Gurucharitra Adhyay 29 is in Marathi. Name of this Adhyay is BhasmaMahima Varnanam.
ऐकोनि यमाचें वचन । शिवदूत सांगती विस्तारुन ।
प्रेतकपाळीं लांछन । भस्म होतें परियेसा ॥ ९१ ॥
वक्षःस्थळीं ललाटेसी । बाहुमूळीं करकंकणेसी ।
भस्म लाविलें प्रेतासी । केवी अतळती तुझे दूत ॥ ९२ ॥
आम्हां आज्ञा ईश्र्वराची । भस्मांकित तनु मानवाची ।
जीव आणावा त्या नराचा । कैलासपदीं शाश्र्वत ॥ ९३ ॥
भस्म कपाळीं असत । केवीं आतळती तुझे दूत ।
तात्काळीं होतों वधित । सोडिलें आम्हीं धर्मासी ॥ ९४ ॥
पुढें तरी आपुल्या दूतां । चुद्धि सांगा तुम्ही आतां ।
जे नर असती भस्मांकितां । त्यातें तुम्ही न आणावें ॥ ९५ ॥
भस्मांकित नरासी । दोष न लागती परियेसीं ।
तो योग्य होय स्वर्गासी । म्हणोनि सांगती शिवदूत ॥ ९६ ॥
शिवदूत वचन ऐकोन । यमधर्म गेला परतोन ।
आपुलें दूतां पाचारुन । सांगतसे परियेसा ॥ ९७ ॥
यम सांगे आपुले दूतां । भूमीवरी जाऊनि आतां ।
जे कोण असतील भस्मांकित । त्यांतें तुम्ही न आणावें ॥ ९८ ॥
अनेकपरी दोष जरी । केले असत धुरंधरीं ।
त्यांतें न आणावें आमुचे पुरीं । त्रिपुंड्र टिळक नरासी ॥ ९९ ॥
रुद्राक्षमाळा ज्याचे गळां । असेल त्रिपुंड्र टिळा ।
त्यातें तुम्ही नातळा । आज्ञा असे ईश्र्वराची ॥ १०० ॥
वामदेव म्हणे राक्षसासी । या विभुतीची महिमा असे ऐशी ।
आम्ही लावितों भक्तीसीं । देवादिकां दुर्लभ ॥ १०१ ॥
पाहें पां ईश्र्वर प्रीतीसीं । सदा लावितो भस्मासी ।
ईश्र्वरें वंदिल्या वस्तूसी । कवण वर्णूं शके सांग मज ॥ १०२ ॥
ऐकोनि वामदेवाचें वचन । ब्रह्मराक्षस करी नमन ।
उद्धारावें जगज्जीवना । ईश्र्वर तूंचि वामदेवा ॥ १०३ ॥
तुझे चरण मज भेटले । सहस्त्र जन्मींचें ज्ञान जाहले ।
कांहीं पुण्य होतें केलें । त्याणें गुणें भेटलासी ॥ १०४ ॥
आपण जघीं राज्य करितां । केलें पुण्य स्मरलें आतां ।
तळें बांधविलें रानांत । दिल्ही वृत्ति ब्राह्मणांसी ॥ १०५ ॥
इतुकें पुण्य आपणासी । घडलें होतें परियेसी ।
वरकड केले सर्व दोषी । राज्य करितां स्वामिया ॥ १०६ ॥
जघीं नेलें यमपुरासी । यमें पुसिलें चित्रगुप्तासी ।
माझें पुण्य त्या यमासी । चित्रगुप्तें सांगितलें ॥ १०७ ॥
तधीं मातें यमधर्मे आपण । सांगितलें होतें हें पुण्य ।
पंचविशति जन्मीं जाण । फळासी येईल म्हणोनि ॥ १०८ ॥
तया पुण्यापासोन । भेटी जाहली तुझे चरण ।
करणें स्वामी उद्धारण । जगद्गुरु वामदेवा ॥ १०९ ॥
या भस्माचें महिमान । कैसें लावावे विधान ।
कवण मंत्र उद्धारण । विस्तारुन सांग मज ॥ ११० ॥
वामदेव म्हणे राक्षसासी । विभूतीचें धारण मज पुससी ।
सांगेन आतां विस्तारेसीं । एकचित्तें ऐक पां ॥ १११ ॥
पूर्वी मंदरगिरिपर्वतीं । क्रीडेसी गेले गिरिजापति ।
कोटि रुद्रादिगणसहिती । बैसले होते वोळगेसी ॥ ११२ ॥
तेहतीस कोटि देवांसहित । देवेंद्र आला तेथें त्वरित ।
अग्नि वरुण यमसहित । कुबेर वायु आला तेथें ॥ ११३ ॥
गंधर्व यक्ष चित्रसेन । खेचर पन्नग विद्याधरण ।
किंपुरुष सिद्ध साद्य जाण । आले गुह्यक सभेसी ॥ ११४ ॥
देवाचार्य बृहस्पति । वसिष्ठ नारद तेथें येती ।
अर्यमादि पितृसहिती । तया ईश्र्वर वोळगेसी ॥ ११५ ॥
दक्षादि ब्रह्मा येर सकळ । आले समस्त ऋषीकुळ ।
उर्वशादि अप्सरामेळ । आले त्या ईश्र्वरसभेसी ॥ ११६ ॥
चंदिकासहित शक्तिगण देखा । आदित्यादि द्वादशार्का ।
अष्ट वसू मिळोन ऐका । आले ईश्र्वर सभेसी ॥ ११७ ॥
अश्र्विनी देवता परियेसी । विश्र्वेदेव मिळून निर्दोषी ।
आले ईश्र्वरसभेसी । ऐके ब्रह्मराक्षसा ॥ ११८ ॥
भूतपति महाकाळ । नंदिकेश्र्वर महानीळ ।
काठीकर दोघे प्रबळ । उभे पार्श्र्वी असती देखा ॥ ११९ ॥
वीरभद्र शंखकर्ण । मणिभद्र षट्कर्ण ।
वृकोदर देवमान्य । कुंभोदर आले तेथें ॥ १२० ॥
कुंडोदर मंडोदर । विकटकर्ण कर्णधार ।
धारकेतु महावीर । भूतनाथ तेथें आला ॥ १२१ ॥
भृंगी रिटी भूतनाथ । नानारुपी गण समस्त ।
नानावर्ण मुखें ख्यात । नानावर्ण-शरीर-अवयवी ॥ १२२ ॥
रुद्रगणांची रुपें कैसीं । सांगेन ऐका विस्तारेसीं ।
कित्येक कृष्णवर्णेसी । श्र्वेत-पीत-धूम्रवर्ण ॥ १२३ ॥
हिरवे ताम्र सुवर्ण । लोहित चित्रविचित्र वर्ण ।
मंडूकासारिखें असे वदन । रुद्रगण आले तेथें ॥ १२४ ॥
नानाआयुधें-शस्त्रेंसी । नाना वाहनें भूषणेसी ।
व्याघ्रमुख कित्येकांसी । किती सूकर-गजमुखी ॥ १२५ ॥
कित्येक नक्रमुखी । कित्येक श्र्वान-मृगमुखी ।
उष्ट्रवदन कित्येकी । किती शरभ-शार्दूलवदनें ॥ १२६ ॥
कित्येक भैरुंडमुख । सिंहमुख कित्येक ।
दोनमुख गण देख । चतुर्मुख गण कितीएक ॥ १२७ ॥
चतुर्भुज गण अगणिक । कितीएका नाहीं मुख ।
ऐसे गण तेथें येती देख । ऐक राक्षसा एकचित्तें ॥ १२८ ॥
एकहस्त द्विहस्तेसीं । पांच सहा हस्तकेसीं ।
पाद नाहीं कितीएकांसी । बहुपादी किती जाणा ॥ १२९ ॥
कर्ण नाहीं कित्येकांसी । एककर्ण अभिनव कैसी ।
बहुकर्ण परियेसीं । ऐसे गण येती तेथें ॥ १३० ॥
कित्येकांसी नेत्र एक । कित्येका चारी नेत्र विचित्र ।
किती स्थूळ कुब्जक । ऐसे गण ईश्र्वराचे ॥ १३१ ॥
ऐशापरीच्या गणांसहित । बैसला शिव मूर्तिमंत ।
सिंहासन रत्नखचित । सप्त प्रभावळीचें ॥ १३२ ॥
आरक्त एक प्रभावळी । तयावरी रत्नें जडलीं ।
अनुपम्य दिसे निर्मळी । सिंहासन परियेसा ॥ १३३ ॥
दुसरी एक प्रभावळी । हेमवर्ण पिवळी ।
मिरवीतसे रत्ने बहळीं । सिंहासन ईश्र्वराचे ॥ १३४ ॥
तिसरिये प्रभावळीसी । नीलवर्ण रत्नें कैसी ।
जडली असती कुसरीसीं । सिंहासन ईश्र्वराचें ॥ १३५ ॥
शुभ्र चतुर्थ प्रभावळी । रत्नखचित असे कमळीं ।
आरक्तवर्ण असे जडली । सिंहासन शंकराचें ॥ १३६ ॥
वैडूर्यरत्नखचित । मोतीं जडलीं असतीं बहुत ।
पांचवी प्रभावळी ख्यात । सिंहासन ईश्र्वराचें ॥ १३७ ॥
सहावी भूमि नीलवर्ण । भीतरी रेखा सुवर्णवर्ण ।
रत्नें जडलीं असतीं गहन । अपूर्व सिंहासन ईश्र्वराचें ॥ १३८ ॥
सातवी ऐसी प्रभावळी । अनेक रत्नें असे जडली ।
जे कां विश्र्वकर्म्यानें रचिली । अपूर्व देखा त्रिभुवनांत ॥ १३९ ॥
ऐशा सिंहासनावरी । बैसलासे त्रिपुरारि ।
कोटिसूर्य तेजासरी । भासतसे परियेसा ॥ १४० ॥
महाप्रळयसमयासी । सप्तावर्ण-मिळणी जैसी ।
तैसिया श्र्वासोश्र्वासेसीं । बैसलासे ईश्र्वर ॥ १४१ ॥
भाळनेत्र ज्वाळमाळा । संवर्ताग्नि जटामंडळा ।
कपाळीं चंद्र षोडशकळा । शोभतसे सदाशिव ॥ १४२ ॥
तक्षक देखा वामकर्णी । वासुकी असे कानीं दक्षिणीं ।
तया दोघांचे नयन । नीलरत्नापरी शोभती ॥ १४३ ॥
नीलकंठ दिसे आपण । नागहार आभरण ।
सर्पांचेंचि करी कंकण । मुद्रिकाही देखा सर्पाचिया ॥ १४४ ॥
मेखला तया सर्पाचें । चर्मपरिधान व्याघ्राचें ।
शोभा घंटा दर्पणाचे । ऐसेपरी दिसतसे ॥ १४५ ॥
कर्कोटक-महापद्म । केलीं नूपुरें पाईंजण ।
जैसा चंद्र-संपूर्ण । तैसा शुभ्र दिसतसे ॥ १४६ ॥
म्हणोनि कर्पूरगौर म्हणती । ध्यानीं ध्याइजे पशुपति ।
ऐसा भोळाचक्रवर्ती । बैसलासे सभेंत ॥ १४७ ॥
रत्नमुकुट असे शिरीं । नागेन्द्र असे केयुरीं ।
कुंडलांची दिप्ति थोरी । दिसतसे ईश्र्वर ॥ १४८ ॥
कंठीं सर्पांचे हार । नीलकंठ मनोहर ।
सर्वांगीं सर्पांचे अलंकार । शोभतसे ईश्र्वर ॥ १४९ ॥
शुभ्र कमळें अर्चिला । कीं चंदनें असे लेपिला ।
कर्पूरकेळीनें पूजिला । ऐसा दिसे ईश्र्वर ॥ १५० ॥
दहाभुजा विस्तारेसीं । एकेक हातीं आयुधेंसी ।
बैसलासे सभेसी । सर्वेश्र्वर शंकर ॥ १५१ ॥
एके हातीं त्रिशूळ देखा । दुसरा डमरु सुरेखा ।
येरे हातीं खड्ग तिखा । शोभतसे ईश्र्वर ॥ १५२ ॥
पानपात्र एका हातीं । धनुष्य-बाणें कर शोभती ।
खट्वांग फरश येरे हातीं । अंकुश करी मिरवीतसे ॥ १५३ ॥
मृग धरिला असे करीं देखा । ऐसा तो हा पिनाका ।
दहाभुजा दिसती निका । बैसलासे सभेंत ॥ १५४ ॥
पंचवक्त सर्वेश्र्वर । एकेक मुखाचा विस्तार ।
दिसतसे सालंकार । सांगेन ऐका श्रोतेजन ॥ १५५ ॥
कलंकाविणें चंद्र जैसा । किंवा क्षीरफेन ऐसा ।
भस्मभूषणें रुपें कैसा । दिसे मन्मथातें दाहोनियां ॥ १५६ ॥
सूर्य-चंद्र-अग्निनेत्र । नागहार कटिसूत्र ।
दिसे मूर्ति पवित्र । सर्वेश्र्वर परियेसा ॥ १५७ ॥
शुभ्र टिळक कपाळीं । बरवा शोभे चंद्रमौळी ।
हास्यवदन केवळीं । अपूर्व देखा श्रीशंकर ॥ १५८ ॥
दुसरें मुख उत्तरेसी । शोभतसे विस्तारेसीं ।
ताम्रवर्णाकार कमळेसी । अपूर्व दिसे परियेसा ॥ १५९ ॥
जैसें दाडिंबाचे फूल । किंवा प्रातःरविमंडळ ।
तैसें मिरवे मुखकमळ । ईश्र्वरांचें परियेसा ॥ १६० ॥
तिसरें मुख पूर्वदिशीं । गंगा अर्धचंद्र शिरसी ।
जटाबंधन केली कैसी । सर्पवेष्टित परियेसा ॥ १६१ ॥
चवथें मुख दक्षिणेसी । मिरवे नीलवर्णेसी ।
विक्राळ दाढा दारुणेसीं । दिसतसे तो ईश्र्वर ॥ १६२ ॥
मुखंहूनि ज्वाला निघती । तैसा दिसे तीव्रमूर्ति ।
रुंडमाळा शोभती । सर्पवेष्टित परियेसा ॥ १६३ ॥
पांचवें असे ऐसें वदन । व्यक्ताव्यक्त असे जाण ।
साकार निराकार सुगुण । सगुण निर्गुण ईश्र्वर ॥ १६४ ॥
सलक्षण निर्लक्षण । ऐसें शोभतसे वदन ।
परब्रह्म वस्तु तो जाण । सर्वेश्र्वर पंचमुखी ॥ १६५ ॥
काळ व्याळ सर्प बहुत । कंठी माळा मिरवे ख्यात ।
चरण मिरवीती आरक्त । कमळापरी ईश्र्वराचे ॥ १६६ ॥
चंद्रासारिखीं नखें देखा । मिरवी चरणीं पादुका ।
अळंकार-सर्प ऐका । शोभतसे परमेश्र्वर ॥ १६७ ॥
व्याघ्रांबर पांघरुण । सर्प बांधले असे आपण ।
गांठी बांधिली असे जाण । नागबंधन करुनियां ॥ १६८ ॥
नाभीं चंद्रावळी शोभे । हृदयीं कटाक्ष रोम उभे ।
परमार्थ मूर्ति लाभे । भक्तजनां मनोहर ॥ १६९ ॥
ऐसा रुद्र महाभोळा । सिंहासनीं आरुढला ।
पार्वतीसहित शोभला । बैसलासे परमेश्र्वर ॥ १७० ॥
पार्वतीचे शृंगार । नानापरीचें अलंकार ।
मिरवीतसे अगोचर । सर्वेश्र्री परियेसा ॥ १७१ ॥
कनकचाफे गोरटी । मोतियांचा हार कंठी ।
रत्नखचित मुकुटी । नागबंदी दिसतसे ॥ १७२ ॥
नानापरीच्या पुष्पजाति । मुकुटावरी शोभती ।
तेथे भ्रमर आलापिती । परिमळालागीं परियेसा ॥ १७३ ॥
मोतियांची थोर जाळी । मिरवीतसे मुकुटाजवळी ।
रत्नें असतीं जडलीं । शोभायमान दिसतसे ॥ १७४ ॥
मुख दिसे पूर्णचंद्र । मिरवतसे हास्य मंद ।
जगन्माता विश्र्वंद्य । दिसतसे परमेश्र्वरी ॥ १७५ ॥
नासिक बरवें सरळ । तेथें मिरवे मुक्ताफळ ।
त्यावरी रत्नें सोज्ज्वळ । जडलीं असती शोभायमान ॥ १७६ ॥
अधर पवळवेली दिसे । दंतपंक्ति रत्न जैसे ।
ऐसी माता मिरवतसे । जगन्माता परियेसा ॥ १७७ ॥
कानीं तानवडें भोंवरिया । रत्नखचित मिरवलिया ।
अलंकार महामाया । लेइली असे जगन्माता ॥ १७८ ॥
पीतवर्ण चोळी देखा । कुच तटीं शोभे निका ।
एकाजवळी रत्नें अनेका । शोभतसे कंठीं हार ॥ १७९ ॥
कालव्याल सर्प थोर । स्तनपान करिती मनोहर ।
कैसे भाग्य दैव थोर । त्या सर्पांचे परियेसा ॥ १८० ॥
Gurucharitra Adhyay 29
गुरुचरित्र अध्याय २९
Custom Search
No comments:
Post a Comment