Thursday, July 20, 2017

Samas Aatava Mumukshu Lakshan समास आठवा मुमुक्षुलक्षण


DashakPachava Samas Aatava Mumukshu Lakshan 
Samas Aatava Mumukshu Lakshan. It is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about Mumukshu. Who is Mumukshu? To know that we can think of a person who is completely absorbed in Prapancha, Now he is repenting and talking about Parmartha. He now came to know his bad virtues, his bad karmas, his bad behaviour with the people, Santa, Good people. He now thinks of Parmartha. Now here in this Samas who is called as Mumukshu, is described in this Samas by Samarth Ramdas.
समास आठवा मुमुक्षुलक्षण 
श्रीराम ॥
संसारमदाचेनि गुणें । नाना हीनें कुलक्षणें ।
जयाचेनि मुखावलोचनें । दोषचि लागे ॥ १ ॥
१) बद्ध माणूस संसाराच्या मदानें धुंद असतो. त्याच्या अंगीं अनेक हीन व वाईट लक्षणें उत्पन्न होतात. त्याच्या मुखावलोकनानें दोषच लागतो.
ऐसा प्राणी जो कां बद्ध । संसारी वर्तता अबद्ध ।
तयास प्राप्त झाला खेद । काळांतरीं ॥ २ ॥
२) असा बद्ध समसारंत मनसोक्त वागत असतो. काळांतरानें त्याच्यावर दुःखाचे खेदाचे प्रसंग ओढवतात.
संसारदुःखें दुखावला । त्रिविध तापें पोळला ।
निरुपणें प्रस्तावला । अंतर्यामीं ॥ ३ ॥
३) संसारांतील दुःखाने तो पीडतो. अनेक प्रकारच्या संकटांनीं तो पोळतो. सत्पुरुषाचा उपदेश ऐकून मग अंतर्यामी तो पस्तवतो. 
जाला प्रपंची उदास । मनें घेतला विषयत्रास ।
म्हणे आतां पुरे सोस । संसारींचा ॥ ४ ॥
४) त्याला प्रपंचाचा कंटाळा येतो. मनापासून विषयभोगाचा ताप वाटतो. संसाराचा सोस पुरें झाला असें त्याला वाटू लागते.   
प्रपंच जाईल सकळ । येथील श्रम तो निर्फळ ।
आतां कांहीं आपुला काळ । सार्थककरुं ॥ ५ ॥
५) हा तात्पुरता असलेला सर्व प्रपंच नाहींसा होईल. त्यासाठीं घेतलेले श्रम फुकट जातील. म्हणून आतां कांहीं आपला काळ सार्थकी लावू.   
ऐसी बुद्धि प्रस्तावली । पोटीं आवस्ता लागली ।
म्हणे माझी वयेसा गेली । वेर्थचि आवघी ॥ ६ ॥
६) अशा रीतीनें त्याच्या बुद्धीला पश्र्चाताप होतो. व मनाला तळमळ लागते. त्याच्या मनांत येऊ लागते कीं, अतांपर्यतचे आपलें सर्व आयुष्य फुकट गेले. 
पूर्वीं नाना दोष केले । ते अवघेचि आठवले ।
पुढें येऊनि उभे ठेले । अंतर्यामीं ॥ ७ ॥
७) पूर्वीं जी नाना दुष्कृत्यें केली ती त्याला आठवू लागतात. ते सर्व त्याला अंतर्यामी दिसूं लागते. 
आठवे येमाची यातना । तेणे भयेचि वाटे मना । 
नाहीं पापासि गणना । म्हणौनियां ॥ ८ ॥
८) आतां त्याला यम यातना आठवू लागतात. त्यामुळे मन भीतिग्रस्त होते. कारण अगणित अशी पापे त्यानें केलेली असतात. 
नाहीं पुण्याचा विचार । जाले पापाचे डोंगर ।
आतां दुस्तर हा संसार । कैसा तरों ॥ ९ ॥
९) आयुष्यांत कधी पुण्याचा विचार केला नाही. पापाचे डोंगर मात्र रचले. आतां हा अवघड संसार कसा तरावा?  
आपले दोष आछ्यादिले । भल्यांस गुणदोष लाविले ।
देवा म्यां वेर्थच निंदिले । संत साधु सज्जन ॥ १० ॥
१०) त्याला समजू लागते कीं, स्वतःचे दुर्गुण लपवून ठेऊन त्यानें उगाचच भल्या माणसांना वाईट ठरविले. हे देवा मी उगाचच साधु संतांची निंदा केली. 
निंदे ऐसे नाहीं दोष । ते मज घडले कीं विशेष ।
माझें अवगुणीं आकाश । बुडों पाहे ॥ ११ ॥
११) निंदेसारखें पातक नाहीं आणि तेंच माझ्याकडून पुष्कळ घडलें आहे. माझें अवगुण इतकें आहेत कीं, त्यांत आकाश बुडुन जाईल.   
नाहीं वोळखिले संत । नाहीं अर्चिला भगवंत ।
नाहीं अतित अभ्यागत । संतुष्ट केले ॥ १२ ॥
१२) मी संतांना ओळखले नाहीं, भगवंतालची पूजा केली नाहीं, अतिथी, अभ्यागत यांना संतुष्ट केलें नाही.
पूर्व पाप वोढवलें । मज कांहींच नाहीं घडलें ।
मन आव्हाटीं पडिलें । सर्वकाळ ॥ १३ ॥
१३) मझ्या पूर्व पापाचें फळ म्हणून माझ्या कडून कांहींच चांगलें घडलें नाही. माझ्या मनाने मला नेहमी आडमार्गानें नेले.  
नाहीं कष्टविलें शेरीर । नाहीं केला परोपकार । 
नाहीं रक्षिला आचार । काममदें ॥ १४ ॥
१४) कामाच्या मदामुळें शरीराला कष्टविले नाही. काम परोपकार केला नाही. आचार, चांगलें वागणें केले नाही.  
भक्ति माता हे बुडविली ।  शांति विश्रांति मोडिली । 
मूर्खपणें म्यां विघडिली । सद्बुद्धि सद्वासना ॥ १५ ॥
१५) भक्तिरुपी माउलीला बुडवून टाकीली. शांतिरुपी विश्रांति मोडून टाकली. सद्बुद्धि, सद्वासना मूर्खपणाने बिघडवून टाकल्या. 
आतां कैसें घडे सार्थक । दोष केले निरार्थक ।
पाहों जातां विवेक । उरला नाहीं ॥ १६ ॥
१६) मी विनाकारण पापाचरण केले. त्यामुळें आतां सार्थक कसें होणार? आतां माझ्याजवळ विवेक असा उरलाच नाही.  
कोण उपाये करावा । कैसा परलोक पावावा ।
कोण्या गुणें देवाधिदेवा । पाविजेल ॥ १७ ॥
१७) आतां कोणता उपाय करावा? परमार्थ कसा साधावा? कोणत्या मार्गानें मला भगवंताची प्राप्ती होईल? 
नाहीं सद्भाव उपजला । अवघा लोकिक संपादिला ।
दंभ वरपंगें केला । खटाटोप कर्माचा ॥ १८ ॥
१८) कधीहि चांगला भाव माझ्यांत उद्भवलाच नाही. सगळें लौकिकाला चांगलें दिसावें म्हणून केले. कर्माचा खटातोप वरपांगी होता. तो दंभाचार होता.  
कीर्तन केलें पोटासाठीं । देव मांडिले हाटवटीं ।
आहा देवा बुद्धि खोटी । माझी मीच जाणे ॥ १९ ॥
१९) पोट भरण्यासाठीं किर्तन केलें. देव बाजारांत मांडिले. देवा माझी बुद्धि किती खोटी आहे ते मीच जाणतो. 
पोटीं धरुनि अभिमान । शब्दीं बोले निराभिमान ।
अंतरीं वांछूनियां धन । ध्यानस्त जालों ॥ २० ॥
२०) आंत अभिमान ठेवून बाहेर मात्र निराभिमानपणाच्या थापा मारत राहीलो. मनांत पैशाची वासना ठेवून ध्यानाचे सोंग केलें. 
वित्पत्तीनें लोक भोंदिले । पोटासाठीं संत निंदिले ।
माझे पोटीं दोष भरले । नाना प्रकारीचे ॥ २१ ॥
२१) शास्त्रांचे पांडित्य दाखवून लोकांनाफसविलें, पोट भरण्यासाठीं संतांची निंदा केली. असें अनेक दोष माझ्या अंतर्यामी भरलेलें आहेत.
सत्य तेंचि उछ्छेदिलें । मिथ्या तेंचि प्रतिपादिलें । 
ऐसें नाना कर्म केलें । उदरंभराकारणें  ॥ २२ ॥
२२) सत्य तें खोटें ठरविले, खोटे असलेले खरे म्हणून सांगितलें. अशी अनेक पापें पोट भरण्यासाठी केली. 
ऐसा पोटीं प्रस्तावला । निरुपणें पालटला ।
तोचि मुमुक्षु बोलिला । ग्रंथांतरीं ॥ २३ ॥
२३) अशा रीतीनें ज्याला खरा पश्र्चाताप होतो तो उपदेशानें अंतर-बाह्य बदलतो त्याला परमार्थ ग्रंथांमध्यें मुमुक्षु म्हटले आहे.  
पुण्यमार्ग पोटीं धरी । सत्संगाची वांछा करी । 
विरक्त जाला संसारीं । या नाव मुमुक्ष ॥ २४ ॥
२४) पुण्याचा मार्ग अनुसरतो, सतसंगाची इच्छा व तो धरतो आणि संसारापासून जो विरक्त होतो त्याला मुमुक्ष म्हणतात.
गेले राजे चक्रवती । माझें वैभव तें किती ।
म्हणे धरुं सत्संगती  ।  या नाव मुमुक्ष ॥ २५ ॥ 
२५) मोठेमोठे चक्रवर्ती राजे गेले. त्यांच्यापुढें माझे वैभव कांहींच नाही. असा विवेक उत्पन्न होऊन जो सन्मार्ग धरतो त्याला मुमुक्ष म्हणतात. 
आपुले अवगुण देखे । विरक्तिबळें वोळखे । 
आपणासि निंदी दुःखें । या नाव मुमुक्ष ॥ २६ ॥
२६) जो स्वतःचे दोष जाणु लागतो आणि विरक्तीच्या शक्तीने त्यांना बरोबर ओळखतो मग स्वतःच आपली निंदा करुन दुःख व्यक्त करतो त्याला मुमुक्ष म्हणुन जाणावा.    
म्हणे मी काये अनोपकारी । म्हणे मी काय दंभधारी ।
म्हणे मी काये अनाचारी । या नाव मुमुक्ष ॥ २७ ॥
२७) तो म्हणतो की, मी उपकार न करणारा, दंभानें वागणारा, अनाचार करणारा असें जो पश्र्चातापानें म्हणतो तो मुमुक्ष होय.
म्हणे मी पतित चांडाळ । म्हणे मी दुराचारी खळ ।
म्हणे मी पापी केवळ । या नाव मुमुक्ष ॥ २८ ॥
२८) तो म्हणतो भ्रष्ट, चांडाळ, दुराचारी, दुष्ट आणि पापी आहेहोय. असें जो पश्र्चातापानें म्हणतो तो मुमुक्ष 
म्हणे मी अभक्त दुर्जन । म्हणे मी हीनाहूनि हीन ।
म्हणे मी जन्मलों पाषाण । या नाव मुमुक्ष ॥ २९ ॥
२९) तो म्हणतो मी अभक्त, दुर्जन, हीनाहून हीन, जणूं कांहीं मी दगडच असें जो पश्र्चातापानें म्हणतो तो मुमुक्ष होय.
म्हणे मी दुराभिमानी । म्हणे मी तपीळ जनीं ।
म्हणे मी नाना वेसनी । या नाव मुमुक्ष ॥ ३० ॥
३०) मी दुराभिमानी आहे, लोक मला रागीट म्हणून ओळखतात. मी व्यसनी आहे असे जो पश्र्चातापाने म्हणतो तो मुमुक्ष होय.
म्हणे मी आळसी आंगचोर । म्हणे मी कपटी कातर ।
म्हणे मी मूर्ख अविचार । या नाव मुमुक्ष ॥ ३१ ॥ 
३१) मी आळशी, अंगचोर, कपटी, भित्रा, मूर्ख आणि अविचारी आहे. असे जो पश्र्चातापाने म्हणतो तो मुमुक्ष होय.
म्हणे मी निकामी वाचाळ । म्हणे मी पाषांडी तोंडाळ ।
म्हणे मी कुबुद्धि कुटिळ । या नाव मुमुक्ष ॥ ३२ ॥
३२) मी नालायक, बडबड्या, पाखंडी, तोंड टाकून बोलणारा, वाकड्या बुद्धीचा, आणि वाकड्या वृत्तीचा आहे. असे जो पश्र्चातापाने म्हणतो तो मुमुक्ष होय.  
म्हणे मी कांहींच नेणे । म्हणे मी सकळाहूनि उणें ।
आपलीं वर्णी कुलक्षणें । या नाव मुमुक्ष ॥ ३३ ॥ 
३३) मला कांहींच ज्ञान नाही. मी सगळ्यांहून मागे आहे. अशा रीतीनें जो स्वतःची वाईट लक्षणें सांगतो. तो मुमुक्ष होय.
म्हणे मी अनाधिकारी । म्हणे मी कुश्र्चिळ अघोरी ।
म्हणे मी नीच नानापरी । या नाव मुमुक्ष ॥ ३४ ॥
३४) तो अजुन म्हणतो कीं, मी सर्व बाबतींत अनाधिकारी, हीन कुलाचा, भयंकर वाईट कर्में करणारा, आणि अनेक प्रकारें नीच आहे. असे जो पश्र्चातापाने म्हणतो तो मुमुक्ष होय.
म्हणे मी काये आपस्वार्थी । म्हणे मी काये अनर्थी ।
म्हणे मी नव्हे परमार्थी । या नाव मुमुक्ष ॥ ३५ ॥
३५) मी अति स्वार्थी आहे. मी अनर्थ करणारा आहे. मी परमार्थी नाही. असे जो पश्र्चातापाने म्हणतो तो मुमुक्ष होय.
म्हणे मी अवगुणाची रासी । म्हणे मी वेर्थ आलों जन्मासी ।
म्हणे मी भार जालों भूमीसी । या नाव मुमुक्ष ॥ ३६ ॥
३६) मी अवगुणांची रास आहे. मी फुकट जन्मास आलो. मी या भूमीला भार झालो. असे जो पश्र्चातापाने म्हणतो तो मुमुक्ष होय. 
आपणास निंदी सावकास । पोटीं संसाराचा त्रास ।
धरी सत्संगाचा हव्यास । या नाव मुमुक्ष ॥ ३७ ॥
३७)  अशा प्रकारे जो भरभरुन स्वतःची निंदा करतो. संसाराचा ज्यास त्रास वाटतो, संसार नकोसा होतो, ज्याला सत्संगतीची इच्छा उत्पन्न होते, तो मुमुक्ष असतो. 
नाना तीर्थें धुंडाळिलीं । शमदमादि साधनें केलीं ।
नाना ग्रंथालये पाहिली । शोधूनियां ॥ ३८ ॥
३८) पुष्कळ तीर्थे फिरला, शमदमादि साधनांचा अभ्यास केला, नाना ग्रंथांचा अभ्यास केला, 
तेणें नव्हे समाधान । वाटे  अवघाच अनुमान ।
म्हणे रिघों संतांस शरण । या नाव मुमुक्ष ॥ ३९ ॥ 
३९) त्याने समाधान झालें नाही. हें सगळें बुद्धीचें अनुमान आहे. कल्पनेचा खेळ आहे असे समजले. हें ध्यानांत घेऊन संतांना जो शरण आला तो मुमुक्ष होय. 
देहाभिमान कुळाभिमान । द्रव्याभिमान नानाभिमान ।
सांडूनि संतचरणीं अनन्य । या नाव मुमुक्ष ॥ ४० ॥
४०) ज्यानें देहाभिमान, कुळाभिमान, द्रव्याभिमान असें सर्व अभिमान सोडून संतचरणीं जो अनन्य झाला, शरण आला तो मुमुक्ष होय.
अहंता सांडूनि दूरी । आपणास निंदी नानापरी ।
मोक्षाची अपेक्षा करी । या नाव मुमुक्ष ॥ ४१ ॥
४१) आपला अहंभाव बाजुला ठेवला, आपल्याला नाना प्रकारे नांवे ठेविली, स्वतःची निंदा केली, आणि आतां मोक्षाची अपेक्षा करतो तो मुमुक्ष होय.  
ज्याचें थोरपण लाजे । जो परमार्थकारणें झिजे ।
संतापाईं विश्र्वास उपजे । या नाव मुमुक्ष ॥ ४२ ॥
४२) ज्याला लौकिक मोठेपणाची लाज वाटते, जोपरमार्थासाठीं झीजतो, संताविषयीं ज्याला विश्र्वास वाटतो, त्याला मुमक्ष म्हणतात. 
स्वार्थसांडून प्रपंचाचा । हव्यास धरिला परमार्थाचा ।
अंकित होईन सज्जनाचा । म्हणे तो मुमुक्ष ॥ ४३ ॥
४३) ज्याचा संसाराचा स्वार्थ सुटतो, ज्याला परमार्थाची उत्कट इच्छा निर्माण होते, आणि मी संतांचा होऊन राहीन असे जो म्हणतो तो मुमुक्ष होय. 
ऐसा मुमुक्ष जाणिजे । संकेतचिन्हें  वोळखिजे ।
पुढें श्रोतीं अवधान दीजे । साधकलक्षणीं ॥ ४४ ॥ 
४४) या लक्षणांवरुन मुमुक्षूला जाणावें त्याला ओळखण्याची ही संकेतचिन्हें आहेत. आतां पुढील समासीं साधकाची लक्षणें सांगतो. श्रोत्यांनी ती लक्ष देऊन ऐकावीत. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
 मुमुक्षलक्षणनाम समास आठवा ॥
Samas Aatava Mumukshu Lakshan
समास आठवा मुमुक्षुलक्षण 


Custom Search
Post a Comment