Sunday, November 10, 2013

Gurucharitra Adhyay 25 गुरुचरित्र अध्याय २५


Gurucharitra Adhyay 25 
Gurucharitra Adhyay 25 is in Marathi. This is story when Shri Guru was at Gangapur. The name of this adhyay is VipraAtmaprashanshana. Two vipras came at Kumasi and were asking TrivikramBharati to have a conversation with them over Vedas. Further they asked him to give them in writing that he is defeated by them and they have more knowledge than him on Vedas. Though TrivikramBharati was having sufficient knowledge to defeat the vipras, he being no pride asked the vipras to come to his Guru at Gangapur where he (TrivikramBharati) will give them a letter of defeat if Guru says so. 
गुरुचरित्र अध्याय २५ 
श्रीगणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ 
जय जया सिद्धयोगि मुनि । तूंचि तारक शिरोमणि । 
साक्षी येतसे अंतःकरणीं । बोधिला माते परमार्थ ॥ १ ॥ 
ऐसा कृपाळू सर्वेश्र्वर । आपण जाहला अवतार । 
येरा दिसतसे नर । ज्ञानी जनां प्रत्यक्ष ॥ २ ॥ 
तया त्रिविक्रमभारतीसी । दाविले रुप प्रत्यक्षेसीं । 
पुढें कथा वर्तली कैसी । तें निरोपावें दातारा ॥ ३ ॥ 
सिद्ध म्हणे ऐक बाळा । श्रीगुरुची अगम्य लीळा । 
सांगतां होय बहुकाळा । साधारण सांगतसे ॥ ४ ॥ 
समस्त महिमा सांगतां । विस्तार होईल बहु कथा । 
याचिकारणें तुज क्वचिता । निरोपीतसे बाळका ॥ ५ ॥ 
पुढें वर्तलें अपूर्व एक । ऐक शिष्या नामधारका । 
' विदुरा ' नाम नगर एक । होता राजा यवनवंशीं ॥ ६ ॥ 
महाक्रूर ब्रह्मद्वेषी । सदा करी जीवहिंशी । 
चर्चा करवी ब्राह्मणांसी । वेद म्हणवी आपणापुढें ॥ ७ ॥ 
विप्रांसी म्हणे तो यवन । जे कां असती विद्वज्जन । 
आपुल्या सभेसी येऊन । वेद सर्व म्हणावे ॥ ८ ॥ 
त्यातें देईन द्रव्य बहुत । सर्वांमध्यें तें मान्यवंत । 
जे कोण सांगतील वेदार्थ । विशेष त्यासी पूजा करुं ॥ ९ ॥ 
ऐसें ऐकूनि ज्ञानी जन । नेणों म्हणती ' मतिहीन ' । 
जे कोण असती ज्ञानहीन । कांक्षा करिती द्रव्यावरी ॥ १० ॥ 
जाऊनि तया म्लेंच्छापुढें । वेदशास्रे वाचिती गाढें । 
म्लेंच्छामनीं असे कुडें । ऐके अर्थ-यज्ञकांड ॥ ११ ॥ 
म्हणे विप्र यज्ञ करिती । पशुहत्या करणें रीती । 
आम्हां म्लेंच्छांतें निंदिती । पशुवधी म्हणोनियां ॥ १२ ॥ 
येणेंपरी ब्राह्मणांसी । निंदा करी बहुवसी । 
योग्यता ज्या द्विजवरांसी । अपार द्रव्य देता होय ॥ १३ ॥ 
येणेंपरी तो यवन । देतो द्रव्य म्हणोन । 
ऐकते जाहले सकळ जन । देशोदेशींचे विप्रकुळ ॥ १४ ॥ 
वेदशास्रीं अति निपुण । द्रव्यावरी करुनि मन । 
भेटते जाहले त्या यवना । वेद म्हणती त्यापुढें ॥ १५ ॥ 
ऐसें मंदमति विप्र । त्यांची जोडी यमाचें नगर । 
मदोन्मत्त दुराचार । कलियुगींचे तेचि इष्ट ॥ १६ ॥ 
येणेपरी वर्तमानीं । वर्तत असतां एके दिनीं । 
मंदभाग्य विप्र दोनी । येऊनि भेटले रायासी ॥ १७ ॥ 
वेदशास्र अभिज्ञाती । तीन वेद जाणों म्हणती । 
तया यवनापुढें कीर्ति । आपली आपणचि सांगते झाले ॥ १८ ॥ 
विप्र म्हणती रायासी । कोणी नाहीं आम्हांसरसी । 
वाद करावया वेदांसी । नव्हती या चारी राष्ट्रांत ॥ १९ ॥ 
असती जरी तुझ्या नगरीं । त्वरित येथे पाचारीं । 
आम्हांसवें वेद चारी । चर्चा करवी त्या द्विजांसी ॥ २० ॥ 
 विप्रवचन ऐकोनि । राजा पडे साभिमानी । 
आपुले नगरीचे ब्राह्मण आणोनि । समस्तांसे पुसतसे ॥ २१ ॥ 
राजा म्हणे समस्तांसी । चर्चा करा तुम्ही यांशीं । 
जे जिंकिती तर्केसीं । अपार द्रव्य देऊं म्हणे ॥ २२ ॥ 
ऐकोनियां ज्ञानी जन । म्हणों लागले त्या यवना । 
ऐसी योग्यता आहे कवणा । जे यांतें पराभविजे ॥ २३ ॥ 
आम्हांमध्यें हेचि श्रेष्ठ । विप्र दोन्ही महासुभट । 
यांतें करोनियां प्रगट । मान द्यावा महाराजा ॥ २४ ॥ 
ऐसें म्हणती द्विज समस्त । ऐकोनि राजा मान देत । 
वस्त्रें भूषणें विचित्र । गजावरी आरुढ करी ॥ २५ ॥ 
आरुढोनि हस्तीवरी । मिरवा म्हणे आपुले नगरीं । 
नव्हती विप्र यांचे सरी । हेचि राजे विप्रांचे ॥ २६ ॥ 
आपण राजा यवनांसी । द्विज राजे हे ब्राह्मणांसी । 
ऐसे भूसुर तामसी । म्लेंच्छांपुढे वेद म्हणती ॥ २७ ॥ 
महातामसी ब्राह्मण । द्विजांतें करुनियां दूषण । 
राजे म्हणविती आपण । तया यवनराज्यांत ॥ २८ ॥ 
ऐसें असतां वर्तमानीं । विप्र मदांधे व्यापूनि । 
राजापुढे जाऊनि । विनविताति तयासी ॥ २९ ॥ 
विप्र म्हणती रायासी । आम्हां योग्यता बहुवसी । 
न मिळे एखादा वादासी । वृथा झाले शिकोनियां ॥ ३० ॥ 
आमुचे मनी बहु आर्ता । करणें वाद वेदशास्त्रार्था । 
निरोप द्यावा जाऊं आतां । विचारुं तुझ्या राष्ट्रांत ॥ ३१ ॥ 
जरी मिळेल एखादा नरु । तयासवे चर्चा करुं । 
न मिळे तैसा द्विजवरु । जयपत्र घेऊं गावोंगावीं ॥ ३२ ॥ 
राजा म्हणे तयांसी । जावें राष्ट्रा त्वरितेंसी । 
पराभवावें ब्राह्मणांसी । म्हणोनि निरोप देतसे ॥ ३३ ॥ 
यवनाचे आज्ञेसी । निघाले द्विजवर तामसी । 
पर्याटण करितां राज्यासीं । गांवोगांवी विचारिती ॥ ३४ ॥ 
गांवोगांवीं हिंडती । जयपत्रे लिहून घेती । 
ऐसी कवणा असेल शक्ति । तयांसन्मुख उभा होय ॥ ३५ ॥ 
समस्त नगरें हिंडतां । गेले तया दक्षिणपंथा । 
भीमातीर असे ख्याता । ' कुमसी ' ग्राम उत्तम ॥ ३६ ॥ 
तेथें होता महामुनि । ' त्रिविक्रमभारती ' म्हणोनि । 
त्यासी येती वेद तीनी । अनेकशास्त्रीं अभज्ञ ॥ ३७ ॥ 
महामुनि कीर्तिवंत । म्हणोनि सांगती जन समस्त । 
ऐकती द्विज मदोन्मत्त । गेले तया मुनीपाशी ॥ ३८ ॥ 
जाऊनि म्हणती तयासी । त्रिवेदी ऐसें म्हणविसी । 
चर्चा करावी आम्हांशीं । अथवा द्यावे हारीपत्र ॥ ३९ ॥ 
विप्रवचन ऐकोनि । म्हणतसे त्रिविक्रममुनि । 
आम्ही नेणो वेद तीनी । अथवा नेणों वेद एक ॥ ४० ॥ 
जरी जाणतों वेदशास्त्र । तरी कां होतों अरण्यपात्र । 
वंदन करिते राजे समग्र । तुम्हांसादृश्य भोग भोगितो ॥ ४१ ॥
नेणों म्हणोनि अरण्यवासी । वेष धरिला असे संन्यासी । 
आम्ही भिक्षुक तापसी । तुम्हांसमान नव्हे जाणा ॥ ४२ ॥ 
हारी अथवा जिंतून । नाहीं त्याचा साभिमान । 
तुम्ही उत्कृष्ट विद्वज्जन । आम्हांसवे काय वाद ॥ ४३ ॥ 
ऐकोनि मुनीचें वचन । तवका आले ते ब्राह्मण । 
आम्हांसवें वाद कवण । करणार ऐसा भूमंडळीं ॥ ४४ ॥ 
हिंडत आलों सकळ राष्ट्र । आम्हांसमान नाही नर । 
म्हणोनि दाविती जयपत्र । असंख्यात परियेसा ॥ ४५ ॥ 
येणेपरी आपणांसी । जयपत्र द्यावें विशेषीं । 
अभिमान असेल मानसीं । करी गा वाद म्हणताति ॥ ४६ ॥ 
अनेकपरी त्या ब्राह्मणांसी । सांगे मुनि विनयेंसीं । 
न ऐकती द्विज महातामसी । मागती जयपत्र आपुलें ॥ ४७ ॥ 
त्रिविक्रम महामुनि । विचार करी आपुले मनीं । 
यांते न्यावें गाणगाभुवनीं । शिक्षा करणें द्विजांतें ॥ ४८ ॥ 
विप्र मदांधें व्यापिले । अनेक ब्राह्मण धिक्कारिले । 
यांते उपाय करणें भले । म्हणोनि योजना करीतसे ॥ ४९ ॥ 
त्रिविक्रम म्हणे त्या ब्राह्मणांसी । चला गाणगापुरासी । 
तेथें देईन तुम्हांसी । जयपत्र विस्तारें ॥ ५० ॥ 
तेथें असती आमुचे गुरु । तयांपुढें देईन पत्रु । 
अथवा तुमचे मनींचा भारु । करु शमन म्हणती देखा ॥ ५१ ॥ 
ऐशी निगुती करुनि । निघाला त्रिविक्रम महामुनि । 
सवें येतीं विप्र दोनी । आंदोलिके बैसोनियां ॥ ५२ ॥ 
मूढ ब्राह्मण अज्ञानी । यतीश्र्वरातें चालवोनि । 
आपण बैसले सुखासनीं । म्हणोनि अल्पायुषी जाहले ॥ ५३ ॥ 
पातले तया गाणगापुरा । जें कां स्थानीं श्रीगुरुवर । 
रम्य स्थान भीमातीर । वास नृसिंहसतस्वती ॥ ५४ ॥ 
नमन करुनि श्रीगुरुसी । विनवी मुनि भक्तींसीं । 
कृपामूर्ति व्योमकेशी । भक्तवत्सल परमपुरुषा ॥ ५५ ॥ 
जय जया जगद्गुरु । निर्गुण तूं निर्विकारु । 
त्रयमूर्तींचा अवतारु । अनाथांचा रक्षक ॥ ५६ ॥ 
दर्शन होतांचि तुझे चरण । उद्धरे संसार भवार्ण । 
नेणती तुज अज्ञानजन । अधोगतीचे तेचि इष्ट ॥ ५७ ॥ 
सद्गदित कंठ जाहला । रोमांचळ उठियेला । 
नेत्रीं बाष्प आनंद-जळा । माथा ठेविला चरणांवरी ॥ ५८ ॥ 
नमन करितां मुनीश्र्वरातें । उठविलें श्रीगुरुनाथें । 
आलिंगोनि करुणावक्त्रें । पुसता झाला वृत्तांत ॥ ५९ ॥ 
श्रीगुरु पुसती यतीश्र्वरासी । आलेति कवण कार्यासी । 
विस्तारुनि आम्हांसी । निरोपावें मुनिवरा ॥ ६० ॥ 
श्रीगुरुवचन ऐकोनि । सांगतसे त्रिविक्रम मुनि । 
मदोन्मत्त विप्र दोनी । आले असती चर्चेसी ॥ ६१ ॥ 
वेदशास्त्रादि मीमांसे । म्हणती चर्चा करुं हर्षें । 
वेद चारी आपुले वश्य । म्हणती मूढ विप्र दोनी ॥ ६२ ॥ 
जरी न कराल चर्चा आम्हांशी । पत्र मागती हारी ऐसी । 
अनेकपरी तयांसी । सांगतां न ऐकती उन्मत्त ॥ ६३ ॥ 
म्हणोनि आलों तुम्हां जवळी । तूंचि स्वामी श्रीगुरुमौळी । 
तुझें वाक्य असे बळी । तेणेपरी निरोपावें ॥ ६४ ॥ 
मुनिवचन ऐकोनि । श्रीगुरु बोलती हास्यवदनी । 
आले होते विप्र दोनी । त्यांते पुसती वृत्तांत ॥ ६५ ॥ 
श्रीगुरु म्हणती विप्रांसी । आलां तुम्ही कवण कार्यासी । 
वाद काय असे तुम्हांसी । काय लाभ येणेंगुणें ॥ ६६ ॥ 
आम्ही तापसी संन्यासी । आम्हां हारी-जित सरसी । 
काय थोरीव तुम्हांसी । जय होतां यतीसवें ॥ ६७ ॥ 
श्रीगुरुवचन ऐकोनि । बोलते जाहले विप्र दोनी । 
आलों पृथ्वी हिंडोनि । समस्त विप्र जिंकीत ॥ ६८ ॥ 
नव्हे कोणी आम्हां सन्मुख । वेदचर्चा-पराङ्गमुख । 
म्हणोनि पत्रें अनेक । जयादिकें दाखविलीं ॥ ६९ ॥ 
येणे रीतीं आम्हांसी । पत्र देता काय सायासी । 
कोप आला त्रिविक्रमासी । घेऊनि आला तुम्हांजवळीं ॥ ७० ॥ 
जरी असेल साभिमान । तुम्हांसहित दोघेजण । 
वेदशास्त्रादि व्याकरण । चर्चा करा म्हणती विप्र ॥ ७१ ॥ 
आम्ही जाणों वेद चारी । नव्हती कोणी आम्हांसरी । 
तुम्ही दोघे यतीश्र्वरी । काय जाणाल वेदांत ॥ ७२ ॥ 
श्रीगुरु म्हणती विप्रांसी । गर्वे नाश समस्तांसी । 
 देवदानवादिकांसी । गर्वे मृत्यु लाधला जाणा ॥ ७३ ॥ 
गर्वे बळीसी काय जाहलें । बाणासुरा काय पावलें । 
लंकानाथ कौरव गेले । वैवस्वत क्षेत्रासी ॥ ७४ ॥ 
कवण जाणे वेदान्त । ब्रह्मादिकां नकळे पंथ । 
वेद आदिअनंत । गर्व वाया तूं कां गा करिसी ॥ ७५ ॥ 
जरी विचारिसी आपुलें हित । तरी सांडिजे गर्व भ्रांत । 
काय जाणसी वेदान्त । चतुर्वेदी म्हणविसी ॥ ७६ ॥ 
श्रीगुरुवचन ऐकोनि । गर्वे दाटले बहु मनीं । 
जाणों आम्ही वेद तीनी । साङ्ग संहिता परियेसा ॥ ७७ ॥ 
येणेंपरी श्रीगुरुसी । बोलती ब्राह्मण गर्वेंसी । 
सिद्ध म्हणे नामधारकासी । अपूर्व पुढें वर्तले ॥ ७८ ॥ 
या वेदांचे आद्यन्त । श्रीगुरु ब्राह्मणांसी निरोपित । 
सांगेन ऐका एकचित्त । म्हणे सरस्वती-गंगाधर ॥ ७९ ॥ 
॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने 
 सिद्ध-नामधारकसंवादे विप्रआत्मप्रशंसानाम पंचविंशोऽध्यायः॥ 
 श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 
 Gurucharitra Adhyay 25 
 गुरुचरित्र अध्याय २५


Custom Search

No comments: