Wednesday, April 26, 2017

Samas Sahava Aadhyatmik Tap समास सहावा आध्यात्मिक ताप


Dashak Tisara Samas Sahava Aadhyatmik Tap 
Samas Sahava Aadhyatmik Tap is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about the pains suffered after taking birth on this earth and are called Aadhyatmik Tap. These pains arise from and within the body.
समास सहावा आध्यात्मिक ताप
श्रीराम ॥
तापत्रांचे लक्षण । आतां सांगिजेल निरुपण ।
श्रोतीं करावें श्रवण । येकाग्र होऊनी ॥ १ ॥
१) मी तापत्रांची लक्षणें वर्णन करुन सांगत आहे. श्रोत्यांनी ती लक्षपूर्वक एकाग्र होऊन ऐकावीत. 
जो तापत्रैं पोळला । तो संतसंगें निवाला ।
आर्तभूत तोषला । पदार्थ जेवी ॥ २ ॥
२) जो तापत्रयांच्या दुःखांनी पोळून निघालेला असतो तो संतांच्या संगतीनें शांत व समाधानी होतो. जसे की एखादी वस्तु मिळाली की त्या वस्तुवाचुन विव्हळ झालेल्या माणसास ती वस्तु मिळाल्यावर समाधान लाभते .
क्षुधाक्रांतास मिळे अन्न । तृषाक्रांतास जीवन । 
बंदीं पडिल्याचें बंधन । तोडितां सुख ॥ ३ ॥
३) जसे भुकेलेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी किंवा बंधनांत पडलेल्याला बंधनापासून सुटका मिळाल्यावर समाधान लाभते. 
माहापुरें जाजावला । तो पैलतीरास नेला ।
कां तो स्वप्नींचा चेइला । स्वप्न दुःखी ॥ ४ ॥
४) जसे महापुरांत सापडलेल्याला पैलतीरास नेले किंवा वाईट स्वप्नाने दुःखी झालेल्यास जागे केल्यावर जसे सुख लाभते. 
कोणी येकासी मरण । येतां दिलें जीवदान ।
संकटास निवारण । तोडितां सुख ॥ ५ ॥
५) किंवा एखाद्यास मरण येत असता जीवदान दिले किंवा संकटांत सापडलेल्याचे संकट निवारण केल्यावर त्याला जसे सुख मिळते, 
रोगीयास औषध । सप्रचित आणि शुद्ध ।
तयासी होये आनंद । आरोग्य होतां ॥ ६ ॥  
६) रोग्याला योग्य औषध दिल्यावर तब्बेत सुधारल्यामुळे जसा आनंद होतो,
तैसा संसारें दुःखवला । त्रिविधतापें पोळला ।
तोचि एक अधिकारी जाला । परमार्थासी ॥ ७ ॥
७) तसा संसार दुःखाने दुःखी झालेल्याला व त्रिविध तापाने पोळलेला माणूस परमार्थाच्या शाश्र्वत सुखास पात्र होतो.  
ते त्रिविध ताप ते कैसे । आतां बोलिजेत तैसे ।
येविषंई येक असे । वाक्याधार ॥ ८ ॥
८) हे त्रिविध ताप कसे, ते मी आतां सांगतो. त्याच्यांबद्दल एका वाक्यांचा संदर्भ आहे.
श्र्लोकः
देहेंद्रियप्राणेन सुखं दुःखं च प्राप्यते ।
इममाध्यात्मिकं तापं जायते दुःखं देहिनां ॥ १ ॥
१) देह, इंद्रियें आणि प्राण यंच्यामुळे जे सुख-दुःख प्राप्त होते, भोगावें लागते त्यास आध्यात्मिक ताप असे म्हणतात. यामुळे दुःखच भोगावे लागते.
सर्वभूतेन संयोगात् सुखं दुःखं च जायते । 
द्वितीयतापसंतापः सत्यं चैवाधिभौतिकः ॥ २ ॥
२) सर्व भूतांच्या (प्राण्यांच्या) संबंधामुळे जे सुख-दुःख भोगावे लागते त्याला आधिभौतिक ताप असे म्हणतात.
शुभाशुभेन कर्मणा देहांते यमयातना ।
स्वर्गनरकादि भोक्तव्यमिदं चैवाधिदैविकम् ॥ ३ ॥
३) मनुष्याला त्याने केलेल्या शुभ वा अशुभ कर्मांमुळे स्वर्ग वा नरकामध्ये जे सुख-दुःख भोगावे लागते त्यास आधिदैविक ताप असे म्हणतात.   
येक ताप आध्यात्मिक । दूजा तो आधिभूतिक ।
तिसरा आधिदैविक । ताप जाणावा ॥ ९ ॥
९) एक ताप आध्यात्मिक, दुसरा आधिभूतिक आणि तिसरा आधिदैविक ताप समजावा.
आध्यात्मिक तो कोण । कैसी त्याची वोळखण ।
आदिभूतिकाचें लक्षण । जाणिजे कैसें ॥ १० ॥
१०) आध्यात्मिक ताप कसा व तो कसा ओळखावा; आधिभूतिक ताप कसा ओळखावा त्यांची लक्षणें समजून घ्या.
आदिदैविक तो कैसा । कवण तयाची दशा । 
हेंहि विशद कळे ऐसा । विस्तार कीजे ॥ ११ ॥
११) आधिदैविक कसा व त्याने काय अवस्था ओढवते; ते सविस्तर विस्तार करुन सांगा.
हां जी म्हणोनि वक्ता । जाला कथा विस्तारिता ।
आध्यात्मिक ताप आतां । सावध ऐका ॥ १२ ॥
१२) हो तसेच करतो. म्हणून वक्ता म्हणजेच श्रीसमर्थ रामदास सविस्तर आध्यात्मिक ताप कसा तो समजुन घ्या असे म्हणाले.
देह इंद्रिय आणी प्राण । यांचेनि योगें आपण ।
सुखदुःखें सिणे जाण । या नाव आध्यात्मिक ॥ १३ ॥
१३) देह, इंद्रिय आणी प्राण यांच्या योगे आपण सुखी किंवा दुःखी होतो.  त्या तापाला आध्यात्मिक ताप म्हणतात.
देहामधून जें आलें । इंद्रियें प्राणें दुःख जाले ।  
तें आध्यात्मिक बोलिलें । तापत्रईं ॥ १४ ॥
१४) जे दुःख देहामुळे निर्माण होते आणि इंद्रिये व प्राण यांच्याद्वारे भोगावे लागते त्या तापाला  तीन तापापैकी आध्यात्मिक ताप असे म्हणतात.
देहामधून काये आलें । प्राणें कोण दुःख जालें ।
आतां हें विशद केलें । पाहिजे कीं ॥ १५ ॥
१५) देहामधुन कोठचे दुःख निर्माण होते व जे प्राणामुळे कोणते दुःख होते.. ते आता सांगितले पाहिजे.
खरुज खवडे पुळिया नारु । नखरुडें मांजर्‍या देवि गोवरु ।
देहामधील विकारु । या नाव आध्यात्मिक ॥ १६ ॥ 
१६) खरुज, खवडे, अंगावरील पुळ्या, नखुरडें, मांजर्‍या, देवि, गोवर हे देहामधून येणारे विकार आहेत. त्यांना आध्यात्मिक ताप समजतात.    
काखमांजरी केशतोड । वोखटें वर्ण काळफोड ।
व्याधी मूळव्याधी माहाजड । या नाव आध्यात्मिक ॥ १७ ॥  
१७) तसेंच काखमांजरी, केस्तुड, सडणारा काळा व्रण, काळपुळी, अति दुःखदायक मूळव्याध हे आध्यात्मिक ताप आहेत.
अंगुळवेडे गालफुगी । कंड लागे जे वाउगी ।
हिरडी सुजे भरे बलंगी । या नाव आध्यात्मिक ॥ १८ ॥
१८) बोटांचे दुखणें, गालफुगी, उगीचच अंगावर उठणारी खाज, हिरडी सुजणे याना आध्यात्मिक ताप समजावे.  
वाउगे फोड उठती । कां ते सुजे आंगकांती ।
वात आणी तिडका लागती । या नाव आध्यात्मिक ॥ १९ ॥ 
१९) अंगावर फोड उठणें, अंगावर सूज येणे, वात होणे, तिडका लागणें, यांना आध्यात्मिक ताप समजावे.
नाईटे अंदु गजकर्ण । पेहाचें पोट विस्तीर्ण ।
बैसलें टाळें फुटती कर्ण । या नाव आध्यात्मिक ॥ २० ॥ 
२०) नायटे, हाड्याव्रण, गजकर्ण, जलोदर, यांना आध्यात्मिक ताप समजावे.   
कुष्ट आणी वोला कुट । पंड्यारोग अतिश्रेष्ठ ।
क्षयरोगचे कष्ट । या नाव आध्यात्मिक ॥ २१ ॥ 
२१) पांढरे कोड, महारोग, रोगांतील मोठा पंडुरोग, रक्तक्षय, क्षयरोग यांना आध्यात्मिक ताप समजावे.
वाटी वटक वायेगोळा । हातीं पांई लागती कळा ।
भोवंडी लागे वेळोवेळां । या नाव आध्यात्मिक ॥ २२ ॥ 
22)गांठ सरकणे, वांति, हातापायां येणार्‍या कळा, वेळोवेळी येणारी चक्कर, यांना आध्यात्मिक ताप समजावे.
वोलांडा आणी वळ । पोटसुळाची तळमळ ।
आर्धशिसी उठे कपाळ । या नाव आध्यात्मिक ॥ २३ ॥
२३) वोलांडा, वळ, पोटशूळाच्या वेदना, अर्धशिशी, कपाळदुखी यांना आध्यात्मिक ताप समजावे. 
दुःखे माज आणी मान । पुष्ठी ग्रीवा आणी वदन ।
अस्तिसांदे दुःखती जाण । या नाव आध्यात्मिक ॥ २४ ॥ 
२४) कंबर, मान, पाठ, गळा, तोंड दुखणें, हाडांचे सांधे दुखणें यांना आध्यात्मिक ताप समजावे.
कुळिक तरळ कामिणी । मुरमा सुंठरें माळिणी ।
विदेसीं लागलें पाणी । या नाव आध्यात्मिक ॥ २५ ॥ 
२५) मोडशी, अजीर्णामुळे होणार्‍या ओकार्‍या, हागवण विदेशी पाणी बाधणे, यांना आध्यात्मिक ताप समजावे. 
जळसोस आणी हिवारें । गिरीविरी आणि अंधारें ।
ज्वर पाचाव आणी शारें । या नाव आध्यात्मिक ॥ २६ ॥ 
२६) कोरड पडणें, हिंवताप, गरगरणें, अंधारी येणे, ताप, दुखणे उलटणे, अंगावर शहारे येणे यांना आध्यात्मिक ताप समजावे.
शैत्य उष्ण आणी तृषा । क्षुधा निद्रा आणी दिशा ।
विषयतृष्णेची दुर्दशा । या नाव आध्यात्मिक ॥ २७ ॥ 
२७) थंडी, उकाडा, तहान, भूक, झोंप, हगवण, अति संभोगामुळे होणारी वाईट अवस्था यांना आध्यात्मिक ताप समजावे.  
आळसी मूर्ख आणी अपेसी । भय उद्भवें मानसीं ।
विसराळु दुश्र्चित आहिर्निशी । या नाव आध्यात्मिक ॥ २८ ॥ 
२८) आळशी, मूर्ख, अपेशी, मनांत भय येणे, विसराळूपणा, नेहमी उद्विग्न रहाणे यांना आध्यात्मिक ताप समजावे.
मूत्रकोड आणी परमें । रक्तपिती रक्तपरमें । 
खडाचढाचेनि श्रमे । या नाव आध्यात्मिक ॥ २९ ॥ 
२९) लघवी अडणें, परमा, रक्तपिती, रक्तीपरमा, मूतखडा व त्याच्या वेदना यांना आध्यात्मिक ताप समजावे.
मुरडा हागवण उन्हाळे । दिशा कोंडतां आंदोळे ।
येक वेथा असोन न कळे । या नाव आध्यात्मिक ॥ ३० ॥
३०) मुरडा, हगवण, उन्हाळा लागणें, शौच कोंडल्यामुळे होणारी तगमग, रोगाचे निदान न होणे यांना आध्यात्मिक ताप समजावे. 
गांठी ढळली जाले जंत । पडे आव आणी रक्त ।
आन्न तैसेंचि पडत । या नाव आध्यात्मिक ॥ ३१ ॥
३१) गांठ सरकणे, जंत होणे, आव व रक्ती आव होणे, अन्न न पचता तसेच पडणे,
पोटफुगी आणी तडस । भरला हिर लागला घांस । 
फोडी लागतां कासावीस । या नाव आध्यात्मिक ॥ ३२ ॥ 
३२) पोट फुगणे, तडस लागणे, ठसका लागणे, घांस अडकणे, फोडाला धक्का लागून जीव घाबरा होणे, 
उचकी लागली उसित गेला । पीत उसळलें उलाटा जाला ।
खरे पडस आणि खोकला । या नाव आध्यात्मिक ॥ ३३ ॥ 
३३)  उचकी लागणे, घांस अडकणे. लागणे, पित्त उसळणे, वांती होणे, जीभकांटे येणे, पडसें, खोकला होणे, 
उसळला दमा आणी धाप । पडजिभ ढासि आणी कफ ।
मावाज्वर आणी संताप । या नाव आध्यात्मिक ॥ ३४ ॥
३४) दमा उसळणे, धाप लागणे, पडजिभेची ढास, कफ होणे, मोवाज्वर येणें, अंगाची आग होणे,  
कोणी सेंदुर घातला । तेणें प्राणी निर्बुजला ।
घशामध्यें फोड जाला । या नाव आध्यात्मिक ॥ ३५ ॥
३५) कोणी सेंदूर खायला घातल्याने मनावर परिणाम होणे, घशामध्ये फोड होणे,
गळसोट्या आणी जीभ झडे । सदामुखीं दुर्गंधी पडे ।
दंतहीन लागती किडे । या नाव आध्यात्मिक ॥ ३६ ॥ 
३६) घटसर्प होणे, जीभ झडणे, नेहमी तोंडाला दुर्गंधी येणे, दांत पडून हिरड्यांवर कृमी होणे,   
जरंडी घोलाणा गंडमाळा । अवचिता स्वयें फुटे डोळा ।
आपणचि कापी अंगुळा । या नाव आध्यात्मिक ॥ ३७ ॥ 
३७) पांथरी वाढणे, घोळण फुटणे, गंडमाळा, अचानक डोळा फुटणे, आपणच आपले बोट कापून घेणे,
कळा तिडका लागती । कां ते दंत उन्मळती ।
अधर जिव्हा रगडती । या नाव आध्यात्मिक ॥ ३८ ॥
३८) कळा व तिडका लागणे, दांत उपटले जाणे, ओठ व जिभ चावली जाणे, 
कर्णदुःख नेत्रदुःख । नानादुःखें घडे शोक ।
गर्भांध आणी नपुश्यक । या नाव आध्यात्मिक ॥ ३९ ॥ 
३९) कान ठणकणे, डोळे दुखणे, नाना प्रकारच्या दुःखाने ओरडणे, जन्मांध असणे, नपुंसक असणे,
फुलें वडस आणी पडळें । कीड गर्ता रातांधळें । 
दुश्र्चित्त भ्रमिष्ट आणी खुळें । या नाव आध्यात्मिक ॥ ४० ॥
४०) डोळ्यांत फुल पडणे, वडस वाढणे, मोतीबिंदु व कांच बिंदु होणे, डोळ्यांच्या पापण्यांना कीड लागणे, डोळे असून न दिसणे, रातांधळेपणा असणे, दुश्चितपण, भ्रमिष्टपणा आणि खुळेपणा असणे  यांना आध्यात्मिक ताप समजावे. 
मुकें बधीर राखोंडें । थोटें चळलें आणी वेडें ।
पांगुळ कुर्‍हें आणी पावडें । या नाव आध्यात्मिक ॥ ४१ ॥
४१) मुकेपण, बहिरेपणा, ओठ तुटके, हात तुटके, वृत्ति चळलेला असणे, वेडेपणा, पांगळेपणा, कुबड, आंखुड पाय, 
तारसें घुलें काणें कैरें । गारोळें जामुन टाफरें ।
शडांगुळें गेंगाणें विदरें । या नाव आध्यात्मिक ॥ ४२ ॥ 
४२) तारवटलेले डोळे, वांकडी मान, काणा, तिरळा, घारे डोळे, अति ठेंगुपणा, ठेचळणे, सहा बोटे, गेंगाणा, विद्रुप,   
दांतिरें बोचिरें घानाळ । घ्राणहीन श्रोत्रहीन बरळ ।
अति कृश अति स्थूळ । या नाव आध्यात्मिक ॥ ४३ ॥  
४३) मोठे दांत, पुढे आलेले दांत, फार लांब नाक, नाक नसलेला, कान नसणें, बरळणारा, अशक्त, अति बारीक, अति जाडा,  
तोंतरें बोंबडें निर्बळ । रोगी कुरुप कुटीळ ।
मत्सरी खादाड तपीळ । या नाव आध्यात्मिक ॥ ४४ ॥ 
४४) तोतरा, बोबडा, अशक्त, रोगी, कुरुप, वाकड्या बुद्धीचा, मत्सरी, खादाड, तापट, 
संतापी अनुताप मत्सरी । कामिक हेवा तिरस्कारी ।
पापी अवगुणी विकारी । या नाव आध्यात्मिक ॥ ४५ ॥
४५) संतापी, अनुतापी, मत्सरी, कामुक, हेवेदावे करणारा, तिरस्कारी, पापी, अवगुणी, विकाराधीन,
उठवणें ताठा करक । आवटळे आणी लचक ।
सुजी आणी चालक । या नाव आध्यात्मिक ॥ ४६ ॥
४६) ज्याला नीट उठता बसता येत नाही, अंग ताठणें, अवघडणें, लचक भरणे, सूज येणे, पायांचा संधिवात,  
सल आडवें गर्भपात । स्तनगुंते सनपात ।
संसारकोंडें आपमृत्य । या नाव आध्यात्मिक ॥ ४७ ॥
४७) न वाढणारा गर्भ, मूल आडवे येणे, गर्भपात, स्तनांतील गांठी सन्निपाात, संसारांतील अडचणी, अपमृत्यु, 
नखविख आणी हिंगुर्डे । बाष्ट आणी वावडें ।
उगीच दांतखीळ पडे । या नाव आध्यात्मिक ॥ ४८ ॥
४८) नखाचें वीष बाधणे, नखुर्डे, शिळे व कुपथ्याचे खाणे त्यामुळे प्रकृती बिघडणे, उगीचच दांतखीळ बसणे, 
झडती पातीं सुजती भुवया । नेत्रीं होती राझणवडीया ।
चाळसी लागे प्राणियां । या नाव आध्यात्मिक ॥ ४९ ॥ 
४९) डोळ्याच्या पापण्या झडणे, भुवया सुजणे, डोळ्यांना रांजणवाडी होणे, चाळीसी लागणे, 
वांग तिळ सुरमें लासें । चामखिळ गलंडें मसें ।
चुकुर होईजे मानसें । या नाव आध्यात्मिक ॥ ५० ॥  
५०) अंगावर काळ्या पुळ्या येणे, तीळ, पांढरे चट्टे, काळे चट्टे, चामखीळ, गालगुंड, अंगावर मांस वाढणे, मनाला भ्रम होणे, 
नाना फुग आणी आवाळें । आंगीं दुर्गंधी प्रबळे ।
चाईचाटी लाळ गळे । या नाव आध्यात्मिक ॥ ५१ ॥ 
५१) अगावर येणारे फुगवटे, आवाळे, अंगाला फार दुर्गंधी येणे, डोक्यारचे केस गळणे,  तोंडांतुन लाळ गळणे,     
नाना चिंतेची काजळी । नाना दुःखें चित्त पोळी ।
व्याधीवांचून तळमळी । या नाव आध्यात्मिक ॥ ५२ ॥  
५२) नाना काळज्यांनी काळवंडणे, नाना दुःखांनी मनाला यातना होणे, कांही होत नसतां जीव घाबरा होणे, 
वृद्धपणीच्या आपदा । नाना रोग होती सदा ।
देह क्षीण सर्वदा । या नाव आध्यात्मिक ॥ ५३ ॥  
५३) म्हातारपणांतील यातना, नेहमी काहींतरी रोग होणे, नेहमी देह अशक्त असणे, 
नाना व्याधी नाना दुःखें । नाना भोग नाना खांडकें ।
प्राणी तळमळी शोकें । या नाव आध्यात्मिक ॥ ५४ ॥  
५४) पुष्कळ रोग, पुष्कळ दुःखे, अनेक भोग, अनेक जखमा यामुळे दुःखाने नेहमी तळमळ होणे, यांना आध्यात्मिक ताप समजावे. 
ऐसा आध्यात्मिक ताप । पूर्व पापाचा संताप ।
सांगतां सरेना अमूप । दुःखसागर ॥ ५५ ॥
५५) हा आध्यात्मिक ताप असा आहे. पूर्वी केलेल्या पापांनी हा ताप होतो. कितीही सांगितले तरी हा संपणारा नाही.
बहुत काय बोलावें । श्रोतीं संकेतें जाणावें ।
पुढें बोलिजे स्वभावें । आदिभूतिक ॥ ५६ ॥
५६) जास्त काय सांगू श्रोत्यांनी मी सांगितलेल्या संकेत खुणांनी समजुन घ्वावे. पुढिल समासी आदिभूतिक ताप सांगणार आहे.
॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आध्यात्मिकतापनिरुपणनाम  समास सहावा ॥
Samas Sahava Aadhyatmik Tap 
समास सहावा आध्यात्मिक ताप




Custom Search

No comments: