Thursday, November 23, 2017

Samas Pachava PanchaPralaya Nirupan समास पांचवा पंचप्रळय निरुपण


Dashak Dahava Samas Pachava PanchaPralaya Nirupan 
Samas Pachava PanchaPralaya Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Pancha Pralaya (five types of destructions)
समास पांचवा पंचप्रळय निरुपण
श्रीराम ॥
ऐका प्रळयाचें लक्षण । पिंडीं दोनी प्रळये जाण ।
येकनिद्रा येक मरण । देहांतकाळ ॥ १ ॥
१) आतां प्रलयाचे लक्षण ऐका. पिंडामध्यें दोन प्रलय असतात. पहिला म्हणजे गाढ झोप आणि दुसरा म्हणजे मरण किंवा देहान्त, मृत्यु होय.   
देहधारक तिनी मूर्ती । निद्रा जेव्हां संपादिती ।
तो निद्राप्रळय श्रोतीं । ब्रह्मांडीचा जाणावा ॥ २ ॥
२) ब्रह्मांडांतसुद्धा दोन प्रलय असतात. ब्रह्मा, विष्णु व महेश या देह धारण केलेल्या देवता जेव्हां झोपीं जातात, तेव्हां ब्रह्मांडाचा निद्राप्रलय सुरु असतो.  
तिनी मूर्तीस होईल अंत । ब्रह्मांडास मांडेल कल्पांत ।
तेव्हां जाणावा नेमस्त । ब्रह्मप्रळये जाला ॥ ३ ॥
३) या तिन्ही देहधारी देवतांचा जेव्हां अंत होतो, त्यावेळीं ब्रह्मांडाचा कल्पान्तकाल सुरु होतो. तेव्हां ब्रह्मप्रलय होऊ लागला असें समजावें.
दोनी पिंडी दोनी ब्रह्मांडीं । च्यारी प्रळय नवखंडीं ।
पांचवा प्रळय उदंडी । जाणिजे विवेकाचा ॥ ४ ॥
४) या नवखंड परुथ्वीवर पिंडाचे दोन व ब्रह्मांडाचे दोन असे चार प्रलय व पांचवा प्रलय विवेकाचा आहे. तो अतिशय महत्वाचा व सर्वोत्तम आहे.    
ऐसे हे पांचहि प्रळये । सांगितले येथान्वयें ।
आतां हें अनुभवास ये । ऐसें करुं ॥ ५ ॥
५) असो. हें पांच प्रळय क्रमानें सांगितलें. ते कसें अनुभवाला येतात तें आतां सांगतो.  
निद्रा जेव्हां संचरे । तेव्हां जागृतीव्यापार सरे ।
सुषुप्ति अथवा स्वप्न भरे । अकस्मात आंगीं ॥ ६ ॥
६) माणसाला झोप लागली कीं, त्याचे जागे असतांनाचे सर्व व्यवहार व व्याप थांबतात. मग त्याला झोप लागतें अगर झोपेंत स्वप्नें पडतात. 
या नांव निद्राप्रळये । जागृतीचा होये क्षये ।
आतां ऐका देहांतसमये । म्हणिजे मृत्युप्रळये ॥ ७ ॥
७) या वर वर्णन केलेल्या अवस्थेला निद्राप्रळय म्हणतात. निद्राप्रळयामध्यें जागेपणाचा संपूर्ण क्षय झालेला असतो. आतां देहाचा मृत्यु म्हणजे मृत्यु प्रळय ऐका. 
देहीं रोग बळावती । अथवा कठीण प्रसंग पडती ।
तेणें पंचप्राण जाती । व्यापार सांडुनी ॥ ८ ॥
८) शरीराला रोग होतो. किंवा फार प्राणघातकप्रसंग येतो. त्यामुळें देहांत असणारे पंचप्राण देहाला सोडून निघून जातात.   
तिकडे गेला मनपवनु । इकडे राहिली नुसती तनु ।
दुसरा प्रळये अनुमानु । असेचिना ॥ ९ ॥
९) पंचप्राण निघून गेले कीं, मनांतील जाणीव पण जाते. मागें नुसता मृत देह उरतो. याला मृत्युप्रलय म्हणतात. हा प्रलय प्रत्यक्ष असतो त्याबद्दल अनुमान, कल्पना करण्याचे कारणच नाहीं.   
तिसरा ब्रह्मा निजेला । तों हा मृत्यु लोक गोळा जाला ।
अवघा व्यापार खुंटला । प्राणीमात्रांचा ॥ १० ॥
१०) ब्रह्मदेव झोपला म्हणजे तिसरा प्रळय सुरु होतो.  त्यावेळीं मृत्यु लोकाचा गोळा होतो. पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्रांचे व्यापार थांबतात.  
तेव्हां प्राणीयांचे सूक्ष्मांश । वायोचकीं  करिती वास ।
कित्येक काळ जातां ब्रह्मयास । जागृती घडे ॥ ११ ॥
११) तेव्हां सगळ्या प्राणीमात्रांचे सूक्ष्म देह ब्रह्मांडांतील वायुमध्यें जाऊन राहतात. अशा रीतीनें पुष्कळ काळ गेल्यावर ब्रह्मदेवाची रात्र संपून दिवस सुरु होतो. व तो जागा होतो.  
पुन्हा मागुती सृष्टि रची । विसंचिले जीव मागुतें संची ।
सीमा होतां आयुष्याची । ब्रह्मप्रळय मांडे ॥ १२ ॥
१२) जागा झाल्यावर तो पुन्हा विश्वाची रचना करतो. इकडेतिकडे असलेल्या जीवांना तो एकत्र गोळा करतो. हा ब्रह्मांडाचा निद्राप्रळय मग ब्रह्मदेवाच्या आयुष्याचा शेवट येतो. त्यावेळीं ब्रह्मप्रळय सुरुं होतो. 
शत वरुषें मेघ जाती । तेणें प्राणी मृत्य पावती ।
असंभाव्य तर्के क्षिती । मर्यादेवेगळी ॥ १३ ॥
१३) शंभर वर्षें ढगच येत नाहीत. त्यामुळें दुष्काळ पडून जीवप्राणी मरुन जातात. आपल्याला कल्पना करता येणार नाहीं असे पृथ्वीला मोठ्या प्रमाणांत तडे पडतात. 
सूर्य तपे बाराकळी । तेणें पृथ्वीची होय होळी । 
अग्नी पावतां पाताळीं । शेष विष वमी ॥ १४ ॥
१४) बारा प्रकारच्या किरणांनी सूर्य प्रकाशतो व उष्णता निर्माण करतो. त्यामुळेम पृथ्वी जळुं लागते. तो जाळ पाताळापर्यंत जातो. मग शेष विष ओकूं लागतो.  
आकाशीं सूर्याच्या ज्वाळा । पाताळीं शेष वमी गरळा ।
दोहिकडून जळतां भूगोळा । उरी कैंची ॥ १५ ॥
१५) आकाशामध्यें सूर्याचा दाह व पाताळांत शेष विष ओकतो या दोन्ही दाहांत सापडलेली पृथ्वी जळून जाते.   
सूर्यास खडतरता चढे । हलकालोळ चहुंकडे ।
कोंसळती मेरुचे कडे । घडघडायमान ॥ १६ ॥
१६) सूर्याची उष्णता जशी वाढत जाते तसा सगळीकडे मोठा हलकल्लोळ माजतो. मेरु पर्वताचे कडे धडाधड कोसळूं लागतात.  
अमरावती सत्यलोक । वैकुंठ कैळासादिक । 
याहिवेगळे नाना लोक । भस्मोन जाती ॥ १७ ॥
१७) इंद्राची अमरावती, सत्यलोक, वैकुंठ, कैलास आणि इतर लोक जळून भस्म होतात.   
मेरु अवघाचि घसरे । तेथील महिमाच वोसरे ।
देवसमुदाव वावरे । वायोचक्रीं ॥ १८ ॥
१८) मेरु पर्वत घसरल्यानें त्याचा महिमा नामशेष होतो. मग तेथें राहणारे देव वायुचक्रांत प्रवेश करतात.  
भस्म जालियां धरत्री । प्रजन्य पडें शुंडाधारीं ।  
मही विरे जळांतरीं । निमिष्यमात्रें  ॥ १९ ॥
१९) पृथ्वी जळून खाक झाल्यावर फार मोठा पाऊस पडतो. हत्तीच्या सोडें एवढ्या मोठ्या त्याच्या धारा पडतात. पृथ्वी त्या पाण्यांत विरुन जाते. 
पुढें नुस्तें उरेल जळ । तयास शोधील अनळ ।
पुढें येकवटती ज्वाळ । मर्यादेवेगळे ॥ २० ॥
२०) मग नुसतें पाणी उरतें. अग्नि तें शोषून घेतो. त्यानंतर अग्निचाच प्रभाव राहतो. ब्रह्मांडांतील सर्व अग्नि एके ठिकाणीं गोळा होतो. तेव्हां त्याला कांहीं मर्यादा राहात नाहीं.   
समुद्रींचा वडवानळ । शिवनेत्रींचा नेत्रानळ ।
सप्तकंचुकींचा आवर्णानळ । सूर्य आणी विद्युलता ॥ २१ ॥
२१) समुद्रामधील वडवाग्नि, शंकराच्या डोळ्यामधील अग्नि, सात कुंचुकींचा अग्नि, सूर्य व वीज यांच्यामधील अग्नि, 
ऐसे ज्वाळ येकवटती । तेणें देव देह सोडिती ।
पूर्वरुपें मिळोन जाती । प्रभंजनीं ॥ २२ ॥
२२) असे सर्व अग्नि एके ठिकाणी गोळा होतात. त्यावेळीं देवांना आपलें देह सोडावें लागतात. मग सर्व देव मूळस्वरुप जें वायु त्यांत मिसळून जातात. 
तो वारा झडपी वैश्र्वानरा । वन्ही विझेला येकसरा ।
वायो धावें सैरावैरा । परब्रह्मीं ॥ २३ ॥
२३) मग वायूचें राज्य सुरु होतें. वायु अति वेगानें वाहु लागुन अग्निवर झडप घालतो. त्यामुळें अग्नि एकदम विझुन जातो. मग परब्रह्मामध्यें वायू सैरावैरा वाहुं लागतो. 
धूम्र वितुळे आकाशीं । तैसें होईल समीरासी ।
बहुतांमधें थोडियासी । नाश बोलिला ॥ २४ ॥
२४) पण ज्याप्रमानें धूर आकाशांत नाहींसा होतो. त्याचप्रमाणें परब्रह्मामध्यें वायु कोठच्याकोठें नाहींसा होतो. कारण पुष्कळामध्यें थोड्याचा नाश होतो.   
वायो वितुळतांच जाण । सूक्ष्म भूतें आणी त्रिगुण ।
ईश्र्वर सांडी अधिष्ठान । निर्विकल्पीं ॥ २५ ॥
२५) वायु अशारीतीनें परब्रह्मीं लीन झाला कीं, सूक्ष्म पांच भूतें, तीन गुण आणि ईश्र्वर आपलें वेगळेंपण टाकून निर्विकार परब्रह्मामध्यें लीन होऊन जातात. 
तेथे जाणीव राहिली । आणी जगज्योती निमाली ।
शुद्ध सारांश उरली । स्वरुपस्थिती ॥ २६ ॥
२६) तेथें अति शुद्ध जाणीव राहते. परंतु जगज्योती नाहींशी होतें. प्रलयाच्यावेळीं विश्व स्वस्वरुपांत विलीन होते. अशारीतीनें सर्व संहार झाल्यावर केवळ स्वरुपस्थिति तेवढी उरते. 
जितुकीं कांहीं नामाभिधानें । तये प्रकृतीचेनि गुणें ।
प्रकृती नस्तां बोलणें । कैसें बोलावें ॥ २७ ॥
२७) ईश्र्वर, जगत् ज्योति, सत्यसंकल्प इत्यादि सर्व नावें व त्यांनीं दर्शविलेल्या कल्पना सगळ्या प्रकृतीमुळें अस्तित्वांत येतात. ती प्रकृतीच मूळ स्वरुपांत विलीन झाली कीं मग त्यांना स्थान उरत नाहीं. त्यांच्याबद्दल बोलणें थांबतें. 
प्रकृती अस्तां विवेक कीजे । त्यास विवेकप्रळये बोलिजे ।
पांचहि प्रळय वोजें । तुज निरोपिले ॥ २८ ॥
२८) आजच्या अवस्थेंमध्यें प्रकृति आहे. ती खरी वाटते व विश्व खरें वाटते. सर्व दृश्याचा निरास करण्यासाठीं आत्मानात्मविवेक करावा. अशा रीतीनें विवेकानें दृश्य खरें नाहीं म्हणून बाजूस सारणें याला विवेकप्रलय म्हणतात. 
 इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचप्रळयनिरुपणनाम समास पांचवा ॥
Samas Pachava  PanchaPralaya  Nirupan
समास पांचवा पंचप्रळय निरुपण


Custom Search

No comments: