Thursday, October 12, 2017

Samas Sahava Dushchit Nirupan समास सहावा दुश्चीतनिरुपण


Dashak Aathava Samas Sahava Dushchit Nirupan 
Samas Sahava Dushchit Nirupan, It is in Marathi. Dushcit means a person whose mind is not stable, steady, lack of devotion and not in peace. Samarth is telling us why such person facing difficulties in Paramarth.
समास सहावा दुश्चीतनिरुपण 
श्रीराम ॥
श्रोता विनवी वक्तयासी । सत्संगाची महिमा कैसी ।
मोक्ष लाभे कितां दिवसीं । हें मज निरोपावें ॥ १ ॥  
१) श्रोता वक्त्याला विनंती करतो कीं, आपण सत्संगाचा महिमा नेहमी सांगता. मग तो लाभला असतां किती दिवसांत मोक्ष मिळतो तें सांगावें.
धरितां साधूची संगती । कितां दिवसां होते मुक्ती ।
हा निश्र्चय कृपामूर्ती । मज दिनास करावा ॥ २ ॥
२) सत्पुरुषाची संगत धरल्यावर किती दिवसांत ब्रह्मदर्शन घडून मुक्ती मिळते? कृपामूर्तींनी मज दिनास हें सांगावें.
मुक्ती लाभे तत्क्षणीं । विश्र्वासतां निरुपणीं ।
दुश्र्चीतपणें हानी । होतसे ॥ ३ ॥
३) वक्ता म्हणतो कीं, सत्पुरुष जो उपदेश करतो त्यावर संपूर्ण विश्र्वास ठेवला तर ताबडतोप आत्मज्ञान होऊन मुक्ती लाभते. पण दुश्र्चितपणानें आपली फार हानी होते. 
सुचितपणें दुश्र्चीत । मन होतें अकस्मात ।
त्यास करावें निवांत । कोणे परीं ॥ ४ ॥
४) यावर श्रोता पुन्हा विचारतो कीं मन सुचित असतें पण एकाएकी तें दुश्र्चित होतें व अशांत होतें. ह्या अशांत मनाला शांत कसें करावें? 
मनाच्या तोडून वोढी । श्रवणीं बैसावें आवडीं ।
सावधपणें घडीनें घडी । काळ सार्थक करावा ॥ ५ ॥
५) वक्ता सांगतो कीं, निरनिराळ्या वस्तूंकडे व विशयांकडे मन ओढलें जातें. तें प्रथम थांबवावे. नंतर खर्‍या आवडीनें श्रवण करावयास बसावें. वेळ वाया न जाऊं देण्याबद्दल सावध असावें. अशा रीतीनें आपला काळ सार्थकीं लावावा.  
अर्थप्रमेय ग्रंथांतरीं । शोधून घ्यावें अभ्यांतरीं ।
दुश्र्चीतपण आलें तरी । पुन्हां श्रवण करावें ॥ ६ ॥
६)  आपण जो ग्रंथ श्रवण करतो, त्यामधील अर्थ व सिद्धांत समजून घ्यावें. मनाची एकाग्रता भंगून चित्त व्यग्र झाले तरी परत श्रवण करावें. 
अर्थांतर पाहिल्यावीण । उगेंचि करी जो श्रवण ।
तो श्रोता नव्हे पाषाण । मनुष्यवेषें ॥ ७ ॥
७) ग्रंथांमधील अर्थ बुद्धीमध्यें न साठवितां जो उगाच श्रवण करतो, तो खरा श्रोता नव्हें. मनुष्यरुपांत असलेला तो पाषाणच असतो.   
येथें श्रोते मानितील सीण । आम्हांस केलें पाषाण ।
तरी पाषाणाचें लक्षण । सावध ऐका ॥ ८ ॥  
८) वक्ता आपल्याला पाषाण म्हणतो म्हणून श्रोत्यांना वाईट वाटेल. म्हणून पाषाणाचे लक्षण सांगतो. तें ऐकावें.  
वांकुडा तिकडा फोडिला । पाषाण घडून नीट केला ।
दुसरें वेळेसी पाहिला । तरी तो तैसाचि असे ॥ ९ ॥
९) समजा, एखादा वाकडातिकडा दगड टाकीनें घडवून नीट केला. पुन्हा जर तो बघितला तर अगदी जसाच्या तसाच असतो.  
टांकीनें खपली फोडिली । ते मागुती नाहीं जडली ।
मनुष्याची कुबुद्धि झाडिली । तरी तो पुन्हा लागे ॥ १० ॥
१०) टाकीचे घाव घालून दगडाची खपली काढली की ती परत कांहीं दगडाला लावता येत नाही. परंतु माणसाचे मात्र अगदी विरुद्ध आहे. चांगल्या उपदेशानें माणसाची वाईट बुद्धि झाडली तर ती तेवढ्यापुरती बाजूला सरकते. परंतु पुन्हा ती त्याला चिकटते.  
सांगतां अवगुण गेला । पुन्हा मागुता जडला ।
याकारणें माहांभला । पाषाणगोटा ॥ ११ ॥
११) एखाद्या माणसाला त्याचा दोष, अवगुण समजावून दिला कीं, तो तेवढ्यापुरता सुटतो. पण पुन्हा तो त्याच्या अंतर्यामी येतोच. पाषाणाचे मात्र असें नाही. म्हणून माणसापेक्षां पाषाण बरा असें म्हणावें लागते.   
ज्याचा अवगुण झडेना । तो पाषाणाहुन उणा ।
पाषाण आगळा जाणा । कोटिगुणें ॥ १२ ॥
१२) पुष्कळ वेळां सांगून ज्याचा अवगुण सुटत नाही. तो माणूस पाषाणापेक्षां हीन दर्जाचा समजावा. अनेक पटीनें पाषाण बरा असें म्हणवें लागतें. 
कोटिगुणें कैसा पाषाण । त्याचेंहि ऐका लक्षण ।
श्रोतीं करावें श्रवण । सावध होऊनी ॥ १३ ॥
१३) अनेक पटीनें पाषाण बरा कसा त्याचें वर्णन करतो. श्रोत्यांनी मनःपूर्वक ते ऐकावे.
माणीक मोती प्रवाळ । पाचि वैडूर्य वज्रनीळ ।
गोमेदमणी परिस केवळ । पाषाण बोलिजे ॥ १४ ॥
१४) माणिम, मोती, प्रवाळ, पांचू, वैडूर्य, वज्रनीळ, गोमेदमणी, परिस इत्यादि सगळे पाषाणच समजतात.   
याहि वेगळे बहुत । सूर्यकांत सोमकांत । 
नाना मोहरे सप्रचित । औषधाकारणें ॥ १५ ॥
१५) शिवाय सूर्यकांत, सोमकांत आणि रोगांवर औषध म्हणून लागू पडणारे मणी असे पाषाणाचे आणखी पुष्कळ प्रकार आहेत. 
याहि वेगळे पाषाण भले । नाना तीर्थीं जे लागले ।
वापी कूप सेखीं जाले । हरिहरमूर्ती ॥ १६ ॥
१६) याहून आणखी वेगवेगळे पाषाण आहेत. तीर्थक्षेत्रीं मंदिरें, घाट, चबुत्रें, व धर्मशाळा बांधण्यास पाषाण वापरतात. विहिरी, आड वगैरेबांधण्यास दगड वापरतात. विष्णु, शंकर आदि देवांच्या मूर्तींसाठी उत्तम पाषाणच लागतात. 
याचा पाहातां विचार । पाषाणाऐसें नाहीं सार ।
मनुष्य तें काये पामर । पाषाणापुढें ॥ १७ ॥
१७) अशा प्रकारें विचार केला तर पाषानाचें मूल्य कितीतरी आहे. हें लक्षांत येईल. अर्थात त्यापुढें माणसाची किंमत कमीच आहे असें म्हणावयास हवे. 
तरी तो ऐसा नव्हे पाषाण । जो अपवित्र निःकारण ।
तयासारिखा देह जाण । दुश्र्चीत अभक्तांचा ॥ १८ ॥
१८) पण जो पाषाण चांगल्या कामासाठीं उपयोगी पडत नाही, तो अपवित्र व कुचकामी असतो. श्रद्धाहीन व व्यग्रचित्ताच्या अभक्ताचा देह त्या पाषाणासारखा अपवित्र व कुचकामाचा समजावा.   
आतां असो हें बोलणें । घात होतो दुश्र्चीतपणें । 
दुश्र्चीतपणाचेनि गुणें । प्रपंच ना परमार्थ ॥ १९ ॥
१९) आतां हें बोलनें पुरें. दुश्चितपणानें माणसाचा घात होतो. दुश्चितपणा अंगीं असेल तर माणसाचा घात होतो. धड प्रपंच नाहीं व धड परमार्थ नाहीं अशी अवस्था होते.
दुश्र्चीतपणें कार्य नासे । दुश्र्चीतपणें चिंता वसे ।
दुश्र्चीतपणें स्मरण नसे । क्षण येक पाहातं ॥ २० ॥
२०) दुश्चितपणानें कार्याचा नाश होतो. सदैव काळजी लागते व कोणत्याही गोष्टीचे धड स्मरण राहात नाही.
दुश्र्चीतपणें शत्रुजिणें । दुश्र्चीतपणें जन्ममरणें ।
दुश्र्चीतपणाचेनि गुणें । हानी होये ॥ २१ ॥
२१) दुश्चितपणामुळें जीवन नकोसें वाटते. तें शत्रूसारखें ताप देतें. जन्ममरण मागें लागते. सर्वप्रकारें नुकसान होते. 
दुश्र्चीतपणें नव्हें साधन । दुश्र्चीतपणें न घडे भजन ।
दुश्र्चीतपणें नव्हे ज्ञान । साधकांसी ॥ २२ ॥
२२) दुश्चितपणामुळें साधन घडत नाही. भजन घदत नाही. साधकाला आत्मज्ञानाची प्राप्ती होत नाही. 
दुश्र्चीतपणें नव्हे निश्र्चयो । दुश्र्चीतपणें न घडे जयो ।
दुश्र्चीतपणें होये क्षयो । आपुल्या स्वहिताचा  ॥ २३ ॥
२३) दुश्चितपणामुळें मनाचा निश्र्चय होत नाही. कार्यांमध्यें यश मिळत नाही. तसेच त्यामुळें आत्महिताचा क्षय होतो. 
दुश्र्चीतपणें न घडे श्रवण । दुश्र्चीतपणें न घडे विवरण ।
दुश्र्चीतपणें निरुपण । हातीचें जाये ॥ २४ ॥
२४) दुश्चितपणामुळें श्रवण नीट होत नाही. श्रवण केलेल्या विषयाचे नीट विवरण करतां येत नाही. त्यामुळें श्रवण केलेला परमार्थ बुद्धीमध्यें नीट सांठवून ठेवता येत नाही. 
दुश्र्चीत बैसलाचि दिसे । परी तो असतचि नसे ।
चंचळ चक्रीं पडिलें असे । मानस तयाचें ॥ २५ ॥
२५) दुश्चितमाणूस एका जागीं बसलेला दिसतो, पण तो तेथें असून नसल्यासारखा असतो. त्याचें मन चंचलपणें निरनिराळ्या विशयांमध्यें चकरा मारीत असते.  
वेडें पिशाच्च निरंतर । अंध मुके आणी बधिर ।
तैसा जाणावा संसार । दुश्र्चीत प्राणीयांचा ॥ २६ ॥
२६) एखाद्या वेड्या, सारखी पिशाचबाधा असणार्‍या माणसाचा किंवा आंधळ्या, मुक्या आणि बहिर्‍या माणसाचा सांसार जसा कांहींतरी असतो तसाच दुश्चित माणसाचा संसार असतो.  
सावध असोन उमजेना । श्रवण असोन ऐकेना ।
ज्ञान असोन कळेना । सारासारविचार ॥ २७ ॥
२७) लक्ष देतो असेम दिसतें पण त्याचे लक्ष नसते, ऐकतो असे दिसतें पण त्याला आकलन होत नसते. आणि ज्ञान आहे असे दिसतें पण त्याला खरें काय व खोटे काय हें त्याला समजत नसते.  
ऐसा जो दुश्र्चीत आळसी । परलोक कैंचा त्यासी ।
जयाचे जिवीं अहिर्निशी । आळस वसे ॥ २८ ॥
२८) जो माणूस असा दुश्चित आहे आणि शिवाय आळशी आहे त्याच्या बद्दल कांहीं बोलावयासच नको. जो सदासर्वदा आळसांत घालवतो त्यास परमार्थ साधणें अगदी अशक्य आहे. 
दुश्र्चीतपणाोासुनि सुटला । तरी तो सवेंच आळस आला ।
आळसाहातीं प्राणीयांला । उसंतचि नाहीं ॥ २९ ॥
२९) जर एखादा माणूस दुश्चितपणांतून सुटला तरी आळस त्यास ग्रासून टाकतो. तो आळसाच्या इतका आहारीं जातो कीं आळसामुळें त्याला कांही करावयास फुरसतच मिळत नाही.  
आळसें राहिला विचार । आळसें बुडाला आचार ।
आळसें नव्हे पाठांतर । कांहीं केल्यां ॥ ३० ॥
३०)आळसानें माणसाच्या विचारांची वाढ होत नाही. त्याचा आचारधर्म बुडतो. कांहीं केल्या पाठांतर होत नाही.  
आळसें घडेना श्रवण । आळसें नव्हें निरुपण ।
आळसें परमार्थाची खूण । मळिण जाली ॥ ३१ ॥
३१) आळसानें श्रवण घडत नाही. निरुपण, प्रवचन यांचा फायदा करुन घेतां येत नाही. परमार्थाची साधना व प्रचीति मलिन होऊन जातात.
आळसें नित्यनेम राहिला । आळसें अभ्यास बुडाला ।
आळसें आळस वाढला । असंभाव्य ॥ ३२ ॥
३२) आळसानें नित्यनेम चालत नाही. अभ्यास होत नाही. आणि आळशीपणानें फार आळसच वाढतो.  
आळसें गेली धारणा धृती । आळसें मळिण जाली वृत्ती ।
आळसें विवेकाची गती । मंद जाली ॥ ३३ ॥
३३) आळसानें धारणाशक्ति नाहींशी होते. धीर धरण्याची शक्ति नाश पावते. मनोवृत्ति मलीन होते. विवेकाची गती मंदावते. 
आळसें निद्रा वाढली । आळसें वासना विस्तारली ।
आळसें सुन्याकार जाली । सद्बुद्धि निश्र्चयाची ॥ ३४ ॥
३४) आळसानें झोप घेण्याची सवय वाढते. वासना वाढतात. निश्चय करणारी सद्बुद्धि शून्य बनते. 
दुश्र्चीतपणासवें आळस । आळसें निद्राविळास ।
निद्राविळासें केवळ नास । आयुष्याचा ॥ ३५ ॥  
३५) आधींच दुश्चितपणा, त्यांत आळशीपणाची साथ मिळाली आणि निद्रेचा विलासही सुरु झाला. मगआयुष्याचा नाश होण्यास वेळ लागत नाही.    
निद्रा आळस दुश्र्चीतपण । हेंचि मूर्खाचें लक्षण ।
येणेंकरितां निरुपण । उमजेचिना ॥ ३६ ॥
३६) निद्रा, आळस व दुश्चितपणा ही मूर्खाची लक्षणें आहेत. त्यामुळें उपदेश जरी केला तरी तो त्या माणसाच्या ध्यानांत येत नाही. 
हें तिन्ही लक्षणें जेथें । विवेक कैचा असेल तेथें ।
अज्ञानास यापरतें । सुखचि नाहीं ॥ ३७ ॥
३७) हे तीन दोष जेथें असतात तेथें विवेक राहूं शकत नाही. अज्ञानी माणसास आळस व झोप यापेक्षां दुसरें कोणतेंही सुख मोठे वाटत नाही. 
क्षुधा लागतां जेविला । जेऊन उठतां आळस आला ।
आळस येतां निजेला । सावकास ॥ ३८ ॥
३८) अशा अज्ञानी माणासास भूक लागली कीं पोटभर जेवला, जेवण झाल्यावर सुस्ती आली. आणि मग तो झोपतो. 
निजोन उठतां दुश्र्चीत । कदा नाहीं सावचित ।
तेथें कैचें आत्महित । निरुपणीं ॥ ३९ ॥
३९) झोंप घेऊन उठला कीं मन व्यग्र असल्यानें कशाकडेही त्याचे लक्ष नसते. मनाच्या अशा अवस्थेंत निरुपण ऐकून कांहीं आत्महित करुन घेणें शक्यच नसते. 
मर्कटापासीं दिल्हे रत्न । पिशाच्याहातीं निधान ।
दुक्ष्चीतपुढें निरुपण । तयापरी होये ॥ ४० ॥
४०) माकडाच्या हातीं रत्न दिलें किंवा पिशाच्याच्या हाती द्रव्याचा ठेवा दिला तर तो जसा वायं जातो. त्याचप्रमाणें दुश्चित माणसाला केलेला परमार्थाचा उपदेश वाया जातो.   
आतां असो हे उपपत्ती । आशंकेची कोण गती ।
कितां दिवसां होते मुक्ती । सज्जनाचेनि संगें ॥ ४१ ॥
४१) अज्ञानाच्या लक्षणांचे हें विवेचन आतां पुरें झाले. मूळ प्रश्र्णाचे उत्तर काय तें आतां पाहूं. मूळ प्रश्र्ण असा कीं सत्समागम केल्यास मुक्ति मिळण्यास किती दिवस लागतात ? 
ऐका याचें प्रत्योत्तर । कथेसि व्हावें निरोत्तर ।
संतसंगाचा विचार । ऐसा असे ॥ ४२ ॥
४२) या प्रश्र्णाचें उत्तर आतां ऐका. या उत्तरानें प्रश्र्ण विचारणार्‍यांची शंका संपूर्ण नाहींशी होईल. संतसमागमाचा विचार पुढिलप्रमाणें आहे.  
लोहो परीसेसी लागला । थेंबुटा सागरीं मिळाला ।
गंगे सरिते संगम जाला । तत्क्षणीं ॥ ४३ ॥
४३) लोखंड परिसाला लागलें, पाण्याचा थेंब समुद्रांत पडला, एक नदी गंगेला येऊन मिळाली; ज्या क्षणीं हें घडतें त्याच क्षणीं लोखंड सोनें बनते, थेंब सागर बनतो, आणि नदी गंगारुप बनते.  
सावध साक्षपी आणी दक्ष । तयास तत्काळचि मोक्ष ।
इतरांस तें अलक्ष । लक्षिलें नवचे ॥ ४४ ॥
४४) त्याच प्रमानें जो अत्यंत सावध आहे, कष्टाळू आहे, आणि तत्पर आहे त्यास सत्समागमामुळें ताबडतोप मोक्ष मिळतो. ज्यांच्या अंगीं हें गुण नाहीत त्यांस अत्यंत सूक्ष्म ब्रह्मस्वरुप पाहूं म्हटले तरी पाहता येत नाही.    
येथें शिष्यप्रज्ञाच केवळ । प्रज्ञावंतां न लगे वेळ ।
अनन्यास तत्काळ । मोक्ष लाभे ॥ ४५ ॥
४५) परमार्थाच्या अनुभवासाठीं शिष्याची बुद्धी तयार व्हावी लागते. सूक्ष्म बनावी लागते. अशी बुद्धी ज्याच्याजवळ असते त्यास वेळ लागत नाही. जो अनन्य होऊं शकतो त्यास ताबडतोप मोक्ष मिळतो. 
प्रज्ञावंत आणी अनन्य । तयास नलगे येक क्षण ।
अनन्य भावार्थेंविण । प्रज्ञा खोटी ॥ ४६ ॥
४६) ज्याची बुद्धि अत्यंत सूक्ष्म आहे आणि जो अनन्य होऊं शकतो त्यास स्वरुपसाक्षात्कार होण्यास एक क्षण देखील लागत नाही. अनन्य श्रद्धा असल्यावाचून नुसती सूक्ष्म बुद्धि कामास येत नाही
प्रज्ञेविण अर्थ न कळे । विश्र्वासेंविण वस्तु ना कळे ।
प्रज्ञाविश्र्वासें गळे । देहाभिमान ॥ ४७ ॥
४७) सूक्ष्म बुद्धि नसेल तर सद्गुरु जें सांगतात त्याचा अर्थ बरोबर कळत नाहीं. अनन्य श्रद्धा नसेल तर आत्मवस्तु आकलन होत नाही. म्हणून प्रज्ञा व विश्वास दोन्ही आवश्यक त्यानें देहाभिमान नाहींसा होतो. 
देहाभिमानाचे अंतीं । सहजचि वस्तुप्राप्ती ।
सत्संगे सद्वती । विलंबचि नाहीं ॥ ४८ ॥  
४८) मी देह आहे ही भावना नाश पावली कीं अगदी सहजतेने आत्मवस्तु लाभते. अशा रीतीनें सत्संगतीमुळें उत्तम गति लाभण्यास वेळ लागत नाही. 
सावध साक्षपी विशेष । प्रज्ञावंत आणी विश्र्वास ।
तयास साधनीं सायास । करणेंचि नलगे ॥ ४९ ॥    
४९) जो मनुष्य आपल्या ध्येयाविषयीं जागरुक असतो, पुष्कळ श्रम करण्यास तयार असतो, प्रज्ञावंत असून बुद्धीमान असतो आणि जो खरा श्रद्धावान आहे त्याला साधनाचे कष्ट करावें लागत नाहीत.         
इतर भाविक साबडे । तयांसहि साधनें मोक्ष जोडे ।
साधुसंगें तत्काळ उडे । विवेकदृष्टी ॥ ५० ॥
५०) इतर जे श्रद्धावंत पण भोळे असतात त्या माणसांनादेखील साधन केल्यानंतर मोक्ष हातीं येतो. सत्समागमानें त्यांच्या अंतर्यामी विवेकशक्ति निर्माण होते.  
परी तें साधन मोडूं नये । निरुपणचा उपाये ।
निरुपणें लागे सोय । सर्वत्रांसी ॥ ५१ ॥
५१) आत्मदर्शन झाल्यानंतरसुद्धाम निरुपणाचा नियम मोडूं नये. आपली साधना सोडूं नये. सर्व सामान्यांना निरुपणामुळें आत्मदर्शनाचा मार्ग समजतो. ते थोडी वाटचाल करुं शकतात. 
आतां मोक्ष आहे कैसा । कैसी स्वरुपाची दशा ।
त्याचे प्राप्तीचा भर्वसा । सत्संगें केवी ॥ ५२  ॥
५२) आतां मोक्ष मोक्ष म्हणतात तो आहे तरी कसा, स्वरुपदर्शनाची अवस्था कशी असते, सत्समागम केल्यानें स्वरुपदर्शन होतें याची खात्री काय ?
ऐसें निरुपण प्रांजळ । पुढें बोलिलें असे सकळ ।
श्रोतीं होऊनियां निश्र्चळ । अवधान द्यावें ॥ ५३ ॥ 
५३) या प्रश्र्णांच्या उत्तरांचे विवेचन पुढील समासांत साकल्यानें केलें आहे. श्रोत्यांनी स्थिर मनानें त्याकडे लक्ष द्यावें.  
अवगुणत्यागावयाकारणें । न्यायनिष्ठुर लागे बोलणें ।
श्रोतीं कोप न धरणें । ऐसिया वचनाचा ॥ ५४ ॥
५४) श्रवण करणार्‍याचे अवगुण जर सुटावयास हवें असतील तर वक्त्याला कडकपणें खरें बोलावें लागतें. श्रोत्यांनी अशा न्यायनिष्ठूर बोलण्याचा राग मानूं नये.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दुश्र्चीतनिरुपणनाम समास सहावा ॥
Samas Sahava Dushchit Nirupan
समास सहावा दुश्चीतनिरुपण 


Custom Search

No comments: