Tuesday, April 4, 2017

Samas Dusara Swaguna Pariksha A समास दुसरा स्वगुणपरीक्षा (अ)


Dashak Tisara Samas Dusara Swaguna Pariksha A 
Samas Dusara Swaguna Pariksha A is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about the pains suffered after taking birth on this earth and how a common man behaves after he is young. The qualities in his nature which obstructs his spititual progress.
समास दुसरा स्वगुणपरीक्षा (अ)
संसार हाचि दुःखमूळ । लागती दुःखाचे इंगळ ।
मागां बोलिली तळमळ । गर्भवासाची ॥ १ ॥
१) संसार हाच दुःखाचे मूळ आहे. जन्म झाला की, दुःखाचे इंगळ जाणवू लागतात.
मागल्या समासांत गर्भवासांतील यातनाचें वर्णन केले. 
गर्भवासी दुःख जालें । ते बाळक विसरलें ।
पुढें वाढों लागलें । दिवसेंदिवस ॥ २ ॥ 
२) गर्भवासांत जे दुःख झाले ते जन्म होतांच बाळक विसरते. आणि मग दिवसेदिवस ते वाढू लागते. 
बाळपणीं त्वचा कोंवळी । दुःख होतांचि तळमळी ।
वाचा नाहीं तये काळीं । सुखदुःख सांगावया ॥ ३ ॥
३) लहानपणी त्वचा कोवळी असते. त्यामुळे होणार्‍या यातनानीं ते बाळक तळमळते. बर सुखदुःख सांगायला वाचा नसल्याने होणार्‍या यातना बाळकाला सांगता येत नाहीत. 
देहास कांहीं दुःख जालें । अथवा क्षुधेनें पीडलें । 
तरी तवं परम आक्रंदलें । परी अंतर नेणवे ॥ ४ ॥
४) बाळकाच्या देहाला कांहीं यातना झाल्या किंवा त्याला भूक लागली तर ते मोठ्याने रडते, पण त्याला नक्की काय झाले आहे, हे त्याच्या अंतरीचे मातेला कळत नाही.
माता कुरवाळी वरी । परी जे पीडा जाली अंतरी ।
तें मातेसी न कळे अभ्यांतरीं । दुःख होये बाळकासीं ॥ ५ ॥
५) माता त्याला कुरवाळते, परंतु बाळकाला अंतरी काय उपद्रव झाला आहे, हे मातेला बाहेरुन कळत नाही. 
मागुतें मागुतें फुंजे रडे । माता बुझावी घेऊन कडे । 
वेथा नेणती बापुडें । तळमळी जीवीं ॥ ६ ॥     
६) तें बाळक हुंदके देऊन रडते. आई त्याला कडेवर घेऊन त्याचे रडणें थांबविण्याचे प्रयत्न करते. पण तीला त्याची नेमकी व्यथा न कळल्याने ते बाळक व्यथेने तळमळतच राहाते.
नाना व्याधीचे उमाळे । तेणें दुःखें आंदोळे ।
रडे पडे कां पोळे । अग्निसंगे ॥ ७ ॥
७) नाना प्रकारच्या रोगांनी त्या मूलाचा जीव वरखाली होतो. ते मूल पडते, रडते, कधी कधी अग्नीच्या संपर्कांत येऊन पोळते.
शरीर रक्षितां नये । घडती नाना अपाये ।
खोडी अधांतरी होये । आवेवहीन बाळक ॥ ८ ॥
८) त्या मुलाला आपल्या शरीराचे स्वतःला रक्षण करता येत नाही. त्यामुळे निरनिराळ्या प्रकारचे शरीराला अपाय होतात. कधी कधी खोड्या करतां करतां एखादा अवयवसुद्धा गमवावा लागतो.  
अथवा अपाय चुकले । पूर्व पुण्य पुढें ठाकलें ।
मातेस वोळखों लागलें । दिवसेंदिवस ॥ ९ ॥
९) कधी कधी पूर्व पुण्यायीने अपाय होत नाहीत. दिवसेंदिवस तें बाळक आईला चांगले ओळखू लागते.  
क्षणभरी मातेस न देखे । तरी आक्रंदे रुदन करी दुःखें ।
ते समईं मातेसारिखें । आणीक कांहींच नाहीं ॥ १० ॥
१०) क्षणभरसुद्धा माता दिसली नाही तरी दुःखाने रडू लागते. त्या वयांत मातेसारखे दुसरे कांहीही त्याच्या लेखी महत्वाचे नसते. 
आस करुन वास पाहे । मातेविण कदा न राहे ।
वियोग पळमात्र न साहे । स्मरण जालियां नंतरें ॥ ११ ॥
११) मोठ्या आशेने आईची वाट बघते. आईशिवाय ते कदापि राहू शकत नाही. तीची आठवण झाली की, तीचा वियोग सहन करुं शकत नाही. 
जरी ब्रह्मादिक देव आले । अथवा लक्ष्मीनें अवलोकिलें ।
तरी नवचे बुझाविलें । आपले मातेवांचुनी ॥ १२ ॥
१२) ब्रह्मदेव आदि देव आले किंवा श्रीलक्ष्मीने बघितलेव बोलावले तरी त्याच्या आईवाचून त्याला कोणीच उगी करु शकत नाही. 
कुरुप अथवा कुलक्षण । सकळांहूनि करंटेपण ।
तरी नाहीं तीसमान । भूमंडळीं कोणी ॥ १३ ॥
१३) ती आई कुरुप असो, करंटी असो कशीही असो त्याच्यासाठी ती या पृथ्वीवर असलेली त्याची ती आईच मोठी असते.
ऐसें तें केविलवाणें । मातेविण दिसे उणें । 
रागें परतें केलें तिनें । तरी आक्रंदोनि मिठी घाली ॥ १४ ॥
१४) असे ते बालक मातेशिवाय केविलवाणे होते. ती रागावली तरी परत तीलाच रडतरडत मिठी घालते.
सुख पावे मातेजवळी । दुरी करितांचि तळमळी ।
अति प्रीति तये काळीं । मातेवरी लागली ॥ १५ ॥
१५) ते आईजवळ सुखावते. आईपासून दूर होताच कासाविस होते. त्या वयांत मातेवर त्याचे फार प्रेम असते.  
मनुष्याच्या लहानपणापासूनच्या निरनिराळ्या अवस्थांचे त्यांत सोसाव्या लागणार्‍या दुःखांचे वर्णन समर्थ येथे करतत आहेत. बालक मोठे होत असतांना त्याची आई मरण पावली तर त्याला काय व कसेदुःख भोगावे लागते त्याचे वर्णन खालीलप्रमाणे केले आहे.
तव ते मातेस मरण आलें । प्राणी पोरटें जालें ।
दुःखें झुर्णीं लागलें । आई आई म्हणोनी ॥ १६ ॥     
१६) आई मरण पावली. मुल पोरके झाले. ते दुःखाने आई-आई म्हणून झुरु लागते.  आई पाहातां दिसेना । दीनरुप पाहे जना ।
आस लागलिसे मना । आई येईल म्हणोनि ॥ १७ ॥
१७) ते आईला शोधते, दिनवाणे होते, मनाला आस लागुन राहते की आई येईल म्हणुन.
माता म्हणौन मुख पाहे । तव ते आपुली माता नव्हे । 
मग हिंसावले राहे । दैन्यवाणें ॥ १८ ॥
१८) ज्याचे त्याचे तोंड आई म्हणुन पाहते, पण त्याला ही आई नाही म्हणुन समजुन हिरमुसले, दैन्यवाणे होते.
मातावियोगें कष्टलें । तेणें मानसीं दुःख जालें ।
देहहि क्षीणत्व पावलें । आतिशयेंसीं ॥ १९ ॥
१९) मातेच्या वियोगाने दुःखी-कष्टी होते. हळुहळु त्याचा देहही अति अशक्त होऊ लागतो.
ज्या बालकाची माता जिवंत असेल त्याचे दुःख काही वेगळेच असते. त्याचे वर्णन खालील ओव्यांत आले आहे.
अथवा माताहि वांचली । मायलेंकुरा भेटीं जाली । 
बाळदशा ते राहिली । दिवसेंदिवस ॥ २० ॥
२०)  माता जिवंत राहुन आईची व बालकाची भेट झाली. तर दिवसेंदिवस त्याचे बालपण सरत जाते.
बाळपण जालें उणें । दिवसेंदिवस होये शाहाणें ।
मग ते मायेंचें अत्यंत पेरुणें । होतें तें राहिलें ॥ २१ ॥
२१) बालपण हळुहळु सरल्यावर ते बालक शहाणे होते. पूर्वी मातेवर असलेले प्रेम किंवा अवलंबुन राहाणे कमी होते. 
पुढें लो लागला खेळाचा । कळप मेळविला पोरांचा ।
आल्यागेल्या डायाचा । आनंद शोक वाहे ॥ २२ ॥
२२) पुढे त्याला खेळण्याचा नाद लागतो. ते मुलांना जमवुन खेळु लागते.  खेळांत जिंकला तर आनंद व हरला तर दुःख हे जाणवु लागते. 
मायबापें सिकवितीं पोटें । तयाचें परम दुःख वाटे ।
चट लागली न सुटे । संगती लेंकुरांची ॥ २३ ॥
२३) आई-वडिल मनापासुन शिकवतात ते त्याला आवडत नाही. इतर मुलांना जमवुन खेळण्याची लागलेली सवय सुटत नाही.  
लेंकुरांमध्यें खेळतां । नाठवे माता आणि पिता ।
तव तेथेंहि अवचिता । दुःख पावला ॥ २४ ॥
२४) मुलांमध्ये खेळतांना आई-वडिलांची आठवण येत नाही. पण तेथेही अचानक दुःख ओढवते.   
पडिले दांत फुटला डोळा । मोडले पाय जाला खुळा ।
गेला माज अवकळा । ठाकून आली ॥ २५ ॥
२५) खेळतांना दांत पडतात. पाय मोडतो. व लंगडा होतो. मग सगळा माज उतरतो
कारण शरीर कुरुप होते.
निघाल्या देवी आणी गोवर । उठलें कपाळ लागला ज्वर । 
पोटसुळीं निरंतर । वायगोळा ॥ २६ ॥
२६) देवी, गोवर, ताप, कपाळशूळ, पोटदुखी असे आजार जडतात.
लागलीं भूतें जाली झडपणी । जळीच्या मेसको मायेराणी ।
मुंज्या झोटिंग करणी । म्हैसोबाची ॥ २७ ॥
२७) याला भूत लागले, कोणीतरी करणी केली किंवा पाण्यांतील मेसको मायराणीने झपाटले अगर मुंजा, झोटिंग किंवा म्हसोबाने धरले असे लोक म्हणतात.
वेताळ खंकाळ लागला । ब्रह्मगिर्‍हो संचरला ।
नेणों चेडा वोलांडिला । कांहीं कळेना ॥ २८ ॥
२८) कोणी म्हणतात की, वेताळ खंकाळा लागला. तर कोणी ब्रह्मसंमध याला लागला तर कोणी म्हणतात याने काही मंतरलेले ओलांडले असावे पण काहींच समजत नाही.   
येक म्हणती वीरेदेव । येक म्हणती खंडेराव । 
येक म्हणती वाव । हा ब्राह्मणसमधं ॥ २९ ॥ 
२९) काहीं म्हणतता वीरेदेव, काहीं म्हणतात खंडेराव तर कांही म्हणतात हे खोटे  याला ब्रह्मसंमध लागल आहे.
येक म्हणती कोणें केलें । आंगीं देवत घातलें ।
येक म्हणती चुकलें । सटवाईचें ॥ ३० ॥
३०) कोणी म्हणतात याचे अंगांत मंत्रशक्तीने कोणीतरी दैवत सोडले आहे. तर कोणी म्हणतात की सटवाईचे काहीं देणे राहीले असावे.
येक म्हणती कर्मभोग । आंगी जडले नाना रोग । 
वैद्य पंचाक्षरी चांग । बोलाऊन आणिले ॥ ३१ ॥
३१) काहीं म्हणतात हा कर्मभोग आहे. शरीराला  नाना रोग जडले आहेत म्हणुन वैद्य पंचाक्षरींना बोलवितात.
येक म्हणती हा वांचेना । येक म्हणती हा मरेना ।
भोग भोगितो यातना । पापास्तव ॥ ३२ ॥
३२) कांही म्हणतात हा वाचणार नाही. काहीं म्हणतात हा मरणार  नाही.  मागील जन्मींच्या पापामुळे हा निरनिराळ्या यातना भोगतो आहे. 
गर्भदुःख विसरला । तो त्रिविधतापें पोळला ।
प्राणी बहुत कष्टी जाला । संसारदुःखें ॥ ३३ ॥
३३) तो बालक गर्भामध्ये असतांना झालेले दुःख विसरला पण जन्मल्यावर संसारदुःखाने दुःखी झाला.
इतुकेंहि चुकोन वांचला । तरी मारमारुं शाहाणा केला ।
लोकिकीं नेटका जाला । नाव राखे ऐसा ॥ ३४ ॥
३४) इतके सोसुनही जर वाचला तर त्याला मारुमुटकुन शहाणा केला. घराण्याचे
बापाचे नांव लोकांमध्ये राखेल असा नेटका केला. 
पुढें मायेबापीं लोभास्तव । संभ्रमें मांडिला विव्हाव ।
दाऊनियां सकळ वैभव । नोवरी पाहिली ॥ ३५ ॥
३५) पुढे आई-बापाने लोभामुळे त्याचा विवाह करण्यासाठी नवरी योजीली. 
वर्‍हाडीवैभव दाटलें । देखोन परम सुख वाटलें ।
मन हे रंगोन गेलें । सासुरवाडीकडे ॥ ३६ ॥
३६)  विवाहासाठी आपापली ऐट दाखवत वर्‍हाडी जमले.  लग्नाचा थाट, वैभव बघुन नवरदेव खुष झाले.  सासुरवाडीच्या वैभवाने तिकडेच रमले.  
मायबापीं भलतैसें असावें । परी सासुरवाडीस नेटकें जावें ।
द्रव्य नसेल तरी घ्यावें । रुण कळांतरें ॥ ३७ ॥  
३७) आई-वडिल कसेही का राहीना आपण सासुरवाडीस निटनेटके जावे मग पैसे नसतील तर कर्ज काढावे लागले तरी चालेल.  
आंतर्भाव ते सासुरवाडीं । मायेबापें राहिलीं बापुडीं ।
होताती सर्वस्वें कुडकुडीं । तितुकेंच कार्य त्यांचें ॥ ३८ ॥
३८) आता जीव सासुरवाडीस लागतो. आई-वडिल बापुडवाणे जीणे जगु लागतात. त्याच्या जीवनांत तेवढेच शिल्लक असते. 
आता बायकोच्या/कामवासनेच्या आहारी गेलेल्याचे वर्णन खालीलप्रमाणे केले आहे.
नोवरी आलियां घरा । अती हव्यास वाटे वरा ।
म्हणे मजसारिखा दुसरा । कोणीच नाहीं ॥ ३९ ॥
३९) बायको घरी आल्यावर सारखी ती त्याला जवळ हवीजवीशी वाटु लागते व माझ्यासारखा दुसरा कोणी सुखी/मोठा नाही असे त्या तरुणाला वाटु लागते. 
मायबाप बंधु बहिणी । नोवरी न दिसतां वाटे काणी ।
अत्यंत लोभला पापिणीं । अविद्येनें भुलविला ॥ ४० ॥
४०) बायको घरी नसली तर आि-बाप भाऊ-बहीण घरी असुनही दुःखी होतो व पापी अविद्येने भुलुन जातो.
संभोग नस्तां इतुका प्रेमा । योग्य जालिया उलंघी सीमा ।
प्रीती वाढविती कामा । करितां प्राणी गुंतला ॥ ४१ ॥
४१) पत्नी वयांत आली नसतांना इतके प्रेम करतो व मग वयांत आल्यावर संभोगाच्या सर्व सीमांचे उल्लंघन करतो. 
जरी न देखे क्षण येक डोळां । तरी जीव होय उताविळा ।
प्रीतीपात्र अंतर्कळा । घेऊन गेली ॥ ४२ ॥
४२) क्षणभर जरी बायको दिसली नाही तरी त्याचा जीव उताविळा होतो.  विवेक विचार सर्व हरवुन बसतो.
कोवळे कोवळे शब्द मंजुळ । मर्यादा लज्या मुखकमळ ।
वक्त्रलोकनें केवळ । ग्रामज्याचे मैंदावें ॥ ४३ ॥  
४३) तिचे गोड बोलणे, ती आदब, मर्यादा, लज्जा, मुखकमळ, ते तिरप्या डोळ्यांनी बघणे, यामुळे कामवासनेने भरुन जातो.   
कळवळा येतां सांवरेना । शरीर विकळ आवरेना ।
अनेत्र वेवसाईं क्रमेना । हुरहुर वाटे ॥ ४४ ॥
४४) तिची आठवण झाली की मन आवरता येत नाही.  कामवासनेने शरिर ताब्यांत राहात नाही. कामधंद्यांत मन लागत नाही. सारखी तिची हुरहुर लागते.
वेवसाय करितां बाहेरी । मन लागलेंसे घरीं ।
क्षणक्षणां अभ्यांतरीं । स्मरण होये कामिनीचें ॥ ४५ ॥
४५) बाहेर कामधंदा करतांना मन मात्र घरी लागलेले असते. क्षणाक्षणाला बायकोची आठवण येतच असते. 
तुम्हीं माझिया जिवांतील जीव । म्हणौनि अत्यंत लाघव ।
दाऊनियां चित्त सर्व । हिरोन घेतलें ॥ ४६ ॥
४६) बायकोने त्याला तुम्ही माझ्या जीवाचा जीव म्हणुन अत्यंत लाघवीपणे त्याचे चित्त हिरावुन घेतले.
मैंद सोइरीक काढिती । फांसे घालून प्राण घेती ।
तैसें आयुष्य गेलियां अंतीं । प्राणीयांस होये ॥ ४७ ॥
४७) ठग लोक प्रथम काही नातेसंबंध दाखवुन जवळीक साधतात व योग्य संधी साधुन प्राण घेऊन लुबाडतात. तसेच मरण जवळ आले की माणसाची दशा होते.
प्रीति कामिनीसीं लागली । जरी तयेसी कोणी रागेजलीं ।
तरी परम क्षिती वाटली । मानसीं गुप्तरुपें ॥ ४८ ॥ 
४८) बायकोवर अति प्रेम जडते. तिलाकोणी रागावुन बोलीले तर फार वाईट वाटते.  तसे बाहेर मात्र बोलुन दाखविता येत नाही.
तये भार्येचेनि कैवारें । मायेबापासीं नीच उत्तरें ।
बोलोनियां तिरस्कारें । वेगळा निघे ॥ ४९ ॥
४९) बायकोची बाजु घेऊन तो आई-बापास दुरुत्तरे करतो. तिरस्काराने बोलुन वेगळा संसार थाटतो.
स्त्रीकारणें लाज सांडिली । स्त्रीकारणें सखीं सोडिलीं ।
स्त्रीकारणें विघडिलीं । सकळहि जिवलगें ॥ ५० ॥
५०) स्त्री साठी लाजलज्जा सोडली. स्त्री साठी जीवाभावाचे मित्र सोडल. सर्व आप्त जीवलग यांच्याशी संबंध बिघडविले.  
स्त्रीकारणें देह विकिला । स्त्रीकारणें सेवक जाला ।
स्त्रीकारणें सांडवला । विवेकासी ॥ ५१ ॥े
५१) स्त्री साठी देह विकुन सेवक झाला. स्त्रीसााठी सारासार विवेक विचार सोडला.
स्त्रीकारणें लोलंगता । स्त्रीकारणें अतिनम्रता । 
स्त्रीकारणें पराधेनता । अंगिकारिली ॥ ५२ ॥ 
५२) स्त्री साठी लंपट झाला. अति नम्र होतो. स्त्री साठी पराधीनता स्वीकारली.  
स्त्रीकारणें लोभी जाला । स्त्रीकारणें धर्म सांडिला ।
स्त्रीकारणें अंतरला । तीर्थयात्रा स्वधर्म ॥ ५३ ॥
५३) स्त्री साठी लोभी झाला. स्त्री साठी अधार्मिक झाला. तीर्थयात्रा, नित्यकर्म सोडली.
स्त्रीकारणें सर्वथा कांहीं । शुभाशुभ विचारिलें नाहीं ।
तनु मनु धनु सर्वहि । अनन्यभावें अर्पिलें ॥ ५४ ॥
५४) स्त्रीसाठी तन मन धन सर्व तिच्यासाठी वाहुन  टाकले.  शुभाशुभाचा विचार केला नाही.
स्त्रीकारणें परमार्थ बुडविला । प्राणी स्वहितास नाडला ।
ईश्र्वरीं कानकोंडा जाला । स्त्रीकारणें कामबुद्धी ॥ ५५ ॥
५५) स्त्रीसाठी परमार्थ बुडविला. तो स्वतःच्या कल्याणास मुकला.  स्त्रीमुळे विषयासक्ती वाढुन ईश्र्वरापुढे जाण्याची लाज वाटु लागली. 
स्त्रीकारणें सोडिली भक्ती । स्त्रीकारणें सोडिली विरक्ती ।
स्त्रीकारणें सायोज्य मुक्ती । तेहि तुछ्य मानिली ॥ ५६ ॥
५६)  स्त्री साठी त्याने भक्ती-विरक्तीचा त्याग केला. स्त्री साठी त्याने सायोज्य  मुक्तीसुध्धा कमी लेखीली. 
येके स्त्रियेचेनि गुणें । ब्रह्मांड मानिलें ठेंगणें ।
जिवलगें तीं पिसुणें । ऐसीं वाटली ॥ ५७ ॥
५७) एका  स्त्री साठी सगळे ब्रह्मांड कमी योग्यतेचे मानिले.  आप्त-स्वकीयांना शत्रु  मानिले.
ऐसी अंतरप्रीति जडली । सर्वस्वाची सांडी केली ।
तव ते मरोन गेली । अकस्मात भार्या ॥ ५८ ॥
५८) अशाप्रकारे अंतरबाह्य बायकोवरील प्रेमाने त्याने जवळच्यांनासुद्धा दूर केले. असे असता ाकस्मात ती बायकोच मरुन गेली. 
तेणें मनीं शोक वाढला । म्हणे थोर घात जाला ।
आतां कैंचा बुडाला । संसार माझा॥ ५९ ॥
५९) त्यामुळे शोकाने भरुन गेला.  तो म्हणु लागला की माझा फार मोठा घात झाला. माझा संसार बुडाोला. 
जिवलगांचा सोडिला संग । अवचिता जाला घरभंग ।
आतां करुं मायात्याग । म्हणे दुःखें ॥ ६० ॥
६०) जिवलग माणसे सोडली. वेगळे घरसंसार मांडला. अति दुःखाने म्हणु लागला की, आता मायेचा त्याग करतो.
स्त्री घेऊन आडवी । उर बडवी पोट बडवी ।
लाज सांडून गौरवी । लोकां देखतां ॥ ६१ ॥
६१) स्त्रीचे प्रेत आडवे मांडीवर घेऊन छाती व पोट बडवित लाज सोडून बायकोची स्तुती करु लागला. 
म्हणे माझें बुडालें घर । आतां न करी हा संसार ।
दुःखें आक्रंदला थोर । घोर घोषें ॥ ६२ ॥
६२) दुःखाने मोठमोठ्याने रडुन म्हणतो की माझे घर बुडाले. आता मी संसार करणार नाही.  
तेणें जीव वारयावेधला । सर्वस्वाचा उबग आला ।
तेणें दुःखें जाला । जोगी कां माहात्मा ॥ ६३ ॥
६३) वात झालेल्या माणसाप्रमणे तो वेड्यासारखा वागु लागला. अंगाला राख फासुन जोगी बनला.
कां तें निघोन जाणें चुकलें । पुन्हां मागुतें लग्न केलें ।
तेणें अत्यंतचि मग्न जालें । मन द्वितीय संमंधीं ॥ ६४ ॥
६४) पण घर सोडले नाही. परत दुसरे लग्न केले. दुसर्‍या बायकोमध्ये मन रमुन गेले. 
जाला द्वितीय संमंध । सवेंचि मांडिला आनंद ।
श्रोती व्हावें सावध । पुढिले समासीं ॥ ६५ ॥
६५) दुसरे लग्न केल्यामुळे त्याच्या आनंदाला भरते आले. 
पुढील समास ऐकण्यासाठी श्रोत्यानी आता सावध व्हावे.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे स्वगुणपरीक्षानाम समास दुसरा ॥  
Samas Dusara Swaguna Pariksha A
समास दुसरा स्वगुणपरीक्षा (अ)




Custom Search

No comments: