Saturday, November 18, 2017

Samas Dusara Deha Aashanka समास दुसरा देहआशंका निरुपण


Dashak Dahava Samas Dusara Deha Aashanka 
Samas Dusara Deha Aashanka, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Deha (body) Aashanka. The listener asked many questions.
समास दुसरा देहआशंका निरुपण
श्रीराम ॥
स्वामीनें विचार दाखविला । येथें विष्णूचा अभाव दिसोन आला ।
ब्रह्मा विष्णु महेशाला । उरी नाहीं ॥ १ ॥
१) मागल्या समासांत स्वामींनी एक विचार मांडला. तो असा कीं, ब्रह्मा, विष्णु, महेश या देवतां शरीरांत आहेत. परंतु या देवतांना कोठें स्थानच नाहीं. त्या शरीरांत आहेत असा अनुभव येत नाहीं.    
उत्पत्ति स्थिति संहार । ब्रह्मा विष्णु महेश्र्वर ।
याचा पाहातां विचार । प्रत्ययो नाहीं ॥ २ ॥
२) ब्रह्मा, विष्णु, महेश उत्पत्ति, स्थिति, संव्हार घडवितात काय ? याचा विचारानें शोध घेतला तर तसा अनुभव येत नाहीं.
ब्रह्मा उत्पत्तिकर्ता चौमुखांचा । येथें प्रत्ययो नाहीं त्याचा ।
पाळणकर्ता विष्णु चौभुजांचा । तो हि ऐकोन जाणों ॥ ३ ॥
३) उत्पत्ति करणारा ब्रह्मदेव चार तोंडांचा आहे असें सांगतात. पण त्याचा कधीं अनुभव येत नाहीं. पालन करणारा विष्णु चार हातांचा आहे असें म्हणतात. परंतु त्याला कधीं कोणी पाहिला नाहीं. तो नुसता ऐकून माहीत आहे.  
महेश संव्हार करितो । हाहि प्रत्ययो कैसा येतो ।
लिंगमहिमा पुराणीं तो । विपरीत बोलिला ॥ ४ ॥
४) महेश संहार करतो असें म्हणतात. पण त्याचा अनुभव कसा तें माहीत नाहीं. पुराणांमध्यें शंकराच्या लिंगाचा महिमा वेगळाच सांगितला आहे. तो विपरीत भासतो.   
मूळमायेस कोणें केलें । हें तो पाहिजे कळलें । 
तिही देवांचे रुप जालें । ऐलिकडे ॥ ५ ॥
५) या तिन्ही देवांचे प्रगटपणें रुप धारण करणें मायेच्या अलीकडचें आहे. ती मूळमाया कोणी केली हें कळलें पाहिजे.  
मूळमाया लोकजननी । तयेपासून गुणक्षोभिणी ।
गुणक्षोभिणीपासून त्रिगुणी । जन्म देवा ॥ ६ ॥
६) मूळमाया ही खरी विश्वजननी आहे. तिच्यापासून गुणक्षोभिणी जन्मली. गुणक्षोभिणीपासून सत्व, रज, तम हे तीन गुण जन्मले. त्या तीन गुणांपासून त्रिदेव जन्मले आहेत. 
ऐसें बोलती शास्त्रकारक । आणि प्रवृत्तीचेहि लोक ।
प्रत्यये पुसतां कित्येक । अकांत करिती ॥ ७ ॥
७) शास्त्र रचणारे शास्त्रकर्ते व शास्त्र प्रमाण मानणारे सामान्य लोक देवांच्या उत्पत्तीबद्दल असें सांगतात. हे देव आहेत याविषयीं कांहीं प्रत्यक्ष अनुभव आहे काय ? असें विचारलें कीं त्यांपैकीं बरेच लोक आकांडतांडव करतात. 
म्हणोन त्यास पुसावेना । त्यांचेन प्रत्ययो आणवेना ।
प्रत्ययेंविण प्रेत्न नाना । ठकाठकी ॥ ८ ॥
८) म्हणून त्यांना विचारण्याची सोय नाहीं. त्या देवांच्या अस्तित्वाचा प्रत्यक्ष अनुभव ते लोक आणून देऊं शकत नाहीत. ज्याचा प्रत्यक्ष अनुभव येत नाहीं त्यासाठीं नाना प्रयत्न करणें म्हणजे नुसती फसवाफसवी होते. 
प्रचितीवीण वैद्य म्हणवी । उगीच करी उठाठेवी ।
तया मूर्खाला गोवी । प्राणीमात्र ॥ ९ ॥
९) एखादा माणूस रोग व त्यांचे उपचार यांचें ज्ञान नसतांना उगाच आपल्याला वैद्य म्हणवूं लागला तर त्याचा व्यवसाय म्हणजे नस्ती उठाठेव होते. अशा मूर्खाला सर्व लोक अडचणींत टाकतात.   
तैसाच हाहि विचार । प्रत्यये करावा निर्धार ।
प्रत्ययें नस्तां अंधकार । गुरुशिष्यांसी ॥ १० ॥
१०) या देवांच्या बाबतींत असाच प्रकार होतो. येथें प्रत्यक्ष अनुभव घेऊन मग आपलें निश्र्चित मत बनवावें. प्रत्यक्ष अनुभव नसेल तर गुरु व शिष्य दोघेहि अज्ञानाच्या अंधारामध्यें भ्रमत राहातात.     
बरें लोकांस काये म्हणावें । लोक म्हणती तेंचि बरवें ।
परंतु स्वामीनें सांगावें । विशद करुनी ॥ ११ ॥
११) बरें लोकांना तरी नांवें कां ठेवावीत? लोक म्हणतील तेंच बरोबर आहे असें म्हणावें लागतें. म्हणून स्वामीनीं हा विषय स्पष्ट करुन सांगावा. 
म्हणों देवीं माया केली । तरी देवांचीं रुपें मायेंत आलीं ।
जरी म्हणो मायेनें माया केली । तरी दुसरी नाहीं ॥ १२ ॥
१२) देवांनीं माय केली असें म्हणावें तर देवचमुळीं मायेनें निर्माण केले आहेत. देवांचीं रुपें मायामय आहेत. मायेनें माया निर्माण केली म्हणावें तर मूळमाया एकच आहे, दोन नाहींत.   
जरी म्हणों भूतीं केली । तरी ते भूतांचीच वळली ।
म्हणावें जरी परब्रह्में केली । तरी ब्रह्मीं कर्तुत्व नाहीं ॥ १३ ॥
१३) पंचभूतांनी माया केली म्हणावें तर मूळमायेमध्यें पंचभूतें भरुन आहेत. म्हणून तें शक्य नाहीं. परब्रह्मानें माया निर्माण केलीं म्हणावें तर परब्रह्मामध्यें कर्तेपण नाहीं.  
आणी माया खरी असावी । तरी ब्रह्मीं कर्तुत्वाची गोवी ।
माया मिथ्या ऐसी जाणावी । तरी कर्तुत्व कैंचें ॥ १४ ॥
१४) शिवाय माया जर खरी असती तर परब्रह्माकडे कर्तेपण देण्याचा प्रश्र्ण होता. माया जर खरीच नाहीं तर तिला निर्माण करण्याच्या कर्तृत्वाचा प्रश्र्णच येत नाहीं. 
आतां हें अवघेंचि उगवें । आणी मनास प्रत्यये फावे ।
ऐसें केलें पाहिजे देवें । कृपाळूपणें ॥ १५ ॥
१५) शेवटीं श्रोता म्हणतो कीं, हें सारें प्रश्र्ण सुटून मनाला अनुभव येईल असें विवेचन सद्गुरुनीं कृपाळू होऊन करावें. 
वेद मातृकावीण नाहीं । मातृका देहावीण नाहीं ।
देह निर्माण होत नाहीं । देहावेगळा ॥ १६ ॥
६) वेद शब्दमय आहेत. शब्द अक्षरापासून बनतात. सर्व अक्षरांचें मूळ ओंकाराच्या साडेतीन मात्रांमध्यें आहे. म्हणून वेद हें मात्रामय आहेत. ओंकार देहाशिवाय साकार होत नाहीं. आणि देहावाचून देह निर्माण होत नाहीं.  
तया देहामधें नरदेहो । त्या नरदेहांत ब्राह्मणदेहो ।
तया ब्राह्मणदेहास पाहो । अधिकार वेदीं ॥ १७ ॥
१७) देहांमध्यें नरदेह उत्तम मानतात. नरदेहामध्यें ब्राह्मणदेह श्रेष्ठ मानतात. ब्राह्मणदेहाला वेदांचा अधिकार आहे. 
असो वेद कोठून जाले । देह कासयाचे केले । 
देव कैसे प्रगटले । कोण्या प्रकारें ॥ १८ ॥
१८) असो. येथें प्रश्न येतों कीं वेद कोठून निर्माण झाले ? देह कशाचे बनवले ? आणि देव कोणत्या रीतीनें दृश्य आकाराला आलें ?
ऐसा बळावला अनुमान । केलें पाहिजे समाधान ।
वक्ता म्हणे सावधान । होईं आतां ॥ १९ ॥
१९) श्रोत्यांचा तर्कअसा धावूं लागला. त्यांचे समाधान करणें जरुर आहे. म्हणून वक्ता म्हणाला कीं, अगदीं लक्षपूर्वक उत्तर ऐकावें. 
प्रत्यये पाहातां सांकडी । अवघी होते विघडाविघडी ।
अनुमानितां घडीनें घडी । काळ जातो ॥ २० ॥
२०) प्रत्यक्ष अनुभव बघितला तर खरोखर अडचण निर्माण होते. कारण शास्त्रें जें प्रतिपादन करतात त्याच्याशी अनुभवाचा विरोध होतो. आणि त्यावर तर्क करीत राहिलें तर निकाल लागत नाहींच उलट क्षणाक्षणाने काळ मात्र फुकट जातो. 
लोकधाटी शास्त्रनिर्णये । येथें बहुधा निश्र्चये । 
म्हणोनियां येक प्रत्यये । येणार नाहीं ॥ २१ ॥
२१) लोकांचीं मतें काय व शास्त्राचे निर्णय काय नाना प्रकारचे असतात. म्हणून त्यांच्यामध्यें एकनिश्र्चित असा सिद्धान्त आढळत नाहीं.  
आतां शास्त्राची भीड धरावी । तरी सुटेना हे गथागोवी ।
गथागोवी हे उगवावी । तरी शास्त्रभेद दिसे ॥ २२ ॥
२२) त्यामुळें असें होतें कीं, शास्त्राचे निर्णय सांभाळण्याचा प्रयत्न केला तर हा घोटाळा उलगडत नाहीं. आणि हा घोटाळा उलगडण्याचा प्रयत्न केला तर शास्त्रांच्या निर्णयामध्यें एकमत आढळत नाहीं.  
शास्त्र रक्षून प्रत्यये आणिला । पूर्वक्ष त्यागून सिद्धांत पाहिला ।
शाहाणा मूर्ख समजाविला । येका वचनें ॥ २३ ॥
२३) आपलें उत्तर असें पाहिजे कीं, एकीकडे शास्त्राच्या प्रामाण्याला धक्का लागूं नये आणि दुसरीकडे प्रत्यक्ष अनुभवाशीं त्याचा विरोध येऊं नये. आधीं पूर्वपक्ष मांडावा. त्यांतील दोष दाखवून तो बाजूस सारावा, आणि मग आपला सिद्धान्त प्रतिपादन करावा. एकच उत्तर द्यावें पण त्यानें शहाणा व अडाणी दोघांचे समाधान व्हावें.  
शास्त्रींच पूर्वपक्ष बोलिला । पूर्वपक्ष म्हणावें लटक्याला ।
विचार पाहातं आम्हांला । शब्द नाहीं ॥ २४ ॥   
२४) शास्त्रामध्यें पूर्वापार सांगण्याची रीत आहे. पूर्वपक्ष अपुरा असतो. खरा नसतो. म्हणून येथें पूर्वपक्ष मांडला आणि त्याचे विवेचन केलें तर आम्हांला त्यांत दोष देता येणार नाहीं.    
तथापि बोलों कांहीयेक । शास्त्र रक्षून कौतुक ।
श्रोतीं सादर विवेक । केला पाहिजे ॥ २५ ॥
२५) तथापि शास्त्रांचे प्रामाण्य रक्षण करुन या विषयाचें कौतुकानें थोडे विवेचन करतो. श्रोत्यांनी आदरानें त्याचा विचार करावा. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे देहआशंकानाम समास दुसरा ।
Samas Dusara Deha Aashanka
समास दुसरा देहआशंका निरुपण


Custom Search

No comments: