Thursday, August 3, 2017

Samas Pachav MayaBrahma Nirupan समास पांचवा मायाब्रह्म निरुपण


Dashak Sahava Samas Pachav MayaBrahma Nirupan 
Samas Pachava MayaBrahma Nirupan. It is in Marathi. Samartha Ramdas is telling us about the Brahma that which is invisable but it is permanent. What we see is not real and permanent and that is called as Maya. The qualities of Maya and Brahma are told in this Samas.
समास पांचवा मायाब्रह्म निरुपण
श्रीराम ॥
श्रोते पुसती ऐसें । माया ब्रह्म तें कैसें ।
श्रोत्यां वक्त्यांच्या मिसें । निरुपण ऐका ॥ १ ॥
१) श्रोत्यांनीं असा प्रश्र्ण विचारला कीं, माया व ब्रह्म हीं कशीं आहेत? श्रोता व वक्ता यांच्या संवादाच्यायोगें त्याचे निरुपण ऐका. 
ब्रह्म निर्गुण निराकार । माया सगुण साकार ।
ब्रह्मासि नाहीं पारावार । मायेसि आहे ॥ २ ॥
२) ब्रह्म हे निर्गुण व निराकार आहे. तर माया सगुण व साकार आहे. ब्रह्म अनंत आहे तर माया परिमितआहे.
ब्रह्म निर्मळ निश्र्चळ । माया चंचळ चपळ ।
ब्रह्म निरोपाधी केवळ । माया उपाधीरुपी ॥ ३ ॥  
३) ब्रह्म निर्मळ व निश्र्चळ तर माया चचंल आहे. ब्रह्म निव्वळ अमर्यादित तर माया ही मर्यादीत आहे.  
माया दिसे ब्रह्म दिसेना । माया भासे ब्रह्म भासेना ।
माया नासे ब्रह्म नासेना । कल्पांतकाळीं ॥ ४ ॥
४) ब्रह्म दिसत नाही. माया मात्र दिसते. ब्रह्म भासत नाही. माया भासते. ब्रह्म कल्पांतीसुद्धा नासत नाही. माया मात्र नासते.  
माया रचे ब्रह्म रचेना । माया खचे ब्रह्म खचेना ।
माया रुचे ब्रह्म रुचेना । अज्ञानासी ॥ ५ ॥
५) ब्रह्म निर्माण होत नाही. तर माया निर्माण होते. ब्रह्म क्षय पावत नाही. माया क्षय पावते. ब्रह्म अज्ञानी जीवाला आवडत नाही. माया मात्र अज्ञानी जीवाला आवडते.  
माया उपजे ब्रह्म उपजेना । माया मरे ब्रह्म मरेना ।
माया धरे ब्रह्म धरेना । धारणेसी ॥ ६ ॥
६) ब्रह्म जन्मत नाही. तर माया जन्मते. ब्रह्म मरत नाही तर माया मरते.  ब्रह्म धारणेंत धरता येत नाहीं. तर माया धारणेंत धरतां येते.  
माया फुटे ब्रह्म फुटेना । माया तुटे ब्रह्म तु्टेना ।
माया विटे ब्रह्म विटेना । अविनाश तें ॥ ७ ॥
७) ब्रह्म फुटत नाही तर माया फुटते. ब्रह्म तुटत नाही तर माया तुटते. ब्रह्म अविनाशी असल्यानें अवीट असते तर माया विनाशी असल्यानें वीटते.
माया विकारी ब्रह्म निर्विकारी । माया सर्व करी ब्रह्म कांहींच न करी ।
माया नाना रुपें धरी । ब्रह्म तें अरुप ॥ ८ ॥
८) ब्रह्म विकारामपासून मुक्त आहे. तर माया विकारयुक्त आहे. ब्रह्म कांहींच करत नाहीं. तर माया सर्व कांहीं करते. ब्रह्म रुपरहित तर माया नाना रुपसहित आहे. माया नाना रुपें धारण करते. 
माया पंचभूतिक अनेक । ब्रह्म तें शाश्र्वत येक ।
मायाब्रह्मांचा विवेक । विवेकी जाणती ॥ ९ ॥
९) ब्रह्म शाश्वत व एकच आहे. तर माया पंचभूतात्मक, अशाश्वत आहे. जे आत्मानात्मविवेकी असतात ते ब्रह्म व माया यांचे खरें स्वरुप जाणतात.  
माया लाहान ब्रह्म थोर । माया असार ब्रह्म सार ।
माया अर्ति पार । ब्रह्मासी नाहीं ॥ १० ॥
१०) ब्रह्म विशाळ तर माया लहान आहे. ब्रह्म सारसर्वस्व तर माया सारहीन आहे. ब्रह्म स्थलातीत आहे तर माया स्थलयुक्त आहे.   
सकळ माया विस्तारली । ब्रह्मस्थिती अछ्यादली ।
परी ते निवडूनि घेतली । साधुजनीं ॥ ११ ॥
११) विश्वामध्यें जिकडे तिकडे माया पसरली आहे. त्यामुळें ब्रह्म झाकले गेले आहे. साधु मायेच्या जंजाळ्यांतून शुद्ध ब्रह्मस्वरुप निवडून घेतात.  
गोंडाळ सांडून नीर घेईजे । नीर सांडूनि क्षीर सेविजे ।
माया सांडूनि अनुभविजे । ब्रह्म तैसे ॥ १२ ॥
१२) पाण्यावर जमलेले शेवाळे बाजूस सारुन खालचे चांगले पाणी घ्यावे. किंवा दूध व पाणी मिसळले असतां त्यांतील पाणी बाजूस सारुन दूध प्यावें. तसेंच माया दूर करुन मिसळलेले शुद्ध ब्रह्माचा अनुभव घ्यावा. 
ब्रह्म आकाशाऐसें निवळ । माया वसुंधरा डहुळ ।
ब्रह्म सूक्ष्म केवळ । माया स्थूळरुपी ॥ १३ ॥
१३) ब्रह्म आकाशासारखें निर्मळ तर माया पृथ्वीसारखी मलीन व गढूळ. ब्रह्म हें सूक्ष्म तर माया स्थूळ आहे. 
ब्रह्म तें अप्रत्यक्ष असे । माया ते प्रत्यक्ष दिसे ।
ब्रह्म तें समचि असे । माया ते विषमरुपी ॥ १४ ॥
१४) ब्रह्म हे अतींद्रिय तर माया इंद्रियगम्य आहे. ब्रह्म सम किंवा सारखें आहे. तर माया विषम किंवा कमी जास्त आहे. 
माया लक्ष ब्रह्म अलक्ष । माया साक्ष ब्रह्म असाक्ष ।
मायेमध्यें दोनि पक्ष । ब्रह्मीं पक्षचि नाहीं ॥ १५ ॥
१५) ब्रह्म ध्यानाचा विषय होत नाही. तर माया ध्यानाचा विषय होऊं शकते. मायेमध्यें पूर्व व उत्तर पक्ष दोन्ही असतात. तर ब्रह्मामध्यें पक्षच नाही.
माया पूर्वपक्ष ब्रह्म सिद्धांत । माया असंत ब्रह्म संत ।
ब्रह्मासि नाहीं करणें हेत । मायेसि आहे ॥ १६ ॥
१६) ब्रह्म हा एकमेव सिद्धांत तर मायेंत अनेक पूर्वपक्ष. ब्रह्म कर्मरहित व माया कर्ममय आहे.  
ब्रह्म अखंड घनदाट । माया पंचभूतिक पोचट ।
ब्रह्म तें निरंतर निघोट । माया ते जुनी जर्जरी ॥ १७ ॥
१७) ब्रह्म अखंड आहे तर माया खंडित आहे. ब्रह्म सगळीकडे भरगच्च आहे. तर माया पंचभूतात्मक पोकळ आहे. ब्रह्म कायमचे पूर्णरुप तर माया जुनाट, कुजकी, नाशवंत आहे. 
माया घडे ब्रह्म घडेना । माया पडे ब्रह्म पडेना ।
माया विघडे ब्रह्म विघडेना । जैसें तैसें ॥ १८ ॥
१८) ब्रह्म घडवले जात नाही. माया घडवली जाते. ब्रह्म पडत नाही, स्थानभ्रष्ट होत नाही. माया पडते स्थानभ्रष्ट होते. ब्रह्म बिघडत नाही. माया बिघडते बाधित होते.  
ब्रह्म असतचि असे । माया निरसितांच निरसे ।
ब्रह्मास कल्पांत नसे । मायेसि आहे ॥ १९ ॥
१९) ब्रह्म नाहीं असे कधींच होत नाही. तर माया निरास केल्यास नाहीशीं होते. ब्रह्माला प्रलय नाही तर माया प्रलयाच्यावेळीं नाश पावणारी आहे.  
माया कठिण ब्रह्म कोमळ । माया अल्प ब्रह्म विशाळ ।
माया नासे सर्वकाळ । ब्रह्मचि असे ॥ २० ॥
२०) ब्रह्म कोमल, मृदु, विशाळ तर माया कठिण, आकुंचित आहे. ब्रह्म सर्वकाल टिकणारे आहे तर माया नाश पावणारी आहे.  
वस्तु नव्हे बोलिजे ऐसी । माया जैसी बोलिजे तैसी ।
काळ पावेना वस्तुसी । मायेसी झडपी ॥ २१ ॥
२१) ब्रह्म वाणीनें वर्णन करुन सांगता येण्यासारखें नाही. तर माया जसें तिचें वर्णन करावें तशी असते. ब्रह्म काळाच्या पलीकडे आहे तर माया काळाचें भक्ष्य आहे.  
नाना रुप नाना रंग । तितुका मायेचा प्रसंग ।
माया भंगे ब्रह्म अभंग । जैसें तैसें ॥ २२ ॥
२२) ब्रह्म अभंग असल्याने मोडत नाही. जसेच्या तसे राहाते. तर माया मोडते. नाना प्रजारची रंगरुपें निर्माण करणें हा मायेचा खेळ आहे.  
आतां असो हा विस्तार । चालत जातें सचराचर ।
तितुकी माया परमेश्र्वर । सबाह्यअभ्यमतरीं ॥ २३ ॥
२३) माया ब्रह्माच्या लक्षणांचा हा विस्तार आतां पुरे. या विश्र्वामधें जेवढें कांहीं सचेतन व अचेतन दिसतें व नाश पावतें, तें सगळे माया होय. या सार्‍या चराचर विश्र्वाचा परमात्मा आंतबाहेर व्यापून आहे. 
सकळ उपाधीवेगळा । तो परमात्मा निराळा ।
जळीं असोनि नातळे जळा । आकाश जैसें ॥ २४ ॥
२४) दृश्य विश्र्वाच्या सगळ्या बंधनांच्या पलीकडे परमात्मा निराळा राहातो. आकाशाचे प्रतिबिंब पाण्यांत पडले तरी आकाश पाण्यापासून अलिप्त असतें. तसाच परमात्मा सर्वांत व्यापलेला असूनअलिप्त राहतो.   
मायाब्रह्माचें विवरण । करितां चुके जन्ममरण । 
संतांस गेलिया शरण । मोक्ष लाभे ॥ २५ ॥
२५) विवेकानें माया व ब्रह्म एकमेकांपासून वेगळे केले तर जन्म मरण चुकते. संतांना शरण गेल्यानें मोक्ष मिळतो. 
अरे या संतांचा महिमा । बोलावया नाहीं सीमा ।
जयांचेनि जगदात्मा । अंतरचि होये ॥ २६ ॥
२६) अहो, या संतांचा महिमा सांगावा तेवढा थोडाच आहे. त्या सांगण्याला सीमा नाही. कारण जगांत व्यापून राहिलेला परमात्मा संतांच्या कृपेनें आपल्या अंतर्यामी प्रगट होतो. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे मायाब्रह्मनिरुपणनाम समास पांचवा ॥  
Samas Pachav  MayaBrahma  Nirupan
समास पांचवा मायाब्रह्म निरुपण


Custom Search

No comments: