Saturday, June 11, 2016

Shri SantanGopal Stotra श्रीसंतानगोपालस्तोत्र

Shri SantanGopal Stotra 
Shri SantanGopal stotra is in Marathi. It is created from the Sanskrit SantanGopal stotra which is created by Vasudeva and it has arisen from the discussion in between Goddess Laxmi and God Keshav (Vishnu). This Marathi stotra is based on Sanskrit Stotra and it is created by Shri Divakar Anant Ghaisas for all those who want Santati (issue). It is very good stotra for all those who are issueless and want issue. All such couples are requested to recite this stotra daily with faith, concentration and devotion.
श्रीसंतानगोपालस्तोत्र 
श्री गणेशाय नमः ॥ 
प्रथम वंदन गणपतीला । जो विघ्नांतक म्हणूनी वर्णियला । 
पूर्ण करो काव्यरचनेला । सन्तानगोपाल स्तोत्राचिया ॥ १ ॥ 
लक्ष्मीचा जो पति । कमळापरि नेत्र शोभती । 
देवकीसुत म्हणुनी ख्याती । त्रिभुवनी जयाची ॥ २ ॥ 
त्या हरीसी माझे नमन । जो असे मधुसूदन । 
कृष्णासी माझे नमन । सुतप्राप्ती व्हावया ॥ ३ ॥ 
वासुदेवासी माझे वंदन । सुतप्राप्ती व्हावी म्हणून । 
गोपाल जो नंदनंदन । यशोदाअंकीं खेळतसे ॥ ४ ॥ 
आम्हांस पुत्र व्हावा म्हणून । करीतसे वासुदेवासी नमन । 
देवकीसुत गोविंद, मुनिजन । जयासी वंदिती ॥ ५ ॥ 
जो गोपाल बाल मनोहर । अच्युत असे कमलावर । 
यदुश्रेष्ठ कृष्ण मजवर । पुत्रवरद कृपा करो ॥ ६ ॥ 
पुत्रकामेष्टीचे फल । कमलनयन जो विमल । 
कमलापति सुकोमल । देवकीनंदन त्या नमन ॥ ७ ॥ 
हे पद्मापते पद्मनयना । पद्मनाभा जनार्दना । 
वासुदेवा श्रीशा मोहना । पुत्र देई मजलागीं ॥ ८ ॥ 
जो यशोदेच्या अंकीं लोळत । मुनिवृंद ज्यासी वंदित । 
आम्हांसी पुत्रलाभार्थ । अच्युत होवो प्रसन्न ॥ ९ ॥ 
श्रीपते देवाधिदेवा । दीनदुःखहरणा माधवा । 
गोविंदा जनार्दना मज द्यावा । सत्पुत्र कृपाप्रसादें ॥ १० ॥ 
तू भक्तांची इच्छा पुरविसी । भक्तांचे रक्षणही करिसी । 
रुक्मिणीवल्लभा कृष्णा मजसी । प्राप्त व्हावा सुपुत्र ॥ ११ ॥ 
रुक्मिणीनाथा सर्वेशा । भक्तकल्पद्रुमा पद्माक्षा । 
पुत्र द्यावा ही आशा । शरण मी तुज आलो ॥ १२ ॥ 
देवकीसुता वासुदेवा । जगत्पते गोविंदा माधवा । 
तनय मज उत्तम द्यावा । शरण मी तव चरणी ॥ १३ ॥ 
वासुदेवा तुज जग वंदिते । पुरुषोत्तमा कृष्णा श्रीपते । 
शरण आलो तव पदांते । पुत्र देई मजलागी ॥ १४ ॥ 
हे कमलाक्षा कमलानाथा । सदया कारुणिका आता । 
शरण येता तव पदा । पुत्र देई मजलागी ॥ १५ ॥ 
 लक्ष्मीपते कमलनाभा । तू त्रिभुवनाची महाशोभा । 
 मनुवंदिता शरण येतां । पुत्र देई मजलागी ॥ १६ ॥ 
तूच कार्य आणि कारण । बुध आणि सुखद पूर्ण । 
वासुदेवा तुज नमन । पुत्र देई मजलागी ॥ १७ ॥ 
राजीवनेत्रा रावणारे । श्रीरामा कवे हरे । 
तव चरणीं चित्त सारे । पुत्र देई मजलागी ॥ १८ ॥ 
आम्हांसी पुत्र मिळावा । म्हणूनी भजतो वासुदेवा । 
रमापते जगत्पते माधवा । पुत्र देई मजलागी ॥ १९ ॥ 
तुवां गोपींचा गर्व हरिला । त्यांचा वस्त्रसमूह हरिला । 
जगत्पते वासुदेवा मला । सुपुत्र आता देईं रे ॥ २० ॥ 
हे यदुनंदना मुनिवंदिता । रमापते वासुदेवा मुकुंदा । 
इच्छा पुरवी शरण येतां । पुत्र देईं मजलागीं ॥ २१ ॥ 
वासुदेवा मज सुत देईं । माधवा मज सुत देईं । 
श्रीकृष्णा मज वत्स देईं । महाप्रभो कृपा करी ॥ २२ ॥ 
श्रीकृष्णा मज अपत्य देईं । राघवा मज आत्मज देईं । 
भक्तमंदार, तनय देईं । नंदनंदना कृपा करी ॥ २३ ॥ 
जगत्पते वसुदेवसुता । गोविंदा कमलानाभा । 
मुकुंदा मुनिवंदिता । कृष्णा सुत मज देईं ॥ २४ ॥ 
मज आश्रय न नसे अन्य । तूच एक शरणस्थान । 
श्री आणि पुत्र देऊन । धन्य करी मजलागीं ॥ २५ ॥ 
यशोदेचे स्तन्य प्राशन । करितसे जो यदुनंदन । 
कपिलाक्षा हरीसी वंदन । पुत्रलाभार्थ मी करी ॥ २६ ॥ 
देवेशा नंदनंदना । प्रभो मज देई नंदना । 
श्री आणि पुत्रदाना । रमापते मज द्यावे ॥ २७ ॥ 
श्री पुत्र आणि पुत्रासवे । श्री वैभवही मज द्यावें । 
दीन वचन आमचें ऐकावें । श्रीपते माधवा ॥ २८ ॥ 
गोपाला बाला गोविंदा । रमापते वासुदेवा सुखप्रदा । 
वैभवासह पुत्रसंपदा । द्यावी हो मजलागीं ॥ २९ ॥ 
मी जें फळ इच्छिले । तें पाहिजे मज दिधले । 
यदुनंदना धन्य झालें । मम जीवन, करी असें ॥ ३० ॥ 
रामा भक्तचिंतामणे ! । कल्पवृक्ष तुजसी म्हणणे । 
मजला संपदा पुत्र देणे । प्रार्थना ही माझी ॥ ३१ ॥ 
आत्मज पुत्र द्यावा । आनंदप्रद तनय व्हावा । 
रघुनंदना कुमार द्यावा । विनंती ही तुजलागीं ॥ ३२ ॥ 
संतानगोपालासी वंदन । भक्तकाम दात्यासी नमन । 
गोविंद अच्युतासी वंदन । आम्हा पुत्र व्हावया ॥ ३३ ॥ 
' अ ' कार युक्त गोपाला । श्रीयुक्त यदुनंदनाला । 
क्लींयुक्त देवकीपुत्राला । यदुनायका वंदन ॥ ३४ ॥ 
वासुदेव मुकुंद अच्युत । ईश्र्वर माधव नाम स्मरत । 
कृष्णा तूच रमानाथ । तनय देईं मजलागीं ॥ ३५ ॥ 
राजीवनेत्रा हरे गोविंदा । समस्त-कामना-वरप्रदा । 
कपिलाक्षा प्रभो सदा । सपुत्र मी असावे ॥ ३६ ॥ 
'अब्ज' पद्म नभापरी । कांति शोभते शरीरीं । 
तो रमानायक सर्वांवरी । वरदान देतसे ॥ ३७ ॥ 
नंदबाळा धरापाळा । गोविंदा यदुकुळबाळा । 
रुक्मिणीवल्लभा मला । तनय देईं श्रीकृष्णा ॥ ३८ ॥ 
दासांसाठी कृपा-मंदार । मुकुंदा माधवा दामोदर । 
कृपा करी रे मजवर । पुत्र देईं पुंडरीकाक्षा ॥ ३९ ॥ 
यदुनायका पद्मेशा । नंदयशोदेची तू आशा । 
कृष्णा श्रीधरा परमेशा । पुत्र देईं मजलागीं ॥ ४० ॥ 
आमची इच्छा पुरवा । रमापते कृष्णा वासुदेवा । 
जगत्पते आम्हांसी द्यावा । सत्पुत्र भगवंता ॥ ४१ ॥ 
तू लक्ष्मीहृदयप्रियकर । सत्यभामापति सुंदर । 
तनय देईं रुक्मिणीवर । प्रभो विनंती ऐकावी ॥ ४२ ॥ 
चंद्रसूर्य तुझे नेत्र । तूच माधव अति पवित्र । 
द्यावा आम्हासी सत्पुत्र । पुंडरीकाक्षा विनंती ॥ ४३ ॥ 
तू करुणा मूर्तिमंत । ब्रह्मा तव पूजा करीत । 
देवकीचा तू प्रिय सुत । मजला तू सुत देई ॥ ४४ ॥ 
देवकीसुता श्रीनाथा । वासुदेवा जगता पाळिता । 
सर्व इच्छांचा पुरविता । तनय देई मजलागीं ॥ ४५ ॥ 
तूच गंभीर भक्तमंदार । तूच माधव अच्युत शंकर । 
गोपबालकांचा प्रियकर । पुत्र देईं मजलागीं ॥ ४६ ॥ 
वासुदेवा ईश्र्वरा श्रीपते । तूच रक्षितोसी भक्तांते । 
तूच प्रभू अखिल जगातें । तनय देईं मजलागीं ॥ ४७ ॥ 
तूच जगन्नाथ रमानाथ । दयानिधी भूमिनाथ । 
वासुदेव सर्वनाथ । तनय देईं मजलागीं ॥ ४८ ॥ 
हे श्रीनाथा वासुदेवा कृष्णा । शरण मी तव चरणा । 
कमलनयना कमलवदना । पुत्र देईं मजलागीं ॥ ४९ ॥ 
दास मंदार तू गोविंद । भक्त इच्छा पूर्णप्रद । 
तुजसी मी शरणागत । पुत्र देईं मजलागीं ॥ ५० ॥ 
गोविंद पुंडरीकाक्ष । रमानाथ दयादक्ष । 
तूच महाप्रभु प्रत्यक्ष । सुत दे मज शरणागता ॥ ५१ ॥ 
श्रीनाथ कमलपत्रनयन । गोविंद मधुसूदन । 
तव भक्त मी हे जनार्दन । पुत्रलाभ मज देईं ॥ ५२ ॥ 
अंगुली अन्य स्तनीं ठेवून । करी एक स्तनपान । 
जननी मुखासी करी अवलोकन । ऐसा मुकुंद स्तवितसे ॥ ५३ ॥ 
हे प्रभा पद्मलोचन । मागतो मी पुत्रसंतान । 
तुज मी आलों शरण । मज देईं तनयातें ॥ ५४ ॥ 
हे मुनिजनवंदित । पुत्रलाभ मी प्रार्थीत । 
जगत्पते मज होवो प्राप्त । इष्ट जे संतान ॥ ५५ ॥ 
श्रीपते वासुदेव जगन्नाथ । देवेन्द्र तव पूजा करित । 
पुरुषोत्तमा मजसी सुत । कृपानिधे तू देई ॥ ५६ ॥ 
तू यशोदेचा प्रिय नंदन । मज देईं पुत्रसंतान । 
 हे हरे कृष्ण जनार्दन । शरण मी तुजलागीं ॥ ५७ ॥ 
तूच राम कौसल्यासुत । गोविन्द वासुदेव जगन्नाथ । 
मजला देईं सुंदर सुत । सुलक्षणी दीर्घायू ॥ ५८ ॥ 
पद्मपत्राक्ष तूच विष्णू माधव । गोविन्द वामन तू केशव । 
सीताप्राणनाथ तू राघव । तनय द्यावा मजलागीं ॥ ५९ ॥ 
हे कमलाक्षा मुनिवंदिता । कृष्णा देवेन्द्रसुशोभिता । 
श्रीराम लक्ष्मणाग्रज श्रेष्ठा । तनय देईं मजलागीं ॥ ६० ॥ 
दशरथासी तू प्रिय । सीतानायक सदयहृदय । 
देईं आतां मज तनय । श्रीरामा शरण मी ॥ ६१ ॥ 
पूर्वीं ज्यापरी बिभीषणा । केलेसी लंकाप्रदाना । 
तेवीं आम्हां तव शरणा । तनय देईं राघवा ॥ ६२ ॥ 
तुझे पद्मसदृश चरण । करितों वारंवार स्मरण । 
राघवा सीताप्राणरक्षण । तनय द्यावा मजलागीं ॥ ६३ ॥ 
रामा मज इष्ट वरदान । कीं प्राप्त व्हावें पुत्रसंतान । 
तुज वंदी ब्रह्मा कमलासन । तुज शरण मी असे ॥ ६४ ॥ 
रामा राघवा लक्ष्मणप्रिया । सीताराम भक्त सदया । 
दशरत्मजा पुत्र द्यावया । प्रसन्न होईं मजलागीं ॥ ६५ ॥ 
देवकीच्या उदरीं जन्मला । यशोदेने जया वाढविला । 
कृष्णा माधवा गोपाला । तनय देईं मजलागीं ॥ ६६ ॥ 
कृष्णा माधवा रमावरा । वामना अच्युता शंकरा । 
गोपबालकप्रियकरा । पुत्र द्यावा मज प्रभो ॥ ६७ ॥ 
तू महाधन्य गोपरक्षिता । तू वासुदेव जगत्पिता । 
मजला तव शरणागता । पुत्रसंतान देईं तू ॥ ६८ ॥ 
 हा देवकीनंदन मज सुत । देवो देवो देवो प्रार्थित । 
देवो देवो तनय सुगत । देवो देवो मजलागीं ॥ ६९ ॥ 
श्रीपती जो राघव । रामचंद्र जो सीताधव । 
मजसी पुत्रसंतान संभव । करी रे मन्नाथा ॥ ७० ॥ 
वासुदेवासी असे प्रार्थना । सीतानाथा असे प्रार्थना । 
कुमार नंदन मम जीवना । पुत्रवंत करावे ॥ ७१ ॥ 
नमस्कार हे मधुसूदन । आलो मी तुज शरण । 
पुत्र देईं वंशविस्तारण । पुत्र देईं पुत्र देईं ॥ ७२ ॥ 
माधवा अच्युता कंसारे । शरण आलो मुरारे । 
अभीष्टसुत देऊन हरे । धन्य करी मजलागी ॥ ७३ ॥ 
मी तुज आलो शरण । सूर्य आणि रोहिणीरमण । 
जोवरी असतील संपूर्ण । सुतासी मम आयुष्य दे ॥ ७४ ॥ 
प्रभो कृष्णा देवकीसुता । तनय मज देईं आता । 
विद्या बुद्धि आणि संपदा । नित्य राहो त्याजवळी ॥ ७५ ॥ 
हे पद्मनेत्रा कामप्रदा । पुंडरीकाक्षा मुकुंदा । 
नत मी तुझिया पदा । सुतदेईं मजलागीं ॥ ७६ ॥ 
हे स्वामी तव चरणी । शरण इच्छा धरुनि मनी । 
सुतलाभार्थ करी विनवणी । पुत्र देईं मजलागीं ॥ ७७ ॥ 
भगवंता रामा माधवा । कामदा कृष्णा केशवा । 
मज सुलक्षणी सुत व्हावा । ऐसी विनंती तुजलागी ॥ ७८ ॥ 
तनय देईं गोविंदा । कमलापते मुकुंदा । 
शरण हे तव पदा । कमलनयना जगत्प्रभो ॥ ७९ ॥ 
तूं पद्मेचापति पद्मनयन । माधवा, प्रद्दुम्न तव नंदन । 
आलो मी तुज शरण । पूत देईं मजलागीं ॥ ८० ॥ 
हाती शंख चक्र पद्म गदा । शाङर्गपाणि गोविंदा । 
कृष्णा नमन तव पदा । सुत देईं मजलागीं ॥ ८१ ॥ 
रमानाथ नारायण । तुज वंदी पद्मा चिरंतन । 
हे राजीव-पत्रलोचन । सुत देईं मजलागीं ॥ ८२ ॥ 
रामा राघवा वसुदेवनंदना । रुक्मिणीप्राणजीवना । 
नारदादि वंदित चरणा । पुत्र देईं मजलागीं ॥ ८३ ॥ 
देवकीसुता गोविंदा । जगत्पते वसुदेव सुखप्रदा । 
गोपबालकप्रिया सदा । पुत्रवंत मज करी ॥ ८४ ॥ 
गोविंदा तुज मुनि वंदिती । रुक्मिणी प्रेम करी अती । 
तुवा उचित मजप्रती । सुत द्यावा सुलक्षणी ॥ ८५ ॥ 
गोपिकांनी जी कमळें । अर्पिली प्रेमभावबळें । 
ती तुवां आदरिलीं प्रेमळें । सुत देईं मजलागीं ॥ ८६ ॥ 
रमाहृदयरुपी कमळ । तेथें रमसी तू लोल । 
मजसी कृपेनें तू बाळ । प्रदान करी कामदा ॥ ८७ ॥ 
वासुदेवा रमानाथा । दासांसी मंगलांचा दाता । 
मजला तनय दे आतां । कृपावंत होवोनी ॥ ८८ ॥ 
तू सर्वांचे करिसी कल्याण । गोविंदा मुर प्राणहरण । 
तुज स्तविती मुनिजन । पुत्र देईं मजलागीं ॥ ८९ ॥ 
मुकुंदा पुत्रदानी ईश्र्वरा । रुक्मिणीच्या प्रियकरा । 
मजवरी आतां कृपा करा । तनय देउनी सुंदर ॥ ९० ॥ 
पुंडरीकापरी तव नयन । गोविंद तुझे नाम धन्य । 
जगत तव पदी शरण । पुत्र देईं मजलागीं ॥ ९१ ॥ 
वासुदेवा तू दयानिधी । मुकुंदा तव चरणारविंदीं । 
साधूंची लागते समाधी । पुत्र देईं मजलागी ॥ ९२ ॥ 
पुत्रसंपदेचा तूं दाता । देव पूजिती तुज गोविंदा । 
तुजला वंदितो मी सदा । पुत्रलाभ मज व्हावा ॥ ९३ ॥ 
देवा तू कारुण्यनिधी । गोपींची तू भावसमाधी । 
मुरारे तुज नमन आधी । पुत्र देईं मजलागीं ॥ ९४ ॥ 
तुज रमेशाते वंदन । रुक्मिणीप्रियाते नमन । 
मज देईं पुत्रसंतान । गोपबालनायका ॥ ९५ ॥ 
लक्ष्मीवरी तव नित्य प्रीती । वासुदेवा नमितो तुजप्रती । 
शेषशायी रंगशायी ख्याती । नमन तुजला पुत्रदा ॥ ९६ ॥ 
रंगशायी रमानाथा । माधवा तू मंगलप्रद । 
गोपबालकांचा तू नाथ । संतान देईं मजलागीं ॥ ९७ ॥ 
हे राघवा मी तव दास । तू दिनांचा कल्पतरु खास । 
सुत देईं मज विश्र्वास । अढळ असे तुजवरी ॥ ९८ ॥ 
हे यशोदेच्या तनया । आभीष्ट मजला द्यावया । 
प्रसन्न होई रे सदया । तनय देईं मजलागीं ॥ ९९ ॥ 
गोविंदा तू देव मत्प्रिय । देईं रे मज तनय । 
 वासुदेवा करी सुतसोय । जगताचा तू सोयरा ॥ १०० ॥ 
नीतिमान धनवान पुत्र । विद्यावंत ख्याती सर्वत्र । 
तुझिया कृपेचा तो स्रोत । इंद्रसखया माधवा ॥ १०१ ॥ 
हे स्तोत्र नित्य म्हणेल । तो सत्पुत्रसंपन्न होईल । 
वासुदेवाची कृपा लाभेल । सुखसंपन्न होतसे ॥ १०२ ॥ 
नाम जप करुनी नित्य । स्तोत्र म्हणावे अगत्य । 
ऐश्र्वर्य राजसन्मान प्राप्त । होईल तुम्हा निश्र्चयें ॥ १०३ ॥ 
लक्ष्मीकेशव-संवादात । वासुदेवें हे स्तोत्र संस्कृत । 
उपदेशिले संतानप्रद । 'संतानगोपाल' नामाने ॥ १०४ ॥ 
मराठीत त्याचा अनुवाद । दिवाकर कवी करी संवाद । 
इष्ट पुत्र व्हावा प्राप्त । विष्णुभक्तांकारणें ॥ १०५ ॥ 
अनंतसुत दिवाकर । घैसास उपनामें साचार । 
श्रीकृणाचा प्रियकर । रचना करी स्तोत्राची ॥ १०६ ॥ 
॥ इति ओवीरुप संतानगोपालस्तोत्र संपूर्ण ॥
Shri SantanGopal Stotra 
 श्रीसंतानगोपालस्तोत्र


Custom Search

No comments: