Thursday, February 10, 2022

ShriRamCharitManas AyodhyaKanda Part 53 श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग ५३

 

ShriRamCharitManas
AyodhyaKanda Part 53 
Doha 311 to 316 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग ५३ 
दोहा ३११ ते ३१६

दोहा—सुलभ सिद्धि सब प्राकृतहु राम कहत जमुहात ।

राम प्रानप्रिय भरत कहुँ यह होइ बड़ि बात ॥ ३११ ॥

एखादा सामान्य माणूसही आळसामुळे जांभई देताना ‘ राम ‘ म्हणतो, तेव्हाही त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात, मग श्रीरामांच्या प्राण-प्रिय भरतासाठी सर्व सिद्धी मिळणे, ही काही मोठी आश्चर्याची गोष्ट नव्हती. ॥ ३११ ॥

एहि बिधि भरतु फिरत बन माहीं । नेमु प्रेमु लखि मुनि सकुचाहीं ॥

पुन्य जलाश्रय भूमि बिभागा । खग मृग तरु तृन गिरि बन बागा ॥

अशाप्रकारे भरत वनात फिरत होता. त्याचा नेम व प्रेम पाहून मुनीसुद्धा संकोच पावत होते. पवित्र जलाची स्थाने, पृथ्वीचे वेगवेगळे भाग, पक्षी, पशू, तृण, पर्वत, वन आणि बागा, ॥ १ ॥

चारु बिचित्र पबित्र बिसेषी । बूझत भरतु दिब्य सब देखी ॥

सुनि मन मुदित कहत रिषिराऊ । हेतु नाम गुन पुन्य प्रभाऊ ॥

सर्व विशेष रितीने सुंदर, विलक्षण, पवित्र आणि दिव्य असलेले पाहून भरताने प्रश्न विचारले आणि प्रश्न ऐकन ऋषिवर्य अत्री यांनी मनःपूर्वक सर्वांचे कारण, नाम, गुण व पुण्यप्रभाव सांगितले. ॥ २ ॥

कतहुँ निमज्जन कतहुँ प्रनामा । कतहुँ बिलोकत मन अभिरामा ॥

कतहुँ बैठि मुनि आयसु पाई । सुमिरत सीय सहित दोउ भाई ॥

भरत कुठे स्नान करीत होता, कुठे प्रणाम करीत होता, कुठे मनोहर स्थानांचे दर्शन घेत होता आणि कुठे अत्रींच्या आज्ञेने बसून सीतेसह श्रीराम व लक्ष्मण या दोघां बंधूंचे स्मरण करीत होता. ॥ ३ ॥

देखि सुभाउ सनेहु सुसेवा । देहिं असीस मुदित बनदेवा ॥

फिरहिं गएँ दिनु पहर अढ़ाई । प्रभु पद कमल बिलोकहिं आई ॥

भरताचा स्वभाव, प्रेम आणि सुंदर सेवाभाव पाहून वनदेवता आनंदाने आशीर्वाद देत होत्या. अशा प्रकारे फिरत असताना अडीच प्रहर झाले, तेव्हा ते परतले आणि येऊन त्यांनी श्रीरघुनाथांच्या चरणकमलांचे दर्शन घेतले. ॥ ४ ॥

दोहा—देखे थल तीरथ सकल भरत पॉंच दिन माझा ।

कहत सुनत हरि हर सुजसु गयउ दिवसु भइ सॉंझ ॥ ३१२ ॥

भरताने पाच दिवसांत सर्व तीर्थस्थानांचे दर्शन घेतले. भगवान विष्णू व महादेव यांची कीर्ती सांगण्या-ऐकण्यामध्ये पाचवा दिवसही गेला, संध्याकाळ झाली. ॥ ३१२ ॥

भोर न्हाइ सबु जुरा समाजू । भरत भूमिसुर तेरहुति राजू ॥

भल दिन आजु जानि मन माहीं । रामु कृपाल कहत सकुचाहीं ॥

दुसर्‍या दिवशी सकाळी स्नान करुन भरत, ब्राह्मण, राजा जनक आणि इतर समाज हे सर्व गोळा झाले. कृपाळू श्रीरामांनी मनात विचार केला की, सर्वांना निरोप देण्यास आजच दिवस चांगला आहे. परंतु हे सांगण्यास त्यांना संकोच वाटत होता. ॥ १ ॥

गुर नृप भरत सभा अवलोकी । सकुचि राम फिरि अवनि बिलोकी ॥

सील सराहि सभा सब सोची । कहुँ न राम सम स्वामि सँकोची ॥

श्रीरामचंद्रांनी गुरु वसिष्ठ, राजा जनक, भरत व सर्व सभेकडे पाहिले, परंतु संकोचाने दृष्टी फिरवून ते भूमीकडे पाहू लागले. सर्व सभा त्यांच्या वागण्याची प्रशंसा करीत विचार करु लागली की, श्रीरामांच्यासारखे भिडस्त स्वामी कोठेही नाहीत. ॥ २ ॥

भरत सुजान राम रुख देखी । उठि सप्रेम धरि धीर बिसेषी ॥

करि दंडवत कहत कर जोरी । राखीं नाथ सकल रुचि मोरी ॥

मन ओळखणार्‍या भरताने श्रीरामांचा रोख पाहून प्रेमाने उठून, मोठ्या धीराने दंडवत घालून हात जोडून म्हटले, ‘ हे नाथ, तुम्ही माझ्या सर्व आवडी पुरवल्या. ॥ ३ ॥

मोहि लगि सहेउ सबहिं संतापू । बहुत भॉंति दुखु पावा आपू ॥

अब गोसाइँ मोहि देउ रजाई । सेवौं अवध अवधि भरि जाई ॥

माझ्यासाठी सर्व लोकांनी दुःख सोसले आणि तुम्हीसुद्धा अनेक प्रकारे दुःख सहन केले. स्वामी, आता आज्ञा द्या. मी जाऊन चौदा वर्षे पूर्ण होईपर्यंत अयोध्येत राहातो. ॥ ४ ॥

दोहा—जेहिं उपाय पुनि पाय जनु देखै दीनदयाल ।

सो सिख देइअ अवधि लगि कोसलपाल कृपाल ॥ ३१३ ॥

हे दिनदयाळ ! हे कोसलाधीश, हे कृपाळू, ज्या उपायाने हा तुमचा दास पुन्हा तुमच्या चरणांचे दर्शन करु शकेल, असा उपदेश या अवधीसाठी मला द्या. ॥ ३१३ ॥

पुरजन परिजन प्रजा गोसाईं । सब सुचि सरस सनेहँ सगाईं ॥

राउर बदि भल भव दुख दाहू । प्रभु बिनु बादि परम पद लाहू ॥

हे स्वामी, तुमच्या प्रेमामुळे व संबंधामुळे अयोध्यावासी, कुटुंबीय आणि प्रजा हे सर्व पवित्र व आनंदाने युक्त आहेत. तुमच्यासाठी भवदुःखाच्या ज्वालेमध्ये जळणे हे सुद्धा चांगलेच आहे. आणि हे प्रभू, तुमच्याविना मोक्षाचा लाभसुद्धा व्यर्थ आहे. ॥ १ ॥

स्वामि सुजानु जानि सब ही की । रुचि लालसा रहनि जन जी की ॥

प्रनतपालु पालिहि सब काहू । देउ दुहू दिसि ओर निबाहू ॥

हे स्वामी, तुमचा स्वभाव फार चांगला आहे. सर्वांच्या हृदयातील व मज सेवकाची आवड, लालसा आणि राहाणी जाणून हे प्रणतपाल, तुम्ही सर्वांचे पालन कराल व हे देवा, दोन्ही बाजूंना शेवटपर्यंत सांभाळून न्याल. ॥ २ ॥

अस मोहि सब बिधि भूरि भरोसे । किएँ बिचारु न सोचु खरो सो ॥

आरति मोर नाथ कर छोहू । दुहुँ मिलि कीन्ह ढिठु हठि मोहू ॥

असा मला पूर्णपणे भरवसा आहे. विचार केल्यावर जरासुद्धा चिंता उरत नाही. माझी लिनता आणि स्वामींचे प्रेम हे दोन्ही असल्यामुळे मला मोठा धीर आला आहे. ॥ ३ ॥

यह बड़ दोषु दूरि करि स्वामी । तजि सकोच सिखइअ अनुगामी ॥

भरत बिनय सुनि सबहिं प्रसंसी । खीर नीर बिबरन गति हंसी ॥

हे स्वामी, हा धीटपणाचा दोष बाजूला सारुन व संकोच सोडून मज सेवकाला उपदेश द्या. ‘ दूध आणि पाणी वेगवेगळी करण्यामध्ये निपुण हंसीच्या सारखी गती असलेली भरताची विवेकपूर्ण विनंति ऐकून सर्वांनी त्याची प्रशंसा केली. ॥ ४ ॥

दोहा—दीनबंधु सुनि बंधु के बचन दीन छलहीन ।

देस काल अवसर सरिस बोले रामु प्रबीन ॥ ३१४ ॥      

दीनबंधु आणि परम चतुर असलेल्या बंधू भरताचे हे नम्र व निष्कपट बोलणे ऐकून देश, काल आणि प्रसंगानुसार श्रीराम म्हणाले, ॥ ३१४ ॥

तात तुम्हारि मोरि परिजन की । चिंता गुरहि नृपहि घर बन की ॥

माथे पर गुर मुनि मिथिलेसू । हमहि तुम्हहि सपनेहुँ न कलेसू ॥

हे बंधो, तुझी, माझी, परिवाराची, घरची व वनाची सर्व चिंता गुरु वसिष्ठ व महाराज जनक यांना आहे. आपल्या शिरावर गुरुजी, मुनी विश्वामित्र आणि मिथिलापती जनक यांचा वरदहस्त आहे, तोवर आम्हांला व तुला स्वप्नातही क्लेश होणार नाहीत. ॥ १ ॥

मोर तुम्हार परम पुरुषारथु । स्वारथु सुजसु धरमु परमारथु ॥

पितु आयसु पालिहिं दुहु भाईं । लोक बेद भल भूप भलाईं ॥

माझा आणि तुझा पुरुषार्थ, स्वार्थ, सुयश, धर्म व परमार्थ यातच आहे की, आपण दोघा बंधूंनी वडिलांच्या आज्ञेचे पालन करावे. राजांच्या मनाप्रमाणे वागणेच लोक व वेद दोन्ही दृष्टींनी चांगले आहे. ॥ २ ॥

गुर पितु मातु स्वामि सिख पालें । चलेहुँ कुमग पग परहिं न खालें ।

अस बिचारि सब सोच बिहाई । पालेहु पुहुमि प्रजा रजधानी ॥

गुरु, पिता, माता आणि स्वामी यांच्या उपदेशाचे पालन केल्याने कठीण मार्गावरुन चालतानाही पाय खड्यात पडत नाही. असा विचार करुन सर्व चिंता सोडून अयोध्येला जाऊन हा समय संपेपर्यंत त्याचे पालन कर. ॥ ३ ॥

देसु कोसु परिजन परिवारु । गुर पद रजहिं लाग छरुभारु ॥

तुम्ह मुनि मातु सचिव सिख मानी । पालेहु पुहुमि प्रजा रजधानी ॥           

देश, खजिना, कुटुंब, परिवार इत्यादी सर्वांची जबाबदारी गुरुजींच्या चरण-रजावर आहे. तू मुनी वसिष्ठ, माता आणि मंत्री यांचा विचार घेऊन त्याप्रमाणे पृथ्वी, प्रजा व राजधानी यांचे फक्त पालन करीत राहा.’ ॥ ४ ॥

दोहा—मुखिआ मुखु सो चाहिऐ खान पान कहुँ एक ।

पालइ पोषइ सकल अँग तुलसी सहित बिबेक ॥ ३१५ ॥

तुलसीदास म्हणतात की, ( श्रीराम म्हणाले ) प्रमुख असणार्‍याने मुखाप्रमाणे असले पाहिजे. तो खाता-पिताना एकटा असतो, परंतु विवेकाने सर्व अंगाचे पालन पोषण करतो. ॥ ३१५ ॥

राजधरम सरबसु एतनोई । जिमि मन माहँ मनोरथ गोई ॥

बंधु प्रबोधु कीन्ह बहु भॉंती । बिनु अधार मन तोषु न सॉंती ॥

राजधर्माचे सारसर्वस्वही एवढेच आहे, ज्याप्रमाणे मनामध्ये मनोरथ लपलेले असतात, तसे श्रीरघुनाथांनी भरताला अनेक प्रकारे समजावून सांगितले तरी आधार मिळाल्याविना त्याच्या मनाला संतोष झाला नाही की, शांती मिळाली नाही. ॥ १ ॥

भरत सील गुर सचिव समाजू । सकुच सनेह बिबस रघुराजू ॥

प्रभु करि कृपा पॉंवरीं दीन्हीं । सादर भरत सीस धरि लीन्हीं ॥

इकडे भरताचे प्रेम आणि तिकडे गुरुजन, मंत्री आणि उपस्थित समाज पाहून श्रीरघुनाथ भीड व स्नेह या कात्रीत सापडले. (भरताला प्रेमाने पादुका द्याव्यात, तर गुरु इत्यादींपुढे त्याबद्दल संकोच वाटत होता. ) शेवटी भरताच्या प्रेमाला वश होऊन प्रभु रामांनी कृपा करुन त्याला खडावा दिल्या आणि भरताने मोठ्या आदराने त्या डोक्यावर धारण केल्या. ॥ २ ॥

चरनपीठ करुनानिधान के । जनु जुग जामिक प्रजा प्रान के ॥

संपुट भरत सनेह रतन के । आखर जुग जनु जीव जतन के ॥

करुणिनिधन  श्रीरामचंद्रांच्या दोन पादुका प्रजेच्या रक्षणासाठी जणू दोन पहारेकरी होत्या. भरताच्या प्रेमरुपी रत्नासाठी जणू त्या पेट्या होत्या आणि जीवाच्या साधनासाठी जणू रामनामाची दोन अक्षरे होत्या. ॥ ३ ॥

कुल कपाट कर कुसल करम के । बिमल नयन सेवा सुधरम के ॥

भरत मुदित अवलंब लहे तें । अस सुख जस सिय रामु रहे तें ॥

त्या रघुकुलाच्या रक्षणासाठी जणू दोन दरवाजे होत्या. श्रेष्ठ कर्म करण्यासाठी दोन हातांप्रमाणे साहाय्यक होत्या, आणि सेवारुपी श्रेष्ठ धर्म सुचविणारे दोन निर्मल नेत्र होत्या. भरत ही वस्तू मिळाल्यामुळे खूप आनंदित होता. त्याला ते सुख मिळाले की, जे श्रीसीतारामांसोबत राहाणयामुळे मिळाले असते. ॥ ४ ॥

दोहा—मागेउ बिदा प्रनामु करि राम लिए उर लाइ ।

लोग उचाटे अमरपति कुटिल कुअवससरु पाइ ॥ ३१६ ॥

भरताने प्रणाम करुन निरोप मागितला, तेव्हा श्रीरामचंद्रांनी त्याला हृदयाशी कवटाळले. इकडे कपटी इंद्राने वाईट संधी शोधून लोकांच्या मनात द्विधा मनःस्थिती उत्पन्न केली. ॥ ३१६ ॥           

सो कुचालि सब कहँ भइ नीकी । अवधि आस सम जीवनि जी की ॥

नतरु लखन सिय राम बियोगा । हहरि मरत सब लोग कुरोगा ॥

त्याचे ते दुर्वर्तन सर्वांच्या हिताचे झाले. चौदा वर्षांचा अवधी पूर्ण होण्याच्या आशेसारखेच ते त्यांच्या जीवनासाठी संजीवनी झाले. नाही तर लक्ष्मण, सीता व श्रीरामांच्या वियोगरुपी दुर्धर रोगाने सर्व लोक ‘ हाय हाय ‘करुन मेले असते. ॥ १ ॥  

रामकृपॉं अवरेब सुधारी । बिबुध धारि भइ गुनद गोहारी ॥

भेंटत भुज भरि भाइ भरत सो । राम प्रेम रसु कहि न परत सो ॥

श्रीरामांच्या कृपेने सर्व गुंता सुटला. देवांची सेना लुटण्यासाठी आली होती, ती हितकारक व रक्षक बनली. श्रीरामांनी भरताला दोन्ही हातांनी कवटाळले. श्रीरामांच्या प्रेमाचा तो आनंद अवर्णनीय होता. ॥ २ ॥

तन मन बचन उमग अनुरागा । धीर धुरंधर धीरजु त्यागा ॥

बारिज लोचन मोचत बारी । देखि दसा सुर सभा दुखारी ॥

कायावाचामनाला प्रेम उचंबळून आले. धैर्याची धुरा धारण करणार्‍या श्रीरघुनाथांचासुद्धा धीर सुटला. त्यांच्या कमलसदृश नेत्रांतून प्रेमाश्रू वाहू लागले. त्यांची ही दशा पाहून देव-समाजही दुःखी झाला. ॥ ३ ॥

मुनिगन गुर धुर धीर जनक से । ग्यान अनल मन कसें कनक से ॥

जे बिरंचि निरलेप उपाए । पदुम पत्र जिमि जग जल जाए ॥

ज्यांनी आपली मने ज्ञानरुपी अग्नीमध्ये सोन्याप्रमाणें शुद्ध करुन घेतली होती, ते मुनिगण, गुरु वसिष्ठ, राजा जनक यांच्या सारखे धैर्याचे मेरु, ज्यांना ब्रह्मदेवाने अलिप्त बनविले होते आणि जे जगतरुपी जलामध्ये कमल पत्राप्रमाणे अनासक्त राहात होते. ॥ ४ ॥   



Custom Search

No comments: