Sunday, February 21, 2021

AyodhyaKanda Part 1अयोध्याकाण्ड भाग १ श्र्लोक आणि दोहा १ ते ४

AyodhyaKanda Dwitiy Sopan Part 1 
Shlok and Doha 1 to 4 
अयोध्याकाण्ड द्वितीयसोपान भाग १ 
श्र्लोक आणि दोहा १ ते ४

यस्याङ्के च विभाति भूधरसुता देवापगा मस्तके

भाले बालविधुर्गले च गरलं यस्योरसि व्यालराट् ।

सोऽयं भूतिविभूषणः सुरवरः सर्वाधिपः सर्वदा

शर्वः सर्वगतः शिवः शशिनिभः श्रीशङ्करः पातु माम् ॥ १ ॥

ज्यांच्या मांडीवर हिमाचलसुता पार्वती, मस्तकावर गंगा, ललाटावर बालचंद्र, कंठामध्ये हालाहल विष, वक्षःस्थळावर सर्पराज शेष सुशोभित आहे, ते भस्म-विभूषित देवांमध्ये श्रेष्ठ, सर्वेश्र्वर, सर्वसंहारक, सर्वव्यापक, कल्याणरुप, चंद्रासमान शुभ्रवर्ण असलेले श्रीशंकर सदा माझे रक्षण करोत. ॥ १ ॥

प्रसन्नतां या न गताभिषेकतस्तथा न मम्ले वनवासदुःखतः ।

मुखाम्बुजश्री रघुनन्दनस्य मे सदास्तु सा मञ्जुलमङ्गलप्रदा ॥ २ ॥

रघुकुलाला आनंद देणार्‍या श्रीरामचंद्रांच्या मुखारविंदाची जी शोभा राज्यभिषेकाची वार्ता ऐकून प्रसन्नही झाली नाही आणि वनवासाच्या दुःखाने खिन्नही झाली नाही, ती मला सदा सुंदर मांगल्य देणारी होवो. ॥ २ ॥

नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागम् ।

पाणौ महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथम् ॥ ३ ॥

ज्यांचे अंग नील कमलासमान श्याम व कोमल आहे, सीतादेवी ज्यांच्या वामांगी विराजमान आहे आणि ज्यांच्या हाती अमोघ बाण व सुंदर धनुष्य आहे, त्या रघुवंशाचे स्वामी श्रीरामचंद्रांना मी नमस्कार करतो. ॥ ३ ॥

दोहा—श्रीगुरु चरन सरोज रज निज मनु मुकुरु सुधारि ।

बरनउँ रघुबर बिमल जसु जो दायकु फल चारि ॥

श्रीगुरुंच्या चरण-कमलांच्या धुलीने मनरुपी दर्पण स्वच्छ करुन मी रघुनाथांच्या निर्मल कीर्तीचे वर्णन करतो. ती धर्म, अर्थ, काम, मोक्ष ही चारी फले प्राप्त करुन देणारी आहे.

जब तें रामु ब्याहि घर आए । नित नव मंगल मोद बधाए ॥

भुवन चारिदस भूधर भारी । सुकृत मेघ बरषहिं सुख बारी ॥

श्रीरामचंद्र विवाह करुन घरी परतले, तेव्हापासून अयोध्येमध्ये नित्य नवीन मंगल चालले होते आणि आनंदानिमित्त अभिनंदने झडत होती. जणू चौदा लोकरुपी मोठ्या पर्वतांवर पुण्यरुपी मेघ सुखरुपी जलाचा वर्षाव करत होते. ॥ १ ॥

रिधि सिधि संपति नदीं सुहाई । उमगि अवध अंबुधि कहुँ आई ॥

मनिगन पुर नर नारि सुजाती । सुचि अमोल सुंदर सब भॉंती ॥

ऋद्धी-सिद्धी आणि संपत्तिरुपी सुंदर नद्या दुथडी वाहात अयोध्यारुपी समुद्राला येऊन मिळत होत्या. नगरातील स्त्री-पुरुष म्हणजे बहुमोल रत्नांचे समूह होते. जे सर्व प्रकारे पवित्र, अमूल्य आणि सुंदर होते. ॥ २ ॥

कहि न जाइ कछु नगर बिभूती । जनु एतनिअ बिरंचि करतूती ॥

सब बिधि सब पुर लोग सुखारी । रामचंद मुख चंदु निहारी ॥

नगराचे ऐश्र्वर्य काही सांगणे शक्य नाही. जणू ब्रह्मदेवांच्या कलाकुसरीची ही परिसीमाच आहे, असे वाटत होते. सर्व नगरनिवासी श्रीरामचंद्रांचा मुखचंद्र पाहून सर्व प्रकारे सुखी होत होते. ॥ ३ ॥

मुदित मातु सब सखीं सहेली । फलित बिलोकि मनोरथ बेली ॥

राम रुपु गुन सीलु सुभाऊ । प्रमुदित होइ देखि सुनि राऊ ॥

सर्व माता व सख्या या आपल्या मनोरथरुपी वेलींना फळे आल्याचे पाहून आनंदित होत होत्या. श्रीरामांच्या रुप, गुण, शील आणि स्वभाव पाहून-ऐकून राजा दशरथ फारच आनंदित होत होते. ॥ ४ ॥

दोहा—सब कें उर अभिलाषु अस कहहिं मनाइ महेसु ।

आप अच्छत जुबराज पद रामहि देउ नरेसु ॥ १ ॥

सर्वांच्या मनात हीच अभिलाषा होती आणि सर्वजण श्रीमहादेवांची विनवणी करुन म्हणत होते की, राजांनी आपल्या उपस्थितीतच श्रीरामचंद्रांना युवराजपद द्यावे. ॥ १ ॥

एक समय सब सहित समाजा । राजसभॉं रघुराजु बिराजा ॥

सकल सुकृत मूरति नरनाहू । राम सुजसु सुनि अतिहि उछाहू ॥

एक प्रसंगी रघुकुलभूषण राजा दशरथ आपल्या सर्व परिवारासह राजसभेमध्ये विराजमान झाले होते. महाराज सर्व पुण्यांची मूर्ती होते. श्रीरामांची उज्ज्वल कीर्ती ऐकून त्यांना अत्यंत आनंद वाटत होता. ॥ १ ॥

नृप सब रहहिं कृपा अभिलाषें । लोकप करहिं प्रीति रुख राखें ॥

त्रिभुवन तीनि काल जग माहीं । भूरिभाग दसरथ सम नाहीं ॥

सर्व राजे दशरथांची कृपा मिळण्याची कामना करीत आणि लोकपालसुद्धा त्यांच्या कलाप्रमाणे वागून त्यांच्यावर प्रेम करीत. तीन लोक आणि तिन्ही कलांमध्ये दशरथांसारखा महद्भाग्यवान कोणी नव्हता. ॥ २ ॥

मंगलमूल रामु सुत जासू । जो कछु कहिअ थोर सबु तासू ॥

रायँ सुभायँ मुकुरु कर लीन्हा । बदनु बिलोकि मुकुट सम कीन्हा ॥

मांगल्याचे मूळ असलेले श्रीरामचंद्र ज्यांचे पुत्र आहेत, त्यांच्याविषयीं जेवढे सांगावे तेवढे थोडेच आहे. राजांनी सहज हाती आरसा घेतला आणि त्यात पाहून आपला मुकुट व्यवस्थित केला. ॥ ३ ॥

श्रवन समीप भए सित केसा । मनहुँ जरथपनु अस उपदेसा ॥

नृप जुबराजु राम कहुँ देहू । जीवन जनम लाहु किन लेहू ॥

त्यांना दिसले की, आपल्या कानाजवळचे केस पांढरे झाले आहेत. जणू म्हातारपण सांगत होते की, ‘ हे राजा, श्रीरामचंद्रांना युवराजपद देऊन आपले जीवन आणि जन्माचे सार्थक का करुन घेत नाहीस ? ‘ ॥ ४ ॥

यह बिचारु उर आनि नृप सुदिनु सुअवसरु पाइ ।

प्रेम पुलकि तन मुदित मन गुरहि सुनायउ जाइ ॥ २ ॥

मनात हा विचार येताच राजा दशरथांनी शुभ दिन आणि चांगला मुहूर्त पाहून मोठ्या प्रेमाने पुलकित होऊन व आनंदमग्न मनाने तो विचार गुरु वसिष्ठांना सांगितला. ॥ २ ॥

कहइ भुआलु सुनिअ मुनिनायक । भए राम सब बिधि सब लायक ॥

सेवक सचिव सकल पुरबासी । जे हमारे अरि मित्र उदासी ॥

महाराज म्हणाले, ‘ हे मुनिराज, ऐका. श्रीरामचंद्र आता सर्व प्रकारे योग्य झाले आहेत. सेवक, मंत्री, सर्व नगरवासी आणि जे आपले शत्रू, मित्र व तटस्थ आहेत, ॥ १ ॥     

सबहि रामु प्रिय जेहि बिधि मोही । प्रभु असीस जनु तनु धरि सोही ॥

बिप्र सहित परिवार गोसाईं । करहिं छोहु सब रौरिहि नाईं ॥

त्या सर्वांना श्रीरामचंद्र माझ्याप्रमाणेच प्रिय आहेत. त्यांच्या रुपाने तुमचा आशीर्वादच शरीर धारण करुन शोभत आहे. हे स्वामी, सर्व ब्राह्मण व परिवार हे सर्व तुमच्या समानच त्यांच्यावर प्रेम करतात. ॥ २ ॥

जे गुर चरन रेनु सिर धरहीं । ते जनु सकल बिभव बस करहीं ॥

मोहि सम यहु अनुभयउ न दूजें । सबु पायउँ रज पावनि पूजें ॥

जे लोक गुरुंच्या चरणांची धूळ मस्तकावर धारण करतात, जणू संपूर्ण ऐश्र्वर्यच त्यांच्या मुठीत येते. याचा अनुभव माझ्याशिवाय दुसर्‍या कोणाला नसावा. तुमच्या पवित्र चरणरजाची पूजा करुन मी सर्व काही मिळविले. ॥ ३ ॥

अब अभिलाषु एकु मन मोरें । पूजिहि नाथ अनुग्रह तोरें ॥

मुनि प्रसन्न लखि सहज सनेहू । कहेउ नरेस रजायसु देहू ॥

आता माझ्या मनात एकच अभिलाषा आहे. हे गुरुवर्य, तीसुद्धा तुमच्या कृपेनेच पूर्ण होईल. ‘ राजांचे स्वाभाविक प्रेम पाहून मुनींनी प्रसन्न होऊन म्हटले, ‘ महाराज, बोला, काय इच्छा आहे ? ॥ ४ ॥

दोहा—राजन राउर नामु जसु सब अभिमत दातार ।

फल अनुगामी महिप मनि मन अभिलाषु तुम्हार ॥ ३ ॥

हे राजन, तुमचे नाव आणि कीर्ती ही सर्व मनोवांछित वस्तू  देणारी आहे. हे राजांच्या मुकुटमणी ! तुमच्या मनात अभिलाषा येण्यापूर्वीच तिचे आपोआप फल मिळते.’ ॥ ३ ॥

सब बिधि गुरु प्रसन्न जियँ जानी । बोलेउ राउ रहँसि मृदु बानी ॥

नाथ रामु करिअहिं जुबराजू । कहिअ कृपा करि करिअ समाजू ॥

आपले गुरु सर्व प्रकारे प्रसन्न आहेत, असे पाहून राजा आनंदाने कोमल वाणीने म्हणाले, ‘ हे गुरुवर्य ! श्रीरामचंद्रांना युवराज करा. आज्ञा मिळाली की, तयारी करता येईल. ॥ १ ॥

मोहि अछत यहु होइ उछाहू । लहहिं लोग सब लोचन लाहू ॥

प्रभु प्रसाद सिव सबइ निबाहीं । यह लालसा एक मन माहीं ॥

मी जिवंत असताना हा आनंदोत्सव झाला, तर सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फिटेल. हे प्रभू, तुमच्या कृपेमुळे भगवान शिवांनी सर्व कामना पूर्ण केल्या. केवळ ही एकच इच्छा मनात उरली आहे. ॥ २ ॥

पुनि न सोच तनु रहउ कि जाऊ । जेहिं म होइ पाछें पछिताऊ ॥

सुनि मुनि दसरथ बचन सुहाए । मंगल मोद मूल मन भाए ॥

ती पूर्ण झाल्यास मग काही काळजी नाही. मग देह राहो अथवा जावो. नंतर पश्र्चाताप करावा लागणार नाही.’ राजा दशरथांचे मंगल व आनंदमूलक सुंदर वचन ऐकून मुनी मनातून प्रसन्न झाले. ॥ ३ ॥

सुनु नृप जासु बिमुख पछिताहीं । जासु भजन बिनु जरनि न जाहीं ॥

भयउ तुम्हार तनय सोइ स्वामी । रामु पुनीत प्रेम अनुगामी ॥

वसिष्ठ म्हणाले, ‘ हे राजा, ऐका. ज्यांना विन्मुख झाल्याने लोकांना पश्र्चाताप करावा लागतो आणि ज्यांच्या भजनाविना मनातील दुःख दूर होत नाही, तेच सर्वलोकमहेश्र्वर स्वामी श्रीराम तुमचे पुत्र झालेले आहेत. ते पवित्र प्रेमामागोमाग येतात. ॥ ४ ॥

दोहा—बेगि बिलंबु न करिअ नृप साजिअ सबुइ समाजु ।

सुदिन सुमंगलु तबहिं जब रामु होहिं जुबराजु ॥ ४ ॥

हे राजा, आता उशीर करु नका. लवकर सर्व साहित्य जमवा. श्रीरामचंद्र युवरज होतील, तोच शुभ आणि मंगलमय दिवस होय. ‘ ॥ ४ ॥

मुदित महिपति मंदिर आए । सेवक सचिव सुमंत्रु बोलाए ॥

कहि जयजीव सीस तिन्ह नाए । भूप सुमंगल बचन सुनाए ॥

राजा आनंदित होऊन राजमहालात आले. त्यांनी सेवकांकडून सुमंत इत्यादी मंत्र्यांना पाचारण केले. त्यांनी “ जय जीव “ असे म्हणून अभिवादन केले. तेव्हा राजांनी श्रीरामांना युवराजपद देण्याचा सुंदर मंगलमय प्रस्ताव मांडला. ॥ १ ॥

जौं पॉंचहि मत लागै नीका । करहु हरषि हियँ रामहि टीका ॥

आणि म्हटले, ‘ जर तुम्हा पंचांना हा विचार योग्य वाटत असेल, तर आनंदाने तुम्ही श्रीरामचंद्रांना राजतिलक करा. ‘ ॥ २ ॥

मंत्री मुदित सुनत प्रिय बानी । अभिमत बिरवँ परेउ जनु पानी ॥

बिनती सचिव करहिं कर जोरी । जिअहु जगतपति बरिस करोरी ॥

हे प्रिय बोलणे ऐकताच मंत्री आनंदित झाले. जणू त्यांच्या मनोरथरुपी रोपट्यावर पाणी शिंपले गेले. त्यांनी हात जोडून म्हटले, ‘ हे जगत्पती, तुम्ही कोट्यावधी वर्षे जगावे. ॥ ३ ॥

जग मंगल भल काजु बिचारा । बेगिअ नाथ न लाइअ बारा ॥

नृपहि मोदु सुनि सचिव सुभाषा । बढ़त बौंड़ जनु लही सुसाखा ॥

तुम्ही सर्व जगाचे कल्याण करणार्‍या शुभ कार्याचा

 विचार केलेला आहे. महाराज ! घाई करा. उशीर लावू

 नका.’ मंत्र्यांची सुंदर वाणी ऐकून राजांना आनंद

 झाला. जणू वाढत जाणार्‍या वेलीला सुंदर फांदीचा

आधार मिळाला. ॥ ४ ॥



Custom Search

No comments: