Tuesday, April 18, 2017

Samas Choutha Swaguna Pariksha C समास चवथा स्वगुणपरीक्षा (क)


Dashak Tisara Samas Choutha Swaguna Pariksha C 
Samas Choutha Swaguna Pariksha C is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about the pains suffered after taking birth on this earth and how a common man behaves after he is young. Qualities he is having in his nature that obstructs his spiritual progress.
समास चवथा स्वगुणपरीक्षा (क) 

श्रीराम ॥
लेंकुरें उदंड जालीं ॥ तों ते लक्ष्मी निघोन गेली ।
बापडीं भिकेसी लागलीं । कांहीं खाया मिळेना ॥ १ ॥ 
अर्थ
१) मुलें पुष्कळ झाली. त्यामुळे खर्च वाढला. साठवून ठेवलेला पैसा संपला.
खायला मिळेना त्यामुळे मुले भिकेस लागली.
लेंकुरें खेळती धाकुटीं । येके रांगती येकें पोटीं ।
ऐसी घरभरी जाली दाटी । कन्या आणी पुत्रांची ॥ २ ॥
२) कांही कडेवर, कांही रांगताहेत अशी ती सर्व घरांत खेळु लागल्याने घरांत मुली आणी मुलांची गर्दी झाली.
दिवसेदिवस खर्च वाढला । यावा होता तो खुंटोन गेला ।
कन्या उपवरी जाल्या त्यांला । उजवावया द्रव्य नाहीं ॥ ३ ॥
३) दिवसेंदिवस खर्च वाढला. पैसा येणे बंद पडले.  मुली लग्गाच्या झाल्या पण त्यांचे लग्न करावयास पैसा नाही. 
मायेबापें होतीं संपन्न । त्यांचे उदंड होते धन ।
तेणें करितां प्रतिष्ठा मान । जनीं जाला होता ॥ ४ ॥
४) आई-वडिल संपन्न होते. त्यांनी बराच धनाचा साठा केला होता. त्यामुळें लोकंत मान व प्रतिष्ठा मिळत होती.  
भरम आहे लोकाचारीं । पहिली नांदणूक नाहीं घरीं ।
दिवसेदिवस अभ्यांतरीं । दरिद्र आलें ॥ ५ ॥   
५) लोकांशी वागतांना पूर्वींच्या श्रीमंतीचा भ्रम मनांत ठेवून होता. परंतु पूर्वीं सारखी  सुबत्ता राहिली नाही. घरांत दारिद्र्य येत होते.  
ऐसी घरवात वाढली । खाती तोंडें मिळालीं ।
तेणेम प्राणीयास लागली । काळजी उद्वेगाची ॥ ६ ॥
६) अशा रीतीने प्रपंच वाढला. खाणारी तोंडे वाढली.  त्यामुळे त्याला काळजी लागली व (सर्वांना खायला पैसा कमी असल्याने कोठून आणायचे ) दःख होऊ लागले.
कन्या उपवरी जाल्या । पुत्रांस नोवर्‍या आल्या ।
आतां उजवणा केल्या । पाहिजेत कीं ॥ ७ ॥
७) मुलींचे लग्नाचे वय झाले. मुलांनाही नवर्‍या सांगुन येऊ लागल्या. यांची लग्ने केली  पाहिजेत. 
जरी मुलें तैंसींच राहिलीं । तरी पुन्हा लोकलाज जाली ।
म्हणती कासया व्यालीं । जन्मदारिद्र्यें ॥ ८ ॥
८) जर मुलांना लग्नाशिवाय ठेविले तर लोकांत लाज जाईल व ते म्हटतील की घरांत दारिद्र होते तर जन्मास कां घातली?
ऐसी लोकलाज होईल । वडिलांचे नांव जाईल ।
आतां रुण कोण देइल । लग्नापुरतें ॥ ९ ॥
९) अशा रीतीने लोक लाज जाईल व वडिलांचे नांवही जाईल. लग्नांपुरते तरी आतां कोण कर्ज देईल?  
मागें रुण ज्याचें घेतलें । त्याचें परतोन नाहीं दिल्हें । 
ऐसें आभाळ कोंसळलें । उद्वेगाचें ॥ १० ॥
१०) मागे ज्यांच्याकडून कर्ज घेतले त्यांचे अजून परत दिले नाही.  अशा रीतीने दुःखाचे मोठे आभाळच कोसळले.
आपण खातों अन्नासी । अन्न खातें आपणासीं ।
सर्वकाळ मानसीं । चिंतातुर ॥ ११ ॥
११) आपण अन्न खातो, पण कधीकधी तेच खाल्लेले अन्न अंगी लागत नाही. तशीच त्याची अवस्था झाली. कारण तो दुःखाने, काळजीने ग्रस्त झाला होता. 
पती अवघीच मोडली । वस्तभाव गाहाण पडली ।
अहा देवा वेळ आली । आतां डिवाळ्याची ॥ १२ ॥
१२) आता पत राहीली नाही. म्हणजे लोक विचारीत नाहिसे झाले. घरांती चीज वस्तु गहाण पडली. त्यामुळे तो ' देवा दिवाळे काढण्याची वेळ आली ' असे म्हणु लागला. 
कांहीं केला ताडामोडा । विकिला घरींचा पाडारेडा ।
कांहीं पैका रोकडा । कळांतरें काढिला ॥ १३ ॥
१३) मग काही घरांतील वस्तु विकल्या. जनावरें विकली. व्याजाने काहीं पैसा कर्जाने घेतला.
ऐसें रुण घेतलें । लोकिकीं दंभ केलें ।   
सकळ म्हणती नांव राखिलें । वडिलांचें ॥ १४ ॥
१४) अशा रीतीने कर्ज घेतले. लोकांत खोटा मोठेपणा मिरवला. सगळे लोक म्हणु लागले  की वडिलांचे नांव राखले.
ऐसें रुण उदंड जालें । रिणाइतीं वेढून घेतलें ।
मग प्रयाण आरंभिलें । विदेशाप्रती ॥ १५ ॥
१५) अशा रीतीने पुष्कळ कर्ज झाले. कर्ज देणार्‍यांनी त्याला वेढून घेतले. मग ह्याने विदेशी प्रयाण करण्याचे ठरविले.
दोनी वरुषें बुडी मारिली । नीच सेवा अंगीकारिली ।
शरीरें आपदा भोगिली । अतिशयेंसीं ॥ १६ ॥
१६) दोन वर्षे परदेशी राहेला. नीच लोकांची चाकरी केली. शरीर यातना फार भोगल्या.
कांहीं मेळविलें विदेशीं । जीव लागला मनुष्यांपासीं ।
मग पुसोनियां स्वामीसी । मुरडत  जाला ॥ १७ ॥
१७) कांहीं पैसा परदेशी मिळविला. मग घरच्या माणसांची त्यांच्या ओढीने आठवण झाली. मग धन्याची परवानगी काढून घरी जाण्यास निघाला. 
तव तें अत्यंत पीडावलीं । वाट पाहात बैसलीं ।
म्हणती दिवसगती कां लागली । काये करणें देवा ॥ १८ ॥
१८) घरी आल्यावर त्याने बघितले की त्याची माणसे अति कष्टी झाली होती. ती त्याची वाट पाहात होती. देवाला साद घालत होती व विचारत होती की 'त्याला यावयास एवढा उशीर कां झाला?'  
आतां आम्हीं कायें खावें । किती उपवासीं मरावें ।
ऐसियाचे संगतीस देवें । कां पां घातलें आम्हांसी ॥ १९ ॥
१९) आम्ही काय खायचे-प्यायचे कां आम्ही उपवास घडून मरावें? अशा माणसाशी दैवाने आमची कां गांठ घातली?
ऐसें आपुलें सुख पाहाती । परी त्याचें दुःख नेणती ।
आणी शक्ती गेलियां अंतीं । कोणीच कामा न येती ॥ २० ॥
२०) अशा रीतीने आपल्याच सुखाचा विचार ती करत होती. पण त्याच्या कष्टाचा, दुःखाचा विचार करत नव्हती. एकदा कां शक्ती क्षीण झाली की कोणी उपयोगी पडत नाही.  
असो ऐसी वाट पाहतां । दृष्टीं देखिला अवचिता ।
मुलें धावती ताता । भागलास म्हणौनी ॥ २१ ॥
२१) अशा प्रकारें वाट पाहात असतां अचानक हा दृष्टीस पडला. मुलें धांवतधांवत येऊन म्हणु लागली बाबा-बाबा तुम्ही किती दमलात.
स्त्री देखोन आनंदली । म्हणे आमची दैन्य फिटली ।
तंव येरें दिधली । गांठोडी हातीं ॥ २२ ॥
२२) बायको ह्याला बघुन खुष झाली. आता आमचे दैन्य फिटले असे म्हणु लागली. 
मग याने तीच्या हातांत दोन गाठोडी दिली.
सकळांस आनंद जाला । म्हणती आमुचा वडील आला ।
तेणें तरी आम्हांला । आग्यां टोप्या आणिल्या ॥ २३ ॥
सगळ्यांना आनंद झाला व ते म्हणु लागले आमचा बाबा आला. त्याने आम्हाला कपडे, टोप्या आणल्या.
ऐसा आनंद चारी दिवस । सवेंच मांडिला कुसमुस ।
म्हणती हें गेलियां आम्हांस । पुन्हा आपदा लागती ॥ २४ ॥
२४) असा चार दिवस आनंद केला. पुढें कुरबुर सुरु झाली. सर्व म्हणु लागले हा गेल्यावर पुन्हा आमचे हाल सुरु होणार. 
म्हणौनी आणिलें तें असावें । येणें मागुतें विदेशास जावें ।
आम्ही हें खाऊं न तों यावें । द्रव्य मेळऊन ॥ २५ ॥
२५) ते म्हणु लागले आणलेले सर्व येथेच ठेवून परत याने परदेशी जावे. आम्ही आत्ता आणिलेले सर्व खाऊन संपविण्याच्या आंत परत धन मिळवून याने परत यावे.   
ऐसी वासना सकळांची । अवघीं सोइरीं सुखाचीं ।
स्त्री अत्यंत प्रीतीची । तेहि सुखाचं लागली ॥ २६ ॥
२६) अशी त्याच्या सर्व माणासांचीच इच्छा होती. सर्वजण फक्त आपलेच सुख बघणारे. बायको अत्यंत प्रिय पण तीही स्व-सुखालाच चटावलेली.  
विदेसी बहु दगदला । विश्रांती घ्यावया आला ।
स्वासहि नाहीं टाकिला । तों जाणें वोढवलें ॥ २७ ॥
२७) हा पसदेशांत अति कष्टला म्हणुन विश्रांती घ्याावयास घरी येऊन श्र्वास घेतो न घेतो तोच परत सर्वांच्या इच्छे मुळे पैसा मिळवण्या परदेशी जाणे ओढवले.  
पुढें अपेक्षा जोसियांची । केली विवंचना मुहू्र्ताची । 
वृत्ति गुतली तयाची । जातां प्रशस्त न वटे ॥ २८ ॥
२८) नंतर ज्योतिषांस विचारुन जाण्याचा मुहूर्त ठरविला. पण घरी जीव गुंतल्याने जाण्यासाठी याचे मन तयार होईना.
माया मात्रा सिद्ध केली । कांहीं सामग्री बांधली ।
लेंकुरें दृष्टीस पाहिलीं । मार्गस्त जाला ॥ २९ ॥
२९) पण मग थोडें पैसे, औषधे घेतली. कांही सामान बरोबर घेतले. मुलांना एकवार पाहुन घेतले व परत परदेशी जाण्यास मार्गी लागला.  
स्त्रियेस अवलोकिलें । वियोगें दुःख बहुत वाटलें ।
प्रारब्धसूत्र तुकलें । रुणानबंधाचें ॥ ३० ॥
३०) बायकोला प्रेमाने बघितले. वियोगाचे दुःख फार वाटले. नियतीने बांधलेला कुतुंबाशी असलेला रुणानुबंध संपला असा विचार मनांत आला.  
कंठ सद्गदित जाला । न संवरेच गहिवरला ।
लेंकुरा आणी पित्याला । तडातोडी जाली ॥ ३१ ॥
३१) कंठ सद्गदित होऊन भरुन आला. त्याला आवरेना इतका गहिवरुन आला. बाप-मुलांची ताटातूट झाली. 
जरी रुणानबंध असेल । तरी मागुती भेटी होईल ।
नाहीं तरी संगती पुरेल । येचि भेटीनें तुमची ॥ ३२ ॥
३२) जर ऋणानुबंध असेल तर आपली परत भेट होईल नाहीतर हीच आपली शेवटची भेट हे समजला. 
ऐसें बोलोन स्वार होये। मागुता  फिरफिरों पाहे ।
वियोगदुःख न साहे । परंतु कांहीं न चले ॥ ३३ ॥
३३) एवढे बोलून तो घोड्यावर बसला. परंतु परत परत मागे वळून वियोगाचे दुःख सहन न झाल्याने पाहात होता. पण परत परदेशी जाण्यावाचून गत्यंतर नव्हते. 
आपुला गांव राहिला मागें । चित्त भ्रमलें संसारउद्वेगें ।
दुःखवला प्रपंचसंगें । अभिमानास्तव ॥ ३४ ॥
३४) आता प्रवास सुरु झाल्यावर आपले गांव मागे राहिले. संसाराच्या कटकटीमुळें उद्वेग झाला. मीपणानें प्रपंचाची संगत केल्याने तो अत्यंत दुःखी झाला.  
ते समईं माता आठवली । म्हणे धन्य धन्य ते माउली ।
मजकारणें बहुत कष्टली । परी मी नेणेंचि मूर्ख ॥ ३५ ॥
३५) त्यावेळी त्याला आईची आठवण झाली. म्हणु लागला की धन्य धन्य ती माझी आई की जीने माझ्यासाठी किती खस्ता खालल्या. पण मी त्याकडे लक्ष दिले नाही.
आजी जरी ते असती । तरी मजला कदा न विशंभती ।
वियोग होतां आक्रंदती । ते पोटागि वेगळीच ॥ ३६ ॥
३६) आज जर ती असती तर तिने मला परदेशी  जाऊं दिले नसते.  वियोग झाल्यावर इतर मोठ्याने रडतात खरे पण वियोगामुळे अंतःकरणापासून रडणारी आई काहीं वेगळीच.  
पुत्र वैभवहीन भिकारी । माता तैसाचि अंगिकारी ।
दगदला देखोनि अंतरीं । त्याच्या दुःखें दुःखवे ॥ ३७ ॥
३७) मुलगा वैभवहीन दरिद्री असला तरी आई त्याचा तसाच स्वीकार करते. त्याच्या कष्टाने-दुः खाने ती दुःखी होते.
प्रपंव विचारें पाहातां । हें सकळ जोडे न जोडे माता ।
हें शरीर जयेकरितां । निर्माण जालें ॥ ३८ ॥
३८) प्रपंचाचा विचार केला तर असें दिसते की प्रपंचात इतर सर्व कांही मिळेल पण या शरीराला जिनें जन्म दिला ती आई मात्र मिळणार नाही. 
लांव तरी ते माया । काय कराविया सहश्र जायाा ।
परी भुलोन गेलों वायां । मकरध्वजाचेनि ॥ ३९ ॥
३९) आई जरी डाकिणी असली तरी मुलावर तिचे अत्यंत प्रेम राहाते. हजार बायका केल्या तरी हें प्रेम त्यांच्याकडून मिळणार नाही. पण कामवासनेने मी अगदी वेड्यासारखा वागलो.
या येका कामाकारणें । जिवलगांसि द्वंद्व घेणें ।
सखीं तींच पिसुणें । ऐसी वाटतीं ॥ ४० ॥
४०) या एका कामवासनेपायी मी जिवलगांशी भांडलो, माझे जिवलग मित्र मला लबाड वाटूं लागले. 
म्हणौन धन्य धन्य ते प्रपंची जन । जे मायेबापाचें भजन ।
करिती न करिती मन । निष्ठुर जिवलगांसीं ॥ ४१ ॥
४१) म्हणून जीं प्रपंचात असलेली माणसें आई-वडिलांशी प्रेमाने वागतात ती धन्य होत. आपल्या जिवलगांच्या बाबतींत ती निष्ठुरपणे वागत नाहीत.
संगती स्त्रीबाळकाची । आहे साठी जन्माची ।
परी मायबापें कैंची । मिळतील पुढें ॥ ४२ ॥
४२) बायको-मुले यांचा सहवास आपल्याला जन्मभर लाभतो. पण आई-वडिल थोडे  दिवस असतात. त्यांचा सहवास जन्मभर कसा पुरेल?
ऐसें पूर्वीं होतें ऐकिलें । परि ते समंई नाहीं कळलें ।
मन हे बुडोन गेलें । रतिसुखाचा डोहीं ॥ ४३ ॥
४३) या गोष्टी मी पूर्वी ऐकल्या होत्या. परंतु तारुण्याच्या मस्तीने व कामवासनेच्या अधीन असल्याने तेव्हां कळले नाही.  
हे सखीं वाटती परी पिसुणें । मिळालीं वैभवाकारणें ।
रितें जातां लाजिरवाणें । अत्यंत वाटे ॥ ४४ ॥
४४) ज्यांना मी सखे मानले ते लबाड होते. पैश्याच्या लोभाने ते माझ्यापाशी जमा झाले होते. पण पैशाशिवाय रिकाम्या हाती जाणे लाजिरवाणे वाटते.
आतां भलतैसें करावें । परि द्रव्य मेळऊन न्यावें ।
रितें जातां स्वभावें । दुःख आहे ॥ ४५ ॥   
४५) आतां काय वाटेल तें करुन पैका मिळवून नेला पाहिजे. रिकाम्या हाती जाणे म्हणजे स्वाभाविकच दुःख ओढवून घेणे आहे.          
ऐसी वेवर्धना करी । दुःख वाटलें अंतरीं ।
चिंतेचिये माहापुरीं । बुडोन गेला ॥ ४६ ॥
४६) असे विचार त्याच्या मनांत येऊ लागले. तो दुःखी होऊन चिंतातुर झाला.
ऐसा हा देह आपुला । असतांच पराधेन केला ।
ईश्र्वरीं कानकोंडा जाला । कुटुंबकबाडी ॥ ४७ ॥  
४७) हा देह आपल्या मालकीचा असूनही दुसर्‍ाच्या गुलामींत घालविला. ईश्र्वरासाठी त्याल झिजविला नाही. कुटुंबासाठी कष्ट करण्यासाठीच याचा वापर केला.
या येका कामासाठीं । जन्म गेला आटाटी ।   
वय वेचल्यां सेवटीं । येकलेंचि जावें ॥ ४८ ॥
४८) या एका कामवासनेसाठी जन्मभर आटापिटा केला. आणि आयुष्य संपल्यावर मात्र एकट्यालाच जावे लागणर.  
ऐसा मनीं प्रस्तावला । क्षण येक उदास जाला ।
सवेंचि प्राणी झळंबला । मायाजाळें ॥ ४९ ॥
४९) अशा प्रकारे पश्र्चातापाने तो मनांत उदास झाला. परंतु परत तो मायेच्या प्रेमाच्या जाळ्यांत सापडला.
कन्यापुत्रें आठवलीं । मनीहूनि क्षिती वाटली ।
म्हणे लेंकुरें अंतरलीं । माझी मज ॥ ५० ॥
५०) मुलामलींची आठवण झाली. मनांत वाईट वाटले. माझी मुले मला अंतरली असे तो म्हणाला.   
मागील दुःख आठवलें । जें जें होतें प्राप्त जालें ।
मग रुदन आरंभिलें । दीर्घ स्वरें ॥ ५१ ॥
५१) जे दुःख पूर्वी भोगले होते ते आठवले व मग तो मोठ्याने रडू लागला.
आरण्यरुदन करितां । कोणी नाहीं बुझाविता ।
मग होये विचारिता । आपुले मनीं ॥ ५२ ॥
५२) आरण्यांत कोणी रडू लागला तरी त्यास शांत करणारा तेथे कोणी भेटत नाही. म्हणून त्याने आपल्या मनाशीच विचार केल. 
आतां कासया रडावें । प्राप्त होतें तें भोगावें ।
ऐसें बोलोनियां जीवें । धारिष्ट केलें ॥ ५३ ॥
५३) आता कशाकरितां रडावें. जे आपल्या वाट्यास आहे ते भोगावे. असे म्हणून त्याने स्वतःस धीर दिला. 
ऐसा दुःखे दगदला । मग विदेशाप्रती गेला ।
पुढें प्रसंग वर्तला । तो सावध ऐका ॥ ५४ ॥
५४) असा दुःखाने दमलेला-थकलेला, तो परत परदेशी गेला. पुढे काय झाले ते सावधपणे ऐका. 
॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे स्वगुणपरीक्षानाम समास चवथा ॥   
Samas Choutha Swaguna Pariksha C
समास चवथा स्वगुणपरीक्षा (क) 


Custom Search

No comments: