Showing posts with label Ovya 89 to 113 भक्तियोग भाग ५. Show all posts
Showing posts with label Ovya 89 to 113 भक्तियोग भाग ५. Show all posts

Monday, December 19, 2022

BhaktiYoga Part 5 Adhyay 12 भक्तियोग भाग ५ अध्याय १२

 

BhaktiYoga Part 5
Shri Dnyaneshwari 
Adhyay 12 Ovya 89 to 113 
भक्तियोग भाग ५ 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय १२ 
ओव्या ८९ ते ११३

म्हणोनि गा पांडवा । मूर्तीचा मेळावा ।

करुनि त्यांचिया गांवा । धांवतु आलों ॥ ८९ ॥

८९) म्हणून अर्जुना, सगुणरुप धारण करुन, भक्तांच्या गांवाला मी धांवत आलों.

नामाचिया सहस्रवरी । नावा इया अचधारीं ।

सजूनिया संसारीं । तारु जाहलों ॥ ९० ॥

९०) माझीं हजारों नांवें ह्याच कोणी नावा, त्या तयार करुन संसारसागरांतून भक्तांना तारणारा मी नावाडी झालों असें समज.

सडे जे देखिले । ते ध्यानकासे लाविले ।

परिग्रही घातले । तरियावरी ॥ ९१ ॥

९१) जे भक्त सडे ( अंतर्बाह्य परिग्रहरहित ) असे मी पाहिले, त्यांस ( माझ्या ) ध्यानरुपी कांसेला लाविलें व परिग्रही होते त्यांना नामरुपी नावेवर बसविलें.

प्रेमाची पेटी । बांधली एकाचां पोटीं ।

मग आणिले तटीं । सायुज्याचां ॥ ९२ ॥

९२) एकाच्या पोटीं प्रेमाची पेटी बांधली आणि मग त्यास मोक्षाच्या कांठावर आणलें.

परि भक्तांचेनि नांवें । चतुष्पादादि आघवे ।

वैकुंठींचिये राणिवे । योग्य केले ॥ ९३ ॥    

९३) परंतु, जे माझे भक्त असे ( माझ्या दृष्टीनें ठरलेले आहेत ) मग ते ( गजेंद्रासारखे ) चार पायांचीं जनावरें वगैरे कां असेनात, पण त्या सर्वांस वैकुंठाच्या राज्यास योग्य केलें.     

म्हणोनि गा भक्तां । नाहीं एकही चिंता ।

तयातें समुद्धर्ता । आथि मी सदा ॥ ९४ ॥

९४) म्हणून माझ्या भक्तांना एकहि चिंता नाही. कारण त्यांचा उद्धार करणारा मी नेहमीं तयार आहे.  

आणि जेव्हांचि का भक्तीं । दिधली चित्तवृत्ती ।

तेव्हांचि मज सूती । तयांचिये नाटीं ॥ ९५ ॥

९५) आणि जेव्हां भक्तांनी ( आपली ) चित्तवृत्ति मला दिली, त्या वेळीं त्यांनी मला ( आपल्या ) छंदांत घातलें. 

याकारणें गा भक्तराया । हा मंत्र तुवां धनंजया ।

कीजे जे यया । मार्गा भजिजे ॥ ९६ ॥

९६) याकरितां हे भक्तश्रेष्ठा अर्जुना, भक्तिमार्गाचें आचरण करावें. हा विचार पक्का लक्षांत ठेव.

मूळ श्लोक

मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय ।

निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः ॥ ८ ॥

८) माझ्या ठिकाणीं मन वृत्तिवंत करुन घाल. माझ्या ठिकाणीं बुद्धि स्थिर कर. (  म्हणजे ) त्यानंतर तूं माझ्या ठिकाणीं निवास करशील ( मद्रूप होशील ) यांत संशय नाहीं. 

अगा मानस हें एक । माझां स्वरुपीं सवृत्तिक ।

करुनि घालीं निष्टंक । बुद्धिनिश्र्चयेंसीं ॥ ९७ ॥

९७) अरे अर्जुना, बुद्धीच्या निश्चयासह, तूं आपले मन फक्त माझ्या स्वरुपीं अखंड वतनदार करुन ठेव.

इये दोनी सरिसीं । मजमाजीं प्रेमेंसीं ।

रिगालीं तरी पावसी । मातें तूं गा ॥ ९८ ॥

९८) बा अर्जुना, या दोघांनीं ( बुद्धी व मन यांनी ) जर माझ्यामध्यें प्रेमानें बरोबर प्रवेश केला, तर तूं मला पावशील.

जे मन बुद्धि इहीं । घर केलें माझां ठायीं ।

तरी सांगे मग काई । मी तूं ऐसे उरे ॥ ९९ ॥

९९) कारण कीं, मन ब बुद्धि हीं माझ्या ठिकाणीं कायमची राहिलीं तर मग, मी व तूं असें द्वैत उरेल काय ? सांग.

म्हणोनि दिवा पालवे । सवेंचि तेज मालवे ।

कां रविबिंबासवें । प्रकाशु जाय ॥ १०० ॥

१००) म्हणून पदराच्या वार्‍यानें दिवा मालवला असतां त्या दिव्याचें तेज ( जसें ) लागलीच नाहींसें होंतें; अथवा सूर्यास्ताच्या वेळीं त्या सूर्याच्या बिंबाबरोबर ( जसा ) प्रकाश जातो; 

उचललेया प्राणासरिसीं । इंद्रियेंही निगती जैसीं ।

तैसा मनोबुद्धिपाशीं । अहंकारु ये ॥ १०१ ॥

१०१) शरीरांतून प्राण निघाल्याबरोबर इंद्रियें जशीं त्याच्या बरोबर निघतात, त्याप्रमाणें जिकडे मन व बुद्धि जातील तिकडे त्यांच्याबरोबर अहंकार येतो.

म्हणोनि माझां स्वरुपीं । मनबुद्धि इयें निक्षेपीं ।

येतुलेनि सर्वव्यापी । मीचि होसी ॥ १०२ ॥

१०२) म्हणून माझ्या स्वरुपीं मन व बुद्धि ही दोन्ही ठेव. एवढ्यानें सर्वव्यापी जो मी, तोच तूं होशील.

यया बोला कांहीं । अनारिसें नाहीं ।

आपली आण पाहीं । वाहतु असें गा ॥ १०३ ॥

१०३) अर्जुना, हें जे मी बोललों, यांत कांहीं अन्यया नाहीं, असें मी आपली शपथ वाहून तुला सांगतों.

मूळ श्लोक

अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् ।

अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनजंय ॥ ९ ॥

९) अथवा माझ्या ठिकाणीं चित्त स्थिर करण्याला समर्थ नसलास तर, हे धनंजया, ( चित्तैकाग्रतेचा ) अभ्यास करुन माझी प्राप्ति करुन घेण्याची इच्छा कर.

अथवा हें चित्त । मनबुद्धीसहित ।

माझां हातीं अचुबिंत । न शकसी देवों ॥ १०४ ॥

१०४) अथवा जर मनबुद्धिसहित हें चित्त माझ्या हातीं ( सकलवासनारहित असें ) संपूर्ण तू देऊं शकणार नाहीस,

तरि गा ऐसें करीं । यां आठां पाहारांमाझारीं ।

मोटकें निमिषभरी । देतु जाय ॥ १०५ ॥

१०५) तर अर्जुना, असें कर कीं, या आठ प्रहरांमध्यें नेमकें निमिषभर चित्त ( मला ) देत जा.

मम जें जें कां निमिख । देखेल माझें सुख ।

तेतुलें अरोचक । विषयीं घेईल ॥ १०६ ॥

१०६) मग जितकें जितकें निमिष तुझें चित्त माझें सुख पाहील, तितकें तुझे चित्त विषयांच्या ठिकाणीं अरुची घेईल.

जैसा शरत्कालु रिगे । आणि सरिता वोहटूं लागे ।

तैसें चित्त काढेल वेगें । प्रपंचौनि ॥ १०७ ॥

१०७) ज्याप्रमाणें शरद् ऋतूचा प्रवेश झाला असता नद्यांचे पाणी कमी होऊं लागतें, त्याप्रमाणें तुझ्या चित्ताचा माझ्या स्वरुपांत जसजसा प्रवेश होईल, तसतसें तुझें चित्त प्रपंचांतून वेगानें निघेल., 

मग पुनवेहूनि जैसें । शशिबिंब दिसें दिसें ।

हारपत अंवसे । नाहींचि होय ॥ १०८ ॥

१०८) मग ज्याप्रमाणें पौर्णिमेपासून दिवसेंदिवस चंद्राचें बिंब कमी होत होत अमावास्येलाअगदीं नाहींसे होतें;

तैसें भोगाआंतूनि निगतां । चित्त मजमाजीं रिगतां ।

हळूहळू पांडुसुता । मीचि होईल ॥ १०९ ॥

१०९) त्याप्रमाणें भोगांतून तुझें चित्त निघून माझ्यामध्यें

 प्रवेश करतां करतां, अर्जुना, तें तुझें चित्त हळूहळू मद्रूप

 होईल.

अगा अभ्यासयोगु म्हणिजे । तो हा एकु जाणिजे ।

येणें कांहीं न निपजे । ऐसें नाहीं ॥ ११० ॥

११०) अरे, अभ्यासयोग जो म्हणतात, तो हाच एक आहे, असें समज. याच्या योगानें कोणतीहि गोष्ट प्राप्त होणार नाहीं, असें नाहीं. 

पैं अभ्यासाचेनि बळें । एकां गति अंतराळे ।

व्याघ्र सर्प प्रांजळे । केले एकी ॥ १११ ॥

१११) अभ्यासाच्या सामर्थ्यानें कित्येक आकाशाच्या पोकळींत चालूं शकतात व कित्येकांनी वाघ व साप यासारखे दुष्ट प्राणी करुन घेतले.

विष कीं आहारीं पडे । समुद्रीं पायवाट जोडे ।

एकीं वाग्ब्रह्म थोकडें । अभ्यासें केलें ॥ ११२ ॥

११२) विष खाण्याचा अभ्यास केला असतां तें विषदेखील पचनीं पडलें. अभ्यासाच्या योगानें समुद्रावरुन पायानें जातां येतें; कित्येकांनीं वेदांचा अभ्यास करुन ते वेद आटोक्यांत आणले,

म्हणोनि अभ्यासासि कांहीं । सर्वथा दुष्कर नाहीं ।

यालागीं माझां ठायीं । अभ्यासें मिळ ॥ ११३ ॥

११३) म्हणून अभ्यासाला कोणतीहि गोष्ट मुळींच कठीण

 नाहीं, याकरितां माझ्या स्वरुपीं तूं अभ्यासाने एकरुप हो.



Custom Search