Thursday, January 19, 2023

BhaktiYoga Part 8 Adhyay 12 Ovya 165 to 185 भक्तियोग भाग ८ ओव्या १६५ ते १८५

BhaktiYoga Part 8 
Shri Dnyaneshwari Adhyay 12
Ovya 165 to 185 
भक्तियोग भाग ८ 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय १२ 
ओव्या १६५ ते १८५

मूळ श्लोक

यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च यः ।

हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः ॥ १५ ॥

१५) ज्याचा लोक कंटाळा करीत नाहींत, व जो लोकांना कंटाळत नाहीं, जो हर्ष, क्रोध, भय आणि उद्वेग यांपासून सुटला आहे, तोच मला प्रिय आहे.

तरी सिंधूचेनि माजें । जळचरां भय नुपजे ।

आणि जळचरीं नुबगिजे । समुद्र जैसा ॥ १६५ ॥

१६५) तर ज्याप्रमाणें समुद्राच्या खवळण्यानें पाण्यांत राहाणार्‍या प्राण्यांस भय उत्पन्न होत नाहीं. आणि जलचरांना समुद्र कंटाळत नाही, 

तेविं उन्मत्तें जगें । जयासि खंती न लगे ।

आणि जयाचेनि आंगें । न शिणे लोकु ॥ १६६ ॥

१६६) त्याप्रमाणें उन्मत्त जगाच्या योगानें ज्याला खेद होत नाहीं; आणि ज्याच्या स्वतःकडून लोकांना शीण होत नाहीं;

किंबहुना पांडवा । शरीर जैसें अवयवां ।   

तैसा नुबगे जीवां । जीवपणें जो ॥ १६७ ॥

१६७) फार काय सांगावें ! अर्जुना, शरीर जसें अवयवांना कंटाळत नाहीं, त्याप्रमाणें आपण सर्वांचा जीव आहों अशी त्याचीआत्मैक्यबुद्धि असल्यामुळें तो प्राणीमात्रांना कंटाळत नाहीं.

जगचि देह जाहलें । म्हणोनि प्रियाप्रिय गेलें ।

हर्षामर्ष ठेले । दुजेनविण ॥ १६८ ॥

१६८) हें जगच त्याचा देह झाल्यामुळें आवडते व नावडते हे भाव त्याच्या चित्तांतून गेले व त्याच्या ठिकाणीं द्वैत नसल्यामुळें त्याची आनंद व क्रोध हीं द्वंद्वें बंद पडलीं. 

ऐसा द्वंद्वनिर्मुक्तु । भयोद्वेगरहितु ।

याही वरि भक्तु । माझां ठायीं ॥ १६९ ॥

१६९) असा ( सुखदुःखादि ) द्वंद्वापासून पूर्णपणें मुक्त झालेला, भय आणि चित्तक्षोभ यांनी रहित झालेला आणि इतकें असून शिवाय माझ्या ठिकाणीं अनन्य असलेला. 

तरि तयाचा गा मज मोहो । काय सांगों तो पढियावो ।

हें असो जीवें जीवो । माझेनि तो ॥ १७० ॥

१७०) तर त्याचा मला मोह असतो, ती आवड काय सांगूं ! हें राहूं दे, तो माझ्याच योगानें जगतो ( म्हणजे त्याच्या जगण्यास माझ्या प्रेमाची जरुर असते )

जो निजानंदें धाला । परिणामु आयुष्या आला ।

पूर्णते जाहला । वल्लभु जो ॥ १७१ ॥

१७१) जो आत्मानंदानें तृप्त झाला व जो पुरुष म्हणजे सर्वांचा शेवट असलेलें ब्रह्मच जन्मास आलें, आणि जो पूर्ण ब्रह्मस्थितिरुपी जी स्त्री तिचा प्रिय पति झाला.

मूळ श्लोक

अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः ।

सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः ॥ १६ ॥

१६) निरक्षेप, शुद्ध, तत्त्वार्थींचा, देखणा, उदासीन, संसारदुःखविरहित कर्मारंभास अवश्य असणारा जो अहंकार तद्विरहित, असा जो माझा भक्त असतो, तो मला प्रिय आहे.   

जयांचा ठायीं पांडवा । अपेक्षे नाहीं रिगावा ।

सुखाचि चढावा । जयाचें असणें ॥ १७२ ॥

१७२) अर्जुना, त्याच्या ठिकाणीं इच्छेला प्रवेश नाही. ( ज्याला कशाचीहि जरुरी नाही. ) आणि जयाच्या जगण्यानें त्याच्या आंतील आत्मसुखाचा उत्कर्षच होत राहतो;

मोक्ष देऊनि उदार । काशी होय कीर ।

परि वेचे शरीर । तिये गांवीं ॥ १७३ ॥

१७३) काशीक्षेत्र हें ( जीवांना ) मोक्ष देण्यांत खरोखर उदार आहे, परंतु त्या क्षेत्रामध्यें मुमुक्षूचें पडावें लागतें.

हिमवंतु दोष खाये । परि जीविताची हानी होये ।

तैसें शुचित्व नोहे । सज्जनाचें ॥ १७४ ॥  

१७४) हिमालय पर्वत पाप नाहीसें करतो; परंतु तेथे मरण्याचा फार संभव आहे. साधूचा पवित्रपणा तसा धोक्याचा नाही.

शुचित्वें शुचि गांग होये । आणि पापतापही जाये ।

परि तेथें आहे । बुडणें एक ॥ १७५ ॥   

१७५) गंगोदक पवित्रांतील पवित्र आहे आणि त्या गंगोदकानें पाप व ताप नाश पावतात, परंतु तेथें ( गंगोदकांत ) बुडी मारण्याची जरुरी असल्याकारणानें तेथें बुडण्याचा संभव असतो.  

खोलिये पारु नेणिजे । तरी भक्तीं न बुडिजे ।

रोकडाचि लाहिजे । न मरतां मोक्षु ॥ १७६ ॥

१७६) गंगेप्रमाणेंच साधूच्या ( ज्ञानाच्या ) खोलीचा अंत लक्षांत येत नाहीं, तरी पण त्याच्या संगतीत साधकांस बुडण्याची भीति नसते. तेथें ( साधुसंगतींत ) मरण्याचाच प्रसंग न येता याच देहांत रोकडा मोक्ष पदरांत पडतो.  

संताचेनि अंगलगें । पापातें जिणणें गंगे ।

तेणें संतसंगें । शुचित्व कैसें ॥ १७७ ॥

१७७) संतांच्या शरीरस्पर्शानें गंगेचीं पापें जातात. तेव्हा त्या संतांच्या संगतीनें किती पवित्रपणा येतो !

म्हणोनि असो जो ऐसा । शुचित्वें तीर्था कुवासा ।

जेणें लंघविलें दिशा । मनोमळ ॥ १७८ ॥

१७८) म्हणून आतां हें वर्णन पुरे. तो याप्रमाणें ( आपल्या ) पवित्रपणानें तीर्थाला आश्रय असतो. ज्यानें मनांतील अज्ञानादि मळ देशोधडीस लावले.

आंतु बाहेरि चोखाळु । सूर्य तैसा उजाळु ।

आणि तत्त्वार्थींचा पायाळु । देखणा जो ॥ १७९ ॥

१७९) सूर्य जसा आत बाहेर निर्मळ असतो, त्याप्रमाणें तो आंत मनानें व बाहेर शरीरानें पवित्र असतो आणि जो ( अज्ञानरुपी भूमींत असलेल्या ) ब्रह्मरुपी धनाला पाहाणारा पायाळू आहे;

व्यापक आणि उदस । जैसें कां आकाश ।

तैसें जयाचें मानस । सर्वत्र गा ॥ १८० ॥

१८०) ज्याप्रमाणें आकाश सर्वव्यापक असून उदास असतें; त्याप्रमाणें ज्याचें मन सर्वव्यापक असून उदास असते; ( म्हणून त्याच्या मनाची कोठेहि आसक्ति नसते ).

संसारव्यथे फिटला । जो नैराश्यें विनटला ।

व्याधा हातोनि सुटला । विहंगमु जैसा ॥ १८१ ॥

१८१) जो निराशारुपी अलंकाराने भूषित झाल्यामुळे संसाराच्या पीडेपासून मुक्त झालेला असतो, ज्याप्रमाणें पारध्याच्या हातांतून पक्षी सुटून जावा, ( आणि म्हणून त्या पक्ष्याला आनंद व्हावा )  

तैसा सतत जो सुखे । कोणीही टवंच न देखे ।

नेणिजे गतायुषें । लज्जा जेवीं ॥ १८२ ॥

१८२) ( वरील पक्ष्याला मोकळरपणाचा आनंद क्षणिक असतो. म्हणजे पारध्याच्या हातांतून सुटल्याबरोबर त्यास आनंद होतो, पण तो एकसारखा टिकत नाही. ) ( परंतु ) तसा या पुरुषाला आनंद सतत असतो व मेलेला पुरुष उघडा-नागडा जरी असला तरी तो लाजेला जसा जाणत नाहीं, तसा तो कोणीकडेहि ( कोणत्याहि स्थितींत ) दुःखाला जाणत नाही.

आणि कर्मारंभालागीं । जया अहंकृती नाहीं आंगीं ।

जैसा निरिंधन आगी । विझोनि जाय ॥ १८३ ॥

१८३) आणि कर्माचा आरंभ करण्याकरितां लागणारा अहंकार ज्याच्या ठिकाणीं नसतो, ज्याप्रमाणें काष्ठरहित अग्नि विझून जातो, 

तैसा उपशमुचि भागा । जयासि आला पैं गा ।

जो मोक्षाचिया आंगा । लिहिला असे ॥ १८४ ॥

१८४) त्याप्रमाणें ज्याच्या वाट्याला शांति आली व ज्याचे नांव मोक्षाच्या सदरांत दाखल झालेलें आहे,

अर्जुन हा ठावोवरी । जो सोहंभावो सरोभरी ।

तो द्वैताचां पैलतीरीं । निगों सरला ॥ १८५ ॥  

१८५) अर्जुना, इतका जो, तें ब्रह्म मी आहें, अशा भावनेनें

 भरलेला आहे, तो द्वैताच्या पलीकडच्या कांठावर निघाला

 ( तो अद्वैत झाला ) [ आतां त्याच्या भक्तीशी कांहीं संबंध

 नसेल अशी शंका येईल. म्हणून त्याचें निराकरण पुढें

 करतात.    

  


Custom Search

No comments: