Saturday, April 22, 2017

Samas Pachava Swaguna Pariksha D समास पाचवा स्वगुणपरीक्षा (ड)


Dashak Tisara Samas Pachava Swaguna Pariksha D 
Samas Pachava Swaguna Pariksha D is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about the pains suffered after taking birth on this earth and how a common man behaves after he is young. Qualities he is having in his nature that obstructs his spiritual progress.
समास पाचवा स्वगुणपरीक्षा (ड) 
श्रीराम ॥
पुढें गेला विदेशासी । प्राणी लागला व्यासंगासी ।
आपल्या जीवेसीं सोसी । नाना श्रम ॥ १ ॥
अर्थ
१ पुढें तो परदेशी गेला व आपला कष्ट व हाल सोसत उद्योग करुं लागला. 
ऐसा दुस्तर संसार । करितां कष्टला थोर ।
पुढें दोनी च्यारी संवत्सर । द्रव्य मेळविलें ॥ २ ॥
२) असा हा कठीण संसार करतां करतां त्याने फार कष्ट केले व फार हाल काढले. पण दोन-चार वर्षात धनही जमा केले. 
सवेंचि आला देशासी । तों आवर्षण पडिलें देसीं । 
तेणें गुणें मनुष्यांसी । बहुत कष्ट जाले ॥ ३ ॥ 
३) मग तो आपल्या देशी आला. तेथे दुष्काळ पडला होता.  त्यामुळे लोक फार हालांत होते.   
येकांच्या बैसल्या अमृतकळा । येकां चंद्री लागली डोळां ।
येकें कांपतीं चळचळां । दैन्यवाणा ॥ ४ ॥
४) घरी आल्यावर त्याने पाहिले की एका मुलाची गालफडे बसली होती तर दुसर्‍याचे डोळे निस्तेज झाले होते. तर काहीं दिनवाणें होऊन चळचळा कांपत होती.
येकें दीनरुप बैसलीं । येके सुजलीं येकें मेलीं ।
ऐसी कन्यापुत्रें देखिलीं । अकस्मात डोळा ॥ ५ ॥ 
५) कोणी दिनवाणी भिकार्‍यासारखी बसलेली. तर कोणाची शरीरे सुजलेली होती. अशी अपल्या मुलामलींची अवस्था त्याने बघितली. 
तेणें बहुत दुःखी जाला । देखोनियां उभड आला ।
प्राणी आक्रंदों लागला । दैन्यवाणा ॥ ६ ॥
६) अशी आपल्या मुलामुलींची अवस्था बघुन तो अत्यंत दुःखी झला. आणि दिनवाणा झालेला तो मोठमोठ्याने रडु लागला. 
तंव ती अवघीं सावध जालीं । म्हणती बाबाा बाबा जेऊं घाली । 
अन्नालागीं मिडकलीं । झडा घालिती ॥ ७ ॥  
७) त्याचे रडणे ऐकून ती मुले सावध झाली. बाबा जेवायला घाला म्हणत भुकेलेली ती मुले झडप घालुन त्याला भिडली.   
गांठोडे सोडून पाहाती । हातां पडिलें तेंचि खाती ।
कांहीं तोंडी कांहीं हातीं । प्राण जाती निघोनी ॥ ८ ॥
८) त्यांनी गांठोडे सोडून पाहीले व हाताला लागेल ते थोडे तोडांत थोडे हातात घेऊन खाऊ लागली.  पण बरेच दिवसांत कांही न खाल्याने व आता भरमसाट खाल्याने त्यांचे प्राण गेले. 
तांतडी तांतडी जेऊं घाली । तों तें जेवितां जेवितां कांहीं मेलीं ।
कांही होतीं धादावलीं । तेंहि मेलीं अजीर्णें ॥ ९ ॥
९) घाईघाईने जेवल्यामुळे जेवता जेवता कांही मेली. तर कांही फार भुकेली असल्याने अजीर्णाने मेली.
ऐसीं बहुतेकें मेलीं । येक दोनी मुलें उरलीं 
तेंहि दैन्यवाणीं जालीं । आपले मातेवाचुनी ॥ १० ॥
१०) अशी बरीच मुले मेली. एकदोन उरली पण आई मेल्याने तीही दैन्यवाणी झाली.
ऐसें आवर्षण आलें । तेणें घरचि बुडालें ।
पुढें देसीं सुभिक्ष जालें । आतिशयेंसीं ॥ ११ ॥
११) असा भयंकर दुष्काळ पडला होता. त्यामुळे घराची वाताहात झाली. नंतर बरीच सुबत्ता आली.
लेंकुरां नाहीं वाढविलें । अन्न करावें लागे आपुलेन हातें ।
बहु त्रास घेतला चित्तें । स्वयंपाकाचा ॥ १२ ॥
१२) मुलांकडे बघणारे, त्यांची काळजी घेणरे कोणी नाही. स्वयंपाक करुन व मुलांना जेवायला घालुन फार त्रास होऊं लागला.
लोकीं भरीस घातलें । पुन्हा मागुतें लग्न केलें ।
द्रव्य होतें तें वेचलें । लग्नाकारणें ॥ १३ ॥
१३) लोकांनी हे सर्व बघुन परत लग्न करण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे लग्न करुन होता तो सर्व पैसा खर्च केला.
पुन्हां विदेशासी गेला । द्रव्य मेळऊन आला ।
तव घरीं कळहो लागला । सावत्र पुत्रांसी ॥ १४ ॥
१४) परत परदेशी जाऊन पैसा मिळवुन घरी आला तर सावत्र मुलांशी भांडणे होत असलेली पाहिली.
स्त्री जाली न्हातीधुती । पुत्र देखों न सकती ।
भ्रताराची गेली शक्ती । वृद्धजाला  १५ ॥
१५) बायको वयांत आलेली व घरधणणीचा रुबाब गाजवित होती. मुले तिच द्वेष करु लागली होती. घरमालक म्हातारा व दुबळा झाला होता. 
सदां भांडण पुत्रांचें । कोणी नायकती कोणाचें ।
वनिता अति प्रीतीचें । प्रीतिपात्र ॥ १६ ॥
१६) नेहमी घरांत मुलांची भांडणें होऊ लागली. कोणीच कोणाचे ऐकेनासे झाले.  ह्याची बयको मात्र ह्याला अति प्रेमाची होती. तो तिच्यावरच फार प्रेम करत होता.  
किंत बैसला मना । येके ठांई पडेना ।
म्हणोनियां पांचा जणा । मेळविलें ॥ १७ ॥
१७) घरांत एकमेकांबद्दल संशय निर्माण झाला. एकत्र राहाणे अवघड झाले. शेवटी याने पांच जणांना पंच म्हणुन बोलाविले.    
पांच जण वांटे करिती । तों ते पुत्र नायेकती ।
निवाडा नव्हेचि अंती । भांडण लागलें ॥ १८ ॥
१८) पांच पंचानी सर्वांचे वाटे केले. पण ते वाटे मुलांना पसंत पडेनात. त्यामुळे वाटणी न होता आणखी भांडणच लागले.
बापलेंक भांडण जालें। लेंकीं बापास मारिलें ।
तंव ते मातेनें घेतलें । शंखतीर्थ ॥ १९ ॥
१९) बाप-मुलांचे भांडण सुरु झाले ते इतके वाढले की मुलांनी बापास मारले. त्यामुळे माता जोराजोरांत रडूंओरडूं लागली.
ऐकोनि मिळाले लोक । उभे पाहाती कौतुक ।
म्हणती बापास लेक । कामा आले ॥ २० ॥
२०) ते ओरडणे ऐकून बरेचसे लोक गोळा झाले. ते उभे राहुन तमाशा बघु लागले. म्हणु लागले की मुलें बापाला चांगली कामास आली. 
ज्या कारणें केले नवस । ज्या कारणें केले सायास ।
ते पुत्र पितीयास  । मारिती पाहा ॥ २१ ॥
२१) मुलांसाठी पित्याने नवस सायास केले. स्वतःचे हाल करुन घेतले. तीच मुले बघा पित्याला मारत आहेत.
ऐसी आली पापकळी । आश्र्चिर्य मानिलें सकळीं ।
उभे तोडिती कळी । नगरलोक ॥ २२ ॥
२२) असे हे पापकर्मी भांडण करुन ते लोक आश्र्चर्य करु लागले. शेवटी नगरांतील लोकांनी ते भांडण मिटविले. 
पुढें बैसोन पांच जण । वांटे केले तत्समान ।
बापलेंकांचें भांडण । तोडिलें तेहीं ॥ २३ ॥
२३) नंतर मग पांचजणांनी बसून समसमान वाटे केले. आणि बापलेकांचे भांडण सोडविले. 
बापास वेगळें घातलें । कोंपट बांधोन दिधलें ।
मन कांतेचें लागलें । स्वार्थबुद्धी ॥ २४ ॥
२४) बापाला वेगळे काढून त्यास रहावयास खोपट बांधुन दिले. तशांतच त्याच्या बायकोचे मन स्वार्थी पापबुद्धीने व्यापले.
कांता तरुण पुरुष वृद्ध । दोघांचा पडिला संमंध ।
खेद सांडून आनंद । मानिला तेहीं ॥ २५ ॥ 
२५) बायको तरुण तर नवरा म्हातारा. त्या दोघांचा घरांत संमंध पण शेवटी दुःख बाजूस सारुन त्यांनी आनंदाने ते स्वीकारले.  
स्त्री सांपडली सुंदर । गुणवंत आणी चतुर ।
म्हणे माझे भाग्य थोर । वृद्धपणीं ॥ २६ ॥
२६) ही बायको सुंदर व चतुर, गुणवान होती. म्हणुन हा सुखावला. म्हणु लागला माझे भाग्य मोठे म्हणुन म्हातारपणी हे सुख लाभले. 
ऐसा आनंद मानिला । दुःख सर्वहि विसरला ।
तव तो गलबला जाला । परचक्र आलें ॥ २७ ॥
२७) असा आनंदित होऊन त्याने झालेले सर्व दुःख विसरले. इतक्यांत आरडाओरडा झाला की शत्रुचा हल्ला झाला आहे.   
अकसमात धाडी आली । कांही बंदीं धरुन नेली ।
वस्तभावहि गेली । प्राणीयाची ॥ २८ ॥
२८) अकस्मात धाड पडून त्यांनी कांही लोकांना बंदी म्हणुन धरुन नेले. चिजवस्तु पैसाअडकाही लुटुन नेला.    
तेणें दुःख जालें भारीं । दीर्घ स्वरें रुदन करी ।
मनीं आठवे सुंदरी । गुणवंत ॥ २९ ॥
२९) याचीही चिजवस्तु गेल्याने याला फार दुःख झाले. हा मोठ्याने रडू लगला. याच्या बायकोही पळवून नेल्याने तिचे गुण मनांत आठवू लागला. 
तव तिची वार्ता आली । तुमची कांता भ्रष्टली ।
ऐकोनियां आंग घाली । पृथ्वीवरी ॥ ३० ॥
३०) तेवढ्यांत बातमी आली की तुमच्या बायकोला पळविणार्‍यांनी भ्रष्ट केले. मग हा जमिनीवर धाडकन पडला.
सव्य अपसव्य लोळे । जळें पाझरती डोळे ।
आठवितां चित्त पोळें । दुःखानळें ॥ ३१ ॥
३१) डावीकडे उजवीकडे गडबडा लोळु लागला. डोळ्यांतुन पाणी वाहु लागले. बायकोची आठवण होऊन दुःखाने मन पोळून निघु लागले.
द्रव्य होतें मेळविलें । तेंहि लग्नास वेचलें ।
कांतेसिहि धरुन नेलें । दुराचारीं ॥ ३२ ॥
३२) मिळविलेला पैसा लग्नासाठी खर्च केला. आणि शेवटी तीलासुद्धा दुष्ट पापी लोकांनी पकडून नेले.  
मजहि वृद्धाप्य आलें । लेकीं वेगळें घातलें ।
अहा देवा वोढवलें । अदृष्ट माझें ॥ ३३ ॥
३३) मलासुद्धा म्हातारपण आले. मुलांनी वेगळे काढले. देवा माझ्यावर सर्व बाजुंनी दुर्दैव कोसळले.
द्रव्य नाहीं कांता नाहीं । ठाव नाहीं शक्ति नाहीं ।
देवा मज कोणीच नाहीं । तुजवेगळें ॥ ३४ ॥
३४)  माझ्याजवळ ना कांता ना पैसा, ना घर ना शक्ती; देवा आता तुझ्याशिवाय मला कोणीच नाही.  
पूर्वी देव नाहीं पुजिला । वैभव देखोन भुलला । 
सेखीं प्राणी प्रस्तावला । वृद्धपणीं ॥ ३५ ॥
३५) या आधी कधीही देवाची पूजा केली नाही. वैभवाला, पैशाला, तारुण्याला सर्वस्व मानून राहीला. म्हातारपणी मात्र पश्र्चाताप झाला व देव आठवला. 
देह अत्यंत खंगलें । सर्वांग वाळोन गेलें ।
वातपीत उसळलें । कंठ दाटला कफें  ॥ ३६ ॥
३६) देह अत्यंत खंगला, क्षीण झाला. सगळे अंग वाळकटले. वातपित्त उसळून कफाने गळा भरुन गेला.
वळे जिव्हेची बोबडी । कफें कंठ घडघडी ।
दुर्गंधी सुटली तोंडीं । नाकी स्लेष्मा वाहे ॥ ३७ ॥
३७) जिभेची बोबडी वळली. कफानें  गळा घरघरु लागला. तोंडाला दुर्गंधी येऊ लागली. नाकांतून शेंबुड वाहु लागला. 
मान कांपे चळचळां । डोळे गळती भळभळां ।
वृद्धपणीं अवकळा । ठाकून आली ॥ ३८ ॥
३८) मान थरथरु लागली. डोळ्यांतुन भळाभळा पाणी वाहु लागले. म्हातारपणी ही अशी देहास वाईट अवस्था प्राप्त झाली.
दंतपाटी उखळी । तेणें बोचरखिडी पडिली ।
मुखीं लाळ गळों लागली । दुर्गंधीची ॥ ३९ ॥
३९) दातंची कवळी उखडल्याने तोंडाचे बोळके झाले. तोंडांतून दुर्गंधयुक्त लाळ गळायला लागली. 
डोळां पाहातां दिसेना । कानीं शब्द ऐकेना ।
दीर्घ स्वरें बोलवेना । दमा दाटे ॥ ४० ॥
४०) डोळ्यांनी दिसत नाही. कानांनी ऐकता येत नाही. मोठ्याने बोलता येईना. दमा दाटून आला.  
शक्ती पायांची राहिली । बैसवेना मुरुकुंडी घाली ।
बृहती वाजों लागली । तोंडाच ऐसी ॥ ४१ ॥
४१) पायांतील शक्ती गेल्याने नीट बसता येईना. आडवे पडून रहावे लागे. गुदद्वारही तोंडासारखे वाजू लागले.
क्षुधा लागतां आवरेना । अन्न समईं मिळेना ।
मिळाले तरी चावेना । दांत गेले ॥ ४२ ॥
४२) भूक लागली तर ती आवरेनाशी झाली. जेवण वेळेवर मिळेनासे झाले. मिळाले तरी दांत नसल्याने चावता येईनासे झाले.
पित्तें जिरेना अन्न । भक्षीतां होये वमन ।
तैसेंचि जाये निघोन । अपानद्वारें ॥ ४३ ॥
४३) पित्तामुळे खाल्लेले अन्न पचत नाहीसे झाले. उलटून पडू लागले. तसेच बाहेर पडु लागले.
विष्टा मूत्र आणी बळस । भोवता वमनें केला नास ।
दुरुन जातां कोंडे स्वास । विश्र्वजनांचा ॥ ४४ ॥
४४) बसल्या जागींच हागणें, मुतणें, बेडके थुंकणे, ओकणें यामुळे अस्वच्छा व दुर्गंध पसरला लोकांचा लांबुन जातानाही श्र्वास कोंडू लागला.
नाना दुःखें नाना व्याधी । वृद्धपणीं चळे बुद्धी ।
तर्‍हीं पुरेना आवधी । आयुष्याची ॥ ४५ ॥
४५) म्हातारपणी निरनिराळी दुःखे व व्याधी निर्माण होतात. तसेच बुद्धीही चळते. तरीसुद्धा आयुष्याची मुदत कांही संपत नाही.
पापण्या भवयाचे केश । पिकोन झडले निःशेष ।
सर्वांगीं लोंबले मांस । चिरकुटासारिखे ॥ ४६ ॥
४६) पापण्यांचे व भुवयांचे केस पिकुन गळुन पडतात. अंगावरचे मांस लक्तराप्रमाणे लोंबु लागते. 
देह सर्व पारिखें जालें । सवंगडे निःशेष राहिले । 
सकळ प्राणीमात्र बोले । मरेना कां ॥ ४७ ॥
४७) देह सगळा पराधीन झालेला असतो. मित्र, सवंगडी लांबुन चौकशी करतात व म्हणतात की हा अजुन मरत कां नाही?
जें जन्मून पोसिलीं । तेंचि फिरोन पडिलीं ।
अंती विषम वेळ आली । प्राणीयासी ॥ ४८ ॥
४८) ज्यांना जन्मल्यापासून पोसलें, तेंच उलटतात. शेवटी माणसावर फार कठीण वेळ येते.   
गेलें तारुण्य गेलें बळ । गेलें संसारीचें सळ ।
वाताहात जालें सकळ । शरीर आणी संपत्ती ॥ ४९ ॥
४९) तारुण्य सरले, बळ संपले, संसाराची हौस-मौज गेली. शरीर व संपत्ती यांचा नाश झाला.
जन्मवरी स्वार्थ केला । तितुकाहि वेर्थ गेला ।
कैसा विषम काळ आला । अंतकाळीं ॥ ५० ॥
५०) जन्म सारा स्वार्थ साधणयांत गेला. तेवढा सर्व फुकटच गेला. आता अंतकाळी कठीण प्रसंग आला.
सुखाकारणें झुरला । सेखी दुःखें कष्टी जाला । 
पुढें मागुता धोका आला । येमयातनेचा ॥ ५१ ॥
५१) सुखासाठी जन्मभर कष्ट केले. शेवटी दुःखाने यातना भोगल्या अजुन पुढें यमयातना भोगण्याचा धोका आहेच.
जन्म अवघा दुःखमूळ । लागती दुःखाचे इंगळ । 
म्हणोनियां तत्काळ । स्वहित करावें ॥ ५२ ॥
५२) जन्म हाच सर्व दुःखाचे मूळ आहे. त्यामुळे दुःखाचे ईंगळे भोगावे लागतात. म्हणुन तत्काळ स्वहीताचे कल्याण करुन घ्यावे.
असो ऐसे वृद्धपण । सकळांस आहे दारुण ।
म्हणोनियां शरण । भगवंतास जावें ॥ ५३ ॥
५३) अशा प्रकारे हे म्हातारपण सर्व दुःखांत अति दारुण, भयंकर आहे. म्हणुन त्या भगवंताला शरण जावे.  
पुढें वृद्धीस तत्वता । गर्भी प्रस्तावा होता । 
तोचि आला मागुता । अंतकाळीं ॥ ५४ ॥
५४) गर्भावस्थेमध्ये जीवाला जो पश्र्चाताप होतो तसाच त्याला म्हातारपणी होतो. म्हणुन जीवाला अंतःकाळी पुन्हा पश्र्चाताप होतो.
म्हणौनि मागुतें जन्मांतर । प्राप्त मातेचे उदर ।
संसार हा अति दुस्तर । तोचि ठाकून आला ॥ ५५ ॥
५५) यासाठी त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आईच्या उदरांत कांहीं काळ राहावे लागते. तरुन जाण्यास अत्यंत कठीण असा हा संसार परत त्याच्या माथी पडतो.  
भगवद्भजनावांचुनी । चुकेना हे जन्मयोनी ।
तापत्रयांची जाचणी । सांगिजेल पुढें ॥ ५६ ॥
५६) भगवंताच्या भजन/भक्तीशिवाय हे पुनःजन्म मरण चुकत नाही. आतां पुढील समासी तीन तापांचा जाच कसा होतो ते मी सांगणार आहे.
॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
स्वगुणपरीक्षानाम समास पाचवा ॥ 
Samas Pachava Swaguna Pariksha D
समास पाचवा स्वगुणपरीक्षा (ड) 


Custom Search

No comments: