Wednesday, July 4, 2018

Samas Dahava VimalBrahma Nirupan समास दहावा विमलब्रह्म निरुपण


Dashak Visava Samas Dahava VimalBrahma Nirupan 
Samas Dahava VimalBrahma Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us the Brahma. Brahma is Nirugun and Nirvikar. It is always there. It has no end. It surrounds everything and is everywhere. Name of this Samas is VimalBrahma Nirupan.
समास दहावा विमलब्रह्म निरुपण 
श्रीराम ॥
धरुं जातां धरितां न ये । टाकूं जातां टाकितां न ये ।
जेथें तेथें आहेच आहे । परब्रह्म तें ॥ १ ॥
१) तें धरावें म्हटलें तर धरतां येत नाहीं, टाकण्याचा प्रयत्न केाला तर टाकतां येत नाहीं. हें परब्रह्म जिथें तिथें आहेच आहे. कधीं नाहीं असें होत नाही. 
जिकडे तिकडे जेथें तेथें । विन्मुख होतां सन्मुख होतें ।
सन्मुखपण चुकेना तें । कांहीं केल्यां ॥ २ ॥
२) जिकडे तिकडे आणि जेथें तेथें असणार्‍या या परब्रह्माकडून तोंड फिरवावें म्हटलें तर जिकडे तोंड फिरवावें तिकडे समोर येतेच. कोणत्याहि दिशेला तोंड फिरवावें तिकडे तें समोर येते. कांहीं केल्या त्यास चुकविता येत नाहीं. 
बैसलें माणूस उठोन गेलें । तेथें आकाशचि राहिलें ।
आकाश चहूंकडे पाहिलें । तरी सन्मुखचि आहे ॥ ३ ॥
३) एखादा बसलेला माणूस उठून गेला तर तेथें आकाश राहतेंच. कोणत्याहि दिशेला तोंड वळवलें तरी आकाश आपल्या तोंडासमोर असतें. 
जिकडे जिकडे प्राणी पळोन जातें । तिकडे आकाशचि भोवतें ।
बळें आकाशाबाहेर तें । कैसें जावें ॥ ४ ॥
४) समजा एखादा प्राणी पळून जाऊं लागला, तो ज्या ज्या दिशेला पळेल त्या त्या दिशेला त्याच्या भोवतीं आकाश असतेंच. अगदी फार मोठा प्रयत्न करुनसुद्धा कोणालाहि आकाशाबाहेर जातां येत नाहीं.   
जिकडे तिकडे प्राणी पाहे । तिकडे तें सन्मुखचि आहे ।
समस्तांचे मस्तकीं राहे । माध्यानीं मार्तंड जैसा ॥ ५ ॥
५) प्राणि जिकडे जिकडे पहातो तिकडे तिकडे आकाश त्याच्या तोंडासमोर येतेच. मध्यान्हीचा सूर्य ज्याप्रमाणें सर्वांच्या डोक्यावर असतो त्याचप्रमाणें सर्वांच्या डोक्यावर आकाश असते.  
परी तो आहे येकदेसी । दृष्टांत न घडे वस्तुसी ।
कांहीं येक चमत्कारासी । देउनी पाहिलें ॥ ६ ॥
६) परंतु सूर्याचा हा दृष्टांत परब्रह्मास लागूं पडत नाहीं. सूर्य एकदेशी आहे. तर ब्रह्म सर्व दिशी आहे. ब्रह्माची कांहीं कल्पना यावी, यासाठीं हा चमत्कार सांगितला. एकच सूर्याचे बिंब अगदी कोट्यावधि लोकांना आपल्या डोक्यावर दिसतें. हा चमत्कारच आहे.  
नाना तीर्थें नाना देसीं । कष्टत जावें पाहाव्यासी ।
तैसें न लगे परब्रह्मासी । बैसले ठाईं ॥ ७ ॥
७) अनेक देशांमध्यें अनेक तीर्थें आहेत. तीं पहायची असतील तर कष्ट सोसून दूर जावें लागतें. पण परब्रह्म दर्शन करण्यास तसें करावें लागत नाहीं. बसल्या ठिकाणीं तें पहाता येते.  
प्राणी बैसोनीच राहातां । अथवा बहुत पळोन जातां ।रिकामें 
परब्रह्म तें तत्वतां । समागमें ॥ ८ ॥
८) समजा, एखादा प्राणी एका जागी बसून राहिला, नंतर तो पळत पळत दूर गेला. त्याच्या या दोन्ही अवस्थांमध्यें परब्रह्म अगदी त्याच्या बरोबर राहतें.  
पक्षी अंतराळीं गेलां । भोंवतें आकाशचि तयाला ।
तैसें ब्रह्म प्रााणीयाला । व्यापून आहे ॥ ९ ॥ 
९) एखादा पक्षी आकाशांत अगदी उंच उडाला. त्याच्याभोवतीं जिकडे तिकडे आकाशच असतें. त्याचप्रमाणें परब्रह्म प्राण्यांना सर्व बाजूनें व्यापून राहतें.
परब्रह्म पोकळ घनदाट । ब्रह्म सेवटाचा सेवट ।
ज्यासी त्यासी ब्रह्म नीट । सर्वकाळ ॥ १० ॥
१०) ब्रह्म पोकळ म्हणजे रिकामें आहे. पण तें अगदी दाट भरलेलें आहे. ब्रह्म पोकळ आहे याचा अर्थ ब्रह्माच्या ठिकाणीं त्याच्याखेरीज अन्य वस्तू नाहीं. म्हणून तें अगदी भरलेलें आहे. झाडून सगळ्यांचा शेवट अखेर ब्रह्मामध्येंच होतो. ज्याला त्याला सर्वकाळ ब्रह्म अगदी सरळ असतें.
दृश्या सबाहे अंतरीं । ब्रह्म दाटलें ब्रह्मांडोदरीं ।     
आ  रे त्या विमळाची सरी । कोणास द्यावी ॥ ११ ॥
११) या अवाढव्य ब्रह्मांडाच्या पोटांत अगदी गच्चपणें भरलेलें ब्रह्म दृश्यांच्या आंत बाहेर व्यापून आहे. त्या निर्मळ ब्रह्माची सर कोणालाहि येऊं शकत नाहीं. 
वैकुंठकैळासस्वर्गलोकीं । इंद्रलोकीं चौदा लोकीं ।
पन्नगादिकपाताळलोकी । तेथेंहि आहे ॥ १२ ॥
१२) वैकुंठ, कैलास, स्वर्गलोक, इहलोक, परलोक, इंद्रलोक, चौदालोक,महासर्पाचे पाताळ लोक या सर्व लोकांना ब्रह्म व्यापून राहिलेलें आहे. 
कासीपासून रामेश्र्वर । आवघें दाटलें अपार ।
परता परता पारावार । त्यास नाहीं ॥ १३ ॥
१३) काशीपासून रामेश्र्वरपर्यंत सर्व जागीं अपार ब्रह्म गच्चपणें भरलेले आहे. त्याच्यापलीकडे जावे म्हणून कितीही दूर गेले तरी त्याला शेवट नाहीं. त्यामुळें जेथें ब्रह्म नाहीं अशी जागाच नाहीं.
परब्रह्म तें येकलें । येकदांचि सकळांसी व्यापिले ।
सकळांस स्पर्शोन राहिलें । सकळां ठाईं ॥ १४ ॥
१४) परब्रह्म अगदी एकटे आहे, एकमेव व अद्वितीय आहे. त्यानें एकदांच सगळ्यांना व्यापून टाकलें आहे. सगळ्यांना स्पर्श करुन तें सगळ्या ठिकाणीं राहिलें आहे. 
परब्रह्म पाउसें भिजेना । अथवा चिखलानें भरेना ।
पुरामधें परी वाहेना । पुरासमागमें ॥ १५ ॥
१५) परब्रह्म पावसानें भिजत नाहीं किंवा चिखलानें माखलें जात नाहीं. पाण्याच्या पूरांतही तें वाहून जात नाहीं. 
येकसरें सन्मुख विमुख । वाम सव्य दोहिंकडे येक ।
आर्धऊर्ध प्राणी सकळीक । व्यापून आहे ॥ १६ ॥
१६) एकाच वेळीं तें समोर असतें व मागें असतें. उजव्या बाजूला असतें व डाव्या बाजूला असतें. खालीं असतें व वर असतें. सर्व प्राण्यांना तें सर्व बाजूंनी व्यापून राहतें.
आकाशाचा डोहो भरला । कदापी नाहीं उचंबळला ।
असंभाव्य पसरला । जिकडे तिकडे ॥ १७ ॥
१७) परब्रह्मानें जणू काय आकाशाचा डोह भरुन टाकला आहे. पण या डोहामधील पाणी कधी उचंबळत नाहीं. कल्पना करतां येत नाहीं अशा अफाट विस्तारानें तों डोह जिकडे तिकडे पसरला आहे.
येकजिनसी गगन उदास । जेथें नाहीं दृश्यभास । 
भासेंविण निराभास । परब्रह्म जाणावें ॥ १८ ॥ 
१८) ज्याच्या ठिाकाणी दृश्याचा यत्किंचित भास नाहीं, असें अगदी एकजिनसी शन्य आकाश कल्पावें. अशा प्रकारचें इंद्रियांना न भासणारें, मनाला आकलन न होणारें, जें आकाश तेंच परब्रह्म समजावें. आपल्या प्रत्ययाला येणार्‍या आकाशांतून सर्व दृश भास नाहींसा केल्यावर जें केवळ आकाश उरतें तेंच परब्रह्म होय. 
संतसाधुमहानुभावां । देवदानवमानवां ।
ब्रह्म सकळांसी विसांवा । विश्रांतिठाव ॥ १९ ॥
१९) संत, साधु, महात्मे, देव, दानव आणि मानव या सगळ्यांना परब्रह्म हेंच खर्‍या विश्रांतीचें ठिकाण आहे. त्याच्यापाशी सर्वांना विसावा मिळतो.  
कोणेकडे सेवटा जावें । कोणेकडे काये पाहावें ।
असंभाव्य तें नेमावें । काये म्हणोनी ॥ २० ॥
२०) कोणत्या बाजूला परब्रह्माचा शेवट आहे, कोणत्या बाजूला तें कसें पाहावें हें सांगणें अशक्य आहे. जें मुळांत अनंत आहे व अमर्याद आहे, त्याला कोणतीहि मर्यादा घालणें शक्य नाहीं. 
स्थूळ नव्हे सूक्ष्म नव्हे । कांहीं येकासारिखें नव्हे ।
ज्ञानदृष्टीविण नव्हे । समाधान ॥ २१ ॥
२१) परब्रह्म स्थूळ नाहीं किंवा सूक्ष्महि नाहीं. या विश्र्वामधील कोणत्यही वस्तूसारखें तें नाहीं. फक्त ज्ञानदृष्टीला त्याचे स्वरुप आकलन होतें. आणि म्हणून ज्ञानदृष्टीनें मनाचे समाधान होतें.    
पिंडब्रह्मांडनिरास । मग तें ब्रह्म निराभास ।
येथून तेथवरी अवकास । भकासरुप ॥ २२ ॥
२२) पिंड व ब्रह्मांड हीं दोन्ही भासरुप आहेत. त्यांचा निरास झाला कीम ब्रह्म निराभास किंवा भासरहित होतें. मग येथून तेथपर्यंत नुसता रिकामा अवकाश अनुभवास येतो. 
ब्रह्म व्यापक हें तो खरें । दृश्य आहे तों हें उत्तरें ।
व्यापेंविण कोण्या प्रकारें । व्यापक म्हणावें ॥ २३ ॥
२३) ब्रह्म व्यापक आहे हें म्हणणें खरेंच आहे, पण जोपर्यंत व्याप्त दृश्य आहे तोपर्यंत हें बोलणें खरें असतें. ब्रह्माला व्यापून रहायला दृश्यच उरलें नाहीं तर मग ब्रह्म व्यापक आहे ही भाषाच संभवत नाहीं.  
ब्रह्मासि शब्दचि लागेना । कल्पना कल्पूं शकेना ।
कल्पनेतीत निरंजना । विवेकें वोळखावें ॥ २४ ॥
२४) शब्द ब्रह्मापर्यंत पोचूं शकत नाहीं. मानवी कल्पना ब्रह्माची कल्पना करुं शकत नाहीं. अशा या कल्पनातीत निरंजन स्वरुपाला विवेकानें ओळखावें.  
शुद्ध सार श्रवण । शुद्ध प्रत्ययाचें मनन ।
विज्ञानीं पावतां उन्मन । सहजचि होतें ॥ २५ ॥
२५) सर्व साधनाचे रहस्य असेल तर तें अध्यात्म श्रवण होय. श्रवण करुन सतत मनन करावें आणि स्वतः अनुभव घ्यावा. स्वानुभव प्राप्त झाला कीं ज्ञानाचें विज्ञान होतें. आणि मग आपोआपच उन्मनी अवस्था होते. 
जालें साधनाचें फळ । संसार जाला सफळ ।
निर्गुणब्रह्म तें निश्र्चळ । अंतरीं बिंबलें ॥ २६ ॥
२६) ज्याला उन्मनी साधतें, त्यास त्याच्या साधनेचें फळ मिळतें. त्याचा संसार सफळ झाला. निश्र्चळ व निर्गुण ब्रह्म त्याच्या अंतर्यामी स्थिर झालें. 
हिसेब जाला मायेचा । जाला निवाडा तत्वांचा ।
साध्य होतां साधनाचा । ठाव नाहीं ॥ २७ ॥
२७) मायेचा हिशोब झाला. मायेचे देणें घेणें संपलें. कांहीहि बाकी राहिली नाहीं. मूळमायेपासून चारी खाणीपर्यंत सारीं तत्वें अशाश्वत आहेत. हें निश्र्चित ठरलें. साध्य पदरांत पडल्यानें साधनाला अवकाश उरला नाहीं. साधना आपोआपच विराम पावली.    
स्वप्नीं जें जें देखिलें । तें तें जागृतीस उडालें ।
सहजचि अनुर्वाच्य जालें । बोलतां न ये ॥ २८ ॥
२८) स्वप्नांत जें जें पाहिलेले असतें तें सगळें जागेपणी नाहीसें होते. अशा रीतीनें सहजच अनिर्वाच्य स्वरुप बनल्यावर त्याबद्दल कांहीं बोलतां येत नाहीं.
ऐसें हें विवेकें जाणावें । प्रत्ययें खुणेंसी बाणावें ।
जन्ममृत्याच्या नांवें । सुन्याकार ॥ २९ ॥
२९) असें हें सगळें विवेकानें जाणावे. स्वतः अनुभव घ्यावा. त्या अनुभवांनी आत्मज्ञानाच्या खुणा अंगीं बाणाव्या. म्हणजे मग आपल्याला जन्म मृत्यु शून्यवत होतात. आपण अमृतपदास पोचतो.
भक्तांचेनि साभिमानें । कृपा केली दाशरथीनें ।
समर्थकृपेचीं वचनें । तो हा दासबोध ॥ ३० ॥   
३०) श्रीरामरायानें भक्ताचा अभिमान धरला आणि त्याच्यावर कृपा केली. त्या समर्थाच्या कृपेनें हीं वचनें स्फुरलीं. त्या वचनांचा संग्रह म्हनजेच हा दासबोध होय.     
वीस दशक दासबोध । श्रवणद्वारें घेतां शोध ।
मननकर्त्यास विशद । परमार्थ होतो ॥ ३१ ॥
३१) दासबोधाचे वीस दशक आहेत. तो श्रवण करुन त्यावर जो शोधपूर्वक मनन करील त्यास परमार्थ म्हणजे काय हें स्पष्टपणें कळेल.     
वीस दशक दोनीसें समास । साधकें पाहावें सावकास ।
विवरतां विशेषाविशेष । कळों लागे ॥ ३२ ॥
३२) दासबोधाचे हे वीस दशक आणि दोनशें समास साधकानें स्वस्थपणें आभ्यासावें. त्याच्यावर विचार केल्यास अधिकाधिक अर्थ कळूं लागेल.   
ग्रंथाचें करावें स्तवन । स्तवनाचें काये प्रयोजन ।
येथें प्रत्ययास कारण । प्रत्ययो पाहावा ॥ ३३ ॥
३३) ग्रंथाची स्तुति करण्याची पद्धत आहे. परंतु अशी स्तुति करण्याचे कारण नाहीं. या ठिकाणी अनुभव हा प्रधान आहे. ग्रंथामध्यें सांगितलेल्या गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन पहावा.  
देहे तंव पांचा भूतांचा । कर्ता आत्मा तेथींचा ।
आणी कवित्वप्रकार मनुशाचा । काशावरुनी ॥ ३४ ॥
३४) देह तर पंचभूतांचा बनलेला आहे. अंतरात्मा हा तेथिल खरा कर्ता आहे. हें जर खरें तर कवित्वाचें कर्तेपण आत्म्याकडेच आहे. माणसाकडे नाहीं. 
सकळ करणें जगदीशाचें । आणी कवित्वचि काये मानुशाचें ।
ऐशा अप्रमाण बोलण्याचें । काये घ्यावें ॥ ३५ ॥
३५) जगामध्यें सगळें कर्तेपण जगदीश्वराचे आहे. अर्थांत कवित्वाचे कर्तेपण माणसाकडे असूं शकत नाहीं. माणसानें कवित्वाचे कर्तेपण स्वतःकडे घेणें अगदी अप्रमाण आहे.  
सकळ देह्याचा झाडा केला । तत्वसमुदाव उडाला ।
तेथें कोण्या पदार्थाला । आपुलें म्हणावें ॥ ३६ ॥
३६) आपला देह संपूर्ण निरास केला म्हणजे तत्वांचा समुदाय उडून जातो. मग कोणत्याही वस्तूला आपलें म्हणतां येत नाहीं.
ऐसींहे विचाराचीं कामें । उगेंच भ्रमों नये भ्रमें ।
जगदेश्र्वरें अनुक्रमें । सकळ केलें ॥ ३७ ॥
३७) अशीं ही विचारांची कामें आहेत. माणसानें भ्रमांत पडून उगीच भटकूं नये. जगदीश्वरानें व्यवस्थितपणें क्रमाक्रमानें सगळें रचलें आहे. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विमळब्रह्मनिरुपणनाम समास दहावा ॥
॥ इति दासबोध ॥ 
Samas Dahava VimalBrahma  Nirupan
समास दहावा विमलब्रह्म निरुपण 


Custom Search

No comments: