Saturday, February 27, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part 13 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग १३

 

Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part 13 
Ovya 361 to 390 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग १३ 
ओव्या ३६१ ते ३९०

तरी पार्था हें झणें । सायास घेशी हो मनें ।

वायां बागुल इयें दुर्जनें । इंद्रियें करिती ॥ ३६१ ॥

३६१) तरी अर्जुना, यांत कष्ट आहेत, असा तुझ्या मनाचा ग्रह कदाचित होऊन असेल, तर तो तसा होऊं देऊं नकोस. हीं दुष्ट इंद्रियें याचा उगाच बाऊ करतात.    

पाहें पां आयुष्याचा अढळ करी । जें सरतें जीवित वारी ।

तया औषधातें वैरी । काय जिव्हा न म्हणे ॥ ३६२ ॥

३६२) पाहा बरें, आयुष्याला स्थिर करणारें व संपत आलेल्या जीविताला मागें आणणारें जें औषध, त्याला जिव्हा शत्रु समजत नाहीं काय ! 

ऐसें हितासि जें जें निकें । तें सदाचि या इंद्रियां दुखे ।

एर्‍हवी सोपें योगासारिखें । कांहीं आहे ॥ ३६३ ॥  

३६३) त्याप्रमाणें आपल्या हितास जें जें चांगलें, तें या इंद्रियांना सदोदित दुःखकारक वाटतें. एर्‍हवीं योगासारखें सोपें कांहीं आहे काय ?

मूळ श्र्लोक

यत्रोपरमते चित्तं निरुद्धं योगसेवया ।

यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति ॥ २० ॥

२०) जेथें योगाच्या अभ्यासाच्याचें नियमन पावलेलें चित्त विषयांपासून परावृत्त होतें, तेथें साधक आपण आपल्याला पाहून आत्मस्वरुपीं सुख पावतो.    

सुखमात्यन्तिकं यत् तद् बुद्धिग्राह्यमतीन्द्रियम् ।

वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः ॥ २१ ॥

२१) जें सुख सर्वोत्कृष्ट आहे, जें ( केवळ ) बुद्धिगम्य आहे, जें इंद्रियांना अगोचर आहे व जें सुख भोगीत असतांना तो योगी आपल्या स्वरुपापासून चलन पावत नाहीं, ( असें सुख योग्याच्या अनुभवाला येतें. )

म्हणोनि आसनाचिया गाढिका । जो आम्हीं अभ्यासु सांगितला निका ।

तेणें होईल तरी हो कां । निरोधु यया ॥ ३६४ ॥

३६४) म्हणून आसनाच्या बळकटपणापासून आरंभ करुन जो आम्ही तुला चांगला योगाभ्यास सांगितला, त्या योगानें या इंद्रियांचा निरोध झाला तर होईल. 

एर्‍हवीं तरी येणें योगें । जैं इंद्रियां विंदाण लागे ।

तैं चित्त भेटों रिगे । आपणपेयां ॥ ३६५ ॥

३६५) एर्‍हवीं तरी या योगामुळें ज्या वेळेला इंद्रियांचा निग्रह होतो, त्या वेळेला त्या वेळेला चित्त आपल्या ( चैतन्याच्या ) भेटीला निघतें.  

परतोनि पाठिमोरें ठाके । आणि आपणियांतें आपण देखे ।

देखतखेंवो वोळखे । म्हणे तत्त्व तें मी ॥ ३६६ ॥

३६६) तें ज्या वेळेला विषयांना सोडून परत अंतर्मुख होतें आणि आपण आपल्या आत्मस्वरुपाला पाहातें, आणि पाहिल्याबरोबर त्यास स्वरुपाची ओळख पटते व तें तत्त्व मी आहें, अशा समजुतीवर तें येतें.

तिये ओळखीचिसरिसें । सुखाचियां साम्राज्यीं बैसे ।

चित्तपण समरसें । विरोनि जाय ॥ ३६७ ॥

३६७) त्या ओळखीबरोबर तें सुखाच्या साम्राज्यावर बसतें, आणि तेथें आत्म्याशीं समरस झाल्यानें चित्ताचा चित्तपणा नाहींसा होतो; 

जयापरतें आणिक नाहीं । जयातें इंद्रियें नेणती कहीं ।

तें आपणचि आपुलां ठायीं । होऊनि ठाके ॥ ३६८ ॥

३६८) व ज्याहून दुसरें कांहीं नाहीं व ज्याला इंद्रियें केव्हांच जाणत नाहींत, असें जें चैतन्य, तें, मन आपल्या स्वतः आपल्या ठिकाणी होऊन राहतें.   

मूळ श्र्लोक

यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः ।

यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते ॥ २२ ॥

२२) आणि जें सुख मिळालें असतां त्यापेक्षा अधिक असा दुसरा कांहीं लाभ आहे, असें मानीत नाहीं, व ( ज्या ) सुखामध्यें असतांना योगी मोठ्या दुःखानेंदेखील डगमगत नाहीं.

मग मेरुपासूनि थोरें । देह दुःखाचेनि डोंगरें ।

दाटिजो पां परि भारें । चित्त न दटे ॥ ३६९ ॥

३६९) मग मेरुपेक्षां मोठ्या दुःखाच्या डोंगरानें त्याचा देह जरी दडपला, तरी पण त्या भारानें त्याचें चित्त दडपत नाहीं. 

कां शस्त्रेंवरी तोडिलिया । देह आगीमाजीं पडलिया ।

चित्त महासुखीं पहुडलिया । चेवोचि नये ॥ ३७० ॥

३७०) अथवा शस्त्रानें त्याचा देह तोडला, किंवा देह अग्नीमध्यें पडला तरी, चित्त निरतिशय सुखांत लीन झाल्यामुळें, परत वृत्तीवर येत नाहीं.

ऐसें आपणपां रिगोनि ठाये । मग देहाची वास न पाहे ।

आणिकचि सुख होऊनि जाये । म्हणूनि विसरे ॥ ३७१ ॥

३७१) याप्रमाणें चित्त आपल्या ठिकाणी येऊन राहिल्यावर मग देहतादात्म्य घेत नाहीं व अलौकिक सुखच बनल्यामुळें तें चित्त देहाला विसरतें. 

मूळ श्लोक

तं विद्यात् दुःखसंयोगवियोगं योगसंज्ञितम् ।

स निश्चयेन योक्तव्यो योगोऽनिर्विण्णचेतसा ॥ २३ ॥

२३) त्या दुःखाच्या संयोगानें विहीन अशा सुखाला योग ही संज्ञा आहे, असें जाणावें. निश्चयपूर्वक व उत्साही अंतःकरणानें युक्त होऊन या, योगानें अनुष्ठान करावें.    

जया सुखाचिया गोडी । मन आर्तीची सेचि सोडी ।

संसाराचिया तोंडीं । गुंतलें जें ॥ ३७२ ॥

३७२) ज्या सुखाची चटक लागल्यानें संसाराच्या तोंडांत गुंतलेलें जें मन, तें विषयवासनेची आठवणहि ठेवीत नाहीं;  

जें योगाची बरव । संतोषाची राणीव ।

ज्ञानाची जाणीव । जयालागीं ॥ ३७३ ॥

३७३) जें सुख योगाचें सौभाग्य आहे, संतोषाचें राज्य आहे आणि ज्याच्याकरितां ज्ञान समजून घ्यावयाचें असतें,

तें अभ्यासिलेनि योगें । सावेव देखावें लागे ।

देखिलें तरी आंगें । होईजेल गा ॥ ३७४ ॥

३७४) तें ( सुख ) योगाचा अभ्यास करुन मूर्तिमंत पाहिलें पाहिजे आणि पाहिल्यावर मग, तो पाहणारा आपणच स्वतः सुखरुप होऊन जातो.

मूळ श्लोक

संकल्पप्रभवान् कामांस्त्यक्त्वा सर्वानशेषतः ।

मनसैवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्ततः ॥ २४ ॥

२४) संकल्पापासून उत्पन्न होणार्‍या सर्व कामांना निःशेष टाकून, सर्व इंद्रियांचें सर्व बाजूंनीं मनानें नियमन करुन,

परि तोचि योगु बापा । एके परी आहे सोपा ।

जरी पुत्रशोकु संकल्पा । दाखविजे ॥ ३७५ ॥

३७५) पण बाबा अर्जुना, एका प्रकारानें तो योग सोपा आहे. ( तो कसा म्हणशील तर ) संकल्पाला पुत्रशोक दाखवावा. [ संकल्पाचा पुत्र जो काम ( विषयवासना ) तो नाहींसा करावा. ]

हा विषयांतें निमालिया आइके । इंद्रियें नेमाचिया धारणीं देखे ।

तरी हियें घालुनि मुके । जीवितांसी ॥ ३७६ ॥

३७६) हा संकल्प जर विषयवासना मेल्या असें ऐकेल व इंद्रियें नेमलेल्या स्थितींत आहेत, असें पाहिल, तर तो ऊर फुटून प्राणास मुकेल.

ऐसें वैराग्य हें करी । तरी संकल्पाची सरे वारी ।

सुखें धृतीचां धवळारीं । बुद्धि नांदे ॥ ३७७ ॥ 

३७७) असें हें वैराग्यानें केलें, तर संकल्पाची येरझार संपते व बुद्धि धैर्याच्या महालांत सुखानें वास करते.    

मूळ श्लोक

शनैः शनैरुपरमेत् बुद्ध्या धृतिगृहीतया ।

आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिन्तयेत् ॥ २५ ॥

२५) धैर्ययुक्त असा बुद्धीनें हळूहळू ( बाह्य प्रपंचापासून मनाचा ) उपरम करावा व मनाला आत्म्याच्या ठिकाणीं स्थिर करुन, दुसर्‍या कशाचेंहि चिंतन करुं नये.

यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरम् ।

ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत् ॥ २६ ॥

२६) चंचल वृत्ति ( अत एव ) अस्थिर असें मन ( आत्म्याकडून निघून ) ज्याच्या ज्याच्यामुळें बाहेर जातें त्याच्या त्याच्यापासून नियमन करुन त्याला आत्म्याच्याच ताब्यांत आणावें. 

बुद्धी धैर्या होय वसौटा । तरी मनातें अनुभवाचिया वाटा ।

हळु हळु करी प्रतिष्ठा । आत्मभुवनीं ॥ ३७८ ॥

३७८) बुद्धि जर धर्माला आश्रयस्थान झाली, तर ती मनाला अनुभवाच्या वाटेनें हळूहळू आत्मानुभवांत कायमचें स्थिर करते,  

याही एके परी । प्राप्ति आहे विचारीं ।

हें न ठके तरी सोपारी । आणिक ऐकें ॥ ३७९ ॥

३७९) याहि एका तर्‍हेनें ब्रह्मप्राप्ति आहे, याचा विचार कर आणि हें जर तुला साध्य होत नसेल तर आणखी एक सोपी युक्ति आहे, ती ऐक.

आतां नियमुचि हा एकला । जीवें करावा आपुला ।

जैसा कृतनिश्र्चयाचिया बोला-। बाहेर नोहे ॥ ३८० ॥

३८०) आतां तूं जो निश्चय करशील, त्याच्या आज्ञेच्या बाहेर जो नियम कधी जाणार नाहीं, अशा प्रकारचा हा एकच नियम जीवाभावापासून तूं आपलासा कर.

जरी येतुलेनि चित्त स्थिरावे । तरी काजा आलें स्वभावें ।

न राहे घालावें । मोकलुनी ॥ ३८१ ॥

३८१) जर येवढ्यानें चित्त स्थिर झालें, तर सहजच काम

 झालें, आणि जर येवढ्यानें तेम स्थिर झालें नाहीं तर

 त्याला मोकळें सोडून द्यावें.  

मग मोकलिलें जेथ जेथ जाईल । तेथूनि नियमुचि घेऊनि येईल । ऐसोनि स्थैर्याची होईल । सवे यया ॥ ३८२ ॥

३८२) मन मोकळें सोडलें असतां तें जेथें जाईल, तेथून नियमच त्यास परत घेऊन येईल, अशा रीतीनें यालाहि स्थैर्याची सवय होईल. 

मूळ श्लोक

प्रशान्तमनसं ह्येन योगिनं सुखमुत्तमम् ।

उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतमकल्मषम् ॥ २७ ॥

२७) ( याप्रमाणें अभ्यास केल्यानें ) ज्याच्या मनाला उत्तम शांती मिळाली आहे, ज्याचा रजोगुण नाश पावला आहे, जो पापपुण्यादिका विरहित आहे व जो ब्रह्मस्वरुप झाला आहे, अशा योग्याला श्रेष्ठ सुख प्राप्त होतें.  

पाठीं केतुलेनि एकें वेळें । तया स्थैर्याचेनि मेळें ।

आत्मस्वरुपाजवळें । येईल सहजें ॥ ३८३ ॥

३८३) नंतर कांहीं एका वेळानें त्या स्थैर्याच्या योगानें मन सहज आत्मस्वरुपाजवळ येईल.

तयातें देखोनि आंगा घडेल । तेथ अद्वैतीं द्वैत बुडेल ।

आणि ऐक्यतेजें उघडेल । त्रैलोक्य हें ॥ ३८४ ॥

३८४) आणि मनानें त्या आत्मस्वरुपास पाहिल्याबरोबर, तें मन स्वतः आत्मस्वरुप होऊन जाईल; तेव्हां त्या अद्वैत स्वरुपांत द्वैत नाहीसें होईल; आणि नंतर हे सर्व त्रैलोक्य ऐक्याच्या तेजानें प्रकाशित होईल.   

आकाशीं दिसे दुसरें । तें अभ्र जैं विरे ।

तैं गगनचि कां भरे । विश्र्व जैसें ॥ ३८५ ॥

३८५) आकाशामध्यें निराळे दिसणारे जे मेघ ते नाहीसे झाल्यावर ज्याप्रमाणें संपूर्ण विश्व आकाशानेंच भरलेलें असतें; 

तैसें चित्त लया जाये । आणि चैतन्यचि आघवें होये ।

ऐसी प्राप्ति सुखोपायें । आहे येणें ॥ ३८६ ॥

३८६) त्याप्रमाणें आत्मस्वरुपीं चित्त लयाला गेलें कीं संपूर्ण विश्व चैतन्यमयच होतें. या सुलभ उपायानें अशी ( एवढी मोठी ) प्राप्ति होते.

मूळ श्लोक

युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मषः ।

सुखेन ब्रह्मसंस्पर्शमत्यन्तं सुखमश्नुते ॥ २८ ॥

२८) या प्रकारें सर्वदा मन आत्म्याच्या ठिकाणीं स्थिर करणारा योगी पापांनी विरहित होतो व अनायासानें ब्रह्मसाक्षात्काररुपीं आत्यंतिक सुख भोगतो. 

या सोपिया योगस्थिति । उकलु देखिला गा बहुतीं ।

संकल्पाचिया संपत्ती । रुसोनियां ॥ ३८७ ॥

३८७) संकल्पाच्या संपत्तीचा ( विषयवासनांचा ) त्याग करुन पुष्कळांनी या सोप्या योगमार्गाचा अनुभव घेतला आहे.

ते सुखाचेनि सांगातें । आले परब्रह्मा आंतौतें ।

तेथ लवण जैसें जळातें । सांडूं नेणे ॥ ३८८ ॥

३८८) ते पुरुष अनायासें परब्रह्माच्या आंत आले. ( ते कसें तर ) मीठ पाण्यांत मिळाले असतां पाण्यास सोडून जसें तें वेगळें राहात नाहीं;   

तैसें होय तिये मेळीं । मग सामरस्याचिया राउळीं ।

महासुखाची दिवाळी । जगेंसि दिसे ॥ ३८९ ॥

३८९) त्याप्रमाणें त्या योग्याची जेव्हां परब्रह्माशीं मिळणी होते, तेव्हां एकस्वरुपाची स्थिति होते. मग समरसतेच्या मंदिरांत संपूर्ण जगासह त्याला महासुखाची दिवाळी दिसते. 

ऐसें आपुले पायवरी । चालिले आपुले पाठीवरी ।

हें पार्था नागवे तरी । आन ऐकें ॥ ३९० ॥

३९०) आपल्या पायांनी आपल्या पाठीवर चालण्यासारखें

 हें आहे. अर्जुना, म्हणून जर तें तुला करतां येणार नाहीं,

 तर दुसरें सांगतों. ऐक.



Custom Search

No comments: