Showing posts with label श्रीरामचरितमानस भाग २६. Show all posts
Showing posts with label श्रीरामचरितमानस भाग २६. Show all posts

Sunday, July 12, 2020

ShriRamcharitmans Part 26 श्रीरामचरितमानस भाग २६


ShriRamcharitmans Part 26 श्रीरामचरितमानस भाग २६ 
दोहा १६२ ते १६५ 
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड

दोहा—आदिसृष्टि उपजी जबहिं तब उतपति भै मोरि ।
नाम एकतनु हेतु तेहि देह न धरी बहोरि ॥ १६२ ॥
तो कपटी मुनी म्हणाला, ‘ जेव्हा सर्वप्रथम सृष्टी उत्पन्न झाली होती, तेव्हा माझी उत्पत्ती झाली होती. तेव्हापासून मी दुसरा देह धारण केलेला नाही. म्हणून माझे नाव ‘ एकतनू ‘ असे आहे. ॥ १६२ ॥
जनि आचरजु करहु मन माहीं । सुत तप तें दुर्लभ कछु नाहीं ॥
तपबल तें जग सृजइ बिधाता । तपबल बिष्नु भए परित्राता ॥
हे पुत्रा, मनात आश्र्चर्य करु नकोस. तपामुळे काहीही दुर्लभ नाही. तपानेच ब्रह्मदेव जगाची रचना करतात. तपामुळेच विष्णू हे जगाचे पालन करणारे झाले आहेत. ॥ १ ॥
तपबल संभु करहिं संघारा । तप तें अगम न कछु संसारा ॥
भयउ नृपहि सुनि अति अनुरागा । कथा पुरातन कहै सो लागा ॥
तपामुळेच रुद्र संहार करतात. जगात अशी कोणतीही गोष् नाही. ‘ हे ऐकून राजाला ( त्याच्याविषयी अतिशय ) प्रेम वाटू लागले. तेव्हा तो तपस्वी प्राचीन कथा सांगू लागला. ॥ २ ॥
करम धरम इतिहास अनेका । करइ निरुपन बिरति बिबेका ॥
उदभव पालन प्रलय कहानी । कहेसि अमित आचरज बखानी ॥
कर्म, धर्म आणि अनेक तर्‍हेचे इतिहास सांगून तो वैराग्याचे आणि ज्ञानाचे निरुपण करु लागला. सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि संहार यांच्या मोठ्या आश्र्चर्यकारक कथा त्याने विस्ताराने सांगितल्या. ॥ ३ ॥
सुनि महीप तापस बस भयऊ । आपन नाम कहन तब लयऊ ॥
कह तापस नृप जानउँ तोही । कीन्हेहु कपट लाग भल मोही ॥
त्या ऐकून राजा त्या तपस्व्याच्या पूर्णपणे अधीन झाला आणि मग त्याला तो आपले नाव सांगू लागला. तपस्वी म्हणाला, ‘ राजा मी तुला जाणतो. तू कपटाने खोटे नाव सांगितलेस, ते मला आवडले. ॥ ४ ॥
सो—सुनु महीस असि नीति जहँ तहँ नाम न कहहिं नृप ।
मोहि तोहि पर अति प्रीति सोइ चतुरता बिचारि तव ॥ १६३ ॥
हे राजन, ऐक. नीती असे सांगते की, राजे लोक वाटेल तेथे आपले नाव सांगत नाहीत. तुझे हे चातुर्य पाहून मला तुझ्याविषयी फार प्रेम वाटू लागले आहे. ॥ १६३ ॥
नाम तुम्हार प्रताप दिनेसा । सत्यकेतु तव पिता नरेसा ॥
गुर प्रसाद सब जानिअ राजा । कहिअ न आपन जानि अकाजा ॥
तुझे नाव प्रतापभानू आहे. महाराज सत्यकेतू तुझे वडील होते. हे राजन, गुरुंच्या कृपेमुळे मी सर्व जाणतो, परंतु त्यात आपलाच तोटा समजून मी सांगत नाही. ॥ १ ॥
देखि ताततव सहज सुधाई । प्रीति प्रतीति नीति निपुनाई ॥
उपजि परी ममता मन मोरें । कहउँ कथा निज पूछे तोरें ॥
 हे राजन, तुझा सहज साधेपणा, प्रेम, विश्वास आणि नीति-निपुणता पाहून माझ्या मनात तुझ्याबद्दल ममता उत्पन्न झाली आहे. म्हणून मी तू न विचारता आपली कहाणी सांगतो. ॥ २ ॥
अब प्रसन्न मैं संसय नाहीं । मागु जो भूप भाव मन माहीं ॥
सुनि सुबचन भूपति हरषाना । गहि पद बिनय कीन्हि बिधि नाना ॥
आता मी खूष आहे, यात शंका बाळगू नकोस. ‘ हे राजन, मनात जे येईल, ते मागून घे. ‘ हे मनमोहक बोलणे ऐकून राजाला आनंद झाला आणि मुनीच्या पाया पडून त्याने विनवणी केली. ॥ ३ ॥
कृपासिंधु मुनि दरसन तोरें । चारि पदारथ करतल मोरें ॥
प्रभुहि तथापि प्रसन्न बिलोकी । मागि अगम बर होउँ असोकी ॥
‘ हे दयासागर मुनी, तुझ्या दर्शनानेच चारी पुरुषार्थ ( धर्म, अर्थ, काम, मोक्ष ) माझ्या हाती आले. तरीही स्वामींना प्रसन्न पाहून मी असा दुर्लभ वर मागतो की, मी शोकरहित व्हावे. ॥ ४॥
दोहा—जरा मरन दुख रहित तनु समर जितै जनि कोउ ।
एकछत्र रिपुहीन महि राज कलप सत होउ ॥ १६४ ॥
माझे शरीर वृद्धावस्था, मृत्यु आणि दुःखाने रहित होवो. मला युद्धात कुणीही जिंकू नये आणि पृथ्वीवर माझे शंभर कल्प एकछत्री राज्य असावे.’ ॥ १६४ ॥
कह तापस नृप ऐसेइ होऊ । कारन एक कठिन सुनु सोऊ ॥
कालउ तुअ पद नाइहि सीसा । एक बिप्रकुल छाड़ि महीसा ॥
तपस्वी म्हणाला, ‘ हे राजन, ‘ तथास्तु ‘ परंतु एक गोष्ट कठीण वाटते, तीही ऐक. हे पृथ्वीच्या स्वामी, फक्त ब्राह्मण कुलातील लोक सोडून प्रत्यक्ष काळसुद्धा तुझ्या चरणी मस्तक ठेवील. ॥ १ ॥
तपबल बिप्र सदा बरिआरा । तिन्ह के कोप न कोउ रखवारा ॥
जौं बिप्रन्ह बस करहु नरेसा । तौ तुअ बस बिधि बिष्नु महेसा ॥
तपामुळे ब्राह्मण नेहमी बलवान असतात. त्यांचा क्रोध झाल्यास रक्षण करणारा कोणीही नाही. हे नरपती, जर तू ब्राह्मणांना वश केलेस, तर ब्रह्मदेव, विष्णू व महेश हे सुद्धा तुझ्या अधीन होतील. ॥ २ ॥
चल न ब्रह्मकुल सन बरिआई । सत्य कहउँ दोउ भुजा उठाई ॥
बिप्र श्राप बिनु सुनु महिपाला । तोर नास नहिं कवनेहुँ काला ॥
ब्राह्मणांवर बळजबरी चालत नसते, हे मी दोन्ही हात उभारुन सत्य सांगतो. हे राजा, ऐक. ब्राह्मणांच्या शापाशिवाय तुझा नाश कोणत्याही काळी होणार नाही.’ ॥ ३ ॥
हरषेउ राउ बचन सुनि तासू । नाथ न होइ मोर अब नासू ॥
तव प्रसाद प्रभु कृपानिधाना । मो कहुँ सर्ब काल कल्याना ॥
राजा ते बोलणे ऐकून अतिशय प्रसन्न झाला आणि म्हणाला, ‘ हे स्वामी, आता माझा नाश कधीही होणार नाही. हे कृपानिधान प्रभो, तुमच्या कृपेने माझे आता नित्य कल्याण होईल.’ ॥ ४ ॥
एवमस्तु कहि कपटमुनि बोला कुटिल बहोरि ।
मिलब हमार भुलाब निज कहहु त हमहि न खोरि ॥ १६५ ॥
‘ असेच होईल ‘, असे म्हणून तो कुटिल मुनी म्हणाला, ‘ परंतु मला भेटला होतास आणि वाट चुकला होतास, ही गोष्ट जर कुणालाही सांगितलीस, तर मग ( वर सफल न झाल्यास ) आमचा दोष नाही. ॥ १६५ ॥
तातें मैं तोहि बरजउँ राजा । कहें कथा तव परम अकाजा ॥
छठें श्रवन यह परत कहानी । नास तुम्हार सत्य मम बानी ॥
हे राजा, मी तुला एवढ्यासाठी मनाई करतो की, हा प्रसंग कोणालाही सांगितल्यास तुझे मोठे नुकसान होईल. हे माझे सत्य वचन समज. ॥ १ ॥
यह प्रगटें अथवा द्विजश्रापा । नास तोर सुनु भानुप्रतापा ॥
आन उपायँ निधन तव नाहीं । जौं हरि हर कोपहिं मन माहीं ॥
हे प्रतापभानू, ऐक. ही गोष्ट जाहीर करण्याने किंवा ब्राह्मणांच्या शापाने तुझा नाश होईल, इतर कोणत्याही कारणाने नाही. अगदी (ब्रह्मदेव ), विष्णू, शंकर हेसुद्धा तुझ्यावर रागावले, तरी तुला मृत्यु येणार नाही.’ ॥ २ ॥स
सत्य नाथ पद गहि नृप भाषा । द्विज गुर कोप कहहु को राखा ॥
राखइ गुर जौं कोप बिधाता । गुर बिरोध नहिं कोउ जग त्राता ॥
राजाने मुनीचे पाय धरुन म्हटले, ‘ हे स्वामी, खरेच आहे. ब्राह्मण आणि गुरुच्या क्रोधापासून बचाव कोण बरे करणार ? सांगा. जरी ब्रह्मदेव रागावले, तरी गुरु वाचवितो, पण गुरु रागावले, तर जगात कोणीही वाचविणारा नाही. ॥ ३ ॥
जौं न चलब हम कहे तुम्हारें । होउ नास नहिं सोच हमारें ॥
एकहिं डर डरपत मन मोरा । प्रभु महिदेव श्राप अति घोरा ॥
जर मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागलो नाही, तर 

खुशाल 

मला मृत्यु येवो. मला त्याची काळजी नाही. पण माझ्या 

मनात एकच भीती आहे. ती म्हणजे ब्राह्नणांचा शाप 

भयंकर असतो. ॥ ४ ॥


Custom Search