Wednesday, March 11, 2020

ShriRamCharitManas Part 3 श्रीरामचरितमानसस भाग ३


ShriRamCharitManas Part 3 श्रीरामचरितमानसस भाग ३ 
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा---जुगुति बेधि पुनि पोहिअहिं रामचरित बर ताग ।
पहिरहिं सज्जन बिमल उर सोभा अति अनुराग ॥ ११ ॥
त्या कवितारुपी मोत्यांना युक्तीने छिद्र पाडून तसेच त्यांना रामचरित्ररुपी सुंदर धाग्यामध्ये ओवून सज्जन लोक आपल्या निर्मळ हृदयात धारण करतात, त्यामुळे अत्यंत अनुरागाची शोभा उजळते. ( त्यांना अतिशय प्रेम लाभते. ) ॥ ११ ॥
जे जनमे कलिकाल कराला । करतब बायस बेष मराला ॥
चलत कुपंथ बेद मग छॉंडे । कपट कलेवर कलि मल भॉंडे ॥
जे घोर कलियुगात जन्मले आहेत, ज्यांची कर्मे कावळ्यासारखी आहेत. परंतु वेष हंसासारखा सोज्ज्वळ आहे, असे ढोंगी आहेत, जे वेदरहित मार्ग सोडून कुमार्गावर चालतात, जे कपटाची मूर्ती आहेत व कलियुगातील पापांची (भरलेली ) भांडी आहेत. ॥ १ ॥
बंचक भगत कहाइ राम के । किंकर कंचन कोह काम के ॥
तिन्ह महँ प्रथम रेख जग मोरी । धींग धरमध्वज धंधक धोरी ॥
ते लोक आपणास श्रीरामांचे भक्त म्हणवून घेऊन लोकांना फसवितात, जे धनलोभ, क्रोध आणि कामाचे गुलाम आहेत, जे धांगडधिंगा घालणारे, धर्माचा मिथ्या झेंडा फदकविणारे ढोंगी आणि कपटी धंद्याचा भार वाहणारे आहेत, जगातील अशा लोकांमध्ये सर्वांत प्रथम माझी गणना होणार आहे. ॥ २ ॥
जौं अपने अवगुन सब कहऊँ । बाढइ कथा पार नहिं लहऊँ ।
ताते मैं अति अलप बखाने । थोरे महुँ जानिहहिं सयाने ॥
जर मी आपल्या सर्व अवगुणांचा पाढा वाचू लागलो, तर कथा फार वाढेल आणि मला पलीकडे पोहोचताही येणार नाही. म्हणून मी फारच थोड्या अवगुणांचे वर्णन केले आहे. यावरुन शहाणी माणसे थोडक्यात जाणून घेतील. ॥ ३ ॥
समुझि बिबिधि बिधि बिनती मोरी । कोउ न कथा सुनि देहहि खोरी ॥
एतेहु पर करिहहिं जे असंका । मोहि ते अधिक ते जड मति रंका ॥
माझी अनेक प्रकारची विनंती समजून घेऊन कोणीही ( राम ) कथा ऐकून मला दोष देणार नाही. यावरही जे शंका घेतील, ते तर माझ्यापेक्षा जास्त मूर्ख आणि बुद्धीने दरिद्री होत. ॥ ४ ॥
कबि न होउँ नहिं चतुर कहावउँ । मति अनुरुप राम गुन गावउँ ॥
कहँ रघुपति के चरित अपारा । कहँ मति मोरि निरत संसारा ॥
मी तर कवी नाही आणि चतुरही म्हणविला जात नाही. केवळ आपल्या बुद्धीनुसार मी श्रीरामांचे गुण गात आहे. कुठे श्रीरामांचे अपार चरित्र आणि कुठे माझी संसारामध्ये आसक्त असलेली बुद्धी ! ॥ ५ ॥
जेहिं मारुत गिरि मेरु उडाहीं । कहहु तूल केहि लेखे माहीं ॥
समुझत अमित राम प्रभुताई । करत कथा मन अति कदराई ॥
ज्या वार्‍यामुळे सुमेरुसारखे पर्वत उडून जातात, तिच्या समोर कापसाची गणती ती काय ? सांगा बरे ! श्रीरामांची अनंत प्रभुता जाणल्यामुळे कथेची रचना करण्यास माझे मन कचरत आहे. ॥ ६ ॥
दोहा---सारद सेस महेस बिधि आगम निगम पुरान ।
नेति नेति कहि जासु गुन करहिं निरंतर गान ॥ १२ ॥
सरस्वती, शेष, शिव, ब्रह्मदेव, शास्त्रे, वेद आणि पुराण –हे सर्व ‘ नेति नेति ‘ ( थांग न लागल्यामुळे ‘ हे नाही, ‘ ‘ हे नाही ‘ असे म्हणून ) नित्य ज्यांचे गुणगान करत असतात, ॥ १२ ॥
सब जानत प्रभु प्रभुता सोई । तदपि कहें बिनु रहा न कोई ॥
तहॉ बेद अस कारन राखा । भजन प्रभाउ भॉति बहु भाषा ॥
जरी प्रभू श्रीरामचंद्रांची प्रभुता अशी ( अवर्णनीय ) आहे, हे सर्वजण जाणतात, तरीही ती सांगितल्याशिवाय कोणी राहिला नाही. यासंबंधी वेदाने याचे असे कारण सांगितले आहे की, भजनाचा प्रभाव पुष्कळ तर्‍हेने वर्णन केला गेला आहे. ( भगवंतांचा महिमा पूर्णपणे कोणी वर्णन करु शकत नाही, परंतु ज्याला जितके शक्य होईल, तितके त्याने भगवंताचे गुणगान केले पाहिजे; कारण भगवंतांच्या गुणगानरुपी भजनाचा प्रभाव मोठा विलक्षण आहे, त्याचे वर्णन शास्त्रांमध्ये नाना प्रकारे आलेले आहे. थोडेसेही भगवद्भजन मनुष्याला सहजपणे भवसागरातून तारुन नेते. ) ॥ १ ॥
एक अनीह अरुप अनामा । अज सच्चिदानंद पर धामा ॥
ब्यापक बिस्वरुप भगवाना । तेहिं धरि देह चरित कृत नाना ॥
जो परमेश्र्वर एक आहे, ज्याला कोणतीही इच्छा नाही, ज्याला कोणतेही रुप आणि नाम नाही, जो अजन्मा, सच्चिदानंद आणि परमधाम आहे, जो सर्वांमध्ये व्यापक व विश्र्वरुप आहे, त्याच भगवंतांनी दिव्य शरीर धारण करुन नाना प्रकारची लीला केली आहे. ॥ २ ॥
सो केवल भगतन हित लागी । परम कृपाल प्रनत अनुरागी ॥
जेहि जन पर ममता अति छोहू । जेहिं करुना करि किन्ह न कोहू ॥
ती लीला फक्त भक्तांच्या कल्याणासाठीच आहे, कारण भगवंत परम दयाळू आहेत आणि शरणागतांवर फार प्रेम करणारे आहेत. त्यांची भक्तांवर मोठी माया आणि कृपा आहे. त्यांनी एकदा ज्याच्यावर कृपा केली, त्याच्यावर मग कधी राग धरला नाही. ॥ ३ ॥
गई बहोर गरीब नेवाजू । सरल सबल साहिब रघूराजू ॥
बुध बरनहिं हरि जस अस जानी । करहिं पुनीत सुफल निज बानी ॥
ते प्रभु श्रीराम गेलेली वस्तू पुन्हा मिळवून देणारे, दीनबंधू, सरळ स्वभावाचे, सर्व शक्तिमान व सर्वांचे स्वामी आहेत, असे मानून बुद्धिमान लोक त्या श्रीहरीच्या कीर्तीचे वर्णन करुन आपली वाणी पवित्र आणि उत्तम फल ( मोक्ष आणि दुर्लभ भगवत्प्रेम ) देणारी बनवितात. ॥ ४ ॥
तेहिं बल मैं रघुपति गुन गाथा । कहिहउँ नाइ राम पद माथा ॥
मुनिन्ह प्रथम हरि कीरति गाई । तेहिं मग चलत सुगम मोहि भाई ॥
त्याच आधारे ( नव्हे, तर भजन हे महान फल देणारे समजून भगवत्कृपेच्या बळावरच ) मी श्रीरामचंद्रांच्या चरणी मस्तक ठेवून त्यांच्या गुणांची कथा सांगत आहे. शिवाय ( वाल्मीकी, व्यास इत्यादी ) मुनींनी श्रीहरींची कीर्ती पूर्वी गाइली असल्यामुळे मला त्या मार्गाने जाणे सुलभ होईल. ॥ ५ ॥
दोहा---अति अपार जे सरित बर जौं नृप सेतु कराहिं ।
चढि पिपीलिकउ परम लघु बिनु श्रम पारहि जाहिं ॥ १३ ॥
ज्या अत्यंत मोठ्या नद्या आहेत, त्यांच्यावर जर राजाने पूल बांधला, तर अत्यंत छोट्या मुग्यांदेखील त्यावर चढून विनासायास पलीकडे जातात. ( तसाच मीसुद्धा मुनींच्या वर्णनाच्या आधारे श्रीरामचरित्राचे वर्णन सहजपणे करु शकेन. ) ॥ १३ ॥
एहि प्रकार बल मनहि देखाई । करिहउँ रघुपति कथा सुहाई ।
ब्यास आदि कबि पुंगव नाना । जिन्ह सादर हरि सुजस बखाना ॥
अशाप्रकारे मनाला धीर देत मी श्रीरघुनाथांच्या सुंदर कथेची रचना करीन. व्यास इत्यादी जे अनेक श्रेष्ठ कवी होऊन गेले आहेत, त्यांनी मोठ्या आदराने श्रीहरींच्या कीर्तीचे वर्णन केलेले आहे. ॥ १ ॥
चरन कमल बंदउँ तिन्ह केरे । पुरवहुँ सकल मनोरथ मेरे ॥
कलि के कबिन्ह करउँ परनामा । जिन्ह बरने रघुपति गुन ग्रामा ॥
मी त्या सर्व श्रेष्ठ कवींच्या चरणी प्रणाम करतो. त्यांनी माझे मनोरथ पूर्ण करावेत. कलियुगातील ज्या कवींनी श्रीरामांच्या गुणांचे वर्णन केले आहे, त्यांनाही मी प्रणाम करतो. ॥ २ ॥
जे प्राकृत कबि परम सयाने । भाषॉ जिन्ह हरि चरित बखाने ॥
भए जे अहहिं जे होइहहिं आगें । प्रनवउँ सबहि कपट सब त्यागें ॥
तसेच जे मोठे बुद्धिमान प्राकृत कवी आहेत, ज्यांनी आपापल्या मातृभाषेमध्ये हरि-चरित्र वर्णिले आहे, त्यांना आणि जे कवी पूर्वी होऊन गेले आहेत, हल्ली जे आहेत व पुढे जे होणार आहेत, त्या सर्वांना अत्यंत निष्कपट भावनेने मी प्रणाम करतो. ॥ ३
होहु प्रसन्न देहु वरदानु । साधु समाज भनिति सनमानू ॥
जो प्रबंध बुध नहिं आदरहिं । सो श्रम बादि बाल कबि करहीं ॥
तुम्ही सर्व कवींनी प्रसन्न होऊन मला असा वर द्यावा की, साधु-समाजामध्ये माझ्या या काव्याचा सन्मान होईल. कारण बुद्धिमान लोक ज्या काव्याचा आदर करीत नाहीत, अशा काव्याची रचना करण्याचा व्यर्थ खटाटोप मूर्ख कवीच करतात. ॥ ४ ॥
कीरति भनिति भूति भलि सोई । सुरसरि सम सब कहँ हित होई ॥
राम सुकीरति भनिति भदेसा । असमंजस अस मोहि अँदेसा ॥
गंगेप्रमाणे सर्वांचे कल्याण साधणारी कीर्ती, कविता आणि संपत्ती हीच उत्तम होय. श्रीरामांची कीर्ती मोठी सुंदर ( सर्वांचे अनंत कल्याण करणारी ) आहे, परंतु माझी कविता तशी सुंदर नाही, असे अंतर असल्यामुळे ( या दोन्हीचा मेळ बसत नाही, ) याचीच मला काळजी वाटते. ॥ ५ ॥
तुम्हरी कृपॉ सुलभ सोउ मोरे । सिअनि सुहावनि टाट पटोरे ॥
परंतु तुम्हा कवींच्या कृपेने ही गोष्ट मला सुलभ होईल. रेशमाची शिलाई तरतावरसुद्धा शोभून दिसते. ॥ ६ ॥
दोहा---सरल कबित कीरति बिमल सोइ आदरहिं सुजान ।
सहज बयर बिसराइ रिपु जो सुनि करहिं बखान ॥ १४ (क) ॥
जी कविता सरळ असून जिच्यामध्ये निर्मळ चरित्राचे वर्णन असते आणि जी ऐकल्यावर शत्रूसुद्धा स्वाभाविक वैर सोडून प्रशंसा करु लागतो, त्याच कवितेचा आदर चतुर लोक करतात. ॥ १४ (क) ॥
सो न होइ बिनु बिमल मति मोहि मति बल अति थोर ॥
करहु कृपा हरि जस कहउँ पुनि पुनि करउँ निहोर  ॥ १४ (ख) ॥
अशी कविता निर्मळ बुद्धीविना निपजत नाही आणि माझ्या बुद्धीचे बळ तर नगण्यच आहे. म्हणून हे कवींनो, मी वारंवार विनवणी करतो की, तुम्ही माझ्यावर कृपा करा की, त्यामुळे मी श्रीहरींच्या कीर्तीचे वर्णन करु शकेन. ॥ १४ (ख) ॥
कबि कोबिद रघुबर चरित मानस मंजु मराल ।
बालबिनय सुनि सुरुचि लखि मो पर होहु कृपाल ॥ १४ (ग) ॥
कवींनो व पंडितानों तुम्ही या रामचरित्ररुपी मानस सरोवरांतील सुंदर हंस आहात. मज बालकाची विनवणी ऐकून व माझी रामचरित्रा-विषयीची  अत्यंत आवड पाहून माझ्यावर कृपा करा. ॥ १४ (ग) ॥
सो०—बंदउँ मुनि पद कंजु रामायन जेहिं निरमयउ ।
सखर सुकोमल मंजु दोष रहित दूषन सहित ॥ १४ (घ) ॥
ज्यांनी रामायण रचले, त्या वाल्मीकी मुनींच्या चरणकमलांना मी वंदन करतो. त्यांची ही रचना खर ( राक्षस ) सहित असली, तरी ती खर ( कठोर ) नसून कोमल व सुंदर आहे. तसेच ती दूषण ( राक्षस ) सहित असली तरी दूषण ( दोष ) रहित आहे. ॥ १४ (घ) ॥
बंदउँ चारिउ बेद भव बारिधि बोहित सरिस ।
जिन्हहि न सपनेहुँ खेद बरनत रघुबर बिसद जसु ॥ १४ (ङ) ॥
जे संसारसागरातून पैलतीराला जाण्यासाठी नावेसारखे आहेत, त्या चारही वेदांना मी वंदन करतो. या वेदांना श्रीरामांच्या निर्मल यशाचे वर्णन करता करता आपण थकून जाऊ, असे स्वप्नातही वाटत नाही. ( त्या वर्णनात वेद नेहमीच उत्साही असतात. ) ॥ १४ (ङ) ॥
बंदउँ बिधि पद रेनु भव सागर जेहिं कीन्ह जहँ ।
संत सुधा ससि धेनु प्रगटे खल बिष बारुनी ॥ १४ (च) ॥
ज्यांनी हा भव-सागर बनविला, ज्याच्या एका बाजूला संतरुपी अमृत, चंद्रमा व कामधेनू निघाले आणि दुसर्‍या बाजूला दुष्ट मनुष्यरुपी विष आणि मदिरा उत्पन्न झाली, त्या ब्रह्मदेवांच्या चरण धुळीला मी वंदन करतो. ॥
दोहा---बिबुध बिप्र बुध ग्रह चरन बंदि कहउँ कर जोरि ।
होइ प्रसन्न पुरवहु सकल मंजु मनोरथ मोरि ॥ १४ (छ)
देव, ब्राह्मण, पंडित व ग्रह या सर्वांच्या चरणी वंदन करुन, हात जोडून मी विनवितो की, तुम्ही सर्वांनी प्रसन्न होऊन माझे सर्व उत्तम मनोरथ पूर्ण करा. ॥ १४ (छ) ॥
पुनि बंदउँ सारद सुरसरिता । जुगल पुनीत मनोहर चरिता ॥
मज्जन पान पाप हर एका । कहत सुनत एक हर अबिबेका ॥
त्यानंतर मी सरस्वती व गंगा यांना वंदन करतो. दोघीही पवित्र व मनोहर चरित्राच्या आहेत. एक (गंगा) स्नान केल्याने व पाणी प्याल्याने पापांचे हरण करते, तर दुसरी (सरस्वती) हिचे गुण व कीर्ती कथन केल्याने आणि श्रवण केल्याने अज्ञानाचा नाश करते. ॥ १ ॥
गुर पितु मातु महेस भवानी । प्रनवउँ दीनबंधु दिन दानी ॥
सेवक स्वामि सखा सिय पी के । हित निरुपधि सब बिधि तुलसी के ॥
श्रीमहेश व पार्वतीला मी प्रणाम करतो. ते माझे गुरु व माता-पिता आहेत, ते दिनबंधू व नित्य दान करणारे आहेत. ते सीतापती श्रीरामचंद्रांचे सेवक, स्वामी व सखा आहेत. तसेच मज तुलसीदासाचे सर्व प्रकारे खरे हित करणारे आहेत. ॥ २ ॥
कलि बिलोकि जग हितहर गिरिजा । साबर मंत्र जाल जिन्ह सिरिजा ॥
अनमिल आखर अरथ न जापू । प्रगट प्रभाउ महेस प्रतापू ॥
ज्यांनी कलियुगाचा प्रभाव पाहून जगाच्या हितासाठी शाबर-मंत्रसमूह रचले, ज्या मंत्रांच्या अक्षरांचा मेळ बसत नाही, नीट अर्थ लागत नाही व जपसुद्धा होत नाही, परंतु श्रीशिवांच्या प्रभावाने त्यांचा प्रत्यक्ष परिणाम मात्र दिसून येतो. ॥ ३ ॥


Custom Search

No comments: