Monday, December 7, 2020

Shri RamCharitManas Part 65 श्रीरामचरितमानस भाग ६५

 

Shri RamCharitManas Part 65 
Doha 293 to 296 
श्रीरामचरितमानस भाग ६५ 
दोहा २९३ ते २९६ 
श्रीरामचरितमानस बालकाण्ड

दोहा—तब उठि भूप बसिष्ठ कहुँ दीन्हि पत्रिका जाइ ।

कथा सुनाई गुरहि सब सादर दूत बोलाइ ॥ २९३ ॥

मग राजांनी उठून वसिष्ठांच्याजवळ जाऊन त्यांना पत्र दाखविले आणि आदराने जनकांच्या दूतांना बोलावून त्यांच्याकडून सर्व वृत्तांत गुरुंना सांगितला. ॥ २९३ ॥

सुनि बोले गुर अति सुख पाई । पुन्य पुरुष कहुँ महि सुख छाई ॥

जिमि सरिता सागर महुँ जाहीं । जद्यपि ताहि कामना नाहीं ॥

सर्व वृत्तांत ऐकून अत्यंत आनंदाने गुरु म्हणाले, ‘ पुण्यात्म्या पुरुषांकरिता पृथ्वी सुखाने भरलेली आहे. जरी समुद्राला नद्यांची अपेक्षा नसते, तरी नद्या समुद्राला भेटण्यास जातात, ॥ १ ॥

तिमि सुख संपति बिनहिं बोलाएँ । धरमसील पहिं जाहिं सुभाएँ ॥

तुम्ह गुर बिप्र धेनु सुर सेबी । तसि पुनीत कौसल्या देबी ॥

त्याचप्रमाणे सुख व संपत्ती न बोलविता स्वाभाविकपणे धर्मात्म्या पुरुषांजवळ जातात. तुम्ही गुरु, ब्राह्मण, गाय आणि देव यांची सेवा करणारे आहात. तशीच कौसल्यादेवीसुद्धा पवित्र आहे. ॥ २ ॥

सुकृती तुम्ह समान जग माहीं । भयउ न है कोउ होनेउ नाहीं ॥

तुम्ह ते अधिक पुन्य बड़ काकें । राजन राम सरिस सुत जाकें ॥

तुमच्यासारखें पुण्यात्मे जगात कोणी झाले नाहीत, आजही नाहीत आणि पुढेही होणार नाहीत. हे राजन, ज्याला रामासारखा पुत्र आहे, त्याच्यापेक्षा अधिक पुण्यवान आणखी कोण असणार ? ॥ ३ ॥

बीर बिनीत धरम ब्रत धारी । गुन सागर बर बालक चारी ॥

तुम्ह कहुँ सर्ब काल कल्याना । सजहु बरात बजाइ निसाना ॥

शिवाय ज्याचे चारी पुत्र वीर, विनम्र, धर्माचे व्रत धारण करणारे आणि गुणांचे समुद्र आहेत. त्या तुमच्यासाठी सर्व काळांमध्ये कल्याणच कल्याण आहे. म्हणून दवंडी पिटून वर्‍हाड सज्ज करा. ॥ ४ ॥

दोहा—चलहु बेगि सुनि गुर बचन भलेहिं नाथ सिरु नाइ ।

भूपति गवने भवन तब दूतन्ह बासु देवाइ ॥ २९४ ॥

आणि लवकर निघा. ‘ गुरुंचे असे बोलणे ऐकून, ‘ हे स्वामी ! फारच छान. ‘ असे म्हणत मस्तक नमवून आणि दूतांना निवास दाखवून राजा दशरथ महाराज आले. ॥ २९४ ॥

राजा सबु रनिवास बोलाई । जनक पत्रिका बाचि सुनाई ॥

सुनि संदेसु सकल हरषानीं । अपर कथा सब भूप बखानीं ॥

राजांनी संपूर्ण अंतःपुर बोलावले आणि त्यांना पत्र वाचून दाखविले. वार्ता ऐकून सर्व राण्या आनंदाने फुलून गेल्या. तसेच त्यांनी दूतांच्या तोंडून ज्या गोष्टी ऐकल्या होत्या, त्या सर्व गोष्टीही, राण्यांना सांगितल्या. ॥ १ ॥

प्रेम प्रफुल्लित राजहिं रानी । मनहुँ सिखिनि सुनि बारिद बानी ॥

मुदित असीस देहिं गुर नारीं । अति आनंद मगन महतारीं ॥

प्रेमाने प्रफुल्लित झालेल्या राण्या अशा शोभून दिसत होत्या की, जशा मेघनाद ऐकून मयूरी प्रफुल्लित होतात. वयोवृद्ध स्त्रिया प्रसन्न होऊन आशीर्वाद देऊ लागल्या. माता तर आनंदात मग्न होऊन गेल्या. ॥ २ ॥

लेहिं परस्पर अति प्रिय पाती । हृदयँ लगाइ जुड़ावहिं छाती ॥

राम लखन कै कीरति करनी । बारहिं बार भूपबर बरनी ॥

सर्वजणी ते अत्यंत प्रेमाचे पत्र हृदयाशी धरुन स्वतःचे समाधान करुन घेऊ लागल्या. राजांमधील श्रेष्ठ दशरथ यांनी श्रीराम-लक्ष्मण यांची कीर्ती व कर्तृत्व यांचे वारंवार वर्णन केले. ॥ ३ ॥

मुनि प्रसादु कहि द्वार सिधाए । रानिन्ह तब महिदेव बोलाए ॥

दिए दान आनंद समेता । चले बिप्रबर आसिष देता ॥

‘ ही सर्व मुनींची कृपा आहे. ‘ असे म्हणून ते बाहेर आले. मग राण्यांनी ब्राह्मणांना बोलाविले आणि त्यांना आनंदाने दाने दिली. श्रेष्ठ ब्राह्मण आशीर्वाद देत निघून गेले. ॥ ४ ॥

सो०—जाचक लिए हँकारि दीन्हि निछावरि कोटि बिधि ।

चिरु जीवहुँ सुत चारि चक्रबर्ति दसरत्थ के ॥ २९५ ॥

मग भिक्षुकांना बोलावून कोट्यावधी प्रकारच्या देणग्या त्यांना दिल्या. ‘ चक्रवर्ती महाराज दशरथ यांचे चारी पुत्र चिरंजीव होवोत.’ ॥ २९५ ॥

कहत चले पहिरें पट नाना । हरषि हने गहगहे निसाना ॥

समाचार सब लोगन्ह पाए । लागे घर घर होन बधाए ॥

असे म्हणत ते अनेक प्रकारची सुंदर वस्त्रे धारण करुन निघाले. नगारेवाले आनंदाने मोठ्या जोराने नगारे वाजवू लागले. सर्व लोकांना वार्ता समजली, तेव्हा घरोघरी आनंदोत्सव सुरु झाला. ॥ १ ॥

भुवन चारि दस भरा उछाहू । जनकसुता रघुबीर बिआहू ॥

सुनि सुभ कथा लोग अनुरागे । मग गृह गलीं  सँवारन लागे ॥

चौदाही लोक उत्साहाने भरुन गेले. जानकी व रामचंद्र यांचा विवाह होणार आहे, ही शुभवार्ता ऐकून लोक प्रेममग्न झाले  आणि रस्ते, घरे व गल्ल्या सजवू लागले. ॥ २ ॥

जद्यपि अवध सदैव सुहावनि । राम पुरी मंगलमय पावनि ॥

तदपि प्रीति कै प्रीति सुहाई । मंगल रचना रची बनाई ॥

जरी अयोध्या ही नित्य शोभिवंत आहे, कारण ती श्रीरामांची मंगलमय पवित्र नगरी आहे, तरी प्रेमाची भरती आल्यामुळे तिला सुंदर मंगल अशी नव्याने सजविली गेली. ॥ ३ ॥

ध्वज पताक पट चामर चारु । छावा परम बिचित्र बजारु ॥

कनक कलस तोरन मनि जाला । हरद दूब दधि अच्छत माला ॥

ध्वज, पताका, पददे व सुंदर चवर्‍यांनी सगळा बाजार विलक्षण सजला होता. सोन्याचे कलश, तोरणे, मण्यांच्या झालरी, हळद, दूर्वा, अक्षता आणि माळा ॥ ४ ॥

दोहा—मंगलमय निज निज भवन लोगन्ह रचे बनाइ ।

बीथीं सींचीं चतुरसम चौंके चारु पुराइ ॥ २९६ ॥

यांनी लोकांनी आपापली घरे सजवून मंगलमय बनविली होती. गल्ल्या-गल्ल्यांत चंदन, केशर, कस्तुरी, कापूस यांपासून बनविलेल्या पदार्थांचे सडे शिंपले. दारात सुंदर रांगोळ्या काढल्या. ॥ २९६ ॥

जहँ तहँ जूथ जूथ मिलि भामिनि । सजि नवसप्त सकल दुति दामिनि ॥

बिधुबदनीं मृग सावक लोचनि । निज सरुप रति मानु बिमोचनि ॥

वीजेप्रमाणे उज्ज्वल कांतीच्या चंद्रमुखी, बालमृगनयनी आणि आपल्या सुंदर रुपाने कामदेवाची पत्नी रती हिचा अभिमान नष्ट करणार्‍या सुहासिनी स्त्रिया, सर्व प्रकारचे सोळा शृंगार करुन जिकडे तिकडे जमून, ॥ १ ॥

गावहिं मंगल मंजुल बानीं । सुनि कलरव कलकंठि लजानी ॥

भूप भवन किमि जाइ बखाना । बिस्व बिमोहन रचेउ बिताना ॥

मनोहर वाणीने गीत गात होत्या. त्यांचे सुंदर स्वर ऐकून कोकिळासुद्धा लाजत होत्या. जेथे विश्र्वाला मोहित करणारा मंडप बनविला होता, त्या राजमहालाचे वर्णन तर काय करावे ? ॥ २ ॥

मंगल द्रब्य मनोहर नाना । राजत बाजत बिपुल निसाना ॥

कतहुँ बिरिद बंदी उच्चरहीं । कतहुँ बेद धुनि भूसुर करहीं ॥

अनेक प्रकारचे मनोहर मांगलिक पदार्थ शोभत होते. अनेक नगारे वाजत होते. कोठे भाट स्तुतिपाठ करीत होते. तर कोठे ब्राह्मण वेद घोष करीत होते. ॥ ३ ॥

गावहिं सुंदरि मंगल गीता । लै लै नामु रामु अरु सीता ॥

बहुत उछाहु भवनु अति थोरा । मानहुँ उमगि चला चहु ओरा ॥

सुंदर स्त्रिया श्रीराम व सीता यांची नावे ओवून-ओवून मंगल गीते  गात होत्या. त्यांचा उत्साह फार मोठा होता आणि त्या मानाने महाल फार छोटा होता. त्यामध्ये तो सामावत नसल्यामुळे जणू चोहीकडे ओसंडत होता. ॥ ४ ॥




Custom Search

No comments: