Saturday, February 27, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part 10 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग १०

 

Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part 10 
Ovya 271 to 300 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग १० 
ओव्या २७१ ते ३००

आइकें प्राणाचा हात धरुनि । गगनाची पाउटी करुनी ।

मध्यमेचेनि दादरेहूनि । हृदया आली ॥ २७१ ॥

२७१) अर्जुना, ऐक. प्राणवायूचा हात धरुन आकाशाची पायरी करुन सुषुम्नारुप जिन्यानें जी हृदयांत आली,

ते कुंडलिनी जगदंबा । जे चैतन्यचक्रवर्तींची शोभा ।

जिया विश्र्वबीजाचिया कोंभा । साउली केली ॥ २७२ ॥

२७२) जी कुंडलिनी जागाची आई आहे व ब्रह्मरुपी सार्वभौमाची शोभा आहे व जिनें विश्वाच्या बीजाच्या कोंभाला सावली केली आहे ( आश्रय दिला आहे );

जे शून्यालिंगाची पिंडी । जे परमत्मया शिवाची करंडी ।

जे प्राणाची उघडी । जन्मभूमि ॥ २७३ ॥

२७३) जी निराकार परमात्म्याचें चिन्ह दाखविणारी पिंडी, जी परब्रह्म शिवाची संबळी व जी प्राणाची उघडउघड जन्मभूमि आहे. 

हें असो ते कुंडली । हृदयाआंतु आली ।

तंव अनाहताचां बोलीं । चावळे ते ॥ २७४ ॥

२७४) हें असो; ती कुंडलिनी हृदयांत ( अनाहत चक्रांत ) येते, तेव्हा ती अनाहताच्या शब्दानें बोलते.

शक्तीचिया आंगा लागलें । बुद्धीचें चैतन्य होतें आलें ।

तें तेंणें आइकिलें । अळुमाळु ॥ २७५ ॥

२७५) कुंडलिनीला चिकटून राहिलेलें जें बुद्धीचें ज्ञान (तिजबरोबर ) आलें होतें, त्या ज्ञानानें तो ( अनाहत ) शब्द किंचित् ऐकला.

घोषांचा कुंडीं । नादचित्रांचीं रुपडीं ।

प्रणवाचिया मोडी । रेखिलीं ऐसीं ॥ २७६ ॥

२७६) घोषाच्या ( परा वाणीच्या ) कुंडांत नाद ( मध्यमारुपी ) चित्रांचीं रुपडी ॐकाराच्या आकारासारखी रेखलेलीं असतात.

हेंचि कल्पावें तरी जाणिजे । परी आतां कल्पितें कैचें आणिजे ।

परी नेणों काय गाजे । तिये ठायीं ॥ २७७ ॥

२७७) याची कल्पना करतां येईल तर समजून घेतां येईल; पण आता कल्पना करणारें ( मन ) कोठून आणावें, तर त्या ठिकाणीं काय वाजतें, तें कळत नाहीं.

विसरोनी गेलों अर्जुना । जंव नाशु नाहीं पवना ।

तंव वाचा आथी गगना । म्हणऊनि घुमे ॥ २७८ ॥

२७८) अर्जुना, पण तें तसें नव्हें. विसरुन सांगण्याचेंच राहिलें; तें काय म्हणशील, तर जोपर्यंत वायूचा नाश झाला नाहीं, तोपर्यंत हृदयाकाशांत शब्द असतो. म्हणून तो अनाहत शब्द घुमतो, असें समज.

तया अनाहताचेनि मेघें । मग आकाश दुमदुमों लागे ।

तंव ब्रह्मस्थानींचें वेगें । फिटलें सहजें ॥ २७९ ॥

२७९) मग त्या अनाहरुप मेघानें आकाश दुमदुमायला लागतें, तेव्हां ब्रह्मस्थानाचें द्वार आपोआप उघडतें.  

आइकें कमळगर्भाकारें । जें महदाकाश दुसरें ।

जेथ चैतन्यें आधातुरें । करुनि असिजे ॥ २८० ॥

२८०) अर्जुना, ऐक. कमळाच्या गर्भाच्या आकाराप्रमाणें जें मूर्ध्नि आकाश आहे, तें दुसरें महाकाशच आहे; त्या मूर्ध्न्याकाशाच्या ठिकाणीं चैतन्य अर्धे भोजन करुन ( अतृप्त ) असतें.    

तया हृदयाचां परिवरीं । कुंडलिनीया परमेश्र्वरी ।

तेजाची शिदोरी । विनियोगिली ॥ २८१ ॥

२८१) त्या चैतन्याला हृदयाकाशाच्या माजघरांत आणणारी कुंडलिनी देवी ही आपल्या तेजाची शिदोरी अर्पण करते. ( ती कशी तर, ) 

बुद्धीचेनि शाकें । हातबोनें निकें ।

द्वैत जेथ न देखे । तैसें केलें ॥ २८२ ॥

२८२) द्वैत ज्याला पाहाणार नाहीं, असा बुद्धीच्या भाजीसह हातांत घेतलेला चांगला नैवेद्य अर्पण केला.

ऐसी निजकांती हारविली । मग प्राणुचि केवळ जाहाली ।

ते वेळीं कैसी गमली । म्हणावी पां ॥ २८३ ॥

२८३) याप्रमाणें आपलें तेज अर्पण केल्यावर ती कुंडलिनी केवळ प्राणवायूरुप होते, तेव्हां ती कशी भासते म्हणून म्हणाल तर,

हो कां जे पवनाची पुतळी । पांघुरली होती सोनेसळी ।

ते फेडूनियां वेगळी । ठेविली तिया ॥ २८४ ॥

२८४) जशी एखादी वार्‍याची पुतळी असावी व तिनें पीतांबर नेसलेला असावा आणि मग तिनें वस्त्र सोडून ठेवावें; 

नातरी वारयाचेनि आंगें झगटली । दीपाची दिठी निमटली ।

कां लखलखोनि हारपली । वीजु गगनीं ॥ २८५ ॥

२८५) अथवा, वार्‍याची झुळुक लागून दिव्याची ज्योत नाहींशी व्हावी, किंवा आकाशांत वीज चमकून अदृश्य व्हावी, 

तैशी हृदयकमळवेर्‍हीं । दिसे सोनियाची जैशी सरी ।

नातरी प्रकाशजळाची झरी । वाहत आली ॥ २८६ ॥

२८६) अथवा हृदयकमळापर्यंत जणूं काय सोन्याची सरी अथवा प्रकाशरुप जलाचा झरा असा कांहीं वाहत आला आहे, अशी ती दिसते.

मग तिये हृदयभूमी पोकळे । जिराली कां एके वेळे ।

तैसें शक्तीचें रुप मावळे । शक्तीचिमाजी ॥ २८७ ॥

२८७) मग तो प्रकाशाचा झरा जसा हृदयाच्या पोकळ भूमींत एकदम जिरावा, त्याप्रमाणें शक्तीचें रुप शक्तीमध्येंच मावळतें, 

तेव्हां तरी शक्तीचि म्हणिजे । एर्‍हवीं तो प्राणु केवळ जाणिजे ।

आतां नाद बिंदु नेणिजे । कला ज्योती ॥ २८८ ॥  

२८८) तेव्हां तरी शक्तीच म्हणतात, पण वास्तविक तो प्राणवायूच आहे असें समज. आतां त्यास नाद, बिंदू, कला व ज्योति असे चारी धर्म नसतात. 

मनाचा हन मारु । कां पवनाचा धरु ।

ध्यानाचा आदरु । नाहीं परी ॥ २८९ ॥

२८९) मनाचा निग्रह करणें किंवा प्राणवायूचा निरोध करणें किंवा ध्यान करावेसें वाटणें, हे प्रकार येथें राहात नाहींत.

हे कल्पना घे सांडी । तें नाहीं इये परवडी ।

हे महाभूतांची फुडी । आटणी देखा ॥ २९० ॥

२९०) ही कल्पना घे, ती कल्पना टाक; हे प्रकार तेथें नाहीत. ( कारण ) ही स्थिती पंचमहाभूतांची पक्की आटणी ( नाश ) आहे असें समज,

पिंडें पिंडाचा ग्रासु । तो हा नाथसंकेतींचा दंशु ।

परि दाऊनि गेला उद्देशु । महाविष्णु ॥ २९१ ॥

‍२९१) पंचमहाभूतांनीं पंचहाभूतांचा लय करावयाचा हें आदिनाथ जे शंकर यांच्या अंतरंग खुणेचें मर्म आहे. परंतु हें मर्म श्रीविष्णु ( श्रीकृष्ण ) दाखवून गेले.

तया ध्वनिताचें केणें सोडुनी । यथार्थाची घडी झाडुनी ।

उपलविली म्यां जाणुनी । ग्राहीक श्रोते ॥ २९२ ॥

२९२) त्या संकेतरुपी सणंगाच्या गूढपणाचीं बंधनें सोडून यथार्थाची घडी साफ करुन, श्रोते ( हे या मालाचे योग्य ) गिर्‍हाईक आहेत, असें समजून, त्यांच्यापुढें घडी उलगडून मी हें सणंग ठेविलें. ( असें ज्ञानेश्र्वर महाराज म्हणतात. )   

ऐकें शक्तीचें तेज लोपे । तेथ देहींचें रुप हारपे ।

मग तो डोळियांचि माजि लपे । जगाचिया ॥ २९३ ॥

२९३) अर्जुना, ऐक कुंडलिनीचें तेज ( जेव्हां ) लय पावतें तेव्हां देहाचा आकार नाहींसा होतो, ( देह वायूरुप बनतो ); तो याप्रमाणें सूक्ष्म झाल्यामुळें मग त्या योग्याला लोकांच्या डोळ्यांतच लपता येतें.  

एर्‍हवी आधिलाचि ऐसें । सावयव तरी असे ।

परी वायूचें कां जैसें । वळिलें होय ॥ २९४ ॥

२९४) वास्तविक तो देह पूर्वीप्रमाणेंच सावयव असतो, परंतु ( आतां ) तो देह जसा वायूचाच बनविलेला असावा, असा होतो.

नातरी कर्दळीचा गाभा । बुंथी सांडोनी उभा ।

कां अवयवचि नभा । निवडला तो ॥ २९५ ॥

२९५) अथवा केळीतील पोकळीवरील सोपटें काढून टाकून ती पोकळी जशी उभी करावी, किंवा आकाशालाच अवयव उत्पन्न व्हावेत, तसा तो दिसतो.  

तैसें होय शरीर । तैं तें म्हणिजे खेचर ।

हें पद होतां चमत्कार । पिंडजनीं ॥ २९६ ॥

२९६) असें ज्या वेळेस शरीर होतें, तेव्हां त्यास खेचर ( गगनविहारी ) म्हणतात. देहधारी लोकांत असें रुप होणें म्हणजे मोठा चमत्कार आहे.

देखें साधकु निघोनि जाये । मागां पाउलाची वोळ राहे ।

तेथ ठायीं ठायीं होये । हे अणिमादिक ॥ २९७ ॥

२९७) पाहा, साधक निघून गेल्यावर मागें जी पावलांची ओळ राहाते, तेथें ठिकठिकाणीं आणिमादिक सिद्धि उत्पन्न होतात; ( म्हणजे साधकाची जी जी भूमिका सिद्ध होईल त्या त्या ठिकाणीं अणिमादिक सिद्धि त्यास प्राप्त होत जातात. )  

परि तेणें काय काज आपणयां । अवधारीं ऐसा धनंजया ।

लोप आथी भूतत्रया । देहींचा देहीं ॥ २९८ ॥

२९८) पण आपल्याला त्या सिद्धींशी काय काम आहे ? अर्जुना, ऐक. देहाच्या देहांतच तीनहि भूतांचा असा लोप होतो.

पृथ्वीतें आप विरवी । आपातें तेज जिरवी ।

तेजातें पवनु हरवी । हृदयामाजीं ॥ २९९ ॥

२९९) पृथ्वीला पाणी नाहींसें करतें. पाण्याला तेज नाहींसें करतें व तेजाला वायू हृदयामध्यें नाहींसा करतो.

पाठीं आपण एकला उरे । परि शरीराचेनि अनुकारें ।

मग तोही निगे अंतरें । गगना मिळे ॥ ३०० ॥

३००) नंतर प्राणवायू एकटा उरतो. पण तो शरीराच्या

 आकारानें असतो. मग तोहि कांहीं वेळानें निघून

 मूर्ध्नाआकाशांत मिळतो.



Custom Search

No comments: