Sunday, July 16, 2017

Samas Sahava ShuddhaDnyana Nirupan समास सहावा शुद्धज्ञान निरुपण


DashakPachava Samas Sahava ShuddhaDnyana Nirupan
Samas Sahava ShuddhaDnyana Nirupan. It is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about ShuddhaDnyana. What is AtmaDnyana? To know real self in you is the true Knowledge. Our body is not true self. When true self leaves the body the person is said to be dead. How to find out true self or real self is told in this Samas.
समास सहावा शुद्धज्ञान निरुपण 
श्रीराम ॥
ऐका ज्ञानाचें लक्षण । ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान ।
पाहावें आपणासि आपण । या नाव ज्ञान ॥ १ ॥
१) शिष्या, ब्रह्मज्ञानाचे लक्षण ऐक. आपलें खरे स्वरुप पहाणें याचें नां ज्ञान होय.
मुख्य देवास जाणावें । सत्य स्वरुप वोळखावें । 
नित्यानित्य विचारावें । या नाव ज्ञान ॥ २ ॥ 
२) मुख्य देव जो ईश्र्वर त्याला जाणावे. आपल्यांतील खरा मी तो आपलें खरें स्वरुप. तें ओळखावेआणि टिकणारे काय व तात्पुरते काय हे नक्की करावे. याला ज्ञान म्हणतात.   
जेथें दृश्य प्रकृति सरे । पंचभूतिक वोसरे ।
समूळ द्वैत निवारे । या नाव ज्ञान ॥ ३ ॥
३) ज्या अवस्थेंत प्रकृतीचा दृश्य पसारा संपतो, पंचमहाभूतांचा खेळ संपतो, आणि मी-तू पणाचे द्वैतभेद संपतो, त्याला ज्ञान म्हणतात. 
मनबुद्धि अगोचर । न चले तर्काचा विचार ।
उल्लेख परेहूनि पर । या नाव ज्ञान ॥ ४ ॥
४) जो अनुभव मन व बुद्धि यांना आकलन होत नाही, जो तर्काने विचारांच्या कक्षेंत येत नाही, परावाणीच्या पलीकडे तो आहे. त्या अनुभवाला ज्ञान म्हणतात.
जेथें नाहीं दृश्यभान । जेथें जाणीव हें अज्ञान ।
विमळ शुद्ध स्वरुपज्ञान । यासि बोलिजे ॥ ५ ॥ 
५) जेथें दृश्याचे भान संपूर्ण नाहीसे होते, जेथें मी जाणतो, मला ज्ञान आहे ही जाणीव अज्ञान समजलें जाते, असें अत्यंत मलरहित, शुद्ध जें स्वरुपभान त्याला ज्ञान म्हणतात.    
सर्वसाक्षी अवस्ता तुर्या । ज्ञान ऐसें म्हणती तया ।
परी तें जाणिजे वायां । पदार्थज्ञान ॥ ६ ॥
६) तूर्या ही चौथी अवस्था सर्वसाक्षिणी असते. म्हणून तिला आत्मज्ञान म्हणतात. परंतु त्या अवस्थेंत साक्षित्वानें पदार्थज्ञान असते. यामुळें तें पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही.
दृश्य पदार्थ जाणिजे । त्यास पदार्थज्ञान बोलिजे । 
शुद्ध स्वरुप जाणिजे । या नाव स्वरुपज्ञान ॥ ७ ॥
७) पदार्थज्ञान म्हणजे दृश्य पदार्थ जाणणें होय. दृश्यरहित शुद्ध स्वरुप जाणणें याचें नाव आत्मज्ञान होय.
जेथें सर्वचि नाहीं ठाईचें । तेथें सर्वसाक्षत्व कैंचे । 
म्हणौनि शुद्ध ज्ञान तुर्येचें । मानूंचि नये ॥ ८ ॥
८) ज्या आत्मस्वरुपाचें ठिकाणी स्वरुपाशिवाय कांहींच उरत नाही, तेथें सर्वसाक्षीपणा असोों शकत नाही. म्हणुन तुर्येमध्यें होणारे ज्ञान शुद्ध आत्मज्ञान मानूं नये. 
ज्ञान म्हणिजे अद्वैत । तुर्या प्रत्यक्ष द्वैत ।
म्हणौनि शुद्ध ज्ञान तें सतंत । वेगळेंचि असे ॥ ९ ॥
९) आत्मज्ञानमध्ये संपूर्ण अद्वैत असते. तुर्येमध्ये तर प्रत्यक्ष द्वैत आढळतें. म्हणून शुद्ध आत्मज्ञान स्वतंत्र आहे. निराळेच आहे. 
ऐक शुद्ध ज्ञानाचें लक्षण । शुद्ध स्वरुपची आपण ।
या नाव शुद्ध स्वरुपज्ञान । जाणिजे श्रोतीं ॥ १० ॥
१०) शुद्ध ज्ञानाचें लक्षण ऐक. जें शुद्ध परमात्मस्वरुप आहे, तेंच आपण आहोत असा जो साक्षात अनुभव येतो, त्याचें नांव शुद्ध स्वरुपज्ञान होय. हे श्रोत्यांनी समजून घ्यावे.
माहंवाक्य उपदेश भला । परी त्याचा जप नाहीं बोलिला ।
तेथील तो विचारचि केला । पाहिजे साधकें ॥ ११ ॥
११) महावाक्यांचा उपदेश उत्तमच आहे. पण त्यांचा जप करण्यास सांगितलेला नाही. साधकानें महावाक्यांच्या अर्थाचा विचार करणें आवश्यक आहे.    
माहांवाक्य उपदेशसार । परी घेतला पाहिजे विचार ।
त्याच्या जपे अंधकार । न फिटे भ्रांतीचा ॥ १२ ॥
१२) महावाक्यांमध्यें परमार्थाच्या उपदेशाचे सार आहे. हे निःसंशय पण त्यांचे मननच केले पाहिजे. जप केल्यानें अज्ञानाचा अंधकार नाहीसा होत नाही. 
माहावाक्याचा अर्थ घेतां । आपण वस्तुचि तत्वतां ।
त्याचा जप करितां वृथा । सीणचि होये ॥ १३ ॥
१३) महावाक्यांचा नुसता अर्थ घेतला, तरी आत्मा ब्रह्मस्वरुप किंवा परमात्मस्वरुप आहे. आणि आपण वास्तविक आत्मस्वरुप आहोत. या महावाक्यांचा जप केल्याने कांहीं आत्मज्ञान होत नाही. उगाचच शीण मात्र होतो.  
माहावाक्याचें विवरण । हें मुख्य ज्ञानाचे लक्षण ।
शुद्ध लक्ष्यांशें आपण । वस्तुच आहे ॥ १४ ॥
१४) माहावाक्यांचे उपदेश असा आहे. मी देह नसून आत्माच आहें, आणि आत्मा ब्रह्मस्वरुप असल्यानें मी ब्रह्मस्वरुप आहे. असा प्रत्यक्ष अनुभव येणे म्हणजे आत्मज्ञान प्राप्त होणे समजावे. 
आपला आपणासि लाभ । हें ज्ञान परम दुल्लभ ।
जें आदिअंतीं स्वयंम । स्वरुपचि स्वयें ॥ १५ ॥
१५) हा आपला आपणालाच होणारा लाभ आहे. हें आत्मज्ञान फार दुर्लभ आहे. जें आधी व नंतरही स्वतः स्वरुपच असते.
जेथून हें सर्व ही प्रगटे । आणी सकळ ही जेथें आटे ।
तें ज्ञान जालियां फिटे । भ्रांति बंधनाची ॥ १६ ॥
१६) ज्या ठिकाणाहून हे प्रगट होते व जेथे सर्व नाहीसे होते, ते ज्ञान झाल्यावर सर्व बंधनांपासून सुटका होते. 
मते आणी मतांतरें । जेथें होती निर्विकारें ।
अति सूक्ष्म विचारें । पाहातां ऐक्य ॥ १७ ॥
१७) जेथेसर्व मते व मतांतरे निर्विकार होतात आणि सूक्ष्मत्वाने विचार केल्यावर सर्व एकच आहे हे पटते. तेच आत्मज्ञान होय.
जें या चराचराचें मूळ । शुद्ध स्वरुप निर्मळ ।
या नाव ज्ञान केवळ । वेदांतमतें ॥ १८ ॥
१८) वेदांच्या मताप्रमाणे जें या चराचराचे मूळ आहे. ते केवळ शुद्ध, निर्मळस्वरुप आहे. यालाच ज्ञान म्हणतात. 
शोधितां आपलें मूळ स्थान । सहजचि उडे अज्ञान ।
या नाव म्हणिजे ब्रह्मज्ञान । मोक्षदायेक ॥ १९ ॥
१९) वेदांच्या मते आपण कोठून आलो, याचा शोध घेता घेता सहजच अज्ञान नष्ट होते. हेच ते मोक्ष मिळवून देणारे ब्रह्मज्ञान होय. 
आपणासि वोळखों जातां । आंगी बाणे सर्वज्ञता ।
तेणें येकदेसी वार्ता । निशेष उडे ॥ २० ॥
२०) आपल्यामधील खरा मी कोण आहे याचा विचार करता, आत्मज्ञान होते. आात्मा सर्वव्यापी असल्यानें आपण आत्मज्ञानामुळें सर्वज्ञ होतो. सर्व ठिकाणी मीच व्यापून आहे आसा अनुभव आल्याने देहापुरताच मी आहे ही आकुंचित वृत्ती लोप पावते.
मी कोण ऐसा हेत । धरुन पाहातां देहातीत ।
आवलोकितां नेमस्त । स्वरुपचि होये ॥ २१ ॥
२१) " मी कोण आहे " आसा हेतु मनांत बाळगुन जर आपण शोध घेऊ लागलो तर खरा मी देहाच्या पलीकडे आहे असा अनुभव येतो. देहाच्या पलीकडे असलेल्या मीला पाहता पाहता आपण निश्र्चितपणे आत्मस्वरुपच होतो.  
असो पूर्वी थोर थोर । जेणें ज्ञाने पैलपार ।
पावले ते साचार । ऐक आतां ॥ २२ ॥
२२) असो. पूर्वीचे खरे थोर पुरुष ज्या ज्ञानाने संसारांतून पार पडले, ते आता ऐका. 
व्यास वसिष्ठ माहामुनी । शुक नारद समाधानी ।
जनकादिक माहांज्ञानी । येणेंचि ज्ञानें ॥ २३ ॥
२३) महामुनि वसिष्ठ आणि व्यास, समाधानी शुक आणि नारद, महाज्ञानी जनकादिक या आत्मज्ञानाने मोठेपणास पोहोचलें.     
वामदेवादिक योगेश्र्वर । वाल्मीक अत्रि ऋषेश्र्वर ।
शोनिकादि अध्यात्मसार । वेदांतमतें ॥ २४ ॥
२४) वामदेवादि योगेश्र्वर, वाल्मिकि, अत्री ऋषीश्र्वर, शौनकादि हे सर्व वेदान्त तत्वज्ञााचे रहस्य जें आत्मज्ञान त्यानेंच परमपदाला पोहोचलें. 
सनकादिक मुख्य करुनी । आदिनाथ मीन गोरक्षमुनी ।
आणीक बोलतां वचनी । अगाध असती ॥ २५ ॥
२५) सनकादि थोर ज्ञानी आणि आदिनाथ, मीननाथ, गोरक्षनाथ हे नाथपंथीय योगी आणखी असंख्य महात्मे आत्मज्ञानानेच समाधानी झाले.  
सिद्ध मुनी माहानुभाव । सकळांचा जो अंतर्भाव ।  
जेणें सुखें माहादेव । डुल्लत सदा ॥ २६ ॥
२६) मोठमोठे सिद्ध, मुनि, आणि माहानुभाव या सर्वांच्या अंतरंगांत जी अवस्था म्हणजेच आत्मज्ञान. ज्या ज्ञानाच्या आनंदाने महादेवही निरंतर डोलत असतो. 
जें वेदशास्त्रांचे सार । सिद्धांतधादांत विचार ।
ज्याची प्राप्ती भाग्यानुसार । भाविकांस होये ॥ २७ ॥
२७) जें आत्मज्ञान वेदशास्त्रांचे तात्पर्य आहे, जें योग्य प्रमाणांनी निश्र्चित केलेले आहे, जें साक्षात् अनुभवाला येते. आणि जें अति सूक्ष्म विचारांती योग्य ठरतें,  तें आत्मज्ञान श्रद्धावंतांना त्याच्या भाग्याप्रमाणे प्राप्त होते.
साधु संत आणी सज्जन । भूत भविष्य वर्तमान ।
सर्वत्रांचें गुह्य ज्ञान । तें सांगिजेल आतां ॥ २८ ॥
२८) पूर्वी होऊन गेलेले, सध्या हयात असलेले, व पुढें होणारे सर्व साधुसंत आणि सज्जन यांचें  गुप्त असलेले असें जें आत्मज्ञान, तें आतां मी सांगतो. 
तीर्थे व्रतें तपें दानें । जें न जोडे धूम्रपानें ।
पंचाग्नी गोरांजनें । जें प्राप्त नव्हे ॥ २९ ॥
२९) तीर्थयात्रा, व्रतें, तप, दान, धुम्रपान, पंचाग्नि साधन, गोरांजनें या साधनांनी आ्मज्ञान प्राप्त होत नाही. 
सकळ साधनाचें फळ । ज्ञानाची सिगचि केवळ ।
जेणे संशयाचें मूळ । निशेष तुटे ॥ ३० ॥
३०) आत्मज्ञान हेंच सगळ्या परमार्थसाधनेचे फळ आहे. तेंच ज्ञानाची परमावधि आहे. त्यामुळें संशयवृत्तीचे मूळच नष्ट होते.
छपन्न भाषा तितुके  ग्रंथ । आदिकरु वेदांत ।
या इतुकियां गहनार्थ । येकचि आहे ॥ ३१ ॥
३१) जगांत कितीतरी भाषा आहेत. प्रत्येक भाषेमध्यें कितीतरी ग्रंथ आहेत. या सर्वांचा खोल अर्थ एकच आहे. आणि तो म्हणजे आत्मज्ञान होय. 
जें नेणवे पुराणीं । जेथें सिणल्या वेदवाणी ।
तेंचि आतां येचि क्षणीं । बोधीन गुरुकृपें ॥ ३२ ॥
३२) पुराणांचा अभ्यास करुन आत्मज्ञान प्राप्त होत नाही. तें ज्ञान सांगतांना वेद थकले. असें आत्मज्ञान आतां या क्षणीं गुरुकृपेने समजावून देतो. 
पाहिलें नस्तां संस्कृतीं । रीग नाहीं मर्‍हाष्ट ग्रंथी ।
हृदईं वसल्यां कृपामूर्ती । सद्गुरुस्वामी ॥ ३३ ॥
३३) श्री समर्थ सांगतात की, संस्कृत ग्रंथांत काय आहे ते आपण पाहिले नाही. मराठी ग्रंथांत आपला प्रवेश नाही. पण आपल्या हृदयांत सद्गुरुस्वामीची कृपामूर्ति मात्र स्थिरपणें राहिली आहे.
आतां न लगे संस्कृत । अथवा ग्रंथ प्राकृत ।
माझा स्वामी कृपेसहित । हृदईं वसे ॥ ३४ ॥
३४) आतां संस्कृत किंवा प्राकृत ग्रंथाची गरज काय ? माझा स्वामी कृपेचा वर्षाव करीत माझ्या हृदयांत बसलेला आहे.   
न करितां वेदाभ्यास । अथवा श्रवण सायास ।
प्रेत्नेंविण सौरस । सद्गुरुकृपा ॥ ३५ ॥    
३५) वेदांचा अभ्यास न करतां, अथवा श्रवणाचे कष्ट न घेतां, मला अगदी प्रयत्नांवाचून सद्गुरुकृपा लाभली आहे.  
ग्रंथ मात्र मर्‍हाष्ट । त्याहून संस्कृत श्रेष्ठ ।
त्या संस्कृतामधें पष्ट । थोर तो वेदांत ॥ ३६ ॥
३६) मराठी भाषेंत ग्रंथ आहेत. पण संस्कृतमधले ग्रंथ त्याहून श्रेष्ठ आहेत. त्या संस्कत ग्रंथामधेही वेदांतावरील ग्रंथ सर्व श्रेष्ठ आहेत.  
त्या वेदांतापरतें कांहीं । सर्वथा श्रेष्ठ नाही ।
जेथें वेदगर्भ सर्व ही । प्रगट जाला ॥ ३७ ॥
३७) वेदान्तापेक्षां दुसरें कांहीं श्रेष्ठ नाही. कारण वेदांचे सारें रहस्य वेदान्तामध्ये प्रगट झाले आहे. 
असो ऐसा जो वेदांत । त्या वेदांताचा हि मथितार्थ ।
अति गहन जो परमार्थ । तो तूं ऐक आतां ॥ ३८ ॥
३८) असो. अशा वेदान्ताचा जोतात्पर्यार्थ आहे. तसेच अति गहन जो परमार्थ आहे. तो आतां तूं ऐक. 
अरे गहनाचें ही गहन । तें तूं जाण सद्गुरुवचन ।
सद्गुरुवचनें समाधान । नेमस्त आहे ॥ ३९ ॥
३९) अतिशय खोल व अर्थगंभीर असें फक्त सद्गुरु वचनच आहे. या वचनाने निश्र्चित समाधान मिळते.
सद्गुरुवचन तोचि वेदांत । सद्गुरुवचन तोचि सिद्धांत ।
सद्गुरुवचन तोचि धादांत । सप्रचीत आतां ॥ ४० ॥  
४०) सद्गुरुवचन म्हणजेच खरा वेदान्त व तोच सिद्धान्तही आहे. तें वचन हेंच प्रत्यक्ष अनुभविलेले ज्ञान होय.
जें अत्यंत गहन । माझ्या स्वामीचें वचन ।
जेणें माझे समाधान । अत्यंत जालें ॥ ४१ ॥
४१) माझ्या सद्गुरुचे जे वचन आहे तें अतिशय खोल अर्थाने भरलेले आहे. त्या वचनानें माझे पूर्ण समाधान झालें. 
तें हे माझें जीवीचें गुज । मी सांगैन म्हणतो तुज ।
जरी अवधान देसी मज । तरी आतां ये ची क्षणीं ॥ ४२ ॥
४२) तें वचन माझ्या जीवाचे रहस्य आहे. तें मी तुला सांगेन. माझ्या सांगण्याकडे तूं लक्ष दिलेस तर तें याच क्षणीं तुला सांगतो. 
शिष्य म्लान्यवदनें बोले । धरिले सदृढ पउलें । 
मग बोलों आरंभिलें । गुरुदेवें ॥ ४३ ॥
४३) शरणागत होऊन शिष्याने श्री समर्थांचे पाय घट्ट धरले. आणि तो दीनमुखानें म्हणाला की, मी अगदी लक्षपूर्वक ऐकतो. मग गुरुदेवांनी सांगण्यास सुरवात केली.   
अहं ब्रह्मास्मि माहांवाक्य । येथीचा अर्थ अतर्क्यें । 
तो ही सांगतो ऐक्य । गुरुशिष्य जेथें ॥ ४४ ॥
४४) " अहं ब्रह्मास्मि " हें महावाक्य आहे. मी ब्रह्म आहे असा त्याचा अर्थ आहे. या अर्थाचे रहस्य तर्काने समजणार नाही. तें मी समजावून सांगतो. त्या अर्थामध्यें गुरु व शिष्य दोघे एक होऊन जातात. 
ऐक शिष्या येथीचे वर्म । स्वयें तूंचि आहेसि ब्रह्म ।
ये विषईं संदेह भ्रम । धरुंचि नको ॥ ४५ ॥
४५) शिष्या या महावाक्यांतील मर्म ऐक. तूं स्वतः ब्रह्मरुप आहेस. याबद्दल किंचितही संशय बाळगु नकोस. त्याविषयीं भ्रम धरु नकोस.
नवविधा प्रकारें भजन । त्यांत मुख्य तें आत्मनिवेदन ।
तें समग्र प्रकारें कथन । कीजेल आतां ॥ ४६ ॥
४६) भक्तीचे नऊ प्रकार मागें सांगितले. त्यापैकी आत्मनिवेदन हा मुख्य भक्तीचा प्रकार आहे. तें आतां संपूर्णपणें वर्णन करतो. 
निर्माण पंचभूतें यीयें । कल्पांतीं नासतीं येथान्वयें ।
प्रकृति पुरुष जीयें । ते ही ब्रह्म होती ॥ ४७ ॥ 
४७) विश्व निर्माण होते तेव्हा पंचमहाभूतें क्रमाने निर्माण होतात. व विश्वाच्या कल्पान्ती तीही त्याच क्रमाने नष्ट होतात. इतकेंच नव्हे तर उरणारी प्रकृति आणि पुरुष तीं देखिल परब्रह्मांत विलीन होतात.
दृश्य पदार्थ आटतां । आपणहि नुरे तत्वतां । 
ऐक्यरुपें ऐक्यता । मुळींच आहे ॥ ४८ ॥
४८) अशा रीतीने सर्व दृश्य वस्तु नाश पावल्या म्हणजे वास्तविक मी पणाने वावरणारा मी देखील उरत नाही. कारण मुळांतच परमात्मा एकरुप असल्यानें एकरुप होण्यास निराळें कांहीं करावेंच लागत नाही. 
सृष्टीची नाहीं वार्ता । तेथें मुळींच ऐक्यता ।
पिंड ब्रह्मांड पाहो जातां । दिसेल कोठें ॥ ४९ ॥
४९) सर्व सृष्टी मूळ स्वरुपांत विलीन झाल्यावर मग ते एकस्वरुप ब्रह्मच तेवढें उरते. त्यामध्येम पिंड व ब्रह्मांड यांना पहावयाचे म्हटले तरी ते आढळणार नाहीत. 
ज्ञानवन्ही प्रगटे । तेथे दृश्य केर आटे ।
तदाकारें मूळ तुटे । भिन्नत्वाचें ॥ ५० ॥
५०) ज्ञानाचा वन्ही पेटला म्हणजे दृश्याचा केरकचरा संपूर्ण जळून नष्ट होतो. ज्ञाता स्वतः ज्ञानरुप झाल्यावर वेगळेपणाचें मूळच जळून जातें.
मिथ्यत्वें वृत्ति फिरे । तों दृश्य असतांच वोसरे ।
सहजचि येणें प्रकारें । जालें आत्मनिवेदन ॥ ५१ ॥
५१) आपल्या इंद्रियांना दिसणारे दृश्य विश्व हें खोटे आहे हे पटले की वृत्ती पालटून हृदयांतील आत्मस्वरुपाकडे धांव घेऊ लागली कीं, दृश्य असोोन सुद्धा नसल्यासारखें होते व आपॉपच आत्मनिवेदन होते.  
असो गुरुचे ठाईं अनृदयांन्यता । तरी तुज कायेसी रे चिंता ।
वेगळणे अभक्त । उरेंचि नको ॥ ५२ ॥
५२) असो, जो शिष्य आपल्या गुरुशी अनन्य असतो त्याला आत्मनिवेदनाची काळजी करण्याचे कारण नसते. शिष्याचे जीवन सद्गुरुमय झाल्यानें आत्मनिवेदनासाठी आणखी वेगळें काहीं करावे लागत नाही. 
आतां हेंचि दृढीकर्ण । व्हावया करी सद्गुरुभजन ।
सद्गुरुभजनें समाधान । नेमस्त आहे ॥ ५३ ॥
५३) असें आत्मनिवेदन एकदम साधत नाही. तें दृढ होऊन अनुभवास येण्यासाठी सद्गुरुचें चरित्र, गुण, महिमा, रुप इत्यादिंचे वारंवार चिंतन करावयास हवे. त्यांच्या वचनांची आठवण करुन त्यांचा अर्थ पुनः पुनः मनांत घोळवावयास हवा. अशा प्रकारचें सद्गुरुचे भजन केलें तर निश्र्चितपणें समाधान मिळते. 
या नाव शिष्या आत्मज्ञान । येणें पाविजे समाधान ।
भवभयाचें बंधन । समूळ मिथ्या ॥ ५४ ॥
५४) शिष्या, यालाच आत्मज्ञान असें म्हणतात. त्यामुळें समाधान मिळतें. संसारांतील भीति व काळजी यांचे बंधन मूळापासून नष्ट होते. 
देह मी वाटे ज्या नरा । तो जाणावा आत्महत्यारा ।
देहाभिमानें येरझारा । भोगिल्याच भोगी ॥ ५५ ॥
५५) मी देहच आहे असे वाटणारा माणूस आत्मघातकी असतो. देहाभिमानाने त्या जन्ममरणाच्या येरझारा सतत भोगाव्या लागतात.
असो चहूं देहावेगळा । जन्मकर्मासी निराळा ।
सकळ आबाळगोबळा । सबाह्य तूं ॥ ५६ ॥
५६) खरा मी आत्मरुप आहे. म्हणून " मी " स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण या चार देहांहून वेगळा आहे. त्या " मी" ला जन्ममरण नाही. कर्माचा स्पर्श नाही. या सगळ्या दृश्यरुप खिचडीला मी आंतबाहेर व्यापून आहे. तो मी म्हणजे आत्मा तूंच आहेस. 
कोणासीच नाहीं बंधन । भ्रांतिसव भुलले जन ।
दृढ घेतला देहाभिमान । म्हणौनियां ॥ ५७ ॥ 
५७) खर्‍या ज्ञनदृष्टीनें पाहिलें तर कोणाही जीवाला बंधन नाही. मी बांधलेला आहे असें अज्ञानामुळें वाटते. तो भ्रम आहे व त्यानें लोक भुलले आहेत. मी देहच आहे हा देहाभिमान घट्ट धरुन ठेवल्यानें मी बांधलेला आहे हा भ्रम निर्माण होतो. व जीवाला भुलवून टाकतो.       
शिष्या येकांती बैसावें । स्वरुपीं विश्रांतीस जावें ।
तेणें गुणें दृढावे । परमार्थ हा ॥ ५८ ॥
५८) या भ्रमांतुन सुटण्यासाठी एक उपाय करावा. आपण एकांतांत बसावें व स्वस्वरुपांत लीन व्हावें. तेथें विसावा घ्यावा. हा अभ्यास करीत गेल्यास परमार्थ स्थिर होतो. आत्मज्ञानाचा उत्कर्ष होतो. 
अखंड घडे श्रवण मनन । तरीच पाविजे समाधान ।
पूर्ण जालियां ब्रह्मज्ञान । वैराग्य भरे आंगीं ॥ ५९ ॥
५९) परमार्थाचे अखंड स्मरण व श्रवण करीत राहीले तरच समाधान मिळते. अज्ञान संपूर्णपणे नाहीसे होऊन ब्रह्मज्ञान पूर्णतेला पोहोचते. अंगांत वैराग्य भरुन जाते. दृश्याबद्दल थोडीही वासना मनांत उरत नाही.  
शिष्या मुक्तपणें अनर्गळ । करिसी इंद्रियें बाष्कळ । 
तेणें तुझी तळमळ । जाणार नाहीं ॥ ६० ॥
६०) शिष्या, कोणतेही बंधन न घालतां इंद्रियांना मनसोक्त भोग भोगून दिले तरी मनाची तळमळ शांत होणार नाही.   
विषईं वैराग्य उपजलें । तयासीच पूर्ण ज्ञान जालें ।
मणी टाकितांची लाधलें । राज्य जेवीं ॥ ६१ ॥
६१) इंद्रियांचे भोग समाधान देत नाहीत. हे उमजून ज्याचे मन विरक्त बनते तेव्हां पूर्ण आत्मज्ञान प्राप्त होते. उदा. एका माणसानें मनी टाकला तेव्हां गेलेले राज्य त्याला परत मिळाले.  
मणी होता सीगटाचा । लोभ धरुनियां तयाचा ।
मूर्खपणें राज्याचा । अव्हेर केला ॥ ६२ ॥
६२) एका राजाने शिंगाच्या मण्याच्या लोभाने राज्य देऊन टाकले पण मण्याचा काहींच उपयोग नाही हे लक्षांत येतांच त्यानें तो मणी परत देऊन टाकला व आपले राज्य परत घेतले. 
ऐक शिष्या सावधान । आतां भविष्य मी सांगेन ।
जया पुरुषास जें ध्यान । तयासि तेंचि प्राप्त ॥ ६३ ॥
६३) शिष्या आतां तुला मी एक निश्र्चित भविष्य सांगतो तें ऐक. माणसाला ज्या गोष्टीचा ध्यास लागतो तीच गोष्ट त्याला मिळते.  
म्हणोनि जे अविद्या । सांडून धरावी सुविद्या ।
तेणें गुणें जगद्वंद्या । पाविजे सीघ्र ॥ ६४ ॥  
६४) म्हणून आपण अविद्या सोडावी व सद्विद्या धरावी. भगवंताच्या किंवा आत्मस्वरुपाच्या नादीं लागावे. आत्मज्ञान झाल्यावर जगाला वंद्य होण्याची योग्यता येण्यास वेळ लागत नाही.  
सन्यपाताचेनि दुखे । भयानक दृष्टीस देखे ।
औषध घेतांचि सुखें । आनंद पावे ॥ ६५ ॥
६५) सन्निपात ज्वर मोठा दोषी असतो. त्यामध्यें रोग्याला भ्रम होतो. मग कांहींतरी भयंकर दृश्यें त्याला दिसूं लागतात. पण योग्य औषधोपचार झाल्यावर ताप उतरुन त्याचा भ्रम नाहींसा होतो. मग तो खरा आनंद भोगतो.    
तैसें अज्ञानसन्यपातें । मिथ्या दृष्टीस दिसतें । 
ज्ञान औषध घेतां तें । मुळींच नाहीं ॥ ६६ ॥
६६) त्याचप्रमाणें अज्ञानरुप सन्निपातानें जीवाला भ्रम होतोआणि मग कांहींतरी भलतेंच व खोटे दृश्य दिसूं लागते. त्यावर आत्मज्ञानाचें औषध घेतलें कीं अज्ञान नाहीसें होते. मग आपल्याला जें दृश्य दिसत  होते तें मुळांतच नव्हतें असा प्रत्यक्ष अनुभव येतो.   
मिथ्या स्वप्नें वोसणाला । तो जागृतीस आणिला ।  
तेणें पूर्वदशा पावला । निर्भय जे ॥ ६७ ॥
६७) एका झोपी गेलेल्या माणसाला भयंकर स्वप्न पडले. तो घाबरुन ओरडू लागला. तेव्हां त्याला लोकांनी जागे केले त्यामुळे जागा झाल्यावर तो परत पहिल्यासारखा निर्भय झाला.   
मिथ्याच परी सत्य वाटलें । तेणें गुणें दुःख जालें ।
मिथ्या आणी निरसलें । हें तों घडेना ॥ ६८ ॥
६८) त्याला पडलेलें स्वप्न खोटें होतें. पण त्याला तें खरें वाटलें त्यामुळें त्याला दुःख झाले. जें खोटें असतें त्याचें संपूर्ण निरसन कधीच होत नसतें. त्याचा कांहींतरी परिणाम उरतोच. 
मिथ्या आहे जागृतासी । परी वेढा लाविलें निद्रिस्तांसी ।
जागा जालियां तयासी । भयेचि नाहीं ॥ ६९ ॥
६९) जो जागा असतो त्याला स्वप्न खोटें असतें. जो झोपलेला असतो त्याला तें सर्व बाजूनीं वेढून टाकते. तोच माणूस जागा झाला म्हणजे त्याला भीति उरत नाही.  
परी अविद्याझोंप येते भरें । भरे सर्वांगीं काविरें ।
पूर्ण जागृती श्रवणद्वारें । मननें करावी ॥ ७० ॥
७०) ज्यावेळी अविद्यारुप झोप जीवाला भुलवून झोपच घालते त्यावेळी दृश्याची वाईट स्वप्ने त्यास पडतात, त्यामुळें तो घाबरतो व भयाने त्याचें सर्व शरीर कांपू लागते. या अविद्यारुप झोपेंतून संपूर्ण जाग येण्यास सारखें श्रवण व मनन केल्यास दृश्याचे भय नाहीसेम होते.  
जागृतीची वोळखण । ऐक तयाचें लक्षण ।
जो विषईं विरक्त पूर्ण । अंतरापासुनी ॥ ७१ ॥
७१) जागेपणीं कसें ओळखावें त्याची खूण सांगतो. तीं ऐकावी. जो अगदी मनापासून इंद्रियभोगांविषयीं पूर्ण विरक्त आहे तो जागा झाला आहे असे ओळखावे.   
जेणें विरक्तीस न यावें । तो सावध ऐसे जाणावें ।
तेणें साधन करावें । थोरीव सांडुनि ॥ ७२ ॥
७२) ज्याला संपूर्ण विरक्ति साधली नाही त्याला साधक असे म्हणतात.  जगामधील आपलें मोठेपण सोडून त्यानें साधन करीत रहावें.  
साधन न मने जयाला । तो सिद्धपणें बद्ध जाला ।
त्याहुनि मुमुक्षु भला । ज्ञानाधिकारी ॥ ७३ ॥
७३) ज्याला साधन करावेसे वाटत नाहीं तो सिद्धपणाच्या अभिमानानें बांधला जातो. अशा अहंकारी सिद्धापेक्षां मुमुक्षु केव्हांही चांगला कारण त्याला ज्ञानाची तळमळ असल्यानें तो ज्ञानाचा अधिकारी असतो.  
तंव शिष्यें केला प्रश्र्न । कैसें बद्धमुमुक्षाचें लक्षण ।
साधन सिद्ध वोळखण । कैसी जाणावी ॥ ७४ ॥ 
७४) हें ऐकून शिष्याने प्रश्न केला कीं, बद्ध व मुमुक्षु यांचे लक्षण काय ? साधक आणि सिद्ध कसें ओळखावें?  
याचें उत्तर श्रोतयांसि । दिधलें पुढिलीये समासीं ।
सावध श्रोतीं कथेसी । अवधान द्यावें ॥ ७५
७५) सद्गुरु म्हणाले कीं, या प्रश्नाचे उत्तर पुढील समासांत दिलें आहें. तें वर्णन सावध श्रोत्यानीं लक्ष देऊन ऐकावें. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे शुद्धज्ञाननिरुपणनाम समास सहावा ॥ 
Samas Sahava ShuddhaDnyana Nirupan
समास सहावा शुद्धज्ञान निरुपण 


Custom Search
Post a Comment