Bhakati Yoga Part 10
मूळ श्लोक
तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी
संतुष्टो येन केनचित् ।
अनिकेतः
स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः ॥ १९ ॥
१९) निंदा व स्तुति
समान माननारा, मौनी, जें जें कांहीं मिळेल त्यामध्यें संतोषवृत्ति ठेवणारा, कोठेंच
आश्रय धरुन न राहणारा, स्थिरबुद्धि असलेला जो भक्तिमान, मनुष्य, तो मला प्रिय
आहे.
जों निंदेतें नेघे । स्तुति
न श्र्लाघे ।
आकाशा न लगे । लेपु जैसा ॥
२०७ ॥
२०७) जो निंदेनें खिन्न
होत नाही व स्तुतीनें चढून जात नाही; ज्याप्रमाणें आकाशाला रंगाचा लेप लागणें शक्य
नाही;
तैसें निंदे आणि स्तुती ।
मानु करुनि एके पांती ।
विचरे प्राणवृत्ती । जनीं
वनीं ॥ २०८ ॥
२०८) त्याप्रमाणें
निंदा अथवा स्तुति यांचा त्याच्या मनावर कांहीं एक परिणाम होत नसल्यामुळें तो
निंदा आणि स्तुति यांस सारखाच मान देऊन, प्राणासारख्या उदास वृत्तीनें लोकांमध्यें
व रानामध्यें संचार करितो.
साच लटिकें दोन्ही । बोलोनि
न बोले जाहला मौनी ।
जे भोगिता उन्मनी । आरायेना
॥ २०९ ॥
२०९) खरें व खोटें हीं
दोन्हीं बोलून न बोलण्यासारखें असल्यामुळें तो मौनी झाला आहे; कारण कीं, तो उन्मनी
अवस्था भोगीत असतां त्यास पुरेसें वाटत नाहीं,
जो यथालाभें न तोखे ।
अलाभें न पारुखे ।
पाउसेंवीण न सुके । समुदु जैसा ॥ २१० ॥
२१०) जो ज्या वेळेला
मिळेल त्यानें हृष्ट होत नाही व ज्याप्रमाणें समुद्र पावसांवाचून सुकत नाही,
त्याप्रमाणें कांहीं न मिळालें तरी जो खिन्न होत नाही;
आणि वायूसि एके ठायीं ।
बिढार जैसें नाहीं ।
तैसा न धरीच केंहीं ।
आश्रयो जो ॥ २११ ॥
२११) आणि ज्याप्रमाणें
वायु हा कोठेहि एकच जागा धरुन राहात नाहीं, त्याप्रमाणें तो कोठेंहि आश्रय धरीत
नाहीं;
आघवाचि आकाशस्तिति । जेवीं
वायूसि नित्य वसति ।
तेवीं जगचि विश्रांति- ।
स्थान जया ॥ २१२ ॥
२१२) ज्याप्रमाणें
आकाशाच्या सर्व विस्तारांत वायूची नित्य वस्ती आहे, त्याप्रमाणें संपूर्ण जग हें
ज्यांचे विश्रांतिस्थान आहे;
हें विश्र्वचि माझें घर ।
ऐसी मती जयाची स्थिर ।
किंबहुना चराचर । आपण जाहला
॥ २१३ ॥
२१३) हें विश्र्वच
माझें घर आहे, असा ज्याचा दृढनिश्र्चय झालेला असतो, फार काय सांगावें । सर्व
स्थावरजंगमात्मक जग जो ( अनुभवाच्या अंगानें ) आपणच बनला आहे.
मग याहींवरी पार्था । माझां
भजनीं आस्था ।
तरी तयातें मी माथां ।
मुकुट करीं ॥ २१४ ॥
२१४) अर्जुना, इतकें
असूनहिं आणखीहि ज्याची माझ्या भजनाच्या ठिकाणी आस्था असते, तर त्याला मी आपल्या
डोक्यावरचा मुकुट करतों.
उत्तमासी मस्तक । खालविजे
हें काय कौतुक ।
परि मानु करिती तिन्ही लोक
। पायवणिया ॥ २१५ ॥
२१५) उत्तम भक्तांपुढें
मस्तक नम्र करणें यांत काय मोठें नवल आहे ? पण उत्तम भक्ताच्या चरणोदकाला
त्रैलोक्य मान देतें.
तरि श्रद्धावस्तूसि आदरु ।
करिता जाणिजे प्रकारु ।
जरी होय श्रीगुरु । सदाशिवु
॥ २१६ ॥
२१६) जर शंकर श्रीगुरु
होतील तरच भक्तितत्त्वचा आदर करण्याचा प्रकार जाणतां येईल.
परि हें असो आतां ।
महेशातें वानितां ।
आत्मस्तुति होता । संचारु
असे ॥ २१७ ॥
२१७) पण, आतां हें
शंकरांचें वर्णन पुरे. कारण शंकरांचे वर्णन करण्यांत आत्मस्तुतीच केल्यासारखी
होते. [ भक्ततत्त्वाचा आदर कसा करावा, हे शंकरच जाणतात. हें कशावरुन ? तर माझ्या
ठिकाणीं असलेली भक्ति, ही त्यांनी, माझें चरणोदक ( गंगा ) मस्तकावर धारण करुन
व्यक्त केली, असें माझें चरणोदक धारण करणारे गुरु पाहिजेत असें म्हणण्यांत
अप्रत्यक्ष रीतीनें मी आपली स्वतःची स्तुति केल्यासारखी होते, म्हणून शंकरांचे
वर्णन पुरे. असें भगवान ह्या ओवींत सांगतात. ]
ययालागीं हें नोहे ।
म्हणितलें रमानाथें ।
अर्जुना मी वाहें । शिरीं
तयातें ॥ २१८ ॥
२१८) एवढ्याकरितां हें
बोलणें नको, असें लक्ष्मीपति श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, मी त्याला डोक्यावर वाहतों.
जे पुरुषार्थ सिद्धी चौथी ।
घेऊनि आपुलां हातीं ।
रिगाला भक्तिपंथी । जगा
देतु ॥ २१९ ॥
२१९) कारण कीं, तो भक्त
चौथी पुरुषार्थसिद्धि जो मोक्ष, तो आपल्या हातात देऊन भक्तीच्या मार्गानें जगाला
मोक्ष देण्यास निघाला.
कैवल्याचा अधिकारी ।
मोक्षाची सोडी बांधी करी ।
कीं जळाचिये परी । तळवटु घे
॥ २२० ॥
२२०) तो मोक्षाचा
अधिकारी म्हणजे मोक्ष देण्यास समर्थ ( असा ) असतो, म्हणून तो मोक्षाचा व्यवहार
चालवितो; ( म्हणजे मोक्ष कोणाला द्यावा अथवा न द्यावा, हें, तो ठरवीतो ) व इतका
समर्थ असूनहि, तो पाण्यासारखा नम्र असतो.
म्हणोनि गा नमस्कारुं ।
तयातें आम्ही माथां मुगुट करुं ।
तयाची टांच धरुं । हृदयीं
आम्ही ॥ २२१ ॥
२२१) म्हणून आम्ही
त्याला नमस्कार करुं. त्याला आम्ही डोक्यावरचा मुकुट करुं व त्याचीं टांच आम्ही
हृदयावर धरुं.
तयाचिया गुणांची लेणीं ।
लेववूं अपुलिये वाणी ।
तयाची कीर्ति श्रवणीं ।
आम्ही लेऊं ॥ २२२ ॥
२२२) त्याच्या गुणांचे
अलंकार आम्ही आपल्या वाचेला घालूं ( आम्ही आपल्या वाचेनें त्याचे गुण गाऊं ), आणि
त्याची कीर्ति हाच, कोणी दागिना, तो आम्ही आपल्या कानांत घालूं. ( कानानी आम्ही
त्याची कीर्ति ऐकूं ,)
तो पाहावा हे डोहळे ।
म्हणोनि अचक्षूसी मज डोळे ।
हातींचेनि लीलाकमळें ।
पुजूं तयातें ॥ २२३ ॥
२२३) तो पाहावा, ही
आम्हांला इच्छा होते. म्हणून आम्ही डोळेरहित आहोत. तरी डोळे धारण करतों, आणि
अमच्या हातांतील क्रीडेच्या कमळानें आम्ही त्याची पूजा करतों.
दोंवरी दोनी । भुजा आलों
घेउनि ।
आलिंगावयालागुनी । तयाचें
आंग ॥ २२४ ॥
२२४) त्याच्या शरीराला
आलिंगन देण्याकरितां दोन हातांवर आणखी दोन हात घेऊन आलों. ( म्हणजे मी चतुर्भुज सगण
रुप धारण केलें. )
तया संगाचेनि सुरवाडें । मज
विदेहा देह धरणें घडे ।
किंबहुना आवडे । निरुपमु ॥
२२५ ॥
२२५) त्यांच्या संगतीच्या सुखाकरितां मी देहरहित, त्या
मला देह धारण करावा लगतो. फार काय सांगावें ? तो
मला किती आवडतो याला उपमाच नाहीं.

No comments:
Post a Comment