Dashak Sahava Samas Pahila Dev Shodhan
Samas Pahila Dev Shodhan. It is in Marathi. We leave in a village or city, to have our staying there happily; we have to meet the head of the village or city. Then our leaving there will be trouble free. Just like that while leaving in this world, we must know who have created us. We must try to please him, and then only we will be happy in our life. The God who has created us must be found out and remembered. Our body is nor our real identity. There is something beyond that which is our real identity, and that is God. To find out him we must have a Sadguru, to lead us on that path. This is all is described in here.
समास पहिला देवशोधन
श्रीराम ॥
चित्त सुचीत करावें । बोलिलें तें जीवीं धरावें ।
सावध होऊन बैसावें । निमिष्य येक ॥ १ ॥
१) प्रथम मन एकाग्र करावे. या समासांत जें सांगितलें आहे तें अंतरी ठेवावे. क्षणभर सावध होऊन बसावे. सांगितलेले ऐकावे.
कोणी येके ग्रामीं अथवा देसीं । राहाणें आहे आपणासी ।
न भेटता तेथिल प्रभूसी । सौख्य कैचें ॥ २ ॥
२) एखाद्या गांवांत किंवा देशांत आपल्याला राहायचे असेल तर तेथील प्रमुखास भेटले तर आपल्याला त्रास न होता सुख लाभते.
म्हणौन ज्यास जेथें राहाणें । तेणें त्या प्रभूची भेटी घेणें ।
म्हणिजे होणें श्र्लाघ्यवाणें । सर्व कांहीं ॥ ३ ॥
३) म्हणून ज्याला जेथें रहाणें असेल तेथील वरिष्ठाची भेट घ्यावी. म्हणजे तेथे आपले राहाणें सुखकर होते.
प्रभूची भेटी न घेतां । तेथें कैंची मान्यता ।
आपुले महत्व जातां । वेळ नाहीं ॥ ४ ॥
४) वरिष्ठाची भेट घेतली नाही तर त्या ठिकाणी आपल्याला कोणी किंमत देत नाही. आपले कांहीं महत्व राहात नाही.
म्हणौन रायापासून रंक । कोणी येक तरी नायेक ।
त्यास भेटणें हा विवेक । विवेकी जाणती ॥ ५ ॥
५) म्हणून राजापासून रंकापर्यंत जो कोणी वरिष्ठ असेल त्याला भेटणें योग्य असते असे विचारी माणसे ओळखतात.
त्यास न भेटता त्याचे नगरीं । राहातां धरितील बेगारी ।
तेथें न करितां चोरी । आंगीं लागे ॥ ६ ॥
६) वरिष्ठाला न भेटता तेथें राहीले तर फुकट काम करुन घेण्यासाठी बिगारी म्हणून धरुन नेतात. चोरी न करतां आपल्यावर चोरीचा आळ आणतात.
या कारणें जो शाहाणा । तेणें प्रभूसी भेटावें जाणा ।
ऐसें न करितां दैन्यवाणा । संसार त्याचा ॥ ७ ॥
७) यासाठीं शहाण्यानें तेथील वरिष्ठास भेटावे. असे केले नाहीं तर प्रपंचांत त्याला निरनिराळे त्रास भोगावें लागतात.
ग्रामीं थोर ग्रामधिपती । त्याहूनि थोर देशाधिपती ।
देशाधिपतीहूनि नृपती । थोर जाणावा ॥ ८ ॥
८) गांवामध्यें ग्रामधिपती वरिष्ठ असतो. त्याच्याहून वरिष्ठ देशाधिपती असतो. तर राजा देशाधिपतीहून वरिष्ठ असतो.
राष्ट्रांचा प्रभु तो राजा । बहुराष्ट्र तो माहाराजा ।
माहाराजाचाहि राजा । तो चक्रवती ॥ ९ ॥
९) राष्ट्राचा वरिष्ठ तो राजा, पुष्कळ राष्ट्रांचा वरिष्ठ तो महाराजा अशा बर्याच महाराजांचा वरिष्ठ तो चक्रवर्ति असतो.
येक नरपति येक गजपती । येक हयपति येक भूपती ।
सकळांमध्यें चक्रवती । थोर राजा ॥ १० ॥
१०) कोणी नरपति, तर कोणी गजपति तर कोणी हयपति असतो. कोणी भूपति असतो या सर्वांहून चक्रवर्ति हा श्रेष्ठ राजा असतो.
असो ऐसियां समस्तां । येक ब्रह्मा निर्माणकर्ता ।
त्याब्रह्मयासहि निर्मिता । कोण आहे ॥ ११ ॥
११) असो. या सर्वांना ब्रह्मदेव निर्माण करतो. पण ब्रह्मदेवाचा निर्माता कोण?
ब्रह्मा विष्णु आणि हर । त्यांसी निर्मिता तोचि थोर ।
तो वोळखावा परमेश्र्वर । नाना येत्नें ॥ १२ ॥
१२) ब्रह्मा, विष्णु आणि शंकर यांना जो निर्माण करतो तो परमेश्र्वर. त्याला नाना प्रयत्न करुन ओळखावें.
तो देव ठाईं पडेना । तरी येमयातना चुकेना ।
ब्रह्मांडनायेक चोजवेना । हें बरें नव्हे ॥ १३ ॥
१३) तो देव जर ओळखला नाही तर यमयातना चुकत नाहीत. ब्रह्मांडनायक परमेश्र्वरास ओळखता येत नाही हें कांहीं बरे नव्हे.
जेणें संसारीं घातलें । आवघें ब्रह्मांड निर्माण केलें ।
त्यासी नाहीं वोळखिलें । तोचि पतित ॥ १४ ॥
१४) ज्या परमात्म्याने आपल्याला संसारांत घातलें, ज्यानें संपूर्ण ब्रह्मांड निर्माण केले. त्याला जो ओळखत नाही तो खरोखर पतितच असतो.
म्हणोनि देव वोळखावा । जन्म सार्थकचि करावा ।
न कळे तरी सत्संग धरावा । म्हणिजे कळे ॥ १५ ॥
१५) म्हणून खर्या देवास ओळखावे. म्हणजे जन्म सार्थकीं लागेल. कळत नसला तरी सत्संग धरीला म्हणजे कळेल.
जो जाणेल भगवंत । तया नांव बोलिजे संत ।
जो शाश्र्वत आणि अशाश्र्वत । निवाडा करी ॥ १६ ॥
१६) ज्याला भगवंत म्हणजे कोण याचे ज्ञान असते, त्याला संत म्हणतात. शाश्वत व अशाश्वताची तो बरोबर निवड करतो.
चळेना ढळेना देव । ऐसा ज्याचा अंतर्भाव ।
तोचि जाणिजे माहानुभाव । संत साधु ॥ १७ ॥
१७) खरा देव कधी बदलत नाही व आपल्या ठिकाणावरुन भ्रष्ट होत नाही असा विश्र्वास ज्याच्या अंतर्यामी असतो, तो महान साचात्कारी संत किंवा साधु असतो.
जो जनामधें वागे । परि जनावेगळी गोष्टी सांगे ।
ज्याचे अंतरीं ज्ञान जागे । तोचि साधु ॥ १८ ॥
१८) तो देहानें लोकांत वावरतो. परंतु तो लोकांना माहीत नसलेल्या स्वस्वरुपाबद्दल सांगतो. ज्याच्या अंतर्यामी आत्मज्ञान नेहमी जागृत असते. तोच खरा साधु होय.
जाणिजे परमात्मा निर्गुण । त्यासीच म्हणावें ज्ञान ।
त्यावेगळें तें अज्ञान । सर्व कांहीं ॥ १९ ॥
१९) परमात्मा हा निर्गुण आहे हेच खरे ज्ञान होय. इतर सर्व कांहीं अज्ञानच समजावे.
पोंट भराव्याकारणें । नाना विद्या अभ्यास करणें ।
त्यासी ज्ञान म्हणती परी तेणें । सार्थक नव्हे ॥ २० ॥
२०) पोट भरण्यासाठी ज्या निरनिराळ्या विद्या आपण शिकतो त्याला ज्ञान म्हणतात पण ते खरे ज्ञान नाही त्याने जीवनाचे सार्थक होत नाही.
देव वोळखावा येक । तेंचि ज्ञान तें सार्थक ।
येर आवघेंचि निरार्थक । पोट विद्या ॥ २१ ॥
२१) एका देवाचा अनुभव करुन घ्यावा. तेच खरें ज्ञान, त्यानेंच जीवनाचे सार्थक होते. बाकीच्या विद्या पोट भरण्यासाठीं, त्या विद्यांनी, त्याच्या ज्ञानाने सार्थक होत नाही.
जन्मवरी पोट भरिलें । देहाचें संरक्षण केलें ।
पुढें अवघेंचि वेर्थ गेलें । अंतकाळीं ॥ २२ ॥
२२) जन्मभर पोटसाठींच सर्व केले. देह सांभाळला. परंतु पुढे अतंकाळी सर्व फुकटच जाते.
येवं पोट भराव्याची विद्या । तयेसी म्हणो नये सद्विद्या ।
सर्वव्यापक वस्तु सद्या । पाविजे तें ज्ञान ॥ २३ ॥
२३) पोट भरण्याच्या विद्यांना आत्मविद्या म्हणू नये. सर्व व्यापक आत्मवस्तु ज्या अनुभवाने तत्काळ प्राप्त होते तें खरें ज्ञान होय.
ऐसें जयापासीं ज्ञान । तोचि जाणावा सज्जन ।
तयापासीं समाधान । पुसिलें पाहिजे ॥ २४ ॥
२४) परमात्मवस्तुचे ज्ञान ज्याच्याजवळ तो सज्जन म्हणून जाणावा. समाधान मिळविण्याचा मार्ग त्याला विचारावा.
अज्ञानास भेटतां अज्ञान । तेथें कैंचे सांपडेल ज्ञान ।
करंट्यास करंट्याचें दर्शन । होतां भाग्य कैंचे ॥ २५ ॥
२५) एक अज्ञानी दुसर्या अज्ञानी माणसाकडे गेला तर त्याला ज्ञान कसें मिळणार? दैवहीन माणसाच्या दर्शनाने आपले भाग्य कसे उजळेल?
रोग्यापासीं रोगी गेला । तेथें कैंचें आरोग्य त्याला ।
निर्बळापासीं निर्बळाला । पाठी कैंची ॥ २६ ॥
२६) एक रोगी दुसर्या रोग्याजवळ गेला तर त्याला आरोग्य कसे मिळणार? दुबळ्या माणसाजवळ दुसर्या दुबळ्याकडून संरक्षण कसें मिळणार?
पिशाच्यापासीं पिशाच्य गेलें । तेथें कोण सार्थक जालें ।
उन्मत्तास उन्मत्त भेटलें । त्यास उमजवी कवणु ॥ २७ ॥
२७) एक पिशाच्च दुसर्या पिशाच्चापाशी गेले तर त्याची त्या योनींतून कशी सुटका होईल? उन्मत्त माणसाकडून दुसर्या उन्मत्ताची समजुत कशी होईल?
भिकार्यापासीं मागतां भिक्षा । दीक्षाहीनापासीं दीक्षा ।
उजेड पाहतां कृष्णपक्षा । पाविजे कैंचा ॥ २८ ॥
२८) भिकार्याजवळ भिक मागितली, दीक्षाहीनाजवळ दीक्षा दे म्हणून दीक्ष मागितलीा, किंवा कृष्णपक्षांत चांदण्यांच प्रकाश कसा मिळेल?
अबद्धापासीं गेला अबद्ध । तो कैसेनि होईल सुबुद्ध ।
बद्धास भेटता बद्ध । सिद्ध नव्हे ॥ २९ ॥
२९) एका स्वैराचारी माणसाकडे दुसरा स्वैराचारी गेला तर तो कांहीं सदाचारी होत नाही. तसेच एका प्रापंचिकाकडे दुसरा प्रापंचिक गेला तर तो सिद्ध पुरुष कसा होणार?
देहापासीं गेला देही । तो कैसेनि होईल विदेही ।
म्हणौनि ज्ञात्यावांचून नाहीं । ज्ञानमार्ग ॥ ३० ॥
३०) त्याचप्रमाणें एका देहबुद्धीच्या माणसाकडे दुसरा देहबुद्धीचा माणुस गेला तर तो विदेही होऊ शकत नाही. म्हणून आत्मज्ञानी पुरुषावाचुन आत्मज्ञानाचा मार्ग सांपडत नाही.
याकारणें ज्ञाता पाहावा । त्याचा अनुग्रह घ्यावा ।
सारासार विचारें जीवा । मोक्ष प्राप्त ॥ ३१ ॥
३१) या कारणानें आत्मज्ञानी माणुस शोधुन काढावा व त्याच्याकडून अनुग्रह घ्यावा. त्याच्या मार्गदर्शनाने सारासार विचारानें मोक्ष मिळतो.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे देवशोधननाम समास पहिला॥
Samas Pahila Dev Shodhan
समास पहिला देवशोधन
Custom Search
No comments:
Post a Comment