Dashak Sahava Samas Sahava Shrusthi Kathan
Samas Sahava Shrusthi Kathan. It is in Marathi. Samartha Ramdas is telling us about Vishwa or Shrusthi that which is visible but not permanent and the Brahma that which is invisable but it is permanent. What we see is not real and permanent and that is called as Shrusthi.
समास सहावा सृष्टिकथन
श्रीराम ॥
सृष्टीपूर्वीं ब्रह्म असे । तेथें सृष्टि मुळींच नसे ।
आतां सृष्टि दिसत असे । ते सत्य किं मिथ्या ॥ १ ॥
१) सृष्टिपूर्वीं ब्रह असतें. तेव्हां विश्र्वाचा सृष्टिचा मागमूस नसतो. नंतर तेथें विश्र्व दिसते. हें खरें कीं खोटे? श्रोत्यानें वक्त्यास विचारले.
तुम्ही सर्वज्ञ गोसांवी । माझी आशंका फेडावी ।
ऐसा श्रोता विनवी । वक्तयासी ॥ २ ॥
२) स्वामी तुम्ही सर्व जाणता. माझ्या या शंकेचे निरसन करावें. अशी श्रोत्यानें वक्त्याला विनंति केली.
आतां ऐका प्रत्योत्तर । कथेसि व्हावें तत्पर ।
वक्ता सर्वज्ञ उदार । बोलता जाला ॥ ३ ॥
३) वक्त्यानें सांगितले. आतां याचे उत्तर तत्परतेने ऐका. मग उदार व सर्व जाणणारा वक्ता बोलूं लागला.
जीवभूतः सनातन । ऐसें गीतेचें वचन ।
येणें वाक्यें सत्यपण । सृष्टीस आलें ॥ ४ ॥
४) या संसारांत माझाच (परमात्मस्वरुपाचा) सनातन अंश जीव झाला आहे. असें गीतेचे वचन आहे. या वचनाने जग, विश्र्व खरे आहे.
यद् दृष्टं तन्नष्टं येणें । वाक्य सृष्टी मिथ्यापणें ।
सत्य मिथ्या ऐसें कोणें । निवडावें ॥ ५ ॥
५) पण जें दिसते तें नासते म्हणजे नाश पावते. या वचनानें जग खोटे ठरते. हे खरें, खोटेंपण कोणी ठरवावे?
सत्य म्हणे तरी नासे । मिथ्या म्हणों तरी दिसे ।
आतां जैसें आहे तैसें । बोलिजेल ॥ ६ ॥
६) विश्र्व सत्य म्हणावे तरी तें नासते हें नाकारता येत नाही. आणि विश्र्व खोटे म्हणावें तरी तें दिसते. म्हणून तें जसें खरोखर आहे. तसेंच आतां सांगतो.
सृष्टीमध्यें बहुजन । अज्ञान आणि सज्ञान ।
म्हणौनियां समाधान । होत नाहीं ॥ ७ ॥
७) विश्र्वामधें कितीतरी माणसें आहेत. कांहीं ज्ञानी तर कांहीं अज्ञानी आहेत. त्यांची मतेम भिन्नभिन्न आहेत त्यामुळें समाधान होत नाही.
ऐका अज्ञानाचें मत । सृष्टि आहे ते शाश्वत ।
देव धर्म तीर्थ व्रत । सत्यचि आहे ॥ ८ ॥
८) अज्ञानी काय म्हणतात. तें ऐका सृष्टि ही शाश्वत आहे. तसेंच देव, धर्म, तीर्थ व व्रतें हीं सत्यच आहेत.
बोले सर्वज्ञाचा राजा । मूर्खस्य प्रतिमापूजा ।
ब्रह्मप्रळयाच्या पैजा । घालूं पाहे ॥ ९ ॥
९) सर्व जाणणारांचा मुख्य म्हणतो कीं, मूर्खांसाठी मूर्तिपूजा आहे. प्रलयकाळींसुद्धा जें जसेंच्या तसे राहाते तें ब्रह्म. स्वानुभवाच्या जोरावर तो पैजा मारण्यास तयार होतो.
तंव बोले तो अज्ञान । तरी कां करिसी संध्यास्नान ।
गुरुभजन तीर्थाटण । कासया फिरावें ॥ १० ॥
१०) हें ऐकून अज्ञानी विचारतो. विश्र्व जर खोटे आहे तर मग तूं स्नान संध्या का करतोस? गुरुभजन कां करतोस? तीर्थयात्रा करीत कां फिरतोस?
श्र्लोक
तीर्थे तीर्थे निर्मलं ब्रह्मवृंदं । वृंदे वृंदे तत्वचिंतानुवादः ।
वादे वादे जायते तत्वबोधः । बोधे बोधे भासते चंद्रचूडः ॥
निरनिराळ्या तीर्थांमध्यें ज्ञानी ब्राह्मनांचे समुदाय असतात. त्या समुदायांमध्ये तत्वज्ञानाची चर्चा चालते. त्यामधुन आत्म्याचे स्वरुप निश्र्चित समजते. त्यांतून शंकरांचे ज्ञान प्राप्त होते.
चंद्रचूडाचे वचन । सद्गुरुचें उपासन ।
गुरुगितानिरुपण । बोलिलें हरें ॥ ११ ॥
११) तें शंकराचे वचन आहे. त्यांत सद्गुरुची उपासना करण्यास सांगितले आहे. शंकरानेंच गुरुगीता सांगितली आहे.
गुरुसि कैसें भजावें । आधीं तयासि वोळखावें ।
त्याचें समादहान घ्यावें । विवेकें स्वयें ॥ १२ ॥
१२) गुरुचें भजन कां करावें? तर सर्व प्रथम त्याला शोधून काढावें, त्याला ओळखावें व त्याच्याजवळ आत्मज्ञानाचे समाधान असते तें विवेकानें त्याच्याकडून मिळवावे.
श्र्लोक
ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं ।
द्वंद्वातीतं गगनसदृशं ।
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं ।
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॥
सद्गुरु नेहमी ब्रह्मानंदाचे सुख घेत असतो. तो श्रेष्ठ सुख देतो. तो केवळ ज्ञानाचीच मूर्ति असतो. तो सुख-दुःख द्वंद्वाच्या पलीकडे असतो. तो नित्य, निर्मळ, एकरुप, पवित्र व अचल असतो. तो सर्वांच्या हृदयांत साक्षीरुपानें वास करतो. तो मानवी कल्पनांच्या पलीकडे गेलेला असतो. तो निर्गुण असल्यानें त्रिगुणरहित असतो. अशा सद्गुरुला मी नमस्कार करतो.
गुरुगीतेचें वचन । ऐसें सद्गुरुचें ध्यान ।
तेथें सृष्टिमिथ्याभान । उरेल कैंचें ॥ १३ ॥
१३) हें गुरुगीतेचे वचन आहे. त्यामध्यें सद्गुरुचे वर्णन अशाप्रकारचे केले आहे. त्या स्वरुपाचे ध्यान केल्यावर सर्व दृश्य मावळते. मग त्या ठिकाणी " हें विश्व आहे व तें मिथ्या आहे " अशी जाणीव उरत नाही.
ऐसा सज्ञान बोलिला । सद्गुरु तो वोळखिला ।
सृष्टि मिथ्या ऐसा केला । निश्र्चितार्थ ॥ १४ ॥
१४) याप्रमाणें ज्ञानी असें म्हणतो कीं, आधीं सद्गुरु शोधावा. त्याला ओळखावा. मग त्याच्या उपदेशानें हें विश्र्व खोटें आहे. असा पक्का अर्थ निश्चित होतो.
श्रोता ऐसें न मनी कदा । आधीक उठिला वेवादा ।
म्हणे कैसा रे गोविंदा । अज्ञन म्हणतोसी ॥ १५ ॥
१५) ज्ञानी माणसाचें हें म्हणणे श्रोत्याला कांहीं पटलें नाही. तो वाद करु लागला. तो म्हणाला कीं, श्रीकृष्णाला तुम्ही अज्ञानी कसें म्हणता?
जीवभूतः सनातनः । ऐसें गीतेचें वचन ।
तयासि तूं अज्ञान । म्हणतोसि कैसा ॥ १६ ॥
१६) " जीवभूतः सनातनः " असें गीतेचे वचन आहे. हें वचन सांगणार्या श्रीकृष्णाला तुम्ही अज्ञानी कसें म्हणता?
ऐसा श्रोता आक्षेप करी । विषाद मानिला अंतरी ।
याचें प्रत्योत्तर चतुरीं । सावध परिसावें ॥ १७ ॥
१७) श्रोत्यानें असा आक्षेप घेतला. तो मनांत दुःखी झाला होता. या प्रश्र्नाचे उत्तर हुशार श्रोत्यांनी सावधपणें ऐकावे.
गीतेस बोलिला गोविंद । त्याचा न कळे तुज भेद ।
म्हणौनियां वेर्थ खेद । वाहातोसी ॥ १८ ॥
१८) गीतेमध्यें श्रीकृष्ण बोलला त्याचा खरा अर्थ तुला कळला नाही. म्हणुन तूं उगाचच दुःख करत आहेस.
श्र्लोक
अश्वथः सर्ववृक्षाणां ॥
माझी विभूति पिंपळ । म्हणौनि बोलिला गोपाळ ।
वृक्ष तोडितां तत्काळ । तुटत आहे ॥ १९ ॥
१९) एके ठिकाणी श्रीकृष्ण सांगतात कीं, " अश्वत्थः सर्व वृक्षानाम् : सर्व वृक्षांमध्यें पिंपळ मी आहे. पण पिंपळ तोडला तर तो तत्काळ तुटतो.
श्र्लोक
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्तयापो न शोषयति मारुतः ॥
दुसरें ठिकाणी श्रीकृष्ण असे सांगतात कीं, याला शस्त्रें तोडू शकत नाहीत, अग्नि जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवूं शकत नाही.
शस्त्रांचेनि तुटेना । अग्निचेनि जळेना ।
उदकामध्यें कालवेना । स्वरुप माझें ॥ २० ॥
२०) श्रीकृष्ण सांगतात कीं, माझें स्वरुप अें आहे कीं, तें शस्त्रानें तुटत नाही, अग्नीनें जळत नाही, व पाण्यानें कालवले जात नाही.
पिंपळ तुटे शस्त्रानें । पिंपळ जळे पावकाने ।
पिंपळ कालवे उदकानें । नाशिवंत ॥ २१ ॥
२१) पण पिंपळ शस्त्रानें तुटतो, अग्नीनें जळतो, व पाण्यांत कालवला जातो. याचा अर्थ पिंपळ नाशवंत आहे.
तुटे जळे बुडे उडे । आता ऐक्य कैसें घडे ।
म्हणोनि हें उजेडे । सद्गुरुमुखें ॥ २२ ॥
२२) पिंपळ तुटतो, जळतो, बुडतो, उडून जातो मग श्रीकृष्णानें दिलेल्या वचनांची एकवाक्यता कशी करावयाची? सद्गुरुच्या मुखानें श्रवण केले म्हणजे अशा वचनांचा समन्वय कसा करावा हे समजते.
इंद्रियाणां मनश्र्चास्मि । कृष्ण म्हणे मन तो मी ।
तरी कां आवरावी उर्मी । चंचळ मनाची ॥ २३ ॥
२३) माणसाचें मन म्हणजे मीच आहे असे श्रीकृष्ण म्हणतो. तर मग मनाच्या चंचल उर्मि आपण कां आवराव्या?
ऐसें कृष्ण कां बोलिला। साधनमार्ग दाखविला ।
खडे मांडूनि सिकविला । वोनामा जेवी ॥ २४ ॥
२४) श्रीकृष्ण असें बोलले कारण त्यांनी साधनामार्ग दाखविला. लहान मुलें खडे घेऊन खेळतात. त्या खड्याच्यांच सहाय्याने आईनें मुलाला अक्षर ओळख करुन दिली. तसेच अज्ञानी माणसाचें मन दृश्य जगांत रमते. त्या जगांतीलच वस्तु घेऊन परमार्थचिंतन कसें करावें. हें विभुतीरुपानीं श्रीकृष्णाने दाखविले.
ऐसा आहे वाक्यभेद । सर्व जाणे तो गोविंद ।
देहबुद्धीचा वेवाद । कामा नये ॥ २५ ॥
२५) श्रीकृष्ण सर्वज्ञ आहेत. ते चुकीचे सांगणार नाहीत. त्यांच्या वचनांतील विरोधाचे कारण हें असें आहे. त्यांच्या वचनांचा समन्वय करण्यास देहबुद्धीनें केलेला वाद उपयोगी पडत नाही.
वेद शास्त्र श्रुति स्मृती । तेथें वाक्यभेद पडती ।
ते सर्वहि निवडती । सद्गुरुचेनि वचनें ॥ २६ ॥
२६) वेद, शास्त्रें, श्रुति, स्मृति यांच्या वचनांत परस्पर विरोध आढळतो. पण सद्गुरुंच्या वचनांनी त्या सर्वांची बरोबर व्यवस्था लावता येते.
वेदशास्त्रांचे भांडण । शस्त्रें तोडी ऐसा कोण ।
हें निवडेना साधुविण । कदा कल्पांतीं ॥ २७ ॥
२७) वेद व शास्त्रे यांच्यामधील भांडण जणूं काय शस्त्रें घेऊन तोंडावे असे नाहे. तें भांडण कोणी मिटवू शकत नाही. कल्पांतापर्यंत प्रयत्न केला तरी साधुपुरुषांखेरीज त्या मतभेदांचा निर्णय करता येणार नाही.
पूर्वपक्ष आणि सिद्धांत । शास्त्रीं बोलिला संकेत ।
याचा होये निश्र्चितार्थ । साधुमुखें ॥ २८ ॥
२८) पूर्वपक्ष आणि सिद्धांत हें शास्त्राचे संकेत आहेत. त्याचा खरा अर्थ साधूंच्या उपदेशाने कळतो.
येरवीं वादाचीं उत्तरें । येकाहूनि येक थोरें ।
बोलों जातां अपारें । वेदशास्त्रीं ॥ २९ ॥
२९) वादविवादामध्यें एकाहून एक वरचढ शंका निघतात. त्यांना एकाहून एक उत्तरें दिली जातात. अशा प्रकारचे पूर्व व उत्तरपक्षांनी वेदशास्त्रें भरलेली आहेत. सर्व सांगता येणें अशक्य आहे.
म्हणोनि वादवेवाद । सांडून कीजे संवाद ।
तेणें होये ब्रह्मानंद । स्वानुभवें ॥ ३० ॥
३०) म्हणून वादविवाद टाळून संवाद साधावा. संवाद केल्यानें आत्मस्वरुपाचा अनुभव येतो व त्यामुळें ब्रह्मानंद प्राप्त होतो.
येके कल्पनेचे पोटीं । होति जाती अनंत सृष्टी ।
तया सृष्टींची गोष्टी । साच केवी ॥ ३१ ॥
३१) मूळ शुद्ध व निर्गुण ब्रह्मस्वरुपामध्यें मी एक आहे तो अनेक व्हावा ही कल्पना आली. मग तिच्यापोटीं अनंत विश्वें होतात व जातात. मुळांत कल्पनेचाच पाया असलेल्या विश्वांना खरेपणा असणें शक्य नाही.
कल्पनेचा केला देव । तेथें जाला दृढ भाव ।
देवालागीं येता खेव । भक्त दुःखें दुःखवला ॥ ३२ ॥
३२) माणसांनी बनविलेला सगुण देव असाच कल्पनेनें बनविलेला असतो. दृढ भाव एखाद्याने अशा देवावर ठेवला. त्या देवाला कांही अपाय झाला तर त्या माणसाला मनापासून दुःख होते.
पाषाणाचा देव केला । येके दिवसीं भंगोन गेला ।
तेणें भक्त दुखवला । रडे पडे आक्रंदे ॥ ३३ ॥
३३) समजा, एकानें दगडाचा देव केला. एके दिवशीं तो देव भंगला, फुटला, किंवा तुटला तर त्यामुळें तो भक्त दुःखी होऊन रडतो, पडतो व आक्रोश करतो.
देव हारपला घरीं । येक देव नेला चोरी ।
येक देवा दुराचारीं । फोडिला बळें ॥ ३४ ॥
३४) असा कल्पनेचा देव कधीं घरीच हरवतो, कधीं चोर घेऊन जातात, तर कधी एखाद्या दुष्टानें तो फोडून टाकला,
येक देव जापाणिला । एक देव उदकीं टाकिला ।
येक देव नेऊन घातला । पायातळीं ॥ ३५ ॥
३५) एखादा देव कोणीं भ्रष्ट करतात, कोणी पाण्यांत टाकतात, कोणी पायदळीं तुडवतात.
काय सांगो तीर्थमहिमा । मोडूनि गेला दुरात्मा ।
थोर सत्व होतें तें मा । काय जालें कळेना ॥ ३६ ॥
३६) कोणी दुष्ट एखादें मोठे तीर्थस्थान सगळें उध्वस्त करतो. मग लोक म्हणतात कीं, या तीर्थाचा महिमा काय सांगावा. या दुष्टानें तें उध्वस्त केलें. स्थान फार जागृत होते पण ते बल कोठें गेले कळत नाही.
देव घडिला सोनारीं । देव वोतिला वोतारीं ।
येक देव घडिला पाथरीं । पाषाणाचा ॥ ३७ ॥
३७) एक देव सोनार तयार करतो. एक देव ओतारी मुशींत ओतून तयार करतो. एक देव पाथरवट दगडापासून तयार करतो.
नर्बदागंडिकातीरीं । देव पडिले लक्षवरी ।
त्यांची संख्या कोण करी । असंख्यात गोटे ॥ ३८ ॥
३८) नर्मदा व गंडकी या नद्यांच्या कांठी लक्षावधि देव पडलेले असतात. ते असंख्य दगडगोटे मोजता येणें शक्य नाही.
चक्रतीर्थीं चक्रांकित । देवा असती असंख्यात ।
नाहीं मनीं निचितार्थ । येक देव ॥ ३९ ॥
३९) चक्रतीर्थामधें चक्राच्या खुणा असलेले असंख्य देव पडलेले आहेत. खरोखर खरा देव एकच आहे असा मनाचा निष्चय कांहीं होत नाही.
बाण तांदळे तांब्रनाणें । स्फटिक देव्हारां पूजणें ।
ऐसे देव कोण जाणे । खरे किं खोटे ॥ ४० ॥
४०) बाण, तांदळे, तांब्याची नाणीं, स्फटिक वगैरेचीं देव म्हणून देव्हार्यांत पूजा करतात. असले देव खरे कीं खोटे, देवच जाणे.
देव रेसिमाचा केला । तो हि तुटोनियां गेला ।
आतां नवा नेम धरिला । मृत्तीकेचा ॥ ४१ ॥
४१) एकानें रेशमाचा देव केला. पण तो तुटुन गेला. मग त्यानें नवा मातेच्या देवाचा नेम धरला.
आमचा देव बहु सत्य । आम्हां आकांतीं पावत ।
पूर्ण करी मनोरथ । सर्वकाळ ॥ ४२ ॥
४२) कांहीं लोक आपला देव फार खरा मानतात. ते म्हणतात अहो तो आम्हांला संकटकाळीं तारतो. नेहमी आमचे मनोरथ पुरें करतो.
आतां याचें सत्व गेलें । प्राप्त होतें तें जालें ।
प्राप्त न वचे पालटिलें । ईश्र्वराचेनी ॥ ४३ ॥
४३) पण आताम त्याचे सत्व गेले. तो शक्तीहिन झालेला आहे. म्हणून आमच्या नशिबांत होतें तें झालें. जें घडणार असतें तें ईश्र्वरालासुद्धा बदलता येत नाही.
धातु पाषाण मृत्तिका । चित्रलेप काष्ठ देखा ।
तेथें देव कैंचा मूर्खा । भ्रांति पडिली ॥ ४४ ॥
४४) या ठिकाणी समर्थ असेम म्हणतात. अरे, मूर्खा, धातु, दगड, माती, चित्र, लाकूड यांत देव कसा असेल? देव आहे असे वाटणें हा केवळ भ्रम आहे.
हे आपुली कल्पना । प्राप्ता ऐसा फळें जाणा ।
परी त्या देवाचिया खुणा । वेगळ्याचि ॥ ४५ ॥
४५) ही सगळी आपली कल्पना आहे. आपल्या प्रारब्धानुसार आपल्याला सुखदुःखे भोगावी लागतात. हें जाणून घ्या. खर्या देवाच्या खुणा कांहीं वेगळ्याच असतात.
म्हणौनि हें मायाभ्रमणें । सृष्टि मिथ्या कोटिगुणें ।
वेद शास्त्रें पुराणें । ऐसींच बोलती ॥ ४६ ॥
४६) म्हणून हा सगळा मायेचा पसारा आहे. मायेनें निर्माण केलेला भ्रम आहे. हें दृश्य विश्व कोटीगुणानें खोटे आहे. वेद, शास्त्रें व पुराणें हेंच सांगतात.
साधुसंत मानुभाव । त्यांचा ऐसाचि अनुभव ।
पंचभूतातीत देव । सृष्टि मिथ्या ॥ ४७ ॥
४७) साधु, संत व थोर अनुभवी महात्मे या सर्वांचा अनुभव असाच आहे. तो अनुभव सांगतो कीं, खरा देव पंचभूतांच्या पलीकडे आहे. आणि दृश्य सृष्टि खोटी आहे.
सृष्टीपूर्वीं सृष्टि चालतां । सृष्टि अवघी संव्हारतां ।
शाश्वत देव तत्वता । आदिअंतीं ॥ ४८ ॥
४८) विश्व निर्माण होण्यापूर्वीं, विश्व चालूं असतांना आणि विश्वाचा संपूर्ण शेवट झाल्यावर शाश्वत देव जसाच्या तसाच असतो. तो आरंभी व शेवटीं कायम राहातो.
ऐसा सर्वांचा निश्र्चयो । येदर्थीं नाहीं संशयो ।
वीतरेक आणि अन्वयो। कल्पनारुप ॥ ४९ ॥
४९) सर्व स्वानुभवी पुरुषांचा असाच निश्चय आहे. याबद्दल त्यांना मुळींच संशय नाही. आन्वय व अतिरेक दोन्ही कल्पनामय आहेत. जिकडे पहावें तिकडे सर्व दृश्य विश्वामध्यें आत्मस्वरुपच भरलेले आहे. अशा पद्धतीनें विचार करणें हा अन्वय होय. तर जें जें दृश्य आहे, तें कल्पनेंत येऊ शकते, मनास भासते, बुद्धीनें ग्रहण होऊं शकतें, तें तें अनात्म असल्यानें त्याचा निरास करुन जें केवलरुपानेम शिल्लक उरतें तें आत्मस्वरुप समजावें, अशा पद्धतीनें विचार करणें हा व्यतिरेक होय.
येके कल्पनेचे पोटीं । बोलजेती अष्ट सृष्टि ।
तया सृष्टीची गोष्टी । सावध ऐका ॥ ५० ॥
५०) कल्पना मुळांत एकच असते. पण तिच्या खटपटीनें आठ सृष्टी जन्म पावतात. त्या सृष्टि सावधपणें ऐका.
येकी कल्पनेची सृष्टी । दुजी शाब्दिक सृष्टी ।
तिजी प्रत्यक्ष सृष्टी । जाणती सर्व ॥ ५१ ॥
५१) एक कल्पनेची सृष्टि, दुसरी शब्दांची सृष्ति, तिसरी प्रत्यक्ष सृष्टि ही सर्वांना माहित आहे.
चौथी चित्रलेपसृष्टी । पांचवी स्वप्न सृष्टी ।
साहावी गंधर्वसृष्टी । ज्वरसृष्टी सातवी ॥ ५२ ॥
५२) चौथी चित्रलेप सृष्टि कागद, कापड, लाकूड, व भिंत यावर रंगांचे लेप लावून केलेली सृष्टी, पांचवी स्वप्नसृष्टी, सहावी गंधर्वसृष्टि, आकाशांत दिसणारे निरनिराळे देखावे, सातवी ज्वरसृष्टि, ताप चढल्यावर होणारा भ्रम.
आठवी दृष्टिबंधन । ऐशा अष्ट सृष्टी जाण ।
यामधें श्रेष्ठ कोण । सत्य मानावी ॥ ५३ ॥
५३) आठवी नजरबंदीपासून दिसणारी सृष्टि. कल्पनेपासून निर्माण होणार्या सृष्टीचे हे आठ प्रकार आहेत. त्यांच्यापैकी कोणती खरी व मोठी मानावी? तर कोणतीच नाही.
म्हणोनि सृष्टी नासिवंत । जाणती संत महंत ।
सगुणीं भजावें निश्र्चित । निश्र्चयालागीं ॥ ५४ ॥
५४) म्हणून ही सृष्टि नाशवंत आहे असे संत व महंत जाणतात. हें जरी खरें तरी खर्या देवाचा निश्चित अनुभव येण्यासाठीं सगुणाचेम भजनपूजन करावें हें मी निश्र्चितपणें सांगतो.
सगुणाचेनि आधारें । निर्गुण पविजे निर्धारें ।
सारासारविचारें । संतसंगें ॥ ५५ ॥
५५) सगुणोपासनेच्या आधारानें निर्गुणापर्यंत पोहोचता येते ही गोष्ट निःसंशय खरी आहे. पण त्या बरोबर सारासार विचार व सत्संग हीं दोन्हीं असली पाहीजेत.
आतां असो हें बहुत । संतसंगें कळे नेमस्त ।
येर्हवीं चित्त दुश्र्चित । संशईं पडे ॥ ५६ ॥
५६) या विषयाचा सविस्तर विचार आतां पुरें. संतसंगती केल्यानें हा विषय निश्र्चितपणें ध्यानांत येतो. एरवी मनांत गोंधळ उडून अनेक संशय निर्माण होतात.
तव शिष्यें आक्षेपिलें । सृष्टी मिथ्या ऐसें कळलें ।
परी हें अवघें नाथिलें । तरी दिसतें कां ॥ ५७ ॥
५७) यावर शिष्याने असा प्रश्र्ण केला कीं, सृष्टी मिथ्या आहे. हे मला कळले. परंतु हें दृश्य विश्व मुळांत नाहींच तर तें दिसते का?
दृश्य प्रत्यक्ष दिसतें । म्हणोन सत्यचि वाटतें ।
यासि काय करावें तें । सांगा स्वामी ॥ ५८ ॥
५८) दृश्य प्रत्यक्ष दिसते म्हणून तें खरें वाटतें. स्वामी याला काय करावें तें आपण सांगा.
याचें प्रत्योत्तर भलें । पुढिले समासीं बोलिलें ।
श्रोतां श्रवण केलें । पाहिजे पुढें ॥ ५९ ॥
५९) याचे उत्तर पुढील समासी सांगितलें आहे. श्रोत्यांनी मात्र तें ऐकलें पाहिजे.
एवं सृष्टी मिथ्या जाण । जाणोनि रक्षावें सगुण ।
ऐसी हे अनुभवाची खूण । अनुभवी जाणती ॥ ६० ॥
६०) याप्रमाणें ही दृश्य सृष्टि खरी नाही हें ध्यानांत ठेवून सगुणाचें रक्षण करावें. सगुणोपासना करावी. अशी ही स्वानुभवाची खूण स्वानुभवी पुरुषच जाणतात.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सृष्टिकथननाम समास सहावा ॥
Samas Sahava Shrusthi Kathan
समास सहावा सृष्टिकथन
Custom Search
No comments:
Post a Comment