥ ५५४ ॥
५५४) मी तुझ्याबरोबर
तुझ्याच आसनावर बसत होतों. अथवा तूं सांगितलेली गोष्ट मानीत नव्हतों. असल्या
गोष्टी अतिपरिचयामुळे पुष्कळ घडल्या.
म्हणोनि काय काय आतां ।
निवेदिजेल अनंता ।
मी राशि आहें समस्तां ।
अपराधांची ॥ ५५५ ॥
५५५) म्हणून
श्रीकृष्णा, आतां काय एक म्हणून सांगावें ? मी सर्व अपराधांची रास आहे;
यालागीं पुढां अथवा पाठीं ।
जियें राहाटलों बहुवें वोखटीं ।
तियें मायेचिया परी पोटीं ।
सामावीं प्रभो ॥ ५५६ ॥
५५६) म्हणून हे प्रभो,
तुझ्या समक्ष अथवा तुझ्या पश्र्चात ज्या अनेक वाईट गोष्टी माझ्या हातून घडल्या
असतील, त्या आई ज्याप्रमाणें मुलाचे सर्व अपराध पोटांत घालते, त्याप्रमाणें तूं
पोटांत घालाव्या.
जी कोण्ही एके वेळे । सरिता
घेउनि येती खडुळें ।
तियें सामाविजेति सिंधुजळें
। आन उपायो नाहीं ॥ ५५७ ॥
५५७) महाराज, कोणत्याहि
एखाद्या वेळी जेव्हां नद्या गढूळ पाण्याचे लोट घेऊन येतात, तेव्हा समुद्राच्या
पाण्याने त्या गढूळ पाण्याच्या लोटास आपल्या पोटांत सामाविले पाहिजे, त्यास दुसरा
उपाय नाही.
तैसीं प्रीती कां प्रमादें
। देवेंसीं मज विरुद्धें ।
बोलविलीं तियें मुकुंदें ।
उपसाहावीं जी ॥ ५५८ ॥
५५८) त्याप्रमाणें
प्रीतीनें अथवा चुकीनें माझ्याकडून देवाला जी विरुद्ध भाषणें बोलली गेली, हे
श्रीकृष्णा, ती तूं सर्व सहन करावीस.
आणि देवाचेनि क्षमत्वें
क्षमा । आढारु जाली आहे या भूतग्रामा ।
म्हणोनि पुरुषोत्तमा ।
विनवूं तें थोडें ॥ ५५९ ॥
५५९) आणि हे देवा,
तुझ्याच क्षमावान् स्वभावामुळे, पृथ्वी या प्राणीमात्रांस धारण करणारी झाली आहे.
म्हणून श्रीकृष्णा, तुला विनंती करावी तितकी थोडीच आहे.
तरि आतां अप्रमेया । मज
शरणगता आपुलिया ।
क्षमा कीजे की यया ।
अपराधांसी ॥ ५६० ॥
५६०) तरी आता हे अगम्या
श्रीकृष्णा, मी जों आपल्याला शरण आलों आहे, त्या मला या अपराधाची क्षमा
करावी.
मूळ श्लोक
पितासि लोकस्य चराचरस्य
त्वमस्य पूज्यश्च गुरुवर्गरीयान् ।
न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः
कुतोऽन्यो लोकत्रयेऽप्यप्रतिमप्रभाव ॥ ४३ ॥
४३) ह्या चराचर जगाचा
तूं पिता आहेस, अत्यंत पूज्य व श्रेष्ठ असा ( या जगाचा ) गुरु आहेस. हे
अप्रतिमप्रभावा , ( स्वर्ग, मृत्यु, पाताळ या ) तिन्ही लोकांमध्यें देखील
तुझ्यासारखा दुसरा कोणीहि नाही; मग तुझ्यापेक्षां अधिक कोठून असणार ?
जी जाणितलें मियां साचें ।
महिमान आतां देवाचें ।
देवो होय चराचराचें ।
जन्मस्थान ॥ ५६१ ॥
५६१)महाराज, आतां मी
तुझें यथार्थ माहात्म्य जाणलें. हे परमात्म्या, तूं स्थावरजंगमात्मक जगाचें
उत्पत्तिस्थान आहेस.
हरिहरादि समस्तां । देवा
तूं परम देवता ।
वेदांतेंही पढविता ।
आदिगुरु तूं ॥ ५६२ ॥
५६२) देवा ! विष्णू,
शंकर इत्यादि दैवतांचा तूं श्रेष्ठ देव आहेस व वेदांनाहि शहाणपणा शिकवणारा मूळ
गुरु तूं आहेस.
गंभीर तूं श्रीरामा ।
नानाभूतैकसमा ।
सकळगुणीं अप्रतिमा । आद्वितीया
॥ ५६३ ॥
५६३) हे श्रीकृष्णा,
तूं फार गंभीर अंतःकरणाचा आहेस व तूं सर्व प्राण्यांत सारखा आहेस. तूं सर्व
गुणांमध्यें बिनजोड आहेस व तुझ्यासारखे दुसरें कोणीहि नाहीं.
तुजसी नाहीं सरिसें । हें
प्रतिपादनचि कायसें ।
तुवां जालेनि आकाशें ।
सामाविलें जग ॥ ५६४ ॥
५६४) तुझ्या बरोबरीचे
कोणी नाही हें सांगावयास कशाला पाहिजे ? तुझ्यापासून झालेल्या आकाशांत सर्व जग
सामावलें आहे.
तया तुझेनि पाडें दुजें ।
ऐसें बोलतांचि लाजिजे ।
तेथ अधिकाचि कीजे । गोठी
केवीं ॥ ५६५ ॥
५६५) त्या तुझ्या
बरोबरीला दुसरा कांही पदार्थ आहे, असे बोलण्याची लाज वाटावयास पाहिजे. अशा
प्रसंगांत तुझ्याहून कोणी मोठे आहे असें म्हणण्याची गोष्टच कशाला पाहिजे ?
म्हणोनि त्रिभुवनीं तूं एकु
। तुज सरिसा न अधिकु ।
तुझा महिमा अलौकिकु ।
नेणिजे वानूं ॥ ५६६ ॥
५६६) म्हणूनच या त्रिभुवनांत ( नांव घेण्यासारखा ) तूं
एकच आहेस. तुझ्या तोडीचा दुसरा कोणी नाही व
तुझ्यापेक्षां अधिक कोणी नाहीं. तुझें माहात्म्य खरोखर लोकोत्तर आहे. त्याचे वर्णन कसें करावें, तें समजत
नाही.

No comments:
Post a Comment