Sunday, July 30, 2017

Samas Tisara Mayodbhav Nirupan समास तिसरा मायोद्भव निरुपण


Dashak Sahava Samas Tisara Mayodbhav Nirupan 
Samas Tisara Mayodbhav Nirupan. It is in Marathi. What we see is created by Maya and it not real, not true. The sky is there before creation of a pot. When pot is created it is also inside the pot and when the pot is broken the sky is still there. Just like that anything that is created by Maya is engulfed by Brahma which is true and real; Brahma is still there before creation and after destruction of anything. Brahma is permanent but it can’t be seen. When we understand this we achieve Moksha. All this is in this Samas Mayodbhav told by Samarth Ramdas.
समास तिसरा मायोद्भव निरुपण
श्रीराम ॥
निर्गुण आत्मा तो निर्मळ । जैसें आकाश अंतराळ ।
घनदाट निर्मळ निश्र्चळ । सदोदित ॥ १ ॥ 
१) गुणमय प्रकृतीच्या पलीकडे असणारा आत्मा निर्मळ आहे. आकाशाची पोकळी सदोदित भरीव, मळरहित व हालचाल नसलेली असते तसेंच आत्मा नेहमी निर्मळ, निश्र्चळ व घनदाट असतो.   
जें खंडलेंचि नाहीं अखंड । जें उदडांहूनि उदंड ।
जें गगनाहूनि वाड । आणि सूक्ष्म ॥ २ ॥
२) तें अखंड आहे. त्याचे तुकडे करता येत नाहीत. तें विशाळाहूनी विशाळ, आकाशाहूनि अधिक व्यापक व सूक्ष्म आहे.  
जें दिसेना ना भासेना । जें उपजेना ना नासेना ।
जें येयना ना जायना । परब्रह्म तें ॥ ३ ॥
३) तें दिसत नाही तसेंच भासत नाही. ते उत्पन्न होत नाही कां नाश पावत नाही. तें कोठेंहीं जात वा येत नाही. असे ते परब्रह्म आहे.
जें चळेना ना ढळेना । जें तुटेना ना फुटेना ।
जें रचेना ना खचेना । परब्रह्म तें ॥ ४ ॥
४) चळणें व ढळणें म्हणजे हे बदल होण्याचे दृश्याचे गुणधर्म त्यांत नाहीत. तें तुटत नाही वा फुटत नाही. त्याचे खचणें नाही वा त्याची रचना करणें शक्य नाही. असें तें परब्रह्म आहे. 
जें सन्मुखचि सर्वकाळ । जें निःकळंक आणि निखल ।
सर्वांतर आकाशपाताळ । व्यापूनि असे ॥ ५ ॥
५) तें सर्व ठिकाणी असते. तें समोरच असते. तें निःकलंक व निखळ शुद्ध आहे. आकाशपाताळ व्यापून असें तें सर्वांच्या अंतर्यामी असते.  
अविनाश तें ब्रह्म निर्गुण । नासे ते माया सगुण ।
सगुण आणि निर्गुण । कालवलें ॥ ६ ॥
६) कधीं नाश न होणारे तें ब्रह्म निर्गुणी आहे. जे नाशिवंत आहे ती माया आहे. म्हणजे हे आपल्या देहासगट दृश्य विश्र्व, हे सगुण आहे. मायेमधें सगुण व निर्गुण यांचे मिश्रण असते.  
या कर्दमाचा विचार । करुं जाणती योगेश्र्वर ।
जैसें क्षीर आणि नीर । राजहंस निवडिती ॥ ७ ॥
७) या सगुण व निर्गुण या मिश्रणाची बरोबर विचार करण्याची पद्धत थोर ज्ञानी पुरुष जाणतात. निर्गुण तेवढेंच सेवन करतात. जसेंकी राजहंस दूध व पाणी यांच्या मिश्रणांतून दूध वेगळे करुन तेवढेंच पीतो.   
जड सबळ पंचभूतिक । त्यामधें आत्मा व्यापक ।
तो नित्यानित्यविवेक । पाहातां कळे ॥ ८ ॥     
८) पंचमहाभूतांपासून जें जें निर्माण होते तें सर्व जड असते. त्यांत आत्मा अंतर्यामी व्यापून असतो. शाश्वत व अशाश्वत काय हें विवेक केल्यानें समजते.  
उसांमध्ये घेईजे रस । येर तें सांडिजे बाकस ।
तैसा जगामध्यें जगदीश । विवेकें वोळखावा ॥ ९ ॥
९) ऊसामधला फक्त रस तेवढा घेऊन चोथा टाकतात. तसाच दृश्य विश्र्वांतील परमात्मा तेवढा ओळखावा व बाकी दृश्य विश्र्व (टाकून) सोडून द्यावे.   
रस नासिवंत पातळ । आत्मा शाश्वत निश्र्चळ ।
रस अपूर्ण आत्मा केवळ । परिपूर्ण जाणावा ॥ १० ॥
१०) आत्मा रस आहे अशी कल्पना केली. पण रस पातळ व नाशिवंत आहे. यामुळें तो अपूर्ण आहे. तर आत्मा निश्र्चळ व शाश्वत आहे. म्हणून आत्मा परिपूर्ण आहे हे ओळखावे. 
आत्म्यासारिखें येक असावें । मां तें दृष्टांतासि द्यावें ।
दृष्टांतमिसें समजावें । कैसें तरी ॥ ११ ॥
११) या दृश्यामधें कोठचीही वस्तु आत्म्यासारखी नाही, तसेअसते तर त्यावरुन आत्मा कसा आहे हे सांगता आलें असते. म्हणुन रसाच्य दृष्टांताच्यायोगे आत्मा कसा तें समजून घ्यावे.  
ऐसी आत्मस्थिती संचली । तेथे माया कैसी जाली ।
जैसी आकाशीं वाहिली । झुळुक वायोची ॥ १२ ॥
१२) निव्वळ आत्मस्वरुप सगळीकडे भरुन राहीले असतां त्यामधे माया कशी निर्माण झाली. तर आकाशांत वार्‍याची एखादी झुळुक यावी तशी शुद्ध आत्मस्थितीमधें स्फुरणानें माया उत्पन्न झाली. 
वायोपासूनि तेज जाालें । तेजापासूनि आप निपजलें ।
आपापासूनि आकारलें । भूमंडळ ॥ १३ ॥ 
१३) वायूपासून अग्नि, अग्निपासून पाणी, पाण्यापासून पृथ्वी तयार झाली.   
भूमंडळापासूनि उत्पत्ती । जीव नेणों जाले किती ।
परंतु ब्रह्म आदिअंती । व्यापूनि आहे ॥ १४ ॥
१४) पृथ्वीपासून जीवसृष्टि निर्माण झाली. जीव अगणित निर्माण झाले.  परंतु सर्वाच्या आधी व शेवटी ब्रह्म मात्र व्यापून राहीले आहे. 
जें जें कांहीं निर्माण जालें । तें तें अवघेंचि नासलें ।
परी मूळीं ब्रह्म तें संचलें । जैसें तैसें ॥ १५ ॥
१५) जें जें निर्माण झालें तें तें सर्व नाश पावलें. परंतु मूळ ब्रह्म मात्र  जसेच्या तसेच राहीले. 
घटापूर्वीं आकाश असे । घटामधें आकाश भासे ।
घट फुटतां न नासे । आकाश जैसें ॥ १६ ॥
१६) एक घट तयार होण्याआधी आकाश असते. घट तयार झाल्यावरसुद्धा त्याच्या पोकळींत आकाश असते. घट फुटला तरी आकाश जसेच्या तसेंच राहते. 
तैसें परब्रह्म केवळ । अचळ आणी अढळ ।
मधें होता जाता सकळ । सचराचर ॥ १७ ॥
१७) तसेच परब्रह्म हे अचळ व अढळ आहे. त्याच्यामधेंच हें चराचर विश्र्व तयार होते व नाश पावते.  
जें जें कांहीं निर्माण जालें । तें तें आधींच ब्रह्में व्यापिलें ।
सर्व नाशतां उरलें । अविनाश ब्रह्म ॥ १८ ॥
१८) जें जें निर्माण झाले त्याला परब्रह्माने व्यापून टाकले तरी सर्व नाश पावल्यावरसुद्धा अविनाशी ब्रह्म शिल्लक राहीले. 
ऐसें ब्रह्म अविनाश । तेंचि सेविती ज्ञाते पुरुष ।
तत्वनिर्शनें आपणास । आपण लाभे ॥ १९ ॥
१९) असें जें कधीही नाश न पावणारे ब्रह्म आहे त्याचा ज्ञाते पुरुष आश्रय करतात. आणि दृश्याचा पूर्ण निरास केला कीं मग आपल्या खरा " मी " चा लाभ आपल्याला होतो.  
तत्वें तत्व मेळविलें । त्यास देह हें नाम ठेविलें ।
तें जाणते पुरुषीं शोधिलें । तत्वें तत्व ॥ २० ॥
२०) तत्वाला तत्व मिळून जो आकार तयार होतो त्याला देह म्हणतात. जाणते व विचारी लोक एका तत्वाचा आधार घेऊन इतर तत्वें शोधून काढतात.  
तत्वझाडा निशेष होतां । तेथें निमाली देहअहंता ।
निर्गुण ब्रह्मीं ऐक्यता । विवेकें जाली ॥ २१ ॥
२१) विनाशी तत्वें एकदा विरली म्हणजे मी देहच आहे ही भावना पण नाहींशी होते. अशा पद्धतीनें निर्गुण ब्रह्माशी विवेकानें जीवाला ऐक्य प्राप्त होते.  
विवेकें देहाकडे पाहिलें । तों तत्वें तत्व वोसरलें ।
आपण कांहीं नाहीं आलें । प्रत्ययासी ॥ २२ ॥
२२) विवेकानें जर देहाचा शोध तर एका विनाशी तत्वानें दुसरें विनाशी तत्व मावळतें व मी हा देहबुद्धिचा नाही असा अनुभव येतो. 
आपला आपण शोध घेतां । आपली तों माईक वार्ता ।
तत्वांतीं उरलें तत्वता । निर्गुण ब्रह्म ॥ २३ ॥
२३) आपण आपला शोध घेणें सुरु केले तर आपण भ्रमात्मक आहोंत हें समजते. अशारीतीनें तत्वांचा निरास झाला कीं खरें निर्गुण ब्रह्मच उरते. 
आपणाविण निर्गुण ब्रह्म । हेंचि निवेदनाचें वर्म । 
तत्वसरिसा गेला भ्रम । मीतूंपणाचा ॥ २४ ॥
२४) देह अहंता किंवा खोटा मी हा भ्रम जाऊन जें उरतें तें निर्गुण ब्रह्म होय. हेंच आत्मसमर्पणाचें वर्म समजावे. कारण विनाशीं तत्वें विरली कीं मी-तूं हा द्वैताचा भ्रम पण नाहींसा होतो.   
मी पाहातां आडळेना । निर्गुण ब्रह्म तें चळेना ।
आपण तेंचि परी कळेना । सद्गुरुविण ॥ २५ ॥
२५) " मी " म्हणून वावरणार्‍या अहंकाराचा शोध केला तर तो सांपडत नाही. निर्गुण ब्रह्मच अगदीं जसेंच्या तसें राहतें. पण आपण अगदी तेंच आहोंत हें सद्गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय कळत नाही.
सारासार अवघें शोधिलें । तों असार तें निघोन गेलें ।
पुढें सार तें उरलें । निर्गुण ब्रह्म ॥ २६ ॥
२६) या सर्व विश्र्वामधें तत्व कोणतें व भ्रम कोणता याचा शोध घेतला म्हणजे जें भ्रमरुप व खोटें असतें तें नाहीसें होते मग खरे तत्व जें ब्रह्म  सर्व व्यापून असते तेवढेंच उरते.  
आधीं ब्रह्म निरोपिलें । तेंचि सकळांमध्यें व्यापलें ।
सकळ आवघेंचि नासलें । उरलें तें केवळ ब्रह्म ॥ २७ ॥   
२७) आरं भी ब्रह्माचें वर्णन केलें. तेंच सर्व विश्र्वास व्यापून आहे हेहीं सांगितलें. तें विश्र्वही नाहींसे झालें की जें उरतें तें निव्वळ ब्रह्म होय.   
होतां विवेकें संव्हार । तेथें निवडे सारासार । 
आपला आपणासि विचार । ठांई पडे ॥ २८ ॥
२८) विवेकानें जगाचा शोध घेऊं लागलें कीं दृश्याचा निरास होतो. त्यामधून टिकणारे कोणते व तात्पुरतें कोणते याची आपोआप निवड होते. मग आपण खरें कोण याचा बोध आपल्या ठिकाणीं आपल्याला होतो.
आपण कल्पिलें मीपण । मीपण शोधितां नुरे जाण ।
मीपण गेलियां निर्गुण । आत्मा स्वयें ॥ २९ ॥
२९) आपल्याच कल्पनेनें आपण आपला मीपणा निर्माण केलेला असतो. विवेकानें त्याचा शोध केला तर तो उरत नाही. हा काल्पनिक मीपणा गेला की जो शुद्ध " मी " उरतो तेंच निर्गुण आत्मस्वरुप होय.
जालियां तत्वाचें निर्शन । निर्गुण आत्मा तोचि आपण ।
कां दाखवावें मीपण । तत्वनिर्शनाउपरी ॥ ३० ॥
३०) विनाशीं तत्वें विवेकानें नाहींशी केली कीं निर्गुण आत्मा तोच मी आहे असा साक्षात्कार होतो. विनाशीं तत्वें ओसरल्यावर देहाचा मी पणा वेगळेपणानें दाखवितां येणें शक्य नसतें. 
तत्वांमध्यें मीपण गेलें । तरी निर्गुण सहजचि उरलें ।
सोहंभावें प्रत्यया आलें । आत्मनिवेदन ॥ ३१ ॥
३१) तत्वें आणि मीपणा दोन्ही विनाशी व दृश्य असल्यानें तत्वांचा निरास झाला कीं मीपण त्याच बरोबर जाते. मग निर्गुण आत्मा तेवढा शिल्लक राहतो. त्यावेळीं " सोहं म्हणजे मी तोच आहे " अशा आत्मनिवेदनाचा अनुभव येतो.       
आत्मनिवेदन होतां । देवाभक्तांसी ऐक्यता ।
साचार भक्त विभक्तता । सांडूनि जाला ॥ ३२ ॥
३२) हें आत्मनिवेदन घडलें म्हणजे देव आणि भक्त एकरुप होऊन जातात. वेगळेपणा दूर सारुन भक्त देवाशी एकरुप होतो. 
निर्गुणासी नाहीं जन्ममरण । निर्गुणासी नाहीं पापपुण्य ।
निर्गुणीं अनन्य होतां आपण । मुक्त जाला ॥ ३३ ॥
३३) निर्गुण स्वरुपाला जन्ममरण नाही. पाप पुण्य नाही. जो निर्गुणाशीं समरस होतो तो मुक्त होतो.
तत्वीं वेटाळून घेतला । प्राणी संशयें गुंडाळला ।
आपणासी आपण भुलला । कोहं म्हणे ॥ ३४ ॥
३४) जीव विनाशीं तत्वांनीं वेढून असतो. त्यामुळें तो संशयाच्या चक्रांत अडकतो. मग स्वतःच स्वस्वरुप विसरतो. आणि कोहं म्हणजे मी कोण आहे असें विचारु लागतो.    
तत्वीं गुंतला म्हणे कोहं । विवेक पाहातां म्हणे सोहं ।
अनन्य होतां अहं सोहं । मावळलीं ॥ ३५ ॥
३५) जीव जोपर्यंत तत्वांमध्यें गुरफटलेला असतो तोपर्यंत मी कोण आहे असें विचारतो. विवेकानें शोध घेऊन तत्वांमध्यें निरसन झालें कीं " मी तोच आहे " असा जीवाला अनुभव येतो. अखेर आत्मस्वरुपाशी एकरुप होऊन मी व तूं हा भेद उडाला कीं अहं सोहं भूनिका उरत नाही. 
याउपरी उर्वरित । तेंचि स्वरुप संत ।
देहीं असोनि देहातीत । जाणिजे ऐसा ॥ ३६ ॥
३६) अशा रीतीनें सर्व अवस्थांच्या पलीकडे जेम निव्वळ स्वरुप असतें तें संत बनून राहतात. देहांत दिसला तरी देहाच्या पलीकडे राहणारा असा तो असतो. हें ओळखावें. 
संदेहवृत्ति ते न भंगे । म्हणोनि बोलिलेंचि बोलावें लागे ।
आम्हासी हें घडलें प्रसंगें । श्रोतीं क्ष्मां करावें ॥ ३७ ॥
३७) साधकाची संशयवृत्ती एकदम नाहीशीं होत नाही. म्हणून पुनःपुनः तेंच तें सांगावें लागतें. हा विषय सांगण्यासाठी मी असें केले म्हणून श्रोत्यांनी मला क्षमा करावी.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे मायोद्भवनाम समास तिसरा ॥ 
Samas Tisara Mayodbhav  Nirupan
समास तिसरा मायोद्भव निरुपण 


Custom Search
Post a Comment