Thursday, October 19, 2017

Samas Aathava AatmaDarshan समास आठवा आत्मदर्शन


Dashak Aathava Samas Aathava AatmaDarshan 
Samas Aathava AatmaDarshan, It is in Marathi. AatmaDarshan means Knowing that I am not the body but I am Aatma itself. This is explain in this Samas by Samarth Ramdas.
समास आठवा आत्मदर्शन
श्रीराम ॥
मागां जाले निरुपण । परमात्मा तो तूंचि जाण ।
तया परमात्मयाचें लक्षण । तें हें ऐसें असे ॥ १ ॥
१) तूंच तो परमात्मा आहेस. असें मागील समासांत सांगितलें. त्यापरमात्म्याचें लक्षण पुढीलप्रमाणें आहे. 
जन्म नाहीं मृत्य नाहीं । येणें नाहीं जाणें नाहीं ।
बद्ध मोक्ष दोनी नाहीं । परमात्मयासी ॥ २ ॥ 
२) परमात्मस्वरुपाला जन्म, मृत्यु नाही. कोठेंही यावयाचें किंवा जावयाचे नाहीं. तसेच त्याला बंधन नाही व मोक्षही नाही.  
परमात्मा निर्गुण निराकार । परमात्मा अनंत अपार ।
परमात्मा नित्य निरंतर । जैसा तैसा ॥ ३ ॥
३) परमात्मा निर्गुण व निराकार आहे. अनंत व अपार आहे. परमात्मा अगदी नित्य, निरंतर जसाच्या तसा असतो. 
परमात्मा सर्वांस व्यापक । परमात्मा अनेकीं येक ।
परमात्मयाचा विवेक । अतर्क्य आहे ॥ ४ ॥
४) परमात्मा सर्वांना व्यापून असतो. तो अनेकांमध्यें एकपणनें राहतो. पण तो बरोबर कसा आहे हे तर्कानें आकलन होत नाही. 
ऐसी परमात्मयाची स्थिती । बोलताती वेद श्रुती ।
परमात्मा पाविजे भक्तीं । येथें संशय नाहीं ॥ ५ ॥
५) परमात्मा तर्कानें आकलन होऊं शकत नाहीं. असें वेद व श्रुति सांगतात. परंतु परमात्मा भक्तीनें प्राप्त होतो यांतही संशय नाही.   
तये भक्तीचें लक्षण । भक्ती नवविधा भजन ।
नवविधा भजनें पावन । बहु भक्त जाले ॥ ६ ॥
६) ज्या भक्तीनें साधक भगवंताशी एकरुप होतो ती नऊ प्रकारची आहे. नवविधा भक्तीनें पुष्कळ भक्त पावन झाले.  
तया नवविधामध्यें सार । आत्मनिवेदन थोर ।
तयेचा करावा विचार । स्वानुभवें स्वयें ॥ ७ ॥
७) नऊ प्रकारच्या भक्तीमध्यें आत्मनिवेदन भक्ति अत्यंत श्रेष्ठ आहे. तिच्यामध्यें सर्व भक्तींचे रहस्य सामावलेले आहे. आत्मनिवेदनाचा अनुभव स्वतः घेऊन त्याचा विचार करावा.     
आपुलिया स्वानुभवें आपणास निवेदावें ।
आत्मनिवेदन जाणावें । ऐसें असे ॥ ८ ॥
८) आपण स्वतःला देवाला अर्पण करावें. व हा जो अनुभव आहे त्यास आत्मनिवेदन म्हणतात. आत्मनिवेदन म्हणजे स्वतःला देवाच्या चरणीं अर्पण करणें. 
   महत्पूजचा अंतीं । देवास मस्तक वाहाती ।
तैसी आहे निकट भक्ती । आत्मनिवेदनाची ॥ ९ ॥
९) कांहीं लोक देवाची महापूजा करतात. अंती पूजारी आपलें मस्तक अर्पण करतो. आत्मनिवेदनाची भक्ति अशी देवाच्या अत्यंत निकट असलेली भक्ति आहे.
आपणांस निवेदिती । ऐसे भक्त थोडे असती ।
तयांस परमात्मा मुक्ती । तत्काळ देतो ॥ १० ॥ 
१०) देवाचे चरणीं आपलें स्वतःचे संपूर्ण समर्पण करणारे भक्त फार थोडे आढळतात. अशा भक्तांना परमात्मा ताबडतोप मुक्ती देतो.
आपनास कैसें निवेदावें । कोठें जाऊन पडावें ।
किंवा मस्तक तोडावें । देवापुढें ॥ ११ ॥
११) देवाचे चरणीं समर्पण करावें. पण आपण सवतःला कसें समर्पण करावें, कोठें जाऊन पडावें किंवा देवापुढें शिर तोडून कां टाकावें तें कळत नाही.   
ऐसें ऐकोन बोलणें । वक्ता वदे सर्वज्ञपणें ।
श्रोतां सावध होणें । येकाग्र चित्तें ॥ १२ ॥
१२) श्रोत्यांचे असें बोलणें ऐकून सर्वज्ञ वक्ता उत्तर देतो तें आतां श्रोत्यांनी सावध होऊन एकाग्रचित्तानें ऐकावें.    
आत्मनिवेदनाचें लक्षण । आधीं पाहावें मी कोण ।
मग परमात्मा निर्गुण । तो वोळखावा ॥ १३ ॥
१३) प्रथम मी कोण आहे ? याचा शोध घेणें हें आत्मनिवेदनाचे लक्षण आहे. मी कोण याचा शोध लागल्यानंतर निर्गुण परमात्मा कसा आहे तें जाणावें.
देवाभक्ताचें शोधन । करितां होतें आत्मनिवेदन ।
देव आहे पुरातन । भक्त पाहे ॥ १४ ॥
१४) देव कसा आहे, भक्त कसा आहे, देव आणि भक्त यांचा संबंध कसा आहे याचा शोध करीत गेलें कीं आत्मनिवेदन आपोआप घडते. देव शाश्वत आहे आपण शाश्वत नाहीं, हें भक्त समजतो. 
देवास वोळखों जातां । तेथें जाली तद्रूपता ।
देवभक्तविभक्तता । मुळींच नाहीं ॥ १५ ॥
१५) देवाची ओळखण करायला गेले कीं, भक्त देवाशी तद्रूप होतो. मग देव व भक्त यांच्यामध्यें थोडेही निराळेपण उरत नाहीं.  
विभक्त नाहीं म्हणोन  भक्त । बद्धन नाहीं म्हणौनि मुक्त ।
अयुक्त नाहीं बोलणें युक्त । शास्त्राधारें ॥ १६ ॥
१६) भगवंतापासून विभक्त नाही म्हणून तो भक्त होय. त्यास बंधन नाही म्हणून तो मुक्त होय. मी हें शास्त्राधारें बोलत आहें, म्हणून तें योग्य आहे. 
देवाभक्ताचें पाहातां मूळ । होये भेदाचें निर्मूळ ।
येक परमात्मा सकळ । दृश्यावेगळा ॥ १७ ॥
१७) देव आणि भक्त या दोघांचे मूळ स्वरुप पाहावयास गेलें कीं, दोघांमधील भेदच नाहींसा होतो. या सगळ्या दृश्याहून वेगळा असा परमात्मा तेवढा शिल्लक उरतो.  
तयासि होतां मिळणी । उरी नाहीं दुजेपणीं ।
देवभक्त हे कडसणी । निरसोन गेली ॥ १८ ॥  
१८) त्या परमात्मास्वरुपांशीं समरस झाल्यावर दोनपणाला, द्वैताला किंवा मीतूंपणाला जागाच उरत नाहीं. मग हा देव व हा भक्त असा भेदाचा विचार राहूंच शकत नाही.  
आत्मनिवेदनाचे अंतीं । जें कां घडली अभेदभक्ती ।
तये नाव सायोज्यमुक्ती । सत्य जाणावी ॥ १९ ॥
१९) आत्मनिवेदनानें स्वतःचे संपूर्ण समर्पण झालें कीं, अभेदभक्तिची अवस्था प्राप्त होते. त्या अवस्थेला सायुज्यमुक्ति असें म्हणतात. ही गोष्ट अगदी खरी आहे. 
जो संतांस शरण गेला । अद्वैतनिरुपणें बोधला ।
मग जरी वेगळा केला । तरी होणार नाहीं ॥ २० ॥
२०) जो संताला किंवा सद्गुरुला शरण जातो आणि ज्याच्या अंतःकरणामध्यें अद्वैताचें गुरुवचन तो स्वस्वरुपच होतो. मग त्याला मीपणानें वेगळा करावा म्हटलें तरी तो वेगळा होणार नाही. 
नदी मिळाली सागरीं । ते निवडावी कोणेपरी ।
लोहो सोनें होतां माघारी । काळिमा न ये ॥ २१ ॥
२१) एखादी नदी सागराला मिळाल्यानंतर तिला निवडून वेगळीं काढतां येत नाहीं. किंवा परिसाचा स्पर्श होऊन लोखंडाचे सोनें झाल्यावर तें कधींच काळें पडत नाही.    
तैसा भगवंतीं मिळाला । तो नवचे वेगळा केला ।
देव भक्त आपण जाला । विभक्त नव्हे ॥ २२ ॥
२२) त्याचप्रमाणें जो भगवंताशीं समरस झाला तों कांहींकेल्या मीपणानें वेगळा राहूं शकत नाहीं. भक्त देव झाल्यावर तो देवाहून विभक्त असूं शकत नाहीं. 
देव भक्त दोनी एक । ज्यासी कळला विवेक ।
साधुजनीं मोक्षदायेक । तोचि जाणावा ॥ २३ ॥
२३) देव आणि भक्त हे दोन नसून एकरुप आहेत या विचारामधील खरा अर्थ ज्याला बरोबर समजला अशा साधकाला तो विचार मोक्षापर्यंत नेतो हें ओळखावें. 
आतां असो हें बोलणें । देव पाहावा भक्तपणें ।
तेणे त्यांचे ऐश्र्वर्य बाणे । तत्काळ आंगी ॥ २४ ॥
२४) आतां हें विवेचन पुरें. आपण भक्त व्हावें आणि देवाचें दर्शन घ्यावें. असें दर्शन जो घेतो त्याचे अंगीं देवाचे ऐश्र्वर्य बाणतें. 
देहचि होऊन राहिले । तेणें देहदुःख साहिजे ।
देहातीत होतां पाविजे । परब्रह्म तें ॥ २५ ॥
२५) मी देहच आहे या भावनेनें आपण राहिलों तर देहाची दुःखें भोगावी लागतात. देहबुद्धि सोडून आपण जर देहातीत झालो तर आपल्याला परब्रह्माचा लाभ होतो.
देहातीत कैसें होणें । कैसें परब्रह्म पावणें ।
ऐश्र्वर्याचीं लक्षणें । कवण सांगिजे ॥ २६ ॥
२६) यावर श्रोता विचारतो कीं, देहातीत कसें व्हायचे हें सांगावें. परब्रह्मचा लाभ कसा करुन घ्यावयाचा व ऐश्र्वर्याची लक्षणें कोणती तें सांगावें.
ऐसें श्रोता आक्षेपिलें । याचें उत्तर काये बोलिलें ।
तेंचि आतं निरोपिलें । सावध ऐका ॥ २७ ॥
२७) श्रोत्यांनीं असें प्रश्र्ण विचारल्यावर वक्त्यानें त्यास उत्तर दिलें तें उत्तर ऐकावें.
देहातीत वस्तु आहे । तें तूं परब्रह्म पाहें ।
देहसंग हा न साहे । तुज विदेहासी ॥ २८ ॥
२८) परब्रह्म देहातीत वस्तु आहे. ही गोष्ट ध्यानांत ठेवावी. तूं स्वतः देहातीत झालास म्हणजे तुला देहबुद्धि किंवा देहाची आसक्ती मुळीच सहन होणार नाही.  
ज्याची बुद्धी होये ऐसी । वेद वर्णिती तयासी ।
शोधितां नाना शास्त्रांसी । न पडे ठांई ॥ २९ ॥
२९) देहातीत असणारी आत्मबुद्धि ज्याला प्राप्त झाली तो देहातीत बनतो. वेदसुद्धा त्याची स्तुति करतात. अनेक शास्त्रांचे अध्यन केलें तरी आत्मबुद्धि निर्माण होत नाही.  
ऐश्र्वर्य ऐसें तत्वता । बाणे देहबुद्धि सोडितां ।
देह मी ऐसें भावितां । अधोगती ॥ ३० ॥
३०) मी देह आहे ही भावना सोडली कीं विदेहीपणाचें ऐश्र्वर्य प्राप्त होते. मी देहच आहे ही भावना जोपर्यंत आहे तोपर्यंत अधोगती कांहीं चुकत नाहीं. 
याकारणें साधुवचन । मानूं नये अप्रमाण ।
मिथ्या मानितां दूषण । लागों पाहे ॥ ३१ ॥
३१) यासाठीं संतांचे वचन खोटे मानूं नये. त्यांचे सांगणें खोटे मानल्याचा दोष लागतो.   
साधुवचन तें कैसें । काये धरावें विश्र्वासें ।
येक वेळ स्वामी ऐसें । मज निरोपावें ॥ ३२ ॥  
३२) यावर श्रोता विचारतों कीं, संतांचें सांगणें कोणतें तें सांगावें. कशावर विश्र्वास ठेवावा हें स्वामी आपण मला सांगावें.         
सोहं आत्मा स्वानंदघन । अजन्मा तो तूंचि जाण ।
हेंचि साधूचें वचन । सदृढ धरावें ॥ ३३ ॥
३३) वक्ता सांगतो कीं, सोहम् म्हणजे तो आत्मा मीच आहे. ज्याला जन्म नाहीं असा स्वानंदघन आत्मा तूंच आहेस. हें संतांचे सांगणें आपण आपल्या मनांत अगदी घट्ट धरुन ठेवावें. 
माहावाक्याचें अंतर । तूंचि ब्रह्म निरंतर ।
ऐसिया वचनाचा विसर । पडोंचि नये ॥ ३४ ॥
३४) " तूंच शाश्वत ब्रह्म आहेस " हाच महावाक्याचा खरा अर्थ आहे. त्या वचनाचा कधीं विसर पडूं देऊ नये. 
देहासि होईल अंत । मग मी पावेन अनंत ।
ऐसें बोलणें निभ्रांत । मानूंचि नये ॥ ३५ ॥ 
३५) देहाचा अंत झाल्यावर मला अनंत ब्रह्म प्राप्त होईल. हें बोलणें वेडेपणाचे आहे, अज्ञानाचें आहे. तें आपण खरें मानूं नये.  
येक मूर्ख ऐसें म्हणती । माया नासेल कल्पांतीं ।
मग आम्हांस ब्रह्मप्राप्ती । येरवीं नाहीं ॥ ३६ ॥
३६) कांहीं मूर्ख लोक असें म्हणतात कीं, विष्वाचा प्रलयकाल आला म्हणजे माया नाहींशी होईल. ती नाश पावली कीं आम्हाला ब्रह्मप्राप्ति होईल , एरव्ही नाहीं.  
मायेसी होईल कल्पांत । अथवा देहासी येईल अंत ।
तेव्हां पावेन निवांत । परब्रह्म मी ॥ ३७ ॥
३७) कल्पांती माया नाश पावेल किंवा देहाचा अंत होईल तेव्हां मग निवांतपणीं आपणास ब्रह्मप्राप्ती होईल असें हें वेडे लोक म्हणतात. 
हें बोलणें अप्रमाण । ऐसें नव्हे समाधान ।
समाधानाचें लक्षण । वेगळेंचि असे ॥ ३८ ॥
३८) या बोलण्याला कांहीं आधार नाहीं. कारण आत्मज्ञानानें मिळणारे समाधान अशा प्रकारचें नाहीं. समाधानाचें लक्षण कांहीं निराळेंच आहे.   
शैन्य अवघेंचि मरावें । मग राज्यपद प्राप्त व्हावें ।
शैन्य अस्तांचि राज्य करावें । हें कळेना ॥ ३९ ॥
३९) सैन्य सगळेच्या सगळें मेलें कीं मगआपण सिंहासनावर बसावें. असा जर एखाद्यानें विचार केला तर तो खात्रीनें वेडेपणाचाच ठरेल. सगळें सैन्य असतांना राज्य करण्यांत खरी शोभा आहे. हे त्याला कळत नाहीं. 
माया असोनिच नाहीं । देह असतांच विदेही ।
ऐसें समाधान कांहीं । वोळखावें ॥ ४० ॥  
४०) माया असून नसल्यासारखीं व्हावी, देह असून विदेही अवस्था असावी. हें जें समाधान आहे त्याचा अनुभव आपण घ्यावा.      
राज्यपद हातासी आलें । मग परिवारें काय केलें । 
परिवारा देखतां राज्य गेलें । हें तों घडेना ॥ ४१ ॥
४१)  एकदां राज्यपदहातांत आल्यावर परिवार म्हणजे सैनिक व नोकरचाकर कांहीं करुं शकत नाहीत. परिवार पहिला म्हणून राज्यपद हातचें गेलें असें कधींच घडत नाही.   
प्राप्त जालिया आत्मज्ञान । तैसें दृश्य देहभान ।
दृष्टीं पडतां समाधान । जाणार नाहीं ॥ ४२ ॥
४२) त्याचप्रमाणें आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर दृश्याचें व आपल्या देहाचें भान राहात नाहीं. म्हणून दृश्य दृष्टीस पडतें तरी अंतरींचे समाधान भंग पावत नाहीं.   
मार्गीं मुळी सर्पाकार । देखतां भये आलें थोर ।
कळतां तेथीचा विचार । मग मारणें काये ॥ ४३ ॥ 
४३) रस्त्यानें जातांना सर्पाच्या आकाराची झाडाची मूळी दिसल्यावर घाबरला पण तो साप नसून मुळीं आहे हें समजल्यावर मग कशाला मारावें हे समजलें.  
तैसी माया भयानक । विचार पाहातां माईक ।
मग तयेचा धाक । कासया धरावा ॥ ४४ ॥
४४) त्याचप्रमाणें अज्ञानी असतां माया भयंकर वाटते. पण आत्मविचार केल्यावर माया भ्रामकआहे याची खात्री पटते. मगमायेचेभय बाळगण्याचें कारण उरत नाहीं.  
देखतां मृगजळाचे पूर । म्हणे कैसा पावों पैलपार ।
कळतां तेथीचा विचार । सांकडें कैंचें ॥ ४५ ॥
४५) वाळवंतटांतून चालतांना सगळीकडे पाणीच पाणी दिसलें मगते पार कसें करावें याचे भय वाटूं लागलें. पण तें मृगजळ आहे हें समजल्यावर संकट नाहींसे झाले.   
देखतां स्वप्न भयानक । स्वप्नीं वाटे परम धाक ।
जागृती आलीयां साशंक । कासया व्हावें ॥ ४६ ॥
४६) एका माणसाला झोपेमध्यें एक भयंकर स्वप्न पडलें. त्यामुळें स्वप्नांत तो फार घाबरला. पण तो जागा झाल्यावर त्याचें भय आपोआप नाहींसें झालें. 
तथापी माया कल्पनेसी दिसे । आपण कल्पनेतीत असे ।
तेथें उद्वेग काईसे । निर्विकल्पासी ॥ ४७ ॥ 
४७) अशा रीतीनें माणूस कल्पना करतो आणि त्यामुळें तो घाबरतो. माया देखील अपल्या कल्पनेचाच परिणाम आहे पण आपण स्वानंदघन आत्मस्वरुप आहोत हा अनुभव आल्यावर आपण मायेपलीकडे आहोत याची खात्री पटते. जो निर्विकल्प आहे त्याला माया दुःख देऊं शकत नाहीं. तो निर्भय असतो.     
अंतीं मती तेचि गती । ऐसें सर्वत्र बोलती ।
तुझा अंतीं तुझी प्राप्ती । सहजचि जाली ॥ ४८ ॥
४८) अंतकाळची मनाची जशी दशा असते तशी मेल्यानंतर गति मिळते असें सर्वजण सांगतात. हें जर खरें तर " मी स्वानंदघन आत्मा आहे" हा दृढ विचार मनांत राहून जर देहबुद्धीचा अंत झाला तर स्वस्वरुपाची प्राप्ति आपोआप होईल यांत शंका नाहीं. 
चौदेहाचा अंत । आणी जन्म मुळाचा प्रांत ।
अंतांप्रांतासी अलिप्त । तो तूं आत्मा ॥ ४९ ॥
४९) चार देहांचा अंत म्हणजे मायेचा अंत. जन्माच्या मुळाचें स्थान म्हणजे अविद्या किंवा वासना. माया आणि अविद्या यांपासून अलिप्त असणारा जो आत्मा तो तूंच आहेस. 
जयासी ऐसी आहे मती । तयास ज्ञानें आत्मगती ।
गती आणी अवगती । वेगळाचि तो ॥ ५० ॥
५०) ज्याची दृढनिष्ठा अशी असते त्याला ज्ञानानें आत्मदर्शन खात्रीनें घडतें. गति आणि अधोगति या दोन्हीं पासून आत्मा निराळाच असतो. 
मति खुंटली वेदांची । तेथें गती आणी अवगती कैंची ।
आत्मशास्त्रगुरुप्रचितीची । ऐक्यता आली ॥ ५१ ॥
५१) आत्मस्वरुपाचें वर्णन करतांना वेदांची मति हरली. या आत्म्याच्या ठिकाणीं गति आणि अवगति या बदलणार्‍या अवस्थांना वाव नाही. आत्मदर्शनामध्यें शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती या तिहींचा समन्वय होतो. 
जीवपणाची फिटली भ्रांती । वस्तु आली आत्मप्रचिती ।
प्राणी पावला उत्तम गती । सद्गुरुबोधें ॥ ५२ ॥ 
५२) ब्रह्मवस्तुचा स्वतःला साक्षात्कार झाला म्हणजे " मी आत्मस्वरुप " आहे असा प्रत्यय येतो. त्यामुळें मी जीव आहे ही भ्रमाची भावना नाहींशी होते. अशा रीतीनें सद्गुरुकडून झालेल्या ज्ञानानें प्राणी उत्तम गतीला जातो.   
सद्गुरुबोध जेव्हां जाला । चौदेहांस अंत आला ।
तेणें निजध्यास लागला । सस्वरुपीं ॥ ५३ ॥
५३) ज्यावेळीं सद्गुरु आपलें ज्ञान शिष्याला देतो त्याचवेळीं त्याच्या (शिष्याच्या) चारी देहांचा अंत होतो. त्यामुळें त्याला स्वस्वरुपाचें सातत्यानें चिंतन राहूं लागतें.  
तेणें निजध्यासें प्राणी । ध्येयंचि जाला निर्वाणीं ।
सायोज्यमुक्तीचा धनी । होऊन बैसला ॥ ५४ ॥
५४) निदिध्यासानें साधक अखेर ध्येयरुपच बनून जातो. तो आत्मस्वरुप बनतो. जो आत्मस्वरुप बनतो. तो सायुज्य मुक्तीचा मालक बनतो.  
दृश्य पदार्थ वोसरतां । आवघा आत्माचि तत्वता ।
नेहटून विचारें पहातां । दृश्य मुळींच नाहीं ॥ ५५ ॥
५५) आपल्या देहासकट सार्‍या दृश्य पदार्थांचे ज्ञान नाहींसे झालें कीं मग जिकडेतिकडे केवळ आत्मस्वरुपच भासूं लागतें. अगदी चिकाटीनें सूक्ष्म विचर केल तर दृश्याला मुळांतच खरें अस्तित्व नाहींअसें कळून येईल.     
मिथ्या मिथ्या पाहिलें । मिथ्यापणें अनुभवा आलें ।
श्रोती पाहिजे ऐकिलें । या नाव मोक्ष ॥ ५६ ॥
५६) जें खोटें आहें तें खोटे असें जाणून जर पाहिलें, इतकेंच नव्हें तर जें खोटें आहें तें खोटेपणानें अनुभवास आलें म्हणजें निःसंशय आत्मज्ञान झालें.. यालाच मोक्ष असें नांव आहें हें श्रोत्यांनी नीट ऐकून ठेवावें.  
सद्गुरुवचन हृदईं धरी । तोचि मोक्षाचा अधिकारी ।
श्रवण मनन केलेंचि करी । अत्यादरें ॥ ५७ ॥
५७) सद्गुरुचें वचन जो आपल्या हृदयांमध्यें धरुन ठेवतो तोच मोक्षाचा अधिकारी होतो. सद्वगुरुच्या वचनाचें श्रवण व मनन अत्यंत आदरानें तो पुन्हां पुन्हां करीत असतो.  
जेथें आटती दोनी पक्ष । तेथें लक्ष ना अलक्ष ।
या नाव जाणिजे मोक्ष । नेमस्त आत्मा ॥ ५८ ॥
५८) ज्या अनुभवामधें द्वैतच नाहीं तेथें पूर्वपक्ष व उत्तरपक्ष दोन्ही स्वरुपांत विलीन होतात. तेथें लक्ष व अलक्ष दोन्ही उरत नाहींत. लक्ष हा मायेचा प्रांत तर अलक्ष हा स्वरुपाचा प्रांत माया नाहींशीं होऊन जातें तेथें लक्ष लय पावतें आणि त्याबरोबर अलक्षपण लयास जातें. केवळ आत्मा तेवढा राहातो. या स्थितीला मोक्ष असें म्हणतात.   
जेथें ध्यान धारणा सरे । कल्पना निर्विकल्पीं मुरे ।
केवळ ज्ञेप्तिमात्र उरे । सूक्ष्म ब्रह्म ॥ ५९ ॥
५९) तेथें ध्यान व धारणा थांबतें. कल्पना निर्विकल्प स्वरुपामध्यें विरुन जते. आणि केवळ शुद्ध जाणीवमय अत्यंत सूक्ष्म ब्रह्मस्वरुप तेवढें शिल्लक उरते.   
भवमृगजळ आटलें । लटिकें बंधन सुटलें ।
अजन्म्यास मुक्त केलें । जन्मदुःखापासुनी ॥ ६० ॥
६०) प्रपंचरुपी मृगजळ संपून जातें. देहबिद्धीनें घातलेले व मुळांतच नसलेलें बंधन तुटते, आणि जो वास्तविक अजन्मा असा आत्मा त्याची जन्ममरणाच्या दुःखांतून सुटका होते. 
निःसंगाची संगव्याधी । विदेहाची देहबुद्धी ।
विवेकें तोडिली उपाधी । निःप्रपंचाची ॥ ६१ ॥
६१) अत्यंत अलिप्त असणारा आत्मा रोगापासून मुक्त होतो. जो मूळचा देहाच्या पलीकडे असणारा त्याला " मी देहच आहे ' ही भवना जदली होती ती भावना नाहींशी होते. ती उपाधी आत्मविवेकानें तोडून टाकिली.   
अद्वैताचें तोडिलें द्वैत । येकांतास दिला येकांत ।
अनंतास दिला अंत । अनंताचा ॥ ६२ ॥
६२) अद्वैताला चिकटलेलें द्वैत तोडून टाकले. आत्म्याचा हरवलेला स्वाभावीक एकांत त्यास परत मिळवून दिला. जो अनंतच आहे त्याची लोपलेली अनंतपणाची जाणीव परत जागृत करुन दिली.  
जागृतीस चेतविलें । चेईर्‍यास सावध केलें ।
निजबोधास प्रबोधिलें । आत्मज्ञान ॥ ६३ ॥
६३) ज्याचें जागेपण झांकलें होतें तें नीट जागें केलें. जागेपणास स्वरुपाची जाणीव करुन दिली. आणि " मी आहे " या ज्ञानाला " मी आत्माच आहे " असें आत्मज्ञानाचें स्वरुप दिलें. 
अमृतास केलें अमर । मोक्षास मुक्तीचें घर ।
संयोगास निरंतर । योग केला ॥ ६४ ॥
६४) अमर आत्म्याला त्याचे अमरत्व परत दिलें. मोक्षाला रहायला मुक्तीचे घर दिलें. जीव व परमात्मा यांचा कायमचा संयोग घडावा अशी जोड घालून दिली.  
निर्गुणास निर्गुण केलें । सार्थकाचें सार्थक जालें ।
बहुतां दिवसां भेटलें । आपणासि आपण ॥ ६५ ॥
६५) निर्गुण परब्रह्मास सगुणपणाचा आळ आला होता. तो घालवून त्याचें मूळ निर्गुणपण परत प्रस्थापीत केलें. मानवजन्माच्या सार्थकामध्यें परमोच्य सार्थक साधलें. आणि पुष्कळ दिवसांनी स्वतःची स्वतःशी गांठ पडली.  
तुटला द्वैताचा पडदा । अभेदें तोडिलें भेदा ।
भूतपंचकाची बाधा । निरसोन गेली ॥ ६६ ॥
६६) द्वैतावर अद्वैताचा पडदा होता. तो फाडून अद्वैत प्रगट केलें. अभेदाच्या अनुभवानें भेदाचा मागमूस नाहींसा केला. पंचभूतांच्या बनलेल्या दृष्य विश्र्वाला मिथ्यापणानें पाहून प्रपंचाचा भ्रम नाहींसा केला.   
जालें साधनाचें फळ । निश्र्चळास केलें निश्र्चळ ।
निर्नळाचा गेला मळ । विवेकबळें ॥ ६७ ॥
६७) जन्मभर केलेल्या साधनाचे फळ मिळालें. निश्चळ ब्रह्मस्वरुपावर साचलेला मायेचा कचरा बाजूस सारुन मूळचा निश्र्चळपणा उघड केला. आत्मविवेकानें अविद्यारुपी मळ नाहींसा केला. 
होतें सन्निध चुकलें । ज्याचें त्यास प्राप्त जालें ।
आपणा देखतां फिटलें । जन्मदुःख ॥ ६८ ॥
६८) स्वस्वरुप निधान जवळच होते. पण भ्रमामुळें तें सांपडत नव्हतें. भ्रमनिरास होऊन तें ज्याचें त्यास प्राप्त झालें. आणि अशारीतीनें स्वस्वरुपाचें दर्शन झाल्यामुळें जिवंतपणीं जन्ममरणचें दुःख आपल्यादेखत नाहींसे झालें. 
दुष्ट स्वप्नें जाजावला । ब्राह्मण नीच याती पावला ।
आपणासि आपण सांपडला । जागेपणें ॥ ६९ ॥
६९) एका ब्राह्मणानें स्वप्न पाहिलें. त्यांत त्यास आपण हीन जातीचे आहोत असें दिसलें. तो फार घाबरला. पण जागा होताच आपण ब्राह्मणच आहोत हें त्याच्या ध्यानांत आलें. त्याचप्रमाणें  " मी देह आहे " या भ्रमानें जीव उगाच दुःखें भोगतो. " मी आत्मा आहे ' हें ज्ञान झाल्यावर तो निर्भय होतो.   
ऐसें जयास जालें ज्ञान । तया पुरुषाचें लक्षण ।
पुढिले समासीं निरुपण । बोलिलें असे ॥ ७० ॥
७०) " मी आत्माच आहे ' हें ज्ञान ज्या पुरुषास होतें. त्याचे लक्षण पुढील समासांत सांगितलें आहे. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आत्मदर्शननाम समास आठवा ॥
Samas Aathava AatmaDarshan 
समास आठवा आत्मदर्शन


Custom Search

No comments: