Tuesday, October 31, 2017

Samas Tisara NisSandeh Nirupan समास तिसरा निःसंदेह निरुपण


Dashak Navava Samas Tisara NisSandeh Nirupan
Samas Tisara NisSandeh Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about NisSandeha in this Samas.
समास तिसरा निःसंदेह निरुपण 
श्रीराम ॥
श्रोतीं केला अनुमान । ऐसें कैसें ब्रह्मज्ञाान ।
कांहींच नाहीं असोन । हें केवि घडे ॥ १ ॥
१) मागील समासाच्या शेवटीं  " करुन कांहींच न करावें, असून कांहींच नसावें " असें वक्त्यानें सांगितलें. त्यावर श्रोत्यानें शंका काढली कीं,  " ब्रह्मज्ञान असें कसें असतें ? " आपण असून नसावें. हें कसें शक्य आहे ? "  
सकळ करुन अकर्ता । सकळ भोगून अभोक्ता ।
सकळांमध्यें अलिप्तता । येईल कैसी ॥ २ ॥
२) सगळीं कर्में करुन अकर्तेपणा, सगळे भोग भोगून अभोक्तेपणा, आणि सगळ्यांत राहून अलिप्तपणा येईल कसा ?
तथापी तुम्ही म्हणतां । योगी भोगून अभोक्ता ।
स्वर्गनर्कहि आतां । येणेंचि न्यायें ॥ ३ ॥
३) तथापि आपण म्हणतां कीं, योगी भोग भोग ून अभोक्ता राहतो. तर मग स्वर्ग व नरक यांच्या भोगांना हा अभोक्तेपणाचा नियम लागूं करावयास पाहिजे.  
जन्म मृत्य भोगिलेच  भोगी । परी तो भोगून अभोक्ता योगी ।
यातना हि तयालागी । येणेंचि पाडें ॥ ४ ॥
४) जन्म व मृत्यु यांचे भोग भोगावेंच लागतात. पण तें भोग भोगून योगी अभोक्ता राहतो. असें जर आहे तर भोगाच्या यातना भोगून देखील योगी त्या भोगीत नाहीं. असें म्हणावें लागेल. 
कुटून नाहीं कुटिला । रडोनि नाहीं रडला ।
कुंथोन नाहीं कुंथिला । योगेश्र्वर ॥ ५ ॥
५) याचा अर्थ असा होतो कीं, योगी पुरुष मार खाऊन मार खात नाहीं, शोकानें रडतो पण रडत नाहीं, शरीर दुःख सहन न होऊन कण्हतो पण तो कण्हत नाही.
जन्म नसोन घातला । पतित नसोन जाला ।
यातना नसोन पावला । नानापरी ॥ ६ ॥
६) त्याला जन्म नसून जन्म घेतो. पतित नसून पतित होतो. आणि यातना नसून नाना प्रकारच्या यातना त्याला भोगाव्या लागतात. 
ऐसा श्रोतयांचा अनुमान । श्रोतीं घेतलें आडरान ।
आतां याचें समाधान । केलें पाहिजे ॥ ७ ॥
७) वक्त्याच्या बोलण्यावर तर्क चालवून श्रोत्यानें काढलेलें हें अनुमान बरोबर नाहीं. श्रोता विचारांच्या आडरानांत पडला आहे. तरी आतां त्याचे समाधान केलें पाहिजे.   
वक्ता म्हणे सावध व्हावें । तुम्ही बोलतां बरवें । 
परी हें तुमच्याच अनुभवें । तुम्हास घडे ॥ ८ ॥
८) वक्ता म्हणतो कीं, श्रोत्यांनीं नीट श्रवण करावें. तुमचें म्हणणें तुम्हांस येणार्‍या अनुभवाच्या दृष्टीनें बरोबर आहे.  
ज्याचा अनुभव जैसा । तो तो बोलतो तैसा ।
संपदेविण जो धिवसा । तो निरार्थक ॥ ९ ॥
९) ज्याला जसा अनुभव येतो तसा तो जीवनाचा अर्थ समजतो. आणि सांगतो. ज्याच्याजवळ फार संपत्ती नसते तो मोठें साहस करुं शकत नाही.  तसा प्रयनही निरर्थक असतो.  
नाहीं ज्ञानची संपदा । अज्ञानदारिद्रें आपदा ।
भोगिल्याच भोगी सदा । शब्दज्ञानें  ॥ १० ॥
१०) ज्या माणसाजवळ आत्मज्ञारुपी संपत्ती नसते, त्याच्याजवळ अज्ञानरुपी दारिद्र्य असतें. त्यामुळे तो अनेक दुःखे भोगतो. त्याची गति फक्त शब्दज्ञानापर्यंतच असते.  
योगी वोळखावा योगेश्र्वरें । ज्ञानी वोळखावा ज्ञानेश्र्वरें ।          
माहाचतुर तो चतुरें । वोळखावा ॥ ११ ॥
११) योग्याची अवस्था योग्यासच कळते. ज्ञान्याची अवस्था ज्ञानी पुरुषासच कळते. चतुर पुरुषच मोठ्या चतुर पुरुषास ओळखूं शकतो.  
अनुभवी अनुभवियास कळे । अलिप्त अलिप्तपणें निवळें ।
विदेहाचा देहभाव गळे । विदेही देखतां ॥ १२ ॥
१२) स्वानुभवी पुरुषच आत्मज्ञानी पुरुषास ओळखतो. जो स्वतः अलिप्त असतो तोच अलिप्तपणानें संपन्न पुरुष ओळखतो. स्वतः विदेही असलेला पुरुष दुसर्‍या विदेही पुरुषास पाहून देहभान विसरतो.  
बद्धासारिखा सिद्ध । आणी सिद्धासारिखा बद्ध ।
येक भावील तो अबद्ध । म्हणावाच नलगे ॥ १३ ॥
१३) नुसत्या देहावरुन बघितलें तर एखादा सिद्ध पुरुष बद्धा सारखा दिसतो व बद्ध पुरुष सिद्धासारखा म्हणुन दोघांची योग्यता एकच आहे असें जो मानतो तो मूर्ख आहे हें सांगावयास नको. 
झडपला तो देहधारी । आणी देहधारक पंचाक्षरी ।
परंतु दोघां येकसरी । कैसी द्यावी ॥ १४ ॥ 
१४) भूतबाधा झालेला माणूस व भूत काढून टाकणारा पंचाक्षरी माणूस दोघे देहानें सारखेंच दिसतात. पण दोघांची योग्यता सारखीं नसते.    
तैसा अज्ञान पतित । आणी ज्ञानी जीवनमुक्त ।
दोघे समान मानील तो युक्त । कैसा म्हणावा ॥ १५ ॥
१५) त्याचप्रमाणे एखदा भ्रष्ट अज्ञानी माणूस व एखादा जीवनमुक्त ज्ञानी पुरुष दोघेही देहानें सारखेंच दिसतात. म्हणून दोघांची योग्यता सारखीच म्हणणारा माणूस विचारी कसा म्हणावा ? 
आतां असो हे दृष्टांत । प्रचित बोलों कांहीं हेत ।
येथें श्रोतीं सावचित्त । क्षणयेक व्हावें ॥ १६ ॥
१६) आतां हें दृष्टांत पुरें. स्वरुपानुभवाच्या कांहीं खुणा आतां सांगतो. श्रोत्यांनीं क्षणभर लक्ष देऊन त्या ऐकाव्यात.   
जो जो ज्ञानें गुप्त जाला । जो विवेकें विराला ।
जो अनन्यपणें उरला । नाहींच कांहीं ॥ १७ ॥
१७) आत्मज्ञानाच्या योगानें जो गुप्त होतो, म्हणजे ज्याचा मीपणा अंतर्धान पावतो, निदिध्यासानें जो स्वरुपामध्यें विलीन होतो, आणि स्वरुपाशी एकरुप झाल्यानें जो यत्किंचित वेगळेपणानें उरत नाहीं,
तयास कैसें गवसावें । शोधूं जातां तोचि व्हावें ।
तोचि होतां म्हणावें । नलगे कांहीं ॥ १८ ॥
१८) त्याला सापडवणें सोपें नसतें. जो त्याला शोधावयास जातो, तो स्वतः तेंच रुप बनतो. तो स्वतः तेंच झाल्यावर सगळें खुंटतें. बाकी कांहीं उरतच नाही.
देहीं पाहातां दिसेना । तत्त्वें शोधितां भासेना ।
ब्रह्म आहे निवडेना । कांहीं केल्यां ॥ १९ ॥  
१९) देहामध्यें त्याला पाहीला जावें तर तर तो तेथें नसतो. पंचभूतांमध्येंही तो दिसत नाही, ब्रह्मरुप होऊन तो ब्रह्मामध्यें तो असतो तरी त्यास स्वरुपाहून वेगळे काढून त्यास पाहता येत नाही.  
दिसतो तरी देहधारी । परी कांहींच नाहीं अंतरीं ।
तयास पाहातां वरिवरी । कळेना कैसा ॥ २० ॥
२०) बाहेरुन तो सामान्य माणसासारखा देहधारी दिसतो. पण त्याला " मी देह आहे ही जाणीव नसते. " अशा ज्ञानी पुरुषास वरवर पाहिलें तर त्याची आंतील अवस्था ध्यानांत येणार नाही.   
कळाया शोधावें अंतर । तंव तो नित्य निरंतर ।
जयास धुंडितां विकार । निर्विकार होती ॥ २१ ॥
२१) तो खरा कसा आहे हे कळण्यासाठीं त्याची अंतरस्थिती शोधून पहावी.  तसें केल्यावर कळतें कीं, तो सदासर्वदा शाश्वत वस्तु असतो. स्वस्वरुपाशीं तदाकार झालेला असतो. त्याचा शोध घेतां घेतां आपली देहबुद्धी नाहीशी होते. आणि आपण स्वतः निर्विकार सद्वस्तु बनतो.    
तो परमात्मा केवळ । तयास नाहीं मायामळ ।
अखंड हेतूचा विटाळ । जालाच नाहीं ॥ २२ ॥
२२) तो शुद्ध व केवल परमात्मस्वरुप असतो. त्याच्या ठिकाणीं मायेचा मल नसतो. कोणत्याही संकल्पाचा त्यास कधींही स्पर्श होत नाहीं.  
ऐसा जो कां योगीराज । तो आत्मा सहजीं सहज ।
पूर्णब्रह्म वेदबीज । देहाकारें कळेना ॥ २३ ॥
२३) अनुभवाच्या अशा उच्च पातळीवर स्थिर राहणारा योगीराज अगदी सहजपणें आत्मस्वरुप असतो. वेदाचें मूळ असणारा आणि पूर्णब्रह्मस्वरुप झालेला तो ज्ञानी त्याच्या देहावरुन ओलखता येणें शक्य नाहीं. 
देह भावितां देहचि दिसे । परी अंतर अनारिसें असे ।
तयास शोधितां नसे । जन्ममरण ॥ २४ ॥
२४) देहाच्या दृष्टीनें तो सामान्य देहधारी पुरुष वाटतो. पण त्याची आंतील स्थिती अगदी निराळीच असते. तिचा शोध घेतला तर त्यास जन्ममरण नाहीं हें समजून येतें. 
जयास जन्ममरण व्हावें । तें तो नव्हेचि स्वभावें ।
नाहींच तें आणावें । कोठून कैंचें ॥ २५ ॥
२५) अविद्येमुळें जीवपणा व जीवपणामुळें जन्ममरण. ज्ञानी पुरुषाची अविद्या व जीवपणा स्वस्वरुप साक्षात्कारानें आपोआप नाहींसें होतात. तो जीवरुप नसून परमात्मस्वरुप असतो. त्यामुळे त्यास जन्ममरण नसतें. जें नाहींच तें आणणार कोठून ?    
निर्गुणास जन्म कल्पिला । अथवा निर्गुण उडविला ।
तरी उडाला आणी जन्मला । आपला आपण ॥ २६ ॥
२६) ज्ञानी पुरुष निर्गुण असतो. त्यास जन्ममरण नसतें. पण अज्ञानी माणसानें निर्गुणास जन्म मरण असते अशी कल्पना केली, तरी निर्गुण जसेंच्या तसेंच राहते. ज्ञानी पुरुषाला कोणाच्या म्हणण्यानें जन्ममरण भोगावें लागत नाही. पण त्या कल्पना करणार्‍या अज्ञानी माणसासच तें भोगावें लागतें.    
माध्यांनीं थुंकितां सूर्यावरी । तो थुंका पडेल आपणाच वरी ।
दुसर्‍यास चिंतितां अंतरीं । आपणास घडे ॥ २७ ॥
२७) भर दुपारीं एखाद्यानें सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर तो थुंका त्याच्याच अंगावर पडतो. किंवा दुसर्‍याचे वाईट व्हावें असें आपण मनांत आणलें तर आपलेंच वाईट होते.   
समर्थ रायाचें महिमान । जाणतां होतें समाधान ।
परंतु भुंकों लागलें स्वान । तरी तें स्वानचि आहे ॥ २८ ॥
२८) समजा एक कर्तृत्ववान थोर पुरुष आहे, त्याचा थोरपणा समजला म्हणजे मनाचें समाधान होते. पण त्याच्यावर भुंकणारी कुत्रीं असतात. ती भुंकली तरी ती कुत्रीच आहेत म्हणून कोणी तिकडे लक्ष देत नाहीत.   
ज्ञानी तो सत्यस्वरुप । अज्ञान देखे मनुष्यरुप ।
भावासारिखा फळद्रूप । देव तैसा ॥ २९ ॥
२९) आत्मज्ञानी पुरुष परमात्मस्वरुप असतो. अज्ञानी त्याला सामान्य मनुष्य समजतात. जसा ज्याचा भाव तसा देव त्याला फलद्रुप होतो. ज्ञानी पुरुषाला जो सामान्य समजतो त्याला फलदेखिल माणसाचेंच प्राप्त होते.   
देव निराकार निर्गुण । लोक भाविती पाषाण ।
पाषाण फुटतो निर्गुण । फुटेल कैसा ॥ ३० ॥
३०) खरा देव निर्गुण आहे. तसाच तो ाकाररहितही आहे. सामान्य लोक पाषाणामध्यें त्याची भाचना करतात. पाषाण तर फुटतो, निर्गुण देव फुटणें शक्य नाही.  
देव सदोदित संचला । लोकीं बहुविध केला ।
परंतु बहुविध जाला । हें तों घडेना  ॥ ३१ ॥
३१) देव सगळीकडें गच्च भरुन आहे. सामान्य लोक त्याला अनेकपणानें भजतात. एकाला अनेकपण देतात. मात्र एकच एक असणारा देव अनेक होणें शक्य नाहीं. 
तैसा साधु आत्मज्ञानी । बोधें पूर्ण समाधानी ।
विवेकें आत्मनिवेदनी । आत्मरुपी ॥ ३२ ॥
३२) तसेंच साधु आत्मज्ञानी असतो. त्या ज्ञानानें तो संपूर्ण समाधानी असतो. निदिध्यासानें तो अनन्य होऊन आत्मस्वरुपाकार बनतो. 
जळोन काष्ठाचा आकार । अग्नि दिसे काष्ठाकार । 
परी काष्ठ होईल हा विचार । बोलोंच नये ॥ ३३ ॥
३३) एखादें लाकूड जेव्हां अग्नीने जळते तेव्हां अग्नीला त्या लाकडाचा आकार प्राप्त होतो. पण अग्नी लाकूड कधींच होत नाही.  
कर्पूर असे तो जळतां दिसे । तैसा ज्ञानीदेह भासे ।
तयास जन्मवितां कैसें । कर्दळीउदरी ॥ ३४ ॥
३४) कापूर जलतो तो जळतांना दिसतो, पण तो कर्दळीच्या पोटांत उत्पन्न होत नाही. त्याचप्रमाणें आत्मज्ञान धारण करणार्‍या ज्ञानी पुरुषाचा देह दिसतो; पण एकदा तो पतन पावला कीं ज्ञानी पुरुषास परत जन्म येत नाही.  
बीज भाजलें उगवेना । वस्त्र जळालें उकलेना ।
बोध निवडितां निवडेना । गंगेमधें ॥ ३५ ॥
३५) बी भाजलें कीं तें उगवत नाही. वस्त्र जळलें कीं तें उकलत नाहीं. एखदा  ओढा गंगेला मिळला कीं परत निराळा काढता येत नाही.  
बोध गंगेमागें दिसे । गंगा येकदेसी असे ।
साधु कांहींच न भासे । आणी आत्मा सर्वगत ॥ ३६ ॥
३६) ओढा गंगेला मिळण्यापूर्वी वेगळा दिसतो नंतर दिसत नाहीं. कारण गंगा एकदेशी आहे. त्यामुळें आधींचा ओढा दिसत राहतो. पण आत्मा सर्वदेसी आहे, सर्वव्यापी आहे व स्थळकाळाच्या त्याला मर्यादा नाहींत. त्यामुळें आत्मज्ञानी पुरुष एकदा का स्वरुपाकार झाला कीं वेगळा दिसत नाही. येथें गंगेची व ओढ्याचा दृष्टांत उणा पडतो.    
सुवर्ण नव्हे लोखंड । साधूस जन्म थोतांड ।
अज्ञान प्राणी जडमूढ । तयास हें उमजेचिना ॥ ३७ ॥
३७) सोनें म्हणजे सर्वोत्तम धातु तर लोखंड म्हणजे हीन धातु. त्याचप्रमाणें साधु हा सुवर्णासारखा तर अज्ञानी हा लोखंडासारखा समजावा. सामन्यांस पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पण साधूला पुन्हा जन्म नसतो. सामान्य अज्ञानी व मूढ माणसांना हें उमजत नाहीं.  
अंधास कांहींच न दिसे । तरी ते लोक आंधळे कैसे ।
सन्नपातें बरळतसे । सन्नपाती ॥ ३८ ॥
३८) आंधळ्या माणसास स्वतःला कांहींच दिसत नाहीं. म्हणून इतर सर्व माणसांना आंधळेंपणानें कांहीं दिसत नाहीं. असें म्हणता येणार नाहीं. सन्निपातज्वरामध्यें माणूस कांहींहीं बरळतो. त्याचप्रमाणें अज्ञानी माणूस साधूबद्दल कांहींहीं बडबडतो.  
जो स्वप्नामधें भ्याला । तो स्वप्नभयें वोसणाला ।
तें भयें जागत्याला । केवि लागे ॥ ३९ ॥
३९) एका माणसाला भयानक स्वप्न पडलें व तत्यामुळें तो घाबरला आणि मोठ्यानें ओरडला जागा असलेल्या माणसाला तें भय वाटणार नाहीं.
मुळीं सर्पाकार देखिली । येक भ्याला येकें ओळखिली ।
दोघांची अवस्था लेखिली । सारिखीच कैसी ॥ ४० ॥
४०) सर्पाचा आकार असलेली मुळी दोघांनी पाहीली. एक घाबरला तर दुसर्यानें ती मुळीं आहे हें ओळखलें. या दोघांची अवस्था सारखींच आहे असें म्हणता येत नाहीं कारण एक घाबरलेला आहे तर दुसरा निर्भय आहे.  
हातीं धरितां हि डसेना । हें येकास भासेना ।
तरी ते त्याची कल्पना । तयासीच बाधी ॥ ४१ ॥
४१) ती मुळीं हातात धरली तरी चावत नाहीं हें घाबरलेल्या माणसाला पटत नाही. ती मुळी नसून सापच आहे ही त्याची कल्पनाच त्याला बाधते.  
विंचु सर्प डसला । तेणें तोचि जाकळला ।
तयाचेनि लोक जाला । कासावीस कैसा ॥ ४२ ॥
४२) ज्या मानसाला साप किंवा विंचू चावतो, त्यालाच तें वीष बाधून तो कासावीस होतो. त्या वीषानें इतर लोक कासावीस होत नाहीत.    
आतां तुटला अनुमान । ज्ञानियास कळे ज्ञान ।
अज्ञानास जन्ममरण । चुकेचिना ॥ ४३ ॥
४३) आतां श्रोत्यानें काढलेल्या शंकेचें निरसन झालें. जो स्वतः ज्ञानी असतो त्यालाच ज्ञानी पुरुषाची अवस्था आकलन होतें. जो अज्ञानी असतो त्याचे मात्र जन्ममरण चुकत नाही.   
येका जाणण्यासाठीं । लोक पडिले अटाटीं ।
नेणपणें हिंपुटी होती । जन्ममृत्यें ॥ ४४ ॥
४४) आपणास ज्ञान व्हावें यासाठीं लोक खटपट करीत असतात. पण अज्ञानामुळें त्यांचे जन्ममृत्यु कांहीं चुकत नाहीत. त्यामुळें त्यांना दुःख भोगावें लागतें. 
तेंचि कथानुसंधान । पुढें केलें परिछिन्न ।
सावधान सावधान । म्हणे वक्ता ॥ ४५ ॥
४५) हाच विषय पुढें अगदी स्पष्ट करुन सांगितला आहे. म्हणून श्रोत्यांनी फार लक्ष द्यावें. अशी वक्ता विनंती करतो. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे निःसंदेहनिरुपणनाम समास तिसरा ॥
Samas Tisara NisSandeh Nirupan
समास तिसरा निःसंदेह निरुपण 


Custom Search

No comments: