Wednesday, November 8, 2017

Samas Sahava Guna Nirupan समास सहावा गुणनिरुपण


Dashak Navava Samas Sahava Guna Nirupan 
Samas Sahava Guna Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Paancha Bhute and Trigunas/ Pancha Bhutas are Aakash (Sky). Vayu (Air), Agni (Fire), Jal (Water), and Pruthavi . TriGuans are Satva, Raj and Tam.
समास सहावा गुणनिरुपण
श्रीराम ॥
आकाश जैसें निराकार । तैसा ब्रह्माचा विचार ।
तेथें वायोचा विकार । तैसी मूळमाया ॥ १ ॥
१) ब्रह्मस्वरुप आकाशासारखें आहे. आकाशास आकार नाही तसा ब्रह्मास आकार नाही. निराकार व निर्विकार आकाशामध्यें वायूची लहर येते. त्याच प्रमाणें निर्विकार परब्रह्मामध्यें मूळमाया उदय पावते.    
हें दासबोधीं असें बोलिलें । ज्ञानदशकीं प्राजंळ केलें ।
मूळमायेंत दाखविलें । पंचभूतिक ॥ २ ॥
२) दासबोधांत सातव्या दशकांत हें सांगितले. नंतर ज्ञानदशकांत म्हणजे आठव्या दशकांत हें स्पष्ट केले. मूळमाया आपल्या पोटांत पंचमहाभूतें घेऊन असते हेहीं तेथें दाखविलें. 
तेथें जाणीव तो सत्वगुण । मध्य तो रजोगुण ।
नेणीव तमोगुण । जाणिजे श्रोतीं ॥ ३ ॥
३) मूळमायेमध्यें त्रिगुण सुप्त असतात. तेथें जाणीव तो सत्वगुण होय. तो ज्ञानमय असतो. थोडी जाणीव व थोडी नेणीव असें मिश्रण असलेला रजोगुण होय. रजोगुण ज्ञान व अज्ञान यांचे मिश्रण असते. आणि नेणीव तो तमोगुण होय. तमोगुण अज्ञानमय असतो असे श्रोत्यांनी समजावें.
म्हणाल तेथें कैंची जाणीव । तरी ऐका याचा अभिप्राव ।
पिंडीं माहांकारण देहीं सर्व--। साक्षिणी अवस्था ॥ ४ ॥
४) मूळमायेमध्यें जाणीव कोठून आली असा प्रश्र्ण पडल्यास त्याचें उत्तर समजावून सांगतो. पिंडाचे चार देह असतात. त्यापैकीं महाकारण हा चौथा. सर्वसाक्षिणी तुर्या अवस्था हें त्या देहाचे लक्षण होय.  
तैसी मूळप्रकृती ब्रह्मांडींचें । देह माहाकारण साचें ।
म्हणोन तेथें जाणीवेचें । अधिष्ठान आलें ॥ ५ ॥
५) ब्रह्मांडाचे देखील चार देह आहेत. त्यापैकी मूळप्रकृति हा महाकारण देह आहे. तो ज्ञानमय असल्यानें तेथें शुद्ध जाणीवेचें अधिष्ठान असतें.  
असो मूळमायेभीतरीं । गुप्त त्रिगुण वास करी ।
पष्ट होती संधी चतुरीं । जाणावी गुणक्षोभिणी ॥ ६ ॥
६) मूळमायेच्या पोटांत सत्व, रज व तम हें तीन गुण गुप्तपणें वास करतात. गुणमाया प्रगट झाली कीं, या तीन गुणांची साम्यावस्था भंगते. मग ते व्यक्त दशेंत येतात. म्हणून गुनक्षोभिणी तीन गुणांना व्यक्त दशेंत आणणारी संधि आहे असें शहाण्यांनी ओळखावें.   
जैसा तृणाचा पोटराकळा । पुढें उकलोन होये मोकळा ।
तैसी मूळमाया अवलीळा । गुणा प्रसवली ॥ ७ ॥
७) धान्याचें कणीस प्रथम बंद असतें. कणीस पिकलें कीं त्यांतले दाणे मोकळे होतात. त्याप्रमाणें मूळमाया आधीं तीन गुणांना पोटांत घेऊन असते. मग गुणमाया प्रगट होते व अगदी सहजपणें तिन्ही गुण व्यक्त दशेला येतात.  
मूळमाया वायोस्वरुप । ऐक गुणक्षोभिणीचें रुप ।
गुणविकार होतांचि अल्प । गुणक्षोभिणी बोलिजे ॥ ८ ॥
८) मूळमाया वायुस्वरुप म्हणजे शक्तीरुप असते. आतां गुणक्षोभिणीचे रुप सांगतो. मूळमायेमध्यें थोडासा गुणांचा विकार आढळला कीं, तिला गुणक्षोभिणी म्हणतात.      
पुढें जाणीव मध्यस्त नेणीव । मिश्रित चालिला स्वभाव ।
तेथें मातृकास ठाव । शब्द जाला ॥ ९ ॥
९) नंतर तिच्यामध्यें सत्व, रज, तम यांच्या मिश्रणानें विश्र्व निर्माण होण्याची क्रिया सहजपणें चालते. त्यामधें प्रथम साडेतीन मात्रांचा ओंकार प्रगट झाला. 
तो शब्दगुण आकाशींचा । ऐसा अभिप्राव येथीचा । 
शब्देंचि वेदशास्त्रांचा । आकार जाला ॥ १० ॥
१०) शब्द हा आकाशाचा गुण आहे. असा यामध्यें गर्भितार्थ आहे. वेद व शास्त्रें शब्दाच्या द्वाराच प्रगट होतात. 
पंचभूतें त्रिगुणकार । अवघा वायोचा विकार ।
जाणीवनेणीवेचा विचार । वायोचि करितां ॥ ११ ॥
११) पांच भूतें व तीन गुण मिळून आठ होतात. हीच अष्टधा प्रकृति होय. ही मूळमायेचाच विकार आहे. तिचेंच एक कनिष्ठ रुप आहे. ज्ञान व अज्ञान यांचा विचार करण्याची वेळ मूळमायेमुळेंच येते.   
वायो नस्तां कैंची जाणीव । जाणीव नस्तां कैंची नेणीव ।
जाणीवनेणीवेस ठाव । वायोगुणें ॥ १२ ॥
१२) जर मूळमाया नसती तर परब्रह्माला स्वतःची ज्ञानरुप जाणीव झाली नसती. जाणीव निर्माण झाली कीं नेणीव स्वाभाविकपणें पुढें येते. म्हणून जाणीव व नेणीव, किंवा ज्ञान व अज्ञान या जोडीला मूळमायेखेरीज स्थान नाहीं.
जेथें मुळींच नाहीं चळण । तेथें कैचें जाणीवलक्षण ।
म्हणोनि वायोचा गुण । नेमस्त जाणावा ॥ १३ ॥
१३) जेथें मूळींच हालचाल नाहीं तेथें जाणीवेचे अस्तित्व आहे असे म्हणतां येत नाही. म्हणून जाणीव हा वायुचा गुण निश्चित समजावा.   
येकापासून येक जालें । हें येक उगेंचि दिसोन आलें ।
स्वरुप मुळींच भासलें । त्रिगुणभूतांचें ॥ १४ ॥
१४) एकापासून एक कसें झालें असेम सांगितल्यावाचून विश्व कसेम निर्माण झालें तें आपल्याला बोलतां येत नाहीं. खरें म्हणजें तीन गुण व पंचभूतें मूळमायेमध्यें एकमेकांत मिसळलेलीच आहेत.   
ऐसा हा मुळींचा कर्दमु । पुढें पष्टतेचा अनुक्रमु ।
सांगतां येकापासून येक उगमु । हें हि खरें ॥ १५ ॥
१५) मूळमायेमध्यें पंचभूतें व तीन गुण सूक्ष्म व एकरुप असतात. पुढें एकपणाचा अनेकपणा होऊं लागला म्हणजे पांच भूतें व तीन गुण वेगळेपणानें अनुभवास येतात. अनेकपणाचा क्रम सांगतांना एकापासून दुसरें निर्माण झालें असें म्हणणें योग्य व बरोबर असते.   
वायोचा कर्दम बोलिला । तयापासून अग्नि जाला ।
तोहि पाहातां देखिला । कर्दमुचि ॥ १६ ॥
१६) आतांपर्यंत वायूमध्यें असणारें मिश्रण सांगितलें. वायूमधून तेज निघतें. अग्नि निर्माण होतो. अग्नीमध्यें देखील वायूप्रमाणेंच मिश्रण असतें. 
अग्नीपासून जालें आप । तेंहि कर्दमस्वरुप ।
आपापासून पृथ्वीचें रुप । तेंहि कर्दमरुपी ॥ १७ ॥
१७) अग्नीपासून पाणी निर्माण झालें. त्यांत मिश्रण असतें. पाण्यापासून पृथ्वी झालीं. तिच्यांत देखील मिश्रण असतें. 
येथे आशंका उठिली । भूतांस जाणीव कोठें देखिली ।
तरी भूतांत जाणीव हे ऐकिली । नाहीं वार्ता ॥ १८ ॥
१८) या ठिकाणीं एक शंका येतें ती अशी कीं, पांच भूतें दिसायला तर अचेतन दिसतात. त्यांच्यामध्यें जाणीव कोठें आढळत नाहीं. पंचभूतांमध्यें जाणीव असते, ही गोष्ट कधीं ऐकलेली नाही. 
जाणीव म्हणिजे जाणतें चळण । तेंचि वायोचें लक्षण ।
वायोआंगीं सकळ गुण । मागां निरोपिलें ॥ १९ ॥   
१९) शंकेचें उत्तर असें कीं, हेतुपूर्वक होणारी जी हालचाल ती जाणीव होय. वायूचें लक्षण हेंच आहे. वायूमध्यें सगळें गुण असतातहें नुकतेंच सांगितलें आहे.      
म्हणोन जाणीवनेणीवमिश्रित । अवघें चालिलें पंचभूत ।
म्हणोनियां भूतांत । जाणीव असे ॥ २० ॥
२०) म्हणून जाणीव व  नेणीव यांच्या मिश्रणानें पांच भूतांचा सगळा खटाटोप चालत असतो. यावरुन महाभूतांमध्यें जाणीव असते, यांत संशय घेण्याचे कारण नाही.   
कोठें दिसे कोठें न दिसे । परी ते भूतीं व्यापून असे ।
तिक्षण बुद्धि करितां भासे । स्थूळ सूक्ष्म ॥ २१ ॥
२१) जाणीव पांचही भूतांना व्यापून असते हें खरें. परंतु कोठे ती प्रगटपणें दिसते कोठे ती दिसत नाही. इतकाच फरक आहे. तीव्र बुद्धीनें विचार केला तर जाणिवेचें स्थूल व सूक्ष्म रुप बरोबर कळेल. 
पंचभूतें आकारलीं । भूतीं भूतें कालवलीं ।
तरी पाहातां भासलीं । येक स्थूळ येक सूक्ष्में ॥ २२ ॥
२२) पांच भूतें जेव्हां आकाराला आलीं तेव्हां दिसायला ती वेगळी दिसूं लागली. पण ती एकमेकांत मिसळलेली किंवा कालवलेली असतात. त्यांच्याकडे पाहिले तर एक स्थूल दिसते आणि दुसरें सूक्ष्म दिसतें.      
निरोधवायो न भासे । तैसी जाणीव न दिसे । 
न दिसे परी ते असे । भूतरुपें ॥ २३ ॥
२३) वायू जेव्हां वाहात नाहीं तेव्हां तो आहे असें वाटत नाहीं. त्याचप्रमाणें जाणीव जेव्हां गुप्त असते तेव्हां ती दिसत नाहीं. परंतु ती दिसली नाहीं तरी भूतांच्या अंतरीं सूक्ष्मरुपानें असतेच. 
काष्ठीं अग्नी दिसेना । निरोधवायो भासेना ।
जाणीव तैसी लक्षेना । येकायेकीं ॥ २४ ॥
२४) लांकडामध्यें अग्नि असून दिसत नाहीं. वायू वाहाणें बंद झालें कीं वायु असून भासत नाही. त्याचप्रमाणें जाणीवेंचे अस्तित्व एकदम ध्यानांत येत नाहीं. 
भूतें वेगळालीं दिसती । पाहाता येकचि भासती ।
बहुत धूर्तपणें प्रचिती । वोळखावी ॥ २५ ॥
२५) पांच भूतें दिसायला वेगवेगळीं दिसतात. पण सूक्ष्म विचारानें बघितली तर तीं एकरुप आढळतात. या गोष्टीचा अनुभव मोठ्या चतुरपणें घ्यावा लागतो.   
ब्रह्मापासून मूळमाया । मूळमायेपासून गुणमाया ।
गुणमायेपासून तया । गुणास जन्म ॥ २६ ॥
२६) विश्वनिर्मितीची गोष्ट - परब्रह्मापासून मूलमाया झाली. मूलमायेपासून गुणमाया झाली. गुणमायेपासून सत्व, रज, तम हे तीन गुण जन्मलें. 
गुणापासूनियां भूतें । पावलीं पष्ट दशेतें ।
ऐसियांचीं रुपें समस्तें । निरोपिलीं ॥ २७ ॥
२७) गुणांपासून पांच भूतें झाली. नंतर ती वेगवेगळी होऊन दृश्य रुपास आली. या सगळ्यांची लक्षणें आतांपर्यंत सांगितली. 
आकाश गुणापासूनि जालें । हें कदापी नाहीं घडलें ।
शब्दगुणास कल्पिलें । आकाश वायां ॥ २८ ॥
२८) खरें म्हणजें पांच भूतें व तीन गुण मिळून गुणमाया असतें. म्हणून आकाश गुणामपासून झालें असें कधींच घडत नाही. शब्दाला अधिष्ठान हवें म्हणून उगीच आकाशाची कल्पना केली आहे. 
येक सांगतां येकचि भावी । उगीच करी गथागोवी ।
तया वेड्याची उगवी । कोणें करावी ॥ २९ ॥
२९) एक सांगितलें तर भलतेंच कांहींतरी समजते. उगीच अर्थाचा घोटाळा करतो, अशा वेड्याची समजूत घालणें फार कठिण असतें. 
सिकविल्यां हि कळेना । उमजविल्यां हि उमजेना ।
दृष्टांतेंहि तर्केना । मंदरुप ॥ ३० ॥
३०) त्याला नीट शिकवले तर कळत नाहीं. समजावून सांगितलें तर समजत नाहीं. उदाहरणें व दृष्टांत देऊन सांगितलें तरी त्यांचा बरोबर अर्थ काढण्याची शक्ति त्याच्या बुद्धींत नाहीं. 
भूतांहून भूत थोर । हा हि दाविला विचार ।
परी भूतांवडिल स्वतंत्र । कोण आहे ॥ ३१ ॥
३१) पांच भूतांमध्यें एकापेक्षां एकथोर  आहे. हा विचार मांडला. याचप्रमाणें  पंचभूतांहून वरिष्ठ व स्वतंत्र कोण हा प्रश्र्ण येतो.   
जेथें मूळमाया पंचभूतिक । तेथें काये राहिला विवेक ।
मूळमायेपरतें येक । निर्गुणब्रह्म ॥ ३२ ॥
३२) जेथें मूळमायाच पांच भूतांनी भरलेली आहे, तेथें या प्रश्र्णाचा विचारच थांबतो. मूळमायेच्या पलीकडे निर्गुण ब्रह्म तेवढें आहे.    
ब्रह्मीं मूळमाया जाली । तिची लीळा परीक्षिली ।
तंव ते निखळ बोलली । भूतेंत्रिगुणांची ॥ ३३ ॥
३३) परब्रह्मामध्यें मूळमाया निर्माण झाली. हें अवाढव्य विश्व बनवण्याचा खेळ ती खेळते. या तिच्या लीलेचें सूक्ष्म निरिक्षण केलें आणि खोल परिक्षण केले तर असें आढळतें कीं ती निव्वळ पांच भूतें व तीन गुण यांची मूस आहे.    
भूतें विचारवंत चत्वार । आकाश पाहातां निर्विकार ।
आकाश भूत हा विचार । उपाधीकरितां ॥ ३४ ॥
३४) चार भूतांना विकार आहेत. त्यांच्यामध्यें बदल घदतो. आकाश मात्र निर्विकार आहे. त्याला उपाधि आहे, मर्यादा आहे. म्हणून तें पंचभूतांत गणलें जाते.  
पिंडीं व्यापक म्हणोन जीव । ब्रह्मांडीं व्यापक म्हणोन शिव ।
तैसाच हाहि अभिप्राव । आकाशाचा ॥ ३५ ॥
३५) जाणीव जेव्हां पिंडाला व्यापते तेव्हां तिला जीव म्हणतात. ती पिंडापुरती मर्यादित होते. जाणीव जेव्हां विश्वाला किंवा ब्रह्मांडाला व्यापते, विश्वापुरती मर्यादित होते तेव्हां तीला शिव म्हणतात. आकाशाचाही असाच विचार करावयास हवा.    
उपाधीमधें सांपडलें । सूक्ष्म पाहातां भासलें । 
इतुक्यासाठीं आकाश जालें । भूतरुप ॥ ३६ ॥
३६) आकाशाला दृश्यानें मर्यादा घातली. सूक्ष्म दृष्टीनें पाहीलें तर तें ज्ञेयरुपानें अनुभवास येतें. ज्ञेयरुपानें म्हणजे वेगळेपणानें जें अनुभवास येतें तें पंचभूतात्मक असतें. म्हणून आकाश पांच भूतांपैकी एक गणलें गेलें आहे.  
आकाश अवकाश तो भकास । परब्रह्म तें निराभास ।
उपाधी नस्ता जें आकाश । तेंचि ब्रह्म ॥ ३७ ॥
३७) आकाश अवकाशरुप आहे, म्हणून तें शून्यमय आहे. शून्य नाहींपणानें भासतें, पण परब्रह्म निराळेंपणानेम अनुभवास येतच नाही. दृश्यपणाची कोणतीही उपाधि नसणारें जें आकाश तेंच ब्रह्मस्वरुप होय.  
जाणीव नेणीव मध्यमान । हेंचि गुणाचें प्रमाण ।
येथें निरोपिलें त्रिगुण । रुपेंसहित ॥ ३८ ॥
३८) सत्व म्हणजे जाणीव, तम म्हणजे नेणीव आणी रज म्हणजे जाणीव नेणीव यांचे मिश्रण. तीन गुणांची रुपें त्यांच्या प्रगट रुपांसहित सांगितलीं आहेत. 
प्रकृती पावली विस्तारातें । पुढें येकाचें येकचि होतें ।
विकारवंतचि तयातें । नेम कैंचा ॥ ३९ ॥
३९) एकदां का प्रकृतीचा विस्तार होऊं लागला म्हणजे एकांतून एक निर्माण होत जातें. प्रकृती विकारवंत आहे असें एकदां समजले म्हणजे तिच्यांत अनंत प्रकारचे दृश्य कसें निर्माण होत जातें याचे आश्र्चर्य वाटणार नाही.  
काळें पांढरें मेळवितां । पारवें होतें तत्वता । 
काळें पिवळें मेळवितां । हिरवें होये ॥ ४० ॥
४०) काळा व पांढरा रंग एकत्र मिसळला कीं त्यापासून पारवा रंग तयार होतो. काळा व पिवळा रंग मिसळला कीं त्यापासून हिरवा रंग तयार होतो.  
ऐसे रंग नानापरी । मेळवितां पालट धरी ।
तैसें दृश्य हें विकारी । विकारवंत ॥ ४१ ॥
४१) अशारीतीनें रंगांचें मिश्रण केलें तर मूळ रंग बदलतात. व नवीन रंग तयार होतात. त्याचप्रमाणें मुळांतच दृश्य विकारवंत असल्यामुळें त्यामध्यें बदल होऊन नवीन नवीन दृश्य वस्तु बनत जातात. 
येका जीवनें नाना रंग । उमटों लागती तरंग ।
पालटाचा लागवेग । किती म्हणोन पाहावा ॥ ४२ ॥   
४२) मुळांत पाणी एकच असतें. परंतु त्यावर तरंग उमटु लागतात. तरंगांमध्यें इतक्या जलद गतीनें बदल घडतो कीं, त्यांची गणती करणें अशक्य असतें.            
येका उदकाचे विकार । पाहातां दिसती अपार ।
पांचा भूतांचे विस्तार । चौर्‍यासी लक्ष योनी ॥ ४३ ॥
४३) पांच भूतांपैकी पाणी एक भूत आहे. त्याचे एकट्याचे इतके फेरबदल घडतांना दिसतात. मग पांच भूतांचा पसारा केवढा अपाट असेल, चौर्‍यांशी लक्ष योनींतील जीवप्राणी त्या अफाट पसार्‍याचाच एक भाग आहे.    
नाना देहाचें बीज उदक । उदकापासून सकळ लोक ।
किडा मुंगी स्वापदादिक । उदकेंचि होयें ॥ ४४ ॥
४४) जगांत कितीतरी प्रकारचे प्राणी दिसतात, पण पाणी हेंच त्यांच्या देहाचे मूळ आहे. सगळीं माणसें किडामुंगी इत्यादि जीव, आणी श्वापदादिक जनावरें सगळीं पाण्यापासून निर्माण होतात. 
शुक्लीत श्रोणीत म्हणिजे नीर । त्या नीराचें हें शरीर ।
नखें दंत अस्तिमात्र । उदकाच्या होती ॥ ४५ ॥
४५) रक्त आणी वीर्य मुळांत पाणीच असतात. त्या पाण्यापासून आपलें शरीर बनतें. नखें, दांतव सगळीं हाडें पाण्यापासूनच तयार होतात. 
मुल्यांचे बारीक पागोरे । तेणें पंथें उदक भरे । 
त्या उदकेंचि विस्तारे । वृक्षमात्र ॥ ४६ ॥
४६) झाडाच्या मुळ्यांना अगदी बारीक तंतुमय शाखा असतात. त्यांच्यातून पाणी शोषलें जाऊन तें सगळ्या झाडाला पुरविलें जातें. त्यापाण्यानें झाडाचा विस्तार होतो.   
अंबवृक्ष मोहरा आले । अवघे उदकाकरितां जाले ।
फळीं फुलीं लगडले । सावकास ॥ ४७ ॥
४७) पाण्यामुळें आंब्याच्या झाडाला मोहोर येतो. झाडांना फुलांचा व फळांचा बहर येतो. तो सगळा पाण्याचा परिणाम होय.  
खोड फोडून अंबे पाहातां । तेथें दिसेना सर्वथा ।
खांद्या फोडून फळें पाहातां । वोलीं सालें ॥ ४८ ॥
४८) आब्याच्या झाडाचें खोड फोडलें तर आंबे दिसत नाहीत. फांद्या तोडल्या तरी तेथें आंबे दिसत नाहीत. तर ओल्या सालीच असतात. 
मुळापासुन सेवटवरी । फळ नाहीं तदनंतरीं ।
जळरुप फळ चतुरीं । विवेकें जाणावें ॥ ४९ ॥
४९)  अशा रीतीनें मुळापासून झादाच्या शेंड्यापर्यंत पाहिलें तरी त्यांच्यामध्यें फळ दिसणार नाहीं. यावरुन झाडाला लगडणारे फळ जळरुप असते असें चतुरमाणसानें विवेकपूर्वक ठरवावें. 
तेंचि जळ सेंड्या चढे । तेव्हां वृक्षमात्र लगडे ।
येकाचें येकचि घडे । येणें प्रकारें ॥ ५० ॥
५०) झाडाच्या मुळ्यांनी शोषलेले पाणी जेव्हां झाडाच्या शेंड्यापर्यंत पोहोचते तेव्हा सगळें झाड फलाफुलांनी लगडुन जातें. एकांतून दुसरें कसें निर्माण होते, याचे हें उत्तम उदाहरण आहे.  
पत्रें पुष्पें फळें भेद । किती करावा अनुवाद ।
सूक्ष्म दृष्टीनें विशद । होत आहे ॥ ५१ ॥
५१) एकाच पाण्यापासून पानें, फळें, व फुलें असें निरनिरालें बदल घडून येतात. ते भेद इतकें असतात कीं, सगळें सांगणें अशक्य आहे. सूक्ष्म दृष्टीनें विचार केला तर या गोष्टी स्पष्टपणें आकलन होऊं लागतात.  
भूतांचे विकार सांगो किती । क्षणक्षणा पालटती ।
येकाचे येकचि होती । नाना वर्ण ॥ ५२ ॥ 
५२) पांच भूतांमध्यें क्षणाक्षणाला सारखा बदल होत असतो. हे बदल सगळे सांगणें शक्य नाहीं. एका पदार्थांत बदल होऊन त्याच्यातून दुसरा पदार्थ निर्माण होतो. पदा्थाच्या रंगामध्यें नाना तर्‍हेचे बदल घडतात. हें सर्व वर्णन करणें शक्य नाहीं.    
त्रिगुणभूतांची लटपट । पाहों जातां हे खटपट ।
बहुरुप बहु पालट । किती म्हणोन सांगावा ॥ ५३ ॥
५३) तीन गुण व पांच भूतें यांच्या परस्पर मिश्रणाचा हा अवाढव्य खटाटोप समजून घेणें म्हणजें मोठीच खटपट आहे. नाना प्रकारच्या वस्तु, त्यांची नाना रुपें , त्यांच्यांत घडणारे नाना बदल, या सर्वांचे निरीक्षण व परिक्षण म्हणजे कठिण काम आहे याची कल्पना करावी. 
ये प्रकृतीचा निरास । विवेकें वारावा सावकास ।
मग परमात्मा परेश । अनन्यभावें भजावा ॥ ५४ ॥
५४) अशा या गुणमायेचे म्हणजे गुणमय प्रकृतीचें निरसन करावें. पण तें अत्यंत विवेकानें व सावकाश करावें. मग परमात्मस्वरुप परमेश्वराशी अगदी अनन्य व्हावें व त्याची भक्ति करावी.    
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे गुणरुपनिरुपणनाम समास सहावा ॥
Samas Sahava  Guna Nirupan
समास सहावा गुणनिरुपण


Custom Search

No comments: