Friday, November 20, 2015

Shree Navanath Bhaktisar adhyay 8 Part 2/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय आठवा ( ८ ) भाग २/२


Shree Navanath Bhaktisar adhyay 8 
Shree Navanath Bhaktisar adhyay 8 is in Marathi. Machchhindra came to Ayodhya to visit ShriRma temple. He was not aloud to enter into the temple as at the same time king Pashupat was there in the temple for ShriRam darshan. Machchhindra was very angry he thought instead of punishing the servants, better to punish king. Hence used sparashstra by chanting mantras while king was boing to ShriRam. King became helpless and could not getup from the ground. He was sucked to the ground. Then a brilliant Mantri was called to help in the situation. He came and found out the reason behind it. He approached Machchhindra and asked to forgive him and requested to help the king to be free from ground. Then he took Machchhindra in the temple where Machchhindra used vibhaktastra so that king would become free from the ground. Then king honoured Machchhindra took him to his palace and remained in his service. Machchindra was pleased and asked him if he wished something. King told him that since he was from Sun family and Ishvaku vansha; he wished to have a darshan of God Rama. The wish was fulfilled by Machchhindra by calling a war against Aaditya (God Sun), defeating him and on the request of God Vishnu; Machchhindra told him everything and asked him to fulfil the desire of king Pashupat of God Ramas' darshan. Then also he made God Rama and God Sun to agree to be helpful for his shabari kavitva vidya. Malu son of Dhundi from Narahari family will tale us the story; In the next ninth adhyay how Machchhindra took out Goraksha out of the mud.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय आठवा ( ८ ) भाग २/२
कीं सदनांत दाटला अंधार अपार । तो दीप उजळितां होतो दूर ।
तन्न्यायें श्रीभास्कर । ज्ञानेश्र्वरा प्रेरितसे ॥ १०१ ॥
तेणें उडवूनि भ्रमिष्टपण । सुपंथसुपंथा करी गमन ।
तें मच्छिंद्रनाथें दृष्टीं पाहोन । वाताकर्षण जल्पत ॥ १०२ ॥
वातास्त्र आकर्षण सबळ । वायुवक्रीं भेदिलें तुंबळ ।
मग वाजींचे आणि सारथ्याचे तये वेळ । श्वासोच्छवास राहिले ॥ १०३ ॥
आणि जो प्रत्यक्ष चंडीकरण । तोही दाटला श्वासेंकरुन ।
वायुचक्री गेले आटून । रथ उलथोनि पडियेला ॥ १०४ ॥
वायुचक्राचा ज्यासी आधार । तों आधार तुटतांचि सत्वर ।
स्वर्गाहूनि उर्वीवर । आदळला स्यंदन तो ॥ १०५ ॥
महीं आदळतां दिव्य रथ । खालीं पडला श्रीआदित्य ।
स्यंदनीं वाजी अति होत । कासाविस श्वासानें ॥ १०६ ॥
परी महीं पडतां तेजोराशिपाळ । महीं मातला अति अनळ ।
तेणें दाहूं पाहे सकळ । महीवरले उद्भिज्ज ॥ १०७ ॥
तें पाहूनि मच्छिंद्रनाथ । जलदास्त्र स्मरे त्वरित । 
तेणेंकरुनि अपरमित । जलवृष्टी होतसे ॥ १०८ ॥
परी आदित्य पडतां निचेष्टित । परम घाबरले स्वर्गदैवत ।
मग विमानयानीं होऊनि त्वरित । मच्छिंद्रापाशीं पातले ॥ १०९ ॥
ब्रह्मा विष्णु आणि शिव । वरुण अश्विनी कुबेर देव ।
सुरवर अनादि सकळ गंधर्व । महीलागीं पातले ॥ ११० ॥
सत्यलोक तपोलोक । अतळ वितळ सुतळादिक । 
संकटीं पडला एक अर्क । लागवेगीं धांविन्नले ॥ १११ ॥
जैसे सकळ तरुवरतीं । चहूंकडूनि पक्षी येती ।
तन्न्यायें महीवरती । सकळ देव उतरले ॥ ११२ ॥  
मग महाराजा क्षीराब्धिजांवई । धांवूनि मच्छिंद्र धरिला हृदयीं ।
म्हणे हा आदित्य कोण न्यायी । संकटीं तुवां योजिला ॥ ११३ ॥
याउपरी करुनि नकस्कार । विष्णुतें देत उत्तर ।
म्हणे महाराजा पाशुपतवीर । आदित्यकुळीं असे हा ॥ ११४ ॥
ऐसें असतां यथार्थ । वंशजासी न पाहे हा आदित्य ।
तस्मात् वडिलांची धर्मनीत । ऐसेपरी असावी कां ॥ ११५ ॥
जिया मातेने बालकांचे संगोपन । तिया रोषाची केली पाखरण ।
मग ती माता काय म्हणून । लावेपरी मिरवावी ॥ ११६ ॥
स्वामी सेवकां अमित्र मानी । मग कार्य कैचें येत घडोनि ।
सदा संशयाची गवसणी । उभयचित्तीं मिरवतसे ॥ ११७ ॥
तस्मात् राय पाशुपती । नावडे या आदित्याप्रती ।
म्हणूनि ऐसा वैकुंठपती । चर्याभाग रचियेला ॥ ११८ ॥
आणिक एक मम वागुत्तरासी । साबरीविद्या कवित्वराशी ।
सूर्यनामें मंत्र उपदेशी । प्रसन्न असावें अर्काने ॥ ११९ ॥
याउपरी आणिक आहे चोज । सूर्यवंशीं विजयध्वज ।
तो पाशुपतातें श्रीराम आज । भेटवावा महाराजा ॥ १२० ॥
ऐसेपरी कामना मनीं । वेधली आहे चक्रपाणी ।
पाशुपतरायाचें प्रेमवदनीं । गुंती पावलों भक्तीनें ॥ १२१ ॥
नवराणिवासह माझा काम । पूर्णते आणा मेघश्याम ।
ऐसें बोलता योगद्रुम । हरी उत्तरा स्वीकारी ॥ १२२ ॥
म्हणे बा रे योगद्रुमा । जो जो काय वेधला काम ।
तो तूं पावशील कल्पद्रुमा । परी सावध करी अर्कातें ॥१२३ ॥
बा रे सूर्यनामीं मंत्र । जगीं होतील प्रविष्ट पवित्र ।
तै रवकष्टानें येऊनि मित्र । कार्य करील लोकांचे ॥ १२४ ॥
ऐसें बोलूनि चक्रपाणी । करतळा कर देत वचनीं ।
म्हणे बा रे भास्कर मंत्रालागुनी । वरदाता झालासे ॥ १२५ ॥
बा रे तव मंत्र लोकोपकार । नामस्मरणीं होता नर । 
तेणेंचि पातक योग भद्र । सकळ जनांचे मिटतील ॥ १२६ ॥
सहज सूर्याचें वदतां नाम । सकळ पातकें होतील भस्म ।
तैशांत मंत्रप्रयोग उत्तम । कार्यालागीं दुणावेल ॥ १२७ ॥
नाममंत्रयुक्त प्रयोग । त्यावरी तव वाणी पवित्र अभंग ।
त्याहीवरती वरद चांग । प्रत्यक्ष दैवतें मिरवतील ॥ १२८ ॥
तरी बा सोळा राशी पावलें । सुवर्ण जडावासी गमले ।
तें भूषण मोला चढलें । मान्य केवीं होईना ॥ १२९ ॥
तरी या कामा कदा आळस । होणार नाहीं महापुरुष । 
आम्ही सर्व देत तव वचनास । उतरलों आहों महाराजा ॥ १३० ॥     
वीरभद्राचे समरंगणीं । आणी नागपत्रअश्र्वत्थस्थानीं ।
तूतें ओपूनि वरदवाणी । तुष्ट केलें आधींच ॥ १३१ ॥
तरी आतां संशय । सांडूनि अर्का जीववावें ।
याचि रीतीं देव अवघे । गौरविती मच्छिंद्रा ॥ १३२ ॥
जैसे एका चंद्राबुसाठी । न्याहाळिती चकोर पाठी ।
तेवीं जगलोचना दिठीं । सकळ देव गौरविती ॥ १३३ ॥
मच्छिंद्र म्हणे पाशुपतराया । आधी दावीन राम काया ।
तेव्हांचि समाधान तरी राया । मम चित्तांत ओसंगी ॥ १३४ ॥
ऐसी ऐकतां मच्छिंद्रवाणी । सौमित्रासह सगुणी । 
प्रगट झाला कोदंडपाणी । भावे मस्तक ओपिलें ॥ १३५ ॥
मग राममूर्ती प्रगट होतां । शिवासी आनंद वाटला चित्ता ।
जयानें राया पाशुपता । आनंदसरिता उचंबळली ॥ १३६ ॥
मच्छिंद्रें देखता कोदंडपाणी । भावे मस्तक ओपिलें चरणीं ।
रामें प्रेमें धरुनि वक्षःस्थानीं । मच्छिंद्रनाथ कवळिला ॥ १३७ ॥
पाशुपतराव भाविक पूर्ण । तोही वंदी श्रीरामचरण । 
राम त्यातें हृदयीं धरुन । धन्य वंश म्हणतसें ॥ १३८ ॥
यावरी मच्छिंद्र जोडोनि दोन्ही हस्त । नम्रोत्तरीं स्तवूनि रघुनाथ ।  
गौरवोनि रामा बोधत । हे रघुत्तमा महाराजा ॥ १३९ ॥
तव नामें अनंत असती । तेवीं त्यांत रामनाम गंगा वसती ।
सर्वांत श्रेष्ठ सीतापती । ग्रंथामाजी निवेदिलें ॥ १४० ॥
त्याही ग्रंथां नाहीं मिती । परी तव नामें शुभ ते असती । 
तेवी माझ्या कवित्वाप्रती । वदनपात्रीं विराजिजे ॥ १४१ ॥ 
साबरीविद्येचें अपार वचन । मंत्रप्रयोगीं कवित्व पूर्ण ।
जेथें येईल तुझें नाम । तेथें कार्य करावें समग्र त्वां ॥ १४२ ॥
तव नामीं होतां मंत्रोच्चार । तें त्वां कार्य करावें समग्र लवकर ।
तरी प्रांजळ चित्ती देवीं कर । मम करीं ओपावा ॥ १४३ ॥
चित्तीं असेल जरी अवमान । तरी सज्ज करीं कां कोदंडबाण ।
माजवोनि आतां समरंगण । नृत्य करु रणांगणीं ॥ १४४ ॥
श्रीराम म्हणे मच्छिंद्रा ऐक । तूं तिहीं देवांचा वरदायक ।
श्रीदत्तात्रेय प्रतापार्क । अवतार तिघा देवांचा ॥ १४५ ॥
आणि नरसिंह अवतार पूर्णब्रह्म । ते तुज वश्य आहेत योगद्रुमा ।
तेथें मी कां नसावें साह्यार्थकामा । साह्य असो तुज आतां ॥ १४६ ॥
तुझ्या मंत्रीं माझे स्मरण । होतांचि कार्य करीन ।
बावनवीरांत सबळ आचरण । मंत्रप्रयोगीं दावीन मी ॥ १४७ ॥
ऐसी वदूनि वरदवाणी । भाष देत मच्छिंद्रपाणी ।
मग म्हणे हे योगधामी । मज तुज ऐक्य असे कीं ॥ १४८ ॥
तूं विष्णूचा अवतार । जो कविनारायण महाथोर ।
तस्मात् तुझें शरीर । ऐक्यत्व असें या लोकीं ॥ १४९ ॥
ऐसें बोलोनि कौसल्यासुत । धन्य म्हणवूनि ग्रीवा तुकावीत । 
यावरी बोले सावध आदित्य । वेगें करीं तपोराया ॥ १५० ॥
एक  मित्रावांचूनि धरणी । झाली असे दिनवाणी । 
तरी योगींद्रा सुखधामीं । मम पूर्वजां मिरवीं कां ॥ १५१ ॥
महीं पडला अंधकार । देव त्रासले समग्र । 
सकळ जगाचा व्यवहार । खोळंबला तपोराया ॥ १५२ ॥
ऐसे ग्लानीं सुढाळ वचन । श्रीराममुखीं ऐकोन ।
तें मच्छिंद्रहृदयीं अपार भूषण । चित्तशक्तीतें मिरविले ॥ १५३ ॥
तेणें परम आनंदवृत्ती । प्रसन्न झाली चित्तभगवती ।
मग वातास्त्रमंत्र देहस्थव्यक्ती । प्रसादातें ओपीतसे ॥ १५४ ॥
वातयुक्त अस्त्र पूर्ण । मुखीं जल्पतां मच्छिंद्रयोगिजन । 
मग सुटी पावोनि वातकर्षण । सुखी केला आदित्य तो ॥ १५५ ॥
मग सावध होऊनि महीं बैसत । दाही दिशा न्याहाळीत ।
तों अपार दृष्टी देखूनि दैवतें । सकळांलागी पाचारी ॥१५६ ॥
सकळ दैवतें जाऊनि तेथ । नमिला महाराज प्रताप आदित्य ।
यावरी विष्णूलागीं पुसत । क्षत्रिय कोण ऐसा आहे ॥ १५७ ॥
कीं वासना पुन्हां परतून । हरुं पाहत श्यामकर्ण ।
धन्य प्रतापी प्रतापगहन । आजि दावीं कां मजकारणें ॥ १५८ ॥
तरी ऐसें प्रतिज्ञे लागून । कीं युगानुयुगीं असें प्रसन्न । 
तरी तयाचें मुखमंडन । मज भेटीतें आणावें ॥ १५९ ॥
मग मच्छिंद्रातें देव पाचारिती । कीं तुज बोलावीतसे गभस्ती ।
मग चंद्रास्त्र जल्पूनि उक्ती । दर्शना जात मच्छिंद्र ॥ १६० ॥
मित्र दाहक तो अति सबळ । म्हणूनि चंद्रास्त जपला मच्छिंद्रबाळ ।
तें मागें पुढें परम शीतळ । चंद्रास्त्री मिरवीतसे ॥ १६१ ॥
त्यांत जलदास्त्राचा वर्षाव । होवोनि होत शीतल ठाव ।
ऐसें योजूनि सविताराव । जाऊनिया नमियेला ॥ १६२ ॥
सर्वांतें देखूनि मच्छिंद्रनाथ । धन्य धन्य ऐसें म्हणत ।
कवण नामीं असे पुसत । ग्राम धाम जन्मादि ॥ १६३ ॥
मग विष्णुवनें मुळापासूनि कथा । नामधामादि सांगितली वार्ता । 
कविनारायण महीवरता । मच्छिंद्रनाथ मिरवतसे ॥ १६४ ॥
येरी म्हणे माझा अंश । नवनारायण असती महीस । 
तयांचा अवतार शुभ आम्हांस चांगुलपणीं वाटला हा ॥ १६५ ॥               
तरी बा रे मच्छिंद्रनाथा । कवण कामनीं वेधली व्यथा ।
तें मज वदूनि वरदामृता । प्राशन करीं महाराजा ॥ १६६ ॥
कृत त्रेता द्वापारयुग गेलें । परी ऐसें नाहीं केले । 
धन्य तुझा प्रताप असे विपुल । धन्य गुरु तुझा तो ॥ १६७ ॥
येरु म्हणे कर जोडोनी । मम वेधली कामना मनीं ।
साबरीविद्या कवित्वकरणी । कृपा करुनि दाविली ॥ १६८ ॥
परी त्यातें वरद आपुला । असावा ऐसें वाटतें मनाला ।
तरी कृपा करुनि वर त्याला दिधला पाहिजे महाराजा ॥ १६९ ॥
मंत्रप्रयोगी तुझें स्मरण । होता व्हावें दृश्यमान ।
जगाचे कार्य मंत्रसाधन । स्वकष्टानें मिरवावें ॥ १७० ॥
ऐसी ऐकतां मच्छिंद्रवाणी । अवश्य म्हणे वासरमणी ।
मंत्रप्रयोग स्वयें घेऊनि । कार्य करीन जगाचें ॥ १७१ ॥
ऐसें वदोनि जगलोचनी । भाष देत करतळींवचनीं । 
यावरी पाशुपतराया बोलावुनी । चरणावरी घातला ॥ १७२ ॥
सूर्यवंशीं वीर्यप्रवाह । वंशमालिका सगुण सर्व ।
तुष्ट केला सविताराव । मच्छिंद्रानें ते समयीं ॥ १७३ ॥
वंशमालिका ऐसी ऐकून । संतुष्ट झाला सवितानारायण ।
मग आपुला सिद्ध करुनि स्पंदन । वातचक्रा आव्हानी ॥ १७४ ॥
येरीकडे सकळ देव । विमानयानीं गेले सर्व । 
आपुलालें स्थान अपूर्व । पाहते झाले ते वेळां ॥ १७५ ॥
येरीकडे मच्छिंद्रनाथ कृपें आव्हानूनि पाशुपत ।
निघता झाला करुनि तीर्थ । राममूर्ती वंदूनिया ॥ १७६ ॥
आतां पुढील अध्यायीं कथन । चंद्रागिरि पाहिला ग्राम ।
तेथें गवरांतूनि गोरक्ष काढून । पुन्हा तीर्थे करील कीं ॥ १७७ ॥ 
नरहरिवंशीं धुंडीसुत । मालू हरीचा शरणागत ।
पुढिले अध्यायीं उत्तम कथेंत । निवेदील श्रोतियांसी ॥ १७८ ॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार । संमत गोरक्षकाव्य किमयागार ।
सदा परिसोत भाविक चतुर । अष्टमाध्याय गोड हा ॥ १७९ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्रीनवनाथभक्तिसार अष्टमाध्याय संपूर्ण ॥

Shree Navanath Bhaktisar adhyay 8 
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय आठवा ( ८ )


Custom Search

No comments: