कीं भक्तिसुखालागीं ।
आपणपेंचि दोही भागीं ।
वांटूनिया आंगीं । सेवकै
वाणी ॥ १८६ ॥
१८६) तथापि
भक्तिसुखाकरितां आपल्यांतच ( देव व भक्त असे ) दोन भाग करुन तो आपल्या ठिकाणीं
सेवाधर्म स्वीकारतो.
येरा नाम मी ठेवी । मग भजती
वोज बरवी ।
न भजतया दावी । योगिया जो ॥
१८७ ॥
१८७) व दुसर्या भागाला
मी ( देव ) असें नांव ठेवतो. याप्रमाणें देव व भक्त, या दोन्ही कल्पना आपल्यांतच
सारख्या कल्पून, अद्वैतांत भजन करणे शक्य नाहीं, अशा समजुतीनें भजन न करणार्या
लोकांना, जो भजनाची चांगली पद्धत ( आचरुन ) दाखवितो.
तयाचें आम्हां व्यसन ।
आमुचें तो निजध्यान ।
किंबहुना समाधान । तो मिळे
तैं ॥ १८८ ॥
१८८) त्या भक्ताचा
आम्हांला छंद असतो. तो भक्त आमच्या स्वतःच्या ध्यानाचा विषय असतो. फार काय
सांगावें ! त्याची जेव्हा आम्हांस भेट होते, तेव्हांच आम्हांस समाधान वाटतें.
तयालागीं मज रुपा येणें ।
तयाचेनि मज एथें असणें ।
तया लोण कीजे जीवें प्राणें
। ऐसा पढिये ॥ १८९ ॥
त्याच्याकरितां मला
सगुण मूर्ति धारण करावी लागते. आणि त्याच्याकरितांच ( मला सगुण विग्रहानें ) या
जगांत राहावें लागतें, तो मला इतका आवडतो की, त्यावरुन जीव व प्राण ओवाळून
टाकावेत.
मूळ श्लोक
यो न हृष्यति न द्वेष्टि न
शोचति न काङ्क्षति ।
शुभाशुभपरित्यागी
भक्तिमान्यः स मे प्रियः ॥ १७ ॥
१७) जो हर्ष पावत नाही,
द्वेष करीत नाहीं, शोक करीत नाहीं, ( अप्राप्त वस्तूची ) इच्छा करीत नाहीं,
चांगलें व वाईट या दोन्हींचा त्याग केलेला जो भक्तिमान् मनुष्य असतो, तो मला प्रिय
आहे.
जो आत्मलाभासारिखें ।
गोमटें कांहींचि न देखे ।
म्हणोनि भोगविशेखें ।
हरिखेजेना ॥ १९० ॥
१९०) जो
आत्मप्राप्तीच्या तोडीचें दुसरें कांहींच चांगलें समजत नाहीं, म्हणून जो एखाद्या
विशेष भोगाने आंनदित होत नाही;
आपणचि विश्र्व जाहला । तरि
भेदभावो सहजचि गेला ।
म्हणोनि द्वेषु ठेला । जया
पुरुषा ॥ १९१ ॥
१९१) आपणच विश्व आहोंत
अशी समजूत बनलेली असल्यामुळें, त्याचा भेदभाव अनायासानेंच नाहींसा झालेला असतो,
म्हणून ज्या पुरुषाच्या ठिकाणीं द्वेषबुद्धि राहिलेली नसते;
पैं आपुलें जें साचें । तें
कल्पांतीही न वचे ।
हें जाणोनि गताचें । न शोची
जो ॥ १९२ ॥
१९२) आपलें जें खरें (
त्रिकालाबाधित आत्मस्वरुप ) आहे, तें कल्पाच्या अंताच्या वेळीदेखील ( आपणापासून )
जात नाही, हें जाणून जो गेल्याचा शोक करीत नाही;
आणि जयापरौतें कांहीं नाहीं
। तें आपणपेंचि आपुलां ठायीं ।
जाहला यालागीं जो कांहीं ।
आकांक्षी ना ॥ १९३ ॥
१९३) आणि ज्याच्या
पलीकडे कांहीं नाहीं, असें जें ब्रह्म तें तो पुरुष आपण आपल्या ठिकाणीं झाल्यामुळे
कशाचीच इच्छा करीत नाही;
वोखटें कां गोमटें । हें
कांहींचि तया नुमटे ।
रात्रिदिवस न घटे ।
सूर्यासि जेवीं ॥ १९४ ॥
१९४) सूर्याच्या
ठिकाणीं रात्र किंवा दिवस, हे दोन्ही जसें घडत नाहींत, त्याप्रमाणें वाईट किंवा
बरें हें त्याला कांहींच वाटत नाहीं,
ऐसा बोधुचि केवळु । जो
होऊनि निष्फळु ।
त्याहीवरी भजनशीळु । माझां
ठायीं ॥ १९५ ॥
१९५) असा जो केवळ अखंड
बोधरुप असून त्याशिवाय आणखी, जो माझ्या ठिकाणीं भजनशील असतो,
तरि तया ऐसें दुसरें ।
आम्हां पढियंतें सोयरें ।
नाहीं गा साचोकारें । तुझी
आण ॥ १९६ ॥
१९६) तरी अरे अर्जुना,
त्याच्यासारखें दुसरें आवडतें नातलग मनुष्य आम्हांला खरोखर कोणी नाही, हें तुझी
शपथ वाहून सांगतों.
मूळ श्लोक
समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः ।
शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः ॥ १८ ॥
१८) शत्रु व मित्र, मान व अपमान यांच्या
ठिकाणीं समान असणारा, शीत व उष्ण, सुख व दुःख यांच्या ठिकाणीं समान असणारा, (
अंतर्बाह्य ) संगरहित.
पार्था जयांचा ठायीं । वैषम्याची वार्ता नाहीं ।
रिपुमित्रां दोहीं । सरिसा पाडु ॥ १९७ ॥
१९७) अर्जुना, ज्याच्या ठिकाणीं भेदभावाची
गोष्टहि नाहीं, शत्रु आणि मित्र या दोघांची ज्याच्या ठिकाणीं सारखी योग्यता आहे;
कां घरींचियां उजियेडु करावा । पारखियां आंधारु
पाडावा ।
हें नेणेचि गा पांडवा । दीपु जैसा ॥ १९८ ॥
१९८) अथवा घरच्या माणसांना ( तेवढा ) उजेड
पाडावा व परक्या माणसांना अंधार पाडावा, हे जसें दिव्याला माहीत नसतें;
जो खांडावया घावो घाली । कां लावणी जयानें केली ।
दोघां एकचि साउली । वृक्ष दे जैसा ॥ १९९ ॥
१९९) जो तोडण्याकरितां घाव घालतो किंवा जो
लागवड करतो, त्या दोघांना वृक्ष जसा सारखी सावली देतो;
नातरी इक्षुदंडु । पाळितया गोडु ।
गाळितया कडु । नोहेचि जेवीं ॥ २०० ॥
२००) अथवा ज्याप्रमाणे ऊंस हा आपल्या पिकास
पाणी घालून वाढविणाराला गोड, व चरकांत घालून गाळणाराला कडू असा असत नाहीं.
अरिमित्रीं तैसा । अर्जुना
जया भावो ऐसा ।
मानापमानीं सरिसा । होतु
जाय ॥ २०१ ॥
२०१) अर्जुना, त्याप्रमाणें
शत्रुमित्रांच्या ठिकाणीं ज्याचा असा भाव आहे व ज्याच्या मनाची स्थिति मानाच्या व
अपमानाच्या वेळीं सारखीच राहाते;
तिहीं ऋतूं समान । जैसे कां
गगन ।
तैसें एकचि मान । शीतोष्णीं
जया ॥ २०२ ॥
२०२) तिन्ही ॠतूंमध्यें
आकाश जसें सारखें असतें, त्याप्रमाणे थंड व उष्ण इत्यादि द्वंद्वांची किंमत
ज्याच्याजवळ सारखीच असते;
दक्षिण उत्तर मारुता । मेरु
जैसा पांडुसुता ।
तैसा सुखदुःखप्राप्ता ।
मध्यस्थु जो ॥ २०३ ॥
२०३) अर्जुना, दक्षिण
दिशेकडील व उत्तर दिशेकडील वार्यांमध्ये जसा मेरु पर्वत ( अचल असतों ) तसा
प्राप्त होणारीं जों सुखदुःखें त्यांमध्यें जो अचल असतो;
माधुर्यें चंद्रिका । सरिसी
राया रंका ।
तैसा जो सकळिकां । भूतां
समु ॥ २०४ ॥
२०४) ज्याप्रमाणें
चांदणें आपली मधुरता राजा आणि रंक यांस सारखीच अनुभविण्यास देतें, तसा जो सर्व
प्राणिमात्रांच्या ठिकाणी सारखा असतो;
आघविया जगा एक । सेव्य
जैसें उदक ।
तैसें तयांतें तिन्ही लोक ।
आकांक्षिती ॥ २०५ ॥
२०५) ज्याप्रमाणें पाणी
हे सर्व जगाला एकच सेव्य आहे, त्याप्रमाणें ज्या भक्ताची स्वर्ग, मृत्यु व पाताळ
हे तिन्ही लोक इच्छा करितात;
जो सबाह्यसंगु । सांडोनिया
लागु ।
एकाकी असे आंगु । आंगीं
सूनी ॥ २०६ ॥
२०६) जो अंतर्बाह्य
संगाचा संबंध सोडून जीव स्वरुपाचा
ब्रह्मस्वरुपांत प्रवेश करुन एकाकी असतो.