Gurucharitra Adhyay 36
Gurucharitra Adhyay 36 is in Marathi. This Adhyay describes many things which are required to do by a Brahmin. It describe the importance of Gayatri Mantra, How to perform Sabdhya, what should be the daily routine of a Brahmin and so on. Name of this Adhyay is AanhikNirupanam.
श्रीगुरुचरित्र अध्याय ३६ भाग ५/५
' प्रं ' नमः दक्षिणमुखाय । ' नं ' नमः प्राङ् मुखाय ।
' यों ' नमः ललाटे । ' यों ' नमः भ्रुवोर्मध्ये ॥ ४४१ ॥
' धिं ' नमः नेत्रत्रये । ' हिं ' नमः नासिकायां ।
' मं ' नमः तालौ । ' धीं ' नमः दंतेषु ॥ ४४२ ॥
' स्यं ' नमः कंठे । ' वं ' नमः हृदये ।
' दें ' नमः स्तनयोः । ' र्गो ' नमः उदरे ॥ ४४३ ॥
प्रणवादि--नमोऽन्त न्यास करावे । अ--कार नाभौ, उ--कार हृदये ।
म--कार मुखे, न-- कार ललाटे । म--कार शिरसि, मुद्रा हस्तेन नमस्कृत्वा ॥ ४४४ ॥
अथ मुद्रासंपुटप्रकारीं । चतुर्विशति अवधारीं ।
सांगेन त्यांचा विस्तार परी । ऐका ब्राह्मण एकचित्तें ॥ ४४५ ॥
' सुमुख ' प्रथम, ' संपुट ' दुसरा । ' वितत ' --' विस्तृत ' चतुर्थ धरा ।
' द्विमुखी ' ' त्रिमुखी, ' --चतुर्मुखी ' करा । ' पंच ' --षण्मुखी ' देखा ॥ ४४६ ॥
' अधोमुखी ' --व्यापकांजलिका । ' शकट ' ' यमपाश ' ऐका ।
' ग्रंथित ' --' संमुखोन्मुखा ' । ' प्रलंब ' --' मुष्टि ' मुद्रा ॥ ४४७ ॥
' मत्स्य ' --' कूर्म '--' वराह ' । ' सिंहाक्रांति ' ' महाक्रांती ' ' मुग्दर ' ख्याति ।
' पल्लव ' नाम मुद्रा असती । चव्वीस मुद्रा यरणेंपरी ॥ ४४८ ॥
मुद्राविणें गायत्रीमंत्र । जप करितां सर्व व्यर्थ ।
याकारणें करावा पवित्र । मुद्रापूर्वक परियेसा ॥ ४४९ ॥
गौप्य करावा मुद्राजप । शिष्यें देखिलिया नाहीं पाप ।
गुरु--पुत्रापुढें अथवा बाप । पाहिलिया दोष नाही ॥ ४५० ॥
इतुके न्यास करोनि । प्राणायाम करा तीनि ।
' समस्तपापक्षयार्थ ' म्हणोनि । अष्टोत्तरशत संकल्पावें ॥ ४५१ ॥
गायत्रीप्रथमपादासी । म्हणा ' ऋग्वेद ' --ऋषि ।
' भूमि ' तत्त्व परियेसीं । ' ब्रह्मा ' दैवत जाणावें ॥ ४५२ ॥
' गायत्री ' नाम छंदासी । म्हणावें प्रथम पादासी ।
आतां द्वितीय पादासी । विधान ऐका सांगेन ॥ ४५३ ॥
द्वितीय पाद गायत्रीसी । ' यजुर्वेद ' असे ऋषि ।
' ऋक्साम ' तत्त्व परियेसीं । ' रुद्रो ' देवता , ' त्रिष्टुप् ' --छंदः ॥ ४५४ ॥
तृतीय पाद गायत्रीसी । ' सामवेद ' असे ऋषि ।
' प्राणापान-व्यान ' ऐशी । समान तत्त्व परियेसा ॥ ४५५ ॥
' विष्णु ' देवता , छंद-- ' जगती ' । जाणावें तुम्ही एकचित्तीं ।
' समस्तपापक्षयार्थे । जपे विनियोगः ' म्हणावें ॥ ४५६ ॥
गायत्रीचें ध्यान । सांगेन तुम्हां विधान ।
एकचित्तें करा पठण । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥ ४५७ ॥
(श्र्लोक) मुक्ताविद्रुमहेमनीलधवलच्छायैर्मुखैस्त्रीक्षणैर्युक्तामिंदुकलानिबद्धमुकुटां तत्त्वार्थवर्णात्मिकाम् ।
गायत्रीं वरदाभयांकुशकशां शूलं कपालं गुणं शंखं चक्रमथारविंदयुगलं हस्तैर्वहतीं भजे ॥ ४५८ ॥
ऐसें ध्यान करोनि । जप करावा नासिकाग्र-नयनीं ।
अंती षडंग न्यासोनि । जप करावा विसर्जन ॥ ४५९ ॥
गायत्रीमंत्राची प्रशंसा । एकचित्तें परियेसा ।
नाम ' मंत्र ' असे विशेषा । अक्षरें दोनी पाप हरे ॥ ४६० ॥
मन्-कार म्हणजे आपुलें मन । त्र--कार नाम आपुला प्राण ।
मन--प्राण एकवटोन । जप करावा एकचित्तें ॥ ४६१ ॥
' जप ' म्हणजे अक्षरें दोनी । प्रख्यात असतीं त्रिभुवनीं ।
ज--कार जन्म विच्छेदोनि । प--कारें जन्मपाप दुरी ॥ ४६२ ॥
चारी वेदांसी मूळ एक । गायत्रीमंत्र असे ऐक ।
याचि कारणें जपावा निक । वेदपठणफळ असे ॥ ४६३ ॥
ऐसा मंत्र न जपे नर । वृथा जन्म जैसा सूकर ।
जप करा हो निर्धार । चिंतिले फळ पाविजे ॥ ४६४ ॥
न करावा उदकीं बैसोन । त्वरित होय प्रज्ञाहीन ।
सांगेन त्याचें कारण । अग्नि तीन विप्रमुखीं ॥ ४६५ ॥
' आहवनीय ' ' गार्हपत्य ' । ' दक्षिणाग्नि ' तिसरा विख्यात ।
आग्नि-उदक-संपर्क होतां । तेजत्व जाय अग्नीचें ॥ ४६६ ॥
उदक वर्जावें याकारण । बैसिजे आपण शुभासन ।
हस्त स्पर्शोनि नाभिस्थानीं । प्रातःकाळीं जपावा ॥ ४६७ ॥
माध्याह्नीं हृदयस्थानीं । जपावा माळा धरोनि ।
हस्त मुखें स्पर्शोनि । सायंकाळीं जपावा ॥ ४६८ ॥
उभेनि जपावा प्रातःकाळीं । बैसोन कीजे माध्याह्नकाळीं ।
अथवा उभा राहोनि निश्र्चळीं । उभय पक्षीं करावा ॥ ४६९ ॥
बैसोन जपावा सायंकाळीं । पहावा वृक्ष मननिर्मळी ।
जरी वृक्ष नसे जवळी । नासाग्र नयनीं जपावा ॥ ४७० ॥
ब्रह्मचारी-गृहस्थासी । जप नेमिला अष्टोत्तरेसी ।
वानप्रस्थ-यतीश्र्वरासी । सहस्त्र मुख्य करावा ॥ ४७१ ॥
संधिविग्रह होय जरी । अष्टाविंशति करा पुरी ।
अशक्य होय जरी । दहा वेळ जपावा ॥ ४७२ ॥
उत्तम पक्ष करा मानसीं । मध्यम मुखें गौप्येंसी ।
प्रगट वाक्याक्षरासी । कनिष्ठ प्रकार परियेसा ॥ ४७३ ॥
त्रिपाद असती गायत्रीसी । मिळोनि न म्हणावी परियेसीं ।
म्हणतां पातक महादोषी । महानरक अवधारा ॥ ४७४ ॥
तत्सवितुर्वरेण्यं, भर्गो देवस्य धीमहि, धियो यो नः प्रचोदयात् ॥ १ ॥
पृथक करोनि त्रिपादासी । जपा मंत्र अतिहर्षी ।
पापें जातीं ब्रह्महत्या दोषीं । अनंत पुण्य पाविजे ॥ ४७५ ॥
अगुळीजपें एक पुण्य । पर्वांगुलीनें दशगुण ।
शंखमणीनें होय शतगुण । प्रवालमाला सहस्त्रफळ ॥ ४७६ ॥
स्फटिकें दहासहस्त्र पुण्य । मौक्तिकें लक्ष गुण जाण ।
पद्माक्षीं जप निर्गुण । दशलक्ष पुण्य असे ॥ ४७७ ॥
कोटिगुणें सुवर्णमाला । कुश रुद्राक्ष अनंतफला ।
जप करा तुम्ही निश्र्चळा । गौप्यमाला धरोनियां ॥ ४७८ ॥
जप करितां नुल्लंघिजे मेरु । पाप बोलजे अपारु ।
प्राणायाम केलिया त्रिवारु । मेरु लंघिले पाप जाय ॥ ४७९ ॥
गायत्रीजप तीन पादास । प्रत्यहीं करावा एकादश ।
पापांचा होय सर्व नाश । त्रिरात्रीचें पाप जाय ॥ ४८० ॥
अष्टोत्तरशत जप करितां । अमोघ पातक जाय त्वरिता ।
करावा सहस्त्र एकचित्ता । उपपातकें नासतीं ॥ ४८१ ॥
महापातकादि दोषासी । कोटि जप करावा परियेसीं ।
जी जी कामना इच्छिसी । त्वरित होय अवधारा ॥ ४८२ ॥
द्रव्य घेवोनि एकापाशी । जप करितां अनंतदोषी ।
चांडालयोनीं भरंवसीं । जन्म पावे परियेसा ॥ ४८३ ॥
जप करावा मनदृढें । न पहावें मागे पुढें ।
शूद्रादिक जातीकडे । संभाषणादि करुं नये ॥ ४८४ ॥
कंडूं नये देह आपुलें । नेणतां जरी इतुकें घडलें ।
श्रोत्राचमन करा वहिलें । दोष नाहीं अवधारा ॥ ४८५ ॥
ब्राह्मणाचे दक्षिणकाना । सप्तदेवता आहेति जाणा ।
स्पर्श करितां तत्क्षणा । पापें जातीं परियेसा ॥ ४८६ ॥
दृष्टीं पडतां चांडाळयाती । द्विराचमनें होय शुद्धती ।
संभाषण होय पतिताप्रति । स्नान करावें परियेसा ॥ ४८७ ॥
मौन्य करावें हें उत्तम । अगत्य बोलिजे संधिविषम ।
' तद्विष्णो--' । मंत्र जपता कर्मी । पापें जातीं सकळिक ॥ ४८८ ॥
जपतां निद्रा येई जरी । अघोवायु जांभई आली तरी ।
क्रोधरुप जपतां भारी । पापें घडतीं अवधारा ॥ ४८९ ॥
नेणतां घडे इतुकें जरी । आचमन करावें श्रोत्रीं ।
अग्नि सूर्यधेनुदर्शन करीं । विष्णुमंत्र जपावा ॥ ४९० ॥
ऐसा जप करावा विधीनें । मनकामना होय पूर्ण ।
ऐकती समस्त ऋषिजन । म्हणोनि सांगे पराशर ॥ ४९१ ॥
गायत्री जप करा ऐसा । प्रातःकाळी म्हणा ' मित्रस्य ' ।
' उदुत्यं ' मंत्र माध्याह्नेसी । ' इमं मे वरुण ' सायंकाळी ॥ ४९२ ॥
शाखापरत्वें मंत्र असती । म्हणा जैसे विधि असती ।
गोत्र-प्रवर उच्चारा भवतीं । वृद्धाचाराप्रमाणें ॥ ४९३ ॥
चारी दिशा नमोनि । प्रदक्षिणा करावी सगुणी ।
गोत्र-प्रवर उच्चारोनि । नमस्कार करा परियेसा ॥ ४९४ ॥
ऐसी संध्या करुन । मग करावें औपासन ।
सांगेन त्याचे विधान । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥ ४९५ ॥
सायंप्रातेर्वेळा दोन्ही । औपासन करावें सगुणीं ।
मिळोनि न करावें विद्वज्जनीं । करावें सर्वीं द्विकाळ मुख्य ॥ ४९६ ॥
न करावें वेळणी अळंद्यांत । भूमीवरी न करा नित्य ।
स्यंडिलीं करावें विहित । अथवा उदकें सारवावें ॥ ४९७ ॥
कुंडीं स्थापोनि अग्नीसी । करावें नित्य औपासनासी ।
वारा घालो नये त्यासी । हातें-पर्णें-मुखें-सुपें ॥ ४९८ ॥
व्याधिष्ठ होय पर्णवायें । सुपें दरिद्र धनक्षय ।
मुखें फुंकिलिया आयुष्य जाय । हस्तमूळीं होय मृत्यु ॥ ४९९ ॥
फुंकणी अथवा विंझणेसीं । वायु घालावा अग्नीसी ।
काष्ठें समृद्धि परियेसीं । ज्वलित असावा अग्नि देखा ॥ ५०० ॥
ज्वाला निघती जये स्थानीं । आहुती घालावी तिये वदनी ।
समिधा आणाव्या ब्राह्मणीं । शूद्रहस्तें घेऊं नये ॥ ५०१ ॥
समिधा पुष्पें दूर्वा देखा । आणों नये शूद्रें ऐका ।
होमद्रव्यें आहेति विशेखा । सांगेन नांवें परियेसा ॥ ५०२ ॥
साळी सांवे नीवार--। तंदुळ असती मनोहर ।
गोधूम जव निर्धार । यावनाळ राळे मुख्य असती ॥ ५०३ ॥
साठीं दाणे मिति प्रंमाण । आहुति मुख्य कारण ।
अधिक अथवा न करा उणे । घृतसंपर्क करावें ॥ ५०४ ॥
घृत नसेल समयासी । तिळ पवित्र होमासी ।
तिळांचें तैल परियेसीं । तेंही पवित्र असे देखा ॥ ५०५ ॥
औपासन केलियावरी । ब्रह्मयज्ञ करावा तर्पण परी ।
सांगेन विधि परिकरीं । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥ ५०६ ॥
मुख्य सकळीं माध्याह्नीं । स्नान-संध्या-जपादि करोनि ।
औपासनादि करा विधानीं । मग करावा ब्रह्मयज्ञ ॥ ५०७ ॥
उदकसमीप मुख्य स्थान । करा तर्पण ब्रह्मयज्ञ ।
प्राणायाम तीन करोन । ' विद्युदसि ' मंत्र जपावा ॥ ५०८ ॥
दूर्वा घेऊन दक्षिण करीं । उदयमुख अथवा उत्तरीं ।
बसावें वाम पादावरी । दक्षिण पाद ठेवोनि ॥ ५०९ ॥
उभयहस्तसंपुटेंसी । ठेवावे दक्षिण जानूसी ।
म्हणावें तीन प्रणवांसी । मग म्हणावें ऋचाक्षर ॥ ५१० ॥
' ओं भूर्भुवः स्वः ' ऐसें म्हणोनि । ' तत्सवितुर्वरेण्यीं ' ।
त्रिपदा गायत्री उच्चारोनि । मग जपावी दहा वेळां ॥ ५११ ॥
स्वाध्याय दिवसासी । म्हणा वेद शक्तीसीं ।
अनध्याय होय तया दिवसीं । एक ऋचा म्हणावी ॥ ५१२ ॥
तेही नये एखाद्यासी । मंत्र म्हणावा विशेषीं ।
' नमो ब्रह्मणे ' मंत्रासी । तीन वेळ जपावें ॥ ५१३ ॥
' वृष्टिरसि ' मंत्रासी । जपोनि स्पर्शावें उदकासी ।
तर्पण करावें परियेसीं । ऐक ब्राह्मणा एकचित्तें ॥ ५१४ ॥
ब्रह्मयज्ञ करावयासी । दर्भ मुख्य परियेसीं ।
वसु-रुद्र-आदित्येसीं । तृप्त समस्त देव-पितर ॥ ५१५ ॥
एखादे दिवसीं न घडे जरी । अथवा होय समय रात्री ।
जप करावा गायत्री । वेदपठण फळ असे ॥ ५१६ ॥
देवतर्पण कुशाग्रेसीं । मध्य-स्थानें तृप्त ऋषि ।
मूळाग्रीं पितृवर्गासी । तर्पण करावें परियेसा ॥ ५१७ ॥
न करावें तर्पण पात्रांत । करावें आपण उदकांत ।
भूमीवरी घरीं नित्य । निषिद्ध असें करुं नये ॥ ५१८ ॥
दर्भ ठेवोनि भूमीवरी । तर्पण करा अवधारीं ।
विधियुक्त भक्तिपुरःसरीं । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥ ५१९ ॥
तीळ धरोन आपुल्या करीं । तर्पण करावें अवधारीं ।
ठेवों नये शिळेवरी । भूमीं काष्ठपात्रीं देखा ॥ ५२० ॥
रोमकूपादि स्थानीं देखा । तीळ ठेवितां पावती दुःखा ।
तीळ होती कृमि ऐका । निषिद्ध बोललीं स्थानें पांच ॥ ५२१ ॥
घरीं तर्पण करावयासी । तीळ अग्राह्य परियेसीं ।
करावें आपण उदकासी । ऐका समस्त ऋषिजन ॥ ५२२ ॥
श्र्वेत तीळ देवांसी । धूम्रवर्ण ऋषिजनांसी ।
कृष्णवर्ण पितरांसी । तिळतर्पण करावें ॥ ५२३ ॥
यज्ञोपवीत सव्यें देवांसी । निवीतीनें करावें ऋषीसी ।
अपसव्यें पितरांसी । तर्पण करावें येणें रीतीं ॥ ५२४ ॥
देवांसी अंजुलि एक । ऋषींसी अंजुलिद्वय सम्यक् ।
पितरांसी अंजुलि त्रिक । तर्पण ऐसें करावें ॥ ५२५ ॥
स्त्रियांसी अंजुलि एक देखा । व्यतिरिक्त माता-बंधूसी ऐका ।
सापत्नी-आचार्य नामिका । द्वयांजुलि करावें ॥ ५२६ ॥
देवब्रह्मऋषीश्र्वरांसी । अक्षता मुख्य तर्पणासी ।
कृष्ण तील पितरांसी । अनंतपुण्य परियेसा ॥ ५२७ ॥
आदित्य-शुक्रवारेंसी । प्रतिपदा मघा-नक्षत्रासी ।
षष्ठी-नवमी-एकादशींसी । तिलतर्पण करुं नये ॥ ५२८ ॥
अथवा विवाह-उपनयनासी । जन्मनक्षत्र-जन्मदिवशीं ।
आपुल्या घरीं शुभदिवसीं । तिलतर्पण करुं नये ॥ ५२९ ॥
जघीं न करी तिलतर्पण । उदकें मुख्य करा जाण ।
मुद्रिका हस्तीं असे सुवर्ण । दर्भपवित्रीं करावें ॥ ५३० ॥
पाय न धुतां मंगळस्नान । तिलावीण करितां तर्पण ।
श्राद्ध करी दक्षिणेवीण । निष्फल असे अवधारीं ॥ ५३१ ॥
निषिद्ध बोलिलें ज्या दिवसीं । तर्पण करावें उदकेसीं ।
दिपवाळी चतुर्दशीसी । करावें तर्पण परियेसा ॥ ५३२ ॥
अंगारक कृष्ण चतुर्दशी । यमाचे नांवें विधीसीं ।
करावें तर्पण परियेसीं । यज्ञोपवीत सव्यानें ॥ ५३३ ॥
एकेक तीळ घेऊनि । त्रिवार अंजुलि देऊनि ।
यमाचें नां उच्चारोनि । तर्पण करावें भक्तीनें ॥ ५३४ ॥
यमाचीं नांवें चतुर्दशी । सांगेन ऐका विस्तारेसीं ।
यम-धर्मराजनामें ऐसीं । मृत्यु-अंतक चौथा जाणा ॥ ५३५ ॥
वैवस्वत-काल देखा । सर्वभूतक्षय ऐका ।
आठवा औदुंबर-दघ्न निका । नीलाय परमेष्ठी एकादश ॥ ५३६ ॥
वृकोदर-चित्र देखा । चित्रगुप्त-चतुर्दशका ।
पृथक् नामें म्हणोनि एकेका । नदींत द्यावें परियेसा ॥ ५३७ ॥
समस्त पातकें नासतीं । रोगव्याधि न पीडिती ।
न घडे कधीं अपमृत्यु । शनैश्र्वरादि महापीडा ॥ ५३८ ॥
शुक्लपक्षीं माघमासीं । तर्पण करावें अष्टमीसी ।
भीष्मनामें परियेसीं । वर्षपातकें परिहार होतीं ॥ ५३९ ॥
ऐसें तर्पण करोनि । सूर्यनामें अर्घ्यें तीनी ।
द्यावी समस्त विद्वजनीं । म्हणे श्रीनृसिंहसरस्वती ॥ ५४० ॥
सिद्ध म्हणे नामधारकासी । कृपामूर्ति श्रीगुरु ऐसी ।
सांगते झाले ब्राह्मणासी । कर्ममार्ग येणेंपरी ॥ ५४१ ॥
म्हणे सरस्वती-गंगाधर । ऐसा ब्राह्मणाचा आचार ।
वर्ततां होय मनोहर । सर्वाभीष्टें साधतीं ॥ ५४२ ॥
॥ इति श्रीगुरुचरितामृते परमकथाकल्पतरौ श्रीनरसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे आह्निकनिरुपणं नाम षट्त्रिंशोऽध्यायः ॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
Gurucharitra Adhyay 36 Part 5/5
श्रीगुरुचरित्र अध्याय ३६ भाग ५/५
Custom Search
No comments:
Post a Comment