Wednesday, August 9, 2017

Samas Aathava Drushya Nirupan समास आठवा दृश्यनिरुपण


Dashak Sahava Samas Aathava Drushya Nirupan 
Samas Aathava Drushya Nirupan. It is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is answering his disciple. Disciple had asked him in earlier Samas, that why unreal or untrue is visible? Why he and anybody else sees what is defined as not true.
समास आठवा दृश्यनिरुपण  
श्रीराम ॥ 
मागां श्रोतीं पुसिलें होतें । दृश्य मिथ्या तरी कां दिसतें ।
याचें उत्तर बोलिजेल तें । सावध ऐका ॥ १ ॥
१) मागच्या समसांत श्रोत्यांनें विचारले होते कीं, जर दृश्य खोटे आहे तर ते दिसते कां? याचे उत्तर आतां लक्ष देऊन ऐका.  
देखिलें तें सत्तचि मानावें । हें ज्ञात्याचें  देखणें नव्हे ।
जड मूढ अज्ञान जीवें । हें सत्य मानिजे ॥ २ ॥
२) इंद्रियांना जें दिसतें तेंच खरें मानायचे हें ज्ञानी माणसाचे पाहाणें नव्हे. जड, मूढ, अज्ञान जीव त्यास खरें मानतात.
येक्या देखिल्यासाठीं । लटिक्या कराव्या ग्रंथकोटी ।
संतांमहंतच्या गोष्टी । त्याहि मिथ्या मानाव्या ॥ ३ ॥
३) केवळ इंद्रियांना दिसते म्हणून तें खरें मानालें तर कितीतरी वेदान्तग्रंथ खोटे ठरवावे लागतील. व साधुसंतांची वचनेंसुद्धा खोटी म्हणावी लागतील.  
माझें दिसतें हेंचि खरें । येथें चालेना दुसरें ।
ऐशिया संशयाच्या भरें । भरोंचि नये ॥ ४ ॥
४) माझ्या इंद्रियांना जें दिसते तेच खरें. त्याच्यापुढे मी दुसरें कांहीं जाणत नाही.  अशा संशयानें भरीस पडूं नये.
मृगें देखिलें मृगजळ । तेथें धावतें बरळ ।
जळ नव्हे मिथ्या सकळ । त्या पशूस कोणें म्हणावें ॥ ५ ॥
५) एखादें हरिण मृगजळ पाहाते. व तेथें खरोखर पाणी आहे या समजुतीने धावंत जाते. तेथें पाणी नाही केवळ पाण्याचा भास आहे. हे त्याला कोण समजावून सांगणार.   
रात्रौ स्वप्न देखिलें । बहुत द्रव्य सांपडलें ।
बहुत जनांसी वेव्हारिलें । तें खरें कैसेनि मानावें ॥ ६ ॥
६) रात्री स्वप्नामध्येम पुष्कळ धन मिळाले त्याचा लोकांशी व्यवहारही केला. तरी हे सर्व खरे कसे मानायचे. 
कुशळ चितारी विचित्र । तेणें निर्माण केलें चित्र ।
देखतां उठे प्रीति मात्र । परंतु तेथे मृत्तिका ॥ ७ ॥
७) एका कुशल चित्रकारानें सुंदर चित्र काढले. तें पाहून आवडले व प्रेम बसले. पण खरे कसे आहे ते पाहीला गेल्यावर नुसती माती हाती लागली.
नाना वनिता हस्ति घोडे । रात्रौ देखतां मन बुडे ।
दिवसा पाहातां कातडें । कंटाळवाणें ॥ ८ ॥
८) रात्रीच्यावेळी दिव्यांच्या प्रकाशांत कलाकारानें बनविलेल्या स्त्रिया, हत्ती, घोडे बघितले तर मनाला बरे वाटते. पण तेच दिवसा बघितल्यावर त्यांचेच कातडे वगैरे बघुन तें कंटाळवाणें होते.  
काष्टी पाषाणी पुतळ्या । नाना ठकारें निर्मिल्या ।
परम सुंदर वाटल्या । परंतु तेथें पाषाण ॥ ९ ॥
९) लाकडाच्या, दगडाच्या निरनिराळ्या सुंदर वस्तु तयार केल्या. त्या आवडल्या, सुंदर वाटल्या पण शेवटी हातीं काय लाकूड व पाषाणच. 
नाना गोपुरीं पुतळ्या असती । वक्रांगें वक्रदृष्टीं पाहाती ।
लाघव देखतां भरे वृत्ती । परंतु तेथें त्रिभाग ॥ १० ॥
१०) मंदिरांच्या दरवाज्यावर सुंदर पुतळ्या कोरलेल्या असतात. त्याच्यां शरिराचा बाक व डोळ्यांतील तिरपेपणा मन मोहून टाकतात. परंतु त्या कशाच्या बनलेल्या आहेत असा विचार केल्यावर समजते. वाळू, चुना व लोखंड हे तीन पदार्थ आढळतात. 
खेळतां नेटके दशावतारी । तेथें येती सुंदर नारी ।
नेत्र मोडिती कळाकुंसरी । परंतु अवघे धटिंगण ॥ ११ ॥
११) दशावताराचा खेळ करुन दाखविणारी स्त्री पात्रें नेत्रपल्लवी वगैरे करुन मन आकर्षून घेतात. पण वास्तविक ते रांगडे पुरुषच स्त्रीच्या भूमिकेंत असतात.   
सृष्टी बहुरंगी असत्य । बहुरुपाचें हें कृत्य । 
तुज वाटे दृश्य सत्य । परी हे जाण अविद्या ॥ १२ ॥
१२) जसा एखदा बहुरुपी निरनिराळी सोंगे दाखवितो. पण ती सर्व खोटी असतात. मूळचा तो तेवढा खरा. तसेच अनेक नावें रुपें यांनी भरलेली ही सृष्टीही खोटीच आहे. तीच्या मागे असलेले परब्रह्मरुपच तेवढे एकमेव खरे आहे. 
मिथ्या साचा सारिखें देखिलें । परि तें पाहिजे विचारिलें । 
दृष्टी तरळतां भासलें । तें साच कैसें मानावें ॥ १३ ॥
१३) खोटें जेव्हां खर्‍यासारखे दिसते तेव्हां तें खरे आहे कां असा विचार केला पाहिजे. आपल्या सदोष दृष्टीला जें दिसते तेंच खरें हे मानणे बरोबर नाही. 
वरी पाहातां पालथें आकाश । उदकीं पाहातां उताणें आकाश ।
मध्यें चांदिण्या हि प्रकाश । परी तें अवघें मिथ्या ॥ १४ ॥
१४) वर पाहिले तर आकाश पालथें दिसते. तेच आकाश पाण्यांत पाहिले तर उताणें दिसते. या दोन्हींमधें चांदण्या चमकतात. पण हे सगळे मिथ्या आहे. कारण डोळ्यांना जें दिसते तें खरे नसते. 
नृपतीनें चितारी आणिले । ज्याचे त्या ऐसे पुतळे केले ।
पाहातां तेचि ऐसे गमले । परी अवघे माईक ॥ १५ ॥
१५) एका राजाने शिल्पकार बोलाविले. त्यांच्याकडून कांही पुतळे हुबेहुब बनवुन घेतले. पुतळा बघितल्यावर तो खरा आहे असेच वाटे. पण शेवटी ते पुतळेंच.  
नेत्रीं कांहीं बाहोलि नसे । जेव्हां जें पाहावें तेव्हां तें भासे ।
डोळां प्रतिबिंब दिसे । तें साच कैसेनी ॥ १६ ॥
१६) डोळ्यामध्यें बाहुली नसते. परंतु आपण पाहतो तेव्हां ती दिसते. कारण आपण पाहतो त्याचे प्रतिबिंब आपल्या डोळ्यांत पडते. ते खरे मानणे योग्य नाही. 
जितुके बुडबुडे उठती । तितुक्यांमध्यें रुपें दिसती ।
क्षणामध्यें फुटोन जाती । रुपें मिथ्या ॥ १७ ॥
१७) पाण्यावर बुडबुडे उठतात. प्रत्येक बुडबुड्यांत प्रतिबिंबे दिसतात. बुडबुडे लगेच फुटतात. ती रुपें देखिल फुटुन जातात. म्हणुन ती रुपें मिथ्या असतात. 
लघुदर्पणें दोनि च्यारी हातीं । तितुकीं मुखें प्रतिबिंबती ।
परी तें मिथ्या आदिअंतीं । येकचि मुख ॥ १८ ॥
१८) आपल्या हातांत दोन चार आरसे घेतल्वावर त्यांत तोंडाची प्रतिबिंबे दिसतात. परंतु ती सर्व खोटी असतात. आपलें तोंड एकच असते.    
नदीतीरें भार जातां । दुसरा भार दिसे पालथा ।
कां पदसादाचा अवचिता । गजर उठे ॥ १९ ॥
१९) नदीतीरावरुन होडी ओझे घेऊन चालली कीं तिचें प्रतिबिंब पालथें दिसते. किंवा आपल्या आवाजाचा तेवढाचा मोठा प्रतिध्वनी उठतो.
वापीसरोवरांचे तीर । तेथें पशु पक्षी नर वानर ।
नाना पात्रें वृक्षविस्तार । दिसे दोहि सवा ॥ २० ॥ 
२०) विहीरीच्या व तळ्याच्याकाठीं पशु, पक्षी, माणसें, वानरें इतर वस्तु, मोठमोठी झाडें यांची प्रतिबिंबे दिसतात. त्यांची ती प्रतिबिंबे खरी नसतात.       
येक शस्त्र झाडूं जातां । दोनि दिसती तत्वता ।
नाना तंतु टणत्कारितां । द्विधा भासती ॥ २१ ॥
२१) एखादें शस्त्र जोरानें हालवले तर दोन शस्त्रे दिसतात. एखादा दोरा ताणून वाजविल्यास तो दोन असल्याप्रमाणें दिसतो.
कां ते दर्पणाचे मंदिरीं । बैसले सभा दिसे दुसरी ।
बहुत दीपांचि हारीं । बहुत छ्याया दिसती ॥ २२ ॥
२२) समजा आरसेमहालांत सभा भरली तर आरश्यांमुळे आणखी सभा भरल्यासारखे वाटते. त्याचप्रमाणें पुष्कळ दिव्यांची माळ पेटविली तर एकाच वस्तुच्या अनेक प्रतिमा दिसतात. 
ऐसें हें बहुविध असे । साचासारिखेंचि दिसे ।
परे हें सत्य म्हणोनि कैसें । विश्र्वासावें ॥ २३ ॥
२३) अशा रीतीनें हे अनेक प्रकार खरें नसून खर्‍याप्रमाणें वाटतात. त्यांच्यावर विश्र्वास कसा ठेवता येईल?
माया मिथ्या बाजीगरी । दिसे साचाचिये परी ।
परी हे जाणत्यानें खरी । मानूंचि नये कीं ॥ २४ ॥   
२४) माया जादुगिरी करते व खर्‍यासारख्या दिसणार्‍या खोट्यावस्तु निर्माण करते. जाणत्या माणसानें त्या खर्‍या कधीहीं मानूं नयेत.  
लटिकें साचाऐसें भावावें । तरी पारखी कासया असावें ।
येवं ये अविद्येचे यावे । ऐसेचि असती ॥ २५ ॥
२५) जें खरें नाही तें खरेंपणानें मानलें तर तर मग असे ठरविणर्‍या जाणत्यांची गरजच नाही. परंतु अविद्या आली कीं तिच्या प्रभावानें असें प्रकार घडतात.   
मनुष्यांची बाजीगरी । बहुत जनास वाटे खरी ।
सेवट पाहातां निर्धारीं । मिथ्या होये ॥ २६ ॥
२६) जादुगारानें निर्माण केलेल्या सर्व वस्तु खर्‍या वाटतात. पण जादुचा खेळ संपल्यावर पाहिलें तर त्या खोट्या होत्या हें निश्र्चयानें कळते.
तैसीच माव राक्षेसांची । देवांसहि वाटे साची ।
पंचवटिकेसि मृगाची । पाठी घेतली रामें ॥ २७ ॥
२७) राक्षससुद्धा अशीच माया रचतात व ती देवांनासुद्धा खरी वाटते. पंचवटीमध्यें असतांना श्रीरामाने भुलुन खोत्या सुवर्णमृगाचा पाठलाग केला.
पूर्व काया पालटिती । येकाचेचि बहुत होती । 
रक्तबिंदीच जन्मती । रजनीचर ॥ २८ ॥
२८) राक्षस मायेने आपलें शरीर बदलतात. एकाचे पुष्कळ होतात. युद्धामध्यें रक्ताच्या एका थेंबांतून पुन्हा जन्म घेतात. 
नाना पदार्थ फळेंचि जाले । द्वारकेमधें प्रवेशले ।
कृष्णें दैत्य किती वधिले । कपटरुपी ॥ २९ ॥   
२९) अनेक वस्तु व फळें यांची रुपें घेऊन राक्षस द्वारकेंत शिरले. पण कृष्णाने अशा कित्येक कपटी राक्षसांना ठार मारलें.   
कैसे कपट रावणाचें । सिर केलें मावेचे ।
काळनेमीच्या आश्रमाचें । अपूर्व कैसें ॥ ३० ॥
३०) रावणाने कपटीपणाने रामाचे खोटे शिर सीतेला दाखविले. तर काळनेमीनें ऋषीचे रुप घेऊन व आश्रम निर्माण करुन मारुतीला फसविले. 
नाना दैत्य कपटमती । जे देवांसहि नाटोपती ।
मग निर्माण होऊन शक्ती । संव्हार केला ॥ ३१ ॥
३१) कपटबुद्धि असलेले पुष्कळ राक्षस देवांनाही आटोपत नसत. मगभगवंताच्या शक्तीनें अवतार घेऊन त्यांचा संहार केला.
ऐसी राक्षेसांची माव । जाणों न सकती देव ।
कपटविद्येचें लाघव । अघटितज्यांचें ॥ ३२ ॥
३२) अशी ही राक्षसांची माया देवांनासुद्धा कळत नसे. राक्षसांचे कपटविद्येंतील प्राविण्य कल्पनेपलीकडील होते. 
मनुष्यांची बाजीगरी । राक्षसांची वोडंबरी ।
भगवंताची नाना परी । विचित्र माया ॥ ३३ ॥
३३) माणुस जें खोटे निर्माण करतो त्यास जादुगीरी, राक्षस जें खोटे निर्माण करतात त्यला वोडंबरी किंवा इंद्रजाल म्हणतात. तर भगवंतापासून जें खोटे निर्माण होतेत्यास माया म्हणतात. ही माया विचित्र आहे. ती अनेक प्रकार निर्माण करते.  
हे साचासारिखीच दिसे । विचारितांच नसे ।
मिथ्याची आभासे । निरंतर पाहातां ॥ ३४ ॥ 
३४) ही माया अगदी खर्‍याप्रमाणें दिसते. विचार केला तर नाहीशी होते. सारखी दिसत असल्यानें खोटी असूनही खर्‍याप्रमाणें भासते. 
साच म्हणावी तरी हे नासे । मिथ्या म्हणावी तरी हे दिसे ।
दोहीं पदार्थीं अविश्र्वासे। सांगतां मन ॥ ३५ ॥
३५) खरी मानावी तरी ही नाश पावते. खोटी म्हणावी तर प्रत्यक्ष दिसते. म्हणून मन ती खरी म्हटली तरी विश्र्वास ठेवत नाही व खोटी म्हटली तरी विश्र्वास ठेवत नाही. 
परंतु हे नव्हे साचार । मायेचा मिथ्या विचार ।
दिसतें हें स्वप्नाकार । जाण बापा ॥ ३६ ॥
३६) परंतु हें कांहीं खरें नाहीं मायेचा विचार म्हणजे खोट्याचा विचार आहे. हें सगळें दृश्य केवळ स्वप्नासारखें आहे. हें समजुन राहा.
तथापी असो तुजला । भासचि सत्य वाटला ।
तरी येथें चुका पडिला । ऐक बापा ॥ ३७ ॥
३७) हा दृश्य पसारा खरा नाहीं. तो भास आहे. असे समजावून सांगितलें तरी तुला तो भासच खरा वाटतो. असे कां होते तें तुला सांगतो.  
दृश्यभास अविद्यात्मक । तुझाहि देहो तदात्मक । 
म्हणौनि हा अविवेक । तेथें संचारला ॥ ३८ ॥ 
३८) दृश्याचा पसारा अविद्येने भरलेला आहे. तसाच आपला देहसुद्धां अविद्येंतच जन्मतो. त्यामुळें खोटे असणारे दृश्य खरें आहे. असा अविवेक आपल्यांत संचरतो.   
दृष्टीनें दृश्य देखिलें । मन भासावरी बैसलें ।
तरी तें लिंगदेह जालें । अविद्यात्मक ॥ ३९ ॥
३९) आपण डोळ्यांनी जी वस्तु पाहातो आपले मन त्या वस्तुचे रुप घेते. सूक्ष्म देहांत प्रतिमा तयार होते. अविद्येनें निर्माण केलेल्या वस्तुला धारण करणारा सूक्ष्म देहसुद्धा अविद्यामयच असतो. 
अविद्येनें अविद्या देखिली । म्हणोनि गोष्टि विश्र्वासली ।
तुझी काया अवघी संचली । अविद्येची ॥ ४० ॥
४०) पाहणारा दृष्टा अविद्यामय व पाहिलेलें दृश्यसुद्धा अविद्यामय असते. म्हणून द्रष्ट्याचा दृश्याच्या खरेपणावर विश्र्वास बसतो. आपला संपूर्ण देह आंतून बाहेरुन अविद्येने भरलेला आहे. 
तेचि काया मी आपण । हें देहबुद्धीचें लक्षण ।
येणें करितां जालें प्रमाण । दृश्य आवघें ॥ ४१ ॥
४१) तो देहच मी आहे असे समजणें हें देहबुद्धीचें लक्षण होय. या दृढ भावनेनें दृश्य बघितले म्हणजे तें खरें वाटते.
इकडे सत्य मानिला देहो । तिकडे दृश्य सत्य हा निर्वाहो ।
दोहींमधें माहां संदेहो । पैसावला बळें ॥ ४२ ॥
४२) देह खरा मानला. दृश्य खरें मानलें. यामुळें दोन्हीमध्यें वेगळेपणा निर्माण होऊन दृश्याबद्दल द्रष्ट्याच्या मनांत संशय जबरदस्तीने पसरतो. 
देहबुद्धि केली बळकट । आणी ब्रह्म पाहों गेला धीट ।
तों दृश्यानें रुधिली वाट । परब्रह्माची ॥ ४३ ॥
४३) आपली देहबुद्धी न सोडता आणखी बळकट करुन परब्रह्म पाहाण्याचा प्रयत्न केला तर असे आढळतें कीं परब्रह्माची वाट दृश्यानें अडविली आहे. 
तेथें साच मानी दृश्याला । निश्र्चयचि बाणोनि गेला ।
पाहा हो केवढा चुका पडिला । अकस्मात ॥ ४४ ॥
४४) आपण दृश्याला खरें मानून आत्मज्ञानाच्या क्षेत्रांत प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. हा केवढा घोटाळा झाला पाहा.
आतां असो हें बोलणें । ब्रह्म न पाविजे मीपणें ।
देहबुद्धीचीं लक्षणें । दृश्य भाविती ॥ ४५ ॥
४५) देहबुद्धीनेम, मीपणाने ब्रह्मप्राप्ती होईल हें शक्य नाही. परंतु हें बोलणें आतां पुरे. दृश्यावर खरेपणाचा विश्र्वास असणें हेंच देहबुद्धीचें लक्षण आहे. 
अस्तिचा देहीं मांषाचा डोळा । पाहेन म्हणे ब्रह्माचा गोळा ।
तो ज्ञाता नव्हे आंधळा । केवळ मूर्ख ॥ ४६ ॥
४६) आपला देह हाडांचा सापळा आहे. त्यामधें मांसाचा डोळा आहे. त्यानेम जो मी ब्रह्म पाहिन असें म्हणतो तो ज्ञानी नव्हे तर आंधळा व मूर्ख आहे. 
दृष्टीसि दिसे मनासि भासे । तितुकें काळांतरी नासे ।
म्हणोनि दृश्यातीत असे । परब्रह्म तें ॥ ४७ ॥
४७) दृष्टीला जेम दिसते व मनास जें भावते ते सर्व कांहीं काळाने नष्ट होणारे आहे. म्हणून परब्रह्म हे दृष्यापलीकडील आहे.
परब्रह्म तें शाश्वत । माया तेचि अशाश्वत । 
ऐसा बोलिला निश्र्चितार्थ । नाना शास्त्री ॥ ४८ ॥
४८) परब्रह्म हें शाश्वत आहे तर मायाही अशाश्वत आहे. असा निश्र्चित निर्णय नाना शास्त्रांनी सांगितला आहे. 
आतां पुढें निरुपण । देहबुद्धीचें लक्षण । 
चुका पडिला तो मी कोण । बोलिलें असे ॥ ४९ ॥  
४९) आतां पुढिल समासांत देहबुद्धीच्या लश्रणांचे निरुपण आहे. ज्याच्याबद्दल भ्रम निर्माण होऊन घोटाळा निर्माण झाला. तो मी कोण हें सांगितलें आहे.   
मी कोण हें जाणावें । मीपण त्यागूनि अनन्य व्हावें ।
मग समाधान तें स्वभावें । आंगीं बाणें ॥ ५० ॥
५०) मी कोण आहे हें जाणून घ्यावें. मगदेहाच्या मीपणाचा त्याग करुन खर्‍या मीशी एकरुप, अनन्य व्हावें. हें जर जमले तर समाधान लाभते.   
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दृश्यनिर्शननाम समास आठवा ॥
Samas Aathava Drushya Nirupan
समास आठवा दृश्यनिरुपण  


Custom Search

No comments: