Dashak Sahava Samas Navava SarShodhan
Samas Navava SarShodhan. It is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us that Brahma Dnyanana is in the Maya itself. We have to keep aside Maya and find out Brahma Dnyanan. It is possible by leaving in the company of Brahma Dnyani Guru. It is possible to acquire in this life also. How? It is described here.
समास नववा सारशोधन
श्रीराम ॥
गुप्त आहे उदंड धन । काये जाणती सेवक जन ।
तयांस आहे तें ज्ञान । बाह्याकाराचे ॥ १ ॥
१) एका श्रीमंताने पुष्कळ धन दडून ठेवलें. तें नोकरांना तें गुप्त धन माहिती नसते. घरांत, बाहेर दिसणारी संपत्तीच त्यांना माहित असते.
गुप्त ठेविलें उदंड अर्थ । आणी प्रगट दिसती पदार्थ ।
शाहाणे शोधिती स्वार्थ । अंतरीं असे ॥ २ ॥
२) पुष्कळ धन लपविलेले व बाहेर दिसणार्या वस्तु फारच थोडया. तसेंच दृश्य मायेच्या आंत असलेला खरा मी शहाणे शोधत असतात. हाच खरा स्वार्थ समजावा.
तैसें दृश्य हें माईक । पाहात असती सकळ लोक ।
परी जयांस ठाउका विवेक । ते तदंतर जाणती ॥ ३ ॥
३) हें मायेने व्याप्त सर्व जग लोक पाहात असतात. पण शहाणे लोक विवेकाने दृश्याच्या आंतील तें आत्मस्वरुप समजतात.
द्रव्य ठेऊन जळ सोडिलें । लोक म्हणती सरोवर भरलें ।
तयाचें अभ्यांतर कळलें । समर्थ जनासी ॥ ४ ॥
४) एका खड्यांत पाणी सोडले. लोकांना तें भरलेले तळें दिसते. पण जाणत्यांनाच त्या खड्याच्या तळाशी धन, द्रव्य ठेविलेले आहे तें समजते.
तैसे ज्ञाते ते समर्थ । तेहीं वोळखिला परमार्थ ।
इतर ते करिती स्वार्थ । दृश्य पदार्थाचा ॥ ५ ॥
५) त्याचप्रमाणें ज्या पुरुषांजवळ ज्ञान असते, त्यांना परमार्थ ओळखता येतो. पण अज्ञानी मात्र दृश्य पदार्थ साठविण्यांत आपला स्वार्थ समजतात.
काबाडी वाहाती काबाड । श्रेष्ठ भोगिती रत्नें जाड ।
हें जयाचें तयास गोड । कर्मयोगें ॥ ६ ॥
६) ओझीं वाहणारे लोक ओझी वाहण्यांत जन्म घालवितात. तर श्रेष्ठ पुरुष मौल्यवान रत्नांचा उपभोग घेतात. कर्मयोगानें हें ज्याचें त्यास योग्य वाटते.
येक काष्टस्वार्थ करिती । एक शुभा येकवाटिती ।
तैसे नव्हेत कीं नृपति । सारभोक्ते ॥ ७ ॥
७) कोणी पोटासाठी मोळ्या विकतो तर कोणी गोवर्या विकतो. पण राजे मात्र असे नसतात. ते वैभव भोगतात.
जयांस आहे विचार । ते सुकासनीं जाले स्वार ।
इतर जवळील भार । वाहातचि मेले ॥ ८ ॥
८) ज्यांच्याजवळ सारासार विचार असतो, ते स्वानंदाच्या सिंहासनावर स्वार होतात. ज्यांच्याजवळ हा विचार नसतो, ते दृश्य पदार्थांचे ओझे वाहण्यांतच जगतात व मरतात.
येक दिव्यान्नें भक्षिती । येक विष्ठा सावडिती ।
आपण वर्तल्याचा घेती । साभिमान ॥ ९ ॥
९) आत्मज्ञानी पुरुष जणूं उत्तम अन्न सेवन करीत असतात. तर अज्ञानी मात्र जणूंकाहीं विष्ठाच चिवडतात. तें जें करतात त्याचाच अभिमान बाळगतात.
सार सेविजे श्रेष्ठी । असार घेयिजे वृथापृष्टीं ।
साराअसाराची गोष्टी । सज्ञान जाणती ॥ १० ॥
१०) जें खरोखर श्रेष्ठ आहेत, त्यांनी सारच सेवन करीत असावें. आळशीं व ऐतखाऊं लोकांनीं असार सेवन करावें. सार व असार ह्याचे ज्ञान फक्त सज्ञानी लोकच जाणतात.
गुप्त परीस चिंतामणी । प्रगट खडे कांचमणी ।
गुप्त हेमरत्नखाणी । प्रगट पाषाण मृत्तिका ॥ ११ ॥
११) परिस व चिंतामणी ही मौल्यवान रत्नें गुप्त असतात. तर खडे व काचेचे मणी मात्र कोठेही पडलेले असतात. सोन्याच्या व रत्नांच्या खाणी गुप्त असतात. तर दगड व माती कोठेंही पडलेले असतात.
अव्हाशंख अव्हावेल । गुप्त वनस्पति अमोल ।
येरंड धोत्रे बहुसाल । प्रगट सिंपी ॥ १२ ॥
१२) उजव्या बाजूला तोंड असलेला शंख किंवा उजव्या बाजूनें वाढणारा वेल किंवा दिव्य वनस्पति गुप्त असतात. तर एरंड, धोत्रा व शिंपला ही मात्र सगळीकडे असतात.
कोठे दिसेना कल्पतरु । उदंड सेरांचा विस्तारु ।
पाहातां नाहीं मळियागरु । बोरि बाभळा उदंडी ॥ १३ ॥
१३) शेराची झाडे बरीच असतात. कल्पतरु मात्र कोठेंच आढळत नाही. चंदनाचे झाड शोधून सापडत नाही. बोरी-बाभळीची झाडे मात्र इकडेतिकडे सर्वत्र आढळतात.
कामधेनु जाणिजे इंद्रें । सृष्टींत उदंड खिल्लारें ।
महद्भाग्य भोगिजे नृपवरें । इतर कर्मानुसार ॥ १४ ॥
१४) जगांत गाई पुष्कळ आहेत. कामधेनु मात्र इंद्रापाशींच आहे. एकटा राजा हार मोठें भाग्य भोगतो. इतर लोक मात्र आपापल्या कर्मानुसार भोगतात.
नाना व्यापार करिती जन । आवघेचि म्हणती सकांचन ।
परंतु कुबेराचें महिमान । कोणासीचि न ये ॥ १५ ॥
१५) जगांत नाना प्रकारचे व्यापार व्यापारी आहेत. ते सगळे धनिक म्हणविले जातात. मात्र कुबेरासारखा श्रीमंत कोणी कधीच होत नाही.
तैसा ज्ञानी योगेश्र्वर । गुप्तार्थलाभाचा ईश्र्वर ।
इतर ते पोटाचे किंकर । नाना मतें धुंडिती ॥ १६ ॥
१६) तो ज्ञानी आहे, योगेश्र्वर आहे. गुप्त असलेले परमात्मरुपी धन मिळवितो. बाकीचे सर्व पोटभरु केवळ मतमतांतरें शोधित बसतात.
तस्मात सार ते दिसेना । आणी असार तें दिसे जना
सारासार विवंचना । साधु जाणती ॥ १७ ॥
१७) त्यामुळे सार किंवा गुप्त परमार्थ ज्ञान दिसत नाही. केवळ असारच, पोटभरु ज्ञानच लोकांना दिसते. सार व असार सार शोधून काढणें केवळ साधु जनांनाच माहित असते.
इतरांस हें काये सांगणें । खरें खोटें कोण जाणे ।
साधुसंतांचि खुणे । साधुसंत जाणती ॥ १८ ॥
१८) सामान्य जनांना हें सांगुन उपयोग नाही. त्यांना खरेखोटे समजत नाही. साधुसंतच त्या खुणा जाणूं शकतात.
दिसेना जें गुप्त धन । तयासि करणें लागे अंजन ।
गुप्त परमात्मा सज्जन- । संगतीं शोधावा ॥ १९ ॥
१९) गुप्त असलेले धन डोळ्यांत अंजन घातल्यावर दिसते. तसेच दृश्यामध्यें गुप्त असलेले परमार्थ ज्ञान ज्ञानी साधुसंतांच्या संगतींतच प्राप्त होते. म्हणुन सत्संगती धरावी.
रायाचे सन्निध होतां । सहजचि लाभे श्रीमंतता ।
तैसा हा सत्संग धरितां । सद्वस्तु लाभे ॥ २०॥
२०) राजाच्या नजिकतेमुळे सामान्याला श्रीमंती, मान मिळतो. तसाच सत्संग धरिला तर सद्वस्तुचा- आत्मस्वरुप ज्ञानाचा लाभ होतो.
सद्वस्तुस लाभे सद्वस्तु । अव्यावेस्तासअव्यावेस्तु ।
पाहातां प्रशस्तास प्रशस्तु । विचाार लाभे ॥ २१ ॥
२१) ज्याला परमात्मवस्तुची तळमळ लागते त्याला ती मिळते. ज्याचें जीवन अव्यवस्थित त्याच्या जीवनांत गोंधळच असतो. थोर लोकांचा सहवास असेल तर मोठ्या विचारांचा लाभ होतो.
म्हणौनि हें दृश्यजात । आवघेंचि आहे अशाश्र्वत ।
परमात्मा अच्युत अनंत । तो या दृश्यावेगळा ॥ २२ ॥
२२) म्हणुन हें दृश्य विश्र्व विनाशी आहे. अच्चुत व अनंत परमात्मा याहून वेगळा आहे.
दृश्यावेगळा दृश्याअंतरी । सर्वात्मा तो सचराचरीं ।
विचार पाहातां अंतरीं । निश्र्चये बाणे ॥ २३ ॥
२३) तो परमात्मा दृश्याहून वेगळा असला तरी तो दृश्यामधेंच आहे. सर्व चराचरांत तो भरलेला आहे. सूक्ष्म विचार केल्यावर तो सर्वांच्या अंतर्यामी आहे असे निश्र्चयात्मकज्ञान होते.
संसारत्याग न करितां । प्रपंचउपाधी न सांडितां ।
जनामध्यें सार्थकता । विचारेंचि होये ॥ २४ ॥
२४) संसार व प्रपंचाच्या खटपटी न सोडतां केवळ विचारांच्या सामर्थ्यानें संसारांत राहूनच जन्माचे सार्थक करणारें आत्मज्ञान होते.
हें प्रचितीचें बोलणें । विवेकें प्रचित पाहाणें ।
प्रचित पाहे तें शाहाणे । अन्यथा नव्हे ॥ २५ ॥
२५) माझा स्वतःचा असा अनुभव मी तुम्हाला सांगितला. असा अनुभव घेऊन बघणारा शहाणा होय. अनुभव न घेणारा शहाणा नव्हे.
सप्रचित आणी अनुमान । उधार आणी रोकडें धन ।
मानसपूजा प्रत्यक्ष दर्शन । यांस महदांतर ॥ २६ ॥
२६) उधारी व रोकडा पैसा; मानसपूजा व प्रत्यक्ष दर्शन यांत जसा मोठा फरक आहे, तसाच फरक कल्पना व अनुभव यांत फरक आहे.
पुढें जन्मांतरीं होणार । हा तों अवघाच उधार ।
तैसा नव्हे सारासार । तत्काळ लाभे ॥ २७ ॥
२७) पुढें होणार्या जन्मांत ईश्र्वर दर्शन होणारच आहे. हा उधारीचा व्यवहार. पण सारासार विचारानें याच जन्मांत आत्मज्ञान प्राप्त होते.
तत्काळचि लाभ होतो । प्राणी संसारीं सुटतो ।
संशय अवघाचि तुटतो । जन्ममरणाचा ॥ २८ ॥
२८) सारासार विवेकानें आत्मज्ञान तत्काळ लाभते. संसारबंधनांतून व जन्ममरणाच्या फेर्यांतून मुक्तता होते. सर्व संशय मिटतात.
याचि जन्में येणेंचि काळें । संसारीं होईजे निराळे ।
मोक्ष पाविजे निश्र्चळें । स्वरुपाकारें ॥ २९ ॥
२९) याच जन्मांत व याच कालांत मनानें समसारांतून मोकळे व्हावे. स्वस्वरुपाशी एकरुप होऊन निश्र्चळ होऊन मोक्ष मिळवावा.
ये गोष्टीस करी अनुमान । तो सिद्धचि पावेल पतन ।
मिथ्या वदे त्यास आण । उपासनेची ॥ ३० ॥
३०) मी जें आतां सांगितलें त्यांत जो कोणी संशय घेईल तो सिद्ध असला तरी त्यापासून भ्रष्ट होईल. जो कोणी हें खोटे म्हणेल त्याला माझ्या उपासनेची शपथ आहे.
हें येथार्थचि आहे बोलणें । विवेकें सीघ्रचि मुक्त होणें ।
असोनी कांहींच नसणें । जनामधें ॥ ३१ ॥
३१) सारासार विवेकानें लचकर मुक्तहोतां येते हें माझें बोलणें अगदी बरोबर आहे. लोकांमधें राहून त्यांच्यांत नसल्याप्रमाणें वृत्ती ठेवता येते.
देवपद आहे निर्गुण । देवपदीं अनन्यपण ।
हाचि अर्थ पाहातां पूर्ण । समाधान बाणे ॥ ३२ ॥
३२) खरा देव म्हणजे परमात्मस्वरुप निर्गुण आहे. त्या स्वरुपाशी एकरुप होणे आवश्यक आहे. ह्या अर्थांत समजुत पटली कीं, समाधान अंगी बाणते.
देहींचाविदेह होणें । करुन कांहींच न करणें ।
जीवन्मुक्तांचीं लक्षणें । जीवन्मुक्त जाणे ॥ ३३ ॥
३३) देहांत राहून देह नसल्यासारखीं वृत्ती ठेवणें आणि पुष्कळ कर्में करुन कांहींच न केल्यासारखें वर्तन असणें हीं जीवनमुक्ताची लक्षणें जीवनमुक्तच जाणतो.
येरवीं हें खरें न वटे । अनुमानेंचि संदेह वाटे ।
संदेहाचें मूळ तुटे । सद्गुरुवचनें ॥ ३४ ॥
३४) एरव्हीं हें खरें वाटत नाही. केवळ ानुभव नाहीं त्यामुळें कल्पनेबद्दल संशय वाटतो. पण हा संशय सद्गुरुवचनांवर विश्र्वास ठेवल्यास मूळापासून नष्ट होतो.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सारशोधननाम समास नववा ॥
Samas Navava SarShodhan
समास नववा सारशोधन
Custom Search
No comments:
Post a Comment