Wednesday, November 20, 2013

Gurucharitra Adhyay 26 गुरुचरित्र अध्याय २६


Gurucharitra Adhyay 26 
Gurucharitra Adhyay 26 is in Marathi. This is a continuation of story of Adhyay 25 when Shri Guru was at Gangapur. The name of this adhyay is Vedvistar kathanam. Two vipras who were very proud of their knowledge were asking TrivikramBharati for a conversation with them over Vedas. TrivikramBharati took them to ShriGuru where ShriGuru telling them Vedvistar.


गुरुचरित्र अध्याय २६ 
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ 
श्रीगुरु म्हणती ब्राह्मणांसी । नका भ्रमूं रे युक्तींसी । 
वेदान्त न कळे ब्रह्मयासी । अनंत वेद आहेति देखा ॥ १ ॥ 
वेदव्यासा-ऐसा मुनि । नारायण अवतरोनि । 
वेद व्यस्त करोनि । ' व्यास ' नाम पावला ॥ २ ॥ 
तेणेही पूर्ण नाहीं केले । साधारण सांगितले । 
शिष्य होते चौघे भले । प्रख्यात नामें अवधारा ॥ ३ ॥ 
तयां शिष्यांची नामें देखा । सांगेन विस्तारें ऐका । 
' पैल ' ' वैशंपायन " निका । तिसरा नामें ' जैमिनी ' ॥ ४ ॥ 
चौथा ' सुमंतु ' शिष्य । करीन म्हणे वेदाभ्यास । 
त्यांसी म्हणे वेदव्यास । अशक्य तुम्हां शिकतां ॥ ५ ॥ 
एकेक वेद व्यक्त शिकतां । पाहिजे दिवस कल्पांता । 
चारी वेद केवीं वाचितां । अनंत महिमा वेदांची ॥ ६ ॥ 
या वेदांचे आद्यंत । सांगेन ऐका एकचित्त । 
पूर्वी भारद्वाज विख्यात । ऋषि अभ्यास करीत होता ॥ ७ ॥ 
ब्रह्मकल्प तीन फिरले । वर्षें शत वाचले । 
ब्रह्मचर्य आचरलें । वेद पूर्ण शिकों म्हणूनि ॥ ८ ॥ 
लवलेश आले त्यासी । पुनरपि करी तपासी । 
ब्रह्मा प्रसन्न झाला परियेंसीं । काय मागसी म्हणोनि ॥ ९ ॥ 
भारद्वाज म्हणे ब्रह्मयासी । स्वामी मज प्रसन्न होसी । 
वेद शिकेन आद्यंतेसीं । ब्रह्मचर्य आश्रमीं ॥ १० ॥ 
वेदान्त मज दावावे । सर्व माते शिकवावे । 
ऐसे वर मज व्हावे । म्हणोनि चरणीं लागला ॥ ११ ॥ 
ब्रह्मा म्हणे भारद्वाजासी । मिति नाही या वेदांसी । 
सर्व केवीं शिको म्हणसी । आम्हांसी वेद अगोचर ॥ १२ ॥ 
तुज दाखवीन पाहे सकळ । करोनियां मन निर्मळ । 
 शक्य झालिया सर्वकाळ । अभ्यास करीं भरद्वाजा ॥ १३ ॥ 
ऐसें म्हणोनि ऋषिसी । ब्रह्मा दाखवी वेदांसी । 
दिसताति तीन राशि । गिरिरूप होवोनि ॥ १४ ॥ 
ज्योतिर्मय कोटि सूर्य । पाहतां ऋषीस जाहलें भय । 
वेदराशी तीन गिरिमये । केवीं शिकूं म्हणोनि ॥ १५ ॥ 
ब्रह्मकल्प तीनवरी । आचरलों आश्रम ब्रह्मचारी । 
शिकलों वेद तावन्मात्रीं । एवढे गिरि कधीं शिकों ॥ १६ ॥ 
म्हणोनि भयभीत झाला । ब्रह्मयाचे चरणीं लागला । 
म्हणे स्वामी अशक्य केवळा । क्षमा करणें म्हणोनि ॥ १७ ॥ 
या वेदांचे आद्यंत । आपण पहावया अशक्त । 
तूंचि जाणसी जगन्नाथ । जें देसी तें घेईन ॥ १८ ॥ 
तूं शरणागता आधार । माझे मनीं वासना थोर । 
वेद शिकावे आपार । म्हणोनि आलों तुजपाशीं ॥ १९ ॥ 
वेद आहेति अमित । इतके शिकावया अशक्त । 
येईल तुमच्या चित्तांत । तितुकें द्यावें आम्हांसी ॥ २० ॥ 
ऐसें वचन ऐकोनि । ब्रह्मदेव संतोषोनि । 
देता झाला मुष्टी तीनी । अभ्यास करीं म्हणोनि ॥ २१ ॥ 
तीन वेदांचे मंत्रजाळें । वेगळें केले तात्काळ । 
ऐसे चारी वेद प्रबळ । अभ्यास करी भारद्वाज ॥ २२ ॥ 
अजून पुरतें नव्हे त्यासी । केवी शिकूं पहातां वेदांसी । 
सांगेन तुम्हां एकेकासी । चौघे वाचा चारी वेद ॥ २३ ॥ 
पूर्ण एकेका वेदास । शिकतां होईल अति प्रयास । 
सांगेन थोडें तुम्हांस । अभ्यास व्यक्त करावया ॥ २४ ॥ 
शिष्य म्हणती व्यासासी । एक एक वेद आम्हांसी । 
विस्तारावा आद्यंतेसीं । जे शक्य आम्हां तें शिकूं ॥ २५ ॥ 
ऐसें विनविती चौघेजण । मुनि धरिती व्यासचरण । 
कृपा करीं गा गुरुराणा । नारायणा व्यासराया ॥ २६ ॥ 
करुणावचन एकोनि । व्यास सांगे संतोषोनि । 
' पैल ' शिष्यातें बोलावोनि । ऋग्वेद निरोपीत ॥ २७ ॥ 
ऐक पैल शिष्योत्तमा । सांगेन ऋग्वेद महिमा । 
पठण करीं गा धर्मकर्मा । ध्यान पूर्वी करोनि ॥ २८ ॥ 
पैल म्हणे व्यासासी । बरवें विस्तारावें आम्हांसी । 
ध्यानपूर्वक लक्षणेंसी । भेदाभेद निरोपावे ॥ २९ ॥ 
त्यांत शक्य जें आम्हांसी । तेंचि शिकों भक्तीसीं । 
तूं कामधेनु आम्हांसी । कृपा करीं गा गुरुमूर्ति ॥ ३० ॥ 
व्यास सांगे पैलासी । ऋग्वेदध्यान परियेसी । 
वर्ण-रुप आहे कैसी । भेदाभेद सांगेन ॥ ३१ ॥ 
ऋग्वेदाचा उपवेद । असे प्रख्यात आयुर्वेद । 
अत्रिगोत्र म्हणा सदा । ब्रह्मा-दैवत जाणावें ॥ ३२ ॥ 
गायत्रीचे छंदासी । रक्तवर्ण परियेसीं । 
नेत्र पद्मपत्रसदृशी । विस्तार-ग्रीवा-कंठ असे ॥ ३३ ॥ 
कुंचित-केशी श्मश्रु, प्रमाण । द्विअरत्नी दीर्घ जाण । 
ऋग्वेद ऐसे रुपधारण । मूर्ति घ्यावी येणेपरी ॥ ३४ ॥ 
आतां भेद सांगेन ऐका । प्रथम ' चर्चाश्रावका ' । 
द्वितीय ' चर्चक श्रवणिया ' ऐका । ' पार ' - ' क्रम ' दोनी शाखा ॥ ३५ ॥ 
' जटा ' ' शकट ' शाखा दोनी । सातवा ' दंड ' म्हणोनि । 
भेद सप्त निर्गुणी । पांच भेद आणीक असती ॥ ३६ ॥ 
' शाकला ' ' बाष्कला ' दोनी ।' आश्र्वलायनी ' शांखायनी ' । 
पांचवी ' मांडूकेया ' म्हणोनि । ऐसे भेद द्वादश ॥ ३७ ॥ 
श्रीगुरु म्हणती ब्राह्मणांसी । व्यासें सांगितलें शिष्यासी । 
ऐसे या ऋग्वेदासी । द्वादश भेद विस्तार ॥ ३८ ॥ 
या कलियुगाभीतरीं । म्हणविसी वेद चारी । 
 वायां करिसी थोरी । ' अध्यापक म्हणोनिया ॥ ३९ ॥ 
तया द्वादश भेदांत । एक शाखा असे विख्यात । 
सलक्षण व्यक्त । कवण जाणे सांग मज ॥ ४० ॥ 
नारायण व्यासमुनि । शाखा द्वादश विस्तारोनि । 
सांगितल्या संतोषोनि । पैल म्हणिजे शिष्यासी ॥ ४१ ॥ 
ऋग्वेदाचे भेद ऐसे । सांगितले वेदव्यासें । 
श्रीगुरु म्हणती हर्षें । मदोन्मत्त द्विजांसी ॥ ४२ ॥ 
यजुर्वेद विस्तार । सांगेन ऐका अपार । 
' वैशंपायन ' शिष्य थोर । अभ्यास केला परियेसा ॥ ४३ ॥ 
व्यास म्हणे शिष्यासी । ऐक एकचित्तेंसी । 
ऐसे या यजुर्वेदासी । उपवेद धनुर्वेद ॥ ४४ ॥ 
भारद्वाज गोत्र जाणा । अधिदैवत रुद्र म्हणा । 
त्रिष्टुप्छंद तुम्ही म्हणा । आतां ध्यान सांगेन ॥ ४५ ॥ 
कृशमध्य निर्धारी । स्थूल-ग्रीवा-कपोल धरी । 
कांचनवर्ण मनोहरी । नेत्र असती पिंगट ॥ ४६ ॥ 
शरीर ताम्र-असितवर्ण । पांच अरत्नी दीर्घ जाण । 
यजुर्वेद ध्यान प्रमाण । वैशंपायना परियेसीं ॥ ४७ ॥ 
ऐशिया यजुर्वेदासी । भेद असती शायशीं । 
सांगेन ऐका भरंवसीं । म्हणे व्यास शिष्यातें ॥ ४८ ॥ 
प्रथम ' चरका ' ' आह्वरका ' । तिसरी नामें ' कठा ' ऐका । 
' प्राच्यकठा 'चतुर्थिका । ' कपिष्ठला ' पांचवी पैं ॥ ४९ ॥ 
सहावी असे ' चारायण ' । वार्तातवीया ' सातवी खूण । 
' श्र्वेत ' म्हणिजे आठवी जाण । ' श्र्वेताश्र्वतर ' नवमी ॥ ५० ॥ 
' मैत्रायणी ' असे नाम । शाखा असे हो दशम । 
तिसी भेद उत्तम । असती सात परियेसा ॥ ५१ ॥ 
' मानवा ' ' दुंदुमा ' दोनी । तिसरा ' ऐकेया ' म्हणोनि । 
' वाराहा ' नाम चौथा खुणी । भेद असे परियेसा ॥ ५२ ॥ 
येरा नाम ' हारिद्रवा ' । भेद जाणा तुम्ही पांचवा । 
' श्याम ' म्हणजे सहावा । सातवा ' श्यामायणी ' जाणा ॥ ५३ ॥ 
वाजसनेया शाखेसी । भेद असती अष्टादशी । 
 नामें सांगेन परियेसीं । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणांतें ॥ ५४ ॥ 
' वाजसनेय ' नाम एक । द्वितीय नाम ' जाबालिक ' । 
' बौधेय ' नाम विशेख । चतुर्थ ' काण्व ' परियेसा ॥ ५५ ॥ 
' माध्यंदिन ' पंचमेसी । ' शाफेय ' नाम षष्ठेसी । 
' तापनीय ' सप्तमेसी । ' कापाल ' षविख्यात ॥ ५६ ॥ 
' पौंड्रवत्स ' नाम विख्यात । ' आवटिक ' नामें उन्नत । 
एकादश भेद नित्य । ' परमावटिक ' परियेसा ॥ ५७ ॥ 
' पाराशर्य द्वादशी ।' वैनेय ' नामें त्रयोदशी । 
चतुर्दश भेद पुससी । ' वैधेय ' म्हणती तयातें ॥ ५८ ॥ 
' औधेय ' नाम विशेषी । जाणा शाखा पंचदशी । 
' गालव ' म्हणिजे षोडशी । सप्तदशी ' वैजव ' नाम ॥ ५९ ॥ 
' कात्यायनी ' नाम विशेषी । शाखा जाण अष्टादशी । 
वाजसनीय शाखेसी । भेद असती येणेपरी ॥ ६० ॥ 
तैत्तिरीय शाखा भेद दोनी । व्यास सांगे विस्तारोनि । 
' औख्या ' ' कांडिकेया ' म्हणोनि । यासी भेद पांच असती ॥ ६१ ॥ 
' आपस्तंबी ' असे थोर । शाखा असे मनोहर । 
यज्ञादि कर्मे आचार । विस्तार असे तयांत ॥ ६२ ॥ 
दुसरा जाणा ' बौधायनी ' । ' सत्याषाढी ' असे त्रीणी । 
' हिरण्यकेशी ' म्हणोनि । चौथा भेद परियेसा ॥ ६३ ॥ 
' औखेयी ' म्हणोनि नांव । भेद असे पांचवा । 
अनुक्रमें पढावा । म्हणे व्यास शिष्यासी ॥ ६४ ॥ 
षडंगे असती विशेषे । नांमे तयांचीं सांगेन ऐके । 
' शिक्षा ' ' कल्प ' ' व्याकरणिक ' । ' निरुक्त '' छंद ' 'ज्योतिष ' ॥ ६५ ॥ 
यांसी उपांगे असती आणिक । त्यांची नामें तूं ऐक । 
' प्रतिपद ' ' अनुपम ' देख । ' छंदस ' तिसरा परियेसा ॥ ६६ ॥ 
' भाषा '' धर्म ' पंचम । ' मीमांसा ''न्याय ' सप्तम । 
' तर्क ' सहित अष्टम । उपांगें असती परियेसा ॥ ६७ ॥ 
परिशिष्टें अष्टादश । असती ऐका विशेष । 
विस्तार करुनि परियेस । व्यास सांगे शिष्यासी ॥ ६८ ॥ 
पूर्वी होत्या वेदराशी । शिकतां अशक्य मानवांसी । 
म्हणोनि लोकोपकारासी । व्यासे केला विस्तार ॥ ६९ ॥ 
शाखाभेद येणेपरी । विस्तार केला परिकरीं । 
जे जे मति आपले उदरीं । तितुके शिकावें म्हणोनि ॥ ७० ॥ 
येणेपरी विस्तारीं । सांगे व्यास परिकरीं । 
वैशंपायन अवधारीं । विनवीतसे तये वेळीं ॥ ७१ ॥ 
यजुर्वेद विस्तारेंसीं । निरोपिला आम्हांसी । 
शाखाभेद अनुक्रमेसी । वेगळाले करोनियां ॥ ७२ ॥ 
संदेह होतो आम्हांसी । मूळशाखा कवण ऐसी । 
विस्तार करोनि प्रीतिसीं । निरोपावे स्वामिया ॥ ७३ ॥ 
व्यास म्हणे शिष्यासी । बरवें पुसिलें आम्हांसी । 
या यजुर्वेदासी । मूळ तुम्हां सांगेन ॥ ७४ ॥ 
मंत्र-ब्राह्मण-संहिता । मिळोनि पढती मिश्रिता । 
 तेंचि मूळ असे ख्याता । यजुर्वेद म्हणिजे तया ॥ ७५ ॥ 
आणिक एक असे खूण । ' संहिता ' मिळोनि ' ब्राह्मण ' । 
तोचि यजुर्वेद मूळ जाण । वरकड शाखा पल्लव ॥ ७६ ॥ 
यज्ञादि कर्मक्रियेसी । हेंचि मूळ परियेसीं । 
अभ्यास करी गा विधींसीं । म्हणे व्यास शिष्यातें ॥ ७७ ॥ 
ऐकोनियां वैशंपायन । विनवीतसे कर जोडून । 
यजुर्वेदमूळ विस्तारोन । निरोपावें स्वामिया ॥ ७८ ॥ 
व्यास म्हणे शिष्यासी । सांगेन ऐक विस्तारेंसीं । 
ग्रंथत्रय असती यासी । अभ्यास करी म्हणतसे ॥ ७९ ॥ 
सप्त अष्टक संहितेसी । एकेकाचे विस्तारेंसीं । 
सांगेन तुज भरंवसीं । म्हणे व्यास शिष्यांते ॥ ८० ॥ 
प्रथम ' इषेत्वा ' प्रश्र्नासी । अनुवाक जाणा चतुर्दशी । 
आठ अधिक विसांसी । पन्नासा असती परियेसा ॥ ८१ ॥ 
' आपउंदंतु ' प्रश्र्नासी । अनुवाक असती चतुर्दशी । 
चारी अधिक तिसांसी । पन्नासा तुम्ही जाणाव्या ॥ ८२ ॥ 
' देवस्यत्वा ' प्रश्र्नासी । अनुवाक असती चतुर्दशी । 
एक अधिक तिसांसी । पन्नास जाणा विस्तार ॥ ८३ ॥ 
चौथा प्रश्र्न ' आददे 'ति । षट्चत्वारिंशत् अनुवाक ख्याती । 
पन्नासा जाणा निरुती । वेदाधिक पन्नास ॥ ८४ ॥ 
' देवासुर ' नामक प्रश्र्न । अनुवाक एकादश पूर्ण । 
पन्नासा असती एकावन्न । पंचम प्रश्र्नीं अवधारा ॥ ८५ ॥ 
' संत्वासिंचा ' इति प्रश्र्न । द्वादश अनुवाक परिपूर्ण । 
पन्नासा एकावन्न । असती सहावे प्रश्र्नासी ॥ ८६ ॥ 
' पाकयज्ञ ' नामक प्रश्र्न । त्रयोदश अनुवाक जाण । 
पन्नासा असती एकावन्न । सप्तम प्रश्र्नीं विस्तार ॥ ८७ ॥ 
' अनुमत्यै ' इति प्रश्र्नासी । अनुवाक जाणा द्वाविंशी । 
द्विचत्वारी पन्नासा त्यासी । प्रथम अष्टक येणेंपरी ॥ ८८ ॥ 
प्रथम अष्टकासी प्रश्र्न । त्याची संख्या सांगेन । 
ते ऐका चित्त देऊन । प्रश्र्न अष्ट जाणिजे ॥ ८९ ॥ 
एक शत चत्वारी । अधिक सहा निर्धारीं । 
अनुवाक असती परिकरीं । अंतःकरणी धरावें ॥ ९० ॥ 
पन्नासा असती ख्यातीसी । त्रिशताधिक बेचाळिशी । 
प्रथमाष्टकीं जाणा ऐसी । म्हणोनि सांगे व्यासमुनि ॥ ९१ ॥ 
द्वितीयाष्टकविस्तार । सांगेन तुज परिकर । 
प्रथम प्रश्र्नाचें नाम थोर । ' वायव्य ँ्' म्हणावें ॥ ९२ ॥ 
प्रथम प्रश्र्न विशेष । अनुवाक जाणा एकादश । 
पांसष्टी असती पन्नासा । एकचित्ते परियेसा ॥ ९३ ॥ 
पुढें असे द्वितीय प्रश्र्न । नाम ' प्रजापति-गुहान् ' । 
द्वादश अनुवाक तुम्ही जाण । दशसप्तक एक पन्नासा ॥ ९४ ॥ 
' आदित्येभ्यः ' प्रश्र्नासी । अनुवाक जाणा चतुर्दशी । 
षट्अधिक पंचाशी । पन्नासा तुम्ही पढाव्या ॥ ९५ ॥ 
प्रश्र्न ' देवामानुषी ' । अनुवाक जाणा चतुर्दशी । 
अष्ट अधिक चत्वारिंशी । पन्नासा तुम्ही वाचिजे ॥ ९६ ॥ 
म्हणतां जाय महापाप । प्रश्र्न असे ' विश्र्वरुप ' । 
द्वादश अनुवाक स्वरुप । चारी अधिक सत्तरी पन्नासा ॥ ९७ ॥ 
' समिधा ' नाम प्रश्र्नास । निरुते अनुवाक द्वादश । 
दश-सप्तक पन्नासा असती त्यास । एकचित्तें परियेसा ॥ ९८ ॥ 
ऐसे द्वितीय अष्टकासी । सहा प्रश्र्न परियेसीं । 
पांच अधिक सत्तरीसी । अनुवाक तुम्हीं जाणावे ॥ ९९ ॥ 
पन्नासांचिये गणन । सांगेन तुज विस्तारोन । 
तीन शत अशीति जाणा । वेदाधिक परियेसा ॥ १०० ॥ 
तिसरा अष्टक सविस्तर । सांगेन तुम्हां मनोहर । 
वैशंपायन शिष्य थोर । गुरुमुखें ऐकतसे ॥ १०१ ॥ 
तिसरा अष्टक प्रश्र्न प्रथम । नाम ' प्रजापतिरकाम ' । 
अनुवाक एकादश उत्तम । द्विचत्वारि पन्नासा त्यासी ॥ १०२ ॥ 
दुसरा प्रश्र्न असे जाण । नाम ' योवैपवमान ' । 
एकादश अनुवाक जाण । षट्चत्वारी पन्नासा त्यासी ॥ १०३ ॥ 
तृतीय प्रश्र्न बरवी । नाम असे ' अग्नेतेजस्वी ' । 
अनुवाकांची एकादशी । षट्त्रिंशती पन्नासा त्यासी ॥ १०४ ॥ 
चौथा प्रश्र्न ' विवाएत ' । एकादश अनुवाक ख्यात । 
षट्चत्वारी पन्नासा त्यांत । एकचित्तें परियेसा ॥ १०५ ॥ 
पुढें प्रश्र्ण पंचम । म्हणावें ' पूर्णापश्र्चात् ' नाम । 
अनुवाक अकरा उत्तम । षट्त्रिंशति पन्नासा त्यासी ॥ १०६ ॥ 
ऐसे पांच प्रश्र्ण तृतीयाष्टकासी । अनुवाक पंचपंचाशी त्यासी । 
द्विशत अधिक सहा त्यासी । पन्नासा असती अवधारा ॥ १०७ ॥ 
चौथा अष्टक प्रथम प्रश्र्न । नामें असे ' युंजान '। 
एकादश अनुवाक खूण । षट्चत्वारी पन्नासा त्यासी ॥ १०८ ॥ 
प्रश्र्न ' विष्णोःक्रमोसि ' । अनुवाक असती एकादशी । 
आठ अधिक चत्वारिंशी । पन्नासा त्यासी विस्तार ॥ १०९ ॥ 
तिसरा प्रश्र्न उत्तम । नाम जाणा तुम्ही ' अपांत्वेम ' । 
त्रयोदश अनुवाक नेम । षट्त्रिंशत् पन्नासा त्यासी ॥ ११० ॥ 
चौथा प्रश्र्न ' रश्मिरसि ' । अनुवाक असती द्वादशी । 
सप्ताधिक तीस त्यासी । पन्नासा ऐसे तुम्ही जाणा ॥ १११ ॥ 
' नमस्ते रुद्र ' उत्तम । प्रश्र्न जाणा पंचम । 
एकादश अनुवाक नेम । सप्ताधिक वीस पन्नासा ॥ ११२ ॥ 
' अश्मन्नूर्ज ' प्रश्र्नास । नव अनुवाक विशेष । 
षट्चत्वारी पन्नासा त्यास । एकचित्ते परियेसा ॥ ११३ ॥ 
प्रश्र्न ' अग्नाविष्णू ' सी । अनुवाक जाणा पंचदशी । 
एक न्यून चाळिसांसी । पन्नासा त्यासी विस्तारें ॥ ११४ ॥ 
ऐशे चतुर्थ अष्टकासी । सप्त प्रश्र्न परियेसीं । 
अनुवाक असती ब्यायशीं । द्विशत एक उणे ऐंशी पन्नासा ॥ ११५ ॥ 
पंचमाष्टक प्रथम प्रश्र्न । नामें ' सावित्राणि ' जाण । 
पन्नासा षष्ठी एक उणे । एकादश अनुवाक ख्यात ॥ ११६ ॥ 
' विष्णुमुखा ' प्रश्र्नासी । अनुवाक असती द्वादशी । 
चतुःषष्ठी पन्नासा त्यासी । श्रीगुरु म्हणती द्विजांते ॥ ११७ ॥ 
तिसरा प्रश्र्न ' उत्सन्न ' । द्वादश अनुवाक धरा खूण । 
पन्नासांसी द्वय न्यून । पन्नासा असती परियेसा ॥ ११८ ॥ 
चौथा प्रश्र्न ' देवासुरा ' । अनुवाक असती त्यासी बारा । 
षष्ठीसी दोन उण्या करा । पन्नासा असती परियेसा ॥ ११९ ॥ 
' यदेकेन ' नाम प्रश्र्न । चतुर्विशति अनुवाक खूण । 
दोन अधिक षष्ठी जाण । पन्नासा असती परियेसा ॥ १२० ॥ 
' हिरण्यवर्णा ' षष्ठ प्रश्र्न । त्रयोविंशति अनुवाक जाण । 
षष्ठीमध्ये सहा न्यून । पन्नासा असती परियेसा ॥ १२१ ॥ 
' यो वा आ य था 'नामें प्रश्र्न । षड्विंशति अनुवाक जाण । 
षष्ठीमध्ये द्वय न्यून । पन्नासा असती परियेसा ॥ १२२ ॥ 
पंचमाष्टक संहितेसी । सप्त प्रश्र्न परियेंसी । 
अनुवाक एक शत त्यांसी । वीस अधिक विस्तारें ॥ १२३ ॥ 
त्रीणि अधिक चतुःशत । पन्नासा असती जाणा विख्यात । 
मन करुनि सावचित्त । ऐका म्हणे तयेवेळीं ॥ १२४ ॥ 
षष्ठमाष्टक संहितेसी । प्रथम प्रश्र्न परियेसीं । 
' प्राचीनवंश ' म्हणा ऐसी । एकादश अनुवाक जाणा ॥ १२५ ॥ 
अधिक सहा सत्रीसी । पन्नासा त्यासी परियेसीं । 
विस्तार करुनि शिष्यासी । सांगतसे व्यासदेव ॥ १२६ ॥ 
' यदुमौ ' नाम प्रश्र्नासी । अनुवाक जाणा एकादशी । 
एके उणे षष्टीसी । पन्नासा असती परियेंसी ॥ १२७ ॥ 
तिसरा प्रश्र्न ' चात्वाल ' । एकादश अनुवाक माळ । 
पन्नासा षष्टी द्वय स्थूळ । तिसरे प्रक्ष्नीं परियेसीं ॥ १२८ ॥ 
चवथा प्रश्र्न ' यज्ञेन ' । एकादश अनुवाक जाण । 
पन्नासा एक अधिक पन्न । एकचित्तें परियेसा ॥ १२९ ॥ 
' इंद्रोवृत्र ' नाम प्रश्र्न । एकादश अनुवाक जाण । 
द्विचत्वारि पन्नासा खूण । पंचम प्रश्र्न येणेपरी ॥ १३० ॥ 
' सुवर्गाय ' प्रश्र्नासी । अनुवाक असती एकादशी । 
त्रीणी अधिक चत्वारिंशी । पन्नासा असती परियेसा ॥ १३१ ॥ 
सहावा अष्टक परिपूर्ण । यासी सहा असती प्रश्र्न । 
सासष्ट अनुवाक जाण । त्रयस्त्रिंशस्त्रिशत पन्नासा ॥ १३२ ॥ 
सप्तमाष्टक प्रथम प्रश्र्न । नामें असे ' प्रजानन ' । 
अनुवाक वीस असती खूण । द्विपंचाशी पन्नासा त्यास ॥ १३३ ॥ 
' साध्या ' जाणिजे द्वितीय प्रश्र्न । अनुवाक वीस असती खूण । 
पन्नासा पन्न परिपूर्ण । एकचित्ते परियेसा ॥ १३४ ॥ 
' प्रजवं वा ' नाम प्रक्ष्नासी । अनुवाक वीस परियेसीं । 
द्विचत्वारि पन्नासा त्यासी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणातें ॥ १३५ ॥ 
' बृहस्पतिरकाम ' प्रश्र्न । द्वाविंशति अनुवाक जाण । 
त्रीण्यधिक पन्न खूण । पन्नासा असती अवधारा ॥ १३६ ॥ 
प्रश्र्न असे पंचम । ' गावो वा ' नामें उत्तम । 
पंचविंशति अनुवाक नेम । चत्वारि पंच पन्नासा त्यासी ॥ १३७ ॥ 
सप्तमाष्टक संहितेसी । प्रश्र्न पांच परियेसीं । 
एकशत सप्त त्यासी । अनुवाक असती विस्तार ॥ १३८ ॥ 
द्विशतावरी अधिकेसी । एकावन्न असती पन्नासी । 
सप्तमाष्टक असे सुरसी । एकचित्तें परियेसा ॥ १३९ ॥ 
सप्तअष्टक संहितेसी । प्रश्र्न चतुश्र्चत्वारी भरंवसीं । 
षट्शत एक अधिकेसी । पन्नास अनुवाक विस्तार ॥ १४० ॥ 
द्विउणें शतद्वय सहस्र दोनी । पन्नासा तुम्ही जाणोनि । 
पठण करा म्हणोनि । व्यास सांगे शिष्यासी ॥ १४१ ॥ 
तीन अष्तक ब्राह्मणांत । असती जाण विख्यात । 
सांगेन ऐका एकचित्त । म्हणे व्यास शिष्यासी ॥ १४२ ॥ 
प्रथमाष्टक ब्राह्मणासी । प्रश्र्न आठ परियेसी । 
नामें सांगेन सुरसी । एकचित्तें परियेसा ॥ १४३ ॥ 
प्रथम प्रश्र्न ' ब्रह्मसंधत ' । नाम असे विख्यात । 
अनुवाक दहा विस्तृत । अशीति दशक असती मनोहर ॥ १४३ ॥ 
' उद्धन्य ' नाम दुसरा प्रश्र्न । सहा अनुवाक शतक पन्न । 
वाजपेय अनुसंधान । ' देवासुरा ' प्रश्र्न तिसरा ॥ १४५ ॥ 
त्यासी दश अनुवाक जाण । पंच अधिक षष्टि दशक खूण । 
चौथा ' उभये ' नाम प्रश्र्न । दश अनुवाक मनोहर ॥ १४६ ॥ 
संवत्सरगणित सहा अधिका । त्यासी जाण तुम्ही दशका । 
पांचवा ' अग्नेःकृत्तिका ' । प्रश्र्न असे अवधारा ॥ १४७ ॥ 
त्यासी अनुवाक द्वादश । सांगेन ऐका दशक । 
दोन अधिक षष्ठी विशेष । एकचित्तें परियेसा ॥ १४८ ॥ 
सहावा प्रश्र्न ' अनुमत्य ' । अनुवाक पहा प्रख्यात । 
पांच अधिक सत्री निरुत । दशक त्यासी अवधारा ॥ १४९ ॥ 
सप्तम प्रश्र्ना धरा खूण । नाम त्या ' एतद्-ब्राह्मण ' । 
दश अनुवाक आहेत जाण । चतुःषष्टि दशक त्यासी ॥ १५० ॥ 
आठवा ' वरुणस्य ' नाम प्रश्र्न । अनुवाक त्यासी दहा जाण । 
सप्त अधिक तीस प्रमाण । दशक त्यासी मनोहर ॥ १५१ ॥ 
प्रथम अष्टक ब्राह्मणासी । प्रश्र्न आठ परियेसीं । 
अष्टसप्तति अनुवाक त्यासी । एकचित्ते परियेसा ॥ १५२ ॥ 
एक उणे पांच शत । दशक आहेत विख्यात । 
वैशंपायन ऐकत । गुरुमुखेकरोनि ॥ १५३ ॥ 
दुसरा अष्टक ब्राह्मांस । प्रथम प्रश्र्न ' अंगिरस ' । 
अनुवाक जाणा एकादश । साठी दशक मनोहर ॥ १५४ ॥ 
' प्रजापतिरकाम ' कांड । प्रश्र्न दुसरा महा गोड । 
एकादश अनुवाक द्दढ । त्रिसप्तति दशक त्यासी ॥ १५५ ॥ 
कांड ' ब्रह्मवादिन ' । एकादश अनुवाक जाण । 
दशक आहेति त्यासी पन्न । एकचित्तें परियेसा ॥ १५६ ॥ 
' जुष्टो ' नाम प्रश्र्न ऐक । अनुवाक आठ अशीति दशक । 
वैशंपायन शिष्यक । गुरुमुखें ऐकतसे ॥ १५७ ॥ 
प्रश्र्न ' प्राणोरक्षति ' । अष्ट अनुवाक त्यासी ख्याति । 
पंच अधिक चत्वारिंशती । दशक तुम्ही ओळखिजे ॥ १५८ ॥ 
' स्वाद्वींत्वा ' नामें षष्ठम । सौत्रामणि-प्रश्र्न उत्तम । 
अनुवाक असती वीस खूण । षडशीति दशक त्यासी ॥ १५९ ॥ 
सप्तम प्रश्र्न ' त्रिवृता ' सी । अनुवाक असती अष्टादशी । 
सहा अधिक षष्ठीसी । दशक त्यासी मनोहर ॥ १६० ॥ 
 अष्टम प्रश्र्न ' पीवोअन्न ' । अनुवाक असती नऊ जाण । 
अशीतीसी एक उणा । दशक त्यासी मनोहर ॥ १६१ ॥ 
द्वितीय अष्टक ब्राह्मणासी । आठ प्रश्र्न परियेसीं । 
वेद उणे शतक त्यासी । अनुवाक असती मनोहर ॥ १६२ ॥ 
पांच शताउपरी । एक उणे चत्वारी । 
दशक आहेति विस्तारीं । एकचित्तें परियेसा ॥ १६३ ॥ 
तृतीयाष्टक ब्राह्मणासी । प्रश्र्न असती द्वादशी । 
नामें त्यांची परियेसीं । एकचित्तें अवधारा ॥ १६४ ॥ 
प्रथम प्रक्ष्न विख्यातु । नाम ' अग्निर्नःपातु ' । 
सहा अनुवाक विख्यातु । त्रीणि अधिक षष्ठी दशक ॥ १६५ ॥ 
' तृतीयस्य ' द्वितीय प्रश्र्न । अनुवाक दहा असती जाण । 
पंचाशीति दशक खूण । एकचित्तें परियेसा ॥ १६६ ॥ 
तिसरा प्रश्र्न ' प्रत्युष्ट ँे रक्ष ' । अनुवाक असती एकादश । 
एका उणे ऐशीं दशक । एकचित्तें अवधारा ॥ १६७ ॥ 
चौथा प्रश्र्न ' ब्रह्मणेसि ' । अनुवाक एक परियेसीं । 
एक उणे विसासी । दशक त्यासी मनोहर ॥ १६८ ॥ 
पंचम प्रश्र्न नाम ' सत्य ' । त्रयोदश अनुवाक विख्यात । 
एक उणें तीस दशक । एकचित्तें परियेसा ॥ १६९ ॥ 
सहावा प्रश्र्न ' अंजंति ' । पंचदश अनुवाक ख्याति । 
अष्ट अधिक त्रिंशति । दशक त्यासी जाणावे ॥ १७० ॥ 
 ' अच्छिद्र ' नाम प्रश्र्न । चतुर्दश अनुवाक जाण । 
तीस अधिक शत खूण । दशक त्यासी मनोहर ॥ १७१ ॥ 
प्रश्र्न अश्र्वमेधासी । ' सांग्रहण्या ' ख्यातीसी । 
अनुवाक असती त्रयोविंशी । एक-नवति दशक ॥ १७२ ॥ 
' प्रजापति 'र्नाम । अश्र्वमेध असे उत्तम । 
त्रयोविंशति अनुवाक नेम । चार अधिक अशीति दशक त्यासी ॥ १७३ ॥ 
' संज्ञान ' म्हणिजे काठका । एकादश अनुवाक असती ऐका । 
एका उणे पन्नास दशक । एकचित्तें परियेसा ॥ १७४ ॥ 
दुसरा ' लोकोसि ' काठक । दश अनुवाक असती ऐक । 
दोनी अधिक षष्ठी दशक । व्यास म्हणे शिष्यासी ॥ १७५ ॥ 
द्वादश प्रश्र्न ' तुभ्य ' काठकासी । अनुवाक नव परियेसीं । 
सहा अधिक पन्नासासी । दशक त्यासि मनोहर ॥ १७६ ॥ 
तिसरे अष्टक ब्राह्मणांत । द्वादश प्रश्र्न विख्यात । 
अनुवाक एक शत षट्चत्वारिंशत । सातशत पंचाशीति दशक जाणा ॥ १७७ ॥ 
तीनी अष्टक ब्राह्मणासी । प्रश्र्न सांगेन परियेंसी । 
आठ अधिक विसांसी । एकचित्तें अवधारा ॥ १७८ ॥ 
त्रीणि शत विसांसी । एक अधिक परियेंसी । 
अनुवाक आहेति विस्तारेंसीं । ' परात्त ' ब्राह्मणासी परियेसा ॥ १७९ ॥ 
दशक संख्या विस्तार । अष्टशत अधिक सहस्र । 
त्रयोविंशति उत्तर । अधिक असती परियेसा ॥ १८० ॥ 
आतां सांगेन ' अरण्य ' । त्यासी असती दहा प्रश्र्न । 
विस्तारोनियां सांगेन । एकचित्ते अवधारा ॥ १८१ ॥ 
' भद्र ' नाम प्रथम प्रश्र्न । द्वात्रिंशत् अनुवाक खूण । 
एक शत तीस जाण । दशक त्यासी मनोहर ॥ १८२ ॥ 
' स्वाध्याय ' ब्राह्मणासी । अनुवाक वीस परियेसीं । 
चतुर्विंश दशक त्यासी । एकचित्तें परियेसा ॥ १८३ ॥ 
' चित्ती ' म्हणिजे प्रश्र्नासी । अनुवाक एकविंशी । 
तीन अधिक पन्नासासी । दशक त्यासी विस्तार ॥ १८४ ॥ 
असे थोर चवथा प्रश्र्न । नाम ' मंत्रब्राह्मण ' । 
द्विचत्वारि अनुवाक जाण । पंचाऐशीं दशक त्यासी ॥ १८५ ॥ 
' श्रेष्ठ ' ब्राह्मण प्रक्ष्नासी । अनुवाक जाणा द्वादशी । 
आठ अधिक शतासी । दशक तुम्ही जाणावे ॥ १८६ ॥ 
' पितृमेध ' असे प्रश्र्न । द्वादश अनुवाक परिपूर्ण । 
सप्तविंशती दशक जाण । एकचित्ते परियेसा ॥ १८७ ॥ 
' शिक्षा ' नाम प्रश्र्नासी । अनुवाक असती द्वादशी । 
तीन अधिक विसांसी । दशक त्यासी मनोहर ॥ १८८ ॥ 
' ब्रह्मवल्ली ' असे प्रश्रन । अनुवाक त्यासी नऊ जाण । 
चतुर्दश दशक असे खूण । व्यास म्हणे शिष्यांसी ॥ १८९ ॥ 
' भृगुवल्ली ' असे प्रश्र्न । अनुवाक त्यासी दहा जाण । 
पंचदश दशक जाण । एकचित्तें परियेसा ॥ १९० ॥ 
दशम प्रश्र्न ' नारायण ' । अनुवाक अशीति असती खूण । 
एकशत वेद जाण । दशक त्यासी परियेसा ॥ १९१ ॥ 
दहा प्रश्र्न अरणासी । अनुवाक जाण परियेसीं । 
दोनी शत पन्नासी । संख्या असे परियेसा ॥ १९२ ॥ 
पंचशताउपरी । ब्याऐशीं विस्तारीं । 
दशक जाणा मनोहरी । म्हणे व्यास शिष्यांते ॥ १९३ ॥ 
ऐसे ग्रंथत्रयासी । प्रश्र्न असती ब्यायशीं । 
एकविंशति अधिक द्विशतसहस्रासी । अनुवाक जाण मनोहर ॥ १९४ ॥ 
पन्नासा दशक विस्तार । सांगेन तुम्हां परिकर । 
द्वयशत दोनी सहस्र । द्वयउणे पन्नासा असती ॥ १९५ ॥ 
द्वयसहस्र चारी शत । सहा अधिक उन्नत । 
दशकीं जाण विख्यात । ग्रंथत्रय परिपूर्ण ॥ १९६ ॥ 
ऐशिया यजुर्वेदासी । भेद असती शायशीं । 
त्यांत एक भेदासी । एवढा असे विस्तार ॥ १९७ ॥ 
येणेपरी व्यासमुनीं । वैशंपायना विस्तारोनि । 
सांगितले म्हणोनि । श्रीगुरु म्हणती द्विजांसी ॥ १९८ ॥ 
तिसरा शिष्य जैमिनी । त्यासी सांगतसे व्यासमुनि । 
' सामवेद ' विस्तारोनि । निरोपीत अवधारा ॥ १९९ ॥ 
उपवेद गांधर्व अत्र । कश्यपाचें असे गोत्र । 
विष्णु असे दैवत । जगती छंद म्हणावा ॥ २०० ॥ 
नित्यस्रग्वी असे जाण । शुचि वस्र प्रावरण । 
क्षौमी दान्त चर्मधारण । दंडधारी असे रुप ॥ २०१ ॥ 
नयन वर्ण कांचन । सूर्यासारिखे असे किरण । 
षडरत्नी दीर्घ प्रमाण । सामवेद रुप असे ॥ २०२ ॥ 
याच्या भेदा नाही मिती । अखिल सहस्र बोलती । 
ऐसी कवणा असे शक्ति । समस्त शिकूं म्हणावया ॥ २०३ ॥ 
नारायणावांचोनि । समस्त भेद नेणे कोणी । 
ऐक शिष्या जैमिनी । सांगेन तुज किंचित ॥ २०४ ॥ 
प्रथम ' असुरायणी ' । दुसरे ' वासुरायणी ' । 
' वार्तातवेय ' म्हणोनि । तिसरा भेद परियेसा ॥ २०५ ॥ 
' प्रांजली ' भेद असे एक । ' ऋग्वैनविध ' पंचम ऐक । 
आणि ' प्राचीनयोग्य ' शाखा । असे सहावा परियेसा ॥ २०६ ॥ 
' ज्ञानयोग्य ' सप्तम । ' राणायनी ' असे ज्या नाम । 
यासी भेद नवम । आहेत ऐका एकचित्तें ॥ २०७ ॥ 
' राणायनी '' शाट्यायनी ' । तिसरा ' शाट्या ' म्हणोनि । 
' मुद्गल ' नाम जाणोनि । चौथा भेद परियेसा ॥ २०८ ॥ 
' खल्वला ' ' महाखल्वला ' । षष्ठ नामें ' लाङ्गला ' । 
सप्तम भेद ' कौथुमा ' भला । ' गोतम ' म्हणिजे परियेसा ॥ २०९ ॥ 
नवम शाखा ' जैमिनी ' । ऐसे भेद विस्तारोनि । 
 सांगितले व्यासमुनीं । श्रीगुरु म्हणती द्विजांसी ॥ २१० ॥ 
पूर्ण सामवबेदासी । कोण जाणे क्षितीसी । 
तीनवेदी म्हणविसी । मदोन्मत्त होवोनियां ॥ २११ ॥ 
' सुमंतु ' म्हणिजे शिष्यासी । सांगतसे व्यास हर्षी । 
अथर्वण वेदासी । निरोपिलें परियेसा ॥ २१२ ॥ 
या अथर्वण वेदासी । उपवेद असे परियेसीं । 
' शस्रशास्र ' निक्ष्चयेसीं । ' वैतान ' असे गोत्र ॥ २१३ ॥ 
अधिदैवत इंद्र त्यासी । म्हणावें अनुष्टप् छंदासी । 
तीक्ष्ण चंड क्रूरेसी । कृष्ण वर्ण असे जाण ॥ २१४ ॥ 
कामरुपी क्षुद्रकर्म । स्वदारतुष्ट त्यासी नाम । 
विश्र्वसृजक साध्यकर्म । जलमूर्ध्नीगालव ॥ २१५ ॥ 
ऐसें रुप तयासी । भेद नऊ परियेसी । 
सुमंतु नाम शिष्यासी । सांगतसे श्रीव्यास ॥ २१६ ॥ 
' पैप्पलाद ' भेद प्रथम । दुसरा भेद ' दांत ' नाम । 
' प्रदांत ' भेद सूक्ष्म । चौथा भेद ' तौत ' जाण ॥ २१७ ॥ 
' औत ' नाम असे ऐक । ' ब्रह्मदपलाश ' विशेष । 
सातवी शाखा ऐक । ' शौनकी ' म्हणिजे परियेसा ॥ २१८ ॥ 
अष्टम ' वेददर्शी ' भेदासी । ' चारणविद्या ' नवमेसी । 
पांच कल्प परियेसीं । सांगेन ऐका एकचित्तें ॥ २१९ ॥ 
' नक्षत्र '-' विधि '-' विधान ' कल्प । 'संहिता' ' शांति ' असे कल्प । 
समस्त देव उपांगरुप । व्यास म्हणे शिष्यांसी ॥ २२० ॥ 
ऐसें चौघां शिष्यांस । सांगतसे वेदव्यास । 
प्रकाश केला क्षितीस । भरतखंडी परियेसा ॥ २२१ ॥ 
या भरतखंडांत । पूर्वी होतें पुण्य बहुत । 
वर्णाश्रमीं आचरत । होते लोक परियेसा ॥ २२२ ॥ 
या कलियुगाभीतरीं । कर्म सांडिले द्विजवरीं । 
लोपले वेद निर्धारी । गौप्य जाहले क्षितीसी ॥ २२३ ॥ 
कर्मभ्रष्ट झाले द्विज । म्लेंच्छांपुढे बोलती वेदबीज । 
सत्व गेले याचिकाज । मंदमति झाले जाणा ॥ २२४ ॥ 
पूर्वी होते महत्व । ब्राह्मणांसी देवत्व । 
 वेदबळें नित्यत्व । भूसुर म्हणती याचिकाज ॥ २२५ ॥ 
पूर्वी राजे याचिकारण । पूजा करिती विप्रचरण । 
सर्वस्व देतां दक्षिणा । अंगीकार नच करिती ॥ २२६ ॥ 
वेदबळे विप्रांसी । त्रैमूर्ति वश होते त्यांसी । 
इंद्रादि सुरवरांसी । भय होते विप्रांचे ॥ २२७ ॥ 
कामधेनु कल्पतरु । विप्रवाक्य होतें थोरु । 
पर्वत करिती तृणाकारु । तृण पर्वत वेदसत्वें ॥ २२८ ॥ 
विष्णु आपण परियेसीं । पूजा करी ब्राह्मणांसी । 
आपुले दैवत म्हणे त्यांसी । वेदसत्वेंकरुनियां ॥ २२९ ॥ 
देवाधीनं जगत्सर्वं मंत्राधीनं च दैवतं । 
ते मंत्रा ब्राह्मणाधीना ब्राह्मणो मम दैवतम् ॥ २३० ॥ 
ऐसे महत्व ब्राह्मणांसी । पूर्वी होते परियेसीं । 
वेदमार्ग त्यजोनि सुरसी । अन्यमार्गे रहाटती ॥ २३१ ॥ 
तेणे सत्व भंगले । हीन यातीतें सेवा करुं लागले । 
अध्यापन करिती भोलें । वेद-विक्रय परियेसा ॥ २३२ ॥ 
हीन यातीपुढें देख । वेद म्हणती मूर्ख लोक । 
त्यांचे पाहूं नये मुख । ब्रह्मराक्षस होताति ॥ २३३ ॥ 
ऐसें चारी वेदांसी । शाखा असती बहुवसी । 
कवण जाणे क्षितीसी । समस्त गौप्य होऊनि गेले ॥ २३४ ॥ 
चतुर्वेदी म्हणविसी । लोकांसवे चर्चा करिसी । 
काय जाणसी वेदांसी । अखिल भेद आहेति जाणा ॥ २३५ ॥ 
ऐशियामध्यें काय लाभ । घेऊं नये द्विजक्षोभ । 
कवणें केला तूंते बोध । जाई आतां येथूनि ॥ २३६ ॥ 
आपुली आपण स्तुति करिसी । जयपत्रें दाखविसी । 
त्रिविक्रमयतीपाशी । पत्र मागसी लिहूनि ॥ २३७ ॥ 
आमुचे बोल ऐकोनि । जावें तुवा परितोनि । 
वायां गर्वे भ्रमोनि । प्राण अपुला देऊं नका ॥ २३८ ॥ 
ऐसें श्रीगुरु ब्राह्मणांसी । सांगती बुद्धि हितासी । 
न ऐकती विप्र तामसी । म्हणती चर्चा करुं ॥ २३९ ॥ 
चर्चा जरी न करुं येथे । हारी दिसेल आमुतें । 
सांगती लोक राजयातें । महत्व आमुचें उरेल केवीं ॥ २४० ॥ 
सिद्ध म्हणे नामांकिता । ऐसे विप्र मदोन्मत्ता । 
नेणती आपुले हिता । त्यांसी मृत्यु जवळी आला ॥ २४१ ॥ 
॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ 
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे 
वेदविस्तारकथनं नाम षड्विंशोऽध्यायः ॥ 
 श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
Gurucharitra Adhyay 26 
गुरुचरित्र अध्याय २६


Custom Search

No comments: