Monday, November 16, 2015

Shree Navanath Bhaktisar adhyay 7 Part 2/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सातवा ( ७ ) भाग २/२


Shree Navanath Bhaktisar adhyay 7 
Shree Navanath Bhaktisar adhyay 7 is in Marathi. Machchhinda and Veerbhadra met at Hareshwar. Veerbhadra insulted Machchhindra, his Guru and NathPanth. Hence Machchhindra was very angry and he called Veerbhadra for a fight. Machchhindra and Veerbhadra who was son of God Shiva, had a war in which Veerbhadra was defeated by Machchhindra. All Gods were also there watching their fight. When Machchhindra used a Maya astra (wepon). the effect would have been the end of everything. As such they requested him to stop Maya astra further destruction. Machchhindra uphelled their request and used Vasanik (another) astra to stop Mya astra from causing further destruction. Gods were pleased and they gave him many astras. They took him to the heaven with them as he wished to have a bath in pious Mankarnika river. He was in the heaven for seven years and came back to the earth to visit other pious places and visited Vajra Bhagavati. Then he proceeded to Ayodhya. In Ayodhya interesting things happened which will be told to us in Next adhyay 8 by Malu who is Son of Dhundi and is from Narahari family.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सातवा ( ७ ) भाग २/२ 
धन्य आहे मच्छिंद्रनाथ । युद्धीं कुशल प्रतापवंत ।
धन्य श्रीगुरु मिळाला त्यातें । प्रतापवंत आगळा ॥ ९१ ॥
मज समान युद्धनेमीं । पातलो यासी युद्धभूमीं । 
परी न देखों युद्धसंगमीं । मच्छिंद्रासमान पुरुषार्थ ॥ ९२ ॥
म्यां पूर्वी रावण बळी भांडोन । सुखें देवीवर रणीं आणूनि ।
किन्नर गंधर्व थकित जाण । नाहीं पुढें ठेले मम युद्धीं ॥ ९३ ॥
कल्पांतभैरव मातें नाम । देते झालें सुरासुर उत्तम । 
माझें जिंकावया युद्धकर्म । मिळाला नाहीं कोणीच ॥ ९४ ॥
परी आजी खातरी कृत्याकृत्य । केली असे मच्छिंद्रनाथें ।
मग करी कवळूनि हृदयातें । धरिता झाला सप्रेम ॥ ९५ ॥
म्हणे महाराजा योगद्रुमा । वेधक कामना असेल तुम्हा ।
तरी ती सांगूनि रुद्रोत्तमा । वरदसुखा पहुडवीं ॥ ९६ ॥
येरु म्हणे बा महाराजा । एक अर्थ तूं करुनि माझा ।
त्याते फळ देऊनिया जा । लोकोपकारीं मिरवावें ॥ ९७ ॥
जैसे एक वायूचे आधीन यथार्थ । वर्षाकाळीं मेघ वर्षे जलातें ।
तेणें तुष्ट होय क्षितींत । चराचर अवघेंही ॥ ९८ ॥
तन्न्याये कामना चित्तीं । विकार सांडी वरली मती ।
तरी कार्यगंधाच्या बैसोनि अर्थी । लोकोपकारीं मिरवावें ॥ ९९ ॥
तरी तो अर्थ म्हणाल कोण । महाराजा करा श्रवण । 
म्यां कामनी वरिला विद्याकाम । साबरीविद्या महाराजा ॥ १०० ॥
तरी त्या मंत्रबोलासमान । आपण वहिवाटा ये देहीं धर्म ।
त्वरें जाऊनि जगाचा काम । मंत्रापाठीं परवावा ॥ १०१ ॥
एवं वर ओपूनि मातें । लोट लोटवा कृपासरिते । 
मग अवश्य म्हणे मच्छिंद्रातें । कार्य सहसा करीन मी ॥ १०२ ॥
ऐसें बोलूनि वरदयुक्तीं । करतळा देत प्रसन्नचित्तीं ।
यापरी सकळ देव बोलती । प्रसन्न होऊनि तयातें ॥ १०३ ॥
म्हणती वीरभद्रें दिधला वर । तया साह्य असों आम्ही समग्र ।
मंत्रपोटीं कार्य थोर । आम्ही करुं सहसाही ॥ १०४ ॥
ऐसें बोलूनि वरदयुक्ती । मग मच्छिंद्र म्हणे नमस्कार सर्वांप्रती ।
रुद्र ब्रह्मा चक्रवर्ती । भावेकरुनि नमियेला ॥ १०५ ॥
विष्णुपदीं ओपितां मौळी । तोही त्यातें कृपें न्याहाळी ।
परम प्रेमें हृदयकमळीं । धरिता झाला स्नेहाळ तो ॥ १०६ ॥
म्हणे वत्सा पूर्णकोटी । जेथें पडतां जीव संकटीं ।
माझे स्मरण करितां ओंठीं । दृश्य होईन त्या ठाया ॥ १०७ ॥
दृश्य होतां संकटराशी । निवारीन मी निश्र्चयेसी ।
मग चक्र अस्त्र देऊनि त्यातें । तुष्ट मानसीं केला तो ॥ १०८ ॥ 
यापरी नंदिश उमानाथ । तोही प्रसन्न होऊनि त्यातें ।
प्रेमें कवळूनि हृदयातें । त्रिशूळास्त्र ओपीतसे ॥ १०९ ॥
यापरी नाभितनया नमितां । तोही वदे प्रसन्नचित्ता ।
शापादपि सविता । संजोगिलें तयासी ॥ ११० ॥
जें वाणीनें निघे अक्षर । तें होय साचोकार ।
शुभाशुभ कर्मावर । फळें पावती गोमटीं ॥ १११ ॥
ऐसें वदूनि विधिराज । तुष्ट केला तपोभुज ।
यापरी शक्र नमी ओज । तोही वर ओपीतसे ॥ ११२ ॥
मग वज्रास्त्र कां पूर्ण । त्यातें दिधलें कृपा करुन ।
मग अस्त्रमंत्र सांगून । वज्रहस्त ओपिला ॥ ११३ ॥
यावरी नमितां देव कुबेर । तोही होऊनियां उदार ।
सिद्धि देऊनि समग्र । दासी केल्या तयाच्या ॥ ११४ ॥
यावरी वरुण भावें नमितां । तोंही प्रसन्न होऊनि चित्ता ।
आपास्त्रमंत्रभोक्ता । केला असे त्वरेनें ॥ ११५ ॥
त्या मंत्राचा होतां पाठ । आपोआप धरेते नीर उठे ।
सकळ सारितां लोटूनि लोट । दिशे दिशे मिरवती ॥ ११६ ॥
यापरी नमितां द्विमूर्धनी । तोही आल्हादे चित्तकामनीं ।
वर दिधला मंत्रअग्नी । स्मरण होतां प्रगटावें ॥ ११७ ॥
यापरी नमितां देव अश्र्विनी । तोही देत मंत्रमोहनी ।
असो सर्व देवी वरदपाणी । एकएकांनीं ओपिला ॥ ११८ ॥
मग आपुलालें आसन योजून । सिद्ध करिते झाले गमन ।
यावरी मच्छिंद्र कर जोडून । विनवीतसे सकळिकां ॥ ११९ ॥
म्हणे महाराजा स्वर्गवासी । मातें कामना वेधली कीं जीवासी । 
मणकर्णिकास्नान मानवांसी । आदर चित्ती वाटतसे ॥ १२० ॥
तरी मातें करावया स्नान । न्याल जरी कृपेंकरुन । 
तरी येऊनियां कामना पूर्ण । करीन आपुली महाराजा ॥ १२१ ॥
ऐसी ऐकूनि वचनयुक्ती । सकळ प्रसन्न झाले चित्तीं ।
मग स्वयें विमानीं वाहूनि श्रीपती । घेऊनियां चालिला ॥ १२२ ॥
विमानयानें आपुले बहुत । त्वरें पातले वैकुंठनाथ । 
मग आपुले आसनीं मच्छिंद्रनाथ । नेऊनियां बसविला ॥ १२३ ॥
आसनीं शयनीं भोजनीं । एकत्रपणी वर्ते चक्रपाणी ।
सकळ देव पातले स्वस्थानी । मच्छिंद्र वैकुंठीं राहिला ॥ १२४ ॥
मग नित्य मनकर्णिकेचें स्नान । मच्छिंद्रनाथ येत करुन ।
यावरी पूर्ण समाधिकारण । पाहूं ऐसें वाटतसे ॥ १२५ ॥
मग विष्णुसी म्हणे मच्छिंद्रनाथ । मेरुपाठार दाविजे मातें ।
म्यां समाधि घेतली पूर्वजन्मांत । तयां गोचर करावें ॥ १२६ ॥
अवश्य म्हणूनी नारायण । मेरुपाठारीं केले गमन ।
मग दाही समाधी दृष्टी पाहून । संतुष्ट झाला मानसीं ॥ १२७ ॥
नवनारायणांच्या समाधी नव । दहावी समाधी वासुदेव ।
ऐसा पाहूनि मनोभाव । पुनः येत वैकुंठी ॥ १२८ ॥
असो एक संवत्सर वैकुंठनाथ । ठेविता झाला प्रीतिवंत ।
मग पाचारुनि उमाकांत । नेता झाला कैलासासीं ॥१२९ ॥
तेथेंही एक संवत्सरपर्यंत । राहता झाला मच्छिंद्रनाथ ।
स्थितिवृत्तीं स्नेह बहुत । वाढविले शिवाचे ॥ १३० ॥
यावरी कोणे एके दिवशी । इंद्र येऊनि कैलासासीं ।
भावें नमूनि महादेवासी । मच्छिंद्रनाथा नेतसे ॥ १३१ ॥
यावरी तीन मास अमरावतीं । राहता झाला योगपती । 
तेथेही अत्यंत वाढवूनि प्रीती । निरोपातें मागतसे ॥ १३२ ॥ तों विधीनें नारद पाठवून । नेलें सत्यलोकाकारण ।
तेथेही षण्मास राहून । विधिराज तोषविला ॥ १३३ ॥
यापरी सकळ देव येऊनि तेथ । घेऊनि जाती मच्छिंद्रनाथ ।
एक एक दिन करुनि तीर्थ । सकळ देवांसी तोषविलें ॥ १३४ ॥
सुरगण गंधर्व किन्नर यक्ष । पितृगयादि अर्यमा दक्ष ।
सकळ करुनि प्रीतीनें प्रत्यक्ष । तोचि एक मिरवला ॥१३५ ॥
असो सप्तवर्षेपर्यंत । स्वर्गी राहिला मच्छिंद्रनाथ ।
सकळांचा गौरव घेऊनि अतिथ । पुसुनिया निघतसे ॥ १३६ ॥
मग सकळ निघूनि स्वर्गवासी । बोळविती मच्छिंद्रासी ।
विमानीं वाहूनि मृत्युलोकासी । आणूनियां घातले ॥ १३७ ॥
असो देव गेले स्वस्थानासी । येरीकडे मच्छिंद्र पृथ्वीसी ।
पुनः चालिला तीर्थाटनासी । करावया अत्यादरें ॥ १३८ ॥
भ्रमण करितां शुद्धमहीसी । जाता झाला केकाडदेशीं ।
तें परम स्थान पश्र्चिमदेशीं । वज्रवन पाहिलें ॥ १३९ ॥
तंव त्या ठायीं वज्रभगवती । महादैवत प्रतापशक्ती ।
भावें नमूनि अंबिकामूर्ति । तीर्थस्नान करीतसे ॥ १४० ॥
तेथें तीनशें साठ कुंडे असती । परी उष्णोदकें भरलीं असती ।
तें पाहूनि परम चित्तीं । आश्र्चर्यातें मानीतसे ॥ १४१ ॥ 
आश्र्चर्य मनांत योजूनि करित । कीं उष्णोदकें कुंडे भरित ।
तरी तयांची राहणी पुसुनि कोणास । आपण कुंडे नित्मावी ॥ १४२ ॥
निर्मूनि ये परी सर्वांहून । परमागळें उष्णोदक जीवन ।
मग सकळ तीर्थात करुनि स्नान । भगवतीठाया पातला ॥ १४३ ॥
पाचारुनि तीर्थाच्या पुजार्‍यासी । वृतांत पुसीला उष्णोदकासी ।
विचारितां सांगे त्यासी । उष्णोदककारण ते ॥ १४४ ॥
म्हणे पूर्वीं वसिष्ठें यज्ञ केला । तेव्हां सकळ देव पातले स्नानाला ।
त्यांनीं निर्मूनि उष्णोदकाला । कुंडे केलीं आपुलालीं ॥ १४५ ॥
उष्णोदकीं स्नानाकरितां तात्कालिक । निर्मिते झाले सकळिक ।
आपुलीं नामें अलोलिक । कुंडांलागीं ठेविलीं ॥ १४६ ॥
द्वादश वरुषें द्वादश दिवस । समस्त राहिले त्या ठायास ।
यज्ञ पावलिया पूर्णतेस । सकळ गेले स्वस्थाना ॥ १४७ ॥
तीं कुंडें अद्यापपर्यंत । स्थानोस्थानीं आहेत ।
ऐसें ऐकूनि मच्छिंद्रनाथ । म्हणे योजिलें करावें ॥ १४८ ॥
मग सरस्वतीसरितापात्रीं । जी उंचवट जागा तया क्षेत्रीं ।
पाहुनि वाटिका पवित्र नेत्रीं । वरुणमंत्र जल्पतसे ॥ १४९ ॥
आपास्त्रमंत्रउच्चार पूर्ण । होतांचि प्रविष्ट झालें जीवन ।
भोगावतीचें उदक काढून । अग्निमंत्र जल्पतसे ॥ १५० ॥
अग्निमंत्र उच्चार होतां । प्रवाहीं लागला हुताशन तत्त्वतां ।
तेणेंकरुनि हुताशनतप्तता । पावती झाली ते समयी ॥ १५१ ॥
शिववरदकरीं त्रिशूळ हातीं । तो बुडाकडोनि टाकिला महीमायीं ।
तेणेकरुनि जीवन तप्त कुंडाप्रती । महीलागीं विराजलें ॥ १५२ ॥
भोगावतीचें उत्तम उदक । प्रगट होतां अलोलिक । 
आपण स्नान करोनि शुचिक । करी भगवती मातेतें ॥ १५३ ॥
भोगावतीचे उत्तम जीवन । अंबिकेप्रति होतां स्नान । 
मग ती मच्छिंद्रा प्रत्यक्ष होऊन । बोलती झाली सम्यक ॥ १५४ ॥
म्हणे जिवलगा मच्छिंद्रनाथा । धन्य तूं प्रतापवंता । 
भोगावती जीवनानें मातें । स्नान घातलें योगींद्रा ॥ १५५ ॥
तरी येथें एकमास वस्तीस वसावें सावकाश ।
मग बोळवीन स्वस्थचित्तास । तुजलागीं पुढारां ॥ १५६ ॥
अवश्य म्हणोनि मच्छिंद्रनाथ । राहता झाला मास तेथ । 
मग रुचल्या अर्थी बोले देवीतें । बोलूनि काळ क्रमीतसे ३ १५७ ॥
यावरी कोणे एके दिवशीं । मच्छिंद्र म्हणे अंबिकेसी ।
वज्रबाई नाम तुजसी । काय म्हणूनि सांगा हें ॥ १५८ ॥
माता म्हणे तपोघना । वसिष्ठ करिता जाहला हवना ।
तें शक्र पातला स्थाना । यालागीं महाराजा ॥ १५९ ॥
तंव सभास्थानीं सकळ ऋषी । बैसले होते महातापसी ।
तों इंद्र पातला देवकटकेंसी । सभास्थानीं बैसावया ॥ १६० ॥
सभेंत येतां शचीनाथे । उत्थापन दिधलें नाहीं त्यातें ।
म्हणूनि क्षोभे अमरनाथ । वज्र लागीं प्ररितसे ॥१६१ ॥
तें पाहूनियां दाशरथी राम । शक्तिमंत्रे दर्भ मंत्रून ।
सोडिता झाला वज्राकारण । बहु तांतडी लगबगें ॥ १६२ ॥
मग त्या दर्भी मंत्रप्रयुक्ती । मी प्रगट झालें महाभगवती ।
वज्र गिळूनि उदर आहुती । करिते झालें ते समयीं ॥ १६३ ॥
यावरी शक्रें राम तो बोलून । पूर्ण केला समाधान ।
मग श्रीरामाचे स्तवन करुन । वज्र पुन्हां मागितलें ॥ १६४ ॥
मग तो प्रसन्न होऊनि चित्तीं । वज्र दिधलें मागुती । 
मग सकळ ऋषिदेवी मजप्रती । नांव ऐसें स्थापिलें ॥ १६५ ॥
यज्ञ जाहला समाप्ती । सकळ गेले स्नानाप्रती ।
परी श्रीरामें येऊनि ते क्षितीं । मातें स्थापिलें अद्यापि ॥ १६६ ॥
ती भोगवती येथें श्रेष्ठा । माझी केली प्राणप्रतिष्ठा ।
तें भोगावतीचें उदक श्रेष्ठा । मिळालें होते मजलागीं ॥ १६७ ॥
किंवा आतां तुझे हातीं । स्नाना पावली भोगावती ।
परी रामाहूनि कृपामूर्ती । तुवां अधिक केले बा ॥ १६८ ॥
रामें न्हाणिलें शीतोदकें । तुवां न्हाणिलें उष्णोदकें ।
आणि अखंडित पुण्यश्र्लोकें । भोगावती दिधली त्वां ॥ १६९ ॥
असो ऐशी संवादयुक्ती । झाल्याअंती त्या उभयतीं ।
उपरी मासाची झाली भरती । नाथ पुसूनी निघाला ॥ १७० ॥
उत्तरदेशीं करितां गमन । अयोध्यें जातां तपोवन । 
द्वारावती तीर्थ करुन । अयोध्यें जातां तपोघन ॥ १७१ ॥
ती कथा बहु सुरस । होईल ती स्वीकारा पुढिले अध्यायास ।
धुंडीसुत नरहरिवंश । मालू सांगे गुरुकृपें ॥ १७२ ॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार  । गोरक्षकाव्य किमयागार ।
सदा परिसोत भाविक चतुर । सप्तमाध्याय गोड हा ॥ १७३ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

श्रीनवनाथभक्तिसार सप्तमाध्याय संपूर्ण ॥

Shree Navanath Bhaktisar adhyay 7 
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सातवा ( ७ )


Custom Search

No comments: