Friday, November 24, 2017

Samas Sahava Bhrama Nirupan समास सहावा भ्रमनिरुपण


Dashak Dahava Samas Sahava Bhrama Nirupan 
Samas Sahava Bhrama Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Bhrama. Neniva means Brahma, Lack of knowledge. We think that what we see is real. It is due to lack of knowledge.
समास सहावा भ्रमनिरुपण
श्रीराम ॥
उत्पत्ती स्थिति संव्हार । याचा निरोपिला वेव्हार ।
परमात्मा निर्गुण निराकार । जैसा तैसा ॥ १ ॥
१) उत्पत्ती, स्थिति आणि संहार कसा यासंबंधीं आतांपर्यंत विवेचन केलें. विश्वांत हें सर्व घडत असतांना निर्गुण, निराकार परमात्मा जसाच्या तसाच राहतो. 
होतें वर्ततें आणी जातें । याचा समंध नाहीं तेथें ।
आद्य मद्य अवसान तें । संचलेंचि आहे ॥ २ ॥
२)  विश्व निर्माण होतें. बराच काळ तें टिकते. व कल्पान्ती नाहींसें होते. परंतु परब्रह्माचा याशी कांहींहीं संबंध नसतो. विश्वाच्या आधी, विश्व निर्माण झाल्यावर आणि विश्व नाहींसे झाल्यावर परब्रह्म अगदी जसेंच्या तसें सर्वत्र दाट भरुन असतें.   
परब्रह्म असतचि असे । मध्येंचि हा भ्रम भासे ।
भासे परंतु अवघा नासे । काळांतरीं ॥ ३ ॥
३) परब्रह्म नेहमीं असतेंच असते. मध्येंच हा विश्वाचा भ्रम निर्माण होतो. विश्व आहे असें भासते परंतु कालांतरांनें तें नाहीसें होते. नाश पावते.  
उत्पत्तीस्थितीसंव्हारत । मध्येंहि अखंड होत जात ।
पुढें सेवटीं कल्पांत । सकळांस आहे ॥ ४ ॥
४) उत्पत्ति, स्थिति आणि संहार परब्रह्मामध्यें सारखें घशलेलें दिसतात. परंतु सगळ्याला कल्प संपलें कीं नाश ठेवलेलाच आहे. 
यामधें ज्यास विवेक आहे । तो आधींच जाणताहे ।
सारासार विचारें पाहे । म्हणौनियां ॥ ५ ॥
५) हें सर्व चालूं असतां मात्र ज्याच्याकडे विवेक आहे, तो हे सर्व आधींच जाणतो. जगांतील सर्व गोष्टींकडे तो सारख्याच एक नजरेनें बघतो. म्हणून त्याला असें अगोदर ज्ञान होतें. 
बहुत भ्रमिष्ट मिळाले । त्यांत उमजल्याचें काय चाले ।
सृष्टीमधें उमजले । ऐसे थोडे ॥ ६ ॥
६) समजा भ्रम झालेल्या लोकांचा एक समुह आहे. त्यामध्यें ज्याला भ्रम नाहीं असा माणूस गेला. जें खरें आहे तें तो त्यांना सांगू लागला तर त्याचें म्हणणें कोणी ऐकत नाही. तशी जगांतील माणसांची अवस्था आहे. येथें भ्रम असलेले बरेच व विश्वाचे खरें स्वरुप ओळखणारे थोडेच दिसतात.    
त्या उमजल्यांचें लक्षण । कांहीं करुं निरुपण ।
भ्रमाहून विलक्षण । महापुरुष ॥ ७ ॥ 
७) विश्वाचें खरें स्वरुप जाणणारे जे ज्ञानी त्यांच्याबद्दल थोडें विवेचन करतो. जो भ्रमाहून निराळा असतो, दूर असतो तोच महापुरुष होय.  
भ्रम हा नसेल जयासी । मनीं वोळखावे तयासी ।
ऐक आतां भ्रमासी । निरोपिजेल ॥ ८ ॥
८) ज्या पुरुषाला कसलाही भ्रम नाहीं, अशाला मनांत ओळखून राहावें. तें ओळखतां यावें म्हणून निरनिराळ्या भ्रमांचे वर्णन आतां करतो. 
येक परब्रह्म संचलें । कदापी नाहीं विकारलें । 
त्यावेगळें भासलें । तें भ्रमरुप ॥ ९ ॥
९) परब्रह्मरुपी एकच एक सद्वस्तु सगळीकडे भरुन राहीली आहे. तिच्यामधें कधींही कोणताही विकार किंवा बदल होत नाहीं. ती तशी अनुभवास न येतां जें जें कांहीं अन्य अनुभवास येतें तें तें सारें भ्रमरुप होय.  जयासी बोलिला कल्पांत । त्रिगुण आणी पंचभूत ।
हें अवघेंचि समस्त । भ्रमरुप ॥ १० ॥
१०) ज्या ज्या गोष्टींना, वस्तूंना, अनुभवांना, कल्पनांना आज ना उद्या  प्रलयकालीं अंत आहे, त्या सगळ्या भ्रमांत मोडतात. पांच भूतें व त्रिगुण हें सर्व भ्रमरुप आहेत.     
मी तूं हा भ्रम । उपासनाहि भ्रम ।
ईश्र्वरभाव हाहि भ्रम । निश्र्चयेंसीं ॥ ११ ॥
११) त्याचप्रमाणें मी आणि तूं, देव आणि भक्त; उपासना व खुद्द ईश्र्वर देखील सर्व निश्र्चितपणें भ्रमरुपच आहेत.  
श्र्लोक 
भ्रमेणाहं भ्रमेण त्वं । भ्रमेणोपासका जनाः ।
भ्रमेणोश्वरभावत्वं । भ्रममूलमिदं जगत् ॥
श्र्लोकार्थ 
भ्रमानें  " मी " आहे असा भास होतो. भ्रमानें " तूं ' आहेस असें वाटतें ; '" भक्त व उपासक "  खरें वाटणें हा भ्रमाचाच परिणाम आहे. " ईश्र्वर आहे " असे वाटणें हा भ्रमच आहे. थोडक्यांत हें सारें विश्व भ्रमरुप आहे.  
याकारणें सृष्टि भासत । परंतु भ्रमचि हा समस्त ।
यामध्यें जे विचारवंत । तेचि धन्य ॥ १२ ॥
१२) या कारणानें हें एवढें विश्व प्रत्यक्ष आहे असें जरी वाटलें तरी तो सगळा भ्रमच आहे. म्हणून जगामध्यें जे खरोखर विवेकशील विचारवंत असतात ते धन्य समजावेत. 
आतां भ्रमाचा विचारु । आत्यंतचि प्रांजळ करुं ।
दृष्टांतद्वारें विवरुं । श्रोतयांसी ॥ १३ ॥
१३) भ्रमाचें स्वरुप अगदीं स्पष्ट होईल असें विवेचन आतां करतो. अनेक उदाहरणें देऊन भ्रमस्वरुप श्रोत्यांच्या नजरेस आणतो. 
भ्रमण करितां दूरी देसीं । दिशाभूलि आपणासी ।
कां वोळखी मोडे जीवलगांसी । या नां भ्रम ॥ १४ ॥
१४) आपल्या गांवापासून दूर असलेल्या अज्ञात भागामध्यें फिरत असतांना आपण वाट चुकतो. आपली दिशाभूल होते. आपल्या जवळच्या व प्रेमांतील माणसांची ओळख विसरतो यास भ्रम म्हणतात.   
कां उन्मत्त द्रव्य संचिलें । तेणें अनेक भासों लागलें ।
नाना वेथां कां झडपिलें । भूतें तो भ्रम ॥ १५ ॥
१५) अंमली पदार्थ खाल्यानें अगर प्ययल्यानें ापल्याला नाहींत त्या व्यथा आहेत असें वाटणें, भूतबाधा होणें,
दशावतारीं वाटती नारी । कां ते मांडली बाजीगरी ।
उगाच संदेह अंतरीं । या नांव भ्रम ॥ १६ ॥
१६) दशावताराच्या नाटकांत काम करणार्‍या बायका खर्‍या वाटणें, जादूचे खोळ खरें वाटणें, कांहीं कारण नसतांना मनांत संशयानें घर करणें हें सर्व भ्रमच.  
ठेविला ठाव तो विसरला । कां मार्गी जातां मार्ग चुकला ।
पट्टणामधें भांबावला । या नांव भ्रम ॥ १७ ॥
१७) आपण ज्या जागी वस्तु ठेविली ती जागा विसरणें, रस्त्यानें जात असतां वाट चुकणें, मोठ्या शहरांत बावरुन किंवा गोंधळून जाणें हा भ्रमच होय.  
वस्तु आपणापासीं असतां । गेली म्हणोनि होये दुचिता ।
आपलें आपण विसरतां । या नांव भ्रम ॥ १८ ॥
१८) एखादी वस्तु आपल्या जवळच असून ती हरवली असें वाटणें, त्यामुळें उदासीन होणें, प्रसंगी आपण कोण, कोठे आहोत याचा विसर पडणें हा भ्रमच होय.           
कांहीं पदार्थ विसरोन गेला । कां जे सिकला तें विसरला ।
स्वप्नदुःखें घाबिरा जाला । या नांव भ्रम ॥ १९ ॥
१९) आपल्या वस्तुंपैकी कांहीं व्तु विसरुन सोडून जाणें, शिकलेली विद्या अगर कला विसरणें, स्वप्नामध्यें झालेल्या दुःखद प्रसंगानें घाबरे होणें याला भ्रम म्हणतात.  
दुश्र्चिन्हें अथवा अपशकुन । मिथ्या वार्तेनें भंगे मन ।
वचके पदार्थ देखोन । या नांव भ्रम ॥ २० ॥
२०) अशुभ चिन्हे बघून, अपशकुन झालेला पाहुन किंवा खोट्या बातम्या ऐकून मन अस्वस्थ होणें, कांहीं वस्तु बघुन दचकणें याला भ्रम म्हणतात. 
वृक्ष काष्ठ देखिलें । मनांत वाटे भूत आलें ।
कांहींच नस्तां हडबडिलें । या नांव भ्रम ॥ २१ ॥  
२१) एखादें झाड किंवा मोठें लाकूड बघून तें भूत आहे असें वाटणें, भिण्यासारखें कांहींच नसतां हादरुन जाणें म्हणजे भ्रमच आहे. 
काच म्हणोन उदकांत पडे । कां सभा देखोन दर्पणीं पवाडे ।
द्वार चुकोन भलतीकडे । जाणें या नांव भ्रम ॥ २२ ॥
२२) समोर दिसणारी कांच नसून पाणी आहे हें न समजल्यानें पाण्यांत पडणें, प्रत्यक्ष सभेकडे न पाहातां आरशांतील सभेचे प्रतिबिंब खरें वाटणें, खर्‍या दारांतून न जातां चुकून भलतेंच दार समजून तिकडे जाणें हें सगळें भ्रमच होय.  
येक अस्तां येक वाटे । येक सांगतां येक निवटे ।
येक दिसतां येक उठे । या नांव भ्रम ॥ २३ ॥  
२३) एक असतां भलतेंच वाटणें, एक सांगितलें तर भलतेंच समजणें, एक दिसलें तर तें भलतेंच आहे अशी कल्पना होणें हें सगळें भ्रमच होय.   
आतां जें जें देइजेतें । तें तें पुढें पाविजेतें ।
मेलें माणूस भोजना येतें । या नांव भ्रम ॥ २४ ॥ 
२४) या जन्मी आपण जें जें दान करुं तें तें पुढिल जन्मी परत मिळेल असें वाटणें, मेलेला माणूस भोजनाला येतो असें वाटणें हें सर्व भ्रमच होत.  
ये जन्मींचे पुढिले जन्मीं । कांहीं येक पावेन मी ।
प्रीती गुंतली मनुश्याचे नामीं । या नांव भ्रम ॥ २५ ॥
२५) या जन्मींचे कांहीं तरी पुढच्या जन्मीं  आपल्याला मिळेल अशी भावना होणें, माणसाच्या नांवांतच प्रेम गुंतुन राहणें याला भ्रमच म्हणतात. 
मेलें मनुष्य स्वप्ना आलें । तेणें कांहीं मागितलें ।
मनीं अखंड बैसलें । या नांव भ्रम ॥ २६ ॥
२६) मेलेला माणुस स्वप्नांत आला व त्यांने कांहीं मागितले तर तें सारखें मनांत घोटाळत राहणें, हा भ्रमच होय. 
अवघें मिथ्या म्हणौन बोले । आणि सामर्थ्यावरी मन चाले ।
ज्ञते वैभवें दपटलें । या नांव भ्रम ॥ २७ ॥  
२७) हें सगळें मिथ्या आहे ासें फक्त बोलायचे आणि मनांत मात्र अधिकार व ऐश्र्वर्य यांची लालसा बाळगणें हा भ्रमच होय.  
कर्मठपणें ज्ञान विटे । कां ज्ञातेपणें बळें भ्रष्टे ।
कोणीयेक सीमा फिटे । या नांव भ्रम ॥ २८ ॥ 
२८) कर्मठपणामुळें ज्ञानाची नावड होणें. तसेंच ज्ञानामुळें जबरदस्तीनें आचारभ्रष्ट होणें, कर्मठपणाचा सनातनीपणा व ज्ञातेपणाचा बेछूटपणा असणें, व्यवहाराच्या मर्यादा उगीच टाकणें, हा भ्रमच होय. 
देहाभिमान कर्माभिमान । ज्यात्याभिमान कुळाभिमान ।
ज्ञानाभिमान मोक्षाभिमान । या नांव भ्रम ॥ २९ ॥
२९) देह, कर्म, जात, कुळ, ज्ञान व मोक्ष यांच्याबद्दल धरलेला अभिमान किंवा दृश्यामधिल कशाहीबद्दल अभिमान धरणें हा सर्व भ्रमच होय.   
कैसा न्याय तो न कळे । केला अन्याये तो नाडळे ।
उगाच अभिमानें खवळे । या नांव भ्रम ॥ ३० ॥
३०) न्याय कोणता तें कळत नाहीं, ान्याय केला तर तो लक्षांत येत नाहीं, अशी स्थिति असून निष्कारण अभिमानानें खवळणें हा सारा भ्रमाचाच प्रकार होय.  
मागील कांहीं आठवेना । पुढील विचार सुचेना ।
अखंड आरुढ अनुमाना । या नांव भ्रम ॥ ३१ ॥
३१) मागचें कांहींच आठवत नाहीं, पुढें काय करावें हें सुचत नाहीं, अशा अवस्थेंत आतां मात्र सारख्या कल्पना करीत राहणें, याला भ्रमच म्हणतात. 
प्रचीतिविण औषध घेणें । प्रचित नस्तां पथ्य करणें ।
प्रचीतीवीण ज्ञान सांगणें । या नांव भ्रम ॥ ३२ ॥
३२) अनुभवानें जें सिद्ध झालेलें नाहीं तें औषध घेणें, तसेंच ज्याचा कोणास अनुभव नाहीं तें पथ्य करणें, ज्याचा स्वानुभव नाहीं तें ज्ञान जगास सांगणें म्हणजे भ्रमच होय. 
फळश्रुतीवीण प्रयोग । ज्ञानेंविण नुस्ता योग ।
उगाच शरीरें भोगिजे भोग । या नांव भ्रम ॥ ३३ ॥  
३३) ज्या प्रयोगाचे फळ माहीत नाहीं असा प्रयोग करणें, ज्ञानाची जोड नसतां योगाचा अभ्यास करणें, उगीचच आपल्या शरीरानें सुखाचे भोग भोगणें हा भ्रमच होय.   
ब्रह्मा लिहितो अदृष्टीं । आणि वाचून जाते सटी ।
ऐशा प्रकारीच्या गोष्टी । या नांव भ्रम ॥ ३४ ॥
३४) माणूस जन्माला येण्या पूर्वी त्याच्या कपाळावर ब्रह्मदेव त्याचे भविष्य लिहून ठेवतो व त्याचे सहाव्या दिवसीं सटी तें वाचून जातें असल्या गोष्टींवर विश्र्वास ठेवणें याला भ्रम म्हणतात.  
उदंड भ्रम विस्तारला । अज्ञानजनीं पैसावला ।
अल्प संकेतें बोलिला । कळावयाकारणें ॥ ३५ ॥
३५) या आतामपर्यंत सांगितलेल्या सर्व गोष्टी भ्रमांत मोडतात. अशाप्रकारें भ्रमाचा फार विस्तार झाला आहे. अज्ञानी लोकांत हे भ्रमाचे प्रमाण मोठें आहे. थोड्या उदाहरणानीं तें लक्षांत यावें म्हणून सांगितलें.
भ्रमरुप विश्व स्वभावें । तेथें काये म्हणोन सांगावें ।
निर्गुण ब्रह्मावेगळें अघवें । भ्रमरुप ॥ ३६ ॥
३६)  हें सर्व विषवच भ्रमरुप आहे.  भ्रमाबद्दल कितीही सांगावें तेवढें थोडेच आहे. एका निर्गुण ब्रह्मा शिवाय बाकीचें सर्व भ्रमरुप आहे.   
ज्ञात्यास नाहीं संसार । ऐसें बोलती अपार ।
गत ज्ञात्याचे चमत्कार । या नांव भ्रम ॥ ३७ ॥ 
३७) आत्मज्ञानी पुरुषाला संसाराचा स्पर्श नाहीं असें बरेंच वेळा सांगितलें आहे. तरी पण देह ठेवलेल्या ज्ञानी पुरुषाचे चमत्कार सांगतात हा सुद्धा भ्रमच आहे. 
येथें आशंका उठिली । ज्ञात्याची समाधी पूजिली ।
तेथें कांहीं प्रचित आली । किंवा नाहीं ॥ ३८ ॥
३८) येथें अशी शंका येतें कीं, समजा आपण ज्ञानी पुरुषाच्या समाधीची पूजा केली तर त्यामुळें त्याच्या अस्तित्वाची कांहीं प्रचीति येते किंवा नाहीं ? 
तैसेचि अवतारी संपले। त्यांचेहि सामर्थ्य उदंड चाले ।
तरी ते काये गुंतले । वासना धरुनि ॥ ३९ ॥
३९) त्याचप्रमाणें पूर्वी होऊन गेलेल्या अवतारी पुरुषांचे केवढें मोठे सामर्थ्य अजून अनुभवास येते हें जर खरें तर अंतकाळीं त्यांची कांहींतरी वासना राहीली व त्यामुळें ते येथें गुंतुन आहेत असें समजायचें काय ?   
ऐसी आशंका उद्भवली । समर्थें पाहिजे निरसिली ।
इतुकेन हे समाप्त जाली । कथा भ्रमाची ॥ ४० ॥
४०) श्रोता म्हणतो कीं, अशी माझी शंका आहे. श्री समर्थांनी तिचें निरसन करावें. भ्रमाचे विवेचन येथें संपलें. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे भ्रमनिरुपण नाम समास सहावा ॥  
Samas Sahava  Bhrama  Nirupan
समास सहावा भ्रमनिरुपण


Custom Search

No comments: