Sunday, October 15, 2017

Samas Satava Molksha Lakshan समास सातवा मोक्षलक्षण


Dashak Aathava Samas Satava Molksha Lakshan 
Samas Satava Moksha Lakshan, It is in Marathi. Moksha means Mukti. Mukti means when devotee becomes one with God, he is free from Birth and Death. What are the things that bind the devotee and he has to take birth and death again and again; are explained by Swami Samarth Ramdas in this Samas with some other aspects.
समास सातवा मोक्षलक्षण  
श्रीराम ॥
मागां श्रोतयांचा पक्ष । कितां दिवसां होतो मोक्ष ।
तेचि कथा श्रोते दक्ष । होऊन ऐका ॥ १ ॥
१) मागें श्रोत्यांनी असें विचारलें कीं, मोक्ष मोळण्यास किती दिवस लागतात ? त्याचे उत्तर श्रोत्यांनी सावधपणें ऐकावे. 
मोक्षास कैसें जाणावें । मोक्ष कोणास म्हणावें ।
संतसंगें पावावें । मोक्षास कैसें ॥ २ ॥
२) मोक्षाला कसें ओळखावें ? मोक्ष कशाला म्हणावें ? संतसंगानें मोक्ष कसा काय प्राप्त होतो ?
तरी बद्ध म्हणिजे बांधला । आणी मोक्ष म्हणिजे मोकळा जाला ।
तो संतसंगें कैसा लाधला । तेंहि ऐका ॥ ३ ॥  
३)  बद्ध म्हणजे बांधलेला. मोक्ष म्हणजे बंधनांतून मोकळा झालेला. संतसंगतीनें बांधलेला मोकळा कसा होतो तें आतां ऐका. 
प्राणी संकल्पें बांधला । जीवपणें बद्ध जाला ।
तो विवेकें मुक्त केला । साधुजनीं ॥ ४ ॥
४) प्राणी संकल्पानें बांधला जातो. मी जीव आहे असा बद्धपणा त्याला येतो. साधुपुरुष जीवाला आत्मानात्मविवेक शिकवून बंधनांतून मोकळा करतात. 
मी जीव ऐसा संकल्प । दृढ धरितां गेले कल्प ।
तेणें प्राणी जाला अल्प । देहबुद्धीचा ॥ ५ ॥
५) मी जीव आहे असा संकल्प केला.तो मनांत बराच काळ धरुन ठेवला. त्यामुळें जीवाची देहबुद्धि घट्ट झाली. मी देहापुरता लहान आहे. अल्प आहे. आकुंचित आहे अशी त्याची मनोवृत्ती झाली.  
मी जीव मज बंधन । मज आहे जन्ममरण ।
केल्या कर्माचें फळ आपण । भोगीन आतां ॥ ६ ॥
६) मग प्राण्याला असें वाटते कीं, मी जीव आहे, मी बांधलेला आहे, मला जन्ममरण आहे. मीच केलेल्या कर्माचे फळ मला आतां भोगावयाचें आहे. 
पापाचे फळ तें दुख । आणी पुण्याचे फळ तें सुख ।
पापपुण्य अवश्यक । भोगणें लागे ॥ ७ ॥
७) पापकर्माचें फळ म्हणून दुःख भोगावें लागते. पुण्य कर्माचे फळ म्हणून सुख भोगावयास मिळते. पाप पुण्याचे फळ भोगल्यावाचून सुटका नाही.
पापपुण्यभोग सुटेना । आणी गर्भवासहि तुटेना ।
ऐसी जयाची कल्पना । दृढ जाली ॥ ८ ॥
८) पापपुण्याचे फळ भोगावेच लागते त्यामुळें जन्म घेणेंही कांहीं सुटत नाही. अशी त्याची कल्पना दृढ झालेली असते. 
तया नांव बांधला । जीवपणें बद्ध जाला ।
जैसा स्वयें बांधोन कोसला । मृत्य पावे ॥ ९ ॥
९) अशा त्याला बांधलेला म्हणतात. जीवपणानें, मी जीव आहें या भावनेनें तो बांधलेला असतो. रेशमाचा किडा स्वतःच रेशमाचा कोश निर्माण करतो आणि त्यांत अडकून गुदमरुन मरुन जातो. त्याचप्रमाणें जीव आपणच संकल्प करतो आणि तो घट्ट झाला कीं जन्ममरणाच्या चक्रांत अडकतो.   
तैसा प्राणी तो अज्ञान । नेणे भगवंताचें ज्ञान ।
म्हणे माझें जन्ममरण । सुटेचिना ॥ १० ॥
१०) सामान्य प्राणी अज्ञानी असल्यानें त्याला भगवंताचें ज्ञान नसते. त्याला वाटते कीं आपल्यामागें लागलेले जन्ममरणाचे चक्र कांहीं केल्या सुटणार नाहीं. 
आतां कांहीं दान करुं । पुढिल्या जन्मास आधारु ।
तेणें सुखरुप संसारु । होईल माझा ॥ ११ ॥
११) मग तो अशी कल्पना करतो कीं, या जन्मीं आपण कांहीं दान केलें तर पुढल्या जन्मी तें आपल्याला उपयोगास येईल व त्या पुण्यानें आपला संसार सुखाचा होईल.   
पूर्वीं दान नाहीं केलें । म्हणोन दरिद्र प्राप्त जालें ।
आतां तरी कांहीं केलें । पाहिजे कीं ॥ १२ ॥   
१२) मागल्या जन्मी आपल्याकडून कांहीं दान केलें गेलें नाही म्हणून ह्या जन्मी आपण दरिद्रि झालो. म्हणून या जन्मीं तरी कांहींतरी दान केलें पाहिजे.         
म्हणौनी दिलें वस्त्र जुनें । आणी एक तांब्र नाणें । 
म्हणे आतां कोटिगुणें । पावेन पुढें ॥ १३ ॥
१३) म्हणून तो एक जुनें वस्त्र आणि एक तांब्याचा पैसा दान करतो. मनांत कल्पना करतो कीं या दानचे फळ पुढिल जन्मी कोटिगुणानें मला मिळेल.  
कुशावर्तीं कुरुक्षेत्रीं । महिमा ऐकोन दान करी ।
आशा धरिली अभ्यांतरीं । कोटिगुणांची ॥ १४ ॥
१४) कुशावर्त व कुरुक्षेत्र या क्षेत्रीं दान केल्यास फळ अमाप मिळते. म्हणून या क्षेत्रीं जाऊन दान करतो व आशा बाळगतो कीं, पुढिल जन्मी याचें फळ भरपूर मिळेल.  
रुका आडका दान केला । अतितास टुकडा घातला ।
म्हणे माझा ढीग जाला । कोटि टुकड्यांचा ॥ १५ ॥
१५) तो एखादा पैसा किंवा अडका दान करतो किंवा अतिथीस एखादा भाकरीचा तुकडा खायला देतो. मनांत कल्पना करतो कीं मला पुढिल जन्मी कोटि तुकड्यांची रास मिळेल. 
तो मी खाईन पुढिलिये जन्मीं । ऐसें कल्पी अंतर्यामीं ।
वासना गुंतली जन्मकर्मीं । प्राणीयांची ॥ १६ ॥
१६) पुढल्या जन्मीं आपण ती खाऊं अशी भ्रामक कल्पना तो मनांत करतो. अशा प्रकारें जन्म घेण्यांत आणि कर्माचें फळ भोगण्यांत माणसाची वासना गुंतून राहते.   
आतां मी जें देईन । तें पुढिले जन्मीं पावेन ।
ऐसें कल्पी तो अज्ञान । बद्ध जाणावा ॥ १७ ॥
१७) या जन्मीं जें आपण दान केलें त्याचे फळ पुढच्या जन्मीं अनेक पटीनें आपल्याला मिळेल अशी कल्पना करणारा अज्ञानी असतो. तोच बद्ध असतो असें ओळखावें. 
बहुतां जन्माचे अंतीं । होये नरदेहाची प्राप्ती ।
येथें न होतां ज्ञानें सद्गती । गर्भवास चुकेना ॥ १८ ॥
१८) पुष्कळ जन्म घेऊन झाल्यावर मानवदेह मिळतो. मानवाचा जन्म घेऊन जर आपण अज्ञानीच राहीलो, आत्मज्ञान करुन घेतलें नाहीं तर जीवाला सद्गती मिळत नाही. व जन्ममरण कांहीं चुकत नाही.    
गर्भवास नरदेहीं घडे । ऐसें हें सर्वथा न घडे ।
अकस्मात भोगणें पडे । पुन्हा नीच योनी ॥ १९ ॥
१९) या जन्मांत आत्मज्ञान न होतां मृत्यु आला तर पुन्हागर्भवासामध्यें नरदेहच मिळेल असें घडणें फार विरळ असतें. उलट त्या जीवाला एकाएकी खालच्या योनीमध्यें जन्म घ्यावा लागतो. 
ऐसा निश्र्चयो शास्त्रांतरीं । बहुतीं केला बहुतांपरीं ।
नरदेह संसारीं । परम दुल्लभ असे ॥ २० ॥
२०) पुष्कळ सास्त्रकारांनीं निरनिराळ्या सास्त्रांमध्यें अनेक प्रकारें हीच गोष्ट निश्र्चयानेम सांगितली आहे. थोडक्यांत संसारामध्यें नरदेह मिळणें फार दुर्लभ आहे. 
पापपुण्य समता घडे । तरीच नरदेह जोडे ।
येरवीं हा जन्म न घडे । हें व्यासवचन भागवतीं ॥ २१ ॥
२१) पाप आणि पुण्य यांचें प्रमाण सम होतें तेव्हांच मानवदेह मिळतो. तें प्रमाण सम नाहीं तोपर्यंत मानवदेह मिळत नाहीं असें भगवतामध्यें व्यासांचे वचन आहे.  
श्र्लोक 
नरदेहमाद्यं सुलभं सुदुर्लभं । प्लवं सुकल्पं गुरुकर्णधारं ।
मयानुकूलेन नभस्वतेरितं । पुमान्भवाब्धिं न तरेत्स आत्महा ॥ 
अर्थ 
हा आद्य मानवदेह सुलभ आहे पण तसाच दुर्लभ आहे. चांगला संकल्प हें त्याचे वल्हें तर गुरु हा सुकाणु धरणारा कर्णधार आहे. भगवंताची अनुकूलता अथवा कृपा हाच वारा होय. त्या वार्‍यानें तें ढकललें जाणारें जहाज आहे. अशी सगळी मदत असतां जो माणूस भवसागर तरुन जात नाहीं तो आत्मघातकीं होय.   
नरदेह दुल्लभ । अल्पसंकल्पाचा लाभ ।
गुरु कर्णधारी स्वयंभ । सुख पाववी ॥ २२ ॥
२२) नरदेह दुर्लभ आहे. पण देहबुद्धीनें केलेल्या अल्प संकल्पानें तो प्राप्त होतो. तो प्राप्त झाल्यावर सद्गुरु कर्णार करावा. तो मार्गदर्शक असतो. त्याच्या वचनानुसार वागल्यास सुखप्राप्ती होते.  
दैव अनुकूल नव्हे जया । स्वयें पापी तो प्राणीया ।
भवाब्धी न तरवे तया । आत्महत्यारा बोलिजे ॥ २३ ॥
२३) दैवाची अनुकूलता ज्याला नाही तो स्वतः पापी असतो. हा भवसागर त्याला तरुन जाता येत नाहीं म्हणून तो आत्मघातकी समजावा. 
ज्ञानेंविण प्राणीयांसी । जन्ममृत्य लक्ष चौर्‍यासी । 
तितुक्या आत्महत्या त्यासी । म्हणौन आत्महत्यारा ॥ २४ ॥  
२४) ज्या प्राण्याला आत्मज्ञान नसतें त्याला चौर्‍यांशी लक्ष वेळां जन्म घ्यावा लागतो व मरावेम लागते. जितक्या वेळां तो ज्ञानहीन मरतो तितक्यावेळां त्यास आत्महत्या घडते. म्हणून तो आत्मघातकी समजावा.        
नरदेहीं ज्ञानेंविण । कदा न चुके जन्ममरण ।
भोगणें लागती दारुण । नाना नीच योनी ॥ २५ ॥
२५) मानवदेह मिळूनही जो आत्मज्ञान करुन घेत नाही त्याचे जन्म मरण कांहीं चुकत नाही. त्याला अत्यंत हलक्या योनीमध्यें जन्म घ्यावें लागतात. 
रीस मर्कट श्र्वान सूकर । अश्र्व वृषभ म्हैस खेचर ।
काक कुर्कुट जंबुक मार्जर । सरड बेडूक मक्षिका ॥ २६ ॥  
२६)अस्वल, माकड, कुत्रा, डुक्कर, घोडा, बैल, रेडा, गाढव, कावळा, कोंबडा, कोल्हा, मांजर, सरडा, बेडूक, माशी, 
इत्यादिक नीच योनी । ज्ञान नस्तां भोगणें जनीं ।
आशा धरी मूर्ख प्राणी । पुढिलिया जन्माची ॥ २७ ॥
२७) इत्यादि अगदी हलक्या योनीमध्यें आत्मज्ञान नसेल तर माणसांना जन्म घ्यावें लागतात. असें असूनही मू्र्ख माणसें पुढील जन्माची आशा बाळगतात. 
हा नरदेह पडतां । तोंचि पाविजे मागुतां ।
ऐसा विश्र्वास धरितां । लाज नाहीं ॥ २८ ॥
२८) सध्याचा मनुष्यदेह मृत्यु पावल्यावर पुन्हा तसाच मानवदेह आपल्याला मिळेल असा भरवंसा धरणार्‍यास लाज कशी वाटत नाहीं ? 
कोण पुण्याचा संग्रहो । जे पुन्हा पाविजे नरदेहो ।
दुराशा धरिली पाहो । पुढिलिया जन्माची ॥ २९ ॥
२९) आपल्याजवळ असा कोणत्या पुण्याचा संग्रह आहे कीं, ज्याच्यायोगे पुन्हा नरदेहच आपल्याला मिळेल ? याची खात्री नसतांना हा मूर्ख पुढच्या जन्माची खोटी आशा धरुन राहतो. 
ऐसें मूर्ख अज्ञान जन । केलें संकल्पें बंधन ।
शत्रु आपणासि आपण । होऊन ठेला ॥ ३० ॥   
३०) अशी मूर्ख व अज्ञानी माणसें आपल्या संकल्पानें स्वतःच बांधून घेतात. अशा रीतीनें मूर्ख माणूस स्वतःच स्वतःचा शत्रू बनतो. 
श्र्लोक 
आत्मवै ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः ।
ऐसें संकल्पाचें बंधन । संतसंगें तुटे जाण ।
अर्थ
आपणच आपले मित्र व आपणच आपले शत्रू असतो. 
ऐक तयाचे लक्षण । सांगिजेल ॥ ३१ ॥
३१) अशा रीतीनेम संकल्पाचें जें बंधन पडतें तें सत्समागमानें तुटतें. त्याचे लक्षण सांगतो तें ऐक.  
पांचा भूतांचें शरीर । निर्माण जालें सचराचर ।
प्रकृतिस्वभावें जगदाकार । वर्तो लागे ॥ ३२ ॥
३२) आपलें शरीर पंचभूतांचे बनलेलें आहे. हें चराचर विश्वदेखील पंचभूतांचेच बनलेलें आहे. प्रकृतीच्या नियमानुसार जगामधील सर्व घटना घडत असतात. आपण ज्यांना निसर्गाचे नियम म्हणतो ते मूलतः प्रकृतीचे नियम असतात. म्हणून जगांत व्यवस्था आढळते. कार्यकारणभाव सत्ता गाजवतो. 
देह अवस्था अभिमान । स्थानें भोग मात्रा गुण ।
शक्ती आदिकरुन लक्षण । चौपुटी तत्वांचे ॥ ३३ ॥  
३३) कांहीं शास्त्रकार असें सांगतात कीं, पिंडब्रह्मांडाची रचना चार तत्वांवर आधारलेली आहे. चार देह : स्थूल, सूक्ष्म, करण व महाकारण. 
चार अवस्था : जागृति, स्वप्न, सुषुप्ति व तुर्या. 
चार अभिमान : विश्व, तैजस, प्राज्ञ व प्रत्यगात्मा.
चार स्थानें : नेत्र, कंठ, हृदय, व मूर्धा.
चार भोग : स्थूल, प्रविविक्त, आनंद, व आनंदावभास.
चार गुण : सत्त्व, रज, तन व शुद्ध सत्त्व.
चार मात्रा : अ, उ, म, व अर्धमात्रा किंवा ईश्र्वर.
चार शक्ति : इच्छा, क्रिया, द्रव्य, व ज्ञान. 
ऐसी पिंडब्रह्मांडरचना । विस्तारें वाढली कल्पना ।
निर्धारितां तत्वज्ञाना । मतें भांबावलीं ॥ ३४ ॥
३४) अशीं एकूण बत्तीस तत्वें मिळून सारी पिंडब्रह्मांडरचना झाली आहे. असें कांहीं तत्वचिंतक म्हणतात. विश्वाचा विस्तार कसा झाला याबद्दल कल्पना जितकी वाढवावी तितकी वाढते. निरनिराळे तत्वचिंतक आपआपली कल्पना चालवितत. त्यामुळें तत्वांचा निश्चय करतांना तत्वज्ञानामध्यें निरनिराळी परस्पर विरोधी मतें उत्पन्न होतात. अणि विचारांचा गोंधळ होतो. 
नाना मतीं नाना भेद । भेदें वाढती वेवाद ।
परी तो ऐक्यतेचा संवाद । साधु जाणती ॥ ३५ ॥
३५) निरनिराळ्या विचारांमध्यें अनेक भेद असतात. त्यांमुळे वादविवाद वाढतात. अशा सर्व भेदांमध्यें ऐक्यता  शोधून सार्‍या मतांमध्यें संवाद उत्पन्न करणें फक्त साधु पुरुषांनाच माहित असते.   
तया संवादाचें लक्षण । पंचभूतिक देह जाण ।
त्या देहामधें कारण । आत्मा वोळखावा ॥ ३६ ॥
३६) सर्व मतांमधील संवाद म्हणजे देह पंचभूतात्मक असतो. पंचभूतें जड आसतात. त्यांना चेतना देणारा आत्मा होय. तो देहात असतो, पण तो देहाहून निराळा असतो.    
देह अंती नासोन जाये । त्यास आत्मा म्हणों नये ।
नानां तत्वांचा समुदाय । देहामधें आला ॥ ३७ ॥
३७) शेवटीं देहाचा नाश होतो. म्हणून देहाला आत्मा मानता येत नाही. देहामध्यें पंचभूतांचा समूह असतो. 
अंतःकर्ण प्राणादिक । विषये इंद्रियें दशक ।
हा सूक्ष्माचा विवेक । बोलिला शास्त्रीं ॥ ३८ ॥
३८) अंतःकरण, पंचप्राण, दहा इंद्रियें, व त्यांचे दहा विषय, हे सगळे मिळून माणसाचा सूक्ष्म देह बनतो असें शास्त्र सांगते.  
घेतां सूक्ष्माची शुद्धी । भिन्न अंतःकरण मन बुद्धी ।
नाना तत्वांचे उपाधी । वेगळा आत्मा ॥ ३९ ॥
३९) सूक्ष्म देहाचा शोध घेतला तर अंतःकतण, मन व बुद्धि पंचभूतांपासून उत्पन्न झालेल्या उपाधी आहेत असें आढळतें. त्यांहून आत्मा अगदी निराळा आहे.  
स्थूळ सूक्ष्म कारण । माहाकारण विराट हिरण्य ।
अव्याकृत मूळप्रकृती जाण । ऐसे अष्टदेह ॥ ४० ॥ 
४०) स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण हे चार पिंडाचे आणि विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत व मूळप्रकृति हे चार ब्रह्मांडाचे मिळून आठ देह होतात. 
च्यारी पिंडीं च्यारी ब्रह्मांडीं । ऐसी अष्टदेहाची प्रौढी ।
प्रकृतिपुरुषांची वाढी । दशदेह बोलिजे ॥ ४१ ॥
४१) चार देह पिंडाचे व चार देह ब्रह्मांडाचे असे आठ देह व त्यांत प्रकति आणि पुरुष असे दोन मिळवले कीं, एकंदर दहा देह होतात. 
ऐसें तत्वांचें लक्षण । आत्मा साक्षी विलक्षण ।
कार्य कर्ता कारण । दृश्य तयाचें ॥ ४२ ॥
४२) पिंडब्रह्मांडांच्या तत्वांचे विवरण हें अशा प्रकारचें आहे. आत्मा सर्वांहून वेगळा असून तो सर्वांचा साक्षी आहे. कार्य, कर्ता व कारण या सगळ्यांना तो वेगळेपणानें पाहतो.  
जीवशिव पिंडब्रह्मांड । मायेअविद्येचें बंड ।
हें सांगतां असे उदंड । परी आत्मा तो वेगळा ॥ ४३ ॥
४३) जीव आणि शिव, पिंड आणि ब्रह्मांड, माया आणि अविद्या यांचा विस्तार अतिशय गुंतागुंतीचा व मोठ्या प्रमाणांत आहे. तो सगळा सांगणें कठिण आहे. पण या सगळ्याहून आत्मा मात्र अगदी निराळा, अलिप्त आहे. 
पाहों जातां आत्मे च्यारी । त्यांचें लक्षण अवधारीं ।
हें जाणोनि अभ्यांतरीं । सदृढ धरावें ॥ ४४ ॥
४४) नुसत्या आत्म्याचा विचार केला तर चार आत्में आहेत. त्यांची लक्षणें आतां सांगतो. ती लक्षपूर्वक ऐकावीत. आणि मनामध्यें घट्ट धरुन ठेवावीत. 
एक जीवात्मा दुसरा शिवात्मा । तिसरा परमात्मा जो विश्र्वात्मा ।
चौथा जाणिजे निर्मळात्मा । ऐसे च्यारी आत्मे ॥ ४५ ॥
४५) पहिला जीवात्मा, दुसरा शिवात्मा, तिसरा परमात्मा यालाच विश्वात्मा म्हणतात व चौथा निर्मलात्मा होय. असे चार आत्में आहेत. 
भेद उंच नीच भासती । परी च्यारी येकचि असती ।
येविषीं दृष्टांतसंमती । सावध ऐका ॥ ४६ ॥
४६) या चार आत्म्यांच्यामध्यें उंच, नीच, किंवा श्रेष्ठ कनिष्ठ भेद आहेत असा भास होतो पण तें खरें नाही. कारण मुळांत चारी आत्में एकच आहेत. एक दृष्टांत देऊन हा मुद्दा स्पष्ट समजावून देतो. तें नीट ऐका. 
घटाकाश मठाकाश । महदाकाश चिदाकाश ।
अवघे मिळोन आकाश । येकचि असे ॥ ४७ ॥ 
४७) आकाश चार प्रकारचे आहे. घटाकाश, मठाकाश, महदाकाश व चिदाकाश दिसावयास हे चार दिसले तरी मूळ आकाश अखेर एकच आहे.        
तैसा जीवात्मा आणी शिवात्मा । परमात्मा आणी निर्मळात्मा ।
अवघा मिळोन आत्मा । येकचि असे ॥ ४८ ॥
४८) त्याचप्रमाणें जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा आणि निर्मळात्मा हे दिसायला चार दिसले तरी अखेर सारे मिळून एकच आत्मा आहे. 
घटीं व्यापक जें आकाश । तया नाव घटाकाश ।
पिंडी व्यापक ब्रह्मांश । त्यास जीवात्मा बोलिजे ॥ ४९ ॥
४९) घटाला व्यापून असणारें जें आकाश तें घटाकाश होय. त्याचप्रमाणें पिंडास व्यापून असणारें जें परब्रह्म त्याला जीवात्मा म्हणतात. 
मठीं व्यापक जें आकाश । तया नाव मठाकाश ।
तैसा ब्रह्मांडीं जो ब्रह्मांश । त्यास शिवात्मा बोलिजे ॥ ५० ॥
५०) मठाला व्यापून असणारें जें आकाश तें मठाकाश होय. त्याचप्रमाणें विश्वाला व्यापून असणारें जें परब्रह्म त्यास शिवात्मा म्हणतात.
मठाबाहेरील आकाश । तया नांव महदाकाश ।
ब्रह्मांडाबाहेरील ब्रह्मांड । त्यास परमात्मा बोलिजे ॥ ५१ ॥
५१) मठाबाहेर असणारें जें आकाश तें महदाकाश होय. त्याचप्रमाणें विष्वाच्या बाहेरचे जें परब्रह्म त्यास परमात्मा म्हणतात. 
उपाधीवेगळें आकाश । तया नांव चिदाकाश ।
तैसा निर्मळात्मा परेश । तो उपाधीवेगळा ॥ ५२ ॥
५२) कोणतीही उपाधी म्हणजे मर्यादा नसणारें जें आकाश तें चिदाकाश होय. त्याचप्रमाणें कोणत्याही उपाधीपासून निराळे असणार्‍या परब्रह्माला निर्मळात्मा किंवा परमेश्र्वर म्हणतात.  
उपाधीयोगें वाटे भिन्न । परी तें आकाश अभिन्न ।
तैसा आत्मा स्वानंदघन । येकचि असे ॥ ५३ ॥
५३) घट किंवा मठ यांसारख्या उपाधींमुळें आकाश भेदयुक्त भासलें तरी तें मूळ अभेदच असते. त्याचप्रमाणें स्वानंदानें आंत बाहेर भरलेला आत्मा पिंड व ब्रह्मांड यांच्या उपाधीनें लहान मोठा भासतो, पण तो मूळ एकच एक आहे. त्याच्यामधें भेदास मागमूस नाही.  
दृश्या सबाह्य अंतरीं । सूक्षात्मा निरंतरीं ।
त्याची वर्णावया थोरी । शेष समर्थ नव्हे ॥ ५४ ॥
५४) आत्मा अत्यंत सूक्ष्म आहे. तो सर्व व्यापून शिल्लक राहतो. म्हणून या दृश्य विश्वातील प्रत्येक वस्तूला आत्मा आंत बाहेर निरंतर व्यापून आहे. त्याचा महिमा वर्णन करण्याचे सामर्थ्य प्रत्यक्ष शेषाच्या अंगीं देखील नाही.
ऐसें आत्म्याचें लक्षण । जाणतां नाहीं जीवपण । 
उपाधी शोधितां अभिन्न । मुळींच आहे ॥ ५५ ॥
५५) आत्मा कसा सूक्ष्म आणि सर्वांना व्यापून आहे, हे ज्याच्या अनुभवास आलें त्याचें जीवपण शिल्लक उरत नाही. त्याचा जीचभाव नाहींसा होतो. उपाधी बाजूस सारली कीं, आत्मा मूळांत भेदरहित आहे. हें साक्षात् ज्ञान होते.   
जीवपण येकादेसी । अहंकारें जन्म सोसी ।
विवेक पाहातां प्राणीयांसी । जन्म कैचा ॥ ५६ ॥
५६) माणूस जीवपणानें एकदेशी बनतो, संकुचित होतो. मी देह आहे या अहंकारानें त्याला जन्म सोसावें लागतात. पण आत्मानात्म विवेक केला तर मी देह नसून आत्माच आहे अशी त्याची खात्री होते. मग त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही.  
जन्ममृत्यापासून सुटला । या नाव जाणिजे मोक्ष जाला ।
तत्वें शोधितां पावला । तत्वता वस्तु ॥ ५७ ॥
५७ ) जन्म व मृत्यु यांच्या कचाट्यांतून जो सुटला त्यास मोक्ष मिळाला असें समजावें. तत्वांचा शोध घेतां घेतां माणूस सद्वस्तु म्हणजे ब्रह्म अनुभवतो. 
तेचि वस्तु ते आपण । हें  महावाक्याचें लक्षण ।
साधु करिती निरुपण । आपुलेन मुखें ॥ ५८ ॥
५८) आपण स्वतः प्रत्यक्ष परब्रह्मच आहोंत असा महावाक्याचा खरा अर्थ आहे. साधु पुरुष हा अर्थ आपल्या मुखानें हा अर्थ समजावून देतात. 
जेचि क्षणी अनुग्रह केला । तेचि क्षणीं मोक्ष जाला ।
बंधन कांहीं आत्मयाला । बोलोंचि नये ॥ ५९ ॥
५९) ज्या क्षणीं साधूची कृपा होते त्याच क्षणीं आपण साक्षात् ब्रह्म आहोत असा साधकास अनुभव येतो. त्याच क्षणीं तो मुक्त होतो. आत्मस्वरुपाला कांहीं बंधन आहे हें बोलणेंच खरें नाही. 
आतां आशंका फिटली । संदेहवृत्ती मावळली ।
संतसंगें तत्काळ जाली । मोक्षपदवी ॥ ६० ॥  
६०) हें सारें विवेचन ऐकून श्रोत्यांची शंका निरसन पावली. त्यांच्या मनांतील संदेहवृत्ती मावळली. संत संगतीनें मोक्षपदवी कशी तत्काळ मिळते हें समजले.          
स्वप्नामधें जो बांधला । तो जागृतीनें मोकळा केला । 
ज्ञानविविकें प्राणीयाला । मोक्षप्राप्ती ॥ ६१ ॥
६१) एका माणसाला स्वप्न पडलें कीं, आपण बंधनांत आहोत. त्याला जागें केलें कीं, त्याचे बंधन नाहींसे होऊन तो मोकळा होतो. त्याचप्रमाणें ज्ञानपूर्वक विवेकानें माणसाची देहबुद्धि नाहींशी होते व त्याला मोक्ष प्राप्त होतो.
अज्ञाननीसीचा अंतीं । संकल्पदुःखें नासती । 
तेणें गुणें होये प्राप्ती । तत्काळ मोक्षाची ॥ ६२ ॥
६२) अज्ञानरुपी रात्र संपली कीं माणसाचीं संकल्पदुःखें नाहींशी होतात. संकल्प नाहींसे झाले कीं त्या योगानें त्यास ताबडतोप मोक्षप्राप्ती होते.   
तोडावया स्वप्नबंधन । नलगे आणीक साधन ।
तयास प्रेत्न जागृतीवीण । बोलोंचि नये ॥ ६३ ॥ 
६३)  स्वप्नामधील बंधन तोडून टाकण्यास दुसरें कोणतें साधन लागत नाहीं. फक्त त्यास जागें करावें, म्हणून साधकानें जागें होण्याचा प्रयत्न करावा. दुसर्‍या साधनाचा विचारच करुं नये. 
तैसा संकल्पें बांधला जीव । त्यास आणीक नाहीं उपाव ।
विवेक पाहातां वाव । बंधन होये ॥ ६४ ॥
६४) जीव केवळ संकल्पानें बांधलेला आहे. संकल्पाच्या बंधनांतून सुटण्यास दुसरा उपाय नाही. आत्मानात्म विवेक केला तर हे संकल्पाचे बंधन आपोआप नाहींसें होते. 
विवेक पाहिल्याविण । जो जो उपाव तो तो सीण ।
विवेक पाहातां आपण । आत्माच असे ॥ ६५ ॥
६५) विवेकावाचून इतर सगळे उपाय केले तर फुकट श्रम मात्र घडतात. विवेक हाच खरा एक उपाय आहे. विवेक केला तर आपण स्वतः आत्मस्वरुप आहोत असा प्रत्यक्ष अनुभव येतो.  
आत्मयाचा ठांई कांहीं । बद्ध मोक्ष दोनी नाहीं ।
जन्ममृत्यु हें सर्वहि । आत्मत्वीं न घडे ॥ ६६ ॥
६६) आत्मस्वरुपाच्या ठिकाणीं बंध नाहीं आणि मोक्ष पण नाहीं जन्म आणि मृत्यु हे देहाला असतात. आत्म्याला जन्म नाहीं तसा मृत्युसुद्धां नाही.   
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे मोक्षलक्षण नाम समास सातवा ॥
Samas Satava Molksha Lakshan
समास सातवा मोक्षलक्षण  


Custom Search

No comments: