Monday, October 9, 2017

Samas Pachava Sthula PanchaMahabhute Aakasha समास पांचवा स्थूळपंचमहाभूतें आकाश


Dashak Aathava Samas Pachava Sthula PanchaMahabhute Aakasha 
Samas Pachava Sthula PanchaMahabhute Swaroop, It is in Marathi. In earlier Samas Samarth Ramdas had told us about Swaroop of PanchaMahaBhute. There are five Mahabhute. These Mahabhute are Aakasha (Sky), Pruthavi (Earth), Jala (Water), Vayu (Wind) and Teja (Fire). Here Samarth is telling us the difference between Aakash and Brahma. Many people thinks that Aakash and Brahma are same even Aakash is Brahma itself. However it is not like that as told by Samarth Ramadas.
समास पांचवा स्थूळपंचमहाभूतें आकाश
स्वरुपाकाशभेदो
श्रीराम ॥
केवळ मूर्ख तें नेणे । म्हणौन घडलें सांगणें ।
पंचभूतांची लक्षणें । विशद करुनि ॥ १ ॥ 
१) जे मंदबुद्धिचे आहेत त्यांना समजणार नाहींत. म्हणून पंचभूतांची लक्षणें अधिक स्पश्टपणें सांगावी लागत आहेत.    
पंचभूतांचा कर्दम जाला । आतां नवचे वेगळा केला ।
परंतु कांहीं येक वेगळाला । करुन दाऊं ॥ २ ॥
२) वास्तविक पंचमहाभूतें एकमेकांत मिसळून गेली आहेत. त्यामुळें त्यंचा चिखलच झाला आहे. त्यांना वेगळें काढणें शक्य नाही. तरी जेवढे वेगळेपण दाखवता येईल तेवढें करुन दाखवितो.   
पर्वत पाषाण शिळा शिखरें । नाना वर्णें लाहान थोरें ।
खडे गुंडे बहु प्रकारें । जाणिजे पृथ्वी ॥ ३ ॥
३) पर्वत, दगड, मोठे दगड, शिखरें, त्यांचे नाना रंग, लहान मोठे आकार, खडे, गोटे हे सारे पृथ्वी समजावेत.  
नाना रंगांची मृत्तिका । नाना स्थळोस्थळीं जे कां ।
वाळुके वाळु अनेका । मिळोन पृथ्वी ॥ ४ ॥
४) निरनिराळ्या ठिकाणी असणारी निरनिराळ्या रंगाची माती, जाड, बारीक असे वाळूचे अनेक प्रकार हे पृथ्वीमय असतात. 
पुरें पट्टणें मनोहरें । नाना मंदिरें दामोदरें ।
नाना देवालयें शिखरें । मिळोन पृथ्वी ॥ ५ ॥
५) गांवें, सुंदर शहरे, नाना प्रकारची साधी व रत्नखचित मंदिरें, त्यांची शिखरें पृथ्वीमय असतात. 
सप्त द्वीपावती पृथ्वी । काये म्हणोनि सांगावी ।
नव खंडे मिळोन जाणावी । वसुंधरा ॥ ६ ॥
६) पृथ्वी सात द्विपामध्यें विभगली आहे. किती म्हणून सांगावीत. नऊ खंड मिळून पृथ्वीच आहे. 
नाना देव नाना नृपती । नाना भाषा नाना रिती ।
लक्ष चौर्‍यासी उत्पत्ती । मिळोन पृथ्वी ॥ ७ ॥
७) निरनिराळे देव, राजे, वेगवेगळ्या भाषा, रिती, चौर्‍यांशी लक्षाची निरनिराळ्या योनींतील प्राण्यांची उत्पत्ती मिळून पृथ्वी झाली आहे.  
नाना उद्वसें जें वनें । नाना तरुवरांचीं वनें ।
गिरीकंदरें नाना स्थानें । मिळोन पृथ्वी ॥ ८ ॥  
८) ओसाड रानें, निरनिराळ्या मोठ्या झाडांनी भरलेलीं जंगलें, डोंगर, दर्‍या, वगैरे सर्व स्थळें मिळून पृथ्वी झाली आहे.    
नाना रचना केली देवीं । जे जे निर्मिली मानवीं ।
सकळ मिळोन पृथ्वी । जाणिजे श्रोतीं ॥ ९ ॥
९) निसर्गानें केलेल्या नाना रचना, माणसानें केलेल्या निरनिराळ्या रचना, सर्व मिळून पृथ्वीच आहे. हे श्रोत्यांनी जाणून घ्यावें.  
नाना धातु सुवर्णादिक । नाना रत्नें जे अनेक ।
नाना काष्ठवृक्षादिक । मिळोन पृथ्वी ॥ १० ॥
१०) सोनें,चांदी, लोखंड, निरनिराळे धातु, निरनिराळी रत्नें, लांकडे व झाडे हें सगळें मिळून पृथ्वी होय.   
आतां असो हें बहुवस । जडांश आणि कठिणांश ।
सकळ पृथ्वी हा विश्र्वास । मानिला पाहिजे ॥ ११ ॥
११) हीं उदाहरणें देणें आतां पुरें. जें जें अचेतन व कठिण असतें, तें सारें पृथ्वीमय असते असा विश्र्वास बाळगावा.  
बोलिलें पृथ्वीचें रुप । आतां सांगिजेल आप ।
श्रोतीं वोळखावें रुप । सावध होउनी ॥ १२ ॥
१२) आतांपर्यंत पृथ्वीचें रुप सांगितले. आतां पाणी कसें आढळते तें सांगतो. श्रोत्यांनी पाण्याचें रुप लक्ष देऊन ऐकावे. 
वापी कूप सरोवर । नाना सरितांचें जे नीर ।
मेघ आणी सप्त सागर । मिळोन आप ॥ १३ ॥ 
१३)  विहिर, आड, तलाव, निरनिराळ्या नद्यांतील पाणी, ढग, आणि सातसमुद्र मिळून सगळे पाणीच आहे.     
श्र्लोकार्ध
क्षारक्षीरसुरासर्पिर्दधि इक्षुर्जलं तथा ।
अर्थ 
मिठाचा, दुधाचा, दारुचा, तुपाचा, दह्याचा, उसाच्या रसाचा, आणि गोड पाण्याचा असे सात समुद्र आहेत.   
क्षारसमुद्र दिसताहे । सकळ जन दृष्टीस पाहे ।
जेथें लवण होताहे । तोचि क्षारसिंधु ॥ १४ ॥
१४) खारट समुद्र नेहमी पाहण्यांत येतो. तो सर्वांना माहित आहे. त्यांतून मीठ निघते म्हणून तो क्षार समुद्र होय.  
येक दुधाचा सागर । त्या नाव क्षीरसागर ।
देवें दिधला निरंतर । उपमन्यासी ॥ १५ ॥
१५) एक दुधाचा सागर आहे. त्याला क्षीरसागर म्हणतात. उपमन्यूला तो देवानेम कायमचा देउन टाकला आहे.  
येंक समुद्र मद्याचा । येक जाणावा घृताचा ।
येक निखळ दह्याचा । समुद्र असे ॥ १६ ॥
१६) एक सागर दारुचा तर एक तूपाचा आहे. तसाच एक सागर नुसत्या दह्याचा आहे.   
येक उसाच्या रसाचा । येक तो शुद्ध जळाचा ।
ऐसा साता समुद्रांचा । वेढा पृथ्वीयेसी ॥ १७ ॥
१७) एकसागर उसाच्या रसाचा आहे, तर एक सागर शुद्ध पाण्याचा आहे. असा सात समुद्रांचा वेढा पृथ्वीभोवतीं पडलेला आहे.  
एवं भूमंडळीचे जळ । नाना स्थळींचे सकळ ।
मिळोन अवघें केवळ । आप जाणावें ॥ १८ ॥
१८) याप्रमाणें पृथ्वीवर व सभोवतीं अनेक ठिकाणी पाणी आहे. हें सगळें मिळून पाणीच होय. 
पृथ्वी गर्भीं कितीयेक । पृथ्वींतळीं आवर्णोदक ।
तिहीं लोकींचें उदक । मिळोन आप ॥ १९ ॥
१९) पृथ्वीच्या पोटांत पाणी आहे. पृथ्वीच्या सभोवतीं पाणी आहे. असे तिन्ही लोकांतील मिळून पाणीच होय. 
नाना वल्ली बहुवस । नाना तरुवरांचे रस ।
मध पारा अमृत विष । मिळोन आप ॥ २० ॥
२०) पुष्कळ प्रकारच्या वेलीं, अनेक प्रकारच्या झाडांचे रस, मध, पारा, अमृत, वीष हें सारें पाणीच होय. 
नाना रस स्नेहादिक । याहि वेगळे अनेक ।
जळावेगळें अवश्यक । आप बोलिजे ॥ २१ ॥
२१) तेलाप्रमाणें स्निग्ध असे अनेक पातळ पदार्थ आहेत. ते पाण्यापासून वेगळें दिसतात. पण ते सारे पाणीच समजावेत.  
सारद्र आणी सीतळ । जळासारिखें पातळ ।
शुक्लीत श्रोणीत मूत्र लाळ । आप बोलिजे ॥ २२ ॥ 
२२) पाण्यासारखें पातळ पदार्थ, रेत, रक्त, मूत्र, लाळ, इत्यादि जे ओले व थंड असतात, ते सगळे पाणीच होय.   
आप संकेतें जाणावें । पातळ बोलें वोळखावें ।
मृद सीतळ स्वभावें । आप बोलिजे ॥ २३ ॥
२३) सारांश पाणी या खुणांवरुन ओळखावे. जो पदार्थ पातळ, ओला, मऊ, व थंड असतो तो पाणीमय असतो. 
जाला आपाचा संकेत । पातळ मृद गुळगुळित ।
स्वेद श्र्लेष्म अश्रु समस्त । आप जाणावें ॥ २४ ॥ 
२४) पाण्याची खूण सांगून झाली. जें जें पातळ, मऊ, गळगुळीत असते जसें कीं, घाम, कफ, अश्रू इत्यादि तें सारें पाणीच होय.  
तेज ऐका सावधपणें । चंद्र सूर्य तारांगणें । 
दिव्य देह सतेजपणें । तेज बोलिजे ॥ २५ ॥
२५) आतां तेजाबद्दल सांगतो. तें सावधपणें ऐकावें. चंद्र, सूर्य, तारांचा समूह, तेजोमय दिव्य देह, हें सगळें तेजमय होय. 
वन्ही मेघी विद्युल्यता । वन्ही सृष्टी संव्हारिता ।
वन्ही सागरा जाळिता । वडवानळु ॥ २६ ॥ 
२६) तेज म्हणजे अग्नि होय. मेघामध्यें विजेच्या रुपानें अग्नि असतो. प्रलयकालाचा अग्नि सृष्टीचा संहार करतो. वडवाग्नि सागराला जाळतो.  
वन्ही शंकराचे नेत्रींचा । वन्ही काळाचे क्षुधेचा ।
वन्ही परीघ भूगोळाचा । तेज बोलिजे ॥ २७ ॥
२७) शंकराच्या तिसर्‍या डोळ्यांत अग्नि आहे. काळ हा सर्व भक्षक आहे. अग्नी हा सर्व पृथ्वीला वेढून आहे. हे सगळें तेजाचेच प्रकार समजावे. 
जें जें प्रकाशरुप ।तें तें तेजाचें स्वरुप ।
शोषक उष्णादि आरोप । तेज जाणावें ॥ २८ ।
२८) जें जें प्रकाशमय आहे तें तें सारे तेजाचें रुप होय. शोषण करणारे, वाळवणारें किंवा कोरडे करणारे किंवा उष्ण हे सर्व शब्द तेजाचेच अस्तित्व दाखवितात. 
वायो जाणावा चंचळ । चैतन्य चेतवी केवळ ।
बोलणें चालणें सकळ । वायोमुळें ॥ २९ ॥
२९) वायु चंचल असतो. वायूमुळें जिवंतपणा असतो. म्हणजेच चैतन्य. चेतनेमुळेंच प्राणी हालचाल करतात. त्यांचे बोलणें, चालणें सगळें कांहीं वायुमुळेंच होते. 
हाले डोले तितुका पवन । कांहीं न चले पवनेंविण ।
सृष्टी चाळाया कारण । मूळ तो वायो ॥ ३० ॥
३०) दृश्य वस्तूंतील सर्व हालचाल वायूच्या सामर्थ्यानें चालते. वायु नसेल तर सर्व हालचाल थंड पडेल. विश्वांतील सर्व घटनांची घडामोड वायुमुळेंच होते. 
चळण वळण आणि प्रासारण । निरोध आणि अकोचन ।
सकळ जाणावा पवन । चंचळरुपी ॥ ३१ ॥
३१) चलन, वलन, पसरणें, प्रतिकार करणें, आकुंचन पावणे या सर्व क्रिया चंचल वायुमुळें घडून येतात. 
प्राण अपान आणी व्यान । चौथा उदान आणी समान ॥
नाग कूर्म कर्कश जाण । देवदत्ता धनंजये ॥ ३२ ॥ 
३२) वायु प्राणरुपानें शरीरांत राहतो. प्राण, ापान, व्यान, उदान व समान हें पांच मुख्य प्राण आहेत. नाग, कूर्म, कृकल, देवदत्त व धनंजय हे पांच उपप्राण आहेत.   
जितुकें कंहीं होतें चळण । तितुकें वायोचें लक्षण ।
चंद्र सूर्य तारांगण । वायोचि धर्ता ॥ ३३ ॥
३३) विश्वामध्यें जी गति आढळते, जी हालचाल दिसते. तें सगळें वायूचें लक्षण समजावें. चंद्र, सूर्य व तारा समूह यांना आपल्या स्थानावर धरुन ठेवणारा केवळ वायुच आहे.  
आकाश जानावें पोकळ । निर्मळ आणी निश्र्चळ ।
अवकाशरुप सकळ । आकाश जाणावें ॥ ३४ ॥ 
३४) आकाश पोकळ आहे, निर्मळ आहे आणि स्थिर आहे. सर्व दिशांना पसरलेला जो अवकाश आहे तोच आकाश समजावा.   
आकाश सकळांस व्यापक । आकाश अनेंकीं येक ।
आकाशाचें कौतुक । चहूं भूतांचें ॥ ३५ ॥
३५) आकाश सर्व विश्र्वाला व्यापून आहे. तें अनेकांमध्यें एकपणानें राहते. पृथ्वी, आप, तेज व वायु या चार भूतांचा सर्व पसारा आकाशामध्येंच असतो. 
आकाशाऐसें नाहीं सार । आकाश सकळांहूनी थोर ।
पाहातां आकाशाचा विचार । स्वरुपासारिखा ॥ ३६ ॥
३६) आकाशाइतके सूक्ष्म दुसरें कांहीं नाहीं. आकाश सर्वांहून मोठे आहे. आकाशाचा विचार करुं लागलें म्हणजे परब्रह्माचा विचार करतो असा भास होतो.
तव शिष्यें केला आक्षेप । दोहीचें सारखेंची रुप ।
तरी आकाशचि स्वरुप । कां म्हणों नये ॥ ३७ ॥
३७) येथें शिष्यानें आक्षेप घेतला कीं, आकाशाचें व ब्रह्माचे रुप जर सारखेंच आहे तर आकाश हेंच ब्रह्म आहे असें कां म्हणू नये ?
आकाश स्वरुपा कोण भेद । पाहातां दिसती अभेद ।
आकाश वस्तुच स्वतसिद्ध । कां न म्हणावी ॥ ३८ ॥
३८) आकाश आणि ब्रह्म यांत भेद काय? सहज पाहिलें तर दोघांत अभेद दिसतो. मग आकाश हेंच स्वतःसिद्ध ब्रह्म आहे असें कां म्हणू नये?  
वस्तु अचळ अढळ । वस्तु निर्मळ निश्र्चळ । 
तैसेंचि आकाश केवळ । वस्तुसारिखें ॥ ३९ ॥
३९) परब्रह्म अचळ आहे, अढळ आहे, निर्मळ आहे, निष्चल आहे, आकाश देखील अगदी तसेंच वस्तुसारखें आहे.  मग आकाशाला परब्रह्म कां म्हणू नये? 
ऐकोनि वक्ता बोले वचन । वस्तु निर्गुण पुरातन ।
आकाशाआंगीं सप्त गुण । शास्त्रीं निरोपिले ॥ ४० ॥
४०) शिष्याचा आक्षेप ऐकून वक्ता उत्तर देऊं लागला. तो म्हणतो, ब्रह्मवस्तु निर्गुण आहे तशीच ती सनातन म्हणजे कायम टिकणारी आहे. पण शास्त्रकारांनी आकाशाचे सात गुण सांगितलें आहेत.  
काम क्रोध शोक मोहो । भय अज्ञान सुन्यत्व पाहो ।
ऐसा सप्तविधा स्वभाव । आकाशाचा ॥ ४१ ॥  
४१) काम, क्रोध, शोक, मोह, भय, अज्ञान आणि शून्यपणा हे सात प्रकारचे गुण आकाशाचे स्वभावधर्म आहेत तें पाहून घ्यावें. 
ऐसें शास्त्राकारें बोलिलें । म्हणौनि आकाश भूत जालें ।
स्वरुप निर्विकार संचलें । उपमेरहित ॥ ४२ ॥
४२) शास्त्रकारांनी असें सांगून ठेवले आहे. त्यावरुन आकाश हेम पंचभूतांपैकी एक मानलें आहे. याउलट ब्रह्मरुप निर्विकार आहे व ते अविकारीपणें सगळीकडे गच्च भरले आहे. 
काचबंदि आणी जळ । सारिखेंच वाटे सकळ ।
परी येक काच येक जळ । शाहाणे जाणती ॥ ४३ ॥
४३) कांच बसवलेली जमीन आणी जमीन दोन्ही सारखींच दिसतात. त्या जमिनीवर पाणी आहे असें समजून माणूस फसतो. परंतु शहाणे लोक दोहींमधील फरक बरोबर ओळखतात.  
रुवामध्यें स्फटिक पडिला । लोकीं तद्रूप देखिला ।
तेणें कपाळमोक्ष जाला । कापुस न करी ॥ ४४ ॥
४४) कापसाच्या राशीवर जर स्फटिक पडला तर तो अगदी कापसाप्रमाणें दिसतो. पण त्यावर जर डोकें आपटलें तर कपाळमोक्ष होतो. नुसत्या कापसावर डोकें आपटलें तर तसें होत नाही.    
तंदुलामधें श्र्वेत खडे । तंदुलासारिखेच वांकुडे । 
चाऊं जातां दांत पडे । तेव्हां कळे ॥ ४५ ॥
४५) तांदळामध्यें पांढरें खडे असतात. त्यांचा आकार तांदळासारखाच असतो. पण ते खडे जर घासांत आले तर दांत पडतात. तेव्हां कलतें कीं तें खडे होते तांदूळ नव्हते.  
त्रिभागामधें खडा असे । त्रिभागासारिखाच भासे ।
शोधूं जातां वेगळा दिसे । कठिणपणें ॥ ४६ ॥
४६) चुना, वाळु व ताग यांचे मिश्रण करुन तें घोटतात. त्यास त्रिभाग म्हणयात. तें अगदी मऊं बनते. त्यामध्यें एखादा खडा असेल तर त्याच्या कठिणपणामुळें तो सहज बाजुस काढता येतो. 
गुळासारिखा गुळदगड । परी तो कठिण निचाड ।
नागकांडी आणी वेखंड । येक म्हणों नये ॥ ४७ ॥ 
४७) गुलानें सर्व बाजुंनी भरलेला दगड गुळाच्या खड्यासारखा दिसतो. पण तो आंतबाहेर कठिणच असतो. तसेंच नागकांडी व वेखंड बाहेरुन अगदी सारखेंच दिसतात. पण त्यांना कोणी एक म्हणत नाही.  
सोनें आणी सोनपितळ । येकचि वाटती केवळ ।
परी पितळेसी मिळतां ज्वाळ । काळिमा चढे ॥ ४८ ॥
४८) सोनें च सोनपितळ वरुन पाहिलें तर अगदी सारखेंच वाटतात. पण पितळ आगींत टाकलें कीं, काळें पडते. सोनें काळें पडत नाही. 
असो हे हीन दृष्टांत । आकाश म्हणिजे केवळ भूत ।
तें भूत आणी अनंत । येक कैसे ॥ ४९ ॥
४९) असो. हे हीन दृश्टांत देऊन आकाश व परब्रह्म एक कसें नाहींत हें दाखवणें पुरें झाले. आकाश केवळ पंचभूतांपैकी एक भूत आहे. अनंत ब्रह्म व पंचभूतांपाोकी एक आकाश दोन्ही एक कसें असूं शकेल ? 
वस्तुसी वर्णचि नसे । आकाश शाम वर्ण असे ।
दोहींस साम्यता कैसे । करिती विचक्षण ॥ ५० ॥ 
५०) परब्रह्माला रंग नाही तर आकाशाला नीलवर्ण आहे. ब्रह्मवस्तु अतींद्रिय आहे. तिच्या ठिकाणीं शब्द, स्पर्श, रुप, रस व गंध नाहीत. ती निर्गुण आहे. तीला रंगअसणें शक्य नाही. म्हणून शहाणे लोक दोहोंचे साम्य मानीत नाहीत.  
श्रोते म्हणती कैचें रुप । आकाश ठाईंचे अरुप ।
आकाश वस्तुच तद्रूप । भेद नाहीं ॥ ५१ ॥
५१) श्रोते म्हणतात, आकाशाच्या रुपाचा प्रश्र्णच नाही. आकाशाला मुळांत कांहीं रुप नाहीं. म्हणून आकाश ब्रह्माशी तद्रूप आहे. दोघांमध्यें मुळींच भेद नाही. असें कां म्हणू नये? 
चहूं भूतांस नाश आहे । आकाश कैसें नासताहे ।
आकाशास न साहे । वर्ण वेक्ती विकार ॥ ५२ ॥  
५२) पांच भूतांपैकी चार भूतांना नाश आहे. पण आकाशाला मात्र नाश नाही. व्यक्त आकार नाही. कोणता विकार नाही.      
आकाश अचळ दिसतें । त्याचें काये नासों पाहातें ।
पाहातां आमुचेनि मतें । आकाश शाश्र्वत ॥ ५३ ॥
५३) शिवाय आकाश अचल दिसते. त्याचे कांहींच नाश पावत नाही. म्हणून आमच्या ( श्रोत्यांच्या ) मतें आकाशच शाश्वत ब्रह्म आहे.  
ऐसें ऐकोन वचन । वक्ता बोले प्रतिवचन ।
ऐक आतां लक्षण । आकाशाचें ॥ ५४ ॥
५४) श्रोत्याचा आक्षेप ऐकून वक्त्यानें उत्तर दिलें तें ऐका. आकाशाचें लक्षण सांगतो.  
आकाश तमापासून जालें । म्हणौन काम क्रोधें वेष्टिलें ।
अज्ञान सुन्यत्व बोलिलें । नाम तयाचें ॥ ५५ ॥
५५) आकाश तमोगुणापासून निर्माण झाले आहे. त्यामुळें कामक्रोध वगैरे विकारांनी तें वेधलेले आहे. तें शून्यमय आहे. म्हणून अज्ञान हें नांव त्यास देतात.  
अज्ञानें कामक्रोधादिक । मोहो भये आणी शोक ।
हा अज्ञानाचा विवेक । आकाशगुणें ॥ ५६ ॥
५६) अज्ञानमय असल्यामुळें काम, क्रोध, मोह, भय, शोक, इत्यादि विकार आकाशाच्या टिकाणीं असतात. आकाशाचा गुण अज्ञान व त्या अज्ञानाचे असें विवेचन करतां येते. 
नास्तिक नकारवचन । तेंचि सुन्याचें लक्षण ।
तयास म्हणती हृदयसुन्य । अज्ञान प्राणी ॥ ५७ ॥
५७) शून्य म्हणजे जें नाहीं तें नाहीपणानें सांगणें हेच शून्याचें लक्षण होय. जो अज्ञानी आहे त्यास हृदयशून्य म्हणतात. त्याचे कारण हेंच होय.
आकाश स्तब्धपणें सुन्य । सुन्य म्हणिजे तें अज्ञान ।
अज्ञान म्हणिजे कठिण । रुप तयाचें ॥ ५८ ॥
५८) आकाशाचा स्तब्धपणा हा शून्यमय आहे. शून्य म्हणजे अज्ञान होय. अज्ञान म्हणजे जडत्व. अर्थात् आकाश स्थूल आहे, जड आहे.  
कठिण सुन्य विकारवंत । तयास कैसे म्हणावें संत ।
मनास वाटे हें तद्वत । आहाच दृष्टीं  ॥ ५९ ॥
५९) जड, शून्य, आणि विकारवंत आकाशाला सूक्ष्म,सद्रूप, निर्विकार ब्रह्माची बरोबरी कशी होऊं शकेल? आकाश हें ब्रह्मासारखें आहे हे आपल्याला वाटते पण असें वाटणें हा वरवर पाहन्याचा परिणाम आहे. ही खरी दृष्टी नव्हे. 
अज्ञान कालवलें आकाशीं । तया कर्दमा ज्ञान नासी ।
म्हणोनियां आकाशासी । नाश आहे ॥ ६० ॥ 
६०) अज्ञान व आकाश एकमेकांत कालवलेले असतात. आत्मज्ञानानें त्या मिश्रणाचा नाश होतो. म्हणून आकाश नाशवंत आहे.       
तैसें आकाश आणि स्वरुप । पाहातां वाटती येकरुप । 
परी दोहींमधें विक्षेप । सुन्यत्वाचा ॥ ६१ ॥
६१) आकाश आणि ब्रह्मस्वरुप दोन्ही वरवर पाहिलें तर एकरुप आहेत असा भास होतो. पण आकाश शून्यरुप आहे आणि ब्रह्म शून्यरुप नाहीं हा त्याच्यामध्यें फारच मोठा फरक आहे. 
आहाच पाहातां कल्पनेसी । सारिखेंच वाटे निश्र्चयेंसीं ।
परी आकाश स्वरुपासी । भेद आहे ॥ ६२ ॥
६२) श्रोत्याच्या कल्पनेप्रमाणें आकाश व ब्रह्म अगदी सारखेंच आहेत असें नक्कीच वाटते. पण दोन्हीमध्यें भेद आहे हें देखिल तितकेंच खरें आहे.  
उन्मनी आणि सुषुप्ति अवस्ता । सारिखेच वाटे तत्वता । 
परी विवंचून पाहों जातां । भेद आहे ॥ ६३ ॥
६३) उन्मनी अवस्था व गाड झोपेची अवस्था बाहेरुन सारख्याच वाटतात. पण उन्मनीमध्यें शुद्ध जाणीव जागी असते तर सुषुप्तीमध्यें जाणीवेचा अज्ञानामध्यें पूर्ण लय असतो. दोन्ही अवस्थांमध्यें असा मूलभूत भेद आहे.   
खोटें खर्‍यासारिखें भाविती । परी परीक्षवंत निवडिती ।
कां कुरंगें देखोन भुलती । मृगजळासी ॥ ६४ ॥
६४) जें खरें नाहीं तें खर्‍यासारखें भासलें तरी परीक्षा करणारे लोक खर्‍यातून खोटे निवडून काढतात. मृगजळाला भूलुन हरणें भुलतात व त्याच्यामागें धांवतात.  
आतां असो हा दृश्टांत । बोलिला कळाया संकेत । 
म्हणौनि भूत आणि अनंत । येक नव्हेती ॥ ६५ ॥
६५) दृष्टांताच्या आधारें हा विषय सांगणें आतां पुरें. आकाश व ब्रह्म यांतील फरक लक्षांत येण्यासाठीं मागील दृष्टांत सांगितलें. थोडक्यांत आकाश व ब्रह्म येक नव्हेत.  
आकाश वेगळेंपणें पाहावें । स्वरुपीं स्वरुपचि व्हावें ।
वस्तुचें पाहाणें स्वभावें । ऐसे असे ॥ ६६ ॥
६६) द्रष्टा वेगळा राहून दृश्यपणानें आकाश बघूं शकतो. परंतु ब्रह्मस्वरुप पाहण्यासाठीं द्रष्ट्याला ब्रह्मस्वरुप व्हावे लागते. 
येथें आशंका फिटली । संदेहवृत्ती मावळली ।
भिन्नपणें नवचे अनुभवली । स्वरुपस्थिती ॥ ६७ ॥ 
६७) हें सांगितल्यावर श्रोत्यांच्या संशयाचें निरसन झालें. त्यांची संदेहवृत्ती पार नाहीशी झाली. त्यांच्या बरोबर लक्षांत आलें कीं, ब्रह्माहून वेगळें राहून ब्रह्मस्थिती अनुभवता येत नाही.     
आकाश अनभवा येतें । स्वरुप अनुभवापरतें ।
म्हणोनियां आकाशातें । साम्यता न घडे ॥ ६८ ॥
६८) अनुभव घेणारा मी वेगळा राहून आकाशाचा अनुभव घेऊं शकतो. परंतु ब्रह्मस्वरुप अशा द्वैतमय अनुभवाच्या पलीकडे आहे. म्हणून आकाश व ब्रह्म दोन्ही एकच असूं शकत नाहीत. दोन्हीमध्यें साम्यता नाही.  
दुग्धासारिखा जळांश । निवडूं जाणती राजहंस ।
तैसें स्वरुप आणी आकाश । संत जाणती ॥ ६९ ॥
६९) दुधामध्यें पाणी मिसळले तर तें दुधासारखें दिसते. पण राजहंस तें पाणी निराळें काढूं शकतो. त्याचप्रमाणें आकाश व ब्रह्म एकरुप दिसतात. पण संत मात्र त्यांच्यांतील भेद बरोबर जाणतात.  
सकळ माया गथागोवी । संतसंगें हे उगवावी ।
पाविजे मोक्षाची पदवी । सत्समागमें ॥ ७० ॥
७०) मायेचा हा पंचभूतात्मक दृश्याचा पसारा गुंतागुंतीचा आहे. संतांच्या संगतींत राहून ही गुंतागुंत सोडवावी. संतांचा सत्संगतीनें मोक्ष प्राप्त करुन घ्यावा.   
इति श्रीदासबोधें गुरुशिष्यसंवादे स्थूळपंचमहाभूतें स्वरुपाकाशभेदोनाम समास पांचवा ॥
Samas Pachava Sthula PanchaMahabhute
समास पांचवा स्थूळपंचमहाभूतेंCustom Search

No comments: