Tuesday, July 3, 2018

Samas Navava Sookshma Nirupan समास नववा सूक्ष्मनिरुपण


Dashak Visava Samas Navava Sookshma Nirupan 
Samas Navava Sookshma Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us the Antaratma i.e. Atma in our body. Name of this Samas is Sookshma Nirupan.
समास नववा सूक्ष्मनिरुपण
श्रीराम ॥
मृतिकापूजन करावें । आणी सवेंचि विसर्जावें ।
हें मानेना स्वभावें । अंतःकर्णासी ॥ १ ॥
१) मातीचा देव आणून त्याची पूजा करायची नंतर विसर्जन म्हणून त्यालाच टाकून द्यायचा. हें आपल्या अंतःकरणाला स्वाभाविकपणें योग्य वाटत नाहीं.
देव पूजावा आणी टाकावा । हें प्रशस्त न वटे जीवा ।
याचा विचार पाहावा । अंतर्यामीं ॥ २ ॥ 
२) ज्या देवाची पूजा करयची त्यालाच टाकून द्यायचा. हें माणसाच्या जीवाला प्रशस्त वाटत नाहीं. आपल्या मनांत याचा विचार करावा. 
देव करिजे ऐसा नाहीं । देव टाकिजे ऐसा नाहीं ।
म्हणोनि याचा कांहीं । विचार पाहावा ॥ ३ ॥
३) देव बनवतां येण्यासारखा नाहीं. तसाच तो टाकून देण्यासारखा पण नाहीं. म्हणून यावर कांहीं विचार करणें जरुर आहे.   
देव नाना शरिरें धरितो । धरुनी मागुती सोडितो ।
तरी तो देव कैसा आहे तो । विवेकें वोळखावा ॥ ४ ॥
४) देव अनेक देह धारण करतो. आणि धरल्यानंतर मागून तें टाकून देतो. देह धारण करणारा आणि देह सोडणारा हा देव कसा आहे, ते विवेकानें ओळखावें.   
नाना साधनें निरुपणें । देव शोधायाकारणें ।
सकळ आपुले अंतःकर्णे । समजले पाहिजे ॥ ५ ॥
५) देवाचा शोध कसा करावा हे सांगणारीं अनेक निरुपणें आहेत. तशीच अनेक साधनेंही आहेत. पण ती सगळी आपण आपल्या अंतःकरणानें समजून घेतली पाहिजेत.  
ब्रह्मज्ञानाचा उपाये । समजल्याविण देतां नये ।
पदार्थ आहे मा घे जाये । ऐसें म्हणावें ॥ ६ ॥ 
६)  ब्रह्मज्ञानाचा उपाय स्वतः समजून घ्यावा. तो स्वतःला समजल्यावांचून दुसरा कोणी देऊं शकत नाही. तो कांहीं असा पदार्थ नाहीं कीं, '" हा घेऊन जा "असें म्हणतां येईल.
सगट लोकांचे अंतरींचा भाव । मज प्रतक्ष भेटवावा देव ।
परंतु विवेकाचा उपाव । वेगळाचि आहे ॥ ७ ॥
७) सर्वसाधारण माणसाच्या मनांत असा हेतु असतो कीं, " मला देवाची प्रत्यक्ष भेट व्हावी " परंतु देवदर्शन करुन घेण्यास विवेकाचा उपाय कांहीं वेगळाच आहे. 
विचार पाहातां तगेना । त्यास देव ऐसें म्हणावेना ।
परंतु जन राहेना । काये करावें ॥ ८ ॥
८) विचारानें परीक्षण केलें असतां, जें शाश्वतपणें टिकत नाहीं त्यास देव म्हणता येत नाहीं. पण लोक ऐकत नाहींत ते अशाश्वतालाच देव म्हणतात. याला कांहीं इलाज नाहीं.
थोर लोक मरोनि जाती । त्यांच्या सुरता करुनी पाहाती ।
तैसीच आहे हेहि गती । उपासनेची ॥ ९ ॥
९) थोर माणसें मरुन गेल्यावर त्यांच्या मूर्ति करुन ठेवतात. व ती मूर्ति तो माणूस आहे असें समजतात. उपासनेच्या बाबतींत असाच प्रकार होतो. आपल्या कल्पनेनें देवाची मूर्ति करुन त्यासच सामान्य लोक देव समजतात. 
थोर व्यापार ठाकेना जनीं । म्हणोनि केली रखतवानी ।
राजसंपदा तयाचेनी । प्राप्त कैची ॥ १० ॥
१०) एखाद्या माणसाला मोठा व्यापार करणें जमेना, म्हणून त्यानें शाईचा व्यापार केला. तर त्या व्यापारांत त्याला राजासारखी संपत्ती मिळवणें कधींच शक्य नाही. उपासनेला हाच नियम लागूं आहे. खरा देव साध्य होत नाहीं म्हणून मातीच्या मूर्तिची उपासना करण्यानें खरें समाधान प्राप्त होणार नाहीं.  
म्हणोनि जितुका भोळाभाव । तितुका अज्ञानाचा स्वभाव ।
अज्ञानें तरी देवाधिदेव । पाविजेल कैचा ॥ ११ ॥
११) म्हणून जेवढा भोळा भाव आहे तेवढा अज्ञानाचा स्वभाव समजावा. अज्ञानानें परमात्मस्वरुपाची प्राप्ती होणें शक्य नाहीं. दृश्य मिथ्या आहे. तें खरें मानणें हाच अज्ञानस्वभाव आहे. 
अज्ञानासी ज्ञान न माने । ज्ञात्यास अनुमान न माने ।
म्हणोनि सिद्धांचीये खुणें । पावलें पाहिजे ॥ १२ ॥
१२) अज्ञानी माणसाला ज्ञान मानवत नाहीं. तर ज्ञानी माणसाला केवळ तर्कवाद मानवत नाहीं. म्हणून जे साक्षात्कारी सिद्ध आहेत त्यांचे अनुभव प्रमाण धरुन त्यांच्या संकेतांनी आपण वागलें पाहिजे. आपले अनुभव संतांच्या अनुभवाशी जुळले पाहिजेत.     
माया सांडून मुळास जावें । तरीच समाधान पावावें ।
ऐसें न होतां भरंगळावें । भलतीकडे ॥ १३ ॥
१३) माया बाजूस टाकून मूळ परब्रह्मापर्यंत गेल्यावर खरें समाधान लाभतें. असें झालें नाहीं तर साधक भलतीकडेच भरकटतो. त्याला समाधान लाभत नाहीं.
माया उलंघावाकारणें । देवासी नाना उपाय करणें ।
अध्यात्मश्रवणपंथेंचि जाणे । प्रत्ययानें ॥ १४ ॥
१४) मायेचे उल्लंघन करतां यावें म्हणून भगवंतानें साधनेचे अनेक प्रकार निर्माण करुन ठेवलें आहेत. परंतु त्या सर्व प्रकारांत अध्यात्माचें श्रवणमनन ही सर्व श्रेष्ठ साधना आहे. साधकानें तसें करुन स्वतः अनुभव घेत पुढें जावें.
ऐसें न करितां लोकिकीं । अवघीच होते चुकामुकी ।
स्थिति खरी आणि लटकी । ऐसी वोळखावी ॥ १५ ॥
१५) या राजमार्गानें न जातां सामान्य माणसें अन्य उपाय करतात. त्यामुळे त्यांची व देवाची चुकामुक होते. साधना खरी कोणती व खोटी कोणती अशा रीतीनें ओळखावीं.    
खोट्याचे वाटे जाऊं नये । खोट्याची संगती धरुं नये ।
खोटें संग्रहीं करुं नये । कांहींयेक ॥ १६ ॥
१६) जें मिथ्या आहे त्याच्या वाटेनें जाऊं नये. त्याची संगत धरुं नये. कांहीहि मिथ्या संग्रही ठेवूं नये. 
खोटें तें खोटेंचि खोटें । खर्‍यासीं तगेनात बालटें ।
मन अधोमुख उफराटें । केलें पाहिजे ॥ १७ ॥
१७) जें मिथ्या आहे तें कोणत्याहि कालीं कोणत्याहि परिस्थितींत मिथ्याच राहणार हें खरें आहे. त्याच्यापुढें खोट्याचा टिकाव लागत नाहीं. खोट्यामधें गुंतलेले मन खर्‍याकडे नेण्यासाठीं त्यास उरफाटे केलें पाहिजे. बहिर्मुख मनाला अंतर्मुख केलें पाहिजे.  
अध्यात्मश्रवण करीत जावें । म्हणिजे सकळ कांहीं फावे ।
नाना प्रकारीचे गोवे । तुटोनी जाती ॥ १८ ॥
१८) अध्यात्म श्रवण करीत जावें. त्या योगानें सर्व गोष्टी हस्तगत होतात. अनेक प्रकारच्या गुंतागुंती उकलल्या जातात.  
सूत गुंतलें तें उकलावें । तैसे मन उगवावें । 
मानत मानत घालावें । मुळाकडे ॥ १९ ॥
१९) ज्याप्रमाणें सुताचा गुंता आपण उकलतो. त्याचप्रमाणें मनाचा झालेला गुंता उकलावा. मनाला हळूहळू मूळ परब्रह्माकडे वळवावे. मायेच्या पसार्‍यांत अनेक ठिकाणीं अनेक प्रकारें गुंतलेले मन क्रमाक्रमानें तेथून सोडवावे. त्यास अंतर्मुख करुन परब्रह्माकडे वाटचाल करण्याची हळुंहळुं सवय लावावी.   
सकळ कांहीं कालवलें । त्या सकळाचें सकळ जालें ।
शरीरीं विभागलें । सकळ कांहीं ॥ २० ॥   
२०) मूळ मायेंतील सगळीम तत्वें एकत्र मिसळली आहेत. त्या मिश्रणापासून विश्वांतील सर्व वस्तु बनल्या आहेत. सर्व प्रकारच्या शरीरांमध्यें तेंच मिश्रण विभागशः भरलेले आहे.  
काये तें येथेंचि पाहावें । कैसें तें येथेंचि शोधावें ।
सूक्ष्माचीं चौदा नांवें । येथेंचि समजावीं ॥ २१ ॥  
२१) हें मिक्षण कोणत्या तत्वांचे बनलेलें आहे व तें कसें बनतें हें या मानवदेहांतच शोधावें. सूक्ष्माची जी चौदा नांवें आहेत, ती येथेच समजून घ्यावी.  
निर्गुण निर्विकारी येक । तें सर्वां ठाईं व्यापक ।
देह्यामधें तें निष्कळंक । आहे कीं नाहीं ॥ २२ ॥
२२) सर्व ठिकाणीं व्यापून असणारें निर्गुण व निर्विकारी असें एकच परब्रह्म आहे. तें निष्कलंक स्वरुप या देहामध्यें आहे किंवा नाहीं याचा शोध घ्यावा.  
मूळमाया संकल्परुप । तें अंतःकर्णाचें स्वरुप ।
जड चेतवी चैतन्यरुप । तें हि शरीरीं आहे ॥ २३ ॥
२३) मूळमाया संकल्परुप आहे. अंतःकरणाचें तेंच स्वरुप आहे. जडाला चेतना देण्याचे चैतन्य तेंच आहे. संकल्प, अंतःकरण व चैतन्य तिन्ही या शरीरांतच आहेत.  
समानगुण गुणसाम्य । सूक्ष्म विचार तो अगम्य ।
सूक्ष्म साधु जाणते प्रणम्य । तया समस्तांसी ॥ २४ ॥
२४) या अवस्थेंत गुण समान असतात. ती गुणसाम्य अवस्था होय. या साम्यावस्थेचा विचार अतिशय सूक्ष्म व अगम्य आहे. जे साधुपुरुष ही सूक्ष्म अवस्था जाणतात, ते सर्वांना वंद्य असतात.    
द्विधा भासतें शरीर । वामांग दक्षणांग विचार ।
तोचि अर्धनारीनटेश्र्वर । पिंडीं वोळकावा ॥ २५ ॥
२५) आपल्या शरीराला डावा व उजवा असें दोन विभाग आहेत. पण दोन्ही जसें एकच रुप आहेत. त्याचप्रमाणें पिंडांत अर्धनारीनटेश्र्वर असतो हें ओळखावें.   
तोचि प्रकृतिपुरुष जाणिजे । शिवशक्ती वोळखिजे ।
शडगुणईश्र्वर बोलिजे । तया कर्दमासी ॥ २६ ॥
२६) तोच प्रकृतिपुरुष आहे. शिवशक्ती पण तोच आहे. त्याच मिश्रणाला षडगुणैश्वर सुद्धां म्हणतात. 
तयासीच म्हणिजे महत्तत्व । जेथें त्रिगुणाचें गूढत्व ।
अर्धमात्रा शुद्धसत्व । गुणक्षोभिणी ॥ २७ ॥
२७) त्रिगुण ज्यांत गुप्तरुपानें राहतात तें महत्तत्व देखील तेंच समजावें. अर्मात्रा, शुद्धसत्व आणि गुणक्षोभिणी तिन्जी एकाच मूळ तत्वांची नांवें आहेत. 
त्रिगुणें चालतें शरीर । प्रतक्ष दिसतो विचार ।
मुळींच्या कर्दमाचें शरीर । ऐसें जाणावें ॥ २८ ॥
२८) तीन गुणांच्या मिश्रणानें आपलें शरीर चालतें. हीं गोष्ट तर प्रत्यक्षच दिसते. मूळच्या मिश्रणाचे बनलेले हें शरीर आहे, असें यावरुन समजावें. 
मन माया आणि जीव । हाहि दिसतो स्वभाव ।
चौदा नामांचा अभिप्राव । पिंडीं पाहावा ॥ २९ ॥
२९) मन, माया आणि जीव या तीन गोष्टी तर शरीराचा स्वभावच आहे. अशा रीतीनें पिंडामध्यें चौदा नावांचा संकेत पहावा. त्यांचें अस्तित्व समजावें.  
पिंड पडतां अवघेंचि जातें । परंतु परब्रह्म राहातें ।
शाश्र्वत समजोन मग तें । दृढ धरावें ॥ ३० ॥
३०) पिंड पडला कीं हें सगळें जातें. परंतु परब्रह्म तेवढें राहातें. तें शाश्वत आहे. असें जाणून घट्ट धरुन ठेंवावें.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सूक्ष्मनिरुपणनाम समास नववा ॥
Samas Navava Sookshma Nirupan 
समास नववा सूक्ष्मनिरुपण


Custom Search

No comments: