Shri Navanath Bhaktisar Adhyay 40
This is the last Adhyay of Shri Navanath Bhaktisar. God Indra called all the nine nathas for the Somabhasa Yadnya at Swarga. After completion of daily practices of Yadnya; Machchhindra used to teach Astravidya of the Nathpanth to his son Meennath who was living with his mother Kilotala in the Swarga. God Indra who was very eager to learn all the Nathpantha's Astravidya, used to be there in the form of a peacock while Machchhindra was teaching Meennath. God Indra learnt all. However on the last day of the Yadnya, he asked all to forgive him for his act of learning by cheating. Indra was cursed and told that whatever knowledge he had acquired would be useless to him and he would not remember anything. However Uparicharvasu, father of Machchhindra requested to forgive God Indra. Navanath agreed to it and asked God Indra to perform tapas of Twelve years. Then in this Adhyay Malu has told the importance of reading or listening of each and every Adhyay from 1 to 40 and the gain of it. Thus here completes the Navanath Bhaktisar Grantham which is told to us by Dhundisut Malu from Narahari family.
श्रीनवनाथ भक्तिसार अध्याय चाळीसावा (४०) भाग २/२
तरी आतां सांगतो मूळापासून । कथा वर्तली कवण ।
प्रथमाध्यायीं गणपतिस्तवन । सुंदरपणीं मिरवलें ॥ १०१ ॥
उपरी सांगूनि रेतक्षिती । आणि मच्छिंद्राची जन्मस्थिती ।
तो बद्रिकाश्रमाप्रती । तपालागीं बैसला ॥ १०२ ॥
या प्रसंगाचें श्रवण पठण । नित्य करितां भावेंकरुन ।
तरी समंधबाधा घरांतून । जाईल त्रासून महाराजा ॥ १०३ ॥
द्वितीय अध्यायीं अत्रिनंदन । विद्यार्णव केला अनुग्रह देऊन ।
उपरी नागपत्रीं अश्र्वत्थीं जाऊन । सिद्धर्थकळा साधिली ॥ १०४ ॥
तो अध्याय करितां नित्य पठण । अपार धन लाभेल संसारी जाण ।
विजयलक्ष्मी पाठीं बैसून । करील हरण दरिद्र ॥ १०५ ॥
तृतीय अध्यायीं मच्छिंद्र मारुती । युद्धा प्रवर्तले श्र्वेतक्षितीं ।
युद्ध करुनि उपरांतीं । ऐक्यचित्त झालें असे ॥ १०६ ॥
याचें झालिया पठण । शत्रु होतील क्षीण ।
मुष्टिविद्यासाधन । तया होत सर्वथा ॥ १०७ ॥
मुष्टिबाधा झाली असोन । अपकार होईल तियेनें ।
मूर्तिमंत मारुती करोनि रक्षण । राहे तया घरीं सर्वदा ॥ १०८ ॥
चतुर्थ अध्यायीं वदली कथा । अष्टभैरव चामुंडा समस्ता ।
रणीं जिंकूनि वसुसुता । ज्वालामुखी भेटली ॥ १०९ ॥
तो अध्याय नित्य पठण करितां । चुकेल कपटाची बंधनव्यथा ।
शत्रु पराभवोनि सर्वथा । निरंतर शांति मिरवेल ॥ ११० ॥
पांचवे अध्यायींचें कथन । भूतें घेतलीं प्रसन्न करुन ।
अष्टपती जिंकून । विजयी झाला मच्छिंद्र ॥ १११ ॥
ती कथा नित्य करितां पठण । भूतसंचार नोहे त्या घराकारण ।
आलीं असतां जाती सोडून । परम त्रासेंकरोनियां ॥ ११२ ॥
सहाव्या अध्यायांत । शिवअस्त्र कालिका मच्छिंद्रनाथ ।
युद्ध करुनि प्रसन्नचित्त । वश्य झालीं अस्त्रें तीं ॥ ११३ ॥
तो अध्याय नित्य करितां पठण । शत्रूलागीं पडेल मोहन ।
निष्कपट तो करुनि मन । किंकर होईल द्वारींचा ॥ ११४ ॥
सातव्या अध्यायीं अपूर्व कथा । जिंकूनि वीरभद्र केली ऐक्यता ।
उपरी स्वर्गापासाव मच्छिंद्रनाथा । इच्छेसमान झालीसे ॥ ११५ ॥
ती कथा नित्य गातां ऐकतां । लिप्त नोहे चौर्यायशींची व्यथा ।
झाली असेल मिटेल सर्वथा । चिंताव्यथा हरतील ॥ ११६ ॥
जखीणभयापासुनी । त्वरित मुक्त होईल जनीं ।
एक मंडळ त्रिकालीं अभ्यासूनी फळप्राप्ति घेइंजे ॥ ११७ ॥
आठवे अध्यायीं सकळ कथन । पाशुपतरायासी रामदर्शन ।
रणीं मित्रराज जिंकोन । केला प्रसन्न विद्येसी ॥ ११८ ॥
तो अध्याय नित्य गातां ऐकतां । आपुला सखा देशावरता ।
तो गृहासी येऊनि भेटेल तत्त्वतां । चिंताव्यथा हरेल कीं ॥ ११९ ॥
नववे अध्यायीं कथन । गोरक्षाचा होऊनि जन्म ।
उपरी सेवूनि बद्रिकाश्रम । विद्यार्णव झालासे ॥ १२० ॥
तो अध्याय नित्य गातां ऐकतां । साधेल विद्या इच्छिल्या अर्था ।
ब्रह्मज्ञान रसायण कविता । चौदा विद्या करोनि राहे ॥ १२१ ॥
दशम अध्यायींचे कथन । स्त्रीदेशीं मच्छिंद्रनंदन ।
अंजनीसुतअर्थी पाठवोन । अर्थ कीलोतळेचे पुरविले ॥ १२२ ॥
एकांती बैसूनि अनुष्ठान । संजीवनी पाठ करी गौरनंदन ।
गहिनीनाथाचा जन्म । कर्दमपुतळा करितां तो ॥ १२३ ॥
तो अध्याय करितां पठण । स्त्रियांचे दोष जातील कपटपण ।
मुलें वांचतील होतां जाण । जगीं संतती मिरवेल ॥ १२४ ॥
उपरी गृहद्रव्याच्या यज्ञांत । उदय पावला जालिंदरनाथ ।
तो एकादश अध्याय पठण करितां नित्य । अग्निपीडा होईना ॥ १२५ ॥
आणि जयाचे धवळारांत । पूर्वींचा कांहीं दोष असत ।
तो जाऊनि संपत्तिविशेषातें । संततीसह भोगील कीं ॥ १२६ ॥
बाराव्यांत हें कथन । जालिंदरें गुरु केला अत्रिनंदन ।
उपरी कानिफाचा होऊनि जन्म । विटंबिलें देवासी ॥ १२७ ॥
तो अध्याय करितां पठण । क्षोभ न पावे कोणी देवता जाण ।
क्षोभित असल्या होतील शमन । सुख सर्व त्याचि देती ॥ १२८ ॥
तेराव्या अध्यायांत । मैनावतीतें प्रसन्न नाथ ।
होऊनि केलें अचल सनाथ । ब्रह्मरुपीं आगळी ॥ १२९ ॥
तरी तो अध्याय करितां पठण । स्त्रीहत्येचे दोष सघन ।
त्यांचें होऊनि सकळ निरसन । उद्धरील पूर्वजां ॥ १३० ॥
चतुर्दश अध्यायीं कथन । गर्तेंत जालिंदर गोपीचंदानें ।
स्त्रीबोलें घातले नेऊन । गुप्त निशीमाझारी ॥ १३१ ॥
तो अध्याय पठण करितां । असेल बंद कारागृहीं व्यथा ।
तरी त्याची होईल मुक्तता । निर्दोष जनीं वर्तेल ॥ १३२ ॥
पंचदशांत सुढाळ कथन । कानिफामारुतींचें युद्धकंदन ।
उपरी स्त्रेराज्यांत जाऊन । आतिथ्य पूर्ण भोगिलें ॥ १३३ ॥
तो अध्याय गातां ऐकता नित्य । घरचे दारचे कलह नित्यकृत्य ।
शांति पावोनि सर्व सुखांत । निर्भयपणें नांदेल ॥ १३४ ॥
सोळावे अध्यायांत । कानिफा भेटला गोपीचंदातें ।
तरी तो अध्याय वाचितां नित्यानित्य । दुःस्वप्नांतें नाशील ॥ १३५ ॥
सप्तदश अध्यायीं कथन । जालिंदर काढिला गर्तेंतून ।
उपरी नाथाची दीक्षा घेऊन । गोपीचंदें अर्चिला ॥ १३६ ॥
तोचि अध्याय पठण करितां । योग साधेल आचरतां ।
दुष्टबुद्धि जाईल सर्वथा । सुपंथपंथा लागेल तो ॥ १३७ ॥
अष्टादश अध्यायीं कथन । बद्रिकाश्रमीं गोपीचंद जाऊन ।
तपःपूर्ण भगिनी उठवोन । तीव्रपणीं आचरला ॥ १३८ ॥
तो अध्याय नित्य पठण करितां । ब्रह्महत्या नासेल सर्वथा ।
पूर्वज कुंभीपाकीं असतां । सुटका होईल तयांची ॥ १३९ ॥
एकोणिसाव्यांत गोरक्षाकारण । भेटला मारुती श्रीरामप्रीतीनें ।
तरी तो अध्याय करितां पठण । तया मोक्षार्थ साधेल कीं ॥ १४० ॥
विसाव्यांत अद्भुत कथन । श्रीमच्छिंद्रा भेटीचें कारण ।
गोरक्ष स्त्रीराज्यांत जाऊन । स्नेहसंपन्न जाहला ॥ १४१ ॥
तो अध्याय पठण करितां गोड । लागलें असेल अत्यंत वेड ।
तरी ती चेष्टा जाऊनि धड । होऊनि प्रपंच आचरेल ॥ १४२ ॥
एकविसाव्यांत स्त्रीराज्यांतून । मच्छिंद्रासी काढिलें गोरक्षनंदने ।
नानापरी बोघूनि मन । दुष्टकर्मातें निवटिलें ॥ १४३ ॥
तो अध्याय नित्य पठण करितां । नासेल बहुजन्मांची गोहत्या ।
निष्कलंक होऊनि चित्ता । तपोलोकीं मिरवेल ॥ १४४ ॥
बाविसाव्यांत सोरटीग्रामीं । गोरक्षें मीननाथा मारोनी ।
पुन्हां उठविला मंत्रेंकरोनी । मच्छिंद्रमोहेंकरोनियां ॥ १४५ ॥
तरी तो अध्याय नित्य पठण करितां । पुत्रार्थिता पुत्र तत्त्वतां ।
तो होईल विद्यावंत । विद्वज्जनां मान्य कीं ॥ १४६ ॥
तेविसाव्यांत रसाळ कथन । मच्छिंद्र गोरक्ष गर्भाद्रीं जाऊन ।
सुवर्णविटेकरितां सुवर्ण । गर्भगिरी केला असे ॥ १४७ ॥
आणिक केला तेथें उत्सव । तरी तो अध्याय पठण नित्य भावें ।
करितां घरीं सुवर्ण नव । अखंड राहे भरोनी ॥ १४८ ॥
चौविसाव्यांत भर्तरीनाथ । जन्मोनि आला अवंतिकेंत ।
तरी तो अध्याय पठण करितां नित्य । बाळहत्या नासेल ॥ १४९ ॥
बाळहत्या जन्मांतरी । तेणें समस्त वांझ होती नारी ।
तरी ते नासेल संसारीं । सुखी होऊनि बाळ वांचे ॥ १५० ॥
पंचविसाव्यांत गंधर्व सुरोचन । रासभ (गाढव) झाला शापेंकरुन ।
तरी तो अध्याय केलिया पठण । शापवचन बाधेना ॥ १५१ ॥
आणि मानवाविण दुसरा जन्म । होणार नाहीं तयाकारण ।
आरोग्य काया पतिव्रता कामिन । पुत्र गुणी होईल ॥ १५२ ॥
सव्विसावे अध्यायांत । गणगंधर्व झाला विक्रमसुत ।
आणि विक्रम भर्तरीसुत एकचित्त । भेटी होऊनि राहिले ॥ १५३ ॥
तो अध्याय करितां पठण । गोत्रहत्या जाती नासून ।
पोटीं पाठीं शत्रुसंधान । न राहे होऊनियां ॥ १५४ ॥
सत्ताविसाव्यांत अद्भुत कथन । राज्यपदीं बैसला राव विक्रम ।
भर्तरी पिंगलेचें होऊनि लग्न । दत्तानुग्रह लाधला ॥ १५५ ॥
तरी तो अध्याय करितां पठण । पदच्युत पावेल पूर्वस्थान ।
गेली वस्तु पुनः परतोन । सांपडेल तयाची ॥ १५६ ॥
अठ्ठाविसाव्या अध्यायांत । पिंगलेकरितां स्मशानांत ।
विरक्त होऊनि भर्तरीनाथ । पूर्ण तप आचरला ॥ १५७ ॥
तो अध्याय करितां श्रवण पठण । त्या भाविकाचें होईल लग्न ।
कांता लाभेल गुणवान । सदा रत सेवेसी ॥ १५८ ॥
एकुणतिसावे अध्यायींचें चरित्र । भर्तरी होऊनि विरक्त पवित्र ।
गोरक्षा सांगती अत्रिपुत्र । गुरु नाथ पैं केला ॥ १५९ ॥
तो अध्याय नित्य करितां पठण । सुटेल क्षयरोगापासून ।
आणि त्रितापांची वार्ता जाण । कालत्रयीं घडेना ॥ १६० ॥
तिसाव्या अध्यायांत । जन्मला चौरंगीनाथ ।
परी तें चरित्र पठण करितां । तस्करी दृष्टी बंधन होय ॥ १६१ ॥
एकतिसाव्यांत चौरंगीनाथ । तपा बैसला हिमालयांत ।
तरी तो अध्याय पढतां नित्य । कपटमंत्र न चालती ॥ १६२ ॥
बत्तिसाव्यांत सुगम कथन । मच्छिंद्र त्रिविक्रमदेहीं संचरोन ।
द्वादश वर्षें राज्य करोन । पुत्र दिधला रेवतीसी ॥ १६३ ॥
त्या अध्यायाचें करितां पठण । आयुष्य असतां देहाकारण ।
गंडांतरें करुं येतील विघ्नें । आपोआप टळतील कीं ॥ १६४ ॥
तेहतिसाव्यांत गौरनंदन । वीरभद्राचा घेऊनि प्राण ।
मच्छिंद्रशव स्वर्गाहून । महीवरती उतरविलें ॥ १६५ ॥
तरी ती कथा करितां पठण । जाणें कोणत्याही कार्यकारण ।
तो सिद्धार्थ साधेल कार्यसाधन । यश येऊनि येईल तो ॥ १६६ ॥
चौतिसाव्यांत रेवणजन्म । होऊनि भेटला अत्रिनंदन ।
सहज सिद्धिकळा दावून । गेला असें महाराजा ॥ १६७ ॥
तरी ती कथा करितां पठण । जाणें कोणत्याही कार्याकारण ।
तो सिद्धार्थ साधेल कार्यसाधन । यश येऊनि येईल तो ॥ १६८ ॥
पस्तिसाव्यांत पूर्ण कथन । रेवण झाला विद्यावान ।
दत्तकृपें स्वर्गीं जाऊन । बाळें आणिलीं विप्रांची ॥ १६९ ॥
तरी ती कथा करितां पठण । महासिद्ध येईल उदराकारण ।
बेचाळिसांचें करुनि उद्धारण । गातील आख्यान लोक परी ॥ १७० ॥
छतिसाव्यांत अपूर्व कथा । जन्म झाला वटसिद्धनाथा ।
आस्तिक ऋषि झाला त्राता । तयाचियें मातेसी ॥ १७१ ॥
ती कथा करितां श्रवण पठण । सर्पवृश्र्चिकदंश जयाकारण ।
झालिया विषाचें उत्तीर्ण । श्रवण केलिया अध्याय तो ॥ १७२ ॥
सदतिसाव्या अध्यायांत । नागनाथासी गुरु झाला अत्रिसुत ।
उपरी विद्याबळें मच्छिंद्रनाथ । जिंकियेले भिडोनि ॥ १७३ ॥
तरी ती कथा करितां श्रवण पठण । सदना न लागे कुशीलपण ।
लाजल्या त्याचें होईल बंधन । विद्यावंत होउनियां ॥ १७४ ॥
अडतिसाव्यांत चरपटीचा जन्म । होऊनि दत्तात्रेयें दीक्षा देऊन ।
विद्येमाजी करुनि संपन्न । तीर्थावळी धाडिला ॥ १७५ ॥
तरी ती कथा सुरस । श्रवण पठण होतां त्यास ।
हिंवताप मधुरा नवज्वरास । शांति होईल सर्वस्वीं ॥ १७६ ॥
एकुणचाळिसाव्यांत कथा । चरपटीनें जिंकिलें अमरनाथा ।
हरिहरादि देवां समस्तां । स्वर्गीं ख्याती लाविली ॥ १७७ ॥
तरी तो अध्याय करितां पठण । तो युद्धा जातां तपोघन ।
शस्त्रबाण पावोन । जय घेऊन येईल कीं ॥ १७८ ॥
यावरी चाळिसाव्यांत कथन । सर्व नाथांतें पाकशासन ।
स्वर्गीं नेऊनि करी हवन । विद्यार्थिरुपें अर्थ पुरविला ॥१७९ ॥
तरी चाळिसावा नित्य पठण करितां । लाभेल सर्व इच्छिल्या अर्था ।
यश श्री ऐश्र्वर्य योग्यता । पुत्रपौत्रीं नांदेल ॥ १८० ॥
एकुणचाळिसांचा फलार्थ । तोचि प्राप्त तदर्थ ।
कीं चाळिसावा एक परिस । कीं कामधेनु कल्पतरु ॥ १८१ ॥
गोरक्ष बोलतो वाचेकरुन । त्याचे असत्य मानील जन ।
जो निंदक यातें दावीं निंदून । तो अधिकारी विघ्नांचा ॥ १८२ ॥
इहलोकीं परलोकी । राहणार नाहीं परम सुखी ।
निर्वंश पावोनि शेवटीं वंशीं । पचेल ग्रंथ निंदितां हा ॥ १८३ ॥
अगा हा ग्रंथ नोहे भक्तिसार । आहे गोरक्षाचा किमयागार ।
परी पालटोनि भाषांतर । महाराष्ट्र अक्षरीं रेखिला ॥ १८४ ॥
म्हणोनि श्रोते हो भाविक जन । सोडोनि द्या कीं निंदावचन ।
विश्र्वासापर स्वार होऊन । मोक्षमुक्काम करा कीं ॥ १८५ ॥
तरी हा ग्रंथ संग्रह करुन । चमत्कार पहावा पठण करुन ।
चाळीस प्रसंग मंत्रनिर्वाण । महासिद्धीचे असती कीं ॥ १८६ ॥
हे चाळीस मंत्र परोपकारी । आहेत दुःखाची करतील बोहरी (नाश) ।
तरी संग्रह करुनि उगलेचि घरीं । ठेवा विश्र्वास धरुनियां ॥ १८७ ॥
ह्या चाळीस अध्यायांत मंत्रतंत्र । सुखकारक असती अति पवित्र ।
दुःखदीसरिद्रहरण सर्वत्र । गोरक्षानें निर्मिलें ॥ १८८ ॥
पठण करितां षण्मासमिती । जो अध्याय ज्या कार्याप्रती ।
तें कार्य होऊनि निःसंशय चित्तीं । पठण करुनि पहावें ॥ १८९ ॥
याउपरी वाचितां न ये जरी । तरी संग्रह करुनि ठेवावा घरीं ।
नित्य वंदितां नमस्कारीं । कार्य त्यांतचि घडेल ॥ १९० ॥
एक कुसुम झोंकूनि वरती । चला म्हणावें मम कार्याप्रती ।
नवनाथ वंदुनि उक्तीं । नमस्कार करावा ॥ १९१ ॥
ऐसा याचा आहे मार्ग । करुनि पहावा चमत्कार चांग ।
नवनाथ ओडवोनि अंग । कार्य तुमचें करितील कीं ॥ १९२ ॥
तरी असो विजय संपत्ती । नांदो श्रोत्यांच्या गृहाप्रती ।
धुंडीसुत हेंचि प्रार्थी । मालू नरहरी देवांतें ॥ १९३ ॥
शके सत्राशें एकेचाळीस । प्रमाथीनाम ज्येष्ठ मास ।
शुक्लपक्ष प्रतिपदेस । ग्रंथ समाप्त जाहला ॥ १९४ ॥
तरी ओंव्या सर्व नेमस्त । सप्तसहस्त्र सहाशत ।
उपरी ऐसे दैदीप्यवंत । ओंव्या मंत्र असती ह्या ॥ १९५ ॥
अध्याय वाचावया न बनेल ज्यासी । तरी अध्यायातील एक ओंवीसी ।
पठण करुनि नाथनामासी । कार्यकाज करावें ॥ १९६ ॥
असो आतां बहु भाव । श्रोते असोत चिरंजीव ।
इहलोकीं परलोकी ठेव । आनंदाची होतसे ॥ १९७ ॥
तरी समस्त नाथांतें धुंडीसुत । मालु नरहरि हेंचि विनवीत ।
कीं श्रोते असोत सुखरुपवंत । सर्व अर्थीं सर्वदा ॥ १९८ ॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार । संमत गोरक्षकाव्य किमयागार ।
सदा परिसोत भाविक चतुर । चत्वारिंशतितमाध्याय गोड हा ॥ १९९ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥
॥ इति श्रीनवनाथभक्तिसार संपूर्ण ॥
॥ श्रीनवनाथांचा श्र्लोक ॥
॥ गोरक्षजालंदरचर्पटाश्र्च अड्भंगकानीफमच्छिंद्राद्याः
चौरंगिरेवाणकभर्त्रिसंज्ञा भूम्यां बभुवुर्नानाथसिद्धां ॥
Shri Navanath Bhaktisar Adhyay 40 श्रीनवनाथ भक्तिसार अध्याय चाळीसावा (४०)
Custom Search
No comments:
Post a Comment