Dashak Satava Samas Chavatha VimalBrahma Nirupan
Samas Chavatha VimalBrahma Nirupan, It is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is describing VimalBrahma. Vimal means Shudha Brahma, it is everywhere but we can’t see it nor experience it because we are engulfed by Maya.
समास चवथा विमलब्रह्म निरुपण
श्रीराम ॥
ब्रह्म नभाहून निर्मळ । पाहातां तैसेंचि पोकळ ।
अरुप आणी विशाळ । मर्यादेवेगळें ॥ १ ॥
१) ब्रह्म आकाशाहून मलरहित आहे. पाहायाला गेलो तर तें आकाशासारखें पोकळ, कोणतेंही रुप नसलेले आणि मर्यादा नसलेले असे विशाळ आहे.
येकविस स्वर्गे सप्त पाताळ । मिळोन एक ब्रह्मगोळ ।
ऐसीं अनंत तें निर्मळ । व्यापून असे ॥ २ ॥
२) एकवीस स्वर्ग व सात पाताळ मिळून एक ब्रह्मगोल होतो. अशा अनेक ब्रह्मगोलांना या निर्मळ ब्रह्मानें व्यापून टाकले आहे.
अनंत ब्रह्मांडांखालतें । अनंत ब्रह्मांडांवरुतें ।
तेणेंविण स्थळ रितें । अणुमात्र नाहीं ॥ ३ ॥
३) अनंत ब्रह्मांडांच्या वर आणी अनंत ब्रह्मांडांच्या खालीं जिकडे तिकडे ब्रह्म पसरले आहे. जेथें ब्रह्म नाही अशी कोठेही रीकामी जागा नाही.
जळीं स्थळीं काष्ठीं पाषाणीं । ऐसी वदे लोकवाणी ।
तेणेंविण रिता प्राणी । येकहि नाहीं ॥ ४ ॥
४) लोक म्हणतात कीं, जळीं, स्थळीं, काष्ठीं व पाषाणी ब्रह्म व्यापून आहे. ब्रह्म नाहीं असा एकही प्राणी नाही.
जळचरांस जैसें जळ । बाह्याभ्यांतरीं निखळ ।
तैसें ब्रह्म हें केवळ । जीवमात्रांसी ॥ ५ ॥
५) समुद्रामधें जळचरांना पाणी जसें आंत बाहेर व्यापून असते, त्याचप्रमाणें सर्व जीवांना ब्रह्म हें आंतबाहेर व्यापून आहे.
जळावेगळा ठाव आहे । ब्रह्माबाहेरी जातां नये ।
म्हणौनि उपमा न साहे । जळाची तया ॥ ६ ॥
६) पाण्याची उपमा ब्रह्माला देता येत नाही कारण पाण्याला मर्यादा आहे. ते संपले की जमीन असते. पण ब्रह्माचे तसे नाही. ब्रह्म कोठेंच संपत नाही. ब्रह्माला ओलांडून पलीकडे जाता येत नाही.
आकाशाबाहेरी पळों जातां । पुढें आकाशचि तत्वता ।
तैसें तयां अनंता । अंतचि नाहीं ॥ ७ ॥
७) आकाशाच्या पलीकडे जावें असे कोणाला वाटलें व तो पळत निघाला तरी तो जिकडे जाईल तिकडे त्याच्यापुढें त्याला आकाश दिसते. त्याचप्रमाणें अनंत ब्रह्माला कोठे अंतच नाही.
परी जें अखंड भेटलें । सर्वांगास लिगटलें ।
अति निकट परी चोरलें । सकळांसि जें ॥ ८ ॥
८) जन्मापासूनच तें आपल्या अंगाला चिकटलेले आहे. इतकें जवळ असूनही तें सर्वांच्यापासून लपून राहीलेले आहे.
तयामधेंचि असिजे । परी तयास नेणिजे ।
उमजे भास नुमजे । परब्रह्म तें ॥ ९ ॥
९) आपण सर्व त्या ब्रह्मांतच असतो. पण त्यामधें आहोत याची जाणीव आपल्याला नसते. भ्रमानें निर्माण होणारा भास समजतो पण ज्याच्यामुळें हा भास निर्माण होतो ते ब्रह्म समजत नाही.
आकाशामधें आभाळ । तेणें आकाश वाटे डहुळ ।
परी तें मिथ्या निवळ । आकाशचि असे ॥ १० ॥
१०) आकाशांत ढग येतात त्यामुळें तें मलिन झाल्यासारखे वाटते. पण ढगांमुळें आलेला मलिनपणा आकाशाला चिकटत नाही. ढग गेल्यावर आकाश परत जसें तसेंच असते व दिसते. तसाच संबंध ब्रह्म व विश्र्व यामधें आहे.
नेहार देतां आकाशीं । चक्रें दिसती डोळ्यांसी ।
तैसे दृश्य ज्ञानियांसी । मिथ्यारुप ॥ ११ ॥
११) आकाशाकडे सारखें टक लावून पाहिलें तर डोळ्यापुढें प्रकाशाची चक्रें दिसतात. तीं कांहीं खरी नसतात. त्याचप्रमाणें अज्ञानी माणसांच्या अनुभवाला येणारे दृश्यविश्र्व ज्ञानी पुरुषांना त्यांच्या अनुभवानें खोटेपणाने प्रतीत होते.
मिथ्याचि परी आभासे । निद्रिस्तांस स्वप्न जैसें ।
जाग जालियां अपैसें । बुझों लागे ॥ १२ ॥
१२) दृश्य खोटें म्हटलें तरी इंद्रियांना ते दिसते. पण माणसाला झोपेंत स्वप्न पडते. झोपेंत त्या स्वप्नांतील सर्व त्याला खरेच वाटते. पन जागें झाल्यावर स्वप्न व ती दृश्यें खरी नाहीत, नव्हती हें त्याला समजते.
तैसें आपुलेन अनुभवें । ज्ञानें जागृतीसि यावें ।
मग माईक स्वभावें । कळों लागे ॥ १३ ॥
१३) ह्याचप्रमाणें जो स्वस्वरुपाचा अनुभव घेतो त्यास आत्मज्ञान होते. त्या ज्ञानाने त्याची अज्ञानरुपी नीद्रा जाते. मग त्याला दृश्य विश्र्व खरें नसून माईक आहे. हे कळूं लागते.
आतां असो हें कुवाडें । जे ब्रह्मांडापैलिकडे ।
तेंचि आतां निवाडें । उमजोन दाऊं ॥ १४ ॥
१४) आतां ही गहन व दुर्बोध भाषा पुरे. ब्रह्मांडाला व्यापून उरणारे जें परब्रह्म तें उमजेल असें सांगतो.
ब्रह्म ब्रह्मांडीं कालवलें । पदार्थासी व्यापून ठेलें ।
सर्वांमधें विस्तारलें । अंशमात्रें ॥ १५ ॥
१५) ब्रह्म ब्रह्मांडांमधे कालवलेले आहे. सर्व पदार्थांस व्यापून आहे. सर्वांत पसरलेले असले तरी तो पसारा अंशमात्रेंच आहे.
ब्रह्मामधें सृष्टी भासे । सृष्टीमधें ब्रह्म असे ।
अनुभव घेतां आभासे । अंशमात्रें ॥ १६ ॥
१६) त्या ब्रह्मांत सर्व विश्र्व मावते. तसेंच सर्व विश्र्वांतही ते व्यापून आहे. मात्र त्याचा अनुभव घ्यावा तर तें अंशमात्रेच आहे. असा अनुभव येतो.
अंशमात्रे सृष्टीभीतरीं । बाहेरी मर्यादा कोण करी ।
सगळें ब्रह्म ब्रह्मांडोदरी । माईल कैसें ॥ १७ ॥
१७) या अवाढव्य विश्र्वामधें ब्रह्म जर अल्प अंशमात्रेच आहे. तर विश्र्वाच्याबाहेर तें किती आहे ह्याचे मोजमाप कोण करेल? तें अपरंपार, अनंत ब्रह्म एवढ्याशा विश्वांच्या पोटांत मावेलच कसें.
अमृतीमधें आकाश । सगळें सांठवतां प्रयास ।
म्हणौन तयाचा अंश । बोलिजेतो ॥ १८ ॥
१८) देवाचें तीर्थ ठेवण्याच्या छोट्या चंबूमध्यें सगळें आकाश साठवण्याचा प्रयत्न वाया जातो. तसें करतां येत नाही. त्याचप्रमाणें विश्र्वामधें संपूर्ण ब्रह्म सामावून घेण्याचा प्रयत्न व्यर्थ जातो. म्हणून विश्र्वामध्यें ब्रह्माचा अंश व्यापून आहे असे म्हणालो.
ब्रह्म तैसें कालवलें । परी तें नाहीं हालवलें ।
सर्वांमधें परी संचले । संचलेपणें ॥ १९ ॥
१९) सर्व पदार्थांत ब्रह्म मिसळले आहे. तें अखंड स्थिर आहे. तें कधीं हललेच नाही. तें इतके घट्टपणें सांचलेले आहे की त्यास हलणें शक्य नाही.
पंचभूतीं असे मिश्रित । परंतु तें पंचभूतातीत ।
पंकीं आकाश अलिप्त । असोनि जैसें ॥ २० ॥
२०) पंचभूतामध्यें तें मिसळले आहे. पण त्यांना चिकटलेलें नाही. जसेंकी चिखलामध्यें आकाश दिसते पण आकाशाला चिखल चिकटत नाही.
ब्रह्मास दृष्टांत न घडे । बुझावया देणें घडे ।
परी दृष्टांतीं साहित्य पडे । विचारितां आकाश ॥ २१ ॥
२१) ब्रह्म कसे आहे हे सांगण्यास कोणताही दृष्तांत योग्य वाटत नाही. परंतु तें कसें आहे याची थोडी कल्पना येण्यासाठीं दृश्य विश्र्वांतील दृष्टांत द्यावा लागतो. त्यासाठीं वाङ्मयाची मदत घ्यावी लागते. त्या दृष्टीनें विचार करता आकाशाचा दृष्टांत देऊन ब्रह्मस्वरुप सांगण्याचा प्रयत्न करावा लागतो.
खंब्रह्म ऐसी श्रुती । गगनसदृशं हे स्मृती ।
म्हणौनि ब्रह्मास दृष्टांतीं । आकाश घडे ॥ २२ ॥
२२) खंब्रह्म म्हणजे आकाश हे ब्रह्म असें श्रुति सांगते. श्रुतिनें तसे सांगितल्यानें ब्रह्माला आकाशाचा दृष्टांत देतात.
काळिमा नस्तां पितळ । मग तें सोनेंचि केवळ ।
सुन्यत्व नस्तां निवळ । आकाश ब्रह्म ॥ २३ ॥
२३) पितळाच्या पिवळेपणांत किंचीत काळसरपणा नसतां तर तें पितळ नसून सोनेंच आहे असे म्हटले असते. तसेंच आकाश हें ब्रह्मासारखेंच सूक्ष्म व विशाळ आहे. पण आकाशांत शून्यत्व असतें तेंच ब्रह्मामध्यें नसते. नाहींतर आकाश ब्रह्मस्वरुपच झालें असते.
म्हणौनि ब्रह्म जैसें गगन । आणि माया जैसा पवन ।
आडळे परी दर्शन । नव्हे त्याचें ॥ २४ ॥
२४) ब्रह्म आकाशासारखें आहे व माया वायुसारखी आहे असे म्हणतात. वायु आहे पण तो प्रत्यक्ष दिसत नाही. त्याचप्रमाणे मायेचा प्रभाव दिसतो पण माया दिसत नाही.
शब्दसृष्टीची रचना । होत जात क्षणक्षणा ।
परंतु ते स्थिरावेना । वायुच ऐसी ॥ २५ ॥
२५) शब्दसृष्टींत सारखी रचना बदलत असते. कारण लोक सारखें शब्द बोलत असतात. पण ही शब्दसृष्टी अशाश्वत असते. वायुला जशी स्थिरता नसते तशीच शब्दसृष्टीला पण स्थिरता नसते.
असो ऐसी माया माईक । शाश्वत तें ब्रह्म येक ।
पाहों जातां अनेक । व्यापून आहे ॥ २६ ॥
२६) मायासुद्धा अशीच अस्थिर व अशाश्वत असते. फक्त ब्रह्म तेवढें शाश्वत आहे. एकच ब्रह्म अनेकांना व्यापून आहे असे सूक्ष्म दृष्टीनें पाहातां आढळतें.
पृथ्वीसी भेदून आहे । परी तें ब्रह्म कठीण नव्हे ।
दुजी उपमा न साहे । तया मृदत्वासी ॥ २७ ॥
२७) जड पृथ्वीला भेदून तिच्यात राहणारे ब्रह्म पृथ्वीसारखें जड नाही. किंबहुना तें इतकें सूक्ष्म आहे कीं त्याच्या इतकें सूक्ष्म अजुन कांहींच नाही.
पृथ्वीहूनि मृद जळ । जळाहूनि तो अनळ ।
अनळाहूनि कोमळ । वायो जाणावा ॥ २८ ॥
२८) पृथ्वीपेक्षां सूक्ष्म पाणी असते. पाण्यापेक्षां तेज सूक्ष्म असते. तेजाापेक्षां वायु सूक्ष्म असतो.
वायोहूनि तें गगन । अत्यंतचि मृद जाण ।
गगनाहून मृद पूर्ण । ब्रह्म जाणावें ॥ २९ ॥
२९) वायुपेक्षा आकाश अत्यंत सूक्ष्म असते. आणि आकाशाहून ब्रह्म सूक्ष्म असते. या सूक्ष्म ब्रह्मास पाहण्यास जीवही अती सूक्ष्म व्हावा लागतो. त्यावेळीं त्याला ब्रह्मस्वरुपाचा अनुभव होण्याची पात्रता येते.
वज्रास असे भेदिलें । परी मृदत्व नाहीं गेलें ।
उपमेरहित संचलें । कठिण ना मृद ॥ ३० ॥
३०) वज्र अति कठीण पण त्यासही ब्रह्म भेदून जाते. तरीही ब्रह्माचे सूक्ष्मपण कमी होत नाही. खरें म्हणजे ब्रह्माला उपमा देता येत नाही. तें जड किंवा सूक्ष्म नसून सर्व ठिकाणीं भरलेले आहे.
पृथ्वीमधें व्यापून असे । पृथ्वी नासे तें न नासे ।
जळ शोषे तें न शोषे । जळीं असोनी ॥ ३१ ॥
३१) ब्रह्म पृथ्वीला आंतून बाहेरुन व्यापून आहे. परंतु पृथ्वीचा नाश झाला तरी त्याला नाश नाही. ब्रह्म पाण्याला व्यापून आहे. पण पाणी शोषलें जाते, नाश पावते. पण ब्रह्म शोषलेही जात नाही व त्याचा नाशपण होत नाही.
तेजीं असे परी जळेना । पवनीं असे परी चळेना ।
गगनीं असे परी कळेना । परब्रह्म तें ॥ ३२ ॥
३२) ब्रह्म तेजाला व्यापून असते. पण तेजानें तें जळत नाही. ब्रह्म वायूला व्यापून असते. पण वायूसारखें तें चळत नाही. ब्रह्म आकाश व्यापून असते पण तें आपल्याला कळत नाही.
शेरीर अवघें व्यापलें । परी तें नाहीं आडळलें । जवळिच दुरावलें । नवल कैसें ॥ ३३ ॥
३३) आपल्या सर्व शरीरभर ब्रह्म त्याला व्यापून आहे. परंतु तें आपल्याला आढळत नाही. तें इतकें जवळ असून फार दूर झाले हें नवलच आहे.
सन्मुखचि चहुंकडे । तयामधें पाहाणें घडे ।
बाह्याभ्यांतरीं रोकडें । सिद्धचि आहे ॥ ३४ ॥
३४) सगळीकडे चारी दिशांना ब्रह्म समोरच असते. आपले पाहाणे व इतर सर्व गोष्टी ब्रह्मांतच घडतात. आंतून व बाहेरुन व्यापून असलेले ब्रह्म स्वयंसिद्ध आहे.
तयामधेंचि आपण । आपण सबाह्य तें जाण ।
दृशावेगळी खूण । गगनासारिखी ॥ ३५ ॥
३५) आपण ब्रह्मामधेंच जगतों व राहातों. आपल्या आंत बाहेर तेंच आहे. अवकाशांतील सर्व दृश्य विलीन केल्यावर जें केवळ निव्वळ आकाश उरतें तसें ब्रह्म आहे. हे खूणेनेच समजावे.
कांहीं नाहींसें वाटलें । तेथेंचि तें कोंदाटलें ।
जैसें न दिसे आपलें । आपणासि धन ॥ ३६ ॥
३६) इथें कांहीं नाही असे जेथें वाटते तेथेंच ब्रह्म पुष्कळ भरलेले असते. आपण स्वतः बाजूला ठेवलेले धन आपल्याला दिसत नाही. तसेंच ब्रह्माच्या बाबतींत घडून येते.
जो जो पदार्थ दृष्टी पडे । तें त्या पदार्था ऐलिकडे ।
अनुभवें हें कुवाडें । उकलावें ॥ ३७ ॥
३७) जी जी गोष्ट आपण पाहातों ती दृष्टीस पडण्या आधी मध्यें ब्रह्म असते. स्थूल दृष्टीस ब्रह्म न दिसणारे असल्यानें स्वरुपानुभावेंच तें कोडे उलगडून घ्यावें
मागें पुढें आकाश । पदार्थेंविण जो पैस ।
पृथ्वीविण भकास । येकरुप ॥ ३८ ॥
३८) सर्व पदार्थांना आकाश मागेंपुढें व्यापून असते. सर्व पदार्थ समजा नाहींसे झालें तरी अवका उरेल. त्यांतच पृथ्वीही नाहीशी झाली तर सगळीकडे ओसाड पोकळी दिसेल.
जें जें रुप आणी नाम । तो तो नाथिलाच भ्रम ।
नामरुपातीत वर्म । अनुभवी जाणे ॥ ३९ ॥
३९) इंद्रियांना दिसणारा नामरुपांचा आकार मुळांतच नसणारा भ्रम आहे. नामरुपांच्या पलीकडे असलेले ब्रह्मरुप रहस्य साक्षात्कारीच जाणतात.
नभीं धूम्राचे डोंगर । उचलती थोर थोर ।
तैसें दावी वोडंबर । माया देवी ॥ ४० ॥
४०) आकाशामध्यें मोठमोठे धुराचे डोंगर दिसतात. पण तें सगळें तात्पुरतें असतात. आकाशाला त्यांचा स्पर्श होत नाही. त्याचप्रमाणें शुद्ध ब्रह्मांमधें मायेने विश्र्वाचे अवडंबर आढळतें.
ऐसी माय अशाश्वत । ब्रह्म जाणावें शाश्वत ।
सर्वां ठाईं सदोदित । भरलें असे ॥ ४१ ॥
४१) अशा रीतीनें माया अशाश्वत असून ब्रह्म मात्र शाश्वत आहे. ते सर्वत्र सर्व ठिकांणी कायम भरलेलें आहे.
पोथी वाचूं जातां पाहे । मातृकांमधेंचि आहे ।
नेत्रीं निघोनि राहे । मृदपणें ॥ ४२ ॥
४२) ग्रंथ, पोथी वाचीत असतां ब्रह्मच वाचत असतें. अक्षरांतील कानामात्रांमधें तेंच असते. सूक्ष्मपणें डोळ्यांत राहून पाहण्याची क्रिया तेंच करतें.
श्रवणें शब्द ऐकतां । मनें विचार पाहातां ।
मना सबाह्य तत्वता । परब्रह्म तें ॥ ४३ ॥
४३) कानानें शब्द ऐकतां, मनानें विचार करीत असतां, मनाच्या आंतबाहेर खरोखर ब्रह्मच असतें.
चरणें चालतां मार्गीं । जें आडळे सर्वांगीं ।
करें घेतां वस्तुलागीं । आडवें ब्रह्म ॥ ४४ ॥
४४) पायांनी वाट चालत असतां ब्रह्म सर्व शरीरांत व्यापून असते. हातांनीं वस्तु घेत असतां त्या वस्तुला व्यापून ब्रह्मच येतें.
असो इंद्रियेंसमुदाव । तयामधें वर्ते सर्व ।
जाणों जातां मोडे हांव । इंद्रियांची ॥ ४५ ॥
४५) आपल्या सर्व इंद्रियांना आंतबाहेर ब्रह्मच व्यापून आहे. त्यामध्यें इंद्रियांची सर्व कामें होत असतात. परंतु इंद्रियांनी ते जाणण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा हव्यास मोडून जातो. ब्रह्म अतिद्रिय असल्यानें इंद्रियांची गति खुंटते.
तें जवळिच असे । पाहों जातां न दिसे ।
न दिसोन वसे । कांहीं येक ॥ ४६ ॥
४६) ब्रह्म आपल्या अगदीं जवळच आहे. परंतु तें पहावें म्हटलें तर दिसत नाही. तरी न दिसतासुद्धा त्याच्या असण्यांत फरक पडत नाही. तें असतेंच
जें अनुभवेंचि जाणावें । सृष्टीचेनि अभावें ।
आपुलेन स्वानुभवें । पाविजे ब्रह्म ॥ ४७ ॥
४७) प्रथम हें सारें दृश्य विश्र्व मनांतून नाहीसें झालें पाहिजे. आपल्या देहासकट सर्व दृश्य सृष्टी सत्य नाहीं अशी खात्री झाली म्हणजे ब्रह्माचा अनुभव येण्याची पात्रता अंगीं येते. त्यानंतर ब्रह्माचा साक्षात्कार होतो व जीव ब्रह्मरुप होऊन जातो.
ज्ञानदृष्टीचें देखणें । चर्मदृष्टी पाहो नेणे ।
अंतरवृत्तीचिये खुणे । अंतरवृत्ती साक्ष ॥ ४८ ॥
४८) ज्ञानदृष्टीनेंच ब्रह्म जाणता येते. त्याला जाणण्यासाठीं आपली स्थूल दृष्टी उपयोगी पडत नाही. अंतरंगांत वृत्ती अत्यंत सूक्ष्म बनणें ही ज्ञानदृष्टीची खूण आहे. आणि हे ज्याचे त्यालाच अंतरंगांत समजते.
जाणे ब्रह्म जाणे माया । जाणे अनुभवाच्या ठाया ।
ते येक जाणावी तुर्या । सर्वसाक्षिणी ॥ ४९ ॥
४९) जागृती, स्वप्न व सुषुप्ति या तीन अज्ञानवृत्तीच्या अवस्था आहेत. चवथी अवस्था तुर्या ही ज्ञानवृत्तीची अवस्था आहे. तुर्या अवस्थेंमध्यें एकीकडे ब्रह्माचे भान असते तर दुसरीकडे दृश्य विश्र्वाचे देखील भान असते. स्वानुभव येण्यासाठीं वृत्ति कोठें ठेववी हें तुर्येमधें बरोबर समजते. ती सर्वसाक्षीणी अवस्था आहे.
साक्षत्व वृत्तीचें कारण । उन्मनी ते निवृत्ति जाण ।
जेथें विरे जाणपण । विज्ञान तें ॥ ५० ॥
५०) " मी आत्मा सर्व दृश्याच्या अतीत आहें, मी केवळ त्याचा साक्षी आहे अशी अवस्था असली तरी तिच्यामध्यें साक्षित्वाची सूक्ष्म वृत्ती असते. साक्षित्व मावळून ती वृत्तीसुद्धां विलीन झाली म्हणजे उन्मनी अवस्था प्राप्त होते. संपूर्ण वृत्तीरहित अवस्था म्हणजे उन्मनी होय. त्या निवृत्ती अवस्थेंमध्यें सर्व जाणतेपण विरते. तेंच विज्ञान होय.
जेथें अज्ञान सरे । ज्ञान तेंहि नुरे ।
विज्ञानवृत्ती मुरे । परब्रह्मीं ॥ ५१ ॥
५१) प्रथम अज्ञान नाहींसे होऊन ज्ञान उदय पावतें. पुढें ज्ञान नाहींसे होऊन विज्ञान येते. अखेर विज्ञान देखील परब्रह्मामतजिरतें. मग केवळ शुद्ध व विमळ ब्रह्म तेवढें शिल्लक उरते.
ऐसें ब्रह्म शाश्वत । जेथें कल्पनेसी अंत ।
योगी जना येकांत । अनुभवें जाणावा ॥ ५२ ॥
५२) असें हें शाश्वत ब्रह्म आहे. तेथें सर्व कल्पना नाहींशा होतात. योगी लोकांचा हा एकान्त आहे. तो अनुभवानें आपण समजून घ्यावा.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विमळब्रह्मनिरुपणनाम समास चवथा ॥
Samas Chavatha VimalBrahma Nirupan
समास चवथा विमलब्रह्म निरुपण
Custom Search
No comments:
Post a Comment