Sunday, July 1, 2018

Samas Satava Aatma Nirupan समास सातवा आत्मा निरुपण


Dashak Visava Samas Satava Aatma Nirupan 
Samas Satava Aatma Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us the vitues of Aatma. Name of this Samas is Aatma Nirupan.
समास सातवा आत्मा निरुपण 
श्रीराम ॥
अनुर्वाच्य समाधान जालें । तें पाहिजे बोलिलें ।
बोलिल्यासाठीं समाधान गेलें । हें तो घडेना ॥ १ ॥
१) आत्मसाक्षात्कार होऊन शब्दांनीं सांगता न येणारे समाधान प्राप्त झालें. तरी पण तें सांगितलें पाहिजे. कारण या समाधानाचे शब्दांनी वर्णन केलें तर तर तें समाधान नाहींसें झालें असें कधी होत नाही.  
कांहीं सांडावें लागत नाहीं । कांहीं मांडावें लागत नाहीं ।
येक विचार शोधून पाहीं । म्हणिजे कळे ॥ २ ॥
२) समाधान प्राप्त करुन घेण्यासाठीं कांहीं सोडावें लागत नाहीं. व कांहीं नवीन मांडावें लागत नाहीं. एका विचारानें शोध घेतला म्हणजे तें कळतें. 
मुख्य कासीविश्र्वेश्र्वर । श्र्वेतबंद रामेश्र्वर ।
मलकार्जुन भीमाशंकर । गुण आत्मयाचे ॥ ३ ॥
३) मुख्य काशीविश्र्वेश्र्वर, मग सेतुबंध रामेश्र्चर, मल्लिकार्जुन, भीमाशंकर,  
जैसीं मुख्य बारा लिंगें । यावेगळीं अनंत लिंगें ।
प्रचित जाणिजेत जगें । गुण आत्मयाचे ॥ ४ ॥
४) अशीं मुख्य बारा ज्योतिर्लिंगें आहेत. त्याशिवाय आणखी पुष्कळ लिंगें आहेत. त्यांची प्रचीति अनेक लोकांना येते. पण हें आत्म्याचे गुण आहेत.
भूमंडळीं अनंत शक्ति । नाना साक्षात्कार चमत्कार होती ।
नाना देवांच्या सामर्थ्यमूर्ती । गुण आत्मयाचे ॥ ५ ॥  
५) पृथ्वीवर अनंत शक्ति आहेत. अनेकांना त्यांचा साक्षात्कार होतो. त्या शक्तीचें अनेक चमत्कार दृष्टीस पडतात. त्याचप्रमाणें अनेक देवांच्या सामर्थ्यसंपन्न मूर्ति आहेत. हे आत्म्याचे गुण आहेत.  
नाना सिद्धांची सामर्थ्यें । नाना मंत्रांचीं सामर्थ्यें ।
नाना मोहरेवल्लींत सामर्थ्यें । गुण आत्मयाचे ॥ ६ ॥ 
६) अनेक सिद्धपुरुषांचे सामर्थ्य, अनेक मंत्रांचें सामर्थ्य, सर्पाच्या मस्तकावर असणार्‍या मण्याचे सामर्थ्य, अनेक वनस्पतींचें सामर्थ्य, 
नाना तीर्थांची सामर्थ्यें । नाना क्षेत्रांची सामर्थ्यें ।
नाना भूंमडळीं सामर्थ्यें । गुण आत्मयाचे ॥ ७ ॥
७) अनेक तीर्थांचें व क्षेत्रांचे सामर्थ्य, जगांतील अनेक प्रकारचे सामर्थ्य अशी अनेक प्रकारची सामर्थ्यें आत्म्याचे गुण आहेत.
जितुके कांहीं उत्तम गुण । तितुकें आत्मयाचे लक्षण ।
बरें वाईट तितुकें जाण । आत्म्याचकरितां ॥ ८ ॥
८) जेवढे म्हणून उत्तम गुणआहेत, तेवढें सगळें आत्म्याचे लक्षण समजावें. परंतु जेवढें बरें वाईट आढळतें तेवढें सारें आत्म्यामुळें असतें. हें ओळखावें.   
शुद्ध आत्मा उत्तम गुणी । सबळ आत्मा अवलक्षणी ।
बरी वाईटआवघी करणी । आत्मयाची ॥ ९ ॥
९) आत्मा शुद्ध असला म्हणजे उत्तम गुण प्रगट करतो. तोच आत्मा मिश्रित असतो तेव्हां अवलक्षणें प्रगट करतो. बरी आणि वाईट करणी अखेर आत्म्याचीच असतें.  
नाना साभिमान धरणें । नाना प्रतिसृष्टी करणें ।
नाना श्रापउश्रापलक्षणें । आत्मयाचेनी ॥ १० ॥
१०) अनेक प्रकारचा अभिमान धरणें, प्रतिसृष्टि निर्माण करणें, अनेक प्रकारचे शाप देणें व उःशाप देणें ही सगळी आत्म्याची लक्षणें आहेत.  
पिंडाचा बरा शोध घ्यावा । तत्वांचा पिंड शोधावा ।
तत्वें आत्माशोधितां पिंड आघवा । कळों येतो ॥ ११ ॥
११) साधकानें आपल्या देहाचा शोध नीटपणें घ्यावा. त्यामध्यें स्थूल, सूक्ष्म तत्वें नीट शोधावीत. त्तवांचा शोध केल्यानें पिंडाची सबंध रचना कळून येते.
जड देह भूतांचा । चंचळ गुण आत्मयाचा ।
निश्र्चळ ब्रह्मावेगळा ठाव कैचा । जेथें तेथें ॥ १२ ॥
१२) तत्वांचा शोध केला तर असें आढळतें कीं, देह जड आहे. पंचभूतांचा आहे. देहामधील चंचळपणा किंवा जाणीव हा अंतरात्म्याचा गुण आहे. त्याचबरोबर निश्र्चळ परब्रह्म सर्वव्यापी असल्यानें तें नाहीं असें स्थानच नाहीं.
निश्र्चळ चंचळ आणी जड । पिंडीं करावा निवाड ।
प्रत्ययावेगळें जाड । बोलणें नाहीं ॥ १३ ॥
१३) आपला पिंड जड देह, चंचळ आत्मा आणि निश्र्चळ परब्रह्म ही तीन तत्वें मिळून बनतो. या तत्वांचा निवाडा आपल्या पिंडांतच करुन घ्यावा. आनुभव घेतल्यावांचून बोलण्यास वजन येत नाहीं.
पिंडामधून आत्मा जातो । तेव्हां निवाडा कळों येतो ।
देहे जड हा पडतो । देखतदेखतां ॥ १४ ॥  
१४) अंतरात्मा पिंडांतून निघून जातो. त्याप्रसंगी तत्वांचा निर्णय ध्यानांत येतो. आपल्या देखत पाहतां पाहतां देह जड होऊन पडतो.   
जड तितुके  पडिले । चंचळ तितुकें निघोनी गेलें ।
जडचंचळाचें रुप आलें । प्रत्ययासी ॥ १५ ॥
१५) जड तेवढें निश्र्चेष्ट पडतें.चंचळ तेवढें देह सोडून निघून जातें. पण या शनुभवावरुन जड व चंचळ यांचें स्वरुप आपल्या अनुभवास येते. 
निश्र्चळ आहे सकळां ठांई । हें तों पाहाणें नलगे कांहीं ।
गुणविकार तेथें नाहीं । निश्र्चळासी ॥ १६ ॥
१६) निश्चळ मुळीं सर्व ठिकाणीं व्यापून आहे. तें कांहीं पहावें लागत नाहीं. निश्चळ स्वरुपांत कोणताच गुणविकार नसतो. केव्हांहि व कोठेंहि तें अगदी जसेंच्या तसेंच राहतें. 
जैसें पिंड तैसें ब्रह्मांड । विचार दिसतो उघड ।
जड चंचळ जातां जाड । परब्रह्मचि आहे ॥ १७ ॥
१७) पिंडाच्या बाबतींत जें खरें तेंच ब्रह्मांडाच्या बाबतींत खरें असतें. हा विचार अगदी उघड आहे. स्पष्ट आहे. जड आणि चंचळ नाहींसें झालें कीं, सर्व व्यापी घनदाट परब्रह्म तेवढें शिल्लक उरते.
माहांभूतांचा खंबीर केला । आत्मा घालून पुतळा जाला ।
चालिला सृष्टीचा गल्बला । येणें रीतीं ॥ १८ ॥
१८) महाभूतांचा खंबीर केला-----म्हणजे रांधा करुन आंबवलेली कणिक----- त्यामध्यें आत्मा घातला, म्हणजे त्यामध्यें जाणीव घातली, तेव्हा त्याचा पुतळा तयार झाला. अशा रीतीनें पृथ्वीचा खटाटोप चालतो. 
आत्मा माया विकार करी । आळ घालिती ब्रह्मावरी ।
प्रत्ययें सकळ कांहीं विवरी । तोचि भला ॥ १९ ॥
१९) खरें म्हणजे माया व अंतरात्मा सर्व बदल घडवून आणतात. पण ब्रह्मावर त्याचा आरोप घातला जातो. जो कोणी या सगळ्या गोष्टींचें विचारानें विवरण करतों तोच मनुष्य उत्तम होय.  
ब्रह्म व्यापक अखंड । वरकड व्यापकता खंड ।
शोधून पाहातां जड । कांहींच नाहीं ॥ २० ॥
२०) ब्रह्माची व्यापकता अगदी अखंड आहे. त्यामुळें त्याच्या ठिकाणीं बदल घडण्यास अवकाश असतो. नीट विचार करुन शोधून पाहिलें तर यांत समजण्यास अवघड असें कांहीं नाहीं.    
गगनासी खंडता नये । गगनाचें नासेल काये ।
जरी जाला माहांप्रळये । सृष्टीसंव्हार ॥ २१ ॥
२१) आकाशाला खंडित करतां येत नाहीं. आकाशाला आपण भेगा पाडूं शकत नाहीं. म्हणून महाप्रलय होऊन सृष्टीचा संव्हार झाला तरी आकाशाचा मुळींच नाश होत नाहीं. 
जें संव्हारामध्यें सांपडले । तें सहजचि नासिवंत जालें ।
जाणते लोकीं उगविलें । पाहिजे कोडें ॥ २२ ॥
२२) जें संहातामधें सांपडते ते स्वाभाविकपणें नाशवंत असतें. विचारवंत जाणत्या लोकांनी हें कोडें सोडविलें पाहिजे. त्यांनीं या गूढ गोष्टीचा उलगडा करणें जरुर आहे. जड आणि चंचळ दोन्ही आलें आणि गेलें तरी परब्रह्म अगदी जसेंच्या तसें कसें राहतें, हें सृष्टीचें कोडें आहे. जाणत्या लोकांनी त्याचा उलगडा करावा. 
न कळतां वाटे कोडें । कळतां आवघें दिसें उघडें ।
म्हणोनी येकांतीं निवाडे । विचार पाहावा ॥ २३ ॥
२३) पण या विश्र्वरचनेची गंमत अशी आहे कीं, जोपर्यंत ती कळत नाहीं तोपर्यंत ती गूढ वाटते. पण ती कळली कीं तिच्यामध्यें कांहीं गूढ नाहीं, ती अगदी सरळ व उघडी आहे, असें कळतें. म्हणून एकांतामध्यें जावें आणि अत्यंत विचार करुन हें गूढ उकलावें.  
मिळतां प्रत्ययाचे संत । येकांतापरीस येकांत ।
केली पाहिजे सावचीत । नाना चर्चा ॥ २४ ॥
२४) स्वानुभवसंपन्न असा कोणी संत भेटला तर मोठ्या सावधान चित्तानें अनेक विषयांवर त्याच्याशी चर्चा करावी. कारण अशा संताची भेट म्हणजे एकांतापेक्षांही मोठा एकांत असतो.  
पाहिल्यावेगळें कळत नाहीं । कळतां कळतां संदेह नाहीं ।
विवेक पाहातां कोठेंचि नाहीं । मायाजाळ ॥ २५ ॥
२५) माणसानें शोधून पाहिलें नाहीं तर काहींच कळत नाहीं. त्याला कळूं लागले कीं कळतां कळतां त्याचे संदेह नाहींसे होतात. विवेकानें शोध केला तर मायाजाळ खरेंपणानें कोठेंच नाहीं अशी खात्री होते.   
गगनीं आभाळ आलें । मागुती सवेंचि उडालें ।
आत्म्याकरितां दृश्य जालें । उडेल तैसें ॥ २६ ॥
२६) आकाशांत अभ्र येतें आणि लगोलग लगेच नाहींसे होऊन जाते. या अंतरात्म्याच्या आश्रयानें हें दृश्य विश्र्व भासतें. पण विवेकानें भ्रम नाहींसा झाला कीं तें लगेच नाहींसे होतें. 
मुळापासून सेवटवरी । विवेकी विवेकें विवरी । 
तोचि निश्र्चय थावरी । चळेना ऐसा ॥ २७ ॥
२७) विवेकी साधक विवेकानें विवरण करतां करतां अगदीं मूळमायेपासून अगदी शेवटपर्यंत जातो. आपल्या सूक्ष्म विवेकानें अशाश्वत तत्वांना तो बाजूस सारतो आणि जो कधी चळणार नाहीं असा स्वस्वरुप निश्र्चय करतो. त्याचा आत्मनिश्र्चय अत्यंत स्थिर असतो. 
वरकड निश्र्चय अनुमानाचें । अनुमानें बोलतां काये वेंचे ।
जाणते पुरुष प्रचितीचे । ते तों मानीतना ॥ २८ ॥  
२८) बाकीचे निश्र्चय अनुमानाच्या बळावर केलेले असतात. अनुमानाच्या आधारानें बोलायला माणसाचें कांहींच जात नाहीं. पण जे साक्षात्कारी जाणते पुरुष असतात ते अनुमानाच्या बोलण्याला मानत नाहींत.    
उगें न बोलणें अनुमानाचें । अनुमानाचें कोण्या कामाचें ।
येथें सगट विचाराचें । काम नाहीं ॥ २९ ॥
२९) अनुमानाचें उगीच बोलणें कामास येत नाहीं. येथें सरसकट तर्क चालवून काम भागत नाहीं. माणसाचा तर्क देखिल अखेर दृश्यामधें घोटाळत असल्यानें, अतींद्रिय क्षेत्रामध्यें त्याला योग्य संचार करतां येत नाहीं. तेथें तो लटका पडतो. 
सगट विचार तो अविचार । कित्येक म्हणती येकंकार ।
येकंकार भ्रष्टाकार । करुं नये ॥ ३० ॥
३०) जो विचार दृश्यामधें उपयोगी पडतो तोच जर सूक्ष्माच्या क्षेत्रांत वापरला तर तेथें अविचार ठरतो. कांहीं लोक त्याला एकंकार म्हणतात. एकंकार हा भ्रष्टाचार असतो. आपण तो करुं नये.  
कृत्रिम अवघें सांडावें । कांहीं येक शुद्ध घ्यावें ।
जाणजाणों निवडावें । सारासार ॥ ३१ ॥
३१) जें कृत्रिम आहे तें सारें सोडावें. जें शुद्ध असेल तें घ्यावें. पुनः पुनः समजून सारासार निवडावें. कृत्रिम म्हणजे सत्य नसून सत्यासारखें दिसतें तें, अर्थात् मिथ्या होय.   
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आत्मानिरुपणनाम समास सातवा ॥
Samas Satava Aatma Nirupan
 समास सातवा आत्मा निरुपण 


Custom Search

No comments: