Sunday, November 26, 2017

Samas Satava SagunaBhajan Nirupan समास सातवा सगुणभजन


Dashak Dahava Samas Satava SagunaBhajan Nirupan 
Samas Satava SagunaBhajan Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Sagun Bhajan. Here in this Samas why Sagun Bhajan is to be done by Sadhak is described.
समास सातवा सगुणभजन
श्रीराम ॥
अवतारदिक ज्ञानी संत । सारासारविचारें मुक्त ।
त्यांचें सामर्थ्य चालत । कोण्या प्रकारें ॥ १ ॥ 
१) रामकृष्णादि अवतार, मोठे ज्ञानी पुरुष आणी संत सारासारविचारानें मुक्त झालेले असतात. त्यांनी देह ठेवल्यानंतर देखील त्यांचें सामर्थ्य येथें चालतें. तें कसें चालतें ?   
हे श्रोतयांची आशंका । पाहातां प्रश्र्ण केला निका ।
सावध होऊन ऐका । म्हणे वक्ता ॥ २ ॥
२) ही श्रोत्यांची शंका आहे. हा प्रश्र्ण खरोखर चांगला आहे. वक्ता म्हणतों कीं, याचे उत्तर लक्ष देऊन ऐकावें.  
ज्ञानी मुक्त होऊन गेले । मागें त्यांचें सामर्थ्य चाले ।
परंतु ते नाहीं आले । वासना धरुनी ॥ ३ ॥
३) आत्मज्ञानी पुरुष मुक्त होतात. नंतर प्रारब्ध संपलें कीं देह ठेवतात. देह थेवल्यानंतरही त्यांची सत्ता चालते, कार्य करते.  पण वासना धरुन ते परत येतात असें नाहीं.  
लोकांस होतो चमत्कार । लोक मानिती साचार ।
परंतु याचा विचार । पाहिला पाहिजे ॥ ४ ॥
४) लोकांना त्यांच्या अस्तित्वाचे चमत्कार अनुभवास येतात. लोक त्यांना सत्य मानतात. पण याचा खरा अर्थ काय याचा विचार केला पाहिजे. 
जीत आस्तां नेणों किती । जनामध्यें चमत्कार होती ।
ऐसियाची सद्यप्रचिती । रोकडी पाहावी ॥ ५ ॥
५) एखादा सत्पुरुष जिवंत असतां त्याच्याकडून लोकांसाठीं पुष्कळ चमत्कार झाले असतील. हें शक्य आहे. पण त्यानें देह ठेवल्यावर जे चमत्कार घडतात त्याची मात्र खरी प्रचिती तत्काळ बघितली पाहिजे.   
तो तरी आपण नाहीं गेला । लोकीं प्रत्यक्ष देखिला ।
ऐसा हा चमत्कार जाला । यास काये म्हणावें ॥ ६ ॥
६) समजा तो सत्पुरुष जिवंत असतांना त्याच्याच घरीं आहे. तेथून तो बाहेर गेलेला नाहीं असें असतांनाा एकाच दिवशीं, एकाच वेळीं तो दोन किंवा अधिक स्थानीं लोकंना प्रत्यक्ष दिसतो. या चमत्काराचे कारण काय असावें ?
तरी हा लोकांचा भावार्थ । भाविकां देव येथार्थ । 
अनेत्र कल्पना वेर्थ । कुतर्काची ॥ ७ ॥
७) याचें कारण असें कीं, लोकांच्या शुद्ध भावनेनें हें घडून येते. संत देवरुप  असतो. व जशी ज्याची भावना असतें तसा त्याला देव फळतो. चमत्काराचें हेंच एकमेव कारण आहे. इतर कल्पना करणें म्हणजे निष्कारण वेडेपणानें तर्क करणें होय.  
आवडे तें स्वप्नीं देखिलें । तरी काय तेथून आलें ।
म्हणाल तेणें आठविलें । तरी द्रव्य कां दिसे ॥ ८ ॥
८) मनापासून आपल्याला जें आवडतें तें स्वप्नांत दिसतें. पण जें दिसतें तें बाहेरुन कोठून आलेले नसते. यावर आक्षेप असा कीं, त्या वस्तुचें आपल्याला स्मरण होतें म्हणून ती दिसतें हें खरें नाहीं. कारण वस्तूचें स्मरण झालें तर ती प्रत्यक्ष दिसतें असें नाहीं. परंतु स्वप्नामध्यें ती प्रत्यक्ष दिसतें, याचें कारण काय ? 
एवं आपली कल्पना । स्वप्नीं येती पदार्थ नाना ।
परी ते पदार्थ चालतीना । अथवा आठऊ नाहीं ॥ ९ ॥
९) थोडक्यांत आपण कल्पना केली त्यामुळें अनेक वस्तु स्वप्नामध्यें दिसतात. त्या वस्तुंचें स्मरण होतें म्हणून त्या दिसतात हें खरें नाहीं. तसेंच त्यांचा व्यवहारांत कांहीं उपयोग नाहीं. हेही खरें आहे. 
येथें तुटली आशंका । ज्ञात्यास जन्म कल्पूं नका ।
उमजेना तरी विवेका । बरें पाहा ॥ १० ॥
१०) येथें श्रोत्यांच्या शंकेचें निरसन झालें. ज्ञानी पुरुषाला जन्म येतो ही कल्पना करुं नये. माझें सांगणें ाकलन होत नसेल तर सूक्ष्म विचार करुन बघा म्हणजे कळेल. 
ज्ञानी मुक्त होऊन गेले । त्यांचें सामर्थ्य उगेंचि चाले ।
कां जे पुण्यमार्गें चालिलें । म्हणोनियां ॥ ११ ॥
११) जे ज्ञानी पुरुष मुक्त होतात त्यांची सत्ता विनासायास व आपोआप चालते.  खर्‍या पुण्यमार्गानें तें गेलेले असतात. भगवंताच्या दर्शनाचा मार्ग तेवढा एकच खरा पुण्यमार्ग होय.   
याकारणें पुण्यामार्गें चालावें । भजन देवाचें वाढवावें ।
न्याये सांडून न जावें । अन्यायमार्गें ॥ १२ ॥
१२) यासाठीं माणसानें पुण्यमार्गानें चालावें. जगामध्यें भगवंताची भक्ति वाढवावी. न्यायाचा पक्ष सोडून अन्यायाच्या मार्गानें जाऊं नये. 
नाना पुरश्र्चरणें करावीं । नाना तीर्थाटणें फिरावीं ।
नाना सामर्थें वाढवावी । वैराग्यबळें ॥ १३ ॥
१३) अनेक प्रकारची पुरश्र्चरणें करावीत. अनेक तीर्थें करावीत. आणि प्रबळ वैराग्य धारण करुन अनेक प्रकारच्या शक्ति अंगीं वाढवाव्यात.  
निश्र्चये बैसे वस्तूकडे । तरी ज्ञानमार्गेहि सामर्थ्य चढे ।
कोणीयेक येकांत मोडे । ऐसें न करावें ॥ १४ ॥
१४) '" मी आत्मस्वरुप आहे " असा मनाचा निश्र्चय झाला तर ज्ञानमार्ग साधतो. व त्यानें अंगी मोठे सामर्थ्य येते. जेथें आपली निष्ठा असेल त्याला धक्का लागेल असें कांहीं करु नये.  
येक गुरु येक देव । कोठें तरी असावा भाव ।
भावार्थ नस्तां वाव । सर्व कांहीं ॥ १५ ॥
१५) एक सद्गुरु किंवा एक देव यापैकीं कोणावर तरी संपूर्ण निष्ठा ठेवावी. तसें नसेंल तर बाकीं सारें वाया जातें.  
निर्गुणी ज्ञान जालें । म्हणोन सगुण अलक्ष केलें ।
तरी तें ज्ञातें नागवलें । दोहिंकडे ॥ १६ ॥
१६) समजा एखाद्याला निर्गुणाचा अनुभव आला. निर्गुणाचे ज्ञान झालें म्हणून त्यानें सगुणाकाडे दुर्लक्ष केलें. सद्गुरु किंवा देवाची उपासना त्यानें सोडून दिली. असा ज्ञानी पुरुष दोन्हीकडून नागावला जातो. त्याला धड निर्गुण स्वाधीन होत नाही. तसेंच धड ना सगुण हाताशीं लागत नाहीं. 
नाहीं भक्ती नाहीं ज्ञान । मधेंच पैसावला अभिमान ।
म्हणौनियां जपध्यान । सांडूंच नये ॥ १७ ॥
१७) त्याच्यापाशीं ज्ञान म्हणावें तर तें नसते. व भक्ति म्हणावी तर ती पण नसते. म्हणून जप व ध्यान कांहीं केल्या सोडूं नये. 
सांडील सगुणभजनासी । तरी तो ज्ञाता परी अपेसी ।
म्हणौनियां सगुणभजनासी । सांडूंच नये ॥ १८ ॥  
१८) जो आत्मज्ञानी सगुणाची उपासना सोडून देतो तो ज्ञानी खरा पण अपयशी असतो. म्हणून सगुणाची उपासना कधीं सोडू नये.             
निःकाम बुद्धीचिया भजना । त्रैलोकीं नाहीं तुळणा ।
समर्थेविण घडेना । निःकाम भजन ॥ १९ ॥
१९) अत्यंत निष्कामबुद्धीनें केलेली म्हणजे कसलीही अपेक्षा न ठेवतां केलेली भगवंताची उपसना अनमोल आहे. या त्रैलोक्यांत तिची बरोबरी करणारी दुसरी वस्तु नाहीं. मोठें आत्मबल असल्याशिवाय कोणीही माणूस अशी उपासना करुं शकणार नाहीं.   
कामनेनें फळ घडे । निःकाम भजनें भगवंत जोडे । 
फळभगवंत कोणीकडे । महदांतर ॥ २० ॥
२०) कांहीं अपेक्षा ठेवून उपासना केली तर ती अपेक्षा पूर्ण होते. कांहींही अपेक्षा न ठेवतां उपासना केली तर प्रत्यक्ष भगवंत भेटतो. एखादी अपेक्षा पूर्ण होणें व प्रत्यक्ष भगवंत भेटणें यांत फार मोठे अंतर आहे, फरक आहे.  
नाना फळें देवापासी । आणी फळ अंतरीं भगवंतासी ।
याकारणें परमेश्र्वरासी । निःकाम भजावें ॥ २१ ॥
२१) भगवंताजवळ आपल्या सर्व अपेक्षा, वासना, मागण्या, इच्छा पूर्ण करण्याचे सामर्थ्य असते. पण आपण आपल्या इच्छाच पूर्ण करण्यामागें लागलों तर आपण भगवंताला अंतरतो. म्हणून अत्यंत निष्काम बुद्धीनें भगवंताची उपासना करावी.  
निःकामभजनाचें फळ आगळें । सामर्थ्य चढे मर्यादेवेगळें ।
तेथें बापुडीं फळें । कोणीकडे ॥ २२ ॥
२२) निष्काम बुद्धीनें केलेल्या उपासनेचे फळ कांहीं आगळेंच असतें. अशा उपासकाच्या अंगीं मोठे सामर्थ्य येते. तेथें कामनापूर्ती मुळींच किंमत राहत नाही. 
भक्तें जें मनीं धरावें । तें देवें आपणचि करावें ।
तेथें वेगळें भावावें । नलगे कदा ॥ २३ ॥
२३) कांहीं व्हावें असा संकल्प भक्ताच्या मनीं आला कीं, भगवंत तो आपणहून सिद्धीस नेतो. त्यासाठीं भक्ताला वेगळी प्रार्थना करावी लागत नाहीं. 
दोनी सामर्थें येक होतां । काळास नाटोपे सर्वथा ।
तेथें इतरांची कोण कथा । कीटकन्यायें ॥ २४ ॥
२४) आत्मज्ञान व भगवंताची भक्ती अशी दोन्ही सामर्थ्ये एकत्र आल्यावर तो ज्ञानी भक्त काळाला देखिल अनावर होतो. मग इतरांना तो भारी होतो यांत नवल काय ? इतर सारे त्याच्यापुढें क्षुद्र किड्यासारखें होतात.    
म्हणोन निःकाम भजन । वरी विशेष ब्रह्मज्ञान ।
तयास तुळितां त्रिभुवन । उणें वाते ॥ २५ ॥
२५) म्हणून अत्यंत निष्काम उपासना आणि ब्रह्मज्ञान असा योग आल्यावर त्याच्यापुढें त्रिभुवनसुद्धां उणे पडते.  
येथें बुद्धीचा प्रकाश । आणीक न चढे विशेष ।
प्रताप कीर्ती आणी येश । निरंतर ॥ २६ ॥
२६) ज्ञानी भक्ताचा महिमा यापेक्षां अधिक आकलन होणें बुद्धीला शक्य नसतें.  त्याचा प्रताप, कीर्ति, व यश निरंतर वर्धमान होत राहतात. 
निरुपणाचा विचार । आणी हरिकथेचा गजर ।
तेथें होती तत्पर । प्राणीमात्र ॥ २७ ॥
२७) ज्या ज्ञानी भक्तापाशीं अत्मज्ञानाचें विवेचन असतें आणि भगवंताच्या उपासनेचे बळ असतें तेथें पुष्कळ लोक आकर्षित होतात व त्या सत्पुरुषाशीं लिन होतात.  
जेथें भ्रष्टाकार घडेना । तो परमार्थहि दडेना ।
समाधान विघडेना । निश्र्चयाचें ॥ २८ ॥
२८) ज्या सत्पुरुषापाशीं भ्रष्टाचाराला स्थान नाहीं, जो नीतिधर्माला धरुन असतो, त्याचा परमार्थ लपून राहात नाहीं. आणि लोक जरी भोवती गोळा झाले तरी निश्र्चयाच्या आत्मज्ञानामुळें लाभलेलें समाधान भंगत नाहीं.  
सारासारविचार करणें । न्याये अन्याये अखंड पाहाणें ।
बुद्धि भगवंताचें देणें । पालतेना ॥ २९ ॥
२९) याकारणासाठीं साधकानें नेहमीं सारासार विचार करावा. न्याय कोणता, अन्याय कोणता, हें अखंड शोधावें. तरच आत्मज्ञानाकडे बुद्धी वळते. पण ही भगवंताची देणगी आहे. ती एकदां प्राप्त झालीं कीं, मग तिच्यांत बदल घडत नाहीं.   
भक्त भगवंती अनन्य । त्यासी बुद्धि देतो आपण ।
येदर्थीं भगवद्वचन । सावध ऐका ॥ ३० ॥
३०) जो भक्त भगवंतापाशीं अनन्य होतो, त्याला भगवंताचें मार्गदर्शन लाभते. त्याला योग्य बुद्धी व विचार करण्याची दिशा दाखवितो. याबद्दल भगवंताचे एक वचन आहे. तें ऐका.  
श्र्लोकार्ध
ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयांति ते ॥
अर्थः
मी त्यांना बुद्धी देतो. त्यायोगें तें मला येऊन मिळतात. 
म्हणौन सगुण भजन । वरी विशेष ब्रह्मज्ञान ।
प्रयत्नांचें समाधान । दुर्ल्लभ जगीं ॥ ३१ ॥
३१) म्हणून भगवंताची सगुण उपासना आणि विशेष म्हणजे ब्रह्मज्ञान आणि त्यामुळें स्वनुभवाचें खरें समाधान या गोष्टीं जगांत फारच दुर्लभ आहेत. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सगुणभजननिरुपणनाम समास सातवा ॥
Samas Satava  SagunaBhajan  Nirupan
समास सातवा सगुणभजन



Custom Search

No comments: