Monday, November 21, 2022

BhaktiYoga Part 2 Ovya 16 to 34 भक्तियोग भाग २ ओव्या १६ ते ३४

 

BhaktiYoga Part 2 
Shri Dnyaneshwari 
Adhyay 12 
Ovya 16 to 34 
भक्तियोग भाग २ 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय १२ 
ओव्या १६ ते ३४

मर्‍हाठियेचां नगरीं । ब्रह्मविद्येचा सुकाळु करीं ।

घेणें देणें सुखचिवरी । हों देईं या जगा ॥ १६ ॥

१६) या मराठी भाषेच्या गांवांत आत्मज्ञानाची रेलचेल कर व या जगाला केवळ ब्रह्मसुखाचेंच घेणें देणें होऊं दे.

तूं आपुलेनि स्नेहपल्लवें । मातें पांघरुविशील सदैवें ।

तरि आतांचि हें आघवें । निर्मीन माये ॥ १७ ॥

१७) श्रीगुरुरुपी माते, जर तूं आपल्या प्रेमरुपी पदरानें मला निरंतर पांघरुण घालशील, तर आतां मी हें सर्व उत्पन्न करीन.

इये विनवणीयेसाठी  । अवलोकिलें गुरु कृपादृष्टी ।

म्हणे गीतार्थेंसी उठी । न बोलें बहु ॥ १८ ॥

१८) या विनवणीबरोबर गुरुंनी त्यास कृपादृष्टीनें पाहिलें व म्हटलें, गीतार्थ सांगावयास लाग. फार बोलूं नकोस.

तेथ जी जी महाप्रसादु । म्हणोनि साविया जाला स्वानंदु ।

आतां निरोपीन प्रबंधु । अवधान दीजे ॥ १९ ॥

१९) ( असें गुरु बोलले ) तेव्हां ज्ञानेश्र्वरमहाराजांना सहजच आनंद झाला व ते म्हणाले, महाराज, आपण जी मला आज्ञा केली, ती मी आपला महाप्रसाद समजतों. तर आता आपल्या आज्ञेप्रमाणें मी कथा सांगेन,आपण लक्ष देण्याची कृपा करावी.

अर्जुन उवाचः—एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ।

ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के तोगवित्तमाः ॥ १ ॥

१) अर्जुन म्हणाला, याप्रमाणें सतत ( तुझ्या व्यक्त स्वरुपाच्या ठिकाणीं ) युक्त असलेले जे भक्त तुझी उपासना करतात आणि जे अव्यक्त अशा अक्षरब्रह्माची उपासना करतात, त्या ( दोन प्रकारच्या ) योग्यांपैकीं उत्तम योगी कोणते ?

तरी सकळवीराधिराजु । जो सोमवंशीं विजयध्वजु ।

तो बोलता जाहला आत्मजु । पांडुनृपाचा ॥ २० ॥

२०) तरी सर्व वीरांचा सार्वभौम राजा व चंद्रवंशाच्या विजयाचा ध्वज व पंडुराजाचा मुलगा जो अर्जुन, तो बोलला.

कृष्णातें म्हणे अवधारिलें । आपण विश्र्वरुप मज दाविलें ।

तंव नवल म्हणोनि बिहालें । चित्त माझें ॥ २१ ॥

२१) मग अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला, ऐकलें महाराज, आपण मला विश्वरुप दाखविलें, तेव्हां तें विश्वरुप अपूर्व म्हणून माझें चित्त भ्यालें

आणि ये कृष्णमूर्तीची सवे । यालागीं सोय धरिली जीवें ।

तंव नको म्हणानि देवें । वारिलें मातें ॥ २२ ॥

२२) आणि ( मला ) या श्रीकृष्णाच्या सगुण रुपाची सवय आहे म्हणून मनानें त्याचाच आश्रय केला. तेव्हां सगुण मूर्तीवर प्रेम ठेवणे चांगलें नाहीं, म्हणून तेथें प्रेम ठेवूं नकोस, असें देवांनी मला बजावलें.   

तरि व्यक्त आणि अव्यक्त । हें तूंचि एक निभ्रांत ।

भक्ती पाविजे व्यक्त । अव्यक्त योगें ॥ २३ ॥

२३) तर व्यक्त रुपानें अथवा अव्क्त रुपानें तूंच एकआहेस, याविषयी ( माझ्या मनांत ) संशय नाहीं, भक्तीनें व्यक्त स्वरुपाची व योगानें अव्यक्त स्वरुपाची प्राप्ति होते.

या दोनी जी वाटा । तूतें पावावया वैकुंठा ।

व्यक्ताव्यक्त दारवंठां । रिगिजे येथ ॥ २४ ॥

२४) हे वैकुंठा, व्यक्त व अव्यक्त असा जो तूं, त्या तुझ्या प्राप्तीच्या उंबरठ्यांत सोडणारे, भक्ति व योग हे दोन मार्ग आहेत.  

पैं जे वानी श्यातुका । तेचि वेगळिया वाला येका ।

म्हणोनि एकदेशिया व्यापका । सरिसा पाडु ॥ २५ ॥   

२५) परंतु जो कस शंभरभार सोन्याच्या लगडीला असतो तोच कस त्या लगडीतील वेगळ्या काढलेल्या एका वालभर सोन्याला असतो, म्हणून मर्यादित व व्यापक यांची योग्यता सारखी आहे. 

अमृताचां सागरीं । जे लाभे सामर्थ्याची थोरी ।

तेचि दे अमृतलहरी । चुळीं घेतलिया ॥ २६ ॥

२६) अमृताच्या समुद्रामध्यें जी सामर्थ्याची थोरवी आढळून येते, तीच थोरवी त्या अमृतसमुद्राच्या लाटेतील एक चुळकाभर अमृत प्यालें असतां प्राप्त होते. ( त्याप्रमाणें व्यक्त रुप जरी परिछिन्न आहे व अव्यक्तरुप हें जरी व्यापक आहे, तरी ती दोन्ही रुपें एकाच योग्यतेची आहेत. )  

हे कीर माझां चित्तीं । प्रतीति आथि जी निरुती ।

परि पुसणें योगपती । तें याचिलागीं ॥ २७ ॥

२७) महाराज, माझ्या चित्तात हाच ( व्यक्त व अव्यक्त हीं दोन्ही रुपें एकच आहेत ) खरोखरी निश्चयें करुन अनुभव आहे; परंतु योगेश्र्वरा, आपल्याला विचारावयाचें तें एवढ्याचकरितां की,

जें देवा तुम्हीं नावेक । अंगिकारिलें व्यापक ।

तें साचचि कीं कवतिक । हें जाणावया ॥ २८ ॥

२८) हे श्रीकृष्णा, तुम्ही जी मागें क्षणभर व्यापक रुपाची ग्राह्य म्हणून शिफारस केलीत तें तुमचें प्रतिपादन खरं खरं मनापासूनचे आहे किंवा तो एक तुम्ही एक क्षणभर केलेला विनोद आहे, हें नीट समजून यावें म्हणून ( मी आपल्यास खुलासा विचारीत आहे. )

तरि तुजलागीं कर्म । तूंचि जयांचें परम ।

भक्तीसी मनोधर्म । विकोनि घातला ॥ २९ ॥

२९) तरी जे भक्त तुझ्या प्राप्तीकरितां कर्म करतात व तूं ज्यांची परम गति आहेस व ज्यांनीं आपले सर्व संकल्प तुझ्या भक्तीला विकल्यासारखे वाहिले आहेत;    

इत्यादि सर्वीं परीं । जे भक्त तूंते हरी ।

बांधोनियां जिव्हारीं । उपासिती ॥ ३० ॥

३०) हे कृष्णा, या व अशाच इतर सर्व प्रकारांनीं, जें भक्त तुला आपल्या अंतःकरणांत दृढ धारण करुन तुझी उपासना करतात;

आणि जें प्रणवेपैलीकडे । वैखरीयेसि जें कानडें ।

कायिसयाहि सांगडें । नव्हे जें वस्तु ॥ ३१ ॥

३१) आणि जी वस्तू ॐकारापलीकडे आहे व वैखरी नांवाच्या वाचेस जी दुर्बोध आहे व जी वस्तु कशाहीसारखी नाहीं,              

तें अक्षर जी अव्यक्त । निर्देशदेशरहित ।

सोऽहंभावें उपासित । ज्ञानिये जे ॥ ३२ ॥

३२) ती वस्तु अविनाशी व इंद्रियांना विषय न होणारी आहे. ती वस्तु दाखवितां येण्याजोगी नाहीं व ती देशानें मर्यादित नाहीं, अशी आहे; अशा वस्तुची जे ज्ञानी ‘ ती वस्तु मी आहें ‘ अशा भावनेने उपासना करतात. 

तयां आणि जी भक्तां । येरयेरांमाजीं अनंता ।

कवणें योगु तत्त्वता । जाणितला सांगा ॥ ३३ ॥

३३) महाराज, अशा या योगी व भक्तांपैकी कोणीं एकानें, हे अनंता, खरोखर योग जाणला, सांगा बरें ?

इया किरीटीचिया बोला । तो जगद्बंधु संतोषला ।

म्हणे हो प्रश्नु भला । जाणसी करुं ॥ ३४ ॥

३४) या अर्जुनाच्या बोलण्यानें तो जगद्बंधु श्रीकृष्ण

 परमात्मा संतुष्ट होऊन म्हणाला, ‘ अरे, अर्जुना, तूं प्रश्न

 करण्याचें चांगलें जाणतोस.’



Custom Search

No comments: