Friday, July 14, 2017

Samas Pachava BahudhaDnyana Nirupan समास पांचवा बहुधाज्ञान निरुपण


Dashak Pachava Samas Pachava BahudhaDnyana Nirupan 
Samas Pachava BahudhaDnyana Nirupan. It is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about Dnyana. However having Dnyana of different arts, skills, or any other Vidya is not true Dnyana or Knowledge. Atmadnyana is different from all these.
समास पांचवा बहुधाज्ञान निरुपण 
श्रीराम ॥
जव तें ज्ञान नाहीं प्रांजळ । तव सर्व कांहीं निर्फळ ।
ज्ञानरहित तळमळ । जाणार नाहीं ॥ १ ॥
१) जोपर्यंत सरळ, स्वच्छ ज्ञान होत नाही, तोपर्यंत इतर सर्व निरर्थक होते. आत्मज्ञान झाल्यावाचून मनाची तळमळ शांत होत नाही.
ज्ञान म्हणती वाटे भरम । काये रे बा असेल वर्म ।
म्हणोनि हा अनुक्रम । सांगिजेल आतां ॥ २ ॥ 
२) ज्ञान शब्द सामान्य माणसाला गोंधळांत टाकतो. ज्ञानाचे रहस्य काय असेल असा प्रश्र्ण त्याला पडतो. म्हणून आतां क्रमाक्रमाने ज्ञान काय ते सांगतो.  
भूत भविष्य वर्तमान । ठाउकें आहे परिछिन्न ।
यासी हि म्हणिजेत ज्ञान । परी तें ज्ञान नव्हे ॥ ३ ॥
३) भूत, भविष्य, वर्तमान हे सगळे माहीत असले तर त्याला ज्ञान म्हणतात. पण ते आत्मज्ञान नव्हे. 
बहुत केलें विद्यापठण । संगीतशास्त्र रागज्ञान ।
वैदिक शास्त्र वेदाधेन । हें हि ज्ञान नव्हे ॥ ४ ॥
४) पुष्कळ विद्यांचा अभ्यास, संगीतशास्त्राचे व रागांचे ज्ञान, वैदिक शास्त्रांचे व वेदांचा अभ्यास केला तरी तेही आत्मज्ञान नाही.  
नाना वेवसायाचें ज्ञान । नाना दीक्षेचें ज्ञान ।
नाना परीक्षेचें ज्ञान । हें ज्ञान नव्हे ॥ ५ ॥
५) नाना व्यवसायांचे, दीक्षांचे आणि परीक्षांचे ज्ञान हें आत्मज्ञान नव्हे.  
नाना वनितांची परीक्षा । नाना मनुष्यांची परीक्षा ।
नाना नरांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ ६ ॥  
६) स्त्रियांची, पुरुषांची, माणसांची परीक्षा करता येणे हेही आत्मज्ञान नव्हे.
नाना अश्र्वांची परीक्षा । नाना गजांची परीक्षा ।
नाना स्वापदांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ ७ ॥  
७) निरनिराळे घोडे, हत्ती, जनावरें यांचे ज्ञान हे आत्मज्ञान नव्हे.
नाना पशूंची परीक्षा । नाना पक्ष्यांची परीक्षा ।
नाना भूतांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ ८ ॥  
८) नाना पशूंचे ज्ञान, पक्ष्यांचे ज्ञान, नाना भूतांचे ज्ञान हेही आत्मज्ञान नव्हे.
नाना यानांची परीक्षा । नाना वस्त्रांची परीक्षा ।
नाना शस्त्रांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ ९ ॥  
९) नाना वाहनें, वस्त्रें, शस्त्र यांचे ज्ञान हे आत्मज्ञान नव्हे. 
नाना धातूंची परीक्षा । नाना नाण्यांची परीक्षा ।
नाना रत्नांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १० ॥  
१०) नाना धातुंची परीक्षा, नाना नाण्यांची परीक्षा, नाना रत्नांची परीक्षा हेही आत्मज्ञान नव्हे.
नाना पाषाणपरीक्षा । नाना काष्ठांची परीक्षा ।
नाना वाद्यांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ ११ ॥  
११) दगड, लाकूड, वाद्यें यांचे ज्ञान हे आत्मज्ञान नव्हे.
नाना भूमींची परीक्षा । नाना जळांची परीक्षा ।
नाना सतेज परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १२ ॥  
१२) नाना जमिनींचे ज्ञान, नाना पाण्याचे आणि नाना तेजांचे ज्ञान हेही आत्मज्ञान नव्हे. 
नाना रसांची परीक्षा । नाना बीजांची परीक्षा ।
नाना अंकुरपरीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १३ ॥  
१३) नाना रस, नाना बीजें, नाना अंकुर यांचे ज्ञान हेही आत्मज्ञान नव्हे.
नाना पुष्पांची परीक्षा । नाना फळांची परीक्षा ।
नाना वल्लींची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १४ ॥  
१४) नाना फुलांची माहीती, नाना फळांची परीक्षा, नाना वेलींची परीक्षा हेही आत्मज्ञान नव्हे. 
नाना दुःखांची परीक्षा । नाना रोगांची परीक्षा ।
नाना चिन्हांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १५ ॥  
१५) नाना दुःख, नाना रोग, नाना चिन्हें यांचे ज्ञान हेही आत्मज्ञान नव्हे.
नाना मंत्रांची परीक्षा । नाना यंत्रांची परीक्षा ।
नाना मूर्तींची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १६ ॥ 
१६) मंत्र, यंत्र, मूर्ति यांचे ज्ञान हेही आत्मज्ञान नव्हे. 
नाना क्षत्रांची परीक्षा । नाना गृहांची परीक्षा ।
नाना पात्रांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १७ ॥  
१७) नाना लढवय्ये, नाना घरें, नाना भांडी यांची माहीती हेही आत्मज्ञान नव्हे. 
नाना होणार परीक्षा । नाना समयांची परीक्षा ।
नाना तर्कांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १८ ॥ 
१८) भवितव्याच्या, काळवेळ, तर्क यांचे ज्ञान हेही आत्मज्ञान नव्हे. 
नाना अनुमानपरीक्षा । नाना नेमस्त परीक्षा ।
नाना प्रकार परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १९ ॥  
१९) अनुमान व नियम अशा अनेक गोष्टींची परीक्षा करतां येणे हे आत्मज्ञान नव्हे. 
नाना विद्येची परीक्षा । नाना कळेची परीक्षा ।
नाना चातुर्यपरीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ २० ॥  
२०) नाना विद्या, कला, चातुर्य यांची परीक्षा म्हणजे आत्मज्ञान नव्हे.
नाना शब्दांची परीक्षा । नाना अर्थांची परीक्षा ।
नाना भाषांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ २१ ॥  
२१) त्याचप्रमाणे शब्द, अर्थ, भाषा यांचे ज्ञान आत्मज्ञान नव्हे.
नाना स्वरांची परीक्षा । नाना वर्णांची परीक्षा ।
नाना लेखनपरीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ २२ ॥  
२२) नाना स्वर, नाना वर्ण, नाना लेखनांची परीक्षाकरता येणे म्हणजे आत्मज्ञान नव्हे.
नाना मतांची परीक्षा । नाना ज्ञानांची परीक्षा ।
नाना वृत्तींची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ २३ ॥ 
२३) नाना, मतें, नाना ज्ञानें, नाना वृत्तींची परीक्षा म्हणजे आत्मज्ञान नव्हे. 
नाना रुपांची परीक्षा । नाना रसनेची परीक्षा ।
नाना सुगंधपरीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ २४ ॥  
२४) नाना रुपें, नाना चवी, नाना सुगंध यांची परीक्षा हे आत्मज्ञान नव्हे.
नाना सृष्टींची परीक्षा । नाना विस्तारपरीक्षा ।
नाना पदार्थपरीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ २५ ॥  
२५) सृष्टी, तीचा विस्तार, आणि पदार्थ यांची परीक्षा करतां येणें हे आत्मज्ञान नव्हे.  
नेमकचि बोलणें । तत्काळचि प्रतिवचन देणें ।
सीघ्रचि कवित्व करणें । हें ज्ञान नव्हे ॥ २६ ॥ 
२६)  मोजकें बोलणें, चटकन उत्तर देणे, शीघ्र कवित्व करणे हे आत्मज्ञान नव्हे.   
नेत्रपालवी नादकळा । करपालवी भेदकळा ।
स्वरपालवी संकेतकळा । हें ज्ञान नव्हे ॥ २७ ॥  
२७) नेत्रपल्लवी, नादकला, करपल्लवी भेदकला स्वरपल्लवी, संकेतकला हे आत्मज्ञान नव्हे.
काव्यकुशळ संगीतकळा । गीतप्रबंध नृत्यकळा ।
सभाच्यातुर्य शब्दकळा । हें ज्ञान नव्हे ॥ २८ ॥  
२८) सुरेख काव्य असलेली संगीतकला, गीत, प्रबंध. नृत्यकला,  सभाचातुर्य, शब्दकला, हे आत्मज्ञान नव्हे.
वाग्विळास मोहनकळा । रम्य रसाळ गायनकळा ।
हास्य विनोद कामकळा । हें ज्ञान नव्हे ॥ २९ ॥  
२९) वकृत्वाने मोहून टाकण्याची कला, रम्य व रसाळ गायनकला, हास्यविनोद व कामकला हें आत्मज्ञान नव्हे.   
नाना लाघवें चित्रकळा । नाना वाद्यें संगीतकळा ।
नाना प्रकारें विचित्र कळा । हें ज्ञान नव्हे ॥ ३० ॥   
३०) नाना प्रकारचें कसब असलेली चित्रकला, नाना वाद्यांवर संगीत वाजविण्याची कला, अशा अनेक कला येत असणे म्हणजे आत्मज्ञान नव्हे. 
आदिकरुनि चौसष्टि कळा । याहि वेगळ्या नाना कळा ।
चौदा विद्या सिद्धि सकळा । हें ज्ञान नव्हे ॥ ३१ ॥   
३१) एकंदर चौसष्ट कला त्याहून आणखी पुष्कळ वेगवेगळ्या कला आहेत. या सर्व कला, चौदा विद्या आणि सगळ्या सिद्धि वश असणें म्हणजे ब्रह्मज्ञान नव्हे.   
असो सकळ कळाप्रवीण । विद्यामात्र परिपूर्ण । 
तरी ते कौशल्यता परी ज्ञान । म्हणों चि नये ॥ ३२ ॥
३२) असो. एखादा माणूस सगळ्या कलांत पारंगत असेल, तसाच सर्व विद्यांमध्येही पारंगत असेल त्याच्या अंगी मोठे चातुर्य असेल हे जरी ज्ञान असले तरी तें आत्मज्ञान नव्हे.  
हें ज्ञान होयेसें भासे । परंतु मुख्य ज्ञान तें अनारिसें ।
जेथें प्रकृतीचें पिसें । समूळ वाव ॥ ३३ ॥
३३) कलेमध्ये व विद्येमध्ये ज्ञान आहे असें भासते. परंतु खरें ज्ञान हें वेगळेच असते. खर्‍या ज्ञानामध्ये मायेने निर्माण केलेला भ्रम संपून जातो. 
जाणावें दुसर्‍याचें जीवीचें । हें ज्ञान वाटे साचे ।
परंतु हें आत्मज्ञानाचें । लक्षण नव्हे ॥ ३४ ॥
३४) दुसर्‍याच्या मनांतील कळणें हें ज्ञान आहे असे वाटते. पण तें कांहीं आत्मज्ञानाचे लक्षण नव्हे.
माहानुभाव माहाभला । मानसपूजा करितां चुकला ।
कोणी येकें पाचारिला । ऐसें नव्हे म्हणोनी ॥ ३५ ॥ 
३५) एक मोठा साधक भगवंताची मानसपूजा करतांना चुकला, तेव्हां जवळच असलेल्या माणसानें त्याला हांक मारुन सांगितलें की, हे असे करावयाचे नसते.   
ऐसी जाणे अंतरस्थिती । तयासि परम ज्ञाता म्हणती ।
परंतु जेणें मोक्षप्राप्ती । तें हें ज्ञान नव्हे ॥ ३६ ॥
३६) अशा रीतीने दुसर्‍याच्या मनांतील जो जाणतो त्याला फार मोठा ज्ञानी समजतात. पण हें मोक्ष मिळवून देणारे ज्ञान नव्हें. 
बहुत प्रकारीचीं ज्ञानें । सांगो जातां असाधारणें ।
सायोज्यप्राप्ति होये जेणें । तें ज्ञान वेगळें ॥ ३७ ॥
३७) आतांपर्यंत वर्णन केल्यानुसार ज्ञानाचे वेगवेगळे प्रकार आहेत. तें सगळे सांगणे शक्य नाही. ज्या ज्ञानाने सायुज्यमुक्ति मिळते, तें ज्ञान मात्र वेगळेच आहे. 
तरी तें कैसें आहे ज्ञान । समाधानाचें लक्षण ।
ऐसें हें विशद करुन । मज निरोपावें ॥ ३८ ॥
३८) यावर शिष्य विचारतो, की, समाधान हेंच ज्या ज्ञानाचे , तें मुख्य लक्षण आहे, ते मला सोपे करुन सांगा. 
ऐसें शुद्ध ज्ञान पुसिलें । तें पुढिलें समासीं निरोपिलें ।
श्रोतां अवधान दिधलें । पाहिजे पुढें ॥ ३९ ॥
३९) याप्रमाणें शुद्ध ज्ञानाचे लक्षण विचारले. तें पुढील समासांत सांगतो. श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावे.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे बहुधाज्ञाननाम समास पांचवा ॥
Samas Pachava BahudhaDnyana Nirupan
समास पांचवा बहुधाज्ञान निरुपण 


Custom Search

No comments: